श्रोडिंजर, एर्व्हीन : (१२ ऑगस्ट १८८७ – ४ जानेवारी १९६१). ऑस्ट्रियन सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. द्रव्याचा (सूक्ष्मकणाचा) तरंग सिद्धांत आणि ⇨ पुंजयामिकीचे इतर आविष्कार यांमध्ये संशोधन कार्य. इलेक्ट्रॉनांच्या तरंगासारख्या वर्तनांचे वर्णन करणाऱ्या गणितीय समीकरणाबद्दल प्रसिद्ध. आणवीय आविष्कारांचे तरंग यामिकीच्या साहाय्याने स्पष्टीकरण दिल्याबद्दल त्यांना ⇨पॉल एड्रिएन मॉरिस डिरॅक यांच्यासमवेत १९३३ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
श्रोडिंजर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला व शिक्षण तेथील विदयापीठातच झाले. त्यांनी व्हिएन्ना, येना, ब्रेस्लौ, झुरिक, बर्लिन, ऑक्सफर्ड व गात्स येथील विदयापीठांत भौतिकीचे अध्यापन केले. बर्लिन विदयापीठात असताना त्यांनी ॲल्बर्ट आइन्स्टाइन, माक्स फोन लौए आणि माक्स प्लांक यांच्याबरोबर जर्मनीमधील सैद्धांतिक भौतिकीचे मोठे केंद्र स्थापन केले. १९४० मध्ये श्रोडिंजर डब्लिन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेत सैद्धांतिक भौतिकी विभागाचे संचालक झाले. आयर्लंडमधील १५ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी भौतिकी, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा इतिहास यांमध्ये संशोधन केले. सेवानिवृत्तीनंतर (१९५६) व्हिएन्ना विदयापीठात त्यांची गुणश्री प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
इ. स. १९२४ मध्ये ⇨ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली यांनी असे सुचविले की, ज्याप्रमाणे विद्युत् चुंबकीय प्रारणाला कणाचे गुणधर्म असतात त्याप्रमाणे द्रव्याच्या सूक्ष्मकणांना तरंगाचे गुणधर्म असावयास पाहिजेत. १९२६ मध्ये श्रोडिंजर यांनी शोधनिबंध सादर केले आणि पुंज तरंगयामिकीकरिता तात्त्विक पाया निर्माण केला. या निबंधांमध्ये त्यांनी पुंजयामिकीचे मूळ समीकरण असलेल्या आंशिक अवकल समीकरणाचे स्पष्टीकरण दिले. अभिजात यामिकीत न्यूटन यांच्या समीकरणास असलेल्या महत्त्वाइतकेच पुंज सिद्धांतात कणाची वा कणसमूहाची तरंग फलने देणाऱ्या श्रोडिंजर यांच्या समीकरणाला महत्त्व प्राप्त झाले. अणूच्या आंतररचनेच्या स्पष्टीकरणार्थ श्रोडिंजर यांनी तरंगयामिकीचा उपयोग केला. त्यांनी मांडलेला सिद्धांत पुढे प्रायोगिक रीत्या प्रस्थापित झाला.
भौतिकीचे महत्त्व व मानवी जीवनावरील त्याचे परिणाम या विषयांचा श्रोडिंजर यांनी सखोल अभ्यास केला होता. आयर्लंडमध्ये १५ वर्षे असताना त्यांनी व्हॉट इज लाइफ ? अँड आदर सायंटिफिक एसेज (१९५६) हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी जननिक संरचनेच्या स्थैर्याचे स्पष्टीकरण करण्याकरिता पुंज भौतिकीचा कसा उपयोग होऊ शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकात सांगितलेल्या अनेक बाबींमध्ये रेणवीय जीवविज्ञानाच्या नंतरच्या विकासात बदल झाले तरी हे पुस्तक या विषयातील अत्यंत उपयुक्त आणि सखोल माहिती देणारे असे ठरले. त्यांचे शेवटचे पुस्तक Meine Weltansicht (१९६१ इं. भा. माय व्ह्यू ऑफ द वर्ल्ड) यामधील त्यांची मीमांसक दृष्टी आणि वेदान्तामधील गूढवाद यांमध्ये फार सारखेपणा दिसून येतो.
ते व्हिएन्ना येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.; सूर्यवंशी, वि. ल.