आ. १. उभयलिंगी हायड्रा (१) वृषण, (२) अंडाशय (तयार होत असलेले), (३) अंडाशयाची प्रगत अवस्था, (४) पक्व अंडाशय.

उभयलिंगता: प्राण्यांमध्ये सर्वसामान्य पणे लिंग हे त्या प्रकारच्या जनन तंत्राचे (जनन संस्थेचे) द्योतक असते. ज्यात पुं- आणि स्त्री- जननेंद्रिये भिन्न व्यक्तींत असतात, त्यास एकलिंगी म्हणतात. अशा प्राण्यांकरिताच स्वाभाविकपणे नर व मादी या संज्ञा स्पष्टपणे वापरता येतात व बऱ्याच प्राण्यांत लैंगिक द्विरूपताही (एकाच जातीच्या नर आणि मादीत असणारे ठळक फरक) आढळते. पण काही प्राण्यांत पुं- आणि स्त्री- जननेंद्रिये एकाच व्यक्तीत आढळतात अशा प्राण्यांना उभयलिंगी म्हटले जाते आणि या स्थितीला उभयलिंगता असे म्हणतात.

आ. २. यकृतकृमीच्या जननेंद्रियांचे आरेखी चित्र (१) मुखासह मुख चूषक, (२) जननिक परिकोष्ठ, (३) शिश्र्न, (४) स्खलन-वाहिनी (ग्रंथीने वेढलेली), (५) शुक्राशय, (६) गर्भाशय, (७) लॉरस्टायडा नाल, (८) वृषण, (९) शुक्रवाहक, (१०) कवच ग्रंथी, (११) अंडाशय, (१२) मध्य पीतक-वाहिनी, (१३) पीतक ग्रंथी.

उभयलिंगता ही शैवाल, नेचे यांसारख्या वनस्पतीत व कित्येक अतिविशेषित झाडांच्या फुलांत तसेच पृथुकृमी (चपटे कृमी), गांडूळ, सी स्क्वर्ट (जलोद्गारी) अशा प्राण्यांत सर्रास व प्राकृतिक स्वरूपात आढळते. पण अतिविशेषित प्राण्यांत त्यातल्या त्यात सस्तन प्राण्यांत व प्रामुख्याने माणसात ती क्वचितच आढळते.

प्राण्यांत उभयलिंगतेची अनेक उदाहरणे आहेत. प्रोटोझोआ संघातील पॅरामिशियमाच्या संयुग्मनात (दोन युग्मकांच्या अथवा एककोशिक म्हणजे एकच पेशी असलेल्या जीवांच्या संयोगात) प्रत्येक संयुग्मकात (ज्यांचा संयोग होतो त्या व्यक्तींत) निर्माण होणारा युग्मनजकेंद्रक (संयोगाच्या क्रियेत दोन केंद्रकांच्या एकीकरणाने उत्पन्न होणारा केंद्रक) हा स्थिर किंवा स्त्री-केंद्रक व स्थानांतरशील (स्थानांतर करणारा) अथवा पुं-केंद्रक निर्माण करू शकतो

म्हणून यात उभयलिंगता आढळते. ॲक्टिनोस्फीरियमामध्येही युग्मक (संयोग पावणाऱ्या प्रजोत्पादक कोशिका, शुक्राणू व अंडाणू) दिसण्यात सारखे असले तरी त्यांचे वर्तन शुक्राणू व अंडाणूसारखे भिन्न असते. उभयलिंगता स्पंजातही आढळते. सीलेंटेरेटामध्ये (आंतरगुही प्राणिसंघामध्ये), विशेषतः हायड्रात, ही अवस्था सापडते. काही जातींचे हायड्रे एकलिंगीही असतात. रक्तप्रवालामध्ये तर प्रत्येक पॉलिप (समुदाय करून राहणाऱ्या प्राण्यांच्या समुदायातील एक प्राणी) प्रसंगी पुं- आणि स्त्री-लिंगकोशिका निर्माण करू शकतो किंवा कोणत्यातरी एका प्रकाराची निर्मिती करू शकतो. इतर प्राणिवर्गात व बहुकोशिक प्राण्यांच्या सीलेंटेरेटापासून ते माणसापर्यंत प्रामुख्याने एक बदल झालेला दिसतो, तो म्हणजे विशिष्ट युग्मक निर्माण करणाऱ्या कोशिकांचे पुंजके केले जाऊन शरीराच्या विशिष्ट भागात ते जनन-ग्रंथी (अंडाशय अथवा वृषण) म्हणून बसविलेले

आ. ३. उभयलिंगी शरकृमीचा मागचा अर्धा भाग (१) अंडाशय, (२) वृषण, (३) शुक्राशय.

 असतात. उभयलिंगी जनन-ग्रंथींची शरीरातील रचना व अवस्थांचे प्रकार वेगवेगळे व कसे महत्त्वाचे असतात हे पुढे दिसून येईल. पृथुकृमी संघात उभयलिंगता फारच आढळते. यकृतकृमी, पट्टकृमी इ. ही त्यांची चांगली उदारहणे होत. वलयी-प्राणिसंघात

आ. ४. मिक्झाइन ग्लुटिनोझा या माशाची द्विलिंगी (उभयलिंगी) जनन ग्रंथी - (अ) नर अवस्थेची, (१) वृषण (आ) तीच जनन ग्रंथी स्त्री अवस्थेत, (२) अंडाशय.

(ॲनेलिडात) गांडुळे, जळवा इ. उभयलिंगी असतात. आर्थ्रोपाेडा संघात बार्नेकल, परोपजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारा) सॅक्युलायना, वाळवी इत्यादींत उभयलिंगता आढळते. मॉलस्कात तर पल्मोनेटा गणातील सर्व गोगलगाई उभयलिंगी असतात. शरकृमीतही (सॅजिट्टातही) उभयलिंगता आढळते. एकायनोडर्माटात व विशेषतः त्यातील होलोथूरॉयडिया व ऑफियूरॉयडिया या वर्गांत उभयलिंगता आढळते. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत मासे, बेडूक, भेक, डुकरे इतकेच काय पण अगदी कमी प्रमाणात माणसातही उभयलिंगता आढळते.

वरील उदाहरणे उभयलिंगतेचे विविध प्रकारही दर्शवितात. उदा., सामान्य व प्राकृतिक (गांडूळ, जलोद्गारी) दुर्मिळ व अपसामान्य म्हणजे नियमाविरुद्ध (अति- विशेषित प्राणी, सस्तन प्राणी) यथार्थ (गांडूळ, गोगलगाई) आभासी (सस्तन प्राणी, विशेषतः माणूस) क्रियात्मक (हायड्रा, पृथुकृमी, गांडूळ, गोगलगाई) आणि अक्रियात्मक (काही झुरळे, तारामीन, मासे इत्यादींच्या वृषणांत अंडाणू सापडतात). वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राकृतिक, यथार्थ व क्रियात्मक उभयलिंगता ही खालच्या प्राणिवर्गांत आढळते. यात उभयलिंगतेची सर्वसाधारणपणे तीन स्वरूपे आढळतात (१) अंडाशय व वृषण एकाच प्राण्यात पण

वेगवेगळ्या जागी असतात (गांडूळ), (२) अंडवृषण एकच असून त्याच्या प्रत्येक पुटकात (कप्प्यात) शुक्राणू व अंडाणू उत्पन्न होतात (भूचर गोगलगाई, सागरी काकडी) आणि (३) अंड-वृषणाचे अंडाशयाशी किंवा वृषणाशी एकीकरण झालेले असते. आभासी उभयलिंगतेत एका लिंगाच्या (स्त्री- अथवा पुं-) जननग्रंथी त्या व्यक्तीच्या शरीरात असतात व दुसऱ्या लिंगाच्या आंतर व बाह्य इंद्रियांची कमीजास्त प्रमाणात वाढ झालेली असते (माणूस). माणसातील उभयलिंगतेविषयी थोडक्यात असे सांगता येईल की, ही स्थिती दुर्मिळ व अपसामान्य स्वरूपाची असून तिचे यथार्थ, अपसामान्य पुरुष, अपसामान्य स्त्री इ. प्रकार असतात. हे प्रकार कोशिका संभूत (कोशिकांच्या विभाजनाने उत्पन्न झालेले) लिंग, जनन ग्रंथींचे लिंग, गौण लैंगिक लक्षणे, प्रवर्तकीय (उत्तेजक स्रावजन्य) प्रकार इत्यादींवर अवलंबून असतात. उभयलिंगतेचे आणखीही प्रकार पडू शकतात. उदा., काही वेळा दोन्ही प्रकारच्या जननग्रंथी एकाच वेळी कार्य करू शकतात तर काहींत नर व मादी या अवस्था सतत एकीनंतर दुसरी अशा क्रमाने चालू रहातात. काहींत (उदा., बेडकांत व विशेषतः 

आ. ५. गांडुळाची (उभयलिंगी) जननेंद्रिये (१) शुक्रग्राहिका, (२) वृषण, (३) शुक्राशय, (४) अंडाशय, (५) अंडवाहिनी (६) शुक्रवाहक, (७) अष्ठीला.

भेकांमध्ये) पुं- जननग्रंथीबरोबर प्रारंभिक अवस्थेतील बिडर इंद्रिय (जननेंद्रियांच्या पुढच्या टोकाला चिकटलेला अपूर्ण वाढ झालेला अंडाशय) असल्याने ते अल्पविकसित उभयलिंगता दर्शवितात. झिफोफोरस या असिपुच्छ (तलवारीच्या आकाराची शेपटी असलेल्या) माशाचा मादीतून नरावस्थेत बदल होताना तो

आ. ६. उभयलिंगी भेकाची जननेंद्रिये (१) विडर इंद्रिय, (२) अंडाशय, (३) वृषण.

 उभयलिंगी अवस्थेतून जातो. काही गोगलगाई, कालवे व सूत्रकृमी यांत विशिष्ट आनुवंशिक ठेवण असताना अगोदर शुक्राणू व नंतर अंडाणू निर्माण होतात. तर लिमॅक्स नावाची पिकळी (शंख नसलेली गोगलगाय) अनुक्रमे मादी, नर, उभयलिंगी व नंतर पुन्हा मादी अशा अवस्थांतून जाते. हे का होते यासंबंधी काहीही खुलासा उपलब्ध नाही. काहींत भोवतालच्या परिस्थितीनुसार लिंगात बदल होतो. काही आयसोपॉड कवची अपृष्ठवंशी प्राण्यांत मुक्तजीवी अवस्थेतील नरांचे परजीवी अवस्थेत मादींत रूपांतर होते. उभयलिंगी प्राण्यांत स्वनिषेचन (स्वफलन) शक्यतो टाळले जाते व त्यासाठी शरीररचना, वागण्याची पद्धती किंवा युग्मकांच्या पक्वनाच्या कालातील भिन्नता – पूर्वपुंपक्वता (अंडाणूंच्या आधी शुक्राणू पक्व होणे), पूर्वस्त्रीपक्वता (शुक्राणूंच्या आधी अंडाणू पक्व होणे) – इ. उपाय अवलंबिले जातात व परनिषेचन (एका प्राण्याच्या अंडाणूचा दुसऱ्या प्राण्याच्या शुक्राणूशी संयोग होणे) साधले जाते. इतर उभयलिंगी प्राण्यांत जरी जनन नियमित होते, तरी मानवांतील उभयलिंगीयांत मात्र ते शक्य होत नाही.

आ. ७. असिपुच्छ माशाच्या मादीचे नरात झालेले रूपांतर (१) नर, (२) मादी, (३) मादीचे नरात झालेले रूपांतर.


कित्येकदा शरीराचा अर्धा भाग नर आणि दुसरा भाग स्त्री असतो. अशा तऱ्हेच्या उभयलिंगतेस स्त्री-पुंरूपी (नर आणि मादी या दोहोंचीही लक्षणे दर्शविणारा प्राणी) उभयलिंगता म्हणतात. हा प्रकार माणसात आढळल्याचा उल्लेख नसला तरी पतंग, फुलपाखरे, गांधील माश्या अशा कीटकांत, तसेच बुलफिंच वगैरे पक्ष्यांत आढळतो. केव्हा केव्हा गाईंना जेव्हा भिन्नलिंगी जुळे होते तेव्हा त्यातील मादीत नराचे गुणधर्म दिसतात व अशांना वंध्ययमी (जुळ्यामध्ये नराबरोबर जन्मलेली वांझ मादी) म्हणतात. ही प्रवर्तकामुळे उत्पन्न झालेली मध्यलिंगता (नराच्या व मादीच्या लक्षणांच्या मधील लक्षणे एकाच व्यक्तीत असण्याची स्थिती) होय असे समजले जाते. सस्तन प्राण्यांच्या गर्भात, वृषण अंडाशयाच्या अगोदर तयार होऊ लागतो व त्यामुळे वृषणजन्य प्रवर्तक त्या जुळ्यातील मादीच्या लिंगाची वाढ खुंटवतो व वंध्ययमी तयार होते. माणसात क्वचित वस्त्रविपर्यय (पोषाख बदलणे) हाही प्रकार आढळतो. यात विशिष्ट लिंगानुरूप शरीररचना असते पण त्या व्यक्तीस विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीप्रमाणे रहाण्याची, वागण्याची व कपडे घालण्याची उत्कट इच्छा असलेली दिसते. उभयलिंगतेशी संबंधित असे हे प्रकार असले तरी खर्‍या अर्थाने ही लैंगिक अपसामान्यतेचीच (अस्वाभाविकतेची) उदाहरणे होत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

उभयलिंगता ही जरी काही ठिकाणी इंद्रियातील रासायनिक विक्रिया व त्यातील बदल यांमुळे निर्माण झाली असली किंवा परिस्थितीजन्य व जातीच्या अतिजीवितेच्या (टिकाव धरून राहाण्याच्या)

आ. ८. एका जातीच्या गांधील माशीत आढळणारी स्त्रीपुरूषी उभयलिंगता उजवी बाजू नर, डावी मादी.

दृष्टिकोनातून निर्माण झालेली असली तरी त्यात विकासतत्त्वही गुंफलेले आढळते. कमी विकास पावलेले प्राणी व अपृष्ठवंशी यांत उभयलिंगता जास्त आढळते, तरी सरीसृप, पक्षी व स्तनी ह्या विकास पावलेल्या प्राण्यांत एकलिंगता आढळते. म्हणजे विकासतत्त्वानुसार उभयलिंगता ही लिंगरचनेची आद्य अवस्था असून त्यातूनच

आ. ९. माणसातील यथार्थ उभयलिंगता.

 कोणत्याही स्वरूपाची एकलिंगता ही दुसऱ्या लिंगाची वाढ दडपून टाकून निर्माण झाली आहे असे दिसून येते. माणसातसुद्धा गर्भाच्या वाढीच्या पाचव्या आठवड्यात पुं- आणि स्त्री-लिंगभेद नसलेली जननग्रंथी निर्माण होते व पुढील दोन आठवड्यांच्या काळात Y गुणसूत्रामुळे तिची वृषणाच्या वाढीकडे व X गुणसूत्रामुळे अंडाशयाच्या वाढीकडे प्रवृत्ती होते. [गुणसूत्र म्हणजे आनुंवशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक असून X व Y ही गुणसूत्रे लिंग निश्चित करतात, → गुणसूत्र]. सारांश, प्रत्येक मनुष्य हा एका अर्थी उभयलिंगीच असतो पुढे एकाची वाढ होते तर दुसरे अवशिष्ट होते. इतकेच काय पण पुं- आणि स्त्री-प्रवर्तक त्याच्या शरीरात कायम निर्माण होत असतात व हा समतोल क्वचित ढळला की, विरुद्ध लिंगाच्या इंद्रियाची वाढ अगर त्याची लक्षणे दिसू लागतात. माणसापुरते बोलावयाचे झाल्यास उभयलिंगता व मध्यलिंगता या अवस्थांनी सामाजिक व दारुण स्वरूपाचे मानसिक प्रश्न मात्र उभे केले आहेत.

उभयलिंगतेस पौराणिक महत्त्वही आहे. पौर्वात्यांत उभयलिंगी देव किंवा देवता जगाच्या उत्पत्तीच्या वेळी होत्या अशी कल्पना आहे. मिसरी, यहुदी व हिंदू यांत प्रचलित असलेली, स्त्री व पुरुषात आविष्कार (प्रकट) पावलेली प्रकृतिपुरुष ही तत्त्वे एकमेकांशी निगडित होती आणि ती प्राथमिक स्वरूपात अविभक्त होती, ही कल्पना याचाच पुरावा होय. ग्रीक पौराणिक कथेनुसार हर्मिझ व ॲफ्रोडाइटी यांचा मुलगा हरमॅफ्रडाइटस हा साल्मॅसिस या जलदेवतेच्या त्याच्यावरील उत्कट प्रेमाने भारावला गेला व ती दोघे कायमची एकरूप झाली व त्यास उभयलिंगत्व प्राप्त झाले. प्रकृति आणि पुरुष, योनी व लिंग यांच्या एकीकरणाचे द्योतक म्हणून व प्रजावृद्धीस असे एकीकरण आवश्यक असते या विचारसरणीने आणि पुं- व स्त्री- जननेंद्रियांचे एकाच देहात वास्तव्य असावे या दृष्टिकोनातून शिव-पार्वतीच्या अर्धनारीनटेश्वर या संयुक्त स्वरूपाचा उगम झाला व ते स्वरूप उभयलिंगतेची किंवा स्त्री-पुंरूपाची भारतीय पौराणिक कल्पना दर्शविते असे वाटते [→ अर्धनारीनटेश्वर]

संदर्भ : 1. Crew, F. A. E. The Genetics of Sexuality in Animals, London, 1927.

    2. Overzier, C. Ed. Intersexuality, London, 1963.

परांजपे, स. य.