सात्मीकरण, भूवैज्ञानिक : एखाद्या शिलारसात बाहेरील घन किंवा द्रव पदार्थ (म्हणजे खडक किंवा दुसरा शिलारस) मिसळून तो त्या शिलारसाने आत्मसात करण्याच्या प्रकियेला ‘सात्मीकरण’ म्हणतात. अशा बाह्य पदार्थाचे सात्मीकरण झाल्यावर त्या शिलारसाचे रासायनिक संघटन बदलते व त्यापासून वेगळ्या प्रकारचा खडक तयार होतो. शिलारसात परका घन पदार्थ मिसळून होणाऱ्या सात्मीकरणाचे वर्णन मराठी विश्वकोशातील ‘अग्निजखडक’ या नोंदीत आले असून येथे द्रवरुप शिलारसांच्या मिश्रणाने होणाऱ्या या सात्मीकरणाची माहिती दिली आहे.

सर्व पृथ्वीवर पसरलेले एक सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेला) व एक अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असणारा) असे दोन आद्य शिलारस कमी-अधिक प्रमाणात मिसळले जाऊन तयार झालेल्या शिलारसापासून अग्निज खडकांचे विविध प्रकार उत्पन्न झाले असावेत, अशी ⇨ रोबेर्ट व्हिल्हेल्म बन्सन यांची कल्पना होती (१८५१). मात्र त्यानंतर झालेल्या अभ्यासांवरुन ही कल्पना समाधानकारक नसल्याचे दिसून आले. दोन शिलारस एकमेकांत मिसळले जाण्याची शक्यता विरळच असते. तथापि अंशतः स्फटिकीभवन झालेले दोन भिन्न शिलारस मिसळून काही ज्वालामुखी खडक तसेच खडकांमधील उथळ भागी असलेल्या भेगांमध्ये किंवा स्तरांदरम्यान शिलारस शिरुन व थिजून बनलेले उथळ अंतर्वेशी अग्निज खडक निर्माण झाले असावेत, असे दिसते. उदा., अगदी भिन्नभिन्न रासायनिक संघटन असलेल्या प्लॅजिओक्लेजांचे बृहत्‌स्फट (मोठे स्फटिक) काही ज्वालामुखी खडकांत सर्वत्र विखुरलेले आढळतात. त्यांपैकी अनेक बृहत्‌स्फटांचे रासायनिक संघटन व ते ज्या द्रव्यात जडवले गेलेले असतात त्या आधारकाचे रासायनिक संघटन यांच्यात काही मेळ आढळत नसल्याचे दिसते. एकाच किंवा एकमेकांशेजारी असणाऱ्या ज्वालामुखीच्या निर्गमद्वारांतून लागोपाठ लवकर बाहेर पडलेल्या लाव्हारसांपासून तयार झालेले बेसाल्ट, अँडेसाइट व रायोलाइट हे खडक अमेरिकेत कोलोरॅडोतील सॅन जुआन नावाच्या ज्वालामुखी खडकांच्या प्रदेशात आहेत. तेथील आणि जपान व कॅलिफोर्नियातील काही खडकांत अशी सात्मीकरणाची उदाहरणे आढळतात.

पहा : अग्निज खडक शिलारस–१.

केळकर,क.वा.