इसब : त्वचेला येणाऱ्या ओल्या व कोरड्या सुजेला ‘इसब’ असे म्हणतात. हा विकार पुष्कळ प्रमाणात आनुवंशिक व अनेकरूपी असतो. परंतु संसर्गजन्य नसतो. विसर्प या मूळ संस्कृत शब्दापासून इसब वा इसप हा शब्द झाला आहे.

कारणे : या रोगाला दोन प्रकारची कारणे असतात. निज किंवा आंतरिक कारणांत आनुवंशिकता, मानसिक क्षोभ, अस्वस्थता, फार स्‍निग्‍ध किंवा फार रुक्ष त्वचा वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो.

बाह्य कारणांमध्ये कित्येक अन्नपदार्थ, त्वचेला क्षोभक असलेल्या पदार्थाचा संपर्क वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. काही लोकांना रोजच्या अन्नातील कित्येक पदार्थ सोसत नाहीत. उदा., गहू, दूध, टोमॅटो, मासे, अंडी, कॉफी वगैरे एक किंवा अनेक पदार्थ खाण्यात आले, तर त्या व्यक्तींना इसब होतो. इसबासारखेच दमा, पित्त वगैरे विकार ⇨ ॲलर्जी (अधिहृषता) या सदरात अंतर्भूत आहेत. त्वचेस बाहेरून लागणाऱ्या पदार्थांमुळे, उदा., साबण, सौंदर्यप्रसाधने, रंग, औद्योगिक कारखान्यांत वापरण्यात येणारे पदार्थ इतकेच काय कित्येक स्त्रियांना एका विशिष्ट प्रकारचे कुंकू कपाळावर लावल्यास इसब उद्भवते.

लक्षणे : इसबात त्वचेवर लाली, सूज, फोड, पीटिका (लाल फोड), पुटिका (लाल  व जाड द्रवयुक्त फोड) व जंतुसंसर्ग झाल्यास पूयिका (पुवाळलेला फोड) व व्रणही (जखमही) होतात. प्रथम त्वचेवर लाली येते, नंतर त्या लाल त्वचेवर कडेला बारीक पुरळासारखे फोड अथवा पीटिका दिसू लागतात. त्या पीटिकेत पाणी साठून तिला पुटिकेचे स्वरूप येते. पुटिका फुटून तीतून थोडेसे चिकट घट्ट पाणी बाहेर पडते. ह्या पुटिका इसबाचे मुख्य स्वरूप मानले जाते. हे चिकट पाणी त्वचेवरच वाळले म्हणजे तेथे पातळसा पांढरा थर अथवा पापुद्रा धरतो. या पापुद्र्याच्या खालची त्वचा जाड व काळसर होते. त्वचेला फार खाज सुटते. फार खाजविले तर जंतुसंसर्ग होऊन व्रण होण्याचा संभव असतो. इसब जितके जुने असेल तितकी त्वचा जाड, कोरडी, खरखरीत व काळी होऊन त्वचेवरील रेषा जास्त खोल दिसतात.

प्रकार : इसबाचे कित्येक प्रकार आहेत. त्यांपैकी महत्त्वाच्या काही प्रकारांचे वर्णन खाली दिले आहे :

(१) अर्भकीय इसब : हे इसब चांगले बाळसे असलेल्या ३ ते ६ महिन्यांच्या मुलांत दिसते. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीच्या सुमारास नाहीसे होते. गाल, डोळ्यांच्या पापण्या, कपाळ, हात व पाय या भागांवर ते जास्त प्रमाणात दिसते. खाज फार असल्यामुळे मूल सारखे खाजवते त्यामुळे रक्त येऊन आग होते. मुलाला देण्यात येणाऱ्या दुधामुळे आनुवंशिक प्रवृत्ती असलेल्या मुलात हा प्रकार दिसतो. गोलाणुसंसर्गामुळे (कॉकस नावाच्या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे) एक प्रकारचा त्वचारोग विशेषत: अशक्त मुलांमध्ये दिसतो. इसबामध्ये गोलाणुसंसर्ग झाल्यासही असाच प्रकार दिसतो त्याला आगपैण म्हणतात.

(२) संपर्कजन्य इसब : कुंकू, साबण, सौंदर्यप्रसाधने वगैरे पदार्थांचा त्वचेशी संपर्क आला, तर हा प्रकार दिसतो. या प्रकारात आनुवंशिकतेचा संबंध असावा असे मानतात. हे पदार्थ वापरणे बंद केले म्हणजे इसब आपोआप बरे होते. सुरुवातीस संपर्क झालेल्या जागीच इसब होते पण पुढे शरीरावर कोठेही होऊ शकते.

(३) त्वक्-स्‍नेहिक इसब : डोक्यात, कानाच्या मागे, चेहऱ्यावर विशेषत: नाकाच्या दोन्ही बाजूंस हा प्रकार दिसतो. त्वचेत नेहमी तयार होणारे स्‍निग्‍ध द्रव्य जास्त प्रमाणात झाल्यामुळे व तेथे जंतुसंसर्ग झाल्यामुळे हा प्रकार होतो.

(४) अपस्फीत-नीला इसब : ज्यांना फार वेळ उभे रहावे लागते अशा व्यक्तींच्या पायांच्या नीलांमध्ये रक्त साठून नीला मोठ्या व नागमोडी (अपस्फीत) होऊन त्वचेला सूज येते. हे इसब बहुधा घोट्याभोवती दिसते.

(५) वार्धक्यजन्य इसब : वार्धक्यात त्वचा अगदी कोरडी पडून तडतडते व खाज सुटून येथे इसब होते.

(६) तंत्रिका-चर्म-शोथजन्य इसब : (तंत्रिका म्हणजे मज्‍जातंतू शोथ म्हणजे दाहयुक्त सूज). हा प्रकार आनुवंशिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींत, विशेषत:अतिसंवेदनशील (प्रकृतीने हळव्या असलेल्या) व्यक्तींत, अथवा मन:क्षोभ, अस्वस्थता या अवस्थांत दिसतो. समाजाच्या वरच्या थरांत याचे प्रमाण अधिक दिसते.

(७) अधिहृषताजन्य इसब : दमा, ⇨ पराग ज्वर वगैरे आनुवंशिक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींत हा प्रकार दिसतो. काही बारीकसारीक कारण झाले किंवा कित्येक वेळा निश्चित कारण न दिसताही हा प्रकार दिसतो. या रोग्यांची अंगकाठी कृश असून ते अस्वस्थ आणि चिडखोर प्रवृत्तीचे असतात. त्वचा अगदी शुष्क असते. धूळ व उष्ण हवा असल्यास या प्रकाराचे प्रमाण अधिक दिसते.

(८) जंतुज इसब : जखमांमधून येणारा, फुटक्या कानातून वाहत असणारा पूयमिश्रित स्राव त्वचेवरून सारखा जात असला, तर स्रावातील सूक्ष्मजंतूंमुळे त्वचेला शोथ होऊन त्याजागी इसब होते.

चिकित्सा : मूळ कारण सापडून ते दूर करता आले, तर रोग त्वरित बरा होतो. परंतु मूळ कारण पुष्कळ वेळा सापडत नसल्यामुळे रोग वारंवार उद्भवत राहतो. तात्पुरता बरा झाला तरी पुन: पुन्हा होण्याचा संभव असतो. विशेषत: आनुवंशिक प्रवृत्तीच्या व्यक्तींना जन्मभर त्रास होत राहतो. चिकित्सा कारणानुरूप केली जाते. आगपैणीमध्ये प्रतिजीव औषधांचा [→ प्रतिजैव पदार्थ] उपयोग होतो. कॉर्टिसोन [→ हॉर्मोन] व हिस्टामीनविरोधी औषधांचा [→ हिस्टामीन] काही प्रकारांत उपयोग होतो. कॅलॅमीन, झिंक ऑक्साइड वगैरे औषधांमुळे तात्पुरते बरे वाटते.

कापडी, रा. सी.

आयुर्वेदीय चिकित्सा : हा एक विसर्पाचा प्रकार आहे. याचे सुके व ओले असे दोन प्रकार असतात. हा पसरणारा रोग आहे, म्हणून तो विसर्पात समाविष्ट केलेला आहे. दोन्ही प्रकारच्या रोगांमध्ये मधूनमधून जळवा किंवा तुंबी किंवा शिंग लावून रक्त काढावे. ओले असल्यास वांती करवावी. यावर महामंजिष्ठादी काढा, खदिरारिष्ट व सारिवासव ही द्यावीत महातिक्तघृत उपयोगात आणावे कांतभस्म, रौप्यभस्म, काशिसभस्म, रससिंदूर, तालसिंदूर व गंधकरसायन ह्यांचा उपयोग करावा. तुरीची डाळ आणि वाळा वजनाने सम प्रमाणात घेऊन व जाळून ती मषी करंजेल तेलातून चोळावी. ओल्या इसबावर या मषीमध्ये शुद्ध मोरचूद व मुर्दाडसिंग ही घालून ती लावावी. आहारामध्ये रक्त दुष्टिकारक असा आहार व मीठ घेऊ नये.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

इसब, पशूंतील : सर्व पाळीव प्राण्यांमध्ये इसब होते. त्याची कारणे, प्रकार, लक्षणे सामान्यपणे माणसांच्या इसबाप्रमाणेच असतात. तरी देखील प्राण्यांचे आहार, सवयी व इतर बाबतींतील भिन्नतेमुळे रोगाबाबतच्या फरकांचाच येथे उल्लेख केला आहे.

कारणे : प्राणिवैशिष्ट्यामुळे किंवा विशेषेकरून बाह्य प्रथिन पदार्थांमुळे होणाऱ्या अधिहृषतेमुळे शरीराच्या त्वचेवर सूज येते, तेव्हा इसब होते. कुत्र्या-मांजरांच्या आहारास जीवनसत्त्वांचा अभाव किंवा ती मुळीच नसणे, शिजवलेले प्रथिनयुक्त किंवा पिठुळ अन्न जास्त प्रमाणात खाणे व अपुरा व्यायाम ही रोग उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरतात. यकृताच्या रोगांमुळे इसब होत नसले तरी पण ते इसबाबरोबर आढळतात.

कुत्र्यांच्या काही जातींत हा रोग जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे तो एका पिढीतून दुसरीत आनुवंशिकतेने उतरतो, हे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. उवा चावल्यामुळे होणारी त्वचेची ग्रहणशीलता रोगाचे मुख्य कारण असते.

व्यवच्छदेक निदान : परजीवींमुळे (दुसऱ्या उपजीवीका करणाऱ्या जीवांमुळे) होणाऱ्या लूत रोगाचे व्रण, इसबाच्या व्रणासारखेच असतात व दोहोंतील फरक नुसत्या डोळ्यांना उमगत नाही. व्रणातून खरवडून काढलेल्या भागाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केल्यानंतरच इसबाचे निदान निश्चित होते.

लक्षणे : ह्या रोगाचे निरनिराळे व विविध प्रकार असूनही त्यांची वर्गवारी करणे सोपे नसल्यामुळे, व्यवहारात ओले व कोरडे असे दोन प्रकार करतात.

(१) ओले : हा प्रकार सर्वसामान्य असून कमी जास्त प्रमाणात प्रत्येक पाळीव प्राण्यात आढळतो. रोगाच्या ह्या स्वरूपात त्वचेतून लसीकायुक्त (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांकडून म्हणजे ऊतकांकडून खास वाहिन्यांद्वारे रक्तात मिसळणाऱ्या द्रव पदार्थाने युक्त) स्राव बाहेर पडते, त्वचेवरील केस संलग्न व चिकट होणे, कंड व दाह अशी लक्षणे असतात. रोगग्रस्त जागी जंतूंचे आक्रमण होण्यामुळे पू तसेच वेदना होणेही शक्य असते. लांब केसाळ कुत्र्या-मांजरांच्या जातीत ह्या प्रकारचे इसब पाठीवर तसेच सामान्यपणे दोन्ही बाजूंवर आढळते. रोगी प्राणी तोंड पोचू शकेल अशा जागी चाटून व खाजवून कंड शमन करण्याचा प्रयत्न करतो पण परिणामी चट्टे (ओरखडे) पडतात व इसब झालेल्या जागेच्या आवतीभोवती मोठ्या प्रमाणात विदीर्ण क्षते (जखमा) होतात. त्या जागेचे केस एकवटून चिकटलेले असल्यामुळे रोगग्रस्त जागा सहज ओळखता येते. परीक्षणात ती ओलसर, चिकट, लालसर व सुजलेली आढळते. रोगी जनावर कोणासही त्या जागेवर हात लावू देत नाही. पायाच्या पंजामध्ये कोमल त्वचेवर इसब झाले म्हणजे कुत्रा लंगडतो, रोगग्रस्त भाग सहजतेने चाटता येईल अशा प्रकारे तो जमिनीवर पडून राहतो व कोणासही तपासू देत नाही. तीनचार दिवस चाटत राहिल्यामुळे ओठांच्या कडांवर अशाच प्रकारे इसब उद्भवते व ह्या दोन्हींवर उपचार लागू पडत नाही.

लांब केसाळ जातीच्या कुत्र्यांमध्ये एक प्रकारचे इसब डोळ्याभोवती होते, तेव्हा त्याला इसबयुक्त नेत्रश्लेष्मशोथ म्हणतात. कारण डोळ्यांच्या पापण्यांवरील कला (नाजूक पटल) सुजलेली आढळते. काही कुत्र्यांमध्ये मुष्कीय (अंडाच्या पिशवीच्या कातडीवर) इसब होते.

घोड्यामध्ये पुढच्या व मागच्या पायांच्या बाकाभोवती व घुटण्याखालच्या सांध्याभोवती इसब होते. ते पांढरे केस असलेल्या पायावर व इतर भागांवरही आढळते. अशा जागांवरील वर्णकावर (कातडीच्या रंगावर) सूर्यकिरणांचा व प्रकाशाचा अनिष्ट परिणाम झालेला असतोच.

गाई-बैल, मेंढ्या व डुकरे यांच्या पायांच्या खुरांमधील कोमल त्वचेवर विशिष्ट प्रकारचे इसब आढळते. यांत ऊतकनाशी किरणकवकाचा [ॲक्टिनोमायसीझ वंशातील कवकाचा, → कवक] संपर्क होतो. ही रोगावस्था खूरकूत रोगापासून (खूरांना होणाऱ्या व्हायरसजन्य रोगापासून) व्यवच्छेदक निदान करण्यास कठीण असते.

(२) कोरडे : शरीराच्या पृष्ठभागावर होणार्‍या या प्रकारात त्वचेवरील केस गळून पडतात व रोगग्रस्त भाग भुरकट रंगाच्या खवल्यांनी आच्छादिलेला आढळतो. काही काळानंतर पुटकी लूतीच्या (केसांच्या मुळाशी होणाऱ्या लूतीच्या) काही प्रकारांत आढळणाऱ्या जाड व सुरकुतलेल्या क्षतांसारखे ह्या रोगाचे स्वरूप दिसते. रोगाची क्षते पाय, मान व डोक्यावर दिसतात. विशिष्ट प्रकारात इसब फक्त त्वचेवर होते व त्यात क्वचित थोडा स्त्राव असला, तर तो वाळून जातो किंवा पृष्ठभागावरील त्वचेमार्फत शोषिला जातो. झालेला रोग गजकर्ण [एक कवकजन्य रोग, → गजकर्ण] नसल्याबद्दल व्यवच्छेदक निदान करून घेण्याची काळजी घेणे जास्त जरूरीचे आहे.

चिकित्सा: एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ पुष्कळ अवधीपर्यंत खाण्यामुळे शरीरात विशिष्ट घटक साचून राहतात व हे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून इसबग्रस्ताच्या आहारात बदल करणे जरूरीचे असते. नुसते बाह्योपचार करून रोगी बरा होत नाही, पण खाण्यापिण्यात बदल केल्याबरोबर ताबडतोब सुधारणा दिसून येते. चारा गवत खाणाऱ्यांना ओला चारा देतात व दाण्याचे प्रमाण कमी करतात. कुत्र्या मांजरांना गाजर, मुळा, कोबी, फुलकोबी वगैरे किसून इतर अन्नपदार्थांबरोबर देतात व मासे देणे बंद करतात. हिस्टामीन विरोधी औषधे उपयोगी ठरतात.

इसबग्रस्त जागेवरचे केस अगदी त्वचेजवळ बारीक कापून जागा स्वच्छ करतात. साबण वापरण्यामुळे कोमल त्वचा चरचरण्याने तिचा दाह होण्याची शक्यता असते, म्हणून थोड्या प्रमाणात धुण्याचा सोडा घातलेले गरम पाणी वापरतात. जागा स्वच्छ केल्यानंतर पुढीलपैकी एक औषध लावतात : (१) कॅलॅमीन विद्राव, (२) तीन ते पाच टक्के तुरटीचा विद्राव किंवा (३) पाच टक्के झिंक सल्फेटाचा विद्राव.

पू झाला असल्यास सल्फा निलमाइडाची पूड वापरतात. वरीलपैकी काही औषधे कोरड्या प्रकारांतही वापरतात व मधूनमधून आलटून पालटून उपयोगात आणतात.

परजीवींमुळे होणारी लूत, गजकर्ण व इसब ह्यांतील फरक ओळखणे सर्वसामान्य माणसाला शक्य नसल्यामुळे रोगनिदान निश्चिती करण्यासाठी तज्ञांची मदत जास्त उपयोगी ठरते.

तोंडाचे इसब : गाई बैलांत व मेंढ्यांत विशिष्ट प्रकारच्या वनस्पती खाण्यात आल्यामुळे त्यांच्या शरीरातील काही पेशी सूर्यप्रकाशाला संवेदनाक्षम होतात व त्यामुळे त्यांना या प्रकारचे इसब होते. न्यूझीलंड देशात एका विशिष्ट कवकामुळे हा रोग उद्भवतो. स्वीट व्हर्नल गवत व क्लोव्हर या गवताच्या जाती ह्या कवकाला विरोधी आहेत. वालुमक्षिका [→ एक प्रकारची माशी, वालुमक्षिका] चावण्यामुळे प्रकाश संवेदनाक्षमतेचा परिणाम जास्त होतो. म्हणून ऑस्ट्रेलियात घोड्यांमध्ये अशाच प्रकारचा त्वचेचा रोग होतो. जपानमध्ये तबेल्यात आढळणाऱ्या माशांमुळेही हा रोग संभवतो. हा रोग उष्ण हवामानात होणाऱ्या रोगांपैकी असून त्यात कंड अतिशय सुटते. उपचारासाठी हिस्टामीनविरोधी औषधे वापरतात.

गद्रे, य. त्र्यं.