फरिदुद्दिन अत्तार : (बारावे-तेरावे शतक). विख्यात सूफी पंथीय फार्सी कवी. फरिद-अल् दिन ‘अत्तार, मुहंमद’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. इराणचे सूफी कवी इब्राहीम ह्यांचा हा पुत्र. त्याचा जन्म १११७ किंवा १११८ मध्ये झाला असावा. ११९३ ते १२३४ ह्या दरम्यान केव्हा तेरी त्याचा मृत्यू झाला असावा, असे या संदर्भातील वेगवेगळी मते पाहता दिसते. प्रा. सईद नफीसी ह्यांच्या मते त्याची जन्ममृत्यूची वर्षे अनुक्रमे ११३६ व १२३० असावीत. नीशापूर (खोरासानमधील एक शहर) किंवा त्याचा परिसर हे फरिदुद्दिनचे जन्मस्थळ.
फरिदुद्दिन अत्तारने एकूण ११४ ग्रंथ लिहिले, असे एक मत आहे. कुराणात एकूण ११४ ‘सुरा’ किंवा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक सुरेवर एकेक ग्रंथ रचण्याच्या उद्देशाने हे ११४ ग्रंथ लिहिले गेले, असेही म्हटले जाते. फरिदुद्दिनच्या नावावर मोडणाऱ्या ६४ ग्रंथांचा निर्देश करून सईद नफीसी ह्यांनी त्यांतील केवळ बाराच ग्रंथ फरिदुद्दिनचे असल्याचे आपले मत मांडले आहे.
फरिदुद्दिनने लिहिलेल्या मसनवींमध्ये मन्तिकुत्तैर ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. ही मसनवी म्हणजे एक रूपक आहे. काही पक्षी सीमुर्गाच्या (फीनिक्स पक्षाच्या) शोधात निघतात. सीमुर्गाला आपला राजा करावे, अशी त्यांची इच्छा असते. तथापि ह्या शोधयात्रेतून अनेक पक्षी निरनिराळ्या सबबी सांगून बाजूला होतात. ह्या यात्रेचा अखेरचा टप्पा तीस पक्षीच गाठू शकतात आणि त्यांनाही आपणच सीमुर्ग असल्याचा साक्षात्कार होतो. मनुष्य ईश्वराचा शोध घेत असतो पण खरोखर त्याच्या स्वतःच्याच ठायी ईश्वरत्व असते ते त्याने जाणून मात्र घेतले पाहिजे, असा विचार ह्या रूपकातून त्याने सूचित केला आहे. श्रेष्ठ इस्लामी धर्मशास्त्रवेत्ता ⇨अल् गझाली ह्याने सांगितलेल्या एका कथेच्या आधारे मन्तिकुत्तैरची रचना झालेली दिसते. इंग्रज कवी एडवर्ड फिट्सजेरल्ड ह्याने ह्या मसनवीचा इंग्रजी अनुवाद बर्ड-पार्लमेंट ह्या नावाने केलेला आहे (१८९९). इलाहीनामा, मुसीबसनामा आणि अस्त्रारनामा ह्या फरिदुद्दिनच्या अन्य उल्लेखनीय मसनवी होत. इलाहीनाम्यामध्ये क्षणभंगुर भौतिक सुखांची आणि संपत्तीची निरर्थकता सांगून चिरंतनाचा शोध घेणे, हेच मानवाचे खरे ध्येय होय तेच त्याला खराखुरा आनंद प्राप्त देऊ शकेल असे सांगितले आहे. आपली संभ्रमावस्था नष्ट करून ईश्वराप्रत जाण्यापूर्वी जीवाला चाळीस अवस्थांमधून कसे जावे लागते, हे मुसीबतनाम्यात दाखविले आहे. विख्यात सूफी पंथीय कवी मौलाना ⇨ रूमी ह्याच्यावर अस्त्रारनाम्याचा मोठा प्रभाव पडला.
फरिदुद्दिनने मुख्तारनामा, पन्दनामा, काही उद्देशिका व भावकविता अशी इतरही रचना केली. मुख्तारनाम्यात, निरनिराळ्या ५० शीर्षकांखाली, दोन हजारांहून अधिक रुबाया आहेत. पन्दनामा ही ८५० कडव्यांची आणि अत्यंत लोकप्रिय रचना आहे. त्याच्या भावकविता आणि उद्देशिका एका दिवाणात संगृहीत आहेत (प्रकाशित, १९४०). तझकिरतुल औलीया ह्या नावाने त्याने इस्लामी संतांची व गूढवाद्यांची चरित्रे आणि वचने संकलित केली. सूफी पंथाच्या अभ्यासकांना हे संकलन मोलाचे वाटते.
नईमुद्दीन, सैय्यद