सेवन : (कन्सम्प्शन). मानवी गरजा भागवण्यासाठी वस्तू व सेवा यांचा केला जाणारा विनियोग. अर्थशास्त्रात सेवन म्हणजे वस्तू व सेवा यांच्यापासून समाधान मिळविण्यासाठी त्यांचा वापर करणे होय. खाद्यपदार्थ खाणे किंवा पेये पिणे म्हणजे जसे सेवन होते तसेच वस्तू उदा., टेबल, पंखा, रेडिओ, दूरदर्शन, वाहन यांचा वापर केल्यास तेही सेवन होते परंतु व्यापारी संघ व कार्पोरेट यांनी प्लँट व यंत्रसामग्री यांची केलेली खरेदी ही भांडवल गुंतवणूक किंवा विनियोग होय, सेवन नव्हे. ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (१८८३–१९४६) यांनी कौटुंबिक सेवनखर्च व तो निश्चित करणारे घटक यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठी सेवनकार्य (कन्सम्पशन फंक्शन) ही संकल्पना प्रथम अधोरेखित केली. सेवन व्यक्ती, कुटुंब अगर संघटन यांच्या उत्पन्नावर अवलंबून असल्याने उत्पन्न व सेवन यांच्यातील नाते अभ्यासता येते. यालाच केन्सने सेवनकार्य असे संबोधले. विशिष्ट अशी उत्पन्नाची पातळी असताना केला जाणारा खर्च असा सेवनाचा अर्थ असून, उत्पन्नाच्या विविध पातळ्यांवर सेवनासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाला सेवनकार्य म्हटले जाते. सेवनखर्च उत्पन्नावर अवलंबून असल्याने उत्पन्नासंबंधित फरकात बदल झाल्यास त्याचा सेवनकार्यावर परिणाम होतो. देशातील सेवा व वस्तूंची एकूण मागणी, सेवन मागणी (कन्सम्पशन डिमांड) गुंतवणूक मागणी (इन्व्हेस्टमेंट डिमांड) यांच्या बेरजेएवढी असते. देशातील रोजगार व उत्पन्नपातळी निश्चित करण्यामध्ये सेवनमागणीचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे सेवनाची पातळी वाढली की, रोजगार निर्मिती व राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी उंचावते. ह्या दोन्हीमध्ये वृद्धी झाली की, एकूण सेवनकार्यात वाढ होते. त्यासाठी परिणामकारकपणे रोजगारीचा दर व उत्पन्न वाढवायचे असेल, तर लोकांच्या सेवनामध्ये वाढ होईल किंवा तशी प्रवृत्ती (प्रॉपेनसिटी) तयार होईल यासाठी उपाययोजना करणे भाग पडते.
प्रत्येक व्यक्ती, कुटुंब यांचे विशिष्ट असे सेवनकार्य असते. जगातील विकसित देशांत सकल राष्ट्रीय उत्पादनापैकी तीन-चतुर्थांश वस्तू सेवन या वर्गात मोडतात. त्यावरुन सेवनकार्याची व्याप्ती लक्षात येते. साकलिक अर्थशास्त्रविषयक अभ्यासाच्या दृष्टीने एकूण सेवनकार्याची पातळी महत्त्वाची असून सेवनकार्याच्या आधारे नागरिकांच्या सेवनखर्च करण्याच्या प्रवृत्तींचा मागोवा घेता येतो. राष्ट्रीय उत्पन्न वाढले की, सेवन व बचत कार्यात वृद्धी होते. केन्स यांच्या उत्पन्न व रोजगार सिद्धांतानुसार सेवनखर्चाचा केवळ व्यक्तिगत पातळीवर विचार न करता देशातील सर्व व्यक्तींच्या एकूण सेवनाचा विचार महत्त्वाचा ठरतो. जेव्हा अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सेवनवर्तनाचा आढावा घेण्यात येतो, तेव्हा सर्वसाधारण उपभोक्त्याच्या वर्तनाच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. सेवनवर्तनाच्या निरीक्षणांच्या आधारे बचती संदर्भातील अनुमान काढता येते कारण उत्पन्नाचा जो हिस्सा सेवनासाठी खर्च केला जात नाही तो बचतीइतका असतो. अल्प मुदतीतील सेवनकार्याची पुढील वैशिष्ट्ये समोर येतात. देशातील बहुसंख्य गरीब लोक आपले संपूर्ण उत्पन्न वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी वापरत असल्याने त्यांची बचत नगण्य असते. विशिष्ट उत्पन्न असलेले काही लोक प्रसंगी वर्ग घेऊन किंवा बचतींना फाटा देऊन उत्पन्नापेक्षा जास्त खर्च सेवनकार्यावर करतात. सेवनावर जादा खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे देशाच्या संपत्तीचा र्हास होण्याची शक्यता निर्माण होते. साहजिकच अशी सेवनवृत्ती दिर्घकालात संभवत नाही. एकदा लोकांच्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली, की लोकआपल्या उत्पन्नापैकी ठराविक हिस्सा सेवनावर खर्च करून उर्वरित रकमेची बचत करण्यास प्रवृत्त होतात. सेवनकार्याचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे लोकांचे उत्पन्न काही अंशी वाढले किंवा कमी झाले तरी त्याच प्रमाणात सेवनखर्चात बदल होतो असे नाही.
नागरिकांचा सेवनावरील होणारा खर्च प्रामुख्याने व्यक्तिगत वाजवी उत्पन्न (रिअल इन्कम), बचती व व्याजदर या तीन घटकांवर अवलंबून असतो. पैकी वाजवी उत्पन्नाचा सेवनावरील होणाऱ्या खर्चावर मोठा प्रभाव असतो. बहुसंख्य लोकांचे कमी उत्पन्नामुळे गतकालीन बचतींचे प्रमाण कमी असते व त्यात सामाजिक सुरक्षा, विमा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन अशा योजनांकडे जमा केलेल्या वर्गणीच्या स्वरूपात असतात. त्यामुळे ह्या रकमा सेवनकार्यासाठी तातडीने उपलब्ध होत नाहीत. परिणामतः अशा बचतींचा दैनंदिन सेवनखर्चावर पडणारा प्रभाव नगण्य असतो. तुलनेने श्रीमंतांकडे बचतीची रक्कम मोठी असली, तरी त्यांचे उत्पन्नही चांगले असल्याने उत्पन्नातून खर्च भागतो व बचतींचा सेवनखर्चावर फारसा परिणाम संभवत नाही. व्याजाचे दर चढे असल्यास काही लोकांचा जादा बचत करण्याकडे कल असतो. विशिष्ट उद्देशाने नियमितपणे बचत करणाऱ्याला चढ्या व्याजदरामुळे अपेक्षित रक्कम उभी करणे शक्य होते. व्याजदरातील बदलामुळे सेवनखर्चावर होणारा निव्वळ परिणाम निश्चितपणे सांगता येत नाही. थोडक्यात सेवनखर्चाचा मोठा हिस्सा उत्पन्नातून भागवला जातो.
उपभोक्त्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करणारी अभिजात आर्थिक उपपत्ती सीमांत उपयोगिता (मार्जिनल युटिलिटी) या अधिकल्पनेने बांधलेली असते. या अधिकल्पनेनुसार उपभोक्ता (ग्राहक) खरे दिलेल्या वस्तुविषयी समाधान व्यक्त करतो परंतु तीच वस्तू जादा मूल्य देऊन खरेदी करावयास लागली असता मिळणारे समाधान कमी होते. व्यक्तींचा (कुटुंबाचा) सेवनखर्च जरी उत्पन्नानुसार बदलत असला, तरी त्याचा विशिष्ट असा आकृतिबंध (पॅटर्न) असतो व खर्च करण्याची दिर्घकालीन प्रवृत्ती स्थिर असते. वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ अशा दोन प्रकारच्या घटकांचा व्यक्तींच्या सेवनप्रवृत्तींवर प्रभाव पडत असतो. वस्तुनिष्ठ घटकामध्ये देशातील उत्पन्नाचे वाटप (इन्कम डिस्ट्रीब्यूशन), वित्तीय धोरण, व्याजदरातील चढउतार, व्यवसाय क्षेत्रात होणारे बदल, व्यक्तींना होणारे आकस्मिक फायदे-तोटे व रोकड रकमेबाबतचे (लिक्वीडीटी) अग्रक्रम या प्रमुख बाबींचा समावेश होतो. प्रामुख्याने देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाबरोबच त्याच्या वाटपाच्या सदोष पद्धतीवर सेवनवर्तन अवलंबून असते. गरिबांचे उत्पन्न मर्यादित असल्याने सेवनावरील त्यांच्या खर्चाचे प्रमाण उत्पन्नाशी निगडित असल्याने त्यांच्या अनेक प्राथमिक गरजा प्रलंबित राहतात. याउलट श्रीमंत व्यक्तींच्या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या असल्यामुळे सेवनावर खर्च करण्यापेक्षा त्यांबाबतीत बचतीचा संभव अधिक असतो. शासनाचे वित्तीय धोरण सेवनकार्यावर बराच प्रभाव पाडत असते. करकपात केल्यास लोकांकडे अधिक पैसा राहतो व सेवन खर्चाला प्रोत्साहन मिळते. उलट करवाढ झाल्यास सेवनावर विपरित परिणाम संभवतो. व्यापारचक्र व व्यवसायातील चढउतार यामुळेही काही लोकांच्या सेवन कार्यावर परिणाम होतो. केन्स यांच्या मते मानवी स्वभाव व मानसशास्त्र यांचा सेवनकार्यावर मोठा पगडा असतो. नागरिकांचे व व्यवसाय संघटनांचे यासंदर्भातील वर्तन व कल सेवनकार्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. व्यक्ती कित्येकदा सेवनखर्च कमी करून आपत्कालीन परिस्थिती, संभाव्य आजारपण, बेरोजगारी, मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, वारसाच्या भविष्याची तरतूद, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा तसेच काटकसरीचे समाधान यांसारख्या बाबींसाठी बचती करतात. व्यवसायांच्या बाबतीत कार्यक्षम-व्यवस्थापन, जनमानसातील प्रतिमा, मालमत्तेची झीज व कालबाह्यता यांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने बचतींची प्रवृत्ती असते. या सर्व घटकांचा सेवनखर्चावर दीर्घकालीन परिणाम संभवतो.
सर्वसाधारण आदर्शवादी आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर अर्थप्राप्ती आणि वस्तूमूल्य हे सेवनाचे दोन प्रमुख निर्धारक होत. विद्यमान गुंतागुंतीच्या आधुनिक समाजात सामाजिक दबाव, फॅशनची प्रवृत्ती, बदलत्या सवयी आदी घटकांचा प्रभाव असला, तरी वस्तूमूल्य व अर्थप्राप्ती यांचाच प्रामुख्याने विचार महत्त्वाचा ठरतो.
देशाच्या उत्पन्न व रोजगाराच्या पातळींवर मुख्यत्वेकरून सेवनखर्च अवलंबून असल्याने एकूणच सेवनखर्च वाढविण्याच्या उद्देशाने काही उपाय योजले जातात. सेवनखर्च वाढला तरच मागणी वाढून उत्पादनात भर पडते, औद्योगिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक होते व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. त्यादृष्टीने राष्ट्रीय उत्पन्नाचे सम-वाटप, सामाजिक सुरक्षा योजनांना प्राधान्य, वेतनाबाबतचे उदार धोरण, मुबलक पतपुरवठा हे उपाय शासनाच्या पातळीवर योजले जातात. आधुनिक अर्थशास्त्रात सेवनकार्य देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास व भरभराट यांवर परिणाम करणारा विषय मानला जातो. केन्स यांनी सेवनकार्याबद्दल मांडलेल्या विचारांचा नंतरच्या अनेक अर्थतज्ज्ञांनी ऊहापोह केला. प्रा. ड्यूसनबेरी यांच्या मते व्यक्तीचा सेवनखर्च केवळ विद्यमान उत्पन्नावर अवलंबून नसतो तर त्याचे पूर्वीचे राहणीमानही त्यास कारणीभूत ठरते. उत्पन्नात घट झाली, तरी सेवनखर्चात त्याच प्रमाणात घट होत नाही कारण चांगल्या राहणीमानाची सवय जडलेली असते. सामाजिक दर्जा व प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पूर्वीएवढाच खर्च करण्याकडे व्यक्तीचा कल असतो. या प्रवृत्तीला रॅचेट इफेक्ट (ीरींलहशीं शषषशलीं) असे संबोधण्यात येते. दीर्घकालीन सेवनखर्च प्रवृत्तीच्या अभ्यासाच्या आधारे असेही स्पष्ट होते की, जरी गरीब कुटुंबे उत्पन्नामध्ये वाढ झाल्यास बचतीकडे वळली, तरी त्यांचे बचतीचे प्रमाण श्रीमंत कुटुंबाच्या तुलनेने अत्यल्प असते. कुटुंबाचा सेवनखर्च संपूर्ण उत्पन्नापेक्षा (ॲब्सोल्यूट इन्कम) सापेक्ष उत्पन्नावर (रिलेटिव्ह इन्कम) अवलंबून असतो. लोक केवळ आपल्या आवडी-निवडीनुसार नव्हे, तर इतरांसारखा विशेषतः शेजाऱ्याप्रमाणे खर्च करण्यास प्राधान्य देतात. सेवनकार्याच्या बाबतीत गरीब लोक श्रीमंत लोकांचे तसेच गरीब देश श्रीमंत देशांचे अनुकरण किंवा नक्कल करतात. यास प्रा. ड्यूसेनबेरी यांनी निर्देशन परिणाम (डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट) असे नाव दिले आहे.
अर्थशास्त्रज्ञ आर्थर सी. पिगू सेवनखर्चात म्हणतात जेव्हा वेतनदरात कपात झाल्यामुळे सर्वसाधारण वस्तूंच्या किंमती कमी होतात तेव्हा पैशाच्या क्रयशक्तीत वाढ होऊन लोकांचे वास्तव उत्पन्न वाढते. लोकांचा सेवनखर्चही वाढतो. पैशाचे वास्तव मूल्य वाढल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन ठोक राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते यांस पिगू परिणाम (पिगू इफेक्ट) असे संबोधले गेले. सेवनखर्च वाढण्यास आणखी एक महत्त्वाचा घटक कारणीभूत होतो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती व शासकीय खर्च. प्रत्येक देशाचा शासकीय खर्च भिन्न असतो व त्यास राजकीय पार्श्वभूमी व धोरणे कारणीभूत असतात. अर्थतज्ज्ञांनी सेवनकार्याचे विश्लेषण करणारे संपूर्ण उत्पन्न सिद्धांत, सापेक्ष उत्पन्न सिद्धांत व निरंतर उत्पन्न सिद्धांत हे गृहीतकांच्या आधारे मांडलेले आहेत. संपूर्ण उत्पन्न सिद्धांतानुसार उत्पन्न वाढताच लोक सेवनखर्च वाढवतात परंतु त्याचप्रमाणात ती वाढ संभवत नाही, तर सापेक्ष उत्पन्न गृहीतकानुसार सेवनखर्च संपूर्ण उत्पन्नावर नव्हे, तर सापेक्ष उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असतो. निरंतर उत्पन्न गृहीतकानुसार व्यक्तीच्या खर्चाचे कायमस्वरूपी व तात्कालिक असे दोन भाग पाडले जातात. कायम उत्पन्न टिकाऊ व दीर्घ मुदतीसाठीच्या वस्तू, तर तात्कालिक उत्पन्न दैनंदिन स्वरूपाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी विनियोगात आणले जाते. कायम उत्पन्न व कायम सेवनखर्च यांतील परस्परसंबंध स्पष्ट करताना कायम उत्पन्नाबरोबरच असा सेवनखर्च प्रभावित करणाऱ्या व्याजदर, इतर मार्गांनी मिळणारे उत्पन्न, प्राधान्यक्रम, संपत्ती संचय या फरकांचा विचार करणे गरजेचे असते. या व्यतिरिक्त जीवनचक्र गृहीतकानुसार ग्राहकाचे सेवनकार्य सध्याच्या उत्पन्नाबरोबरच उर्वरित आयुष्यात मिळणारे संभाव्य उत्पन्न व संपत्ती यावरही अवलंबून असते. व्यक्ती आपले उत्पन्न व खर्च यांचा अशारीतीने ताळमेळ घालते की, आयुष्यभर विशिष्ट प्रकारचे राहणीमान कायम ठेवता येईल. आर्थिक स्थैर्यासाठी सेवनखर्च कमी करून भांडवल संचय करण्याकडे बहुसंख्य व्यक्तींचा कल असतो. तात्पर्य, एकविसाव्या शतकात सेवनकार्य विचारसरणीकडून भांडवली विचारसरणीच्या दिशेने जगातील बहुसंख्य जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांची वाटचाल चालू असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
संदर्भ : 1. Deaton, Angus, understanding Consumption, New York, 1992.
2. Dewett, K. K. Modern Economic Theory, New Delhi, 1993.
3. Mukherjee, Sampat, Modern Economic Theory, New Delhi, 1996.
4. Sundaram, K. P. M. Vaish, M. C. Principles of Economics, New Delhi, 1978.
चौधरी, जयवंत