ग्रेट बॅरिअर रीफ : ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळची सुप्रसिद्ध प्रवालभित्ती. जगातील ही सर्वांत मोठी प्रवालभित्ती कोरल समुद्रात क्वीन्सलँडच्या उत्तरेकडील टॉरस सामुद्रधुनीपासून मकरवृत्तापर्यंत सु. २,ooo किमी. गेलेली असून ती अनेक लहानमोठ्या प्रवालभित्तींची मिळून झालेली आहे. सर्वांत बाहेरची भित्ती समुद्रबूड जमिनीच्या काठावर आहे. तिच्यावर जोरदार वाऱ्यांचा व लाटांचा मारा सतत होत असतो. ही भित्ती उत्तरेकडे किनाऱ्यापासून १६ ते १९ किमी. दूर असून केअर्न्झच्या दक्षिणेस ती किनाऱ्यापासून दूर दूर जाऊ लागते आणि तिचे स्वरूपही विस्कळित होत जाते. अगदी दक्षिणेकडे ती किनाऱ्यापासून ३२o किमी. दूर आहे. भित्ती व किनारा यांदरम्यानच्या २,o७,ooo चौ. किमी. उथळ क्षेत्रात अनेक बेटे व दुय्यम भित्ती आहेत. काही कासवे आणि पक्षी विणीच्या हंगामात येथे येतात. विविध चित्तवेधक, चित्रविचित्र समुद्री प्राण्यांनी हा भाग गजबजलेला असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील हौशी प्रवाशांचे ते एक आकर्षण बनलेले आहे. अनेक बेटांवर प्रवाशांसाठी विश्रामगृहे स्थापन झालेली आहेत. नवनवीन समुद्री क्रीडाप्रकारांमुळे ती भरभराटली आहेत.
कुमठेकर, ज. ब.
“