पाटोळा: भारतातील एक मूल्यवान रेशमी साडीचा प्रकार, गुजरातमध्ये पाटोळा-निर्मितीची परंपरा असून त्याचे दक्षिण भारतातील तेलीया रुमाल, ओरिसातील छापील शाल व हैदाराबादमधील मशरू या प्रकारांशी कमीअधिक साम्य आढळून येते. रेशमाच्या रंगीत धाग्यांचे हे विणकाम अनन्यसाधारण मानले जाते.
पाटोळा हा विशेषतः गुजराती स्त्रियांचा विशेष आवडता प्रकार आहे. विवाहप्रसंगी वधूसाठी पाटोळा वापरण्याची प्रथा आहे. श्रीमंतीचे प्रतिष्ठाचिन्ह म्हणून त्याकडे पाहिले जाते. इ. स. पू. पाचव्या शतकापासून पाटोळ्याचा रंगाईचे व विणीचे तंत्र परिचित असल्याचे उल्लेख सापडतात. इ. स. अकराव्या शतकात हे तंत्र बरेच विकसित झाल्याचे दिसते. रंगवैचित्र्य सोडले, तर पाटोळ्याच्या विणीचे तंत्र मात्र पारंपरिकच राहिल्याचे दिसून येते.
पाटोळा अत्यंत कुशलतेने विणावा लागतो. प्रत्यक्ष विणायला सुरुवात करण्यापूर्वी बांधणी पद्धतीने कापडाचा ताणा व बाणा यांचे धागे वेगवेगळ्या प्रकारे रंगविण्यात येतात. प्रथम ताणा फिकट रंगात रंगवितात व मग त्यावर अपेक्षित आकृतिबंधाचा आराखडा पेन्सिलच्या साह्याने काढतात. त्यानंतर आखलेला भाग मेणाच्या धाग्यांनी गाठी बांधून अपेक्षित गडद रंग येईपर्यंत रंगवितात. बाणादेखील याच पद्धतीने रंगविण्यात येतो. त्यानंतर दोन्हीही एकत्र विणण्यात येऊन त्यावर हत्तीसारखे प्राणी, पक्षी, मानवाकृती, फुले, वनस्पती इत्यादींचे चित्रबंध उठविण्यात येतात. उत्तम प्रतीच्या पाटोळ्यात रंगसंगतीची वेधकता व आकृतिबंधातील सौंदर्यपूर्ण पण साधी रचना आढळते. त्यातील रंग सौम्यसुंदर, परंतु उत्तम प्रतीचे असतात. त्यांतून फुलपाखरी रंगांचा आभास निर्माण होतो. पाटोळ्यावरील रंगांत रंगबदलाची वेगळी जाणीव होण्याइतका भडकपणा नसतो. ते एकमेकांत मिसळून गेलेले असतात. त्यामुळे रंगांची एकरूपता, नक्षीतील खुलावट व त्या सर्वामधून दिसून येणारी सुंसंगती हीच पाटोळ्यातील खरी कलात्मकता ठरते. लाल, पिवळा, हिरवा, काळा व पांढरा हे फक्त पाचच परंपरागत रंग पाटोळ्यात वापरतात. आधुनिक काळात इतरही रंगांच्या सूक्ष्म छटा साधण्यात येतात. कधीकधी त्यासाठी अद्यावत खळ वापरण्यात येते. प्रदेशपरत्वे पाटोळ्याच्या रंगाईत व विणीत थोडाफार फरक दिसून आला असला, तरी त्याचे निर्मितितंत्र एकाच प्रकारचे असते.
खंबायत, पाटण, सुरत वा बडोदा येथे निर्माण होणाऱ्या पाटोळ्याचा आकृतिबंधात स्थानिक वैशिष्ट्ये आढळून येतात. पाटण येथील पाटोळ्यात अशा आठ प्रकारच्या शैली आढळतात. उदा., नारीकुंजर, रतनचौक, फुलवाडी, वाघकुंजर, ओंकार, पान, छब्री व चौखडी. रास ही शैली नवीन असून तिच्यात नृत्याचे चित्रबंध असतात. इतर परंपरागत शैली-प्रकारांत हत्ती-पोपटासारखे पशुपक्षी, पिंपळपानांसारख्या पर्णाकृती, टोपलीसदृश नक्षी, तर कधी खोलगट जाळीदार अशा प्रत्येक नक्षीत देठासह तीन फुले अशी विविध प्रकारची मनोवेधक कलाकुसर उठवलेली दिसून येते. पाटोळ्यावरील आकृतिबंध उलटसुलट बाजूंनी सारखाच दिसतो, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आधुनिक काळात पाटोळ्यातील रेशमी चित्रबंध टेबलक्लॉथ, चोळीचे कापड, रुमाल इत्यादींवर काढले जातात. (चित्रपत्र ४८).
जोशी, चंद्रहास