हस्रत मोहानी : (१ जानेवारी १८७५–१३ मे १९५१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राष्ट्रवादी मुस्लिम नेते, उर्दू कवीआणि विचारवंत. त्यांचे पूर्ण नाव सैय्यद फझलूल हसन. उत्तर प्रदेशातील मोहन (उनाओ जिल्हा) या गावी सैय्यद या प्रसिद्ध घराण्यात त्यांचाजन्म झाला. हस्रत मोहानी हे त्यांचे टोपणनाव. वडील अझर हुसेन हे धार्मिकहोते. युनानी वैद्यकाचा व्यवसाय ते करीत असत परंतु एकूण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. त्यामुळे पाश्चात्त्य शिक्षणापासूनहस्रत मोहानी वंचित राहिले. त्यांनी अंजुमन उर्दू-ई-मुल्ला आणि एम्.ए. ओ. या महाविद्यालयांतून (अलीगढ) थोडे अध्ययन केले तथापित्यांच्या आंदोलकी वृत्तीमुळे त्यांना महाविद्यालय सोडावे लागले (१९०३). याच सुमारास त्यांचा विवाह निशात-फातिमा या तरुणीशी झाला. त्या हस्रत यांच्याबरोबर सामाजिक कार्यात नेहमी असत आणि त्यांनी कधीही परदा (बुरखा) वापरला नाही. त्यांची आई आणि आजीया दोघींचे उर्दू आणि फार्सी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांच्या सहवासात हस्रत मोहानींना काव्य, गझला, फार्सी लोककथा यांचा परिचय झाला. त्यांच्या जहाल ब्रिटिशविरोधी विचारांमुळे त्यांना बी.ए. झाल्यानंतर एल्एल्.बी.ला प्रवेश मिळाला नाही. पुढे नोकरी न करता ते काँग्रेसच्या राजकारणात सहभागी झाले.

 

हस्रत जरी अलीगढ कॉलेजच्या पहिल्या चळवळीचे नेते असले, तरी ? सर सय्यद अहमद खानप्रणीत ब्रिटिशधार्जिण्या धोरणांचे पूर्णविरोधक होते. त्यांनी उर्दू-ए-मुआवला हे मासिक सुरू करून जनजागृती सुरू केली. त्यांच्या ब्रिटिशविरोधी लिखाणामुळे ब्रिटिशांनी त्यांचे मासिक अनेक वेळा बंद पाडले. काँग्रेसच्या सुरतमधील अधिवेशनात जहाल व मवाळ यांत संघर्ष झाला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. ब्रिटिश शासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा केला. त्याविरुद्ध त्यांनी लेख लिहिला, तेव्हा त्यांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली (१९०८). विशेष म्हणजे हस्रत मोहानी लो. टिळक आणि योगीअरविंद यांचे निष्ठावान भक्त होते. तसेच त्यांनी अरविंदबाबूंचे समर्थन करणारे अनेक लेख लिहिले. स्वदेशीचा प्रसार केला. त्या काळात रासबिहारी घोष, मौलाना सिंधी, बरकतुल्लाह इत्यादींनी काबूल येथे हंगामी सरकार स्थापन करून क्रांतीचे प्रयत्न सुरू केले होते. हस्रत यांचा त्यांना पाठिंबा होता.

 

काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची अधिवेशने १९१५ मध्ये मुंबईला एकाच वेळी भरली. हस्रत मोहानींनी त्या वेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जोरदार प्रयत्न केले. तेव्हा महंमद अली जिनांशी त्यांचे मतभेद झालेआणि अखेरपर्यंत ते एकत्र आले नाहीत. १९१९ मध्ये दिल्लीमध्ये खिलाफत कॉन्फरन्सच्या वेळी त्यांनी ‘हिंदू-मुसलमानांनी पूर्णपणे स्वदेशीचे पालन करावे आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकावा ‘, असा ठराव मांडला. एकाएकी असा सर्वंकष बहिष्कार टाकणे अव्यवहार्य म्हणून म. गांधीजींनी त्या ठरावाला विरोध केला. अहमदाबाद काँग्रेसच्या अधि-वेशनात (१९२१) त्यांनी आणखी एक जहाल ठराव मांडला तो म्हणजे ‘१ जानेवारी १९२२ रोजी भारताचे संयुक्त राज्यांचे प्रजासत्ताक म्हणून घोषणा करावी ङ्ख. विशेष म्हणजे ब्रिटिशांशी निःशस्त्र प्रतिकार करण्याचामुद्दा हस्रत आपल्या भाषणांतून मांडत असताना म. गांधींना असहकारिता (नॉन-को-ऑपरेशन) हा पर्याय सुचला, हे खुद्द गांधीजींनीच आपल्या आत्मचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीत म्हटले आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर हस्रत यांची घटना समितीवर नियुक्ती करण्यात आली परंतु त्यांनी अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली नाही कारण त्यांना भारत-पाकिस्तान फाळणी मान्य नव्हती.

 

१९१७ च्या रशियन क्रांतीचा हस्रत यांच्या विचारांवर विशेष प्रभाव होता. १९२५ मध्ये कानपूर येथे घेण्यात आलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या परिषदेचे ते एक संयोजक होते. त्यांनी स्वतःला ‘मुस्लिम कम्युनिस्ट’ म्हणून घोषित केले होते. तसेच ते ‘जमीयत-उलेमा-ए-हिन्द’ या राष्ट्रवादी संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी श्रीकृष्णभक्तीची अनेक कवने लिहिली. प्रसिद्ध गझलगायक गुलामअली यांनी लोकप्रिय केलेली ‘चुपके चुपके रात दिन’ ही हस्रत यांची प्रसिद्ध गझल.

 

लखनौ येथे त्यांचे निधन झाले.

बेन्नूर, फकरूद्दीन