हिंद मजदूर पंचायत : एक कामगार संघटना. मधू लिमये व जॉर्ज फर्नांडीस यांनी कामगार क्षेत्रात पक्षाचे कार्य करण्यासाठी हिंदमजदूर पंचायत ही संघटना १९६१ मध्ये स्थापन केली. तत्पूर्वी पंचायतीचे बहुसंख्य कार्यकर्ते हिंद मजदूर सभेमध्ये काम करीत होते. प्रजा समाजवादी पक्षातील दुफळीनंतर ते हिंद मजदूर सभेतून बाहेर पडले. पुन्हा १९७९मध्ये मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात हिंद मजदूर पंचायतीचे हिंद मजदूर सभेमध्ये विलिनीकरण झाले परंतु हा एकोपा फार काळ टिकला नाही आणि पुन्हा एकदा १९८३ मध्ये दोन्हींत फूट पडून पूर्वाश्रमीच्या हिंद मजदूर पंचायतीचे सदस्य हिंद मजदूर सभेतून बाहेर पडले व त्यांनी बंगलोर येथे झालेल्या परिषदेत स्वतंत्र संघटना स्थापन करून तिचे नामकरण हिंद मजदूर किसान पंचायत असे केले. 

 

हिंद मजदूर किसान पंचायतीचे नेते व कार्यकर्ते यांच्यात २००८ मध्ये चर्चा झाली. त्यात कामगार संघटना व चळवळ अधिक क्रियाशील व बळकट करण्याचे ठरले. त्याला अनुसरून हिंद मजदूर किसान पंचायतीचे हिंद मजदूर सभेत कायमस्वरूपी विलिनीकरण करण्याचा ठराव संमत झाला व मार्च २००९ मध्ये त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात आला. मुंबई येथे झालेल्या २३ ऑक्टोबर २०१०च्या परिषदेत प्रत्यक्षात विलिनीकरणाची कार्यवाही झाली. एकत्रितपणे काम करून चलनवाढ, बेरोजगारी, मालक-कामगार संबंधातील तणाव व देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ व्हावा, या मुद्द्यांवर काम करण्याचा ठराव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, यासाठीही प्रयत्न करण्याचे प्रस्तावित केले गेले. 

चौधरी, जयवंत