मात्सुओ बाशो : (१६४४–१६९४). श्रेष्ठ जपानी कवी. खरे नाव मात्सुओ मूनेफूसा. ‘बाशो’ ह्या नावानेही प्रसिद्ध. इगा प्रांतातील यूएनो येथे जन्मला. बाशो हा मूळचा योद्धा. एका सरंजामशहाच्या नोकरीत तो होता. तथापि वयाच्या सु. तेविसाव्या वर्षी ही नोकरी सोडून देऊन त्याने सर्वस्वी कवितेस वाहून घेतले. ‘हायकू’ ह्या काव्यप्रकाराचा (हायकू ही एक छोटी, सुभाषितात्मक कविता) अभ्यास करून त्यावर त्याने प्रभुत्व मिळविले थोर कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली. पुढे त्याने झेन ह्या धर्मपंथाचा स्वीकार केला (बौद्धांच्या महायान पंथातील, चीन-जपानमध्ये विकसित झालेला हा एक पंथ). एका साध्या पर्णकुटीत तो राहू लागला. झेन तत्त्वज्ञानाचा बाशोच्या कवितेवर मोठा प्रभाव आहे.
बाशोला प्रवासाची आवड होती. आपल्या प्रवासाचे गद्य-पद्य वृत्तांत त्याने लिहून ठेवले. पद्य वृत्तांत ‘हायकू’ ह्या काव्यप्रकारात आहेत. बाशोच्या श्रेष्ठ प्रतिभेचा प्रत्यय त्यांतून येतो. उत्तर जपानच्या त्याच्या प्रवासाचा वृत्तांत–ओकू-नो-होसोमिची (१६९४)– द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ ह्या नावाने इंग्रजीत अनुवादिला गेला आहे.
वाचकाच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणाऱ्या आणि चेतवणाऱ्या आपल्या मितभाषी कवितेने बाशोने ‘हायकू’ ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न केली आणि कलात्मक आविष्काराचे प्रभावी साधन म्हणून ‘हायकू’ ला मोठी मान्यता प्राप्त करून दिली. ओसाका येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.