इटली : यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र. मुख्य द्वीपकल्पाशिवाय यात सार्डिनिया (२४,०८० चौ. किमी.) व सिसिली (२५,७४८ चौ. किमी.) या मोठ्या आणि एल्बा, जील्यो, इस्किया, काप्री, लिथारी, पांतेल्लेरीया, लँपडूसा इ. सु. ७० लहान बेटांचा समावेश होतो. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवाच आहे (सिसिली ते आफ्रिका अंतर १४५ किमी.). त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. याचे अक्षांश ३६० ३८’ उ. ते ४७० ५’ उ. आणि रेखांश ६० ३३’ पू. ते १८० ३१’ पू. असून क्षेत्रफळ ३,०१,१९५ चौ. किमी. व लोकसंख्या ५,४०,२५,२११ (१९७१) आहे. देशाची जास्तीत जास्त लांबी १,१४२ किमी. असून आल्प्सकडे जास्तीत जास्त रुंदी ५६३ किमी. व दक्षिणेकडे कमीत कमी ३२ किमी. आहे. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. बेटे सोडून देशाची सागरी सरहद्द सु. ४,३०० किमी. असून द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे लिग्यूरियन व टिरीनियन, दक्षिणेकडे आयोनियन व पूर्वकडे एड्रिॲटिक समुद्र आहेत. सिसिली हे नैर्ऋत्येकडील बेट ३२ किमी. लांब व ३ ते १६ किमी. रुंद अशा मेसिना सामुद्रधुनीने वेगळे झालेले आहे. सार्डिनिया रोमच्या पश्चिमेस सु. २४० किमी. व सिसिलीच्या वायव्येस ३२० किमी. आहे. देशाच्या भौगोलिक सीमांत सान मारीनो या छोट्याशा (६१ चौ. किमी.) प्रजासत्ताकाचा व व्हॅटिकन (०·४ चौ.किमी.) या सार्वभौम धर्मपीठाचाही समावेश होतो. इटलीची राजधानी रोम आहे.
भूवर्णन : उत्तरेकडे आल्प्स, त्याच्या दक्षिणेस पो नदीचे खोरेआणि त्याच्याही दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पाठीच्या कण्यासारखा पसरलेला ॲपेनाइन्स व त्याच्या दोन्ही बाजूच्या किनारपट्ट्या असे इटलीचे सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल. उत्तरेकडील आल्प्स तृतीययुगीन घडामोडीत वलीकरणाने बनलेला अर्वाचीन पर्वत असल्याने त्यात उंच शिखरे, खोल दऱ्या, खिंडी, सरोवरे व हिमानी क्रियेचे अवशेष आढळतात. येथील आल्प्सचे तीन सारखे भाग पडतात : पीडमाँट, लाँबर्ड व व्हिनीशियन आल्प्स, जेनोआच्या पश्चिमेकडील कादीबोना खिंडीपासूनन स्विस सरहद्दीवरील सिंप्लॉन खिंडीपर्यंत पसरलेल्या पीडमाँट आल्प्समध्ये तुटलेले कडे व अवघ्या २५ किमी. मध्ये २,७५० मीटरपर्यंत गेलेली सुळक्यासारखी शिखरे आहेत. सेंट बर्नार्ड व माँ सनी या महत्त्वाच्या खिंडी याच भागात आहेत. काळ्या शिस्टमध्ये अधूनमधून ४,०००–५,००० मी. उंचीचे ग्रान पारादीसो, माँटे रोझा व माँ ब्लां यांसारखे स्फटिकी गिरिपिंड आढळतात. येथील माँट वीझोपासून पो नदीचा उगम होतो. सिंप्लॉन खिंडीपासून ऑस्ट्रियन सरहद्दीजवळील रेझिया खिंडीपर्यंत पसरलेला लाँबर्ड आल्प्स रुंद असून दक्षिणोत्तर गेलेल्या अनेक दऱ्या तेथे आढळतात. आल्प्सवरून आलेल्या हिमनद्यांमुळे या दऱ्यांतून माद्जोरे, लूगानो, कॉमो, ईझेओ, गार्दा यांसारखी निसर्गरम्य सरोवरे बनली आहेत व या दऱ्यांतून दळणवळणाचे मार्गही गेले आहेत. हा भाग जलविद्युत्निर्मितीसही उपयुक्त झाला आहे. व्हिनीशियन आल्प्स ईशान्येकडे कांपॉरॉसॉ (तार्वीस्यो) खिंडीपर्यंत पसरला असून त्याची उंची २,४००–३,३०० मी. पर्यंतच आहे. त्याची रुंदी मात्र जास्त असून तो दळणवळणास सोयीचा आहे. यातील ब्रेनर खिंडीची उंची फक्त १,४३० मी. आहे. इटली-ऑस्ट्रिया-युगोस्लाव्हिया यांमधील कार्स्ट भूमिस्वरूपाचा पट्टा येथूनच सुरू होतो. सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी विविध रंगछटांनी चमकणारे, ३,३०० मीटरपर्यंतच उंचीचे परंतु अनेक रेखीव सुळक्यांनी युक्त असल्यामुळे प्रवाशांचे एक आकर्षण ठरलेले डोलोमाइट डोंगरही येथेच आढळतात. पो नदीचे खोरे पश्चिमेकडे अरुंद व पूर्वेकडे रुंद होत गेले असून देशाचा १७ टक्के भाग या खोऱ्याने व्यापला आहे. प्राचीन काळची ही एड्रिॲटिकची द्रोणी आल्प्समधील दगडधोंड्यांनी व गाळाने भरून येऊन हा सखल प्रदेश बनला आहे. आद्दा, ओल्यो, तीचीनो, सेझ्या, त्रेब्या, तारो, तानारो या पोच्या उपनद्या आदीजे, ब्रटो, प्यावे वगैरे या खोऱ्यातील नद्या व आल्प्समधून वाहणारे असंख्य झरे ह्यांमुळे हे एक अत्यंत समृद्ध मैदान बनले आहे. यालाच लाँबर्डीचे मैदान असेही म्हणतात. पूर्व किनाऱ्यावर गाळ साचल्यामुळे कोमाक्यो व इतर बरीच खारकच्छे बनली आहेत.
द्वीपकल्पाच्या मध्यातून वायव्य-आग्नेय दिशेने गेलेली ॲपेनाइन्स पर्वतश्रेणी तृतीययुगीन काळातील घडामोडीत बनलेली आहे. त्याच काळात टिरीनियन समुद्राचा भाग खचून द्वीपकल्पीय इटली, सिसिली, सार्डिनिया, कॉर्सिका हा भागच तेवढा शिल्लक राहिला. शास्त्रज्ञांच्या मते ही घडामोड अद्याप अपूर्ण असल्याने येथे मुख्य भूमीवरील व्हेसूव्हिअस (१,१७५ मी.), सिसिलीमधील एटना (३,२७५ मी.) व स्ट्राँबोली बेटावरील स्ट्राँबोली (९२६ मी.) ह्यांसारखे जागृत ज्वालामुखी असून येथे जपानखालोखाल भूकंप होतात. ॲपेनाइन्सचे उत्तर, दक्षिण व मध्य असे तीन विभाग असून त्याचे पोटभाग स्थानिक नावांनी प्रसिद्ध आहेत. हा सु. १,२९० किमी. लांब व ३०–१३६ किमी. रुंद असून यावरील बराच भाग पठारी आहे. मध्य भागात यावर त्राझिमेअनो व ज्वालामुखी विवरांत पाणी साचून वनलेली बोल्सेना, ब्रात्चानो, वीको, नेमी, आल्बानो इ. सरोवरे निर्माण झाली आहेत. माँटे कोर्नो (२,९२० मी.) हे ॲपेनाइन्समधील सर्वोच्च शिखर होय. ॲपेनाइन्सवरून पूर्वेकडे अनेक लहान नद्यानाले तर आर्नो, टायबर, लीरी वोलतूर्नो, गारील्यानो या काही मोठ्या नद्या पश्चिमेकडे वाहतात. या नद्यांनी समृद्ध खोरी तयार केली आहेत. बोक्केता, लाचीझा, ला फूता, जोंवी, पेस्कारा, स्केर्दजा यांसारख्या तेरा महत्त्वाच्या खिंडी ॲपेनाइन्समध्ये असल्याने दळणवळण सुकर झाले आहे.
इटलीचा वायव्य किनारा डोंगराळ, तीव्र चढउताराचा व चिंचोळा असून, आल्प्समुळे व भूमध्यसामुद्रिक हवामानामुळे तो रिव्हिएरा नावाने हौशी प्रवाशांचे आकर्षण ठरला आहे. पश्चिम किनाऱ्यावरील टस्कनी, रोम, नेपल्स येथील नदीखोऱ्यांचा प्रदेश सुपीक मैदानी आहे. पूर्वेकडील किनारा अरुंद व चुनखडकाचा बनलेला आहे. सिसिली बेट बहुतांशी डोंगराळ व पठारी आहे. सार्डिनियाचा नैर्ऋत्य भाग सोडल्यास इतर प्रदेशही डोंगराळ आहे.
द्वीपकल्पावरील टायबर, आर्नो इ. मोठ्या नद्या वगळल्यास इतर नद्यांना उन्हाळ्यात नाममात्र पाणी असते तर पावसाळ्यात मात्र त्या पुराचा धोका निर्माण करतात. उत्तरेकडील पो नदीला आल्प्स पर्वतावरून हिमजलाचा फायदा मिळत असल्याने तिला वर्षभर भरपूर पाणी असते. पो नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील एड्रिॲटिक समुद्रकिनारा बराचसा सरळ आहे आणि त्यावर अँकोना, ब्रिंडझी, बारी अशी थोडी बंदरे आहेत त्या मानाने पश्चिम किनाऱ्यावर जेनोआ स्पेत्स्या, लेगहॉर्न, सालेर्नो, नेपल्स यांसारखी प्रसिद्ध बंदरे आहेत. दक्षिणेकडे टॅरँटोच्या आखातावर असलेले त्याच नावाचे बंदर संरक्षित व नैसर्गिक आहे सार्डिनियामध्ये काल्यारी व सिसिलीमध्ये पालेर्मो ही महत्त्वाची बंदरे आहेत.
नदी खोऱ्यातील गाळाच्या जमिनी व लाव्हारसाने निर्माण झालेल्या जमिनी अव्वल दर्जाच्या आहेत. डोंगराळ प्रदेश व दक्षिणेकडील जमिनीतील चुनखडीचा अंश यांमुळे इटलीतील बरीच जमीन हलक्या दर्जाची आहे. जमिनीची धूप हा येथील महत्त्वाचा प्रश्न आहे.
खनिजसंपत्ती : सार्डिनियामध्ये शिसे व कथील, सिसिलीमध्ये गंधक, टस्कनीमध्ये पारा, आब्रुत्झीमध्ये बॉक्साइट, इतरत्र मँगॅनीज, पायराइटीस, जस्त, अँटिमनी, ॲस्बेस्टस व केओलीन ही खनिजे गरजेपुरती मिळतात. पारा व गंधक यांची निर्यात करता येते. इटलीतील संगमरवर, ॲलॅबेस्टर, ट्रॅव्हर्टिन इ. बांधकामाचे दगड प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. किनाऱ्यावर समुद्रापासून मीठ काढले जाते. महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीत हा देश अभागी आहे. दगडी कोळशाचे व लोहधातुकाचे प्रमाण अत्यल्प असून कोळशाचा दर्जाही चांगला नसतो. खनिजवायूचे उत्पादन पो नदीच्या खोऱ्यात बरेच वाढले असून उत्तरेकडे मोठमोठ्या शहरांना नळातून त्याचा पुरवठा होतो. मध्य इटली आणि सिसिली येथील खनिजतेलाच्या उत्पादनातही गेल्या २५ वर्षांत आश्चर्यकारक वाढ झाली आहे. इटलीच्या शक्तिसाधनांची उणीव जलविद्युत् व औष्णिक विद्युत् योजनांनी भरून काढली आहे. १९७१ मध्ये यांचे उत्पादन १२,४८६ कोटी किवॉ. तास होते.
हवामान : इटलीचे हवामान प्रामुख्याने भूमध्यसागरी आहे तथापि देशाच्या उंचसखलपणामुळे हवामानात विविधता आढळते. जुलैचे सरासरी तपमान २४० से. व जानेवारीचे ८० से. असते. आल्प्स पर्वताच्या उंच रांगांमुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडविले जातात व पो नदीच्या खोऱ्यात हिवाळ्यात थंडीचा कडाका थोडा कमी होतो. खोऱ्यात उन्हाळे उबदार असतात आणि पाऊस बराचसा वसंत आणि शरद ऋतूंमध्ये पडतो. पो खोऱ्यात ९० सेंमी. पासून आल्प्स पर्वताच्या बाजूला २०० सेंमी. पर्यंत त्याचे प्रमाण वाढत जाऊन डोंगराळ भागात हिमवृष्टी होते. रिव्हिएरा किनाऱ्याच्या बाजूस वर्षभर हवामान सौम्य व भरपूर सूर्यप्रकाशाचे आढळते. समुद्रसान्निध्यामुळे द्वीपकल्पीय भागात थंडी कमी असते. एड्रिॲटिक समुद्राच्या बाजूस आल्प्सच्या कमी उंचीमुळे ईशान्येकडून येणारे बोरा नावाचे थंड वारे त्या भागात थंडीचे प्रमाण थोडे वाढवितात परंतु बहुतेक भागांत हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने व उन्हाळे पूर्ण कोरडे असल्याने हिवाळे सौम्य व उन्हाळे कडक होतात. पावसाचे प्रमाण उत्तरेकडून दक्षिणेकडे ९० सेंमी. ते ६४ सेंमी. पर्यंत कमी होत जाते. भरपूर सूर्यप्रकाश व कोरडी हवा हे इटलीच्या हवामानाचे आकर्षण आहे.
वनस्पती व प्राणी : ३००० वर्षांपासून या देशावर मानवी वस्ती असल्याने येथील मूळ नैसर्गिक वनस्पती नाहीशी झाली आहे. आल्प्सच्या २,००० मीटरवरील व ॲपेनाइन्सच्या २,३०० मीटरवरील प्रदेशांत सूचिपर्णी वृक्ष आणि त्याखाली बीच, ओक व चेस्टनट आढळतात. पो खोऱ्यात पॉप्लर, विलो आणि द्वीपकल्पावर व बेटांवर बुचाची झाडे, ओक, जूनिपर, लॉरेल, मर्टल इ. भूमध्यसागरी वनस्पती आढळतात. देशाच्या अरण्यांनी व्यापलेल्या २० टक्के क्षेत्रापैकी मोठा भाग आल्प्स पर्वतात असून दक्षिणेकडे द्वीपकल्पावर व बेटांवर फारच थोडी अरण्ये आढळतात. यांतून इटलीची इमारती लाकडाची गरज पुरी होत नाही. वनवर्धनाचे कार्य १९४९ पासून सरकाने हाती घेतले आहे.
अरण्ये कमी झाल्याने डोंगराळ प्रदेश देखील बरेच उघडे पडले आहेत आणि शिकारीमुळे वन्य पशूंची संख्या फारच तुरळक झाली आहे. मोठे सस्तन वन्य प्राणी पूर्णपणे नाहीसे झाले असून आल्प्स पर्वताच्या काही भागांत अस्वले, शॅमॉय जातीची हरणे, द्वीपकल्पाच्या बाजूस लांडगे आणि सार्डिनियामध्ये सांबर इ. प्राणई तुरळक आढळतात. रानडुकरांची संख्या मात्र अजूनही बरीच दिसते. द्रोणकावळे आणि भांडीक हे पक्षी व सरडे इटलीतील वैशिष्ट्य होय. देशाशी संलग्न असलेल्या समुद्रांतून विविध प्रकारचे सागरी प्राणी आढळतात. किनाऱ्यालगत समुद्रात डॉल्फिन जातीचे प्राणी व मासे भरपूर मिळतात.
आठल्ये, द. वा.; कुमठेकर, ज. व.; शाह, र. रू.
इतिहास : इटलीच्या प्राचीन इतिहासाला प्रदीर्घ परंपरा आहे. रोमन साम्राज्यापूर्वी इटलीमध्ये अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे झाली. इ. स. पू. १२००–१००० ह्या काळात इट्रुस्कन लोकांनी टायबर नदीच्या पश्चिमेस आपली वसाहत केलेली आढळते. कालांतराने त्यांची सत्ता दक्षिणेस लेशियम, कँपेन्यापर्यंत व उत्तरेस पठारापर्यंत पसरली होती. ह्या काळात इटलीत एक वैभवशाली संस्कृती नांदली. त्यानंतर मात्र इटलीवर रानटी टोळ्यांची आक्रमणे झाली. पुढे इ. स. पू. ७३० च्या सुमारास ग्रीक लोकांनी इटलीच्या पश्चिम भागात वसाहत केली. विशाल ग्रीस (मॅग्ना ग्रीशा) ह्या भागात ग्रीकांचे वर्चस्व होते. पुढे उत्तर सिसिलीत फिनिशियन लोकांच्या वसाहतींमुळे ग्रीकांच्या विस्तारवादी धोरणास आळा बसला. इ. स. पू. ५१० मध्ये रोमन लोकांनी प्रजासत्ताकाची स्थापना केली व लॅटिन लीगचे नेतृत्व पतकरले. रोमन संस्कृतीच्या अस्तानंतर इटलीच्या राजकीय जीवनात आमूलाग्र बदल झाला.
सोयीसाठी इटलीच्या इतिहासाचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे भाग पाडता येतात :
(१) मध्ययुग : ४७६–११००
(२) पोपसत्ता व राजसत्ता यांचा संघर्षकाळ : ११००–१४००
(३) प्रबोधनकाळ : १४००–१७९५
(४) नेपोलियन व एकीकरणाचा काळ : १७९५–१८७०
(५) आधुनिक काळ : १८७० च्या पुढे
मध्ययुग : इटलीत मध्ययुगाच्या सुरुवातीस गॉथ (व्हिसीगॉथ) व व्हँडॉल ह्या टोळ्यांनी धुमाकूळ घालून रोमन साम्राज्य खिळखिळे केले. व्हँडॉलांनी ४५५ मध्ये रोमवर स्वारी करून रोम बेचिराख केले. त्यांचा सेनापती ओडोव्हेकर याने ऑगस्टस ह्या सम्राटास पदच्युत केले आणि अशा प्रकारे ४७६ मध्ये रोमन साम्राज्य संपुष्टात आले. ओडोव्हेकर हा सुरुवातीच्या काळातील राजा असून त्याने जुन्या रोमन साम्राज्याचा सम्राट म्हणून स्वतःस घोषित केले. त्याचे राज्य पुढे ४९३ मध्ये थीओडोरिक द ग्रेट ह्या ऑस्ट्रोगॉथ टोळीच्या राजाने जिंकले. ५२६ पर्यंत त्याने धीमेपणाने राज्य करून इटलीत शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. ५५२ मध्ये शेवटच्या गॉथ राजाचा पराभव होऊन इटली बायझंटिन साम्राज्याचे मांडलिक राज्य बनले. तथापि ह्या सुमारास लाँबर्डी नावाच्या लोकांनी इटलीच्या रोखाने आगेकूच करून रोमला धडक मारल्याचे दिसून येते. बायझंटिन अमलात (३३०–१०५०) रोम येथे पोपच्या सत्ता दृढ होऊ पाहत होती.
लाॅँबर्डी लोकांनी पो नदीच्या खोऱ्यात ५६८ मध्ये आपले राज्य स्थापले. ते सु. दोनशे वर्षे टिकून होते. ह्याच काळात पोपच्या सत्तेत वाढ झालेली होती. ५९० मध्ये ग्रेगरी द ग्रेट हा पोप झाला. त्याने लाँबर्डींचा रोमचा वेढा उठविला व पोवच्या सामर्थ्याचा खरा पाया घातला. लाँबर्डींच्या वाढत्या सत्तेला आळा घालण्यासाठी तिसरा पोप स्टीव्हेन याने ७५३ मध्ये फ्रँक राजा पेपिन ह्यास बोलाविले. त्याने पोपला लाँबर्डींनी काबीज केलेले प्रदेश मिळवून दिले. पुढे वीस वर्षानंतर त्याचा मुलगा शार्लमेन याने लाँबर्डींचा संपूर्ण पराभव केला. त्यानंतर ८०० मध्ये शार्लमेनला पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट म्हणून पोपने अभिषेक केला.
शार्लमेनच्या ८४३ मधील पराभवानंतर अरबांनी सिसिली पादाक्रांत केली. दहाव्या शतकात इटलीत अनेक छोटे सरदार व अमीर उमराव सत्ताधारी बनले. त्यामुळे अंतर्गत बंडाळी व अस्थिरता निर्माण झाली. ९५१ मध्ये जर्मन राजा पहिला ऑटो द ग्रेट याने इटलीत आपले राज्य स्थापले. बारावा पोप जॉन याने त्याला रोमन सम्राट म्हणून ९६२ मध्ये अभिषेक केला. ऑटोने देशीतील अराजकता काही काळ दूर केली. पोप जॉनच्या गैरवर्तनामुळे ऑटोने त्यास पदच्युत केले. त्यावेळी सम्राटाचे पोपवरील वर्चस्व पूर्णत्वाला पोहोचले होते. अकराव्या शतकात नॉर्मन लोकांनी इटलीवर स्वाऱ्या केल्या. त्यांचा पुढारी रॉबर्ट याला त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे साम्राज्यांतर्गत अधिकार बहाल केले (१०५९). पुढे नॉर्मनांनी अरबांकडून सिसिली जिंकून घेतली.
पोपसत्ता व राजसत्ता यांचा संघर्षकाळ : अकराव्या शतकात पोप आणि पवित्र रोमन सम्राट यांच्यातील संघर्ष वाढीस लागला. त्याचा परिणाम इटलीमधील दोघांचीही सत्ता कमकुवत होण्यातच झाला. त्यामुळे जेनोआ, मिलान, व्हेरोना, प्याचेंत्सा, बोलोन्या, फ्लॉरेन्स, पीसा, व्हेनिस इ. नगरराज्ये अस्तित्वात आली. जेव्हा ११५४ मध्ये फ्रेड्रिक बार्बारोसा (११२५–११९०) ह्या जर्मन राजाने इटलीत प्रथम प्रवेश केला, तेव्हा त्याने तत्कालीन नगरराज्यांचे व पोपचे वर्चस्व कमी करून सम्राटाचे वर्चस्व वाढविण्याचा निश्चय केला. परंतु ११७६ मध्ये इटालियन नगरसंघाने (लाँबडीं लीग) त्याचा पराभव केला. शेवटी ११८३ मध्ये फ्रेड्रिकने ह्या नगरांचे स्वतंत्र अस्तित्व मानेय केले. ११९८ ते १२१६ ह्या काळात तिसरा इनोसंट ह्या पोपने चर्चची सत्ता वाढविली. अर्थातच सम्राटाशी संघर्ष अटळ होता. हा संघर्ष दुसरा फ्रेड्रिक (११९४–१२५०) ह्याच्या काळात शिगेला पोहोचला. फ्रेड्रिकनंतर सम्राटांचे वर्चस्व कमी होऊ लागले. इटलीत फ्रेंचांचे वर्चस्व वाढले परंतु फ्रेंचांच्या गैरवर्तनामुळे सिसिलियन लोकांनी बंडे केली. आठवा पोप बॉनिफेसने (१२३५?–१३०३) पोपसत्ता विस्तृत केली. सिसिली, फ्लॉरेन्स इ. प्रदेशांत हस्तक्षेप करून त्याने चर्चच्या वर्चस्वात भर घातली. परंतु त्याला अनेक शत्रू उत्पन्न झाले. त्यांच्याशी लढण्यासाठी त्याने फ्रेंचांना पाचारण केले. परंतु अंती फ्रेंचांनी त्यालाच बंदिवान केले (१३०३). चौदाव्या शतकात प्रादेशिक राज्यांनी इटलीच्या वैभवात आणि संस्कृतीत भर घातली. परंतु त्याचबरोबर त्यांच्या परस्परस्पर्धा व वैरभाव यांमुळे इटली हा परकीय सत्तांच्या स्पर्धेचा प्रदेश बनला.
प्रबोधनकाळ : ह्या कालखंडात फ्लॉरेन्स व मिलान यांत प्रदीर्घकालीन (१३५०–१४५४) युद्ध झाले. नंतर १४५५ मध्ये मिलान, फ्लॉरेन्स, व्हेनिस आणि नेपल्स यांनी एकत्र येऊन ‘इटालियन संघ’ निर्माण केला. त्याला पोपनेही मान्यता दिली. पंधराव्या शतकातील इटलीच्या एकीकरणाचा हा मोठ्यातील मोठा प्रयत्न होता. कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे तुर्कांचा धोका जास्तच गंभीर स्वरूपाचा झाला. ह्या संघामुळे तो टळला व इटलीत शांतता प्रस्थापित होऊन प्राचीन विद्यांच्या पुनरुज्जीवनास चालना मिळाली.
पंधराव्या शतकात पोपसत्ता जास्त लौकिक स्वरूपाची झाली व विद्येची जिज्ञासा वाढीस लागली. याच काळात नेपल्समध्ये व मेडिची घराण्याच्या सत्तेखाली फ्लॉरेन्समध्ये कला आणि विद्या यांची जोपासना होऊ लागली. अमेरिकेच्या शोधानंतर इटलीवर एकामागून एक परकीय आक्रमणे सुरू झाली. १४९४ मध्ये फ्रान्सचा आठवा चार्ल्स याने इटलीवर आक्रमण केले आणि नेपल्सवरील आपली सत्ता घोषित केली. त्याने ह्यावेळी मिलानच्या बाजूने इटलीवर स्वारी केली. तेव्हा फ्लॉरेन्स व नेपल्स तसेच पोपसत्ता ही एकत्र आली. असंघटित इटली कोणीही जिंकू शकेल, हे चार्ल्सने सिद्ध केले. स्पेन आणि फ्रान्स येथील राजांनी इटलीचा प्रदेश पादाक्रांत करण्यास आरंभ केला. स्पेनच्या पाचव्या चार्ल्सने (पवित्र रोमन साम्राज्याचा तो अधिपती होता) सर्व इटली आपल्या अंमलाखाली आणली. जर्मन आणि स्पॅनिश सैन्याने इटली द्वीपकल्प व रोम शहर उद्ध्वस्त केले. तथापि त्याच्या कारकीर्दीत पुढे १५०० पर्यंत इटलीस राजकीय स्थैर्य व शांतता लाभली. मात्र तेथून पुढे सु. दोनशे वर्षे इटली हा यूरोपमधील राजांचे भक्ष्य व यूरोपची रणभूमी बनला आणि जी थोडी नगरराज्ये इटलीत तग धरून होती, तीही पुढे नष्ट झाली. तथापि वरील काळात कला व ज्ञान ह्या क्षेत्रात प्रगती झालेली आढळते. लिओनार्दो दा व्हींची, मायकेलअँजेलो ह्यांसारख्या कलावंतांमुळे व मॅकिआव्हेलीसारख्या राज्यशास्त्रज्ञांमुळे इटली देश यूरोपचा आदर्श बनला. पुढे १५२१–१७९६ च्या दरम्यान इटलीवर परकीय सत्तांचे वर्चस्व स्थापन झालेले स्पष्ट दिसते. स्पेन व फ्रान्स यांच्यातील सत्तास्पर्धेत इटलीचे महत्त्व असाधारण आहे. स्पेनचा पाचवा चार्ल्स आणि फ्रान्सचा पहिला फ्रान्सिस यांच्यात १५२१ पासून युद्ध सुरू झाले. १५२९ मध्ये चार्ल्सने आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. पोपने चार्ल्सला सम्राट म्हणून अभिषेक केला. फ्रान्स व स्पेन ह्यांमध्ये झालेल्या १५५९ मधील कातो-कांब्रेझी ह्या तहान्वये सिसिली, नेपल्स व मिलान ही राज्ये स्पेनकडे गेली व फ्रान्सने इटलीतील हॅप्सबर्ग घराण्याच्या राजसत्तेचे वर्चस्व मान्य केले. १५४० मध्ये चार्ल्सने मिलान, पार्मा आणि प्याचेंत्सा या राज्यांतसुद्धा हॅप्सबर्ग वर्चस्व प्रस्थापित केले.
वरील काळात ज्ञान व कला या क्षेत्रांत हळूहळू पीछेहाट सुरू झाली. तरीही विज्ञानाच्या क्षेत्रात इटलीने मोठी भर घातलेली दिसून येते.
हॅप्सबर्ग घराण्याच्या कारकीर्दीतील फ्रान्सविरुद्धच्या युद्धात इटलीचे फार नुकसान झाले. १७१३ मध्ये स्पेनची गादी फ्रान्सच्या बुरबाँ घराण्याकडे आली, तेव्हा उत्रेक्तच्या शांतता तहान्वये स्पेनची इटलीतील मालमत्ता ऑस्ट्रियाचा सम्राट सहावा चार्ल्स याला मिळाली. १७२० मध्ये सव्हॉयच्या ड्यूकने ऑस्ट्रियास सिसिली देऊन सार्डिनिया घेतला. १७३४ मध्ये स्पेनला नेपल्सचे राज्य मिळाले. १७३७ मध्ये तस्कनीचा प्रदेश ऑस्ट्रियाकडे आला. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा उठाव झाल्यावर इटलीतील परिस्थिती बदलू लागली. प्रथमतः फ्रेंच क्रांतीविषयी सहानुभूती असलेला वर्ग लवकरच क्रांतिकारकांच्या अतिरेकी धोरणामुळे विरोधी बनला. १७९६ मध्ये नोपोलियनने ऑस्ट्रियास इटलीतून हुसकावून लावले व इटली फ्रान्सचे अंकित राष्ट्र बनले. १७९७ मधील कँपोफार्मिडो या ऑस्ट्रियाबरोबरच्या तहानुसार व्हेनिस ऑस्ट्रियास देऊन उरलेल्या इटलीची पाच नगरराज्यांत विभागणी केली आणि मिलान, जेनोआ, रोम, बोलोन्या व नेपल्स ह्यांना राजधानीचा दर्जा दिला. साहजिकच इटलीत लोकशाहीचे नवे वारे खेळू लागले.
नेपोलियन व एकीकरणाचा काळ : नेपोलियन १८०४ मध्ये सम्राट झाल्यावर इटलीत नेपोलियनची सत्ता सुरू झाली. ह्यावेळी त्याने आपल्या सावत्र भावास तेथील व्हाइसरॉय केले. पुढे त्याने नेपल्सच्या गादीवर जोसेफ ह्या आपल्या मेहुण्यास बसविले आणि पुढे १८११ मध्ये मुलास रोमचा राजा म्हणून जाहीर केले. नेपोलियनचा १८१५ मध्ये पाडाव झाल्यावर ऑस्ट्रियाने पुन्हा लाँबर्डी व व्हिनीशिया हे प्रदेश ताब्यात घेतले व इटलीचे पुन्हा पूर्वीसारखे तुकडे केले. परंतु फ्रेंच क्रांतीमुळे निर्माण झालेले एकीकरणाचे व राष्ट्रीयत्वाचे वारे त्यामुळे जास्तच जोरात वाहू लागले.
परकीय सत्तेला विरोध करण्याकरता व इटलीचे संयुक्त राज्य निर्माण करण्याकरता १८१५ ते १८४८ या काळात अनेक गुप्त संघटना निर्माण झाल्या. १८२० मध्ये नेपल्समध्ये व नंतर पीडमाँटमध्येही क्रांतिकारक उठाव झाला, पण ऑस्ट्रियाच्या मदतीने तो मोडून काढण्यात आला. ऑस्ट्रियाचे दडपशाहीचे धोरण व इटलीतील छोट्या राज्यांची ऑस्ट्रियावरील भक्ती यांमुळे काही काळ इटलीत शांतता नांदू लागली. परंतु ही शांतता वरवरची होती.
फ्रान्समध्ये झालेल्या जुलै १८३० मधील क्रांतीचे पडसाद इटलीतही उठले. बोलोन्यात बंड झाले, ते ऑस्ट्रियाने मोडले. १८३०-३१ नंतर इटलीच्या राजकारणात तीन महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले दिसतात: (१) नेपल्समध्ये दुसरा फर्डिनँड गादीवर आला. त्याच सुमारास सोळावा ग्रेगरी पोप झाला आणि चार्ल्स ॲल्बर्ट सार्डिनियाचा राजा झाला. (२) जुन्या गुप्त संघटना नाहीशा होऊन त्यांची जागा मॅझिनीच्या ‘यंग इटली’ ह्या क्रांतिकारक संघटनेने घेतली. (३) युरोपात फ्रान्सच्या सत्तेचे पुनरुज्जीवन होऊन त्यामुळे ऑस्ट्रियाच्या वर्चस्वावर बंधन पडले.
चार्ल्स ॲल्बर्ट हा आपल्या पूर्वसूरींपेक्षा अधिक उदारमतवादी होता. साहजिकच इतर राज्ये संघटित इटलीचा अध्वर्यू म्हणून त्याच्याकडे पाहू लागली. तथापि ह्यापेक्षा इटालियन लोकांचे अधिक लक्ष आकर्षित केले असेल, तर ते मॅझिनीने. १८३१–१८४६ ह्या काळात मॅझिनीच्या प्रेरणेने देशभक्तिपर लिखाण प्रचंड प्रमाणात लिहिले जाऊ लागले. मॅझिनीचा उद्देश इटलीला ऑस्ट्रियाच्या जाचातून मुक्त करून प्रजासत्ताक स्थापणे हा होता. त्याच्या संघटनेने इतर संघटनांप्रमाणे गुप्त चळवळीचा मार्ग अवलंबिला नाही, तर उघड बंडाचे निशाण उभे केले. ही चळवळ चालू असतानाच यूरोपात १८४८ मध्ये क्रांती झाली. त्यावेळी सार्डिनियाच्या राज्याच्या नेतृत्वाखाली इटलीचे एकीकरण करण्याचा व ऑस्ट्रियास हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान रोममध्ये मॅझिनीच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक राज्य स्थापण्यात आले. पोप पळून गेला, परंतु जुलै १८४९ मध्ये फ्रेंचांनी रोम काबीज करून पोपला पुन्हा रोममध्ये प्रस्थापित केले. व्हेनिसमध्येही बंड झाले, परंतु ऑस्ट्रियनांनी त्याचा बीमोड केला. तथापि सार्डिनियात १८४९ मध्ये गादीवर आलेल्या दुसऱ्या व्हिक्टर इमॅन्युएलने उदारमतवादी धोरण पुरस्कारिले. त्याने इटलीच्या स्वातंत्र्यास पाठिंबा दर्शविला व काव्हूरला पंतप्रधान नेमले.
काव्हूरचा काळ १८४९–१८६१ हा मानावा लागेल. १८५२ मध्ये तो पीडमाँटचा पंतप्रधान झाल्यापासून सार्डिनियाच्या नेतृत्वाखालील इटलीचे एकीकरण करण्याकरिता त्याने अविरत श्रम घेतले. १८५९ मध्ये फ्रान्सच्या मदतीने ऑस्ट्रियाचा त्याने पराभव केला व लाँबर्डी १८५९ मध्ये मुक्त केले. गॅरिबाल्डी आणि त्याच्या हजार सैनिकांनी सिसिली व नेपल्स जिंकून घेतले आणि मध्य इटलीतील राज्येही सार्वमतानुसार सार्डिनियात विलीन झाली. १७ मार्च १८६१ रोजी इटलीचे स्वतंत्र राज्य जाहीर करण्यात आले. इटलीने १८६६ मध्ये प्रशियाशी संगनमत करून ऑस्ट्रो-प्रशियन युद्धास भाग घेतला व ऑस्ट्रियाकडून व्हिनीशिया प्रांत मिळविला. १८७० च्या फ्रँको-प्रशियन युद्धात रोममधील फ्रेंच लष्कर काढून घेण्यात आले तेव्हा इटालियन सैन्याने ते ताब्यात घेतले. रोम इटलीची राजधानी बनले.
आधुनिक काळ : इटलीमध्ये १८७१ ते १९१४ ह्या काळात लोकशाही राज्याचा प्रयोग झाला. इमॅन्युएलचे कार्य पुढे त्याच्या हंबर्ट ह्या वारसाने चालविले. ह्यावेळी एकीकरणाच्या युद्धामुळे इटलीतील अर्थव्यवस्था कोलमडली होती. १८८१ मध्ये मतदानाचा हक्क विस्तृत करण्यात आला. १८८२ मध्ये इटलीने ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याशी त्रिमित्र करार केला. ह्या करारामुळे इटलीला ऑस्ट्रिया किंवा फ्रान्स यांचे भय उरले नाही. ह्या काळात इटलीस यूरोपीय राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. १८९५-९६ मध्ये इटलीने इथिओपियावर (ॲबिसिनिया) स्वारी केली. परंतु तीत इटलीचा संपूर्ण पराभव झाला. इटलीमध्ये युद्धाची परिणती करभार वाढण्यात झाली. १८९८ च्या मेमध्ये अन्नाच्या प्रश्नावरून साऱ्या देशभर उग्र निदर्शने झाली. ही अशांतता दीर्घकाळ टिकून होती. १९०१ ते १९०५ या काळात प्रचंड संप झाले व जाळपोळ झाली. १९०८ मधील भूकंपाने इटलीची आर्थिक स्थिती अधिकच खालावली. ऑक्टोबर १९१२ मध्ये इटलीने तुर्कस्तानकडून ट्रिपोली हस्तगत केली. परंतु ह्या युद्धामुळे इटलीची नाजूक आर्थिक परिस्थिती अधिकच बिघडली आणि करवाढीविरूद्ध प्रचंड आंदोलने व संप घडून आले (मार्च १९१४).
पहिल्या महायुद्धात सुरुवातीला इटलीने तटस्थतेचे धोरण पुकारले. इटलीने एप्रिल १९१५ मध्ये इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांच्याशी तह करून पूर्वीच्या त्रिमित्र कराराचा त्याग केला आणि ऑस्ट्रिया व जर्मनीयांविरुद्ध युद्ध पुकारले. परंतु ह्यात इटलीस यश मिळाले नाही. परिणामी युद्धोत्तर तहात त्यास अत्यंत थोडा फायदा झाला.
पॅरिसच्या शांतता परिषदेतील इटलीच्या अपयशामुळे व युद्धोत्तर काळातील आर्थिक हलाखीमुळे देशात अस्थिरता निर्माण झाली. आत्यंतिक राष्ट्रवादातून फॅसिझमचा उदय झाला व त्याचे नेतृत्व लवकरच मुसोलिनीच्या हाती गेले. त्याने राष्ट्रवादी लोकांची संघटना मार्च १९१९ मध्ये स्थापन करून त्यास ‘फॅसिस्ट’ हे नाव दिले व त्यांच्या विचारसरणीस फॅसिझम हे नाव रूढ झाले. अंतर्गत कारवाईत फॅसिस्टांनी खून, दहशत यांचा संपूर्ण उपयोग करून घेतला. फॅसिस्ट पक्ष १९२२ च्या सुमारास एवढा बलवान झाला की, हळूहळू त्याने इटलीतील इतर भागावर ताबा मिळविण्यास सुरुवात केली आणि ऑक्टोबरमध्ये तर त्यांनी प्रत्यक्ष रोमवर चाल केली. तिसऱ्या व्हिक्टर इमॅन्युएलने त्यांचे नेतृत्व स्वीकारून मुसोलिनीस पंतप्रधान केले व शासकीय सत्ता त्याच्या हातात दिली. पुढे तर त्याने स्पेन व अल्बेनिया (१९२६), हंगेरी (१९२७), इथिओपिया व ग्रीस (१९२९) व ऑस्ट्रिया (१९३०) ह्या राष्ट्रांशी मित्रत्वाचे करार केले. त्याने १९३० मध्ये लष्कर वाढविण्याचा निर्णय घेऊन नौदलात वाढ करण्यास प्रारंभ केला. पोपचा प्रश्न १९२९ मध्ये सामोपचाराने सोडविण्यात त्याने यश मिळविले. पोपचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले. पोपनेही रोमवरील आपला हक्क सोडून दिला. १९३०–१९३५ ह्या काळात इटलीत आर्थिक मंदीची लाट उसळली.
इटलीने इथिओपियावर १९३५ मध्ये स्वारी करून राष्ट्रसंघाचा रोष ओढवून घेतला. १९३६ च्या स्पेनच्या यादवी युद्धात इटलीने बंडखोरांच्या बाजूने भाग घेतला. तेव्हा फ्रान्स, इंग्लंड यांना इटलीच्या वाढत्या सत्तेविषयी शंका निर्माण झाली. सबब इटलीने त्याच वर्षी जर्मनीशी समझोता करून फ्रान्सच्या वर्चस्वाला धक्का दिला. त्याच वर्षी इटलीने जर्मनी व जपान यांच्याबरोबर कम्युनिस्टविरोधी तह केला. १९३९ मध्ये इटलीने अल्बेनिया काबीज केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस (सप्टेंबर १९३९) इटलीने आपली तटस्थता जाहीर केली. जून १९४० मध्ये इटलीने फ्रान्स आणि इंग्लडविरुद्ध युद्ध पुकारले. सप्टेंबरमध्ये जर्मनी, इटली व जपान यांनी परस्परांना दहा वर्षे संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. इटलीने २७ ऑक्टोबर १९४० रोजी ग्रीस उद्ध्वस्त केले व जर्मनीची मदत मागितली आणि पुढे डिसेंबर १९४१ मध्ये अमेरिकेविरुद्द युद्ध पुकारले. त्यानंतर १९४६ च्या सुरुवातीस आफ्रिकेतील इटलीच्या वसाहती संपुष्टात आल्या आणि इटलीचे युद्ध सामर्थ्य संपले. मुसोलिनीस राजीनामा देणे भाग पडले. फेब्रुवारी १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांनी इटलीचा घेतलेला बहुतेक प्रदेश इटलीस परत केला. इटलीत जून १९४६ मध्ये सार्वजनिक मतानुसार प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. युद्धनुकसानभरपाई म्हणून इटलीकडून मोठी रक्कम दोस्त राष्ट्रांनी घेण्याचे ठरले.
इटलीला १९४८ च्या जूनमध्ये मार्शल योजनेनुसार आर्थिक पुनर्रचनेसाठी मदत मिळाली. एप्रिल १९५० मध्ये इटलीने नाटो करारावर सही केली व त्याच वर्षी इटलीला संयुक्त राष्ट्रे या संघटनेने सोमालीलँडचे विश्वस्त नेमले.
नव्या संविधानानुसार (डिसेंबर १९४७) सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून १९४८ च्या निवडणूकीत ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले. परंतु १९४६ ते १९६० ह्या काळात नूतन फॅसिस्टांचा व कम्युनिस्टांचाही उदय झाला. इटालियन सोशल मुव्हमेंट किंवा ‘मिसिनी’ या नावाने हे नूतन फॅसिस्ट ओळखले जाऊ लागले. दिवसेंदिवस त्यांचे वर्चस्व वाढीस लागले आहे. अविवेकी राष्ट्रवादाचा अतिरेक होऊ लागला असून कम्युनिस्ट व इतर डाव्यांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाल्यावर सर्व डावे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जुलै १९६० अखेरीस आमींतोरे फानफानी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार प्रस्थापित केले. त्यानंतर इटलीत वारंवार राजकीय सत्तांतरे होत राहिली. जून १९७२ मध्ये ज्यूल्यो आंद्रेऑत्ती यांनी पंतप्रधानकीचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी रूमर यांनी जुले १९७२ मध्ये संमिश्र सरकार बनविले. त्यात ख्रिश्चन डेमोक्रॅट, सोशॅलिस्ट, सोशल डेमोक्रॅट व रिपब्लिकन हे पक्ष सहभागी होते.
देशपांडे, अरविंद
राजकीय स्थिती : इटली हे सार्वभौम प्रजासत्ताक राज्य आहे. पूर्वी इटलीमध्ये लोकसत्ताक नगरराज्ये अस्तित्वात होती. त्यानंतर रोमचे साम्राज्य आले. यूरोपात ग्रीसच्या खालोखाल इटलीची राज्यपद्धती जुनी आहे. सद्यःस्थितीत दाट लोकसंख्या, मध्यवर्ती भौगोलिक स्थान, औद्योगिक प्रगती व रोमचा सांस्कृतिक वारसा ह्यांमुळे त्यास जागतिक राजकारण्यात व विशेषतः मध्य व पश्चिम यूरोपच्या राजकारणात आगळे स्थान प्राप्त झाले आहे.
१० जून १९४६ रोजी केसेशन कोर्टाने २ जून १९४६ रोजी झालेल्या जनमतनिर्देशाच्या बहुमताची घोषणा केली आणि इटली हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. शेकडो वर्षे अस्तित्वात असणारी राजेशाही संपुष्टात आली. चार्ल्स ॲल्बर्टचे संविधान रद्द करण्यात येऊन नवीन संविधान बनविण्यासाठी संविधान समितीची स्थापना झाली. दरम्यान दे निक्कोलो हा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला. संविधान समितीने तयार केलेल्या संविधानास २२ डिसेंबर १९४७ रोजी मान्यता मिळून २ जानेवारी १९४८ पासून हे संविधान कार्यवाहीत आले. संविधान मुख्यत्वे इंग्लंड, अमेरिका व फ्रान्स ह्यांच्या राज्यपद्धतींच्या आधारे तयार करण्यात आले. त्याचे एकूण १८ विभाग असून १३९ अनुच्छेद आहेत. संविधानाने सर्वांना समता जीवित, वित्त व स्वातंत्र्य ह्यांची हमी भाषणस्वातंत्र्य वृत्तपत्रस्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य इ. दिलेले आहे. संविधानानुसार इटली हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र असून राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख म्हणून निवडून आल्यावर सात वर्षे काम पाहतो. त्याची निवड दोन्ही सभागृहांतर्फे केली जाते. येथे द्विसदनी राज्यपद्धती असून वरिष्ठ सभागृह (सीनेट) व कनिष्ठ सभागृह (चेंबर ऑफ डेप्युटीज) ह्यांच्या सहकार्याने राज्यकारभार चालतो. कनिष्ठ सभागृहातील सदस्यांची संख्या ६३० (१९७०) असून उमेदवार म्हणून उभे राहणाऱ्या नागरिकास २५ वर्षे वयाची मर्यादा घातली आहे. ८०,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या मतदार संघातून त्याची कनिष्ठ सभागृहावर सभासद म्हणून निवड होते. कनिष्ठ गृहाची मुदत ५ वर्षे असून २१ वर्षांवरील सर्व नागरिकांस मतदानाचा अधिकार आहे. मात्र सीनेटच्या निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारास किमान ४० वर्षे वयाची मर्यादा असून मतदाराचे वय किमान २५ वर्षे असले पाहिजे, अशी अट आहे. सीनेटची मुदत सहा वर्षे आहे. राष्ट्राध्यक्षास सीनेटचे पाच सभासद नेमण्याचा अधिकार आहे. तसेच माजी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व अशा प्रकारचे उच्च पदाधिकारी संविधानानुसार सीनेटचे सभासद होतात. सीनेटचा मतदारसंघ साधारणतः दोन लक्ष मतदारांचा असावा लागतो.
संविधानाप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्राध्यक्षाची निवड होते. त्याची कमीतकमी वयोमर्यादा ५० वर्षे असते. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देणे, वटहुकूम काढणे, कायदेमंडळ बरखास्त करणे वा बोलविणे, नव्या निवडणूका घेणे, सर्वक्षमा जाहीर करणे वगैरे जबाबदारीचे अधिकार त्यास असून सर्व लष्करी दलांचा तो प्रमुख असतो. त्याने नियुक्त केलेल्या व कायदेमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळामार्फत येथील राज्यकारभार चालतो.
द्विपक्षीय लोकशाही अद्यापि ह्या देशात रुजावयाची आहे. सध्या देशात एकूण प्रमुख नऊ राजकीय पक्ष असून त्या पक्षांचे जहाल व मवाळ असेही आणखी काही गट आहेत. तथापि अद्यापपर्यंत कोणताही पक्ष निर्विवाद बहुमताने दीर्घकाळ सत्तेवर राहू शकलेला नाही, असे वारंवार होणाऱ्या राजकीय सत्तांतरांवरून तसेच अलीकडील, १९७० व १९७२ मधील संमिश्र मंत्रिमंडळांवरून स्पष्ट होते.
राज्यकारभाराच्या सोयीसाठी रीजन्स, प्रॉव्हिन्सिस व कम्युन्स अशी प्रादेशिक विभागणी केली असून १९४८ च्या संविधानानुसार २० स्वायत्त रीजन्स असावेत, असे ठरले होते तथापि १९७० पर्यंत फक्त पाच स्वायत्त रीजन्स अस्तित्वात आले असून उरलेल्यांची हळूहळू कार्यवाही होत आहे. वरील स्थानिक विभागांचा कारभार विधिमंडळे, प्रादेशिक कारभार-मंडळे व त्यांचे अध्यक्ष यांच्यामार्फत चालतो. प्रादेशिक प्रश्नांच्या बाबतींत हे प्रदेश व त्यांची विधिमंडळे बहुतांशी स्वतंत्र आहेत. केंद्र सरकारने नेमलेला एक आयुक्त, केंद्र व हे प्रदेश यांमधील दुवा म्हणून काम करतो. मात्र पोलीस, सैन्यदल, रेल्वे, टपाल आदींवर वरील प्रदेशांचा कोणताही अधिकार पोहोचत नाही. पाच विशेष रीजन्सची सरकारे १९४८ ते ६८ च्या दरम्यान अस्तित्वात आली पण त्यांना मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ती म्हणजे सिसिली, फ्रीऊली-व्हेनेत्स्या जूल्या, सार्डिनिया, व्हाले दा ऑस्टा, त्रेनतीनो-आल्तो आदीजे ही होत. या रीजन्समध्ये एकूण ९२ प्रांत असून सु. ८,००० कम्युन्स समाविष्ट केलेले आहेत. लहानमोठ्या शहरांसाठी प्रातिनिधिक स्थानिक स्वराज्यसंस्थांची सोय आहे.
सर्वांच्या कष्टावर आधारलेली लोकशाही, असे ह्या प्रजासत्ताकचे संविधानात वर्णन केलेले असून लोकांची सत्ता ही सार्वभौम मानलेली आहे. कायद्याने वंश, धर्म, भाषा, लिंगभेद इत्यादींच्या आधारे व्यक्तिव्यक्तींत भेदाभेद केला जात नाही. फाशीची शिक्षा कायद्याने रद्द केलेली आहे. राष्ट्राध्यक्ष आपली मुदत संपण्यापूर्वी सहा महिने सोडून केव्हाही दोन्ही सभागृहे बरखास्त करू शकतो. संविधानातील अनुच्छेद सात प्रमाणे कॅथलिक चर्च व राज्यसंस्था ह्यांचे परस्पर अधिकार स्पष्ट केलेले असून दोघेही आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र व सार्वभौम मानण्यात आलेले आहेत.
न्यायव्यवस्था : संविधानाप्रमाणे १५ न्यायाधीशांचे एक कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट असून प्रत्येकी पाच न्यायाधीशांची नेमणूक अनुक्रमे राष्ट्राध्यक्ष, संसद व केसेशन कोर्टाचे न्यायाधीश ह्यांच्याकरवी होते. संविधानात्मक बाबी व तत्संबंधीचे सर्व दावे या न्यायालयांमार्फत निकालात काढतात. सर्वोच्च न्यायालय हे रोममध्ये असून त्यास कोर्टांत ऑफ केसेशन म्हणतात. न्यायव्यवस्थेसाठी त्याची तेवीस अपील कोर्टांत विभागणी केली आहे. त्यास संविधानासंबंधीचे खटले वगळता इतर सर्व न्याय देण्याचे अधिकार आहेत. इटलीमध्ये किरकोळ कायदेशीर खटले हे कन्सिलिएत कोर्टांमार्फत मिटविले जातात. जिल्हा अपील कोर्टांखालोखाल मँडामेंटी कोर्टे स्थापन केलेली आहेत. त्यांना ‘प्रेटुरा’ असे म्हणतात. त्यांना न्यायाधीशाचे अधिकार असतात.नियुक्त विभागावर अधिकार असलेली १५४ निवाडा मंडळे आहेत, त्यांशिवाय ज्युरीच्या समोर न्यायदान होणारी ९१ व अपील कोर्टे २४ आहेत. याखेरीज विशिष्ट कार्यक्षेत्रापुरती प्रशासकीय व लष्करी न्यायालये स्थापन केलेली आहेत. याशिवाय संविधानात तरतूद नसतानाही कित्येक खास न्यायालये अस्तित्वात आहेत. एकंदरीत इटलीतील न्यायव्यवस्था एकात्म असून प्रत्येक न्यायालय एकसंघ राष्ट्रीय व्यवस्थेचा घटक असते.
संरक्षण : इटलीच्या अंमलाखालील बहुतेक वसाहती १९४७ मध्ये संपुष्टात आल्या. शांततातहानुसार इटलीच्या लष्करात आमूलाग्र कपात करण्यात आली. मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीत २१ ते ५५ वर्षे वयाच्या सर्व पुरुषांना सैन्यातील नोकरी सक्तीची होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास इटलीमध्ये सु. पंधरा लक्ष पायदळ, प्रत्येकी चाळीस हजारांचे नौदल व हवाईदल आणि पन्नास हजार लष्करी पोलीस एवढे प्रचंड सेनादल व तदानुषंगिक युद्धनौका, विमाने, रणगाडे, विनाशिका, पाणतीर, तोफा इ. युद्धसाहित्य होते. परंतु वरील तहानंतर इटलीस पाणतीर, अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, विनाशिका वगैरे तयार करण्याची बंदी घालण्यात आली. एवढेच नव्हे तर वरील लष्करी सामर्थ्यातही त्यास सक्तीने कपात करावी लागली. तथापि १९५८ नंतर इटलीने पुन्हा आपली संरक्षणाची फळी भक्कम करण्यास प्रारंभ केला असून इटली नाटोचा सभासद आहे. त्याच सुमारास तो संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला. त्याच्या पायदळात पाच इन्फन्ट्री विभाग व दोन आधुनिक शस्त्रधारी विभाग तयार झाले आहेत. एकूण ३०० जेट विमाने व काही जुनी विमाने हवाईदलात आहेत. नौदलात ३ क्रूझर्स, २ डिस्ट्रॉय लिडर्स, ५ विनाशिका व पन्नासहून अधिक युद्धनौका, तसेच ४ पाणबुड्या, ७० सुरुंगशोधक नौका व एक लाख टनांपेक्षा जास्त ओझे वाहणाऱ्या काही साहाय्यकारी नौका ह्यांचा समावेश होतो. इटलीची भूसेना, हवाईदल व नौदल अनुक्रमे ३,०६,६००, ७०,००० व ४१,८०० होते (१९७३). इटलीच्या एकूण अर्थसंकल्पातील सु. एक पंचमांश खर्च संरक्षणावर केला जातो ह्याशिवाय अमेरिका लष्करी दृष्ट्या इटलीस सढळ हाताने मदत करीत आहे.
देशपांडे, सु. र.
आर्थिक स्थिती : रोमन साम्राज्यानंतर इटलीची आर्थिक स्थिती ढासळतच गेली. प्रबोधनकाळानंतरही इटलीत आर्थिक दृष्ट्या फारशी प्रगती झाली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत इटली यूरोप खंडातील मागासलेल्या कृषिप्रधान देशांत मोडत असे. पहिल्या महायुद्धामुळे इटलीची आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने फॅसिस्ट अर्थव्यवस्था आली. थोड्या आर्थिक सुधारणा झाल्या परंतु दुसऱ्या महायुद्धाने देशाची आर्थिक घडी पार कोलमडून टाकली व इटालियन चलनाची किंमत पूर्णपणे गडगडली. त्यातच युद्धाच्या नुकसानभरपाईचा ताण देशावर पडला. नवीन चलन १९४७ पासून स्थिरावले. खनिजसंपत्तीची वाण, अपुरी शक्तिसाधने, डोंगराळ प्रदेश, दळणवळणातील अडचणी व कर्जबाजारीपणा असतानाही ९५० नंतर सरकारने अवलंबिलेल्या योजना, औद्योगिक धोरण, परकीय मदत, प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न इत्यादींमुळे उद्योगप्रधान देशांत इटलीची गणना होऊ लागली. राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ, कर्जफेड, दरडोई उत्पन्नात वाढ, बेकारीतील घट या गोष्टी त्यामुळेच शक्य झाल्या. १९०१ मध्ये ६० टक्के लोक कृषिधंद्यात होते, ते १९५१ मध्ये ४२ टक्के, तर १९६७ मध्ये चोवीस टक्क्यांवर आले. राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा १९५० मध्ये ३२% होता, तो १९६० मध्ये २२% झाला. १९३८ ते १९६० दरम्यान औद्योगिक वाढ मात्र तिपटीने झाली. मात्र या औद्योगिक वाढीतही इटलीच्या उत्तर व दक्षिण भागांत तफावत आढळते. इटलीतील ४४% लोक, ६५% उद्योगकामगार व ७१% भांडवल उत्तरेत तर ३७% लोक व ६% भांडवल दक्षिणेत आहे. जगात गंधक उत्पादनात इटलीचा दुसरा क्रमांक असून पाऱ्याच्या उत्पादनात व निर्यातीत पहिला आहे. व्यापारी जहाजवाहतुकीतही इटलीचा क्रमांक जगात आठवा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेचे कार्यालय रोम येथे आहे. यूरोपीय सामाईक बाजारपेठ, यूरोपीय कोळसा व पोलाद मंडळ व आंतरराष्ट्रीय अणुशक्ती आयोग यांसारख्या संघटनांच्याद्वारे इटलीने आपला आर्थिक पाया भक्कम केला आहे.
शेती : इटलीच्या एकूण जमिनीपैकी ७५% जमीन डोंगराळ असून १९०७ मध्ये ३९·७% लागवडीयोग्य, १७·४% गवताळ, ९·७% फळझाडांखाली, २०·५% जंगलयुक्त व ३·४% पडीक होती. पिकांची विविधता व उत्पन्न उत्तर इटलीमध्ये जास्त असून गहू, तांदूळ, भाजीपाला, गुरेढोरे या दृष्टीने तो प्रदेश समृद्ध आहे. दुय्यम धान्ये ऑलिव्ह इ. बाबतीत दक्षिण इटलीचा भाग बरा आहे. दक्षिण इटलीतील जमीन चुनखडीची व हलक्या प्रतीची असून फक्त ज्वालामुखींच्या जवळपास जमीन सुपीक आहे. शिवाय दक्षिण इटलीत शेतजमिनीची धूप जास्त होते.सामान्यपणे उत्तरेकडील शेती आधुनिक तर दक्षिणेकडील शेती परंपरागत आहे. सार्डिनियामध्ये मेंढपाळी व सिसिलीमध्ये फळबागा महत्त्वाच्या आहेत. १९७० मध्ये इटलीतील ५८·६% शेती स्वतः जमीनमालकच करीत असत. ३४% मजुरीने, ५·१% वाट्याने व २·३% इतर प्रकारे कसली जात असे. १९५० च्या जमीनसुधारणा कायद्याने ८ लक्ष हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने संपादन केली व १९६२ मध्ये ६,३४,००० हे. जमीन वाटण्यात आली. १९६१ सालापासून ‘पियानो वर्द’ या नावाची ५५० अब्ज लिरेंची एक पंचवार्षिक योजना आखली असून शेतीउत्पादन वाढविणे, मजुरांचे वेतन वाढविणे, यांत्रिकीकरण करणे, व वाटणी पद्धती नाहीशी करणे यांवर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय किनाऱ्यावरील दलदलीचे प्रदेश कमी करणे, शेतजमिनीचे धुपेपासून संरक्षण करणे, जलसिंचन योजना पूर्ण करणे, ग्रामीण भागातील बेकारांची नवीन उद्योगधंद्यांत व्यवस्था लावून देणे इ. गोष्टी या योजनेत समाविष्ट आहेत. इटलीतील पिकांमध्ये गहू प्रमुख आहे. पोच्या खोऱ्यात होणारा बराच तांदूळ निर्यात होतो. याशिवाय येथे मका, बार्ली, ओट, राय, बटाटे, तंबाखू, वाटाणे, घेवडा, बीट, टोमॅटो व भाजीपाला ही पिके होतात.
इटलीतील फळबागांना बरेच महत्त्व आहे. दक्षिणेकडील व सिसिलीमधील लिंबे व त्या जातीची फळे यांपासून इटलीला बरेच परकी चलन मिळते. त्यानंतर दुसरा क्रम ऑलिव्हचा येतो. त्याचे तेल खाण्यासाठी सर्व इटलीत वापरले जाते. द्राक्षांची लागवड सर्वत्र होते. त्यांपासून प्रसिद्ध इटालियन मद्ये तयार करतात. याशिवाय येथे सफरचंद, पेअर, पीच, अंजीर, बदाम, कलिंगडे इ. फळे मोठ्या प्रमाणावर होतात. नैसर्गिक रेशमासाठी तुतीच्या झाडाची पैदास लाँबर्डी व पूर्व किनारा येथे फार होत असे परंतु आता हे उत्पादन मागे पडत चालले आहे.
इटलीत १९७१ मध्ये सु. ८८ लक्ष गुरे, ९० लक्ष डुकरे, ८९ लक्ष शेळ्यामेंढ्या, २·७ लक्ष घोडे, २·६३ लक्ष गाढवे व १·७४ लक्ष खेचरे होती. गाईच्या दुधापासून चीज बनवितात. येथील काही चीजप्रकार जगप्रसिद्ध आहेत.
उद्योग : इटलीमध्ये काही थोडे प्रचंड उद्योगधंदे आणि बारीकबारीक उद्योग करणारे शेकडो छोटे कारखाने दिसून येतात. कापडविणण्याचा उद्योग हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामध्ये कापसाचे सूत, कापड, कृत्रिम रेशीम आणि कापड तसेच ज्यूटचा धागा, लोकरीचे धागे व कच्चे रेशीम असा क्रम लागतो. १९७१ मध्ये इटलीत ८६३ सूतगिरण्या, ४३ लक्ष चात्या व ७४,५६७ माग होते. रेशीम उद्योगात ७,७७,०३२ चात्या व २०,१५० भाग होते. कच्च्या रेशमाचे उत्पादनही महत्त्वाचे असून कृत्रिम धाग्याचे उत्पादन ३१ गिरण्यांतून होत होते. लोकरी कापडाच्या २३८ गिरण्या असून त्यांत २१,८९० माग होते. रासायनिक उद्योगधंद्यात १९७१ मध्ये ४९·६३ लक्ष टन सल्फ्युरिक ॲसिड, १४·७ लक्ष टन अमोनिया,१२·६३ लक्ष टन सुपरफॉस्फेट इतके उत्पादन झाले. याशिवाय येथे मोटारी, स्कूटर्स, टंकलेखनयंत्रे, शिवणयंत्रे, गणनयंत्रे यांसारख्या वस्तूंचे उत्पादन महत्त्वाचे आहे. बहुतेक उद्योगधंदे मिलान-तूरिन-जेनोआ या औद्योगिक शहरांच्या त्रिकोणात वसलेले आढळतात. देशाच्या १% क्षेत्र असलेल्या मिलान प्रांतात १४% कारखाने आहेत. तूरिन येथे मोटारी जेनोआ व पाँतेंदेरा येथे स्कूटर्स बारी येथे पोलाद नेपल्स येथे जहाजबांधणी मिलान येथे कापड कॉमो येथे रेशीम ब्येल्ला व बेर्गामो येथे लोकर जेनोआ, मिलान व तूरिन येथे इंजिने, विद्युत्उपकणे व गणनयंत्रे असे केंद्रीकरणाचे स्वरूप आढळते. यांशिवाय ह्या भागात अन्नपदार्थ, फर्निचर, पादत्राणे, कागद इ. विविध उद्योगधंदे विखूरलेले आहेत. जलविद्युत्शक्तीचा व नैसर्गिक वायूचा पुरवठा, जेनोआसारख्या बंदराचा उपयोग, आल्प्स पर्वतामधून फ्रान्स व मध्ययूरोपकडे असलेल्या दळणवळणाच्या सोई, कुशल कारागीर, मजूर पुरवठा, धाडसी उद्योगपती आणि प्रगतिपर शेती असी या केंद्रीकरणाची अनेक कारणे आहेत. फियाट मोटार कंपनी, पायरेली रबर कंपनी, स्निआव्हिस्कोसा कापड उद्योगसमूह, ऑलिव्हेट्टी यंत्रे, एडिसन वीजउद्योग आणि माँटीकॅटिनी रासायनिक उद्योगसमूह इ. जगप्रसिद्ध कंपन्या या भागात आहेत. इटलीतील मोटारींच्या उत्पादनापैकी ८५% मोटारी फियाट तयार करते. १९६७ मधील आकड्यांनुसार इटलीत रोज सु. ४,००० मोटारी, २,३०० गणनयंत्रे व २,२०० शिवणयंत्रे तयार होत. कलाकुसरीचे व्यवसाय रोम, नेपल्स, व्हेनिस, फ्लॉरेन्स अशा इतिहासप्रसिद्ध शहरांतून विखुरलेले आहेत. फ्लॉरेन्समधील जवाहिरांच्या आणि संगमरवरी वस्तू व्हेनिसच्या भरतकामाच्या, विणलेल्या, काचेच्या, कातडी वस्तू आणि रंगीत झिलईची मातीची भांडी आल्प्समधील लाकडी कोरीव वस्तू तसेच नेपल्सजवळील पोवळ्याच्या वस्तू या जगप्रसिद्ध आहेत.
उद्योगधंद्यांमध्ये सु. ९४ लाख कामगार गुंतलेले आहेत. ह्यांपैकी १९६१ च्या आकडेवारीनुसार खाणकामात १%, अन्न व तंबाखू ४·४%, कापड ५·९%, कपडे, पादत्राणे व कातडीकाम ५·८%, इंजिनियरिंग ११·४%, धातुकाम २%, रसायने, रबर व कागद ४%, बांधकाम ८%, वाहतूक, दळणवळण ७·५%, व्यापार २४%, बँक, विमा २·२%, वीज, गॅस, पाणीपुरवठा १% व बाकीचे इतर उद्योगांत होते. १९५० मध्ये बेकारांची संख्या ३० लाखांचे आसपास होती ती १९६१ मध्ये १० लाखांनी खाली आली. चौदा वर्षाखालील कोणासही कारखान्यात नोकरीस घेतले जात नाही. आठवड्याचे कामाचे तास ४८ असतात. औद्योगिक मजुरांच्या एकूण चार प्रमुख संघटना असून त्यांची १९६१ मधील सभासद संख्या ८६,६२,१७१ होती समस्त इटालियन कामगार संघ (सी. जी. आय. एल.) ह्या कम्युनिस्ट वर्चस्वाखालील संघटनेचे ३६ लाखांवर सभासद होते.
देशापुढील प्रश्न सोडविण्यासाठी व्यापार वाढविणे हाच उपाय समजून इटलीने ‘इ. इ. सी.’ (यूरोपीय सामाईक बाजारपेठ) व ‘एफ्टा’ (यूरोपियन फ्री ट्रेड ॲसोसिएशन) या संघटनांशी सहकार्य केले आहे. अंतर्गत व्यापाराच्या दृष्टीने जवळ जवळ ३३% उलाढाल ही प्रांतांच्या राजधान्यांतून होते. मिलान हे प्रमुख व्यापारी केंद्र असून त्याखालोखाल रोम, जेनोआ, नेपल्स, तूरिन ही शहरे येतात. मिलान आणि तूरिनसाठी जेनोआ हे बंदर व मध्य इटलीसाठी नेपल्स हे बंदर महत्त्वाचे आहे. त्यामानाने अँकोना, बारी, ब्रिंडझी ही दक्षिणेकडील बंदरे छोटी आहेत.
युद्धोत्तर काळात इटलीचा व्यापार खूपच वाढला असला तरी अद्यापही निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे. आयातीमध्ये खनिज तेल, मका, लाकूड, लोकर लोखंड, तांबे इ. धातू कोळसा, वनस्पती तेले, कागद, वाहने, धान्य, मांस, अवजड यंत्रे इत्यादींचा अंतर्भाव होतो. १९६९ च्या निर्यातीमध्ये कापड ७%, कपडे ७%, रसायने ७%, मोटारी, स्कूटर्स वगैरे ८%, वीज, विद्युत् उपकरणे, टंकलेखन यंत्रे, गणनयंत्रे इ. २४%, फळे व भाजीपाला ६%, पेट्रोलियम पदार्थ ५% व द्राक्षे, कलाकुसरीच्या वस्तू, चीज, अन्नपदार्थ, मद्य, इत्यादींचा समावेश होतो. १९६८ मध्ये आयातीपैकी ३५% इ. इ. सी देशांतून, १२·२% एफ्टा देशांतून व ६·७% पूर्व यूरोपीय देशांतून झाली होती. निर्यातीपैकी ३९·२% इ. इ. सी. देशांकडे, १५·५% एफ्टा देशांकडे व ५·३% पूर्व यूरोपकडे झाली होती. १९६९ मध्ये इटलीमधील आयात ७,७८१ अब्ज लिरे व निर्यात ७,३३१ अब्ज लिरे इतकी होती. आयातनिर्यातीमधील फरक इटालियन जहाजवाहतुकीच्या उत्पन्नातून, हौसी प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून, परदेशातील इटलीच्या लोकांकडून येणाऱ्या पैशातून आणि इतर सेवामार्गांनी भरून काढला जातो. १९२३ पासून राष्ट्रीय आयुर्विमा कंपनीस अथवा सरकारने परवानगी दिलेल्या कंपन्यांनाच आयुर्विमा-व्यवसाय करता येतो. १९६६ मध्ये इटलीत अशा एकूण १६४ कंपन्यांपैकी ५१ परदेशी होत्या. विम्याचा प्रचार खेड्यापाड्यांपर्यंत झालेला आहे.
इटलीमघ्ये लिरा हे अधिकृत चलन आहे. १९६८ मध्ये १५०० लिरे = १ पौंड स्टर्लिंग, ६२४·२५ लिरे = १ डॉलर किंवा ८३·३ लिरे = १ रुपया होता. बँका डी इटालिया या नावाची मध्यवर्ती बँक असून तिचा सर्व चलनव्यवहारावर ताबा आहे.
दळणवळण : रोमन साम्राज्यामध्ये सैन्याच्या वाहतुकीसाठी काही रस्ते तयार केलेले होते. १८३९ साली नेपल्स ते पोर्तीची ही ८ किमी. रेल्वे बांधण्यात आली. १९७१ मध्ये एकूण रेल्वेमार्गांची लांबी २०,२३९ किमी. होती. त्यांपैकी १६,१०० किमी. सरकारी मालकीची असून त्यांपैकी ८,१७१ किमी. मार्गाचे विद्युतीकरण बाकी होते.
पक्क्या व चालू सडकांची एकूण लांबी २,८६,७८४ किमी. असून त्यांपैकी ४३,६३५ किमी. राष्ट्रीय हमरस्ते, ९३,१४२ किमी. राज्यरस्ते व १,४५,६६५ किमी. इतर रस्ते आहेत. इटलीमधील, विशेषतः दक्षिणेकडील द्वीपकल्पातील व सार्डिनिया व सिसिलीमधील, वाहतूक मुख्यत्वेकरून मोटारनेच होते. १९७० मध्ये १,०२,०९,०४५ खाजगी मोटारी, ३३,१४० बस, ८,९०,५०७ मालमोटारी, ३७,११,९०० मोटार सायकली व इतर वाहने होती.
पो नदी, तिचे कालवे, सरोवरे व व्हेनिसजवळचा प्रदेश ह्या ठिकाणी जलवाहतूक चालते. जलमार्गांची लांबी १९६९ मध्ये १९३३ किमी. होती. त्यांपैकी ८४९ किमी. लांबीची वाहतूक कालव्यांतून होत असे. सिसिली आणि सार्डिनिया यांना जोडणारी सागरी जलमार्गाची वाहतूक नियमित आहे. इटालियन व्यापारी जहाजांचे १९७१ मधील एकूण टनेज ८०,६०,७६० असून त्यामधील जहाजांची संख्या ४,२३५ होती. जगात व्यापारी जहाजांचे बाबतींत इटलीचा क्रम आठवा लागतो. बहुतेक सागरी वाहतूक नेपल्स, जेनोआ व व्हेनिस या बंदरांतून होते. अंतर्गत विमान वाहतूक आणि परदेशी विमानवाहतूक ही ॲलिटालिया या एकमेव कंपनीतर्फे चालते. देशात २१ आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय व ७५ क्लबांचे विमानतळ आहेत.
पोस्ट आणि तार ही खाती सरकारकडे असून नभोवाणी आणि दूरचित्रवाणी यांवर बऱ्याच अंशी सरकारी नियंत्रण आहे. १९७१ मध्ये एकूण रेडिओंची संख्या १४,४३,८६०, दूरचित्रवाणीयंत्रांची संख्या १,१८,७५,४६०, दूरध्वनियंत्रांची संख्या १,०३,२१,००० होती. देशात १३,११९ डाकघरे व २६,७५९ किमी. लांबीच्या तारायंत्री तारा होत्या.
लोक व समाजजीवन : इटालियन लोकात अनेक वंशांचे मिश्रण आहे तथापि ईशान्य इटलीतील लोक उंच असून रुंद डोक्याचे व गोरे, वायव्य भागातील मध्यम उंचीचे व मध्यम गोरे आणि दक्षिणेकडील व बेटांतील कमी उंचीचे, लांबट डोक्याचे व कमी गोरे आहेत. इटलीतील पहिली शिरगणती १८७१ मध्ये झाली. त्यावेळी लोकसंख्या २,७५,७७,६४० होती. १९११ मध्ये ती ३,३३,७०,१३८ १९५१ मध्ये ४,७५,१५,५३७ १९६१ मध्ये ५,०४,६३,८६२ व १९७० मध्ये सु. ५,४३,०२,०१९ इतकी होती. यावरून देशाची लोकसंख्या दरवर्षी सु. ४ लक्षांनी वाढत आहे असे दिसते. विशेषतः दक्षिणेकडे जननाचे प्रमाण अधिक आहे. अन्य यूरोपीय देशांप्रमाणे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने लोकसंख्येची वाढ हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. १९११ मध्ये जननमानाचे प्रमाण दरहजारी ३१·५ होते ते १९६७ मध्ये १७·७ झाले. मृत्युमानाचे प्रमाण अनुक्रमे १९·१ वरून ९·५ वर आले. १९७० मध्ये लोकसंख्येचे प्रमाण दर चौ. किमी. ला १८०·२५ होते. इटलीमध्ये मोठ्या शहरांची संख्या बरीच असून दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येचा प्रवाह शेतीकडून धंद्याकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे असा दिसून आला आहे. १९७० साली रोम २७·७८ लक्ष, मिलान १७·१३ लक्ष, नेपल्स १२·७८ लक्ष, तूरिन ११·९० लक्ष ही दहा लाखांहून अधिक लोकवस्तीची शहरे असून एक लाखाहून अधिक लोकवस्ती असलेली शहरे ४५ होती. पोट भरण्यासाठी बरेच इटालियन दरसाल अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, ब्राझील या देशांत जातात व जर्मनी, नेदर्लंड्स, फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशांत अल्पकाळ देशांतर करतात. उद्योगधंद्याची वाढ चालू ठेवणे व जनन संख्या मर्यादित करणे यांवर सरकार भर देत आहे. इटली हा देश ख्रिश्चन धर्मीयांचा गाभा असल्याकारणाने व त्यातच पोपचे धर्मपीठ या देशात असल्याकारणाने जवळजवळ सर्व लोक ख्रिश्चन धर्मीय असून त्यांमध्ये ९९ टक्के रोमन कॅथलिक आहेत. १९६२ मध्ये सु. १,००,००० प्रॉटेस्टंट व ५०,००० ज्यू होते. १९२९ च्या पोप व इटालियन सरकार यांच्यामधील तहाला संविधानाने मान्यता दिली. त्यानुसार रोमन कॅथलिक हा इटलीचा मुख्य धर्म आहे. धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु बहुजन समाजाच्या चालीरीतींच्या आड येणाऱ्या कोणत्याही पंथाचा व धर्माचा प्रसार करण्यास परवानगी नाही. प्राथमिक व माध्यमिक शाळांतून कॅथलिक धर्मीय शिक्षण दिले जाते. विवाह वगैरे धार्मिक संस्कार धर्मगुरूसमक्ष होतात. नवीन संविधान सुधारणेनुसार घटस्फोटाला परवानगी मिळाली आहे. पोपचे प्रमुख धर्मपीठ रोमजवळील व्हॅटिकन येथे असून त्याला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा आहे [→ व्हॅटिकन]. सामान्य माणसाच्या जीवनात धर्माला मोठे स्थान आहे.
इटालियन ही राज्यकारभाराची व अधिकांश लोकांची भाषा आहे. मूळ लॅटिन भाषेपासून ही झालेली आहे. प्रदेशाप्रदेशांमध्ये बोलीभाषा खूपच बदललेल्या आढळून येतात. साधारणपणे टस्कनीमधील बोलीभाषा शुद्ध समजली जाते. फ्रान्सच्या सरहद्दीजवळ फ्रेंच, जर्मनी-ऑस्ट्रिया सरहद्दीजवळ जर्मन व ईशान्येकडे स्लाव्ह भाषा बोलली जाते.
प्राचीन इटलीमधील बहुतेक वाङ्मय लॅटिन भाषेत आढळते. यूरोपातील अनेक भाषा लॅटिनपासून उगम पावल्या. पोपचा सर्व कारभार लॅटिनमधून चालत असल्याने आणि यूरोपवर कित्येक शतके पोपचा पगडा असल्याने लॅटिन भाषेतील साहित्य समृद्ध बनले आहे [→ लॅटिन भाषा लॅटिन साहित्य]. इटालियन भाषेचा इतिहास थोडा असला, तरी तीतही अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेले आहेत [→ इटालियन भाषा इटालियन साहित्य].
फॅसिस्ट राजवटीत इटलीत आरोग्याबाबत बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात निकृष्ट अन्नपुरवठ्यामुळे इटलीत क्षय, हृदयविकार, सांसर्गिक रोग इ. बळावले होते. युद्धोत्तर कालात सरकारने यांबाबत दक्षता घेतल्याने येथील आरोग्यमान सुधारले. इटलीत आरोग्यसुधारणांसाठी विशेष संस्था कार्य करीत आहेत. १९३८ मध्ये बालमृत्यूचे प्रमाण हजारी १०६ होते, ते १९६१ मध्ये हजारी ४०·१ इतके खाली आले. नवीन सामाजिक कायद्यानुसार वृद्ध व पेन्शनरांना मोफत औषधे व वैद्यकीय साहाय्य मिळते. हेच साहाय्य शेतमजुरांनाही मिळते. लहान लहान वस्त्यांमधून आरोग्यकेंद्र व कल्याणकेंद्रे आहेत. उद्योगधंद्यातील कामगार, व्यापारी व्यवसायातील व बँकेतील नोकर व शेतकरी या सर्वांसाठी सामाजिक विम्याची पद्धत अंमलात असून त्याचे हप्ते त्या त्या क्षेत्रांतील मालक, कामगार, तसेच सरकार यांना भरावे लागतात. यात व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना मदत, बेकारीभत्ता, आजारीपणातील मदत, म्हातारपणासाठी मदत व अपघाताचे वेळी मदत इ. गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. शिशुसदने, अनाथाश्रम, अपंगांसाठी गृहे व भिकाऱ्यांसाठी आश्रम यांसारख्या संस्था या देशात भरपूर आहेत. माता-बालसंगोपन कार्यासाठी १९२५ साली एक राष्ट्रीय संघटना स्थापण्यात आली आहे.
दुसऱ्या महायुद्धात देशातील राहण्याच्या एक पंचमांश जागा निकामी झाल्या. संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने व इटालियन राष्ट्रीय विमा मंडळाच्या आर्थिक साहाय्याने घरांची बांधणी वेगाने सुरू झाली आणि १९६१ च्या सुमारास बहुतेक सर्वांना राहण्याच्या जागा मिळाल्या. लोकवस्तीस पाणीपुरवठ्याच्या बाबतीत उत्तर इटली व पो नदीचे खोरे या भागांत पाण्याची अडचण नाही. ऐतिहासिक कालांतील उत्कृष्ट योजनेमुळे रोम शहराचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. दक्षिणेकडे उन्हाळा पूर्णपणे कोरडा असतो तेथे व चुनखडीच्या प्रदेशात हा प्रश्न अधिक तीव्र होतो. सर्वसाधारण इटालियन मनुष्य बराचसा रंगेल, खेळ, क्रीडा यांच्यात जास्त आनंद घेणारा, कलेचा उपासक असा आढळून येतो. तथापि देशाच्या निरनिराळ्या भागात काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. उत्तरेकडे इटालियन मनुष्य अबोल व गंभीर, तर तस्कनी व अंब्रियात तो मोकळा आणि दक्षिणेकडे तो जास्त बोलका, विनोदी आणि कल्पनासाम्राज्यात दंग होणारा आढळतो. इटलीत खाद्यपदार्थांतही अशीच विविधता आढळते. सर्वसाधारण इटालियन मिताहारी परंतु चवीने खाणारे आहेत. इटालियन स्वयंपाकी जगभर प्रसिद्ध आहेत. उत्तर इटलीत स्त्रिया शेतावर व इतर कामात मदत करतात.
देशामध्ये १९७१ मध्ये ८१ दैनिके होती. त्यांचा खप ४७ लाखांच्या आसपास होता. त्यांपैकी ४६ उत्तरेकडे, २३ मध्य इटलीत, ६ दक्षिणेकडे व बाकीची बेटांमध्ये प्रसिद्ध होत. रोम (१६ दैनिके) आणि मिलान (१०) ही या दृष्टीने दोन प्रमुख केंद्रे आहेत. लाखावर खप असलेली १७ दैनिके असून त्यांपैकी ११ उत्तरेत, ५ मध्य इटलीत व एक दक्षिणेकडे आहे. १७% वर्तमानपत्रे राजकीय पक्षांच्या, ५४·९% उद्योगसमूहांच्या व ९·३% कॅथलिकांच्या नियंत्रणाखाली आहेत. कुरिए डेल सेरा या मिलानच्या दैनिकाचा खप चार लाखांवर असून अवंती या समाजवादी व ल युनिटा या कम्युनिस्ट वर्तमानपत्रांचा खप दोन लाखांवर आहे. दैनिकांशिवाय येथून चार हजारांवर नियतकालिके प्रसिद्ध होतात. यांपैकी कित्येकांचा खप लाखावर असून डोमेनिका डेल कुरिए या मिलानच्या लोकप्रिय साप्ताहिकाचा खप दहा लाखांवर आहे.
मध्ययुगात इटलीत शिक्षणव्यवस्था प्रामुख्याने पोपच्या नियंत्रणाखाली होती. प्रबोधनकालानंतरही इटलीत शिक्षणाबाबत फारशी सुधारणा नव्हती. १८७० नंतर येथे शिक्षणाबाबत आस्था वाढली. जगप्रसिद्ध शिक्षणतज्ञ माँटेसरीसारख्या विदुषी येथे निर्माण झाल्या. फॅसिस्ट राजवटीत गोव्हान्नी जेंटीले या शिक्षणतज्ञाने शिक्षणपद्धतीत सुधारणा केली. १९५१ मध्ये इटलीत १३·६% निरक्षरता होती. दक्षिणेकडे काही ठिकाणी ४०%, तर सार्डिनियात ५३% होती. १९६१ साली पुरुषांच्या निरक्षरतेचे प्रमाण ६·६% व स्त्रियांचे १०% होते. इटलीत ६ ते ११ वयांतील सर्व मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. तथापि डोंगराळ व ग्रामीण भागांतून मुले वर्षांतून फारतर ४-५ महिनेच शाळेत जातात. शाळांच्या इमारतीही सोईच्या नसतात. प्राथमिक शिक्षकांना खेड्यांत राहण्याची सोय नसल्याने त्यांचा प्रवासातच वेळ अधिक जातो. ११–१४ वयापर्यंत शिक्षण मोफत नाही, पण सक्तीचे आहे. १४ वर्षे वयानंतर मुलांना मानव्य, विज्ञान व तंत्र या शाखांत प्रवेश मिळतो. हे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश मिळतो. १९७०-७१ मध्ये ३८,०८३ प्राथमिक शाळांत २,२८,९९८ शिक्षक व ४८,९१,४५४ विद्यार्थी होते. ८,९३९ माध्यमिक शाळांत १,९७,६२७ शिक्षक व २१,६७,६६१ विद्यार्थी होते. १९४१ तांत्रिक शाळांत ५४,६७८ शिक्षक व ६,७५,३७७ विद्यार्थी होते. ८०७ शिक्षक प्रशिक्षण विद्यालयांत १८,००९ शिक्षक व २,२१,६२३ विद्यार्थी होते. १८१ कलाविद्यालयांतून ५,१४० शिक्षक व ३९,०३६ विद्यार्थी होते उच्च शिक्षणाच्या २७२ संस्थांमधून ११,७८८ शिक्षक व ६,७८,८४५ विद्यार्थी होते. १९४८ पासून प्रौढ शिक्षणाचे दिवसाचे व रात्रीचे वर्ग काढण्यात आले असून त्यांत शिक्षण घेणारांची संख्या मोठी आहे.
देशात विद्यापीठे व तत्सम शिक्षणसंस्था १९७१ मध्ये ३७ होत्या. बोलोन्या विद्यापीठाची स्थापना १२०० मध्ये झाली असून ते जगातील एक जुने विद्यापीठ समजले जाते. बोलोन्याचे पाठोपाठ त्याच शतकात नेपल्स, पॅड्युआ, जेनेआ, पेरूजा अशा ठिकाणी विद्यापीठे स्थापन झाली. रोम येथील विद्यापीठ १३०३ मध्ये स्थापन झाले असून ते देशातील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे १९६७-६८ मध्ये त्यात ५३,००० विद्यार्थी होते. कला व शास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी इटलीत तेराव्या शतकापासून विविध मंडळे धनवानांच्या आश्रयाने स्थापन झाली. यांतूनच पुढे अनेक अकादमींचा जन्म झाला. फ्लॉरेन्स, नेपल्स, रोम व्हेनिस इ. ठिकाणी पंधराव्या ते सतराव्या शतकांत स्थापन झालेल्या अकादमी प्रसिद्धीस आल्या. यांतील अकादमींतून कित्येक नामांकित शास्त्रज्ञ, कलाकार इत्यादी उदयास आले.
इटलीत ग्रंथालयांची संख्या बरीच असून अनेक शहरांत जुन्या ग्रंथांचे संग्रह आढळतात. फ्लॉरेन्स, रोम, पालेर्मो, सॉडना इ. ठिकाणी सरकारी ग्रंथालये आहेत. बोलोन्या विद्यापीठातील ग्रंथालय प्राचीन व मोठे आहे. व्हॅटिकनमध्ये ६०,००० वर हस्तलिखिते आहेत. वस्तुतः इटली हा, प्राचीन ग्रंथ, वस्तू, कलाकृती इ. बाबतींत जगातील एक समृद्ध देश आहे. संग्रहालयांची संख्या इटलीत भरपूर आहे. रोममधील व्हिला ज्यूला संग्रहालय सर्वात मोठे असून नेपल्स व पालेर्मो येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, फ्लॉरेन्समधील अनेक संग्रहालये, सार्डिनियामधील काल्यारी संग्रहालय, मिलानमधील ब्रेरा संग्रहलय सिराक्यूस शहरातील पुराणवस्तुसंग्रहालय आणि व्हेनिसमधील अकादमी महत्त्वाची आहे.
कला व क्रीडा : वास्तुशिल्प व मूर्तिशिल्प यांबाबतीत प्राचीन इटली वैभवशाली होता. अनेक क्षेत्रांत व जगातील अनेक ठिकाणी रोमन पद्धतीचा पगडा दिसून येतो. रोमनकालीन इमारती, नाट्यगृहे, मंदिरे, चर्च, स्नानगृहे, शहरांची आखणी, विविध मूर्ती, चित्रे इत्यादींनी आजही लोक मंत्रमुग्ध होतात. पंधराव्या शतकात कलेच्या पुनरुज्जीवनास सुरुवात झाली आणि इटलीमधून ती लाट यूरोपात पसरली, त्याची दोन प्रमुख केंद्रे फ्लॉरेन्स व रोम ही होती. लिओनार्दो दा व्हींची, मायकेलअँजेलो, रॅफेएल, दोनातेलो, सावोनारोला इ. कलाकार या काळात होऊन गेले. चौदाव्या शतकापर्यंत बहुतेक इटालियन वादकांवर फ्रेंच संगीताचा प्रभाव होता. पुढे सोळाव्या शतकात फ्लेमिश संगीताचा प्रभावही बराच पडला. अठराव्या शतकानंतर वाद्यसंगीताची आणि त्यातही ऑपेरा वाद्यवृंद या पद्धतीची इटलीत फार प्रगती झाली आहे [→ इटलीतील कला].
फुटबॉल, मुष्टियुद्ध, सायकलशर्यती व मोटारशर्यती हे येथील लोकप्रिय खेळ होत. टेनिस, गोल्फ हेही येथे बरेच खेळले जातात. बर्फावरील खेळ आल्प्समध्ये मोठ्या प्रमाणावर असून व्हेनिस, सरोवरे व रिव्हिएरा यांतील बोटींच्या शर्यती प्रसिद्ध आहेत. ऑलिंपिकमध्ये इटलीला धावणे, सायकलशर्यत, मुष्टियुद्ध, वॉटरपोलो इत्यादींमध्ये प्रावीण्य मिळाले होते. १९६० मध्ये रोम येथे ऑलिंपिक सामने भरले होते. इटलीत प्रामुख्याने रोमन कॅथलिकांचे वर्चस्व असल्याने बहुतेक सण व उत्सव त्या पंथाप्रमाणे पाळले जातात. तथापि इटलीतील बऱ्याच ठिकाणी प्राचीन पद्धतीनुसार होणारे उत्सव लोकप्रिय आहेत. सिएना येथील शर्यती, व्हेनिस येथील बोटींच्या शर्यती, फ्लॉरेन्समधील ईस्टरची मिरवणूक, रोममधील मद्योत्सव, नेपल्स येथील संगीतस्पर्धा आणइ कातेन्यावरील दोपोत्सव प्रसिद्ध आहेत. इटलीतील नाट्य व चित्रपटसृष्टी महत्त्वाची आहे. व्हेनिसला भरणाऱ्या चित्रपटमहोत्सवास व कलाप्रदर्शनास साऱ्या जगातून लोक येतात.
महत्त्वाची स्थळे : प्रवाशांचे आकर्षण या दृष्टीने इटलीमध्ये पाहण्यासारखे खूपच आहे. ऐतिहासिक अवशेष, वास्तुशिल्पे, कलासंग्रहालये याबरोबरच इटलीच्या उत्तर भागातील सरोवरांची शोभा, रिव्हिएरा, द्राक्षांच्या बागा व लहान लहान बेटे यांचेही प्रवाशांना खूप आकर्षण आहे. निरनिराळ्या देशांतून येथे येणारांची संख्या तीन कोटींहून जास्त आहे. त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न हजार अब्ज लिरेंच्या वर होते. इटालियन आयात-निर्यातीतील तफावतही या व्यवसायाने बऱ्याच प्रमाणात भरून काढली जाते. इटलीमध्ये प्रेक्षणीय स्थळांची संख्या भरपूर असून त्यांमध्ये प्रामुख्याने व्हॅटिकनमधील सेंट पीटरचे चर्च, फ्लॉरेन्समधील प्रार्थनामंदिरे, पीसा येथील कलता मनोरा, पाँपेई येथील जुने अवशेष. फ्लॉरेन्स, नेपल्स, रोम व इतर ठिकाणचे मध्ययुगीन शिल्प, नेपल्स व सान मारीनो येथील किल्ले, बहुतेक मोठ्या शहरांतून असलेली संग्रहालये, व्हेनिस येथील अकादमी व मिलान, रोम, नेपल्स, व्हेनिस इ. शहरांतील भव्य नाट्यगृहे, ही प्रेक्षणीय आहेत. (चित्रपत्र ३९).
आठल्ये, द. बा.; कुमठेकर, ज. ब.; शाह, र. रू.
पहा : इट्रुस्कन संस्कृति; प्रबोधनकाळ; रोमन संस्कृति.
संदर्भ : 1. Adams, J. C.; Barile, Paolo, The Government of Republican Italy, London, 1962.
2. Crow, J. A. Italy, New York, 1965.
3. Guicciardini, Francesco; Trans. Alexander, Sidney, The History of Italy, Toronto, 1969.
4. Hildebrand, G. M. Growth and Structure in the Economy of Modern Italy, Harvard, 1965.
5. Smith, D. M. Italy, Modern History, London, 1959.