उष्णकटिबंधी रोग: पृथ्वीच्या उष्णकटिबंधामध्ये विशेष प्रमाणात आढळणाऱ्या रोगांना उष्णकटिबंधी रोग असे म्हणतात.

उष्णकटिबंधी रोग, त्यांवरील प्रतिबंधक उपाय व चिकित्सा

रोगाचे नाव 

रोगकारक आणि रोगवाहक 

प्रादेशिक प्रसार 

प्रतिबंधक उपाय 

चिकित्सा 

हिवताप 

प्‍लास्मोडियम वंशाचे प्रजीव, ॲनॉफेलीसवंशाच्या डासांच्या मादीचा दंश.

उष्णकटिबंध. 

डासांचा नाश करणारी कीटकनाशके, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी आणि शरीराच्या उघड्या भागावर डास चावणार नाहीत अशी औषधे लावणे.

क्विनीन, निव्हाक्वीन व इतर औषधे. 

कृष्णमूत्र ज्वर 

प्‍लास्मोडियम वंशाचे प्रजीव, ॲनॉफेलीस वंशाच्या डासांच्या मादीचा दंश.

 

उष्णकटिबंध. 

डासांचा नाश करणारी कीटकनाशके, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी आणि शरीराच्या उघड्या भागावर डास चावणार नाहीत अशी औषधे लावणे. 

क्विनीन, निव्हाक्वीन व इतर औषधे. 

काळा आजार 

लीशमॅनिया  वंशाचे प्रजीव वालुमक्षिका कुत्रा.

भारतातील आसाम वगैरे पूर्वेकडील प्रदेश ईजिप्त, चीन वगैरे देश.

रुग्ण अलग ठेवणे, ग्रस्त कुत्र्यांचा नाश, कीटकनाशके. 

अँटिमनीची पंचसंयुजी लवणे. 

पीत ज्वर 

एक विशिष्ट विषाणू (व्हायरस) ईडिस ईजिप्ताय जातीचा दिवसा चावणारा डास.

दक्षिण अमेरिका, ईजिप्त आणि उत्तर आफ्रिकेतील उष्ण प्रदेश.

कीटकनाशके, प्रतिबंधक लशीचा परिणाम चार वर्षे राहतो.

– 

आमांश, यकृत विद्रधी इ. अमीबाजन्य विकार

एंटामीबा हिस्टॉलिटिका हा प्रजीव पाणी, दूध वगरे अन्नाशी संबंध असलेले वाहक.

सर्व उष्णकटिबंध. 

अन्न, पाणी वगैरे गोष्टी स्वच्छ आणि जंतुरहित करून (उकळून) वापरणे माशांचा नाश करणे वाहक शोधून त्यांचा अन्नाशी संबंध येणार नाही अशी व्यवस्था करणे.

एमिटीन, व्हायोफॉर्म, क्लोरोक्वीन, टेरामायसीन.

निद्रा रोग 

ट्रिपॅनोसोमा गँबिएन्स ट्रि. ऱ्होडेसिएन्स  या जातींचे सूक्ष्मजंतू, त्सेत्से माशी.

मध्य व दक्षिण अमेरिका पश्चिम, मध्य आणि विषुववृत्तीय आफ्रिका, विशेषतः काँगो व न्यासालँड.

माशांचा नाश, माशा चावणार नाहीत असे कपडे वापरणे.

आर्सेनिकापासून तयार केलेली औषधे. 

डेंग्यू (हाडमोड्या) ज्वर 

एक विशिष्ट विषाणू ईडिस ईजिप्ताय जातीचा डास.

सर्व उष्णकटिबंधी प्रदेश. 

कीटकनाशकांचा उपयोग करून डासांचा नाश करणे. 

– 

वालुमक्षिका ज्वर, त्रिरात्र ज्वर

एक विशिष्ट विषाणू वालुमक्षिका.

यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील २०ते ४५मधील उत्तरेकडील प्रदेश. 

कीटकनाशके.

– 

पुनरावर्ती ज्वर 

बोरेलिया  वंशाचे सर्पिल जंतू गोचीड उवा.

सर्व उष्णकटिबंधी प्रदेश. 

उवा व गोचिडींचा नाश करणे. 

पेनिसिलीन, टेट्रा-सायक्लीन, आर्सेनिका- पासून तयार केलेली औषधे.

खंडितकायी कृमी रोग (शिस्टोसोमियासीस) 

खंडितकायी कृमी गोगलगाय.

आफ्रिका, पश्चिम आशिया.

मलमूत्राने पाणी दूषित न होऊ देणे.

अँटिमनीपासून केलेली औषधे, फुआडीन.

यॉज

सर्पिल जंतूची एक जात.

श्रीलंका, वेस्ट इंडीज, फिलिपीन्स.

रुग्णाशी संसर्ग टाळणे.

उपदंशाप्रमाणे पेनि-सिलीन वगैरे औषधे.

प्राची व्रण (ओरिएंटल सोअर), दिल्ली गळू.

लीशमॅनिया ट्रॉपिका जातीचा प्रजीव कृंतक प्राण्यावरील वालुमक्षिका.

उत्तर भारत, पंजाब, अरबस्तान, स्पेन, इटली, ग्रीस.

कीटकनाशके.

अँटिमनीपासून बन-विलेली औषधे.

विषुववृत्ताच्या उत्तरेचे कर्कवृत्त आणि दक्षिणेचे मकरवृत्त यांच्यामधील सु. ४७० प्रदेशास उष्णकटिबंध असे म्हणतात. या प्रदेशातील हवा दमट आणि सूर्याच्या उत्सर्गी किरणांनी तापलेली असते. अशी हवा अनेक परजीवींना (अन्य प्राण्यांच्या शरीरावर उपजीविका करणाऱ्या जीवांना) पोषक असल्यामुळे त्या परजीवींमुळे होणारे विशिष्ट रोग या प्रदेशात आढळतात.


रोगकारक परजीवींचा संसर्ग एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात होण्याचे अनेक प्रकार आहेत, त्यांपैकी महत्त्वाचे पुढीलप्रमाणे : (१) रोगग्रस्त व्यक्तीच्या कफातून, हवेमधून अथवा प्रत्यक्ष स्पर्शामुळे क्षय आणि घनिष्ट संबंधामुळे महारोग (कुष्ठरोग) यांसारख्या रोगांचा संसर्ग होतो. (२) रोगग्रस्त व्यक्तीचे मलमूत्र, पाणी, दूध, अन्न आणि कपडे यांमुळे दूषित झालेल्या पदार्थांमुळे अप्रत्यक्ष संसर्ग होतो. उदा., पटकी, आमांश वगैरे. (३) परजीवींच्या जीवनचक्रांतील काही भाग ज्या विशिष्ट मध्यस्थ पोषकाच्या (मध्यंतरीच्या काळात ज्या दुसऱ्या प्राणिशरीरात उपजीविका होते त्या प्राण्याच्या) शरीरात जातो, त्या मध्यस्थ पोषकाच्या शरीरातून बाहेर पडलेले परजीवी, पाण्यातून, जमिनीतून अथवा प्रत्यक्ष पोषक मध्यस्थच शरीरात गेल्यासही संसर्ग होतो. उदा., खंडितकायी कृमी रोग, अंकुशकृमी रोग अथवा  नारू. (४) दंश करणाऱ्या कीटकांनी रुग्णाच्या रक्तातील परजीवी शोषून घेऊन दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो. उदा., हिवताप, पीत ज्वर, वालुमक्षिका ज्वर  वगैरे.

यांखेरीज अन्नातील विशिष्ट घटकांच्या न्यूनतेमुळे होणारे रोगही उष्णकटिबंधात अधिक प्रमाणात दिसतात. उदा., वल्कचर्म रोग  स्कर्व्ही, क्वाशिओरकोर  वगैरे.

उंदरासारखे कृंतक (कुरतडणारे) प्राणी, डासासारखे दंशक कीटक, परजीवी कृमी आणि मध्यस्थ पोषक यांच्या वाढीला उष्ण प्रदेशांतील हवामान अधिक अनुकूल असते. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणा, अस्वच्छता, गलिच्छपणा आणि गर्दी या कारणांमुळेही उष्ण प्रदेशांत रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार अधिक होतो. ज्यांना अविकसित प्रदेश असे म्हणतात, ते भौगोलिक दृष्ट्या बहुशः उष्ण कटिबंधात मोडतात. हिवताप, अंकुशकृमी रोग, उपदंश, क्षय आणि कुष्ठरोग यांच्यामुळे या प्रदेशांतील समाजांची शारीरिक आणि आर्थिक प्रगती काही प्रमाणात खुंटली आहे. अपेक्षित आयुर्मर्यादा हा उत्पादनशक्तीतील महत्त्वाचा घटक असून उत्पादनक्षमतेचे वय होण्यापूर्वीच कित्येक मुले मृत्युमुखी पडत असल्यामुळे या देशांवर आर्थिक ताणही पडल्याशिवाय रहात नाही.

इतिहास : १८७० मध्ये लूइ पाश्चर यांनी सूक्ष्मजंतूमुळे रोग होतात हे सिद्ध केले. त्यानंतर पुढील अर्ध शतकात बहुतेक रोगांच्या जंतूंचा व परजीवींचा शोध लागला. १८८० मध्ये लाव्हरां यांनी हिवतापाचा प्रजीव शोधून काढला, १८९७ साली रॉनल्ड रॉस यांनी हा प्रजीव डासामार्फत मानवी शरीरात कसा टोचला जातो त्याचे वर्णन केले. १९०० साली हॅव्हाना येथे रीड व त्यांचे सहकारी यांनी पीत ज्वराचा संसर्ग डासांमुळेच होतो हे दाखविले. आफ्रिकेतील निद्रा रोग हा त्सेत्से माशीमुळे, काळा आजार  वालुमक्षिकेमुळे, पुनरावर्ती ज्वर  गोचिडीमुळे, प्लेग पिसूमुळे, प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस) उवेमुळे आणि खंडितकायी कृमी रोग गोगल गाईमुळे प्रसारित होतो असे अनेक शोध लागले. उष्णकटिबंधातील रोगांचे निर्मूलन करणे ही आरोग्यरक्षणाची समस्या आणि चळवळ बनली. लंडन, लिव्हरपूल, पनामा, कलकत्ता इ. ठिकाणी उष्णकटिबंधातील रोगांचा अभ्यास करणाऱ्या संस्था निघाल्या. रॉकफेलर यांच्या अनुदानाच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागाने १९९४ साली सुरुवात केल्यानंतर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय सहकार विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने सहाय्य केल्यामुळे हा आता आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विषय झाला आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर तयार करण्यात आलेली प्रतिजैव [→ प्रतिजैव पदार्थ] व कृत्रिम औषधे, रोगप्रतिबंक आणि प्रतिकारी लस, आणि कीटकनाशके यांच्यामुळे हिवताप, देवी, उपदंश, क्षय इ. रोग आटोक्यात आले आहेत. निद्रा रोग आणि सर्पिल (स्पायरोकीटा वंशातील) परजीवींमुळे होणारे काही रोग अजून मात्र टिकून आहेत.

ज्यांना उष्ण कटिबंधातील रोग असे म्हटले जाते ते दुसरीकडे होतच नाहीत असे नाही. त्यांतील कित्येक रोग समशीतोष्ण प्रदेशांतही प्रसृत झाले होते, परंतु तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, रोगप्रतिकारक स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक लशी वगैरे उपायांनी त्यांचे नियंत्रण आणि निर्मूलन शक्य झाले आहे. या गोष्टींची उणीव उष्णकटिबंधात मोडणाऱ्या प्रदेशांतच विशेष दिसून येते.

उष्ण प्रदेशांत आढळणाऱ्या काही रोगांची कारणे, प्रसरण, ते रोग आढळणारे प्रदेश व त्यांच्याविरुद्ध करण्याचे प्रतिबंधक उपाय व चिकित्सा यांची संक्षिप्त माहिती कोष्टकरूपाने पृ. ८७७ वर दिली आहे.

पहा : डेंग्यू ज्वर यॉज.

संदर्भ : 1. Bercovitz, Z. Ed. Clinical Tropical Medicine, New York, 1944.

    2. Manson-Bahr, P. H. Ed. Manson’s Tropical Diseases, Baltimore, 1960.

    3. Wilcocks, C. Health and Disease in the Tropics, New York, 1951.

आपटे, ना. रा.