निजामुल्मुल्क : (११ ऑगस्ट १६७१–२१ मे १७४८). औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला मोगल मुत्सद्दी, युद्धकुशल सेनापती आणि हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक. याचे नाव मीर कमरूद्दीन. याला मोगल दरबारातून फतेहजंग खानदौरान, चिनकिलिचखान, निजामुल्मुल्क आसफजाह अशा पदव्या वेळोवेळी मिळत गेल्या. इतिहासात तो सामान्यपणे निजामुल्मुल्क आसफजाह या नावानेच ओळखला जातो. याचे घराणे मूळचे मध्य आशियातील होय. त्याचा आजा ख्वाजा आबिद हा शाहजहानच्या कारकीर्दीच्या शेवटी हिंदुस्थानात येऊन औरंगजेबाच्या पदरी लागला. त्याचा मुलगा शहबुद्दीन ऊर्फ गाजीउद्दीन फीरोजजंग हा तरूण वयात मध्य अशियातील बुखारा येथून निघून हिंदुस्थानात आपल्या बापाकडे आला. औरंगजेबाच्या पदरी हाही मोठ्या हुद्यावर चढला. गाजीउद्दीन फीरोजजंगाचा मुलगा निजामुल्मुल्क हा होय. औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेत निजमुल्मुल्क हा औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत लढत होता. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्या वेळी तो विजापूरच्या सुभेदारीवर होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तो उत्तरेकडे गेला. बहादुरशाहच्या कारकीर्दीत निजमुल्मुल्काला कामगिरी करून दाखविण्याची विशेष संधी मिळाली नाही पण १७१३ मध्ये सय्यद बंधूंच्या मदतीने फरुखसियर हा बादशाह बनल्यावर निजामुल्मुल्काची दक्षिणेच्या सुभेदारीवर नेमणूक झाली. दक्षिणेत निजामुल्मुल्क १७१५ पर्यंत होता, या दोन वर्षांच्या काळात मराठ्यांच्या वाढत्या शक्तीला आळा घालण्याचा त्याने प्रयत्न केला. पण १७१५ मध्ये त्याला परत दिल्लीला जावे लागले. १७१९ मध्ये दिल्लीत सत्ताबदल होऊन फरुखसियरला पदच्युत करण्यात आले. निजामुल्मुल्काला माळव्याची सुभेदारी देण्यात आली. पण सय्यद बंधूंशी बेबनाव झाल्यामुळे निजामुल्मुल्काने दक्षिणेकडे कूच करून तेथील सुभेदारी बळकावली. सय्यद बंधूंचा पाडाव झाल्यानंतर निजामुल्मुल्काला १७२२ मध्ये वजीर म्हणून नेमण्यात आले पण तो परत दक्षिणेत आला आणि आपला प्रतिस्पर्धी मुयारिजखान याचा पाडाव करून त्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. दक्षिणेच्या सुभ्यावर निजामुल्मुल्काला मराठ्यांशी आयुष्यभर झगडावे लागले.
मराठ्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी यांचे हक्क मोगल दरबारातून मिळविले होते. ते निजामुल्मुल्काला आवडले नाही. कोल्हापूरकर संभाजीचा पक्ष उचलून त्याने छत्रपती शाहू आणि पहिला बाजीराव यांची सत्ता उलथून पाडण्याचा प्रयत्न केला पण १७२७–२८ मध्ये पालखेड आणि १७३७ मध्ये भोपाळ येथे बाजीरावाने त्याचा पराजय करून त्याची सगळी कारस्थाने हाणून पाडली. माळवा आणि गुजरात हे प्रांत पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात गेलेले निजामुल्मुल्काला पहावे लागले. १७३९ च्या नादिरशाहच्या स्वारीत निजामुल्मुल्क हा दिल्लीस होता. १७४१ मध्ये त्याने आपला मुलगा नासिरजंग याचे बंड मोडून काढले. १७४३ मध्ये त्याने तमिळनाडूमधून मराठ्यांची सत्ता नाहीशी करून तेथे आपला पुन्हा जम बसविला. मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात त्याने साम्राज्य सावरण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने त्याने दक्षिणेत स्वतंत्र सत्तेची स्थापना केली. निजामाचे घराणे पुढे २२५ वर्षे हैदराबाद येथे नांदले.
पहा : मराठे निजाम संबंध हैदराबाद संस्थान.
पगडी, सेतु माधवराव
“