क्यूरी, प्येअर : (१५ मे १८५९–१९ एप्रिल १९०६). किरणोत्सर्ग (काही मूलद्रव्यांचे कण वा किरण बाहेर टाकून होणारे विघटन) व रेडियमासंबंधीच्या संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेले फ्रेंच भौतिकीविज्ञ व मारी क्यूरी यांचे पती. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. सोरबोन विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी १८९५ साली डॉक्टरेट पदवी मिळविली व त्याच वर्षी एकोल द झिक एट द चिमी या संस्थेत भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९०४ मध्ये सोरबोन विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर व पुढील वर्षी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली.
त्यांचे सुरुवातीचे संशोधन स्फटिकांच्या चुंबकीय गुणधर्मांसंबंधी होते. चुंबकीय ग्रहणक्षमतेसंबंधी त्यांनी १८९५ मध्ये एक महत्त्वाचा नियम शोधून काढला. पुढे पी. वाइस यांनी १९०७ मध्ये त्यात सुधारणा केली व त्यामुळे या नियमास ‘क्यूरी-वाइस नियम’ असे म्हणतात. एका विशिष्ट तापमानाला पदार्थाच्या चुंबकीय गुणधर्मांत बदल होतो, असा त्यांनी शोध लावला. या विशिष्ट तापमानाला ‘क्यूरी तापमान बिंदू’ असे नाव देण्यात आलेले आहे. पॉल झाक क्यूरी या आपल्या भावाबरोबर त्यांनी स्फटिकांच्या दाबविद्युताचा (स्फटिकावर दाब दिल्यास निरनिराळ्या पृष्ठावर निर्माण होणाऱ्या विरुद्ध विद्युत् भारांचा) शोध १८८० साली लावला.
मार्या स्क्लॉडॉफस्का (मारी क्यूरी) यांच्याबरोबर १८९५ मध्ये विवाह झाल्यानंतर दोघांनी किरणोत्सर्गासंबंधी एकत्रितपणे संशोधन केले आणि रेडियम व पोलोनियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीच्या डेव्ही पदकाचा आणि बेक्रेल यांच्याबरोबर १९०३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
किरणोत्सर्गाच्या शरीरक्रियेवर होणाऱ्या परिणामासंबंधी त्यांनी इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने दोन महत्त्वाचे संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले होते. त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याच्या सहकार्याने १९०३ मध्ये रेडियम लवणांपासून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेसंबंधी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसला एक मूलभूत महत्त्वाचा निबंध सादर केला होता. त्यांनी लावलेल्या शोधांचा दुरुपयोग होण्याच्या धोक्याचाही त्यांनी नोबेल पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी उल्लेख केला होता. ते पॅरिस येथे अपघातात मृत्यू पावले.
भदे, व. ग.