सिद्यु कान्हू विद्यापीठ : झारखंड राज्यातील डुमका येथील एक विद्यापीठ. त्याची स्थापना १० जानेवारी १९९२ रोजी बिहार विधानसभेच्या अधिसूचनेनुसार झाली आणि त्याचे सिद्यु व कान्हू या दोन १८५५ च्या बंडात हुतात्मा झालेल्या संथाळ आदिवासी नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नामकरण करण्यात आले. भागलपूर विद्यापीठाचे विभाजन करुन या विद्यापीठाची स्थापना केली. त्याचे स्वरुप अध्यापन-संलग्न असे आहे. डुमका येथील एस्. पी. महाविद्यालय हे त्याचे मूळ केंद्र होय. संथाळ परगण्यातील १२,२०६ चौ. किमी. क्षेत्रातील आदिवासींच्या शिक्षणाचे उद्दिष्ट या विद्यापीठाच्या स्थापनेमागे होते. झारखंडच्या निर्मितीनंतर त्या राज्याकडे ते आले. १९५६ च्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाकडून २००६ मध्ये या विद्यापीठास भारतीय विद्यापीठ संघटनेचे सदस्यत्व मिळाले. सध्या विद्यापीठाच्या अखत्यारित ३ अध्यापन विभाग, १३ घटक महाविद्यालये व १४ संलग्न महाविद्यालये आहेत. विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा असून शास्त्र, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या व वाणिज्य अशा चार विद्याशाखा आहेत. पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे कालावधी नियत केला आहे. डॉक्टरेट पदवी व तत्संबंधीचे संशोधन यांसाठी विद्यापीठात सर्व प्रमुख विभागांतून सुविधा उपलब्ध आहेत. या विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात झारखंड राज्यातील डुमका, कुंधीत, जामतारा, गोद्दा, बांका, पाकौर, साहेबगंज, मधुपूर, देवगड, धामरी, रानीश्वर, महेशपूर, शिकरीपरा,पाथरगाम इ. क्षेत्रांतील महाविद्यालयांचा अंतर्भाव होतो.

भटकर, जगतानंद