खोटी साक्ष : असत्य किंवा खोटे विधान. ते लेखी किंवा तोंडीही असू शकते. खोटी साक्ष ही सामाजिक व्यवस्थेस व व्यवहारास अत्यंत हानिकारक असल्यामुळे तीस कायद्याने फौजदारी गुन्हा ठरविला आहे. सर्व काळी सर्व देशांत खोटी साक्ष हा शिक्षार्ह गुन्हा समजण्यात आला आहे. भारतातही स्मृतिकारांनी या गुन्ह्यास प्रायश्चित्त व शिक्षा सांगितलेली आहे. सुरापान करण्यास असलेली शिक्षा (उकळते गोमूत्र घेणे) खोट्या साक्षीस द्यावी, असे मनुस्मृतीत सांगितले आहे. विष्णू धर्मसूत्रात खोट्या साक्षीदाराची सर्व मालमत्ता जप्त करण्याबद्दल सांगितले आहे.

जाणूनबुजून केलेले असत्य कथन किंवा असत्याची कल्पना असून किंवा सत्य असल्याची खात्री नसून केलेले कथन साधारणतः खोट्या विधानात मोडते. असत्य कथन किंवा खोटे विधान खोट्या साक्षीच्या गुन्ह्यात मोडण्याकरिता खालील तीन अटी पूर्ण व्हावयास पाहिजेत : (१) कायद्याप्रमाणे व्यक्ती शपथेने किंवा कायद्याच्या स्पष्ट तरतुदीने सत्यकथनास वा कोणत्याही गोष्टीच्या अधिकथनास बांधलेली असली पाहिजे. (२) व्यक्तीने असत्य कथन करावयास पाहिजे. (३) कथन असत्य असल्याबद्दल व्यक्तीस माहीत असले पाहिजे किंवा तसा तिचा विश्वास असला पाहिजे वा सत्य आहे याबद्दल विश्वास नसला पाहिजे.

ज्या प्रकरणी खोटी साक्ष दिली असेल, त्या प्रकरणी भारतीय कायद्याप्रमाणे या साक्षीचे महत्त्व असलेच पाहिजे असे नाही. चौकशी चालू असलेल्या प्रकरणावर महत्त्वाचा परिणाम होणार असो वा नसो, डाव रचून किंवा संकल्पपूर्वक खोटी साक्ष देणारा या कलमाच्या तरतुदीप्रमाणे अपराधी ठरतो. पण इंग्लंडमध्ये मात्र तेथील कायद्याप्रमाणे इतर गोष्टींबरोबर संबंधित प्रश्नांसंबंघी त्या साक्षीचे महत्त्व असले पाहिजे, अशी अट आहे.

केलेल्या विधानाच्या सत्यतेवर विश्वास ठेवण्यास सयुक्तिक आणि संभवनीय कारण असल्याचे जर आरोपीने सिद्ध केले, तर त्याची या आरोपातून मुक्तता होऊ शकते.

खोडवे, अच्युत