आयसेन्स्तीन, स्यिर्ग्येई स्यिकायलव्झिच: (२३ जानेवारी १८९८ – १० फेब्रुवारी १९४८). प्रख्यात रशियन चित्रपट-दिग्दर्शक व चित्रतंत्रज्ञ. रीगा येथे जन्म. प्रारंभी स्थापत्य अभियंता व वास्तुविशारद. १९२० नंतर रंगभूमीवर पदार्पण केले. मॉस्को आर्ट थिएटरमध्ये मायरहोल्टच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमिविषयक अनुभव घेऊन अनेक नाटकांचे नेपथ्य, रंगमंच-सजावट तसेच निर्मितीही केली. तथापि रंगभूमीच्या मर्यादा जाणवल्याने चित्रपटक्षेत्रात त्याने लवकरच प्रवेश केला. स्ट्राइक (१९२४) या त्याच्या पहिल्याच मूकपटास पारितोषिक मिळाले, तसेच द बॅटलशिप पोटम्कीन (१९२५) या वास्तववादी मूकपटास जागतिक कीर्ती लाभली. ऑक्टोबर (१९२७-२८टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड हे दुसरे नाव), जनरल लाईन (१९२६-२९द ओल्ड अँड द न्यू) या चित्रपटांनीही त्याच्या कीर्तीमध्ये भर घातली. १९३० मध्ये निमंत्रणानुसार तो हॉलिवूडला गेलापरंतु राजकीय दबावामुळे तेथे त्यास चित्रनिर्मिती करता आली नाही. पुढे १४ महिन्यांच्या मेक्सिको येथील वास्तव्यानंतर रशियन सरकारकडून त्यास परत बोलावणे आले. त्यामुळे तेथील चित्रपटही अपूर्णच राहिला. त्याचा काही भाग कालांतराने थंडर ओव्हर मेक्सिको (१९३३) या नावाने प्रदर्शित झाला. अलेक्झांडर नेव्हस्की (१९३८) या त्याच्या पहिल्या बोलपटास ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ हा सन्मान लाभला. त्याच्या इव्हान द टेरिबल या संकल्पित चित्रपटत्रयीचा पहिला भाग १९४५ मध्ये प्रदर्शित झाला दुसरा भाग (त्यात त्याने प्रथमच काही रंगीत भाग अंतर्भूत केला.) जप्त झाल्याने तिसरा भाग पूर्ण होऊ शकला नाही. मॉस्को येथे त्याचे निधन झाले.
आयसेन्स्तीनच्या प्रारंभीच्या मूकपटांमध्ये विशिष्ट व्यक्तीऐवजी नायक म्हणून व्यक्तिसमूहालाच प्राधान्य दिले आहे व व्यावसायिक नटांऐवजी सामान्य माणसांनाच त्याने चित्रपटांत भूमिका दिल्या आहेत. चित्रसंकलन व विशेषत: दृश्यमिश्रण या तंत्रांच्या अत्यंत प्रभावी व कलात्मक वापर करून त्याने चित्रपटाच्या तंत्रविकासात मोलाची भर घातली. त्याचे चित्रपटतंत्रविषयक लिखाण द फिल्म सेन्स (१९४२, १९४७), फिल्म फॉर्म (१९४९), नोट्स ऑफ अ फिल्म डायरेक्टर (१९५९) व फिल्म एसेज (१९६८) या भाषांतरित इंग्रजी ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे.
इनामदार, श्री. दे.