सावनेर : महाराष्ट्रातील एक प्राचीन गाव. ते नागपूर जिल्ह्यात कोलार नदीकाठी नागपूरच्या वायव्येस सु. ३७ किमी. वर वसले आहे. लोकसंख्या २,२३,१६५ (२००१) होती. हे याच नावाच्या तहसीलाचे मुख्यालय असून छिंदवाडा इटारसी रस्त्यावरील एक प्रमुख स्थानक आहे. सावनेरचा उल्लेख जैमिनी अश्वमेध या प्राचीन ग्रंथात सारस्वतपूर असा केलेला असून तत्संबंधी अनेक पौराणिक कथा-दंतकथा प्रचलित आहेत. जवळच्या अदासा गावात टेकडीवर महादेव व गणपती यांची प्राचीन मंदिरे असून ही टेकडी हे या प्रदेशातील पूर्वेकडील प्रवेशद्वार होय. याच्या जवळच पेंढाऱ्यांच्या आक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष, जीर्ण बुरूज इ. आढळतात. याशिवाय खुद्द सावनेरमध्ये कोलार नदीकाठी शिवपूर्व कालातील महादेव मंदिर असून त्यातील शिवलिंगाच्या पाठीमागे गणपतीची सुरेख मूर्ती खोदलेली आहे. यांव्यतिरिक्त मंदिरात अन्य मूर्ती नाहीत मात्र विविध देवदेवतांची भित्तिचित्रे चितारलेली आहेत. नंदीमंडपातील नंदीची भव्यमूर्ती (१·२१ × ०·७६ मी.) लक्षणीय आहे. मंदिरासमोरील पटांगणात मारुतीची मूर्ती आहे. औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. वर्षातून शिवरात्रीला व ज्येष्ठ महिन्यात अशी दोनदा येथे यात्रा भरते.

येथे कोष्टी लोकांची मुख्यत्वे वस्ती असल्यामुळे विणकामाचा-हातमागाचा व्यवसाय मोठा होता मात्र यंत्रमाग आल्यामुळे त्यावर विपरीत परिणाम झाला. तांबड्या रंगाच्या (रेड डाय) निर्मितीसाठी सावनेर पूर्वी ख्यातनाम होते. सुपीक जमिनीमुळे तसेच संत्री व कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनामुळे येथे सुबत्ता असून, दर शुक्रवारी भरणाऱ्या बाजारात कापड आणि जनावरांच्या खरेदीसाठी सभोवतालच्या खेड्यांतून अनेक लोक जमतात. अलीकडे शहरात कापसाच्या गिरण्या सुरू झाल्या असून कच्चा कापूस नागपूरला पाठवितात.

शहरात स्कॉच फ्री चर्च मिशनच्या द्वारा इंग्रजी माध्यमाची शाळा असून एक मुलींची प्राथमिक शाळा व दोन माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय प्राथमिक शिक्षकांना शिक्षण-प्रशिक्षण देणारी दोन महाविद्यालये आहेत. सावनेर नगरपालिका (स्था. १८६७) आरोग्य, पाणी, स्वच्छता या सेवा पुरविते. तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळा चालविते. याच तहसीलात खापरखेडा येथे औष्णिक विद्युत् केंद्र असून यातून विदर्भातील आठ जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अन्य भागांस विजेचा पुरवठा केला जातो.

शहरात प्रसिद्घ नाटककार राम गणेश गडकरी यांची समाधी आहे. शिवाय जवळ साडेसहा किमी. वर महात्मा गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी प्राध्यापक भन्साळी यांनी स्थापन केलेला आश्रम आहे. हा आश्रम सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत विधायक कार्य करत असून तेथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. तेथील सभागृहात तत्त्वज्ञान, विविध धर्म यांवर चर्चासत्रे भरतात. याशिवाय एक शेती विद्यालय व प्रयोगशाळा असून आधुनिक पद्घतीच्या शास्त्रशुद्घ शेतीविषयी तिथे शेतकऱ्यांना माहिती पुरविण्यात येते.

देशपांडे, सु. र.