पउमचरिउ : महाकवी ⇨ स्वयंभू (आठवे शतक) ह्याने रामकथेवर रचिलेले अपभ्रंश महाकाव्य. ‘पद्मचरित’ हे त्याच्या नावाचे संस्कृत रूप. विद्याधर कांड, अयोध्या कांड, सुंदर कांड, युद्ध कांड आणि उत्तर कांड अशी ह्या महाकाव्याची एकूण पाच कांडे असून, त्यात एकूण ९० ‘संधी’ किंवा ‘सर्ग’ आहेत. प्रत्येक संधीच्या अखेरीस स्वयंभूने ‘सयंभुअवलेण’, ‘सयंभुंजंतउ’ अशा शब्दांत स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. रामकथा हा स्वयंभूच्या महाकाव्याचा विषय असला, तरी त्याने रामकथेला जैनधर्मानुकूल रूप दिलेले आहे. अग्निदिव्यानंतर सीतेने विरक्त होऊन मुनी सर्वभूषणाकडून दीक्षा घेणे, लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर रामाने जैन यती होणे इ. स्वयंभूवर्णित घटना त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. ह्या महाकाव्यावर विमलसूरीने महाराष्ट्री प्राकृतात लिहिलेल्या पउमचरियाची आणि रविघेणकृत संस्कृत पद्मपुराणाची छाप आहे. त्याला ‘अपभ्रंशातील वाल्मीकी’ म्हणावे इतकी स्वयंभूची काव्यशैली प्रासादिक आणि लालित्यपूर्ण अशी आहे. हरिवल्लभ चूनीलाल भायाणी ह्यांनी हे महाकाव्य तीन खंडांत संपादिलेले आहे (१९५३, १९५३, १९६०).
तगारे, ग. वा.