आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष : अनेक राष्ट्रांतील शास्त्रज्ञांनी एकमेकांच्या सहकार्याने १ जुलै १९५७ ते ३१ डिसेंबर १९५८ या १८ महिन्यांच्या कालावधीत भूभौतिकीय समन्वेषण करण्याचा (पाहणी करून माहिती गोळा करण्याचा) एक विस्तृत कार्यक्रम आखलेला होता. या कालावधीस ‘आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष’ (इंटरनॅशनल जिऑफिजिकल इयर, ΙGY) असे नाव देण्यात आलेले आहे.
भूभौतिकीय आविष्कार : आपणास दिसणाऱ्या नैसर्गिक घडामोडींचे गूढ उकलण्यासाठी एकूण पृथ्वीविषयी व विशेषत:पृथ्वीची संरचना व पृथ्वीत होणारे फेरफार यांविषयी शक्य तितकी माहिती मिळविणे आवश्यक असते. ही माहिती मुख्यत:भूवैज्ञानिक व भूभौतिक पद्धतींनी मिळविली जाते. भूवैज्ञानिक पद्धतींनी केलेले पृथ्वीचे अन्वेषण (संशोधन) सामान्यत:प्रत्यक्ष परीक्षणाने केले जाते. भूभौतिकीय पद्धतींत भौतिकीय तत्त्वांवर आधारलेल्या पद्धती व उपकरणे वापरली जातात व या पद्धतींनी केलेले अन्वेषण सामान्यत: अप्रत्यक्ष परीक्षणावर अवलंबून असते.
वारे, सागरी प्रवाह, हिमाचे पाणी होणे, पाण्याची वाफ होऊन ढग बनणे व त्या ढगांपासून पुन्हा पाऊस किंवा हिमवर्षाव होणे इ. घडून येणाऱ्या चक्री क्रिया चालू ठेवण्यात सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वाटा महत्त्वाचा असतो. त्यामुळे हवामान व जलवायुस्थिती (दीर्घावधीची सरासरी हवामान परिस्थिती) यांचे स्वरूप ठरविण्यासाठी सूर्याच्या ऊर्जेचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
सूर्यावरील डाग, शिखा इ. प्रक्षोभ निर्माण झाल्यामुळे भूचुंबकीय वादले निर्माण होतात. सूर्याच्या या सक्रियतेमुळे (क्रियाशीलतेमुळे) ध्रुवांभोवतालच्या किंवा त्यांच्या लगतच्या प्रदेशात, आकाशातील उंच जागी दिसणाऱ्या ⇨ध्रुवीय प्रकाशाच्या स्वरूपात बदल होतात. पृथ्वीच्या पृष्ठापासून ३२ किमी.हून अधिक उंच जागी असणाऱ्या पृथ्वीभोवतालच्या ⇨आयनांबराच्या थरांपासून संदेशवाहक रेडिओलघुतरंग परावर्तित होत असल्यामुळे प्रक्षेपण स्थानापासून ते दूरवर पोचू शकतात. या दूरवर्ती बिनतारी संदेशवहनात निर्माण होणारे अडथळे व सूर्याची सक्रियता यांचा परस्परसंबंध आहे. उच्च वातावरणात, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३२ किमी. ते ९६० किमी. इतक्या उंचीवर असणाऱ्या मंडलाकार भागात, सूर्यापासून तसेच इतर ताऱ्यांपासून व ग्रहांच्या मधील अवकाशातून आलेल्या कणांचा व प्रारणांच्या (विद्युत् चुंबकीय ऊर्जेचा) भरणा असतो. या कणांच्या व प्रारणांच्या प्रमाणावरही सूर्याच्या सक्रियतेचा परिणाम होतो. सूर्यापासून निघून पृथ्वीवर पोचणाऱ्या किरणांचा परिणाम पृथ्वीच्या सर्व पृष्ठावर व तिच्या भोवतीच्या वातावरणावर होत असल्यामुळे व तो परिणाम सुर्याच्या सक्रियतेशी निगडित असल्यामुळे सूर्याचे तसेच त्याच्या सक्रियतेचे अध्ययन महत्त्वाचे ठरले आहे.
अवकाशातून सर्व दिशांनी येणाऱ्या ⇨विश्वाकिरणांचा(अतिभेदक किरणांचा)पृथ्वीकडे सतत वर्षाव होत असतो,पण पृथ्वीकडे येताना वाटेतील उच्च वातावरणातल्या कणांशी टक्कर होऊन त्यांच्यापासून द्वितीयक विश्वकिरण तयार होतात व तेच पृथ्वीच्या पृष्ठावर येतात.प्राथमिक विश्वकिरण पृथ्वीवर पोचू शकत नाहीत. प्राथमिक विश्वकिरणांची माहिती मिळविणे हाही भूभौतिकीय अन्वेषणाचा विषय आहे.
भूभौतिकीय अन्वेषणाचे यापेक्षा वेगळ्या प्रकारचे विषय म्हणजे पृथ्वीचा आकार, आकारमान व तिच्यावरील काही निवडक स्थानांचे अक्षांश व रेखांश अचूक ठरविणे, अंटार्क्टिकातील व ग्रीनलंडातील बर्फाच्या थरांची जाडी व त्यांचे परिणाम ठरविणे, बर्फाने झाकलेल्या अंटार्क्टिकाच्या भूमीविषयी माहिती मिळविणे, सागर–महासागरांच्या पाण्याचे पृष्ठीय व खोल जागेतील प्रवाह, महासागरांच्या तळाशी असलेल्या जमिनीचे व तिच्यावर साचलेल्या गाळांचे स्वरूप इ.व पृथ्वीच्या संरचनेविषयी अन्वेषण, ही होत.यांपैकी शेवटच्या विषयाने भूकंपाचा उलगडा होण्यास मदत होत असल्यामुळे त्याचे व्यावहारिक महत्त्व स्पष्ट आहे.
भूभौतिकीय वर्षातील कार्याचा आराखडा : एकूण पृथ्वीविषयी वर वर्णन केलेली माहिती मिळविणे हे थोड्या व्यक्तींकडून होणारे कार्य नाही. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांतील शेकडो अभ्यासकांनी मिळविलेली माहिती सहकार्य करून एकत्र करता आली, तर हे उद्दिष्ट थोड्या वेळात व अल्प खर्चात साध्य होणे शक्य असते. अशा कार्यात राजकीय अडचणी उद्भवणेही शक्य असते. एखादा समुद्र किंवा पर्वत अनेक राष्ट्रांच्या हद्दीतून जात असेल, तर त्या राष्ट्रांनी सहकार्य केल्यासच त्या समुद्राची किंवा पर्वताची सर्वांगीण माहिती मिळविणे शक्य असते. आंतरराष्ट्रीय भूभौतिक व इतर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था तसेच निरनिराळ्या देशांतील वैज्ञानिक संस्था यांच्यात त्यांनी मिळविलेल्या माहितीची देवाणघेवाणही होत असते.
आंतरराष्ट्रीय सहकार्याने पृथ्वीविषयक घटनांचे अन्वेषण प्रथम १८८२-८३ व नंतर १९३२-३३ साली झाले होते. या अन्वेषणकालावधींना ‘ध्रुवीय वर्षे’ म्हणतात आणि त्या ध्रुवीय वर्षांत भूचुंबकत्व व ध्रुवीय प्रकाश यासंबंधी विस्तृत व सखोल अन्वेषण झाले. त्यापुढील आंतरराष्ट्रीय सहकार्याने पृथ्वीविषयक घटनांचे अन्वेषण कार्य करण्याचा अठरा महिन्यांचा कालावधी म्हणजे १ जुलै १९५७ पासून तो ३१ डिसेंबर १९५८ हा (IGY)होय. पुढे हा अवधी बारा महिन्यांनी वाढविण्यात आला व वाढविलेल्या कालावधीला ‘आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय सहकार वर्ष (इंटरनॅशनल जिऑफिजिकल को-ऑपरेशन इयर, IGCY) १९५९’ म्हणतात.
विज्ञानांची व तंत्रविज्ञानांची प्रगती १९३३ नंतर वेगाने होत गेली व अतिशय संवेदनक्षम व अचूक मापने करणारी उपकरणे व संगणक (गणितकृत्य करणारी) यंत्रे उपलब्ध झाली. त्यामुळे भूभौतिकीय व संलग्न विषयांचे सांगोपांग अध्ययन करण्यास विशेष चालना मिळाली. १९५० साली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वैज्ञानिकांनी इतर राष्ट्रांतील भूभौतिकीविदांशी व वैज्ञानिक संस्थांशी संपर्क साधून पूर्वीच्या दोन ध्रुवीय वर्षांप्रमाणे तिसऱ्या ध्रुवीय वर्षाची योजना कार्यवाहीत आणण्याच्या शक्याशक्यतेसंबंधी विचारविनिमय केला व एक योजनाही तयार केली. असेच आणखी काही प्रयत्न झाल्यावर ⇨इंटरनॅशनस कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्सलाही ही योजना पसंत पडली व विस्तृत प्रमाणावर अन्वेषण करण्याची योजना तयार करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यास आली. या समितीत ज्योतिषशास्त्र, भूगोल, भूगणित, रेडिओ भौतिकी आणि जागतिक जलवायुस्थिती या विषयांतील तज्ञ होते. या समितीने कार्याचा आराखडा तयार केला व तो कसा, कोठे व कोणी कार्यवाहीत आणावयाचा हे ठरविले. सौर चक्रातील प्रचंड खळबळाट होण्याच्या कालावधीचा आंतरराष्ट्रीय निरीक्षणाच्या कालात समावेश होईल, अशाच रीतीने आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षाचा कालावधी ठरविण्यात आला.
या प्रचंड प्रमाणात झालेल्या अन्वेषणात पृथ्वीवरील सत्तराहून अधिक राष्ट्रांनी, प्रगत अशा पाश्चिमात्य राष्ट्रांप्रमाणेच आशिया खंडातील जपान, व्हिएटनाम, इझ्राएल, इराण, भारत, पाकिस्तान इ. राष्ट्रांनीही भाग घेतला होता. निरनिराळ्या देशांतील २,५०० केंद्रांवर निरीक्षणाची व्यवस्था केली होती. त्यांशिवाय अनेक तात्पुरती नवीन केंद्रे उभारण्यात आली होती. अशांपैकी उल्लेखनीय म्हणजे बारा प्रमुख राष्ट्रांनी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उभारलेली अन्वेषण केंद्रे होत. अंटार्क्टिका हे केवळ वैज्ञानिक संशोधनासाठी राखले जावे व राजकीय झगडे किंवा युद्ध यांपासून ते अलिप्त ठेविले जावे, असे या बारा राष्ट्रांनी एकमताने ठरविले. या आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षात जवळजवळ दहा हजार वैज्ञानिकांनी, हजारो तंत्रज्ञांनी व निरीक्षकांनी भाग घेतला. या जगड्व्याळ अन्वेषणांचा खर्च सु.५० कोटी डॉलर झाला.
अन्वेषणाचे विषय : अन्वेषणासाठी ध्रुवीय प्रकाश व वात-प्रकाश (उच्च वातावरणात उत्पन्न होऊन, रात्री आकाशात दिसणारा प्रकाश), विश्वकिरण, भूचुंबकत्व, गुरुत्वप्रवेग, हिमनदीविज्ञान, आयनद्रायु (आयनद्रायू म्हणजे धनविद्युत् भारित अणुकेंद्रे व ऋणविद्युत् भारित इलेक्ट्रॉन यांनी बनलेला व समूहद्दष्ट्या विद्युत् भाररहित परंतु विद्युत् संवाहक असलेला वायू) भौतिकी, अक्षांश–रेखांश निश्चिती, जलवायुविज्ञान, महासागरविज्ञान, भूकंपविज्ञान व सौरक्रिया हे विषय निवडण्यात आले होते. यांपैकी प्रत्येकासाठी पृथ्वीवरील अनेक ठिकाणी व निरनिराळ्या उंचींवर किंवा सागरातील खोलींवर निरीक्षणे घेणे अवश्य होते. निरीक्षणे एकसमयावच्छेदे घेतलेली असली म्हणजे त्यांचा परस्परसंबंध समजून येणे शक्य असते व कित्येक गोष्टींसाठी, उदा., ध्रुवीय प्रकाशाची उंची ठरविण्यासाठी, अशी निरीक्षणे आवश्यक असतात.
कामाच्या सोयीसाठी वरील विषयांचे तीन प्रमुख गट करण्यात आले होते. ते असे : (१) उच्चवातावरणीय भौतिकी : सौरक्रिया, सूर्य व इतर तारे, सूर्य व ग्रह यांच्यामधील माध्यम यांच्यापासून येणाऱ्या कणांविषयी व प्रारणांविषयी अध्यन. (२) उष्णता व पाणी यांसंबंधी : जलवायुस्थिती, हिमनदीविज्ञान व महासागरविज्ञान यांविषयी अध्ययन. (३) पृथ्वीची संरचना व अंतरंग : भूकंपविज्ञान प्रवेगीय मापने व अक्षांश–रेखांशनिश्चिती यांविषयी अध्ययन. वरील तिहींशिवाय ध्रुवीय प्रदेशातील हिमराशी, तेथील जीवांचे स्वरूप व परिस्थिती, मानवी परिस्थिती-वैद्यक व त्या प्रदेशाचे भूवैशाचे भूवैज्ञानिक स्वरूप, यांविषयीच्या अध्ययनाचाही त्यात अंतर्भाव होता.
सूर्याच्या काही मोठ्या अशा शिखांच्या वर्णपटरेखांत होणारे फेरफार नोंदण्यात आले. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपाचा दैनंदिन नकाशा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सूर्य, विश्वकिरण व उच्च वातावरण यांच्यातील घडामोडींमुळे बिनतारी संदेशवहनात निर्माण होणाऱ्या गोंगाटाचे मापन करण्यात आले.
जमिनीवरील २५० हून अधिक वेधशाळांतील उपकरणांच्या साहाय्याने भूचुंबकत्वाची मापने करण्यात आली व वेगाने होणार्या भूचंबकत्वाच्या आंदोलनांचे काळजीपूर्वक अध्ययन करण्यात आले. अग्निबाणांच्या व कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने भूचंबकीय क्षेत्राच्या उंच वातावरणातील घटकांचेही मापन करण्यात आले. उच्च वातावरणातील निरनिराळ्या घटकांची आयन (आयन म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) घनता, चुंबकीय वादळे वगैरेंविषयी अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने आयनसोंड हे साधन वापरण्यात आले.
उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रकाशाच्या नुसत्य डोळ्यांनी करावयाच्या पाहणीसाठी शेकडो केंद्रे स्थापन करण्यात आली होती. शिवाय कित्येक शेकडो हौशी व्यक्तींनी त्या प्रकाशाच्या निरीक्षणाच्या व त्याच्या विस्ताराचे मापन करणाच्या कामात मदत केली. यांशिवाय विशेष उपकरणे वापरून निरीक्षण करणार्या
पृथ्वीवर विखुरलेल्या ६५० केंद्रांतून उच्च वातावरणाचे, ७०० केंद्रांतून प्रारणाचे व १०० केंद्रांतून ओझोनाचे (ऑक्सिजन वायूच्या एका प्रकाराचे) अध्ययन झाले. तापमान, दाब, आर्द्रता व वारे यांचे निरीक्षण व मापनही झाले. अल्प व दीर्घ मुदतीचे सागरी प्रवाह, सागरी पातळीतील बदल आणि इतर वातावरणीय घटक व सागरी घटक यांचा परस्परसंबंध यांचाही अभ्यास करण्यात आला. यासाठी ३५ राष्ट्रांनी ७० अन्वेषण नौका वापरात आणल्या व भारती-ओहोटीच्या नोंदीसाठी २२५ केंद्रे उभारण्यात आली. सागरात खोलवर असलेल्या प्रचंड ऊर्जेचे संक्रमण कितपत होते याच्याही नोंदी घेण्यात आल्या. सागराच्या पातळ्यांतील बदल अंतर्गत प्रवाहाचे सुचक असून त्यांच्या हवामानावर परिणाम होत असतो. सागरी पातळ्यांतील बदलाची नोंद घेण्यासाठी शेकडो बेटांवर केंद्रे उभारली होती. हिमनद्या जवळजवळ सर्व खंडांत आहेत व त्यांच्या हालचालींमुळेही हवामानात बदल होत असतो. या माहितीमुळे हवामानाचे दैनंदिन अंदाज करण्याच्या पद्धतीत सुधारणा करता येणे व अधिक अचूक अंदाज करता येणे शक्य झाले. अंटार्क्टिका व ग्रीनलंड यांच्यातील हिमस्तरांची व आर्क्टिक महासाहरातील हिमाच्या पुंजांची गती, प्राकृतिक स्वरूप व तापमान इत्यादींचे मापन करण्यासाठी ८३ वेधशाळा स्थापिल्या होत्या.
कृत्रिम भूकंपपद्धती वापरून बर्फाच्या थरांची जाडी काढणे व त्यांच्या खालील जमिनीचे प्राकृतिक स्वरूप व तिच्या खडकांची संरचना ठरविणे ही कामेही करण्यात आली. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांत झालेल्या भूकंपांच्या नोंदींचेही अध्ययन करण्यात आले व पन्नासाहून अधिक देशांतील भूकंपवैज्ञानिकांनी मिळविलेली माहिती एकत्र करून तिच्यावरून पृथ्वीच्या आंतरिक रचनेविषयी व भूकंपक्षम प्रदेशांच्या भौगोलिक वाटणीविषयी अंदाज करण्यात आले. अंटार्क्टिकातील भूकंपांविषयी काहीच माहिती नव्हती म्हणून त्या खंडातही भूकंपमापक यंत्रे बसविण्यात आली होती, पण त्यांवर भूकंपाची नोंद झालीच नाही.
पृथ्वीचा आकार व घनफळ यांच्या निश्चितीसाठी तसेच गुरुत्वप्रवेगाच्या मापनासाठी ठिकठिकाणी २०० केंद्रे उभारली होती. अक्षांश व रेखांश यांच्या मापनासाठी ७० केंद्रांतून अत्याधुनिक संवेदनक्षम साधने वापरली होती. या मापनांचा अचूक नकाशे करण्यास उपयोग झाला. याशिवाय खंडे एकमेकांपासून दूर सरकू शकतात की नाही, याचाही अंदाज करणे या मापनांवरून पुढील कालात शक्य होईल.
माहितीचा गोषवारा : या आंतरराष्ट्रीय सहकार्यातून मिळविलेल्या प्रचंड माहितीतून निष्पन्न झालेल्या काही मुख्य गोष्टींचा गोषवारा खाली दिला आहे. (१) वातावरणविज्ञान व आयनांबर-भौतिकी यांविषयी मिळालेल्या माहितीवरून आयनांबर-वादळे व वातावरणीय हालचालींचे अंदाज करता येतात. (२) वातावरणविज्ञानाविषयी मिळालेल्या माहितीवरून दैनंदिन जागतिक हवामान अंदाजपत्रक तयार करण्यात येऊ लागले. (३) भूकंपविज्ञानातील आधुनिक तंत्र वापरून अंटार्क्टिकातील बर्फाची जाडी मोजून त्याखालील जमिनीची रूपरेषा ठरविण्यात आली. (४) आर्क्टिक महासागराखाली कित्येक हजार मी. उंच अशी पर्वताची रांग आहे. तिच्याविषयी आणि महासागरांच्या पाण्याच्या खोल भागातील प्रवाह व त्यांच्या तळांखालील जमिनींचे भौतिक स्वरूप यांविषयी नवीन माहिती मिळविण्यात आली. महासागरांच्या तळाच्या विस्तीर्ण क्षेत्रात लोह, मँगॅनीज व कोबाल्टमिश्रित तांबे यांच्या धातुपाषाणांचे निक्षेप आढळले आहेत. (५) उच्च वातावरणात क्ष-किरण, ध्रुवीय प्रकाशकारी कण व विद्युत् प्रवाह आढळले. सूर्यप्रकाशाच्या जंबुपार किरणांची खुलासेवार छायाचित्रे प्रथमत:च घेण्यात आली.(६) शेकडो अग्निबाणांच्या क्षेपणाने पृथ्वीपासून ३,२०० किमी. उंचीपर्यंत तापमान, दाब, घनता यांची मापने करण्यात आली. प्रत्यक्ष ध्रुवीय प्रकाशातून अग्निबाण सोडून चाचण्या घेतल्यावर असे आढळून आले की, ४० किमी. वर असलेला विश्वकिरणांचा सौम्य स्रोत (एका सेकंदात आरपार जाणाऱ्या कणांची संख्या व त्यांचा सरासरी वेग यांचा गुणाकार) हा प्राथमिक विश्वकिरणांच्या स्रोतापेक्षा अनेक पटींनी मोठा असतो. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अग्निबाणांच्या साहाय्याने सूर्यप्रारणांसंबंधी व इतर ताऱ्यांकडून होणार्या जंबुपार प्रारणांसंबंधी माहिती मिळविण्यात आली. (७) व्हॅन ॲलन प्रारण-पट्ट (पृथ्वीच्या भोवती बाह्य वातावरणात असणारे अतिशय आयनीकारक असलेले व्हॅन ॲलन यांनी शोधून काढलेले प्रारण-पट्ट) दोन असतात, हे उपग्रहांच्या साहाय्याने कळून आले. पृथ्वीपासून ४०० ते ३,८४० किमी. उंचीपर्यंत आतला व्हॅन ॲलन पट्ट असून दुसरा त्याच्या बाहेर ९,६०० ते ५७,६०० किमी. उंचीवर आहे. (८) उपग्रहांच्या साहाय्याने पृथ्वीचा आकार किंचित नासपतीच्या (पेअरच्या) फळाच्या आकारासारखा आहे हे आढळून आले आहे. पूर्वी सैद्धांतिक रीतीने काढलेल्या आकारापेक्षा तो विशेष वेगळा नसला तरी अधिक अचूक आहे.
या प्रचंड माहितीतून हजारो निबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारतातील शास्त्रज्ञांनी उच्च वातावरण व सौर क्रिया या विषयांच्या संशोधनात भाग घेऊन अनेक निबंध प्रसिद्ध केले आहेत. या सर्व माहितीचे संकलन अमेरिका, रशिया आणि प. यूरोप अशा तीन केंद्रांत झाले. याची माहिती सर्वांस उपलब्ध करण्याच्या हेतूने प्रकाशनाचे काम संघटनेने १९६२ मध्ये पूर्ण केले. शास्त्रीय दृष्ट्या अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने झालेला हा प्रचंड प्रयत्न अभूतपूर्व गणला गेला आहे. संकलित केलेल्या माहितीत पुढील अनेक शोधांची बीजे असल्यामुळे संशोधकांस ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल.
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स या संस्थेने आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्ष संपल्यानंतरही भूभौतिकीय समन्वेषण चालू राहावे याकरिता महासागर-अन्वेषण, अंटार्क्टिका-अन्वेषण, अवकाश-अन्वेषण, चुंबकीय सर्वेक्षण (पाहणी) इ. विषयांतील तज्ञांच्या समित्या नेमल्या व यांतील काही विषयांतील अन्वेषण अद्यापही चालू आहे. १९६४-६५ मध्ये सूर्याची सक्रियता किमान होती त्या वेळी सूर्याचा अभ्यास करण्याकरिताही तज्ञांची एक खास समिती नेमण्यात आली होती.
पहा : अवकाशविज्ञान भूचुंबकत्व भूभौतिकी.
टोळे, मा. ग.
“