उत्पादन संघटना : नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्तूंचे किंवा त्यांच्या निर्मितीस उपयुक्त अशा मालाचे उत्पादन, ही आधुनिक अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे कारण सर्व आर्थिक व्यवहारांचे अंतिम उद्दिष्ट– ग्राहकांच्या गरजा भागविणे– कितपत साध्य होऊ शकेल, हे उत्पादनावरच अवलंबून असते. आवश्यक ते उत्पादक घटक इष्ट प्रमाणात वापरून ग्राहकांच्या गरजा भागविणाऱ्या वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती उत्पादनसंस्था करीत असतात. त्या अनेक प्रकारच्या असतात काही लहान, काही मध्यम तर काही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करतात. प्रत्येक संस्थेमध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन काम करीत असल्यामुळे अशा संस्थांना संघटनेची गरज असते. प्रत्येक उत्पादनसंस्थेस आपली उद्दिष्टे कमीतकमी वेळ व पैसा खर्च करून साधणारी उत्पादन संघटना निर्माण करून ती कार्यवाहीत आणावी लागते.
गेल्या पन्नास वर्षांत पुढारलेल्या औद्योगिक राष्ट्रांत उत्पादनाचा वेग व त्याचे परिमाण खूपच वाढल्यामुळे तेथील उत्पादन संघटनांच्या स्वरूपातही पुष्कळच बदल झाला आहे. लहान व मध्यम आकाराच्या उत्पादनसंस्था अद्यापि नाहीशा झाल्या नसल्या, तरी प्रचंड प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या संघटना याच आधुनिक उद्योगाच्या खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक संस्था होत. अशा संघटनांचे स्वरूप जरी उत्पादित वस्तूगणिक वेगवेगळे असले, तरी त्यांची काही वैशिष्ट्ये साधारणतः सर्वत्र आढळतात. प्रचंड प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उत्पादनसंस्थेला बरेच भांडवल जमवावे लागते. एखाद्या व्यक्तीकडून, भागीदारी संस्थेकडून किंवा खाजगी मर्यादित कंपनीकडून आवश्यक तेवढे भांडवल गोळा होऊ शकत नाही. म्हणूनच मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावर अनेक भागधारकांची संयुक्त भांडवल कंपनी स्थापून पुरेसे भांडवल जमवावे लागते. अशा मुबलक संयुक्त भांडवलामुळेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे सामर्थ्य उत्पादन संघटनांना लाभते.
बहुतेक मोठ्या उत्पादन संघटनांच्या कार्यपद्धतीत इतरही महत्त्वाची वैशिष्ट्ये दिसून येतात. श्रमविभागणी तत्त्वाचा अवलंब करून या संघटना उत्पादनाचा वेग वाढवितात. श्रमविभागणीमुळे काम सुलभ करता येते व सोपे काम अकुशल कामगारांकडे सोपवून कुशल कामगारांना अधिक कौशल्याचे व जबाबदारीचे काम देता येते. श्रमविभागणी व सुलभीकरण यांप्रमाणेच विशेषीकरणाचे तत्त्वही उत्पादन संघटना वापरतात. विशेषीकरण अनेक क्षेत्रांत वापरता येते. विशिष्ट कामगारांकडेच काही प्रक्रिया सोपविल्यास ते अधिक कुशल बनून उत्पादन अधिक वेगाने करू शकतात. अनेक प्रकारच्या वस्तूंच्याऐवजी काही विशिष्ट वस्तूच निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करून उत्पादन संघटना आपली उत्पादकता वाढवितात. उत्पादनासाठी लागणाऱ्या पद्धती, यंत्रे, अवजारे, प्रक्रिया या सर्वच गोष्टींच्या बाबतीत विशेषीकरणाचा अवलंब करून कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचे प्रयत्न उत्पादन संघटना करीत असतात. उद्योगांचे विशिष्ट प्रदेशात स्थानीयीकरण हासुद्धा विशेषीकरणाचाच एक प्रकार होय.
उत्पादन संघटनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रमाणीकरणाच्या वा मानकीकरणाच्या तत्त्वाचा वापर. उत्पादित वस्तूंचे वजन, आकार, मोजमाप, गुणधर्म इत्यादींची प्रमाणे वा मानके निश्चित करून त्यानुसार त्यांचे उत्पादन करावयाचे ठरविले, म्हणजे विशेषीकरण कार्यान्वित करणे सुलभ होते. मानकीकरणापासून फायदे म्हणजे उत्पादनखर्चात बचत होते व गिऱ्हाइकास ठराविक गुणधर्म असलेली वस्तू मिळू शकते. प्रमाणित गुणधर्म असणाऱ्या वस्तू निर्माण करूनच उत्पादन संघटना आपली बाजारपेठेतील प्रतिष्ठा टिकवू शकतात. मानकीकरणाचा आणखी एक फायदा हा की, त्यामुळे उत्पादनासाठी यंत्रे वापरणे शक्य होते.
उत्पादनाचे यांत्रिकीकरण हे त्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय. यंत्रामुळे श्रम आणि वेळ यांची बचत होते व उत्पादनाच्या प्रक्रिया पूर्वनिश्चित क्रमानुसार बिनचूक होतात. यंत्र एकदा सुरू झाले की, साधारणतः बंद होईपर्यंत आपले काम करीत राहते. त्याचे उत्पादन व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसते आणि त्यामुळे वस्तूंच्या गुणधर्मांत सातत्य टिकून राहते. यंत्रावर काम सोपविले म्हणजे मनुष्याची विचारशक्ती केवळ उत्पादनासाठी खर्च करावी न लागता तिचा दुसरीकडे उपयोग करता येतो. प्रमाणीकरण, यांत्रिकीकरण व विशेषीकरण या तत्त्वांचा अवलंब करूनच प्रचंड प्रमाणावर उत्पादन करण्याची पद्धती अंमलात आणता येते. अर्थात यंत्रांवर देखरेख मात्र कामगारांना करावी लागते. काही वस्तूंच्या उत्पादनासाठी अलीकडे स्वयंचलनाच्या तत्त्वाचा उपयोग केला जातो. उत्पादकाच्या काही प्रक्रिया किंवा समग्र उत्पादन स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने करणे काही बाबतींत शक्य झाले आहे. अशा उत्पादन संघटनांमध्ये मानवी बुद्धी केवळ यंत्रे सुस्थितीत ठेवणे, त्यांचा योग्य समन्वय साधणे व संघटनेचे यथावश्यक नियोजन व नियंत्रण करणे, एवढ्यासाठीच वापरावी लागते.
पहा : उद्योग मानकीकरण.
संदर्भ : Roscoe, E. S. Organization for production, Homewood, 1963.
धोंगडे, ए. रा.