मानववंश : विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव, एका मोठ्या होमो या प्रजातीतील एकुलत्या एका जीवविज्ञानीय जातीत मोडतात म्हणून त्यांना होमो सेपियन या गटातील मानतात आणि या होमो सेपियनमधील कित्येक लोकगट, जननिक तत्त्वावर आधारित लक्षणानुसार एकमेकांपासून स्वतंत्र गणले जातात. या जीवविज्ञानीय जात्यांतर्गत छोट्या छोट्या गटांना सर्वसाधारणपणे वंश असे म्हटले जाते. जननिक तत्त्वावर आधारित लक्षणे दोन प्रकारची असतात. एक, एकूण सर्वसाधारण दृग्गोचर लक्षणे (कातडीचा रंग, प्रकार, चेहरा व शरीराची इतर प्रमाणे) व दोन, न दिसणारी, परंतु जैव प्रकारातील लक्षणे (रक्तगट).
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की प्राणिविज्ञानानुसार, वंश म्हणजे जननिक किंवा नैसर्गिक निवडीमुळे इतर लोकगटांपासून स्पष्टपणे उठून दिसणारा निराळा लोकगट किंवा व्यक्तिसमूह होय. म्हणून यानुसार कृत्रिम रीत्या एकत्रितपणे बांधला गेलेला किंवा एखाद्या लोकगटामधून बाजूला काढलेल्या व्यक्तींचा गट किंवा धार्मिक गट किंवा भाषिक गट किंवा राष्ट्रीय गट म्हणजे वंशगट नव्हे.
अमेरिकेतील भौतिक मानवशास्त्रज्ञांनी वंशाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘जेणेकरून वातावरण, जमीन व भौगोलिक परिस्थित्यनुसार स्थानिक लोकगटांमध्ये दिसण्यात, शारीरिक गुणधर्मात व क्रियाशील वर्तनात जो फरक दिसतो, तो दुसरे तिसरे काहीही नसून, ते लोकगट म्हणजे एकाच जातीच्या उपजाती किंवा भौगोलिक वंशप्रकार किंवा नुसते वंश होत.’
वंशाच्या अनेक व्याख्या शास्त्रज्ञांनी मांडल्या. त्यांपैकी वंश संकल्पनेचा सिद्धांत ज्याप्रमाणे बदलत गेला, त्याप्रमाणे व्याख्याही बदलत गेल्या. बदलेल्या तीन व्याख्या पुढे दिल्या आहेत : सेल्टझेरच्या मते वंश म्हणजे. ‘मानवी समूहातील एक मोठा गट असून या समूहातील व्यक्ती एकमेकांसारख्या अगर एकमेकांजवळच्या शारीरिक घटक गुणांचे–लक्षणांचे–संयोजन दर्शविणाऱ्या असतात. या संयोजनामागे आनुवांशिकता महत्त्वाची मानली जाते.’
हूटन या मानवशास्त्रज्ञाने वंशासंबंधी पुढील उद्गार काढले आहेत. तो म्हणतो, ‘मानवी समूहातील एक मोठा गट म्हणजे वंश होय. या गटातील व्यक्ती थोड्याफार फरकाने निराळ्या असल्या, तरी एकाच समूहाने प्रतिनिधीत्व करतात. अशा समूहाचे संयोजन आकृतिक व मानीय लक्षणांनी केले जाते. अशी लक्षणे असंघायी असून वंशपरंपरेने चालत आलेली असतात.’ तर डब्ल्यू. सी. बॉइड याने वंशाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘एका किंवा अनेक जीनमुळे एका व्यक्तिसमूहाचे दुसऱ्या व्यक्तिसमूहापासून जे वेगळेपण दृष्टीप्तत्तीस येते, त्यामुळे एकमेकांपासून वेगळ्या असलेल्या व्यक्ति समूहास वंश असे म्हणता येईल.’
या वर दिलेल्या व्याख्या, त्यांचे स्वरूप, त्यांचा गर्भितार्थ लक्षात घेण्यासाठी त्या ज्या संकल्पनांवर आधारलेल्या आहेत, त्या संकल्पनांचा विचार करणे याठिकाणी सर्वप्रथम उचित ठरेल. यास्तव वंश ही संकल्पना काय होती व ती कालानुसार कसकशी बदलत गेली. याचा त्रोटक आढावा या ठिकाणी घेतला आहे.
मानववंश-संकल्पना : गेल्या कित्येक वर्षांपर्यंत भौतिकी अथवा शारीरिक मानवशास्त्रात, वंश संकल्पनेचा विचार, मानवामानवांतील विविधता समजण्यासाठी आणि त्या विविधेच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी एक उपयुक्त व निश्चित साधन म्हणून केला जात होता. परंतु अगदी अलीकडच्या काळामध्ये वंश ही संकल्पना कुचकामी आणि तकलादू मानली जाऊ लागली कारण भौगलिक दृष्ट्या स्वतंत्र मानल्या गेलेल्या निरनिराळ्या वंशांतील महदंतर निश्चितपणे समजून येत नाही, उलट सध्या अस्तित्वात असलेल्या कित्येक मानवी गटांचे, वंश वर्गीकरणाच्या उपलब्ध असलेल्या निकषांच्या आधारे, वर्गीकरणही व्यवस्थित करता येत नाही. तसेच एखाद्या लक्षणाच्या आधारे एखाद्या गटाचे वंश वर्णन तसेच करता येईल, ही खात्री देता येत नाही. यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले वंश वर्गीकरण म्हणजे कित्येक वेळेला स्थानिक लोकगटांचे शतकानुशतके चालत आलेले सामाजिक वर्गीकरण असते. असा अनेक कारणांमुळे वंश संकल्पनेवर टीका होऊ लागली. समीक्षकांच्या मते तर ही संकल्पना संशोधनासाठी अजिबात उपयुक्त नाही. यामुळे मानवामानवांतील विविधता समजण्यासाठी उलट आडकाठी येते. इतकेच नव्हे, तर त्यामुळे समाजावर दूरगामी दुष्परिणाम होण्याचेच अधिक संभवते.
वंश संकल्पनेला सर्वप्रथम आव्हान, १९४२ मध्ये ॲश्ली माँटग्यू याच्या मॅन्स मोस्ट डेंजरस मीथ : द फॅलिसी ऑफ रेस या ग्रंथाने केले. १९६० पर्यंत माँटग्यू ह्या फोल संकल्पनेविरूद्ध एकाकी लढत होता कारण या काळात वंश संकल्पनेच्या विश्लेषणावर अनेक निबंध प्रसिद्ध होत होते परंतु प्रत्यक्षात माँटग्यूला कुणी साथ देत नव्हते. माँटग्यूच्या मताशी अप्रत्यक्ष सहमत असणाऱ्यांनीही १९७० पर्यंत त्याचा फारसा पाठपुरावा केला नाही. परंतु १९७० च्या आसपास मात्र विविध क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये ह्या नवीन (म्हणजे फोल) संकल्पनेसंबंधीचे चित्र एकदम पालटून गेले आणि वंश संकल्पनेच्या फोलपणाची ही दुसरी बाजूही विचारात घेतली जाऊ लागली.
हा वैचारिक बदल अनेक कारणानी उपयुक्त ठरला. भौतिकी मानवशास्त्र शास्त्रशुद्ध व पारखून घेतलेले मतच प्रमाणभूत धरते, हे त्याचे पहिले व महत्त्वाचे कारण होय. त्याशिवाय मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेली क्रमिक पुस्तके लोकमतावर खूप मोठा प्रभाव पाडतात. यामध्ये शिक्षक, त्यांचे विद्यार्थी आणि परिणामी समाज अंतर्भूत होतो. साहजिकच जुनाट कल्पना मागे पडतात. विशेषतः राजकीय क्षेत्रावरही याचा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. या कारणांमुळे वंश संकल्पनेत क्रांती घडवून आणणारे बदल महत्त्वाचे मानले पाहिजेत.
शास्त्रीय दृष्ट्या वंश संकल्पनेचा विचार तीन निरनिराळ्या कालखंडात केला गेला. त्यांपैकी पहिल्या कालखंडामध्ये वंशोप्तत्तीसंबंधी विचार केला गेला. वंश जरी निरनिराळे दिसत असले, तरी त्यांचा उगम एकच आहे की अनेक? हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला व अनेक जननिक उगमाच्या विचाराला मान्यता मिळून त्यातून वांशिक उच्चनीचतेचा उगम झाला. हा सर्व भाग एकोणिसाव्या शतकापर्यंत येतो. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या कालखंडामध्ये वांशिक भेदाभेव व एक जननिक विरुद्ध अनेक जननिक असे वाद सुरू झाले व या पार्श्वभूमीवर असमानतेच्या मुद्याला धरून असणाऱ्या लोकमताला, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आव्हान देण्यास सुरुवात झाली. या शास्त्रीय चर्चेचे पडसाद सामाजिक जीवनावर घेऊन, ‘प्रत्येक वंश आपापल्या परीने श्रेष्ठच आहे’, या मताची धारणा झाली. विसाव्या शतकाच्या मध्यास वंश संकल्पनेच्या मूळ कल्पनेलाच आव्हान दिले गेले आणि होमो सेपियनचे (म्हणजे मानवाचे) असे वंश असू शकतात काय? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले. याला ज्यांनी होकारार्थी उत्तर दिले, त्यांना फुटीर व अशास्त्रीय मानण्यात येऊ लागले यांपैकी कून, गार्न, बर्डसेल व डोबझान्स्की हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ होत आणि याला ज्यांनी नकारार्थी उत्तर दिले व ‘वंश संकल्पना ही शास्त्रशुद्ध नाही’, असा विचार प्रगट केला, त्यांना प्रगत समजण्यात येऊ लागले.
शा तऱ्हेचे साधकबाधक विचार १९७० पर्यंतच्या काळात मांडले गेले विविध क्रमिक वा इतर ग्रंथांद्वारे त्याचे प्रसरण झाले. १९७५ ते १९७९ च्या सुमारास ह्या प्रगत विचाराला खूपच प्रमाणात मान्यता मिळाली. हा सर्व भाग या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो.
अशा तऱ्हेचे साधकबाधक विचार १९७० पर्यंतच्या काळात मांडले गेले विविध क्रमिक वा इतर ग्रंथांद्वारे त्याचे प्रसरण झाले. १९७५ ते १९७९ च्या सुमारास ह्या प्रगत विचाराला खूपच प्रमाणात मान्यता मिळाली. हा सर्व भाग या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो.
ही वंश संकल्पनेची अत्याधुनिक बाजू झाली. याबरोबरच वंश संकल्पनेची पहिली बाजू काय होती, तीही पहाणे उद्बोधक ठरेल.
प्राचीन व आधुनिक यूरोप आणि आशिया खंडांतील निरनिराळ्या देशांमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणावर विषमता होती. त्याची कारणे मुख्यत्वे जाती-जातीतील वैषम्य अगर उच्चनीच सामाजिक गटांतील सलोख्याचा अभाव, अशा स्वरूपाची होती. भारतातील जाती-जातीतील वैषम्य, धार्मिकतेच्या नावाखाली आढळून येणारी असमानता इत्यादी कारणांमुळे संघर्ष झाले. परंतु ‘वंशभेद’ असा प्रकार पूर्वी विरळच होता. पूर्वी ज्या काही लढाया झाल्या वा एकमेकाविरूद्ध बलाबल वापरले गेले, याचे उद्दिष्ट नवीन प्रदेश बळकावणे व त्याद्वारा आपले प्राबल्य वाढविणे इतपत मर्यादित होते. राष्ट्राच्या वा धर्माच्या प्रेमाखातर हौतात्म्य पतकरल्याची अनेक उदाहरणे आहेत. राज्यकर्त्यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून त्यांच्याविरुद्ध उठाव केल्याचीही उदाहरणे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीतही वंशभेदाऐवजी जुलमी राज्यकर्ते व तथाकथित उच्च सामाजिक गटांविरुद्ध उठाव केलेला दिसतो. परंतु वरीलपैकी अगर वरील उदाहरणांसारख्या इतर प्रकारांमध्ये वंशाच्या उच्चनीचतेमुळे अगर शारीरिक गुणधर्माच्या विषमतेमुळे झगडे झालेले दिसत नाहीत. वंश संकल्पनेचा विचार तसा हीन व कमीपणाचा मानला जात होता. मग या वंशाची कल्पना उदयाला आली कशी ?
‘आर्य वंशीय’ या संज्ञेचा प्रथमोच्चार सुप्रसिद्ध जर्मन भाषाभ्यासक माक्स म्यूलर यांनी केला. त्यातील विनाशात्मक अर्थ लक्षात आल्यानंतर सारवासारव करताना त्यांनी या उक्तीचा वापर सर्रास करू नये, असा सल्ला दिली. ‘वास्तविक, आर्य काही वंश नव्हे, ती एक भाषा आहे व ती भाषा वापरणारा जो गट तो आर्य वंशीय’, असा आपल्या म्हणण्याचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण माक्स म्यूलर यांनी दिले. त्यातील सद्हेतू लक्षात न घेता फक्त विनाशकारी अर्थच तेवढा करण्यात आला. ॲश्ली माँटग्यू यांच्या मते ‘ती एक ठळक दुर्दैवी घटना होय’.
ॲश्ली माँटग्यू यांच्या मते ‘ज्यावेळी अमानवी कारवायांविरुद्ध चळवळी सुरु झाल्या, त्याचवेळी उच्च आणि नीच वंशाचा उगम झाला असावा.’ असहाय्य परिस्थितीतील लोकांना यूरोपातील अनेक व्यापाऱ्यांनी गुलामासारखी वागणूक देऊन आपले इप्सित साध्य करून घेण्यात अमानुष कृतींचा अवलंब केला. या अन्यायाविरुद्ध ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरु झाल्या, त्यावेळी ‘निसर्गानेच तुम्हाला नीच बनविले, त्यात आमचा काय दोष?’ अशा प्रकारचा सोयीस्कर युक्तिवाद सुरू झाला. नीचतेची लक्षणे काय? तर काळा रंग, दारिद्र्य व त्या मागोमाग येणारे अज्ञान इत्यादी. परंतु हाही युक्तिवाद जेव्हा लंगडा पडू लागला तेव्हा शारीरिक गुणावगुणांची उदाहरणे देण्यात येऊ लागली. गोरे लोक रंगाने गोरेपान, उंच, सरळ व लांबसडक नाकाचे, निळ्याभोर डोळ्याचे वगैरे लक्षणांचे असून निर्गो म्हणजे काळ्या रंगाचे, खुजे व काळ्याभोर डोळ्यांचे, बसक्या–रुंद व आखूड नाकाचे असे मानले गेले. या फरकांमुळे गोरे लोक म्हणजे उच्चवंशीय व बुद्धिमान मानले जाऊन निग्रो लोक नीच वंशीय व मंदबुद्धीचे मानले जाऊ लागले. या युक्तिवादाला समर्थपणे उत्तरे न देता आल्याने काहींनी हा युक्तिवाद मानलाही व म्हणून काही काळ गुलामी पत्करली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, ग्रेगोर मेंडलच्या आनुवंशिकता शास्त्रातील मूलभूत संशोधनामुळे, शारीरिक गुणधर्म आनुवांशिकता व वातावरणाचा परिणाम या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात, हे सिद्ध झाले व परत एकदा वंशभेदाविरूद्धच्या चळवळींना जोर आला. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हे चित्र बऱ्याच प्रमाणात पालटत गेले.
इंग्रजी भाषेत ‘वंश’ याला रेस असा शब्द रूढ आहे परंतु ‘रेस’ हा शब्द प्रत्यक्षात कधी व कसा वापरात आला, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. अरबी भाषेतील रॅस (RAS) या शब्दापासून रेस हा शब्द आला असावा, असा एक विचारप्रवाह आढळतो. अरबी भाषेत ‘रॅस’या शब्दाचा अर्थ शीर्ष वा सुरुवात असा होतो. अरबी भाषेत एकदा हा शब्द रूढ झाल्यानंतर स्पॅनिश, इटालियन व इतर भाषांमध्ये तो रूढ झाला असावा. निरनिराळ्या वंशांची सुरुवात व उगम निरनिराळा–एकजननिक, अनेकजननिक असला पाहिजे, ही कल्पना या शब्दामागोमाग आली. निराळा उगम मानल्यानंतर ‘उच्च’ वा ‘नीच’ अशी विशेषणेही त्या मागोमाग आली. अशा तऱ्हेने आलेल्या ‘वंश’ या उक्तीची व्याख्या, त्याचे स्वरूप, वंशासंबंधीचे शास्त्रीय निकष, त्या निकषांवर आधारित जागातिक व भारतीय वंश वर्गीकरणे इत्यादींचा विचार पुढील विवेचनात मांडला आहे.
वंश संकल्पनेचा सिद्धांस : वॉडिंग्टन याने ॲन इन्ट्रोडक्शन टू मॉडर्न जेनेटिक्स या पुस्तकात वंश संकल्पनेविषयी विचार मांडला. तो असा, ‘फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळणारे सर्व गुणधर्म ग्राह्य धरून, त्या आधारे वंशाची व्याख्या केल्यास, असा प्रयत्न संपूर्णपणे अयशस्वी ठरेल कारण मानवी लोकसंख्येच्या सर्व थरांत विभक्तीकरण व पुनःसंयोजन इतके पराकोटीचे आहे की त्या सर्वांच्या आधारे एकाच व्यक्तीची वंशप्रकृती थोडक्यात सांगणे केवळ अशक्य आहे.’ वंश संकल्पनेत, वंश प्रकृतीच्या विभिन्नतेची टाळता न येणारी अशी काही उत्तरांगे आहेत. वंश संकल्पनेचा सिद्धांत कोण्या एकाच व्यक्तीस लागू न करता, तो व्यक्तिसमूहास लागू केला जातो व व्यक्तिसमूहाच्या वंश प्रकृतींचे संख्यात्मक विश्लेषण अनेक गुणर्धामांच्या आधारे केल्यासच वंश संकल्पनेचा सिद्धांत मांडता येतो म्हणून वंश संकल्पनेचा सिद्धांत तुलनात्मक व सापेक्ष आहे. एका व्यक्तिसमूहामध्ये आढळणाऱ्या गुणमधर्माची तुलना दुसऱ्या व्यक्तिसमूहाबरोबर केली जाते.
थोडक्यात वंश संकल्पनेचा सिद्धांत मांडताना जास्तीतजास्त गुणधर्म (शारीरिक लक्षणांची परीक्षा) जास्तीतजास्त लोकसंख्येच्या संदर्भात तपासले पाहिजेत. सापेक्षतेच्या दृष्टीकोनातून संशोधकाची भूमिका महत्त्वाची ठरते. किती गुणधर्मांची–लक्षणांची–तपासणी किती लोकसंख्येमध्ये तपासावयाची हा भाग व्यक्तिसापेक्ष आहे.
डोबझान्स्की व एप्लीन यांनी या संदर्भात पुढीलप्रमाणे भाष्य केलेले आढळते : ‘वंश म्हणजे कोणी एक व्यक्ती अगर कोणतीही एकच वंशप्रकृती नव्हे. वंश असा एक व्यक्तिसमूह, की ज्यामध्ये निरनिराळ्या वंशप्रकृतीचा अंतर्भाव होतो. तसेच जनुकांची किंवा गुणसूत्रांची व्यक्तिसमूहामधील समानता व त्यामुळे तयार होणारी संरचना असाही वंशाचा अर्थ नव्हे.’ प्रत्येक पेशीमध्ये अनेक प्रकारच्या जनुकांची व गुणसूत्रांची रचना असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जीनमध्ये व गुणसूत्रामध्ये संयोजनाचीही क्षमता असते. या नियमानुसार वांशिक वर्गीकरण हाताळावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, कोणत्याही एकाच–जुनकाच्या संदर्भात एखादी व्यक्ती ‘अ’ वंशाची ठरेल, तर दुसऱ्या जुनकाच्या संदर्भात तीच व्यक्ती ‘ब’ वंशाची तर आणखीही तिसऱ्या जुनकाच्या संदर्भात ‘क’ वंशाचीही ठरेल म्हणजेच प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र वंशच ठरेल. परंतु हा निकष वंश संकल्पनेत बसत नाही. वंश संकल्पना व्यक्तिसमूहास लागू केली पाहिजे. व्यक्तीस नव्हे. म्हणून प्रत्येक व्यक्तिसमूह म्हणजे वंश होईल व अशा व्यक्तिसमूहांचे समूह म्हणजे जाती होतील.
व्यक्तिसमूहाचा वंश म्हणून उल्लेख करताना, शारीरिक लक्षणांचा, जुनक व गुणसूत्रांचा आधार घेतला जातो. यात व्यक्तिसमूहाशी निगडित अशा संस्कृतीचा कोणी फारसा अंतर्भाव करीत नाही. ॲश्ली माँटग्यू याने वंशाविषयीचे विचार मांडताना शारीरिक गुणधर्मांबरोबर संस्कृती गुणधर्मांचाही समावेश करावा असे सुचविले आहे. तसेच अशा गटास ‘वंश’न म्हणता‘वंशिक गट’ म्हणावे असे सुचविले. म्हणून लोकसंख्येच्या अनेक व्यक्तिसमूहांपैकी एक व्यक्तिसमूह म्हणजे वंशिक गट होय. हा गट एकाच जातीचे प्रतिनिधित्व करतो. असा व्यक्तिसमूह सामाजिक, भौगोलिक व तत्सम अलगीकरणाच्या यंत्रणेनुसार शारीरिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिकवून असतो.
वंश स्थापना किंवा वंश विभिन्नत्व या दोन्ही कल्पना, वैयक्तिक रीत्या किंवा एकत्रितपणे, म्हणजे डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतितत्त्वाचाच एक भाग होत. असे मत बहुतेक प्राणिवैज्ञानिकांनी पुरस्कारलेले आहे. स्थूलमानाने वंशा-वंशातील फरक दोन पातळ्यांवर पाहिले जातात. एक म्हणजे सर्वसाधारण व चटकन दृष्टीस दिसणारे फरक. उदा., पोषाख, हावभाव, एंकदर वर्तणूक, रोटी–बेटी व्यवहार वगैरे. दुसरे म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातील फरक. उदा., आनुवंशिकी फरक, दातांचे आकार व प्रकार, हाडांची घनता, चेहरा, कवटी व तत्सम भागांचे संघटन इत्यादी.
आनुवंशिकताविज्ञानाच्या प्रगतीमुळे वंश संकल्पनेवर नवीनच प्रकाश पडला. सर्वसाधारणपणे वांशिक गट एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत्यनुसार ठरविला जातो. भौगोलिक सीमा यामुळे महत्त्वाच्या ठरतात परंतु निसर्गतः असे उप्तन्न झालेले वंशगट, जननिक गटांसारखे असणार नाहीत. यामुळे एकाच भौगोलिक परिस्थितीत रहाणारे दोन लोकगट दोन निरनिराळ्या वंशांचे असू शकतील. पुनरुत्पादनासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींमुळे गटाचा एकसंघ टिकून असतो म्हणून जरी भौगोलिक सीमा एकच असल्या, तरी त्या सीमांतर्गत पुनरुपादनाच्या अलगीकरणामुळे वंशगट एकच असेल असे नाही. त्यामुळे भौगोलिक सीमांनुसार आधारित वंश प्रकारांत, अनेक स्थानिक वंश प्रकार आढळतात. अशा छोट्या स्थानिक वांशिक गटांत रोटी-बेटी व्यवहारास परवानगी असते मात्र भौगोलिक वंशात अशा प्रकारे रोटी-बेटी व्यवहार आढळणार नाहीत. यामुळे जगात सर्वसाधारणपणे स्थानिक वांशिक गट जननिक दृष्ट्या पुनरुपादनासाठी व सांस्कृतिक दृष्ट्या अलगीकरणास उपयुक्त ठरतो.
पिढ्यान्पिढ्या एकाच भौगोलिक वातावरणात रहात असलेल्या वंशाच्या लोकांत येणाऱ्या आनुवंशिकी लक्षणांचा व नैसर्गिक वातावरणाचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे अतिउष्ण प्रदेशातील उष्णता सहन करण्याची ताकद अगर कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षणता त्या त्या विशिष्ट वंशगटात भिन्न भिन्न असते. मात्र या घनिष्ट संबंधाचा सांस्कृतिक वर्तणुकीशी फारसा संबंध दिसत नाही, म्हणून एकाच वंशातील लोक जरी एकाच वातावरणात राहत असले, तरी मुलांच्या वाढीशी संबंधित असणाऱ्या वर्तुणुकीत फरक दिसतो मात्र आनुवंशिकी लक्षणांमध्ये, ज्याचे अस्तित्व जनुकामुळेच केवळ शक्य आहे, तेवढीच लक्षणे येतात. ज्या गोष्टी सहजासहजी पाहून, निरखून शिकता येतात अशी लक्षणे या संबंधात नाहीत. उदा., भाषा, रुढी, प्रथा, सामाजिक गोष्टी अगर वैयक्तिक वर्तणूक वगैरे. ही लक्षणे वंशगट जरी एकच असला, तरी व्यक्तिपरत्वे बदलू शकतात.
वरील सर्व प्रकारच्या शक्याशक्यतेच्या चर्चेमुळे वंशाची व्याख्या करण्यासाठी अगर वंशाचे स्वरूप ठरविण्यासाठी निकष ठरविण्याची निकड भासू लागली व त्यासाठी खूप प्रयत्न झाले. सध्या उपलब्ध असलेल्या निकषांचे सोयीच्या दृष्टीने दोन गटांत वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे जुने म्हणून गणलेले वंश निकष व दुसरे म्हणजे नवीन निकष. साधारणपणे जुने व नवे यांची सांगड आनुवंशिकीच्या प्रगतीपूर्वीच्या व नंतरच्या निकषांनी घातली जाते. जुन्या मानल्या गेलेल्या निकषांमध्ये रंग (कातडीचा, डोळ्याचा, केसांचा वगैरे), केसांचा प्रकार, मानवमितीची काही मोजमापे, डोळे, नाक, ओठ या बाबतची अवलोकने इत्यादींचा समावेश होतो. नवीन निकष रक्तगट व त्यावर अवलंबून असणारी प्रकृती अगर विकृती याच्यांशी निगडित आहेत. यामुळे ए. ओ. बी. ऐबी या रक्तगटांची विशिष्ट वंशातील टक्केवारी विचारात घेतली जाते. तसेच इतरही रक्तगट व त्यांचे शरीरातील प्रमाण व त्यांचा परिणाम इ. गोष्टीही विचारात घेतल्या जातात. या नवीन निकषांमुळे वंशगटांच्या अभ्यास-पद्धतीही बदलल्या. प्रयोगशाळेत निकष पडताळून घेतले जाऊ लागले. यामुळे मिश्रवंश समजणे सोपे गेले, तर मिश्रवंशात किती प्रमाणात मिश्रण आहे, तेही ठरविता येते. केवळ रक्तगटांचाच नव्हे तर रक्तरुग्णांचाही अभ्यास करण्यात येऊ लागला व त्यामुळे विकृतीवस्थांची माहिती व त्यांची आनुवंशिकता समजून येऊ लागली. अशा अवस्था वंशप्रकार समजण्यास सोयीस्कर ठरतात. या पार्श्वभूमीवर विसाव्या शतकाच्या मध्यास यूनेस्कोने शास्त्रज्ञांची एक परिषद १९५१ मध्ये बोलावली व त्यांच्या निवेदनाद्वारे परिषदेचे निष्कर्ष प्रसिद्ध केले.
यूनेस्कोचे निवेदन वंशासंबंधीच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर चर्चा करून वंशाचे स्वरूप काय असावे? व वांशिक भेदाभेद कोणकोणत्या तत्त्वानुसार प्रमाण मानावयाचे? हे ठरविण्यासाठी भौतिकी मानवशास्त्रज्ञांची व आनुवंशिकीविज्ञांची एक बैठक झाली. त्यांनी जे एक सविस्तर निवेदन वंशांबाबत तयार केले, ते प्रमाण मानण्यात येऊ लागले. त्यातील महत्त्वाचे व ठळक मुद्दे असे :
(१) सध्या हयात असेलेले सर्व मानव होमो सेपियन या एकाच जातीचे असून सर्वजण समाईक साठ्यामधून निर्माण झाले आहेत मात्र समाईक साठ्यातून ते कधी व कसे वेगळे होत गेले याबाबत दुमत आहे.
(२) गटागटांतील काही शारीरिक विषमता आनुवंशिकी संरचनेमुळे व काही वातावरणाच्या परिणामामुळे दिसून येते.
(३) राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक गटांचा वंशगटांशी तसा काहीहा संबंध नाही. निदान सांस्कृतिक लक्षणांचा असा संबंध दाखविणारा एकही दाखला देता येत नाही.
(४) निरनिराळ्या भौतिकी मानवशास्त्रज्ञांनी वंशवर्गीकरणाचे प्रयत्न केले आहेत. मुख्यतः तीन वंशगट असले पाहिजेत, असे सर्वांनुमते ठरले. ते तीन गट म्हणजे कॉकेसॉईड, निग्रॉईड व मंगोलॉईड होत.
(५) मानसिक लक्षणांचा वापर वंशवर्गीकरणासाठी होऊ शकत नाही, असे सर्व मानवशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. बुद्धिगुणांक व व्यक्तीची प्रकृती यासाठी प्रत्येकाच्या ठायी असणारी क्षमता व वातावरणाचा परिणाम याच महत्त्वाच्या गोष्टी ठरतात हे एकाच वंशातील व्यक्तींचा अभ्यास करून दाखवून देण्यात आले आहे.
(६) आनुवंशिकी तत्त्वानुसार चालत आलेल्या गुणांमधील विषमतेचा, सांस्कृतिक विषमतेशी एक महत्त्वाचा घटक म्हणून काही संबंध नाही.
(७) शुद्ध वंश म्हणावा असा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झाला नाही.
(८) मानवी एकतेच्या दृष्टीकोनातून असे सुचविले जाते, की जन्मतःच सर्वजण समान असतात. नंतर जी असमानता वाढत जाते, त्यासाठी उपलब्ध संधी, सामाजिक बंधने, कायद्याची बंधने इ. गोष्टी जबाबदार असतात.
यूनेस्कोच्या निवेदनावरून ज्या गोष्टींची उकल होते, त्या म्हणजे (१) प्राणिसृष्टीतील मानवाचे स्थान, (२) वंश वर्गीकरण व त्याची लक्षणे, (३) वंश संभवन, (४) वंश मिश्रण, (५) वंशवाद, (६) शुद्ध वा अशुद्ध वंश, (७) वंश व मानसिक धारणा, (८) वंश व संस्कृती, (९) वंश व एकता, (१०) वंश व आनुवंशिकी तत्त्व, (११) वंश व रक्तगट इत्यादी. यांपैकी सर्वच गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणे अशक्य आहे. वरील गोष्टींपैकी प्रणिसृष्टीतील मानवाचे स्थान याचा विचार मानवाच्या उत्क्रांतीत येतो. तसेच उत्क्रांतीविषयक संज्ञा वा संकल्पना या संदर्भात आलेल्या विचारांच्या आधारे वंश समावास स्पष्ट होऊ शकतो. या ठिकाणी फक्त दोनच गोष्टींचा स्थूलपणे विचार करू : (१) वंश वर्गीकरणासंबंधीचे निकष व (२) वंश वर्गीकरण–(अ) जागतिक वंश वर्गीकरण व (ब) भारतातील वंश वर्गीकरण.
वंश वर्गीकरणासंबंधीचे निकष : वंश वर्गीकरणाच्या निकषासंबंधी अभ्यास करताना तो कसा व कितपत करावा? कोणते निकष वापरावेत? कोणते वापरू नयेत? इत्यादीसंबंधी काही जागतिक संकेत ठरले आहेत.
ज्या शरीर गुणधर्मावर वातावरणाचा परिणाम होतो अगर होण्याची शक्यता आहे (उदा., थंडी किंवा उष्णता यांचा परिणाम, हवेतील दमटपणा अगर कोरड्या हवेचा परिणाम वगैरे अगर जो एखादा शरीरावयव कार्यात्मक काम करतो, असा अवयव उदा., शरीर तोलण्यासाठी होणारा पायांचा उपयोग अगर हाताळण्यासाठी हातांचा उपयोग इत्यादी अगर सांस्कृतिक सवयी वा नियम. उदा., अन्न तयार करण्याच्या पद्धती, निषिद्ध गोष्टी इ.). ह्या स्रव गोष्टी वंश वर्गीकरणाच्या निकषात येत नाहीत. असे गुणधर्म निवडाताना आनुवंशिकता व अनुयोजना या तत्त्वांचा वापर करण्यात यावा. कोणताही वंश केवळ एकाच गुणधर्मावर आधारित असू नये. त्याचप्रमाणे अनेक गुणधर्मांची कसोटी एकाच व्यक्तीच्या बाबतीत लावली जाऊ नये. तर अनेक गुणधर्मांची परीक्षा मोठ्या संख्येने लोकसंख्येनुसार परीक्षावी. कित्येक वेळा शारीरिक गुणधर्म, वय व लिंग यांनुसार बदलत असल्याने तुलनेसाठी अगर परीक्षेसाठी शक्यतो एकाच वयाच्या आणि एकाच लिंगाच्या व्यक्तींची निवड करण्यात यावी. जुनकाच्या अस्तित्वामुळे काय काय बदल घडू शकतात. ते गोचर होतात. वंशप्रकृतिकारक लक्षणांची निवड वंश वर्गीकरणासाठी केली पाहिजे, हे जरी खरे असले, तरी प्रत्यक्षात दृश्यरुप लक्षणांचीच निवड केलेली आढळते. अशी दृश्यरुप लक्षणांच्या निवडीमागे ऐतिहासिक कारण महत्त्वाचे आहे. ज्यावेळी वंश वर्गीकरण केले गेले, त्यावेळी दृश्यरुप लक्षणांची आनुवंशिकता व अनुयोजना गृहीत धरण्यात आली, या गृहीतामागचे कारण म्हणजे त्यावेळी आनुवंशिकताशास्त्र अस्तित्वात नव्हते हे होय. आनुवंशिकताशास्त्राच्या प्रगतीनुसार मात्र दृश्यरुप लक्षणे पूर्णतः तशी नसतात असे आढळून आले. परंतु एकदा प्रमाण मानल्या गेलेल्या लक्षणांमध्ये फरक झाला नाही. वंश संकल्पनेचा सिद्धांत जुना व पुराणमतवादी काहीसा अशास्त्रीय मानला जातो. त्याचे वरील कारण महत्त्वाचे होय. दुसरे कारण असे की, वंश प्रकृतिकारक लक्षणे चटकन लक्षात येत नाहीत. कित्येक वेळा त्यासाठी रासायनिक चिकित्सा करावी लागते. ही कृती अवघड असल्यानेही दृश्यरुप लक्षणांची निवड केलेली दिसते. अशा तऱ्हेने जी लक्षणे वंश वर्गीकरणासाठी प्रमाण मानली गेली, त्याची त्रोटक माहिती पुढील प्रमाणे :
(१) कवटीचा घुमट : यामध्ये (अ) कवटीची धारणक्षमता (ब) लांबी, रुंदी व त्यावर आधारित निर्देशांक: (क) कवटीच्या घुमटाची उंची (ड) कपोलास्थीचा उतार व रुंदी (इ) कवटीच्या हाडांची जाडी (ई) बृहद्रंध्राची ठेवण व (उ) अधिनेत्रक कंगोरे यांचा समावेश होतो.
वरील सर्व गुणधर्मांचा विचार, मस्तकमिती व मस्तकसामुद्रिक या मानवमितीच्या तंत्रानुसार केला जातो, तो असा :
(अ) कवटीची धारणक्षमता : बृहद्रंध्रावाटे मोहोरीचे बी आत ओतून त्याचे आकारमान मोजमापकाच्या सहाय्याने काढले जाते. हीच कवटीची धारणक्षमता होय. साहजिकच प्राचीन मानवाची वा मृतमानवाची धारणक्षमता या पद्धतीने मोजता येते. सर्वसाधारण शरीरयष्टीच्या पुरुषाची शारीरिक क्षमता १,३२५ घ. सेंमी., तर स्त्रीची क्षमता १,१७५ घ. सेमी. असते. वंश, वय, लिंग याप्रमाणे कवटीची क्षमता बदलत असली, तरी एकाच वंशांच्या, लिंगाच्या आणि वयाच्या व्यक्तीची क्षमता फारच थोड्या प्रमाणात बदलत असते. सर्व वंशांचा एकमित्र विचार केल्यास आधुनिक मानवाच्या कवटीची धारणक्षमता ७९० ते २,३५० घ. सेंमी. इतक्या प्रमाणात असते. धारणक्षमतेचा संबंध मानवाची उंची व त्याची शरीरयष्टी यांच्याशी लावतात आणि अंदाज बांधतात. तसेच धारणक्षमता मेंदूच्या आकाराशी निगडित आहे. परंतु यावरून मेंदूचा आकार व नंतर बुद्धिगुणांक काढणे चुकीचे ठरते कारण मेंदूचा नुसता आकार महत्त्वाचा नसून त्याची क्लिष्टता महत्त्वाची ठरते.
(ब) कवटीची लांबी-रूंदी निर्देशांक : लांबी मोजण्याच्या दृष्टीने ग्लॅबेला व ऑपिस्थोक्रेनियॉन या विशिष्ट बिंदूचा उपयोग केला जातो. दोन भुवयांच्या मध्ये, नाकाच्या थोडे वर, कपालास्थीवर जो उंचवट्याचा भार मध्य-अरीय प्रतलावर येतो, तो बिंदू म्हणजे ग्लॅबेला-भूमध्य होय. पश्चकपालास्थीवर जास्तीतजास्त उंचवट्याचा जो बिंदू अरीय प्रतलावर असतो, त्याला ऑपिस्थोक्रेनियॉन म्हणतात. ग्लॅबेला (वा भूमध्य) व ऑपिस्थोक्रेनियॉन यांच्यातील जास्तीतजास्त अंतर जे मध्य अरीय प्रतलामार्गे येते, तीच कवटीची लांबी असते. पश्चकपालास्थीवरील जास्तीतजास्त कडेला, परंतु उंचवट्याचा जो बिंदू असतो त्याला युरियॉन म्हणतात. अशा दोन बिंदूंमधील मध्य अरीय प्रतलाशी काटकोनातील जास्तीतजास्त अंतर म्हणजे कवटीची रुंदी होय. यांपैकी ग्लॅबेला हा स्थिर बिंदू असून ऑपिस्थोक्रेनियॉन व युरियॉन हे बिंदू प्रयत्न प्रमाद पद्धतीनुसार काढावे लागतात. केवळ लांबी अगर रुंदीचा उपयोग वर्गीकरणात क्वचितच केला जातो. या दोन मोजमापांच्या आधारे काढलेल्या मस्तकनिर्देशांकाचा उपयोग मात्र वर्गीकरणासाठी करण्यात येतो [⟶ मस्तकनिर्देशांक].
बहुतेक प्राचीन मानवाची मस्तचे लांबट आकाराची आढळल्याने, हा आकार प्रारंभीचा वा आद्य असल्याचे मानले जाते. एकाच वंशाच्या व्यक्तीमध्ये मस्तकाचे आकारही काहीसे बदलते आढळतात. कृत्रिम गोष्टींचा वा वातावरणाचा परिणाम यास कारणीभूत आहे. उदा., चीनमध्ये लहान मुलांचे पाय घट्ट बांधून ठेवण्याची प्रथा अगर निग्रोच्या मुलांची डोकी लहानपणीच घट्ट बांधण्याची प्रथा आहे.
(क) कवटीच्या घुमटाची उंची : कानाच्या वरच्या कडेला असणाऱ्याबिंदूपासून ते शिरोबिंदूपर्यंतची उंची म्हणजे घुमटाची उंची होय. प्लाइस्टोसीनपासून किंवा अश्मयुगापासून घुमटाच्या उंचीमध्ये फरक झालेला दिसतो. घुमटाची उंची थोडी वाढलेली आढळते. घुमटाच्या उंचीचा व अग्रमतिस्तष्काच्या वाढीचा एकमेकाशी संबंध दाखविला जातो. तसेच अग्रमस्तिष्काचा बुद्धी वाढीशीही संबंध दाखविला जातो. यावरून प्राचीन मानवांपैकी कमी उंचीच्या घुमटाचे मानव जास्त उंचीच्या मानवापेक्षा कमी बुद्धिमान असावेत परंतु ही गोष्ट शंभर टक्के प्रमाण मानता येत नाही. ‘वंश व बुद्धिमत्ता’ यांचा आधुनिक मानवाच्या संदर्भात असा निष्कर्ष काढता येत नाही.
(ड) कपालास्थीचा उतार व रुंदी : प्राचीन मानवांपैकी काही मानव व कपी यांच्या कपालास्थीचा उतार भुवईपासून सुरू होतो. तसेच कपालास्थी लहान व अरुंद असते. कपालास्थीचा उतार ठरविताना निरीक्षणाचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे अंदाज चुकण्याचीही शक्यता बरीच असते. आधुनिक मानवी वंशातदेखील वरीलप्रमाणे निरीक्षण केले जाते.
(इ) कवटीच्या हाडांची जाडी : कानाच्या वर सु. २-३ सेंमी. अंतरावर कवटीची जाडी व्यास मापकाने मोजली जाते. प्राचीन मानवाच्या कवटीची हाडे जाड आढळतात, तर आधुनिक मानवी वंशात तसा लक्षणीय फरक आढळत नाही.
(ई) बृहद्रंधाची ठेवण : बृहद्रंध्र जर कवटीच्या तळाशी मध्यभागी असेल, तर मस्तकाचा भाग व्यवस्थित तोलला जातो. परंतु तेच जर तळाच्या मध्याच्या मागील बाजूस सरकले असेल, तर त्याचा परिणाम चेहऱ्याचा भाग पुढे ओढण्यात व पाठीच्या कण्याच्या आकारावर होतो.
(उ) अधिनेत्रक कंगोरे : बोटांनी चाचपून अधिनेत्रकांची जाडी अजमावयाची असते. प्राचीनतेकडून आधुनिकतेकडे वाटचाल करताना या कंगोऱ्याची जाडी कमी होत गेलेली दिसते.
(२) चेहेरा व खालचा जबडा : या संदर्भात ज्या मोजमापाचा व निरीक्षणांचा समावेश केला जातो, त्याच्याशी निगडित गोष्टी पुढीलप्रमाणे : (अ) चेहऱ्याची लांबी, रुंदी व निर्देशांक (ब) चेहऱ्याचे प्रवर्धन (क) गालाच्या हाडांचा प्रकार वगैरे.
(अ) चेहऱ्याची लांबी, रुंदी व निर्देशांक : नाकाच्या खोबणीत असणारा बिंदू (नेझियॉन) व वरच्या जबड्याच्या हिरडीचा खालच्यातील खालचा अरीय प्रतलावरील मध्य बिंदू यांच्यातील सरळ रेषेतील अंतरास चेहऱ्याची लांबी समजली जाते आणि मध्य अरीय प्रतलास काटकोनात छेदणारे, दोन गालांच्या हाडांतील सरळ अंतर म्हणजे चेहऱ्याची रुंदी होय. कवटीप्रमाणेच चेहऱ्याची लांबी व रुंदीचा स्वतंत्र उपयोग क्वचित केला जातो. मात्र या दोन्हींवर आधारित अशा चेहऱ्याच्या निर्देशांकाचा सर्रास उपयोग केला जाते.
चेहरा- निर्देशांक = |
चेहऱ्याची लांबी |
X १०० |
चेहऱ्याची रुंदी |
या निर्देशांकावरून चेहऱ्याचा प्रकार पुढीलप्रमाणे ठरविला जातो.
प्रकार |
निर्देशांक |
|
प्राचीन अवशेष |
आधुनिक मानव |
|
रुंद चेहरा |
८५ च्या खाली |
८५ च्या खाली |
मध्यम चेहरा |
८५ ते ९८ |
८५ ते ९० |
अरुंद लांब चेहरा |
९८ च्या वर |
९० च्या वर. |
चेहरा-निर्देशांक वय व लिंग याप्रमाणे जरी बदलत असला, तरी त्यावर वातावरणाचा परिणाम अजीबात नसतो. त्यामुळे या लक्षणास वंश वर्गीकरणात फार महत्त्व आहे.
(ब) चेहऱ्याचे प्रवर्धन : खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे अब या रेषेने कड ह्या रेषेशी केलेला कोन जर ९०० चा असेल, तर चेहरा भूमीस काटकोनाकृतीत म्हणजे सपाट असतो. याउलट हाच कोन ९०० पेक्षा कमी होत जातो ‘उद्गतहनू’ होत जातो असे ‘उद्गतहनू’ लक्षण प्राचीन अवशेषांमध्ये बरेच आढळते. आधुनिक मानववंशातसुद्धा असे लक्षण आढळते, परंतु त्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
(क) गालाच्या हाडांचा प्रकार : गालाची हाडे ज्या प्रमाणात वर आलेली असतात, त्या प्रमाणात चेहऱ्याचा आकार रुंद अगर लांबट होत असतो. चेहऱ्याची हाडे जास्त बाहेर आलेली व लक्षणीय असतील तर चेहरा रुंद भासतो. उदा., मंगोल वंशाचे लोक. याउलट ही हीडे जर बसलेली, दबलेली असतील, तर चेहरा लांबट भासतो. उदा., निग्रो वंशाचे लोक.
वर वर्णन केलेली कवटी व चेहरा यांची लक्षणे, मानवमिती व निरीक्षणांचा वापर कसा केला जातो, त्याचे नमुने होत. या दोन्ही कृतींचा वापर ज्या लक्षणांबाबत केला जातो, अशी इतर अनेक लक्षणे सांगता येतील. परंतु ज्यामध्ये केवळ निरीक्षणावर भर दिला जातो, अशीही कित्येक लक्षणे आहेत. त्यांपैकी दोन प्रमुख लक्षणे म्हणजे केसांचे निरीक्षण व दुसरे म्हणजे ओठांचे निरीक्षण.
(१) केसांच्या निरीक्षणासंबंधी : केसांच्या प्रकारांची माहिती मुख्यत्वे दोन भागांत विभागली जाते. एक म्हणजे केसांचा रंग व दुसरा म्हणजे केसांसंबंधी इतर माहिती. यांपैकी केसांच्या रंगासंबंधी माहिती मिळविण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :
शरीरगुणधर्मातील ज्या ज्या गुणधर्मांचा–लक्षणांचा–रंगाशी संबंध येतो, त्यात शरीराच्या कातडीच्या अगदी खालच्या थरात असलेल्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याचा फार महत्त्वाचा वाटा असतो. या रंगद्रव्याने शरीरातील प्रमाणानुसार त्या त्या अवयवाच्या लक्षणाच्या रंगछटा बदलत जातात. उदा., डोळ्याचा, कातडीचा, केसांचा रंग मेलॅनिनच्या प्रमाणानुसार कमीअधिक गडद वा फिकट होतो. मेलॅनिन अगदी कमी प्रमाणात असेल, तर पांढरा अगर गोरा रंग प्राप्त होतो व हेच प्रमाण जास्त झाले की गडद तपकिरी किंवा काळसर रंगछटा मिळते. आपल्याला जो काळा रंग वाटतो, तो वास्तविक काळा नसून मेलॅनिनच्या अधिक प्रमाणामुळे गडद तपकिरी असतो. मेलॅनिनच्या कमीअधिक प्रमाणास आनुवंशिकता जास्त प्रमाणात जबाबदार असते. तसेच प्रत्येक वंशगटात रंगछटांची श्रेणी ठराविक आढळते. यामुळे केसांचा रंग काळा, भुरा, तपकिरी इ. प्रकारे बदलतो. केसांचा वा सर्वसाधारण शरीराचाही रंग ठरविण्यासाठी नैसर्गिक निवडीचे तत्त्वही जबाबादार असते. उदा., उष्ण प्रदेशात गडद तपकिरी रंगामुळे उष्णतेची तीव्रता सहन केली जाण्याची क्षमता वाढते परंतु थंड हवेच्या प्रदेशात याची जरूरी नसल्याने तेथील रंगछटा पांढुरक्या रंगाकडे झुकलेली आढळते. स्थलांतरित लोकांच्या रंगछटात फरक पडतो पण असा फरक फक्त स्थलांतरित कालापुरता मर्यादित असतो आणि मूळच्या वसतिस्थानाकडे आल्यावर मूळचा रंग प्राप्त होतो. कृत्रिम रीत्या दिलेले केसांचे रंग मात्र फसवे असतात व त्या प्रकाराचा समावेश रंगछटांच्या विविधतेत होत नाही.
केसांसंबंधीची इतर माहिती पाच प्रकारांत मोडते. केसांचा आकार (सरळ, कुरळे, लोकरीसारखे वगैरे) केसांची पोत (मऊ, मध्यम, खरबरीत वगैरे) केसांची लांबी (आखूड, मध्यम, लांब वगैरे) केसांची संख्या (तुरळक, मध्यम, दाट वगैरे) व केसांच्या आडव्या छेदाचा प्रकार (वर्तुळाकार, अंडाकृती, चपटा वगैरे). [⟶ केस].
कधी कधी सरळ, मऊ, लुसलुशीत केस कृत्रिम उपायांनी कुरळे व खरखरीत केलेले आढळतात. वातावरण व केस यांचाही घनिष्ठ संबंध आहेच. म्हणून एखाद्या वातावरणातील लोकांचे केस अपेक्षित प्रकारचे असतीलच असे नाही.
(२) ओठाच्या निरीक्षणासंबंधी : वंश वर्गीकरणात ओठ व त्याचे प्रकार व त्यानुसार वंश प्रकार हा एक फार मोठा भाग आहे. जाड, पातळ, गुलाबी, पांढुरके, काळसर, पुढे आलेले वगैरे पुष्कळ ओठांचे प्रकार आपण पहातो परंतु शास्त्रीय दृष्ट्या त्यांचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते : (अ) त्वचावरणात्मक ओठ व (ब) प्रत्यक्ष ओठ किंवा पापुद्रामय ओठ. नाकाचा भाग ज्या ठिकाणी संपतो, तेथपासून ते पापुद्रामय ओठांचा भाग म्हणजे त्वचावरणात्मक ओठ होय. त्वचावरणात्मक ओठ व पापुद्रामय ओठ यांना ज्या रेषेने विभागलेले असते, त्याला ओठाची टीप असे म्हणतात. त्वचावरणात्मक ओठांचा रंग बहुधा शरीराच्या इतर भागासारखाच असतो, परंतु पापुद्रामय ओठ मात्र काहीसे तांबूस (किंवा जांभळट) असतात. तसेच मिटलेल्या अवस्थेतील ओठ किंचित वर उचलल्यास आतील रंग अधिकच तांबूस दिसतो. मात्र काही काही वेळा ओठ वर न उचलताही असे दोन रंग स्पष्ट दिसतात. या प्रकारास ओठांचे बहिर्वलन असे म्हणतात ह्या वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीचा उपयोग वंश वर्गीकरणासाठी केला जातो. निग्रो वंशातील व्यक्तींमध्ये असे बहिर्वलन लक्षणीय असते.
वंश भेदाच्या दृष्टीने ओठांचा प्रकार (जाड, मध्यम, पातळ वगैरे) व ओठांचे बहिःक्षेप्य या दोन गोष्टींचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. निग्रो वंशातील लोकांचे ओठ अतिशय जाड, बहिःक्षेप्य व बहिर्वलित असतात. इतर वंशांच्या लोकांमध्ये मात्र बहुधा मध्यम जाडीचे ओठ आढळतात. परंतु एकंदरीत ओठांच्या माहितीचे हे शारीरिक लक्षण तसे क्षुल्लकच म्हणावे लागेल. ओठांचे सर्व प्रकार हा भाग निरीक्षणात्मक परीक्षणाचा आहे. यामध्ये मोजमापाचा प्रश्नच येत नाही. अशी लक्षणे आनुवंशिक समजली जातात शिवाय बाह्य वातावरणाचा या लक्षणावर काही परिणाम होत नाही.
एकंदरीत, वंश वर्गीकरणासंबंधी कोणती लक्षणे वापरावीत, अशी कमीत कमी किती लक्षणे वापरीत, या दोन प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देता येते परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे देता येत नाही कारण लक्षणांची संख्या व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे व स्थलपरत्वे बदलती असते. तेव्हा लक्षणांच्या संख्येविषयी निश्चित सूत्र सांगता येणे कठीण आहे. मात्र जास्तीतजास्त लक्षणांचा उपयोग उपकारक ठरेल. वर उल्लेखिलेल्या लक्षणांव्यतिरिक्त आणखी काही लक्षणे सांगता येतील, ती अशी–ललाटीय रुंदी मस्तकाचा घेर जबड्याची लांबी, रुंदी, उंची वैगेरे, व नाकाची लांबी, रुंदी व इतर निरीक्षणात्मक प्रकार कानासंबंधीची मोजमापे व निरीक्षणे शरीराच्या इतर अवयवांची मोजमापे व निरीक्षणे रक्तगट व त्याचे वितरण इत्यादी.
वंश वर्गीकरणाचे स्वरूप अठराव्या शतकाच्या सुमारास प्रथम कार्ल लिनीयस याच्या प्रयत्नामुळे समजून आले. होमो सेपियन ह्या मानवी साठ्याच्या असंख्य उपशाखा म्हणजे वंश. इतपत मथितार्थ लिनीयसला अभिप्रेत होता व या तत्त्वाच्या आधारे त्याने होमो सेपियनचे एकूण सहा गट (वंश) सांगितले. यांपैकी होमोफीरस हा पहिला गट अजिबात अस्तित्वात नाही व शेवटचा गट मॉन्स्ट्रस म्हणजे विकृतिविज्ञानाचा एक नमुना आहे. म्हणून शेवटी सहांपैकी चारच वंशगट उरतात. हे चार वंशगट त्यांच्या वसतिस्थानाचे निदर्शक मानले, तरी चालण्यासारखे आहे. यावरून साधारण बोध होतो तो असा की अमेरिका, यूरोप, आशिया व आफ्रिका या चार खंडांनुसार अनुक्रमे वरील चार वंशगट विखुरले आहेत परंतु अशा वर्गीकरणासाठी शारीरिक लक्षणांबरोबरच बौद्धिक किंवा मानसिक लक्षणांचाही अंतर्भाव केला गेला.
वैज्ञानिकांपैकी कूव्हिए याने मानवी साठ्याची तीन वंशगटांमध्ये विभागणी केली : (१) कॉकेशियन (गोरे लोक), (२) मंगोल (पिवळ्या वर्णाचे), (३) निग्रो (काळ्या रंगाचे).
ब्लूमेनबाखने पाच वंशगटाची वर्गवारी मांडली : (१) कॉकेशियन, (२) मंगोल, (३) इथिओपियन, (४) अमेरिकन व (५) मलेयन.
वरील विभागणी कातडीचा रंग, केसांची विविधता आणि चेहरा व कवटीच्या आकार-प्रकारानुसार केली आहे. तसेच कूव्हिएच्या वर्गीकरणावर ब्लूमेनबाखचा फार मोठा प्रभाव दिसतो. ब्लूमेनबाखने अरब व स्वीडिश यांचा कॉकेशियन किंवा गोरे लोक यांमध्ये अंतर्भाव केलेला दिसतो परंतु ऑस्ट्रेलियन व बुशमन हे दोन महत्त्वाचे गट त्यांच्या वर्गीकरणामधून वगळलेले दिसतात.
हक्स्ली याने मानवी साठ्याचे वर्गीकरण एकूण पाच वंशगटांत केले :
(१) ऑस्ट्रेलॉईड. (२) निग्रॉईड. (३) मंगोलॉईड, (४) झँथोक्रॉईक व (५) मेलॅनोक्रॉईक.
(१) ऑस्ट्रेलॉईड : ऑस्ट्रेलियातील रहिवासी व दक्षिण भारतातील बऱ्याचशा आदिवाशी गटांचा यात अंतर्भाव होऊ शकेल. कातडीचा तपकिरी रंग, गडद तपकिरी किंवा काळेभोर डोळे, काळे व बहुधा कुरळे केस, अरुंद परंतु लहान आकाराच्या डोक्याचे, अधिनेत्रक कंगोऱ्याची लक्षणीय वाढ दर्शविणारे. जबडे पुढे झुकलेल्या अवस्थेत, ओठाची रचना साधारणतः चुरगळल्यासारखी व रुंद नाकाचे असे वर्णन बहुतांशी या लोकांचे करता येईल.
(२) निग्रॉईड : गडद तपकिरी रंगापासून ते काळ्या कुळकुळीत कातडीच्या रंगाचे, काळ्याभोर डोळ्याचे आणि काळेभोर व लोकरीसारख्या कुरळ्या केसांचे असे हे लोक होत. तसेच डोक्याचा लघुशीर्षी आकार, अलक्षणीय अधिनेत्रक कंगोरे, नकट्या–बसक्या नाकाचे, प्रवर्धित चेहेरा आणि खरबरीत व पुढे आलेले ओठ ही लक्षणेही या प्रकारात मोडतात. अशा वंशगटांची वसतिस्थाने प्रमुख्याने दक्षिण आफ्रिकेत आढळतात. सहारा वाळवंट, मादागास्कर येथे तसेच सर्वसाधारण आफ्रिकन निग्रो म्हणून ज्यांची गणना करता येईल, अशा आफ्रिकेतील सर्वांची गणना यात करता येईल. निग्रॉईडची पुन्हा दोन उपगटांत विभागणी केली जाते : (अ) दक्षिण आफ्रिकेतील ‘बुशमन’ व (ब) अंदमान द्वीपकल्प, फिलिपीन्स इ. प्रदेशांतील ‘नेग्रिटो’.
(३) मंगोलॉईड : लघुशीर्षी चिनी व जपानी व त्यासमान इतर लोकगटांचे लोक या वंशाचे प्रतिनिधी समजले जातात. साधारणपणे हे लोक मध्यम ते बुटक्या उंचीच्या प्रकारात मोडतात. तसेच काळे डोळे, अंगावरील केसांची वाढ कमी प्रमाणात, पिवळसर ते तपकिरी कातडीच्या रंग छटा, बसके नाक तसेच चेहेरा, डोळ्याच्या पापणीची विशिष्ट प्रकारची लक्षणीय दुमड इ. इतरही लक्षणांचा अंतर्भाव यामध्ये केला जातो.
(४) झँथोक्रॉईक : यांचे गोऱ्यापान रंगाचे असे सर्वसाधारणपणे वर्णन केले जाते. वस्तुतः रंगहीन रंग म्हणजे गोरा रंग असे या रंगाचे वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यांचे डोळे निळसर ते घारे असून लांबसडक केस व शिरोभाग लांबी – रुंदीच्या संदर्भात प्रमाणबद्ध असतो. उत्तर यूरोपचा भाग व उत्तर आफ्रिकेचा भाग येथील लोकगटांचा समावेश या वंशगटात करता येईल.
(५) मेलॅनोक्राईक : याचे पांढुरक्या गोऱ्या रंगाचे लोक असेही वर्णन केले जाते. शारीरिक दृष्ट्या ते बुटके परंतु खुजे नाहीत, धूसर तपकिरी किंवा नितळ कातडीचे असून त्यांचे डोळे व केस काळ्याभोर रंगाचे आढळतात. दक्षिण यूरोप व अरबस्तान ही त्यांची वसतिस्थाने. ग्रीक, अरबी व स्पॅनिश हे या वंशगटाचे प्रतिनिधी होत.
डकवर्थने मस्तकाच्या निर्देशांकानुसार मानवी साठ्याचे विभाजन सात वंशांमध्ये केले : (१) ऑस्ट्रेलियन, (२) अंदमानी, (३) यूरेशियाटिक, (४) पॉलिनीशियन, (५) ग्रीन लॅडिश, (६) साऊथ आफ्रिकन व (७) आफ्रिकन निग्रो.
ग्राफ्टन एलियट स्मिथने मानवी साठ्याचे वर्गीकरण सहा वंशांमध्ये केले : (१) ऑस्ट्रेलियन, (२) निग्रो, (३) मंगोल, (४) नॉर्डिक, (५) अल्पाईन, (६) मेडिटरेनियन.
अशा प्रकारची अनेक वंश वर्गीकरणे वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या तऱ्हेने मांडली. या सर्व वर्गीकरणांमध्ये लक्षणांना प्राधान्य दिलेले दिसते व काही वेळा भौगोलिक परिस्थितीही विचारात घेतलेली दिसते. ही वर्गीकरणे अठराव्या व एकोणिसाव्या शतकांच्या उत्तरार्धापर्यंत मांडली गेली परंतु हे सर्व प्रयत्न नंतरच्या काळात झालेल्या प्रयत्नांच्या मानाने त्रोटक वाटतात. वर्गीकरणासंबंधीच्या निकषांचा जसाजसा अधिकाधिक विचार होत गेला, तसतशी सखोल व विस्तृत वर्गीकरणे मांडली गेली. १८८९ च्या सुमारास जन्माने रशियन परंतु नंतर फ्रान्समध्ये वास्तव्य केलेला मानवशास्त्रज्ञ झोझेफ देनिकेअर याने एकूण २९ विविध वंशांचे वर्गीकरण सहा प्रमुख शाखांमध्ये व १७ दुय्यम प्रकारच्या उपशाखांद्वारे केले. केसांचा रंग, केसांचा प्रकार व चेहेऱ्याचे विस्तृत वर्णन असे स्थूल निकष त्याने या वर्गीकरणासाठी वापरले. त्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे :
(१) लोकरीसारख्या केसांचे व रुंद नाकाचे वंश – गडद कातडी रंगाचे – |
|
पिवळट रंगाची कातडी, लंबशीर्षी. |
बुशमन |
तांबूस तपकिरी रंग, अति खुजे, मध्यम लंबशीर्षी किंवा समशीर्षी. काळा रंग, उंच परंतु लंबशीर्षी. तपकिरी – काळसर रंग, मध्यम उंची, लंबशीर्षी. |
नेग्रिटो निग्रो बांटू मेलानेशियन–पॉपुअन |
(२) कुरळ्या केसांचे किंवा तरंगात्मक केसांचे, गडद कातडी रंगाचे– |
|
तांबूस-तपकिरी, अरुंद नाक, उंच, लंबशीर्षी, |
इथिओपियन |
धुपेली –तपकिरी, रुंद नाक, मध्यम उंची, लंबशीर्षी. |
ऑस्ट्रेलियन |
तपकिरी–काळसर, रुंद वा अरुंद नाक, खुजे, लंबशीर्षी . |
द्रविडियन |
धुपेली –पांढुरका कातडीचा रंग, अरुंद परंतु आकडीसारख्या नाकाचे टोक, जाडसर, लघुशीर्षी. |
ॲसिरॉईड |
(३) तरंगात्मक तपकिरी किंवा काळसर केसांचे, गडद रंगाच्या डोळ्यांचे वंश – |
|
स्वच्छ, तपकिरी कातडी रंग, काळे केस, अरुंद नाक, तसेच सरळ अगर बहिर्वक्र नाक, उंच लंबशीर्षी. |
इंडो-अफगाण |
पिंगट – पांढुरका रंग, काळे केस, उंच व लांबट चेहऱ्याचे, गरूडासारखे नाक, लक्षणीय पश्चकपाल, लंबशीर्षी. |
अरब किंवा सीमाइट |
लंब वर्तुळाकार चेहरा, सरळ परंतु खडबडीत नाक, लंबशीर्षी. चौकोनाकृती चेहरा, |
बर्बर |
सुरळ सुरेख नाक, समशीर्षी. लांबट चेहरा, |
लिटोरल – यूरोपियन |
कमी उंचीचे, लंबशीर्षी. |
इबेरो इन्सूलर |
फिकट पांढऱ्या रंगाचे, तपकिरी केसांचे, खुजे, लक्षणीय लघुशीर्षी. |
पश्चिम यूरोपियन |
गोलाकार चेहरा वा लांब चेहरा , उंच, लघुशीर्षी. |
ॲड्रियाटिक |
(४) दिसायला सुरेख, तरंगात्मक किंवा सरळ केसांचे, सौम्य डोळ्यांचे, तांबूस पांढुरक्या कातडीच्या रंगाचे वंश : |
|
केस काहीसे तरंगात्मक–तांबूस, उंच, लंबशीर्षी. |
उत्तर यूरोपियन |
सरळ केस–क्षौम केसाचे, मध्यम परंतु लघुशीर्षी. |
पूर्व युरोपियन |
(५) तरंगात्मक किंवा सरळ केसांचे, काळसर, काळ्याभोर डोळ्यांचे वंश : |
|
सौम्य तपकिरी कातडीच्या रंगाचे, केसाळ, रुंद परंतु अंतर्वक्र नाकाचे, लंबशीर्षी. |
ऐनू |
पिवळसर कातडीचा रंग, तसेच मऊ कातडीचे, उंच उठावदार नाक, लंब वर्तुळाकार चेहरा, समशीर्षी ते लघुशीर्षी. |
पॉलिनीशियन |
खुजे, फताड्या परंतु काहीसे अंतर्वक्र नाकाचे, गालाची हाडे वर आलेली, चौव्य चेहरा, लंबशीर्षी ते समशीर्षी. |
इंडोनिशियन |
(६) सरळ लांबसडक केसांचे वंश : |
|
कमी उंची, लक्षणीय सरळ अगर अंतर्वक्र नाक, समशीर्षी किंवा लंबशीर्षी. |
दक्षिण अमेरिकन |
उष्ण रक्ताचे, पिवळट कातडीचे, सरळसोट गरुड नाकाचे, उंच, समशीर्षी. |
उत्तर अमेरिकन |
कमी उंचीचे, लघुशीर्षी. |
मध्यम अमेरिकन |
सरळ नाक, उंच, लघुशीर्षी. |
पॅटॉगोनियन |
चौकोनी चेहरा, तपकिरी पिवळट कातडी, कमी उंची, गोलाकार चपटा चेहरा, लंबशीर्षी. |
एस्किमो |
पिवळट – पांढुरक्या कातडीच्या रंगाचे, वर उचलेले गेलेले वक्राकार नाक, खुजे, लघुशीर्षी. |
लॅप |
सरळ किंवा अंतर्वक्र नाक, समशीर्षी किंवा लंबशीर्षी. |
उग्रीयन |
गालाची हाडे वर आलेली, सरळ नाक, मध्यम उंची, लघुशीर्षी. |
तुर्क |
फिकट पिवळा कातडीचा रंग, गालाची हाडे वर आलेले, लघुशीर्षी. | मंगोल |
त्याने रूढ संकेतानुसार परंतु सोप्या पद्धतीने तीन निर्देशांकांचा उपयोग करून आपले वर्गीकरण मांडले. ते पुढीलप्रमाणे :
(१) लांबी−रुंदीच्या संदर्भात डोक्याचा निर्देशांक. (२) लांबी−उंचीच्या संदर्भात डोक्याचा निर्देशांक. (३) लांबी−रुंदीच्या संदर्भात नाकाचा निर्देशांक.
तसेच या निर्देशांकाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात विशिष्ट चिन्हांचा वापर करून त्याला सुटसुटीत स्वरूप दिले. त्यानंतर या तिन्ही निर्देशांकांतील एक एक गट घेऊन त्याप्रमाणे वंश वर्गीकरण केले. त्याने वापरलेली विशिष्ट चिन्हे व त्यानुसार निर्देशांकाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे :
निर्देशांक |
चिन्ह |
वर्गीकरणातील गट |
|
(१) |
डोक्याचा |
डी |
लंबशीर्षी |
एम् |
समशीर्षी |
||
बी |
लघुशीर्षी |
||
(२) |
डोक्याचा |
सी |
कॅमीसिफॉलिक |
ओ |
ऑर्थोसिफॉलिक |
||
एच् |
हायप्सीसिफॉलिक |
||
(३) |
नाकाचा |
अरुंद नाकाचे |
|
मध्यम नाकाचे |
|||
रुंद नाकाचे |
वरील तिन्ही निर्देशांकांतील गटाचा संयुक्तपणे उपयोग करून निरनिराळ्या वंशाचे वर्गीकरण त्याने केले. अशा प्रकारे एकूण २७ संयुक्ते मिळतात. उदा., बीएच्एल् म्हणजे लंबशीर्षी, हायप्सीसिफॉलिक व अरुंद नाकाच्या लोकांचा वंश वगैरे. या २७ संयुक्तांपैकी ८ संयुक्तांचा मिळून मूलभूत वंशाचा एक भाग होतो व उरलेल्या १९ संयुक्तांचा मध्यम प्रकारच्या संयोजनाचा दुसरा भाग होतो. या ठिकाणी फक्त ८ मूलभूत वंशांचा विस्तार दिला आहे :
डीएच्एल् : कास्पीन वंश : ज्या स्थानिक वा आदिवासी लोकांचा यात समावेश होतो ते गट वा देश पुढीलप्रमाणे−सार्डिनिया, रशिया, नवाश्मयुगातील ईजिप्त, गाला, सोमाली, भारत, न्यूझीलंड, एस्किमो वगैरे.
डीसीएल् : भूमध्यसमुद्र : यामध्ये सिसिली, सार्डिनिया, ईजिप्त, इंग्लंड, रशिया, भारत, एस्किमो, कॅलिफोर्निया वगैरेंचा समावेश होतो.
डीएच्पी : प्रोटो−निग्रॉइड–यामध्ये पूर्व वंशाचा ईजिप्त, कॅमेरून, गाबाँ, बांटू, जर्मनी (नवाश्मयुगातील), ऑस्ट्रेलिया, पूर्व पापुआ−न्यूगिनी, हवाई, अलगाँकिअन, इराक वगैरेंचा समावेश होतो.
डीसीपी : प्रोटो−ऑस्ट्रेलॉईड : यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यू ब्रिटन, निग्रो आणि बांटू−इराक, ऑस्ट्रिक, सार्डिनिया आणि सिसिली वगैरेंचा समावेश होतो.
बीएच्एल् : अल्पाईन यामध्ये वालसिस (स्विस), झेक, तुर्क, आर्मेनियन, ब्रह्मी, चिनी वगैरेंचा समावेश होतो.
बीसीएल् : उरल–यामध्ये वालसिस (स्विस), टायरोल, उत्तर समुद्र, व्हेनेझुएला वगैरेंचा समावेश होतो.
बीएच्पी : पॅलीअल्पाईन–यामध्ये वालसिस (स्विस), झेक, मंगोलियन, ब्रह्मी, हवाई, वगैरेंचा समावेश होतो.
बीसीपी : मंगोलॉइड–यामध्ये वालसिस (स्विस), मंगोल, टायरोल, लॅप वगैरेंचा समावेश होतो.
वरील वर्गीकरणामध्ये अतिशय मर्यादित घटकगुणांचा अंतर्भाव केला असून एवढ्यावरूनच वंशवर्गीकरण बरोबर होत नाही. विभिन्नतेचे प्रमाण खूपच असल्याने एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे या प्रकारचे वर्गीकरण पुरेशी माहिती देऊ शकत नाही. या व इतर अशाच कारणांमुळे वरील वर्गीकरण ग्राह्य मानले जात नाही.
ॲल्फ्रेड हॅडनने १९३० मध्ये आपले वर्गीकरण मांडले. यासाठी त्याने केसांच पोत, तसेच शरीराची उंची, मस्तिष्कनिर्देशांक व नाकाचा निर्देशांक यांचा उपयोग केला. त्याने मांडलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे :
(१) |
उलोट्रीची पूर्व उलोट्रीची : |
|
अती खुजे, समशीर्षी वा लघुशीर्षी. |
नेग्रिटो |
|
उंच किंवा मध्यम उंची, गडद रंगाची |
पापुअन |
|
कातडी, लंबशीर्षी. |
मेलानेशियन |
|
पश्चिमी किंवा आफ्रिकन उलोट्रीची : |
||
अति खुजे, पिवळट तपकिरी वर्ण, समशीर्षी |
नेग्रिटो |
|
कमी उंची, पिवळट रंग, समशीर्षी. |
बुशमन हॉटेंटॉट |
|
कमी उंची ते उंच, गडद वर्ण, लंबशीर्षी. |
निग्रो नाईलओटीक बांटू |
|
(२) |
सिमेट्रीची लंबशीर्षी : |
|
रुंद नाकाचे |
द्रविडपूर्व ऑस्ट्रेलियन |
|
मध्यम किंवा अरुंद नाकाचे |
द्रविडियन हेमाइट |
|
कातडीचा मध्यम रंग चलीत उंची, काळे केस. |
इंडो−अफगाण इंडोनेशियन पॅलिओ−अमेरिंडियन |
|
तपकिरी झाक असलेला, पांढरट कातडीचा रंग, |
यूरोआफ्रिकन सिमाइटस |
|
काळे केस, मध्यम उंची, समशीर्षी : |
मेडिटरेनियन |
|
तपकिरी−पांढरट रंग, |
पिरेनियन |
|
काळे केस, मध्यम उंची, |
ॲटलांटो−मेडिटरेनियन |
|
केस व कातडीचा सौम्य रंग, निळसर वा राखी डोळे, उंच |
नॉर्डिक |
|
|
ऐनू |
|
सौम्य तपकिरी रंग, केसांचा रंग चलित, उंच किंवा मध्यम उंची. |
अल्पाइन्स डिनेरिक–आर्मेनॉइड आर्मेनियन |
|
(३) |
लिओट्रीची लंबशीर्षी : |
|
पिवळा किंवा पिवळट तपकिरी रंग, मध्यम उंची. समशीर्षी : |
एस्किमो |
|
पिवळट – तपकिरी रंग, खुजे, |
पॅलिओ−एशियाटिक |
|
मध्यम उंची किंवा उंच. |
चिनी उत्तर अमेरिकन इंडियन |
|
लघुशीर्षी : |
||
पांढरट पिवळट अगर |
तुर्क, तुंग, |
|
तांबट – तपकिरी रंग, |
मंगोल |
|
खुजे, मध्यम उंचीचे |
पॉलिनीशियन |
|
अगर उंच. |
अमेरिंडियन्स ऑफ हायलँड, ईशान्य पॅसिफिक किनाऱ्यावरील अमेरिंडियन |
हूटनने १९३१ मध्ये आपले वर्गीकरण मांडले. तीन प्राथमिक वंशांखेरीज या तिन्हींच्या संकरित अशा संयुक्त वंशाची तोंडओळख या वर्गीकरणात होते. हूटनचे वर्गीकरण थोडक्यात पुढीलप्रमाणे :
प्राथमिक किंवा मूळ वंश (१) गोऱ्या कातडीचे : गोरे वंश यूरोपियन, यूरोआफ्रिकन, कॉकेसॉईड.
मूळ उपवंश : (१) मेडिटरेनियन, (२) ऐनू, (३) केल्टिक, (४) नॉर्डिक, (५) अल्पाईन व (६) ईस्ट बाल्टिक.
संकरित संमिश्र उपवंश : (७)अर्मेनॉइड (मूळचे मेडिटरेनियन + अल्पाईन + इंडो−अफगाण), (८) डिनेरिक (उत्तर पाषाणाश्मयुगातील लोक + अल्पाईन + अर्मेनॉइड + नॉर्डिक).
(२) निग्रॉईड मूळ वंश : (१) आफ्रिकन निग्रो (निग्रो + जंगलवासी निग्रो), (२) नॉइलॉटिक निग्रो, (३) नेग्रिटो (पिग्मी किंवा खुजी जमात).
(३) मंगोलॉईड मूळ वंश – मूळचे मंगोल, (२) आर्टिक मंगोल (एस्किमो).
संमिश्र वंश : (अ) प्रामुख्याने गोरे : (१) ऑस्ट्रेलियन (आर्ष गोरे + वास्मीयन + मेलानेशियन + पापुअन).
(२) इंडो−द्रविडियन (मूळचे मेडिटरेनियन + ऑस्ट्रेलॉईड + नेग्रिटो + अर्मेनॉइड, नॉर्डिक, मंगोलॉईड).
(३) पॉलिनीशियन (इंडोनेशियन + मंगोलॉईड + मेलानेशियन + पापुअन).
(ब) मुख्यतः मंगोल : (१) अमेरिकन इंडियन (मंगोलॉईड + अर्मेनॉईड + ऑस्ट्रेलॉईड + क्वचित निग्रॉईड).
आकृति प्रकार – लघुशीर्षी व लंबशीर्षी.
(२) इंडोनेशियन – मंगोलॉईड किंवा इंडोनेशियन मलेय (मंगोलॉईड + प्राचीन मेडिटरेनियन + ऐनू + नेग्रिटो).
(क) मुख्यतः निग्रॉईड : (१) मेलानेशियन – पापुअन किंवा ओशनिक, निग्रॉईड (नेग्रिटो + ऑस्ट्रेलॉईड + अंतर्वक्र नाकाचे मेडिटरेनियन + मलेय व पॉलिनीशियन).
(२) बुशमन – हॉटेन्टॉट (नेग्रिटो + अश्मयुकातील बोस्काप + बांटू निग्रो व हॅमेरॉईड मेडिटरेनियन).
(३) टास्मेनियन – (नेग्रिटो + ऑस्ट्रेलियन) आईकस्टेडस वर्गीकरण १९३३.
(१) यूरोपी फॉर्म : मुख्य साठा किंवा गोऱ्यावंशाचे लोक |
|
यूरोपॉईड शारीरिक आकार : |
|
रंग−द्रव्य कमी असलेले उत्तरीय वंश मध्य पट्ट्यातील लघुशीर्षी. |
नॉर्डिडपूर्व यूरोपॉईडअल्पिड्सडिनेरिड्सअर्मेनिड्स टुरानिड्स |
दक्षिण यूरॅसिडस |
मेडिटरेनॉईड्सओरिएंटॅलिड्सइंडीड्स |
दुय्यम वंश |
पॉलीनेसिडस |
जरा दूरचे प्रकार |
वेड्डिड्स |
मध्यम प्रकार |
ऐनूड्स |
(२) निग्री फॉर्म : मुख्यसाठा (काळा वंश) |
|
निग्रीड शारीरिक आकार : |
|
यूरोपॉइडसच्या नजीकच्या पट्ट्यातीलगवताळ प्रदेशातील पट्टे. |
इथियोपिडससूदानीडसनाईलोटीडसबांटूओड्स |
उष्ण प्रदेशीय जुने प्रकार |
पॅलीओनिग्रोडस |
दुय्यम वंशमेलॅनिसिडस्आफ्रिकननिग्रॉईडस शिवाय |
इंडोमेलॅनिड्सनिओमेलॅनिड्स पॅलिओमेलॅनीड्स |
जरा दूरचे प्रकार |
पिग्मिड्स |
मध्यम प्रकार |
ऑस्ट्रेलिड्स |
(३) मंगोली फॉर्म : मुख्य साठा (पिवळट वंश) |
|
मंगोलॉईड शारीरिक आकार : |
|
यूरोपॉईडच्या नजीकच्या पट्ट्यातील उत्तरीय वंश |
सैबेरिडसतुंगीडससिनीड्स |
दक्षिणीय प्रकार |
पॅलिओ−मंगोलिड्स |
इंडियानीड शारीरिक आकारउत्तरीय लघुशीर्षी |
पॅसिफीड्ससेंट्रॅलिड्स |
उत्तरीय लंबशीर्षी |
सिल्हीड्समार्जिड्स |
दक्षिणीय लघुशीर्षी |
ॲन्डीड्सपाटागोनीड्स |
दक्षिणीय लंबशीर्षी |
ब्राझिलीड्सलाजिड्स |
जरा दूरचे प्रकार |
एस्किमॉईड्स |
मध्यम प्रकार |
बुशमन |
अशा प्रकारे वंश वर्गीकरणे ज्यांनी मांडली, त्यांपैकी मॉन्टेन्डॉनचे वर्गीकरण १९३३ लेसर−मिलेटचे वर्गीकरण १९३६ व्हॅलॉईचे वर्गीकरण १९४८ कून–गार्न व बर्डसेलचे वर्गीकरण १९५० व बैसुटीचे वर्गीकरण १९५९ वगैरे उल्लेखनीय आहेत. मात्र ह्या सर्व जागतिक वर्गीकरणांचा आढावा, येथे घेण्याऐवजी भारतातील वंश वर्गीकरणाचा आढावा घेणे श्रेयस्कर होईल.
(ब) भारतातील वंश वर्गीकरण : भारतातील वंश वर्गीकरणाचा प्रश्न जागतिक वर्गीकरणापेक्षा काहीशा निराळ्या पद्धतीने हाताळावा लागेल. उपलब्ध असलेल्या वर्गीकरणासंबंधी विचार करावयाचा झाल्यास, इतकेच सांगता येईल, की कोणतेही वर्गीकरण अपूर्ण आहे. अठरापगड जाती व शेकडो भाषांचा वापर या देशात असल्याने वर्गीकरणासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करणे अतिशय कठीण जाते. हे अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण होय. तसेच बहुसंख्य लोकवस्ती खेड्यांत असून शिक्षितांचे मानही कमी आहे. तसेच आदिवासी जमातींची संख्याही जवळजवळ आठ टक्के आहे. दळणवळणाची साधने, शिक्षणाचा अभाव इत्यादींमुळे अजूनही दूरदूरच्या प्रदेशांतील जमातींचे ज्ञान होऊ शकत नाही. काही महत्त्वाची वंश वर्गीकरणे पुढीलप्रमाणे होत.
सर हर्बर्ट रिश्लेच्या मते भारतात मुख्यत्वे तीन वंशांचे लोक आहेत ते म्हणजे (द्राविडियन, इंडो−आर्यन व मंगोलियन/मंगोल) द्राविडी वंश, इंडो−आर्यांचा वंश व मंगोल वंश. यांपैकी पहिले दोन मिश्र स्वरूपात निरनिराळ्या राज्यांत आढळतात, तर तिसरा वंश मुख्यत्वे आग्नेयीकडील सीमावर्ती भागात व आसाममध्ये आढळतो. तसेच द्राविडी वंश हा खऱ्याअर्थाने वंश मानावा का, कारण तो एक भाषिक गट आहे, असे मत असून तीनही मुख्य वंशांत (कॉकेसॉईड, निग्रॉईड व मंगोल) त्याचे प्रतिनिधी आढळतात. भारतातील लोकांमधील रुंद मस्तकी लक्षणाचा उगम रिश्लेच्या मते मंगोल किंवा सिथियनमध्ये असावा परंतु सर्वच मंगोल वंशीय लोक रुंद मस्तकी असतातच असे नाही व त्या आधारे गुजरात व बंगालमधील लोकांचे वंश वर्गीकरण एकाच निकषावर कसे काय शक्य आहे हे कळणे कठीण आहे. तसेच मंगोल वंशातील लोकांमध्ये आढळणारी वरच्या पापणीची विशिष्ट दुमड, बंगाली लोकांच्यात दिसत नाही. अशा प्रकारचे साधक−बाधक मुद्दे रिश्लेच्या वंश वर्गीकरणाबाबत मांडले गेले. त्याच्या मते खालील तीन मुख्य व इतर दुय्यम असे एकूण सात वंशप्रकार भारतात आढळतात, ते असे :
(१) तुर्को–इराणी : मुख्यत्वे रुंद डोक्याचे, सरळ, मोठ्या नाकाचे व लांब नाकाचे, उंच, काळ्याभोर वा क्वचित गडद राखी रंगाच्या डोळ्यांचे केसाळ व म्हणून भरपूर दाढी–मिशा असलेल्या ह्या वंशप्रकारात बलुची, ब्राहुईव अफगाण लोकांचा समावेश होतो. (स्वातंत्र्यपूर्व काळातील हे वर्गीकरण आहे).
(२) इंडो–आर्यांचा वंश : लांबशीर्षी, लांब परंतु अरुंद नाक, गडद तपकिरी रंगाचे डोळे, उंच व भरपूर केस अंगावर असलेले हे लोक पंजाबी, राजपूत, जाट व खत्री इ. जमातींचे होत.
(३) सिथो−द्राविडी वंश : सिथियन व द्रविडी वंशाचे मिश्र रूपाचा हा वंश होय. रुंद शीर्ष, दिसायला सुरेख, चेहऱ्यावर तुरळक केस, मध्यम उंची, मध्यम बांधा इ. लक्षणांच्या ह्या वंशप्रकारात महाराष्ट्रीय मराठा, ब्राह्मण, गुजरात व कूर्ग येथील कुर्गी इ. लोक येतात. यातील उच्च सामाजिक गटांत सिथियन तर नीच सामाजिक गटांत द्राविडी लक्षणे आढळतात.
(४) आर्य–द्राविडी वंश : आर्य व द्रविडी वंशांचा हा मिश्रसमाज. लंब किंवा मध्य आकाराच्या मस्तकाचे, सौम्य ते गडद तरकिरी रंगाच्या कातडीचे, मध्यम आकाराच्या नाकाचे, कमी उंचीचे अशा लक्षणांचा बनलेला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथील लोकांचा यात समावेश होतो.
(५) मंगोल–द्राविडी वंश : मंगोल व द्रविड वंशाचा मिश्र समाज. रुंद ते मध्यम आकाराची मस्तके, रुंद ते अरुंद प्रकारचे नाक, कातडीचा गडद रंग, चेहऱ्यावर भरपूर केस, मध्यम उंची, ही लक्षणे असलेल्या मुख्यत्वे बंगाली कायस्थांचा यात समावेश होतो.
(६) मंगोल : रुंद मस्तक, रुंद नाक, सपाट चेहरा, डोळ्याच्या पापण्यांची विशिष्ट दुमड, कमी उंची, पिवळट झाक असलेला कातडीचा रंग, अंगावर केसांचे अगदी कमी प्रमाण इ. लक्षणे या प्रकाराची सांगता येतील. आसाम, नेपाळ, मणिपूर, ब्रह्मदेश, नागालँड, येथील लोकांचा यात समावेश होतो.
(७) द्राविडी वंश : लंब मस्तकी, रुंद नाक व बसकी नाके, काळ्या रंगाचे डोळे, कातडी व केसांचा काळाभोर रंग, उंचीने खुजे अशीलक्षणे असलेले लोक बहुधा द. भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच मध्य प्रदेशाचा दक्षिणेकडचा भाग, छोटा नागपूर इ. भूप्रदेशांत राहतात.
या रिश्लेच्या वर्गीकरणाशी ए. सी. हॅडन सहमत नाही. हॅडनने शारीरिक घटकगुण, संस्कृती, रूढ समजुती, भाषा, लोककथा इ. निकषांचे आधारे भारताचे तीन भौगोलिक विभागांमध्ये वर्गीकरण केले व त्यानुसार वंशवर्गीकरण मांडले आहे
(१) हिमालयाचा परिसर : (अ) इंडो–आर्यन वंश : दिसायला सुरेख, उंच, काळेभोर डोळे, अरुंद पण लांब नाक इ. लक्षणांनुसार कुलूच्या खोऱ्यातील लोक, तसेच नेपाळी व पूर्व पंजाबातील लोकांचा यात समावेश होतो.
(ब) मंगोल वंशीय : यात भारताच्या ईशान्य पट्ट्यात येणारे लोक विशेषतः लेपचा, गारो, नागा, खासी, डफला वगैरे जमातींचे लोक, तसेच नेपाळ, भूतान, सिक्कीम, काश्मीर व पंजाब येथील लोकांचा समावेश होतो.
(२) उत्तरेकडील सपाटीचा प्रदेश : या प्रदेशातील लोकांना हिंदूस्थानी असे नाव हॅडनने दिले आहे. यांमध्ये जाट, राजपूत या लोकांचा समावेश असून त्यांमध्ये इंडो–आर्यन वंश प्रामुख्याने आढळतो.
(३) दक्षिणेचा परिसर : (अ) नेग्रिटो : मध्यम आकाराचे मस्तक, अतिशय रुंद व म्हणूनच सपाट भासणारे आखूड नाक, सपाट पश्च कपालखंड, कपाळाचा भाग पुढे ओढलेल्या अवस्थेत, काळा रंग, काळेभोर केस, गडद तपकिरी रंगाचे डोळे, जाड व काहीसे पुढे आलेले ओठ वगैरे लक्षणे या प्रकारात येतात. कोचीनमधील कादर, निलगिरी टेकड्यांतील उरुला वगैरे जमातींचा यात समावेश होतो.
(ब) द्राविड−पूर्व वंश : लंब मस्तकी, रुंद व आखूड नाक आणि कमी अगर मध्यम उंचीचे हे लोक वर्णाने सावळे किंवा काळसर आहेत. उदा., संथाळ, भिल्ल, गोंड वगैरे.
(क) द्राविड वंश : लांबट मस्तक, मध्यम प्रतीचे नाक, मध्यम उंची, तपकिरी ते काळसर रंग वगैरे लक्षणे या वंशप्रकारात येतात. तमिळी ब्राह्मण, मलबारी तसेच त्रावणकोर, कोचीन येथील लोकांचा यात समावेश होतो.
(ड) दक्षिणी रुंद मस्तकाचे लोक. उदा., पणियन, तमिळ वगैरे.
(ई) पश्चिमी रुंद मस्तकाचे लोक उदा., नागर ब्राह्मण, कूर्गी लोक वगैरे.
हॅडनच्या मते द्राविड–पूर्व हे भारतातील मूळचे लोक असावेत. त्यांच्याबरोबर द्रविडियनांचाही समावेश होतो परंतु आर्य मात्र इसवी सनाच्या पूर्वी काही शतके भारतात आले असावेत. त्यापूर्वी भारतात वांशिक स्थिती काय होती, याबाबत हॅडनने काहीही भाष्य केले नाही.
बी. एस्. गुहांचे वर्गीकरण : १९३१ च्या जनगणनेच्या काळामध्ये मानवमितीची शास्त्रशुद्ध मोजमापे वापरून भारतातील वांशिक स्थितीसंबंधी विस्तृत व अभ्यासपूर्ण वर्गीकरण त्यांनी मांडले. जरी थोडीफार टीका झाली असली, तरी जागतिक वर्तुळात भारतातील गुहांचे वर्गीकरण सर्वमान्य झाले आहे. भौतिकी मानवशास्त्राच्या अद्यावत मानवमितीच्या तंत्राचा वंश वर्गीकरणाच्या दृष्टीने विस्तृत प्रमाणावर सर्वप्रथम उपयोग, हे या वर्गीकरणाचे वैशिष्ट्य होय. इतरांना आलेल्या अडचणींवर मात करून शक्य होईल तितकी अधिक लोकसंख्या यामध्ये समाविष्ट करून घेतली आहे. १९३१ च्या जनगणनेच्या निष्कर्षांच्या प्रकाशित झालेल्या अनेक भागांपैकी एका संपूर्ण भागामध्ये याचे विस्तृत वर्णन आढळते. गुहांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे मांडता येईल :
(१) नेग्रिटो : या वंशाचे लोक भारतात सर्वप्रथम आलेल्या लोकांपैकी होत. ते सर्व जगातील आफ्रिका, मेलानेशिया, ऑस्ट्रेलिया व त्याभोवतालचे प्रदेश यांतून आढळणाऱ्यानिग्रो वंशाशी साम्य दर्शवितात. कमी उंचीचे, काळसर रंगाचे, मेंढीच्या लोकरीइतक्या कुरळ्या केसांचे, बहुतांशी लंब मस्तकी (क्वचित मध्यम व रुंद मस्तकीही आढळतात), जाड ओठांचे की जे काहीसे पुढे आलेल्या स्वरुपातील दिसतात, असे वर्णन या वंशाच्या लोकांना लागू पडते. कोचीनमधील कादर, इरुला वगैरे जमातींचे लोक या प्रकारात मोडतात. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या अस्तित्वासंबंधी बऱ्याच मानवशास्त्रज्ञांत दुमत दिसते.
(२) प्रोटो−ऑस्ट्रेलॉईड : भारतातील मूळच्या लोकांच्या यादीत यांचा दुसरा क्रमांक लागतो. गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे, रुंद ते अतिरुंद–सपाट फताड्या नाकाचे तसेच नाक बसके, तरंगात्मक व काही काही वेळा कुरळे केस, कमी उंचीचे असे वर्णन या वंशाच्या लोकांचे केले जाते. मध्य व दक्षिण भारतातील जुने आदिवासी गट, तसेच पश्चिम भारतातील व गंगेच्या खोऱ्यातील हिंदू धर्माच्या आदिवासी टोळ्या, ओराओं, संथाळ, मुंडा वगैरे छोटा नागपूर भागातील आदिवासी चेंचू, कुरुंबा, येरवा व बदागा हे दक्षिण भारतीय व भिल्ल, कोल इ. मध्य व पश्चिम भारतातील आदिवासी जमातींचा यात समावेश होतो. थोडक्यात हिमालय व उत्तर भारतातील आदिवासी सोडल्यास, बहुसंख्य आदिवासी या गटात येतात.
काही मानवशास्त्रज्ञांच्या मते गुहांचे हे वर्गीकरण काही जमातींना लागू होत नाही. उदा., मुंडा जमात. ही जमात स्थलांतरित असून त्यांच्यापासून झालेल्या संकरित समाजाचे, उदा., खारिया–मुंडा, महाली−मुंडा, ओशॅन−मुंडा, भूमीज−मुंडा इत्यादींचे या वर्गीकरणात स्थान काय?
(३) मंगोलॉईड : या वंशाचे लोक ईशान्यकडून निरनिराळ्या वेळी भारतात शिरले असावेत. सपाट चेहरा, चेहेऱ्याची वर उचललेली लक्षणीय हाडे, तुरळक केस व खास वैशिष्ट्यपूर्ण पापणीची दुमड ही त्यांची काही वैशिष्ट्ये होत. यांचे अनेक उपवंश आहेत. गुहांच्या मते मुख्य दोन उपवंश असे : (अ) लांबट मस्तकाचे व रुंद मस्तकाचे पॅलिओ−मंगोलॉईड आणि (ब) तिबेटो−मंगोलॉईड.
(अ) लांबट मस्तकाचे पॅलिओ–मंगोलॉईड–लांबट किंवा मध्यम आकाराचे मस्तक, लक्षणीय पश्चकपाल, मध्यम प्रतीचे–आखूड नाक, सपाट चेहरा, डोळ्यांची ठेवण तिरकस व नेहमीची पापणीची लक्षणीय दुमड न आढळता क्वचित आढळणारी, सौम्य, तपकिरी व गडद तपकिरी रंग इ. लक्षणे असणारे लोक हिमालयाशी संलग्न असणाऱ्याप्रदेशात राहतात तसेच आसाम व ब्रह्मदेशातील लढाऊ जमातींचा यामध्ये समावेश होतो.
रुंद मस्तकी पॅलिओ−मंगोलॉईड : रुंद मस्तक, गडद रंग, मध्यम प्रकारातील नाक, वैशिष्ट्यपूर्ण पापणीची दुमड, सपाट व लहानसा चेहरा, सरळ लांबसडक केस, क्वचितच तरंगित केस इ. लक्षणे या प्रकारात आढळतात. लेपचा आणि छोटा नागपूरमधील काही डोंगरी आदिवासींच्या टोळ्यांचा यात समावेश होतो.
(ब) तिबेटो−मंगोलॉईड : रुंद मस्तक, लांबट परंतु सपाट चेहरा, लांब परंतु मध्यम रुंदीचे नाक, डोळ्याची तिरकस ठेवण, पापणीची दुमड, शरीरावरील केसांचे कमीत कमी प्रमाण इ. भूतान व सिक्कीम प्रदेशांतील लोकांचा या लक्षणांच्या वंशात समावेश होतो.
(४) मेडिटरेनियन : (अ) पॅलिओ–मेडिटरेनियन : लांब न उंच घुमटाचे मस्तक, पुढे आलेले कपाळ, रुंद व आखूड नाक, कातडीचा गडद रंग, मध्यम उंची, अरुंद चेहरा, केसांचे शरीरावर कमी प्रमाण इत्यादी या लोकांमध्ये तमिळी ब्राह्मण, नायर आणि द. भारतातील तेलुगू ब्राह्मणांचा समावेश होतो.
(ब) मेडिटरेनियन : मस्तक व चेहरा लांबट, अरुंद नाक, उंची मध्यम ते उंच, गडद किंवा बदामी रंगाचे, शरीरावरील केसांचे भरपूर प्रमाण इ. लक्षणांनुसार इंदूरमधील मराठा, कोचीनमधील नंबुद्री ब्राह्मण व अलाहाबादमधील ब्राह्मण यांचा समावेश होतो.
(क) प्राच्य प्रकार : लांब व अंतर्वक्र नाक एवढे सोडल्यास बाकी सर्व लक्षणे वरीलप्रमाणेच असणारे राजपुतान्यातील भय्ये, पंजाबी, खत्री इत्यादींचा यांत समावेश होतो.
(५) पश्चिमी रुंद मस्तकी वंश : (अ) अल्पिनॉईड–रुंद मस्तक, गोलाकार पश्चकपाल, गोल चेहरा, लक्षणीय नासिका, मध्यम उंची, सौम्य रंग, शरीर व चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात केस असलेल्या या वंशप्रकारात गुजराथी व्यापारी, काठेवाडचे काठी व बंगाली कायस्थ यांचा समावेश होतो.
(ब) डिनेरिक : रुंद मस्तक, गोलाकार पश्चकपाल, उंच घुमटाचे मस्तक, लांबट व बहुधा आंतर्वक्र नाक, लांबट चेहरा, उंच, किंचित गडद रंगाच्या या वंशप्रकारात बंगाल, ओरिसा व कूर्गमधील लोकांचा समावेश होतो.
(क) अर्मेनॉईड : रुंद मस्तक, अरुंद नाक, गोरा रंग, खुजे ते मध्यम उंची असणाऱ्याया प्रकारात मुख्यत्वे पारशी, बंगाली वैद्य व कायस्थ यांचा समावेश होतो.
(६) नॉर्डिक्स : लांबट मस्तक, काहीसे बाकदार कपाळ, पुढे झुकलेले पश्चकपाल, सरळसोट व उचलल्या गेलेल्या स्थितीतील नाक, लांबट चेहरा, गुलाबी रंग, उंच ते मध्यम उंची, धट्ट्याकट्ट्या शरीरयष्टीचे, निळसर ते तपकिरी डोळे असणारे. या लोकात विजापूरच्या पठाणांचा विशेषेकरून समावेश होत असला, तरी हा वंश संपूर्ण भारतभर पसरला आहे.
मेडिटरेनियन हे मूलभूत लक्षण ब्राह्मण व उच्च जातीत जास्त प्रमाणात आढळते असे जरी गुहांचे मत असले, तरी अल्पाइन व प्रोटोनॉर्डिक ही लक्षणेही भारतातील पश्चिम भागामध्ये व विशेषतः बंगालमध्ये अधिक प्रमाणात असल्याचेही त्यांचे मत आहे. अल्पाइन व नॉर्डिक लक्षणे आर्यांच्या भारतातील आगमनापासून आली असली पाहिजेत असा कयास आहे. आदिम जाती–जमातीमध्ये मुख्यतः पुढील चार प्रकारांची लक्षणे आढळतात : (१) अरुंद, लांब व सर्वसाधारण मध्यम उंचीचे, मस्तकी घुमट, लक्षणीय अधिनेत्रक कंगोरे, रुंद परंतु लहानसा चेहरा, तोंडाचा भाग काहीसा पुढे आलेला.
(२) गडद रंग, खुजे, अतिशय दाट व कुरळे केस इ. लक्षणांचा दुसरा प्रकार कादर व पुलियन जमातींमध्ये आढळतो.
(३) रुंद मस्तकाच्या मंगोलियन लक्षणांचा हा तिसरा प्रकार मुख्यतः आसाम व ब्रह्मदेश येथील लोकांत आढळतो.
(४) हा चवथा प्रकार म्हणजे मंगोलियनांमधील उपप्रकार म्हणता येईल. मध्यम उंची, उंच घुमट, नाकाचा मध्यम आकार आणि वैशिष्ट्यपूर्ण मंगोलियन चेहरा व डोळ्यांचा भाग असे वर्णन या प्रकारास लागू पडते. ही लक्षणे मुख्यतः उत्तरेकडील टेकड्यांच्या प्रदेशातील व ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील लोकांमध्ये आढळतात. तसेच वरील चार प्रकारांपैकी पहिल्या प्रकारांमध्ये बहुतेक मध्य व दक्षिण भारतातील आदिम जाती–जमातींचा समावेश गुहाने केलेला दिसतो. गुहाच्या वंश वर्गीकरणावर टीकाही केली जाते. उदा., भारतात आढळणाऱ्यानेग्रिटो लक्षणांच्या उगमासंबंधी अगर अस्तित्वासंबंधी गुहांच्या विरोधी मते मांडली जातात. कोचीनमधील कादर लोक लांबट मस्तकाचे असल्याने, त्यांना गुहाने नेग्रिटो लक्षणांचा दर्जा दिला. परंतु कात्रफाझ द ब्रेओ याच्या मते नेग्रिटो लक्षणांच्या समूहामध्ये रुंद मस्तकाच्या लोकांचा समावेश होतो. त्यामुळे कादर वरील प्रकारात येऊच शकत नाहीत.
नेग्रिटो लक्षणांच्या उद्गम व अस्तित्वाबाबत पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. गुहा, कात्रफाझ, अय्यपन, हॅडन, हूटन, अय्यर, बसू, सी. व्ही. वेंकटाचारी इ. संशोधकांच्या लिखाणाने यास पुष्टी मिळते. दक्षिण भारतात द्रविडियन वंशाच्या लोकांमध्ये तसेच काही आदिवासी जमातींमध्ये नेग्रिटो लक्षणे आढळतात, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे परंतु त्याच्या कारणमीमांसेमध्ये मतैक्य नाही.
भारतातील वर्गीकरणासंबंधी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती अशी की बहुतेक वर्गीकरणांमध्ये अफगाणिस्तान, नेपाळ, सिक्कीम, भूतान, ब्रह्मदेश वगैरे प्रदेशांतील लोकांचाही काही प्रमाणात समावेश केला आहे कारण सर्व वर्गीकरणे स्वातंत्र्यपूर्व काळातील, फाळणीपूर्वीची आहेत. ब्रिटिश अमदानीतील बहुतेक प्रदेशांतील जुन्या भारतीय प्रदेशातील लोकांचा यामुळे सर्व वर्गीकरणात समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर कालात भारताच्या सीमा बदलल्या. तसेच १९५० च्या नंतर व १९६५ च्या नंतर विशेषतः वंश संकल्पनेमध्ये बदल झाला असून अशी वर्गीकरणे केवळ प्राणिविज्ञानाच्या दृष्टिकानातून केली जातात. तसेच आनुवंशिकीशास्त्राच्या प्रगतीमुळे प्रत्येक व्यक्तीची जननिक प्रकृती स्वतंत्र असल्याचे दिसून आल्याने, मूळ वंश संकल्पनेला–समूहाच्या पायावर आधारित असलेल्या–धक्का लागला. दळणवळणाच्या सोयी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असून मिश्र समाजांची व तदनुषांगाने नवीन वंशांची स्थापना होत असून, मूळ वंश संकल्पनेवर अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे.
संदर्भ : 1. Alice, Littlefield Leonard, Libermann Larry. T. Reynalds, The Potential Demise of Concept in Physical Anthropology, Current Anthropology. Vol. 23, No. 6, December, 1982, Chicago.
2. Beals, R. L. Hoijer, Harry, An Introduction to Anthropology, New York, 1959.
3. Benedict, Ruth, Race, Science and Politics, New York, 1959.
4. Cavalli−Sforza, L. L. Bodmer, W. F. The Genetics of Humsn Populations, London, 1971.
5. Comas, Juan, Manual of Physical Anthropology, Springfild (III.), 1960.
6. Coon, C. S. Living Races of Man, London, 1966.
7. Coon, C. S. The Origin of Races, London, 1962.
8. Garn, S. M. Ed. Readings on Race, Springfield (III.), 1968.
9. Garn, S. M. Human Races, Springfield (III.), 1969.
10. Hooton, E. A. Up from the Ape, New York, 1947.
11. King, J. C. The Biology of Race, New York, 1971.
12. Levin, M. G. Michael, H. N. Trans. & Ed. Ethnic Origins of the Peoples of Northeastern Asia, Toronto, 1963.
13. Lowie, R. H. The History of Ethnological Theory, London, 1966.
14. Majumdar, D. N. Races and Cultures of India, Bombay.1958.
15. Mead, Margaret etal, Ed. Science and the Concept of Race, New York, 1968.
16. Montagu, M.F. Ashley, Ed. Culture and Evolution of Man, Oxford, 1962.
17. Montagu, M. F. Ashley, Race and I.Q. London, 1975.
18. Nesturkh, M. Hanna, George, Trans. The Races of Mankind, Moscow, 1966.
19. Oakley, K. P. The Problem of Man’s Antiquity: an Historical Survey, London, 1966.
20. Sarkar, R. M. Fundamental of Physical Anthropology, Calcutta, 1970.
21. Shibutani, T. Kwan, K. M. Ethnic Stratification, London, 1965.
22. UNESCO, Statement on Race, Washington, 1951.
कुलकर्णी, वि. श्री.
“