दूरध्वनिविद्या : दूर अंतरावरील व्यक्तीशी संपर्क साधण्याची गरज व्यवहारात अनेकदा येते. तारायंत्राच्या शोधाने ही गरज अंशतःच भागली गेली. कारण त्या पद्धतीत दोन व्यक्तींचा प्रत्यक्ष संपर्क येत नाही व संदेश पाठवणे, त्याचे उत्तर येणे, त्यावरून जरूर ते निर्णय घेणे या गोष्टींना फार विलंब होतो. दूरध्वनीच्या साहाय्याने दोन दूरच्या व्यक्ती परस्परांशी चर्चा करू शकतात आणि परस्परांचे मुद्दे–प्रतिमुद्दे ऐकून झटपट निर्णय घेऊ शकतात. या दृष्टीने पाहता अनेक क्षेत्रात दूरध्वनीचे स्थान अनन्यसाधारण आहे.
दूर अंतरावरून परस्परांशी संभाषण शक्य होईल असे साधन शोधून काढण्यासाठी (मुख्यतः अमेरिकेत) एकोणिसाव्या शतकात सी. जी. पेज (१८३७), सी. बुर्सेल (१८५४), जे. पी. राइस (१८६०) इ. कित्येक शास्त्रज्ञांचे प्रयोग सुरू होते व त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही येत होते. त्या सर्वांत आघाडी मारली ती ⇨ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या अमेरिकेत स्थायिक झालेल्या स्कॉटिश शास्त्रज्ञांनी. ७ मार्च १८७६ रोजी त्यांना दूरध्वनीचे एकस्व (पेटंट) देण्यात आले व अशा तऱ्हेने दूरध्वनितंत्राची सुरुवात झाली. जरी बेल यांना दूरध्वनीचे जनक म्हणून ओळखले जात असले, तरी या क्षेत्रात इतर कित्येक शास्त्रज्ञांनीही महत्त्वाचे शोध लावले आहेत व सुधारणा केल्या आहेत. हल्लीचे दूरध्वनितंत्र अशा अनेक शास्त्रज्ञांच्या संयुक्त परिश्रमांतूनच प्रगत झाले आहे.
दूरध्वनीचे तत्त्व : ध्वनीचे तरंग हवेतून जातात व जसजसे उद्गमापासून अंतर वाढत जाते तसतसे ते अधिकाधिक दुर्बल होत जाऊन शेवटी ऐकू येईनासे होतात. तेव्हा ध्वनितरंगांच्या स्वरूपात ध्वनीचे प्रसारण फार दूर अंतरापर्यंत करणे अशक्य आहे. म्हणून यासाठी काहीतरी वेगळा उपाय शोधावा लागतो. दूरध्वनीच्या कार्याचे तत्त्व थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल (आ.१). संदेश देणाऱ्याच्या भाषणाचे ध्वनितरंग प्रथम ‘प्रेषक’ या साधनावर पडतात व प्रेषक त्यांचे तशाच स्वरूपाच्या विद्युत् तरंगांत रूपांतर करतो. मग वाहक तारांमधून हे विद्युत् तरंग दुसऱ्या बाजूला ‘ग्राही’ या साधनापर्यंत जाऊन पोहोचतात. मग ग्राही त्यांचे पुन्हा ध्वनितरंगांत रूपांतर करतो व अशा तऱ्हेचे संदेश घेणाराला ते भाषण ऐकू येते.
प्रेषकाची रचना व कार्य : सध्या जास्त प्रमाणात वापरात असलेल्या प्रेषकाचा शोध १८७८ मध्ये हेन्री हर्निग्ज यांनी लावला. पुढे त्यात अनेक सुधारणा करणात आल्या. कार्बनाच्या बारीक कणिकांच्या समुच्चयावरील दाब वाढविल्यास त्यांचा विद्युत् रोध कमी होताे व दाब कमी केल्यास त्यांचा विद्युत् रोध वाढतो (म्हणजेच त्यांचा विद्युत् रोध परिवर्ती असतो), या तत्त्वाचा उपयोग या प्रेषकात केलेला असतो. यात (१) ही एक लवचिक चकती (आ. २) असून तिच्यावर ध्वनितरंग पडले की, तज्जन्य हवेच्या दाबातील चढउतारांमुळे ती मागेपुढे अशी आंदोलित होऊ लागते. तिच्चाबरोबर तिला जोडलेला दट्ट्या (२) व विद्युत् प्रस्थ (पट्टीच्या स्वरूपाचे विद्युत् अग्र) (३) हेही मागेपुढे होऊ लागतात.(३) हे चल आणि (४) हे स्थिर विद्युत् प्रस्थ आहे. या दोहोंच्या मध्ये खास प्रक्रिया केलेल्या कार्बनाच्या कणिका (५) भरलेल्या असतात. (३) या प्रस्थाच्या आंदोलनांमुळे या कणिकांवरील दाब कमीजास्त होत राहतो व तद्नुसार विद्युत् मंडलातील विद्युत् प्रवाहही कमीजास्त होतो. (८) व (९) ही वेटोळी परस्परांस चुंबकीय रीत्या संलग्न असून (९) मधील वेढे (८) पेक्षा जास्त असतात. विद्युत् चुंबकीय प्रवर्तनामुळे (चुंबकीय स्राेतात बदल झाल्याने निर्माण झालेल्या विद्युत् चालक प्रेरणामुळे (८) या प्राथमिक वेटोळ्यातील विद्युत् प्रवाहात जसे फेरफार होतात त्यानुसार परंतु जास्त विद्युत् वर्चसाच्या (पातळीच्या) प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाचे प्रवर्तन (९) या द्वितीयक वेटोळ्यात होते. अशा तऱ्हेने ध्वनितरंगांचे विद्युत् तरंगात रूपांतर होऊन त्यांचे वाहक तारांतून (८) प्रसारण होते. थोड्याफार फरकाने याच प्रकारचे प्रेषक सर्वत्र वापरण्यात येतात.
ग्राहीची रचना व कार्य : आरंभीच्या काळात प्रेषक व ग्राही म्हणून एकच उपकरण वापरीत असत परंतु ते फारच गैरसोयीचे होऊ लागल्याने (प्रत्येक दूरध्वनी उपकरणात) वेगळा प्रेषक व वेगळा ग्राही वापरण्याची पद्धत रूढ झाली. हल्ली वापरात असलेल्या प्रकारचा ग्राही प्रथम १८९० मध्ये प्रचारात आला आणि पुढे वेळोवेळी त्यात अनेक सुधारणा होत गेल्या. सोयीसाठी हल्ली ग्राही व प्रेषक एकाच भुजेत बसविलेले असतात. या भुजेला हातसंच (हँड सेट) असे म्हणतात. हातसंचाची कल्पना प्रथम १८७९ मध्ये पुढे आली. १९३० मध्ये त्यात कित्येक सुधारणा होऊन त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. आ. ३ मध्ये दूरध्वनीच्या स्वरूपात झालेले विविध बदल दाखविले आहेत. आ. ४ मध्ये एका साध्या ग्राहीची रचना दाखविली आहे. (१) हा एक स्थायी सामर्थ्यवान लोहचुंबक असून त्याच्याभोवती तारेची दोन वेटोळी (२ व ३) आकृतीत
दर्शविल्याप्रमाणे गुंडाळलेली आहेत. या वेटोळ्यांची टोके (आदान अग्रे, ४ व ५) वाहक तारांना जोडलेली असतात. ‘प्रेषका’ मुळे निर्माण होणारा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह या वेटोळ्यांतून जातो व त्यानुसार चुंबकाचे सामर्थ्य कमीअधिक होत रहाते. चुंबकासमोर एक मिश्रलोहाची चकती (६) बसविली आहे. चुंबकाच्या सामर्थ्यामधील फेरफारानुसार ही चकती मागेपुढे आंदोलित होते व त्यामुळे तिच्या समोरच्या हवेत ध्वनितरंग निर्माण होतात व संदेश घेणाराला मूळचे भाषण ऐकू येते. अत्याधुनिक ग्राहीत चकती प्लॅस्टिकची असून तिच्या कडेला कंकणाकार लोखंडाची पातळ चकती चिकटविलेली असते. यामुळे एकूण चकती खूप हलकी होऊन आवाज जास्त मोठा ऐकू येते.
ध्वनितरंगांच्या कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) २० ते २०,००० हर्ट्झ या दरम्यान असतात परंतु या सर्व कंप्रतांचे प्रसारण करावयाचे म्हटले, तर दूरध्वनीची एकूण रचना फार खर्चाची व गुंतागुंतीची होईल. प्रयोगान्ती असे दिसून आले की, संभाषण स्पष्टपणे समजणे व बोलणाराचा आवाज साधारणपणे ओळखता येणे या गोष्टींसाठी फक्त ३०० ते ३,४०० हर्ट्झ या दरम्यानच्या कंप्रतांचे प्रसारण पुरेसे होते. म्हणून प्रेषक आणि ग्राही यांच्या रचनांतच अशी योजना करतात की, फक्त ३०० ते ३,४०० हर्ट्झ दरम्यानच्याच कंप्रतांचे आदान–प्रदान व्हावे. संदेश देणाऱ्याला त्याचा ग्राहीतून स्वतःचेच बोलणे ऐकू येणे इष्ट नसते. यासाठी काही खास विद्युत् मंडलांची योजना केलेली असते.
दूरध्वनीचे मूळभूत मंडल : फक्त दोन दूरध्वनींवरून ते धारण करणाऱ्यांचे संभाषण शक्य होण्यासाठी जरूर असणाऱ्या विद्युत् मंडलाला दूरध्वनीचे मूलभूत मंडल (आ. ५) असे म्हणतात. या मंडलाची पुढील वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत : (अ) येथे दोन्ही दूरध्वनीधारकांसाठी स्वतंत्र विद्युत् घट असून प्रत्येक धारकाचा प्रेषक, विद्युत् घट व प्राथमिक वेटोळे यांच्या जुळण्या एकसरी (एकापुढे एक जोडण्याच्या) पद्धतीने केल्या आहेत. (आ) दोन्ही धारकांचे ग्राही व द्वितीयक वेटोळी यांची वाहक तारांमधून एकसरी जुळणी केली आहे. प्रारंभी खुलासा केल्याप्रमाणे या दोन्ही धारकांना परस्परांशी संभाषण करता येईल, हे उघड आहे. (इ) प्रत्येक प्राथमिक वेटोळ्यातून त्या त्या धारकाच्या बोलण्यामुळे उत्पन्न होणारा परिवर्ती एकदिश विद्युत् प्रवाह जाईल. (ई) दोन्ही द्वितीयक वेटोळी, ग्राही व वाहक तारा यांमधून फक्त भाषणजन्य प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह जाईल.
वाहक तारांतून संदेशवहन : प्रारंभीच्या काळात तारयंत्राप्रमाणे एकच वाहक तार वापरून व दुसऱ्या वाहक तारेऐवजी जमीन वापरून दूरध्वनीचे विद्युत् मंडल पुरे करीत. त्यामुळे एकाच वेळी जाणाऱ्या–येणाऱ्या संदेशांची परस्परांमध्ये मिसळामिसळ होई व तारायंत्राच्या संदेशांपासून सुद्धा उपद्रव होई. दोन तारा वापरल्यास हा त्रास खूपच कमी होतो. १९ जुलै १८८१ रोजी या कल्पनेचे बेल यांनी एकस्व घेतले व हीच पद्धत हल्ली वापरली जाते.
प्रेषकापासून अंतर वाढत जाते, तसतसे तारांच्या विद्युत रोधामुळे संदेश अधिकाधिक क्षीण होत जातात. परस्परांजवळून जाणाऱ्या दोन तारांमध्ये विद्युत धारकता प्रस्थापित होते. परिणामी संदेशांचे आणखी क्षीणन होते. तांब्यासारख्या उत्तम संवाहकाच्या तारा वापरून रोधामुळे होणारे क्षीणन कमी करता येते. धारकतेमुळे उत्पन्न होणारे क्षीणन कमी करण्यासाठी तारांच्यामध्ये प्रत्येक सु. १,००० ते २,००० मी. अंतरावर प्रर्वतक वेटोळी जोडून तारांची विद्युत प्रवर्तकता वाढविण्यात येते. ही वेटोळी उच्च पार्यतेच्या (चुंबकीय स्राेत घनता व ती निर्माण करणारी चुंबकीकरण प्रेरणा हे गुणोत्तर उच्च असलेल्या) कड्यांवर गुंडाळलेली असतात. आ. ६ मध्ये या वेटोळ्यांची जोडणी दाखविली आहे. वाहक तारा व जोडलेली प्रवर्तक वेटोळी यांचे संलग्न कार्य निग्न पारक विद्युत छानकासारखे [→ छानक, विद्युत्] होते. या योजनेला एक विशिष्ट मज्जाव कंप्रता असते. या कंप्रतेपेक्षा कमी कंप्रतेच्या संदेशाकरिता क्षीणनाचे प्रमाण कमी होते. या कल्पनेचे एम्. आय्. प्यूपिन यांनी १९०० मध्ये एकस्व घेतले. हे सर्व उपाय वापरूनही प्रेषकात निर्माण होणारे विद्युत् संदेश इतर मदत न घेता १५ ते २५ किमी. अंतरापर्यंतच समाधानकारकपणे जाऊ–येऊ शकतात. त्याहून जास्त अंतर असल्यास वाहक तारांवर ठराविक अंतरावर विवर्धक बसवून संदेश पुनःपुन्हा सामर्थ्यवान करण्यात येतात. प्रारंभी हे विवर्धक यांत्रिक पद्धतीचे होते. त्यानंतर इलेक्ट्रॉन नलिकांवर (व्हाल्व्हवर) व आता ट्रँझिस्टरवर आधारलेले विवर्धक वापरण्यात येतात. या विवर्धकांना दूरध्वनीच्या परिभाषेत ‘पुनरुच्चारक’ (रिपिटर्स) असे म्हणतात.
घंटा : दूरध्वनीवरून आपणाशी कोणीतरी संपर्क साधू पहात आहे, हे दूरध्वनिधारकाला समजण्यासाठी काहीतरी व्यवस्था करणे जरूर असते. अगदी आरंभीच्या काळात संदेश देऊ इच्छिणारी व्यक्ती (संदेशवांच्छक) आपल्या प्रेषकाच्या तबकडीला पेन्सिलीने ठोकून मोठा आवाज करी व वांच्छित व्यक्तीचे लक्ष वेधून घेई. पुढे हीच गोष्ट पेन्सिलीऐवजी एका खास साधनाने करण्यात येऊ लागली परंतु या कामासाठी जास्त कार्यक्षम अशी घंटा वाजविण्याची पद्धत टी. ए. वॉटसन यांनी शोधून काढली. जुन्या पद्धतीच्या दूरध्वनीबरोबर एक छोटे विद्युत् जनित्र (चिरचुंबकी जनित्र, मॅग्नेटो) असे. त्याची दांडी वांच्छिकाने फिरविली म्हणजे तज्जन्य विद्युत् प्रवाहाने वांच्छिताच्या दूरध्वनीची घंटा वाजविणारा विद्युत प्रवाह व संदेश देणारा विद्युत् प्रवाह जाण्यासाठी वाहक तारांची एकच जोडी वापरली जाई व जरुरीनुसार दोन स्विच वापरून दूरध्वनी वापरणाऱ्याला घंटेचे किंवा संदेशाचा विद्युत् मंडल कार्यवाहीत आणता येई. परंतु कित्येकदा अनवधानाने योग्य तो स्विच योग्य त्या स्थितीत ठेवला जात नसे व त्यामुळे घोटाळे होत. ते टाळण्यासाठी हे स्विच आपोआप योग्य त्या स्थितीत यावेत अशी योजना करण्यात आली. प्रचलित उपकरणात जेव्हा हातसंच दूरध्वनीच्या पेटीवरील खास आकड्यावर ठेवला जातो, तेव्हा त्याच्या वजनानेच घंटेचे मंडल पूर्ण करणारा स्विच दाबला जातो व हातसंच उचलल्याबरोबर घंटेचा स्विच उघडला जाऊन संदेशाचा स्विच बंद होऊन ते मंडल पूर्ण होते. ही कल्पना प्रथम एच्. एल्. रूझवेल्ट यांनी कार्यवाहीत आणली. प्रचलित यंत्रणेत घंटेसाठी जरूर तो (प्रत्यावर्ती) विद्युत् प्रवाह मध्यवर्ती केंद्रातून पुरवला जातो. त्याचप्रमाणे जरुरीप्रमाणे घंटेचा आवाज लहानमोठा करता यावा अशीही सोय केलेली असते.
शक्ती पुरवठा : प्रेषकाचे कार्य चालण्यासाठी (एकदिश) विद्युत् प्रवाहाचा पुरवठा जरूर असतो. यासाठी पूर्वीच्या काळी प्रत्येक दूरध्वनिधारकाकडे विद्युत घट ठेवीत परंतु हे खर्चाचे होऊ लागले आणि त्याचप्रमाणे या घटांची देखभाल करून ते सुस्थितीत ठेवणे हेही त्रासदायक होऊ लागले. यासाठी हा विद्युत् पुरवठा हल्ली मध्यवर्ती केंद्रातूनच (सामान्यतः ५० व्होल्ट वर्चोभेद देणाऱ्या विद्युत् घटांद्वारे) करण्यात येतो. दूरध्वनिधारकाने आपला हातसंच उचलल्याबरोबर हा पुरवठा सुरू होतो व हातसंच जागेवर ठेवल्याबरोबर पुरवठा बंद होतो. या पद्धतीत एकाच वेळी चालू असलेले वेगवेगळ्या दूरध्वनींवरील संदेश मध्यवर्ती विद्युत् पुरवठा केंद्रात एकत्र येऊन त्यांची मिसळामिसळ होण्याचा धोका उत्पन्न होतो. तो टाळण्यासाठी प्रवर्तक व धारित्रांच्या (विद्युत् भार साठवून ठेवणाऱ्या प्रयुक्तींच्या) खास जुळण्या वापराव्या लागतात. मध्यवर्ती विद्युत् पुरवठा पद्धती प्रथम ओकॉनेल यांनी सुरू केली.
दूरध्वनी विनिमय केंद्राची आवश्यकता : आतापर्यंत आपण दोन दूरध्वनिधारकांमध्ये संदेशांची देवाणघेवाण कशी होते, ते पाहिले. (यापुढील वर्णनात दूरध्वनिधारक याऐवजी धारक हा शब्द वापरला आहे). समजा, एकूण ५ धारक आहेत व त्यांपैकी कोणत्याही २ धारकांना परस्परांशी संपर्क साधणे शक्य करावयाचे आहे. मग प्रत्येक धारकाला ४ प्रेषक व ग्राहक पुरवावे लागतील. त्यांना जोडण्यासाठी १० वाहक तारांच्या जोड्या लागतील. यासाठी खूप खर्च तर येईलच पण त्याशिवाय एकूण यंत्रणा खूप गुंतागुंतीची होईल. जसजशी धारकांची संख्या वाढत जाईल तसतसा हा खर्च व ही गुंतागुंतही वाढेल. हे टाळण्यासाठी एका मध्यवर्ती केंद्रातच सर्व दूरध्वनींची जरूर त्याप्रमाणे जोडणी करणे आवश्यक ठरते. धारकांची संख्या मर्यादित असेल, तर ही जोडणी केंद्रातील प्रचालक (ऑपरेटर) हातांनी करतात. अशा केंद्राला हातजोडणी (विनिमय) केंद्र असे म्हणतात परंतु धारकांची संख्या जास्त (सु. १,००० किंवा अधिक) असल्यास हातजोडणी पद्धत खर्चाची व विलंब करणारी होते. मग स्वयंचलित पद्धतीने जोडणी करणारे केंद्र उभारावे लागते. मध्यवर्ती नियंत्रणाची जरुरी नसलेल्या व मोठे कार्यालय, कारखाना, आगगाडी अथवा विमान यांत मर्यादित स्वरूपात संदेशवहन (संभाषण) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीचे वर्णन ‘आंतरसंदेशवहन पद्धति’ या स्वतंत्र नोंदीत दिलेले आहे.
प्रत्येक धारकाला एक वाहक तारांची जोडी दिलेली असते. या जोडीला धारकाचे मंडल असे म्हणतात. सर्व धारकांची मंडले विनिमय केंद्रात आणून पूर्ण केलेली असतात. दोन दूरध्वनींवरून संभाषण होण्यासाठी दोन्ही बाजूंची दूरध्वनी उपकरणे, त्या धारकांची मंडले, विनिमय केंद्र व वाहक तारा हे सर्व घटक कार्यवाहीत यावे लागतात. या घटकांचा खाली विचार केलेला आहे.
दूरध्वनी उपकरण : प्रेषक व ग्राही एकत्र बसविलेला हातसंच व तो नेहमी जिच्यावर ठेवतात ती पेटी हे दूरध्वनी उपकरणाचे दोन घटक होत. हातसंचाची रचना वर आलीच आहे.
पेटीमध्ये एक घंटा आणि घंटेच्या मंडलासाठी एक व संदेशवहनाच्या मंडलासाठी एक असे दोन स्विच असतात व त्यांची कार्यवाही हातसंचाच्या वजनामुळे आपोआप होते. येथपर्यंतची यंत्रणा हातजोडणी विनिमय किंवा स्वयंचलित विनिमय अशा दोन्ही प्रकारच्या केंद्रांखाली येणाऱ्या दूरध्वनी उपकरणांत सारखीच असते.
हातजोडणी केंद्रातील कार्य : अशा केंद्राला जोडलेल्या दूरध्वनी उपकरणांसाठी प्रत्येक एक सूचना देणारा दिवा व एक अभिचालित्र (अगदी अल्प शक्तीचा उपयोग करुन मोठ्या शक्तीच्या विद्युत् मंडलात जरूर तो बदल घडवून आणणारे साधन) असतात. प्रत्येक दूरध्वनीशी संलग्न धारकाचे मंडल प्रत्येकी एका खोबणीला (जॅकला) आणून जोडलेले असून या सर्व खोबणी एक फलकावर ओळीने बसविलेल्या असतात.
विशिष्ट धारकाने (त्याला आपण अ म्हणू) आपला हातसंच उचलल्याबरोबर मध्यवर्ती विद्युत् पुरवठ्यातून विद्युत् प्रवाह चालू होऊन अभिचालित्रामार्फत अ चा सूचना–दिवा पेटतो. त्यावरुन प्रचालकाला हे समजते की, अ ला संदेश द्यावयाचा आहे. मग प्रचालक एका तीन पदरी तारेची एक त्रिअग्री खुंटी अ च्या खोबणीमध्ये घालून व एक स्विच चालवून त्याच्यासी संपर्क साधतो. खुंटी घातल्यामुळे सूचक–दिवा विझतो. मग अ प्रचालकाला त्याला हवा असलेल्या दूरध्वनीचा क्रमांक (आ चा) सांगतो. मग वरील तिपदरी तारेची दुसरी खुंटी आ च्या खोबणीत घालून प्रचालक अ आणि आ यांच्या मंडलांची परस्परजोडणी करतो व घंटा–स्विच दाबतो. त्यामुळे आ च्या दूरध्वनीची घंटा वाजू लागते व त्याने आपला हातसंच उचलला की, प्रचालक घंटा–स्विच बंद करतो व यानंतर अ आणि आ यांमध्ये संभाषण सुरू होते. संभाषण संपवून दोघांनी आपले हातसंच जागच्याजागी ठेवले की, तिपदरी तारेशी संलग्न असे दोन सूचक–दिवे लागतात. त्यावरून प्रचालकास संभाषण संपल्याचे समजते व तो दोघांमधील जोडणी काढून टाकतो.
तबकडी उपकरणाची रचना : स्वयंचलित केंद्राशी संलग्न असणाऱ्या उपकरणाचे आतील भाग आणि त्यातील तबकडी उपकरणाची कार्यपद्धती आ. ७ मध्ये दाखविली आहे. या उपकरणात एक गोल तबकडी (१) असून तिच्यावर सारख्या अंतरावर, बोट आत जाऊ शकेल इतपत मोठी अशी १० भोके असतात. या भोकांमधून अनुक्रमे १ ते ९ व शून्य हे आकडे दिसू शकतात. तबकडीच्या कडेवर सारख्या अंतरावर १० चौकोनी दाते (४) असतात. इष्ट क्रमांकाच्या भोकात बोट घालून ही तबकडी सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) फिरवून बोट (५) या थांब्याला लागले की, तबकडी सोडावयाची असते. मग (तिच्याखाली असलेल्या) स्प्रिंग व वेगनियंत्रक यांच्यामुळे तबकडी आपोआप ठराविक वेगाने फिरुन पूर्वस्थानी येऊ द्यावयाची असते (ही गती बोटाने ढकलून वाढविण्याचा प्रयत्न करु नये). (३) ही तरफ अशी बसविलेली आहे की, तबकडी उलट फिरतेवेळी तिच्यावरील प्रत्येक दाता जेव्हा (३) वरुन पलिकडे जातो तेव्हा ही तरफ वर उचलली जाऊन त्यावेळेपुरता (२) हा स्विच उघडतो व वाहक तारांतून केंद्राकडे जाणाऱ्या विद्युत् प्रवाहात खंड पडतो परंतु आपण जेव्हा सव्य दिशेने तबकडी फिरवतो तेव्हा ही स्विचाची उघडझाप होत नाही, हे लक्षात घ्यावे. तबकडीवरचा (४) हा आकडा फिरविल्यास वाहक तारांतून केंद्राकडे जाणाऱ्या प्रवाहाचा आलेख आ. ८ मध्ये डावीकडील ‘कख’ विभागात दाखविला आहे. त्या प्रवाहात चार वेळा खंड (अ) पडलेले दिसतील. याप्रमाणे तबकडीवरचा जो आकडा फिरवावा तितके खंड असलेला विद्युत् प्रवाह केंद्राकडे जातो (० आकडा फिरविल्यास १० खंड पडतील) व तद्नुसार केंद्रातील स्वयंतलित स्विच यंत्रणा ठराविक टप्प्यांमधून सरकते व योग्य त्या क्रमांकाशी जोडणी होऊ शकते.
तबकडी फिरविण्याऐवजी प्रत्येक आकड्याकरिता एक याप्रमाणे ढकल बटणे (पुश बटन्स) असलेला इलेक्ट्रॉनीय मंडले असलेला दूरध्वनी तयार करण्यात आलेला आहे. तथापि हे उपकरण बरेच गुंतागुंतीचे असल्यामुळे अद्याप विशेष प्रचारात आलेले नाही.
स्वयंचलित स्विचाचे कार्य : आ. ९ मध्ये स्वयंचलित केंद्रातील स्विच कसे कार्य करतो त्याचे तत्त्व सोप्या पद्धतीने दाखविले आहे. मात्र प्रत्यक्ष वापरला जाणारा स्विच यापेक्षा खूपच वेगळा असतो, हे लक्षात ठेवावे. या स्विचाचा मुख्य भाग (अ) हे दातेरी चक्र आणि त्याला जोडलेला (आ) हा फिरता जोडक (जोडणारे साधन) होय, (प) व १ ते ९ व ० हे स्थिर स्पर्शक वर्तुळाकार बसविलेले असून, (अ) हे एक दाता फिरल्यास (आ) १ शी, (अ) २ दाते फिरल्यास (आ) २ शी,… (अ) १० दाते फिरल्यास (आ) ० शी, विद्युत् मंडल प्रस्थापित करतो. प्रत्यक्षात (आ) सारखे ३ भुज असतात. त्याचप्रमाणे स्थिर स्पर्शकाचेही ३ संच असून प्रत्येकाशी एकेक फिरता स्पर्शक विद्युत् मंडल प्रस्थापित करू शकतो. यांपैकी दोन भुज वांच्छकाच्या धारक मंडलाच्या दोन तारा दोन स्थिर स्पर्शकांना तोडतात. तिसरा भुज (व त्याच्याशी संलग्न होणारे मंडल) तो स्विच गुंतलेला आहे की नाही ते दर्शविण्यासाठी असतो. (ई) हे ओढ–कुत्रे एकदा डावीकडे ओढल्यास (अ) एक दाता (अपसव्य दिशेने) फिरते (व जोडक १ शी जोडला जातो). याप्रमाणे (अ) जितके दाते फिरेल तितक्या क्रमांकाच्या स्थिर स्पर्शकाला (आ) जोडला जातो. (इ) हे थांब–कुत्रे (अ) ला परत फिरण्याला प्रतिबंध करते परंतु (ऊ) हा मोचन विद्युत् चुंबक (त्याच्या वरील वेटोळ्यातून विद्युत् प्रवाह जाऊ देऊन) चुंबकित केल्यास तो (ऐ) या तरफेला व त्यामुळे (ई) ला खाली खेचतो. मग (अ) उलट (सव्य दिशेने) फिरते व (आ) हा (प) वर आल्यानंतर थांबतो. ही क्रिया एका स्प्रिंगेमुळे होते (आकृतीत ही स्प्रिंग दाखविलेली नाही). धारकाने संभाषण संपवून आपला हातसंच पेटीवर ठेवला की, वरील क्रिया व्हावी अशी व्यवस्था केलेली असते.
आ. ८ मध्ये दाखविलेला धारकाच्या तबकडी उपकरणामुळे निर्माण होणारा खंडित विद्युत् प्रवाह (एका अभिचालित्रातून) (ड) या गतिदायक विद्युत् चुंबकाच्या वेटोळ्यातून जाऊ दिला जातो. प्रत्येक वेळी जेव्हा खंडित विद्युत् प्रवाह पुन्हा चालू होतो, तेव्हा (उ) चुंबकित होऊन (ए) ला व त्याबरोबर (ई) ला डावीकडे खेचतो व (अ) एक दाता डावीकडे फिरतो. त्यामुळे (आ) एक टप्पा वर फिरतो. परंतु (उ) भोवतीचा विद्युत प्रवाह खंडित झाला, तरी (अ) परत उलट्या दिशेने फिरु शकत नाही [कारण (इ) त्याला प्रतिबंध करते]. अशा तऱ्हेने तबकडीवरील ४ हा आकडा फिरविला असेल, तर त्यामुळे (अ) हा ४ दाते फिरेल व (आ) ४ स्पर्शकावर येऊन थांबेल.
स्वयंचलित जोडणी : दोन अंकी क्रमांकाच्या दूरध्वनींची स्वयंचलित जोडणी कशी होऊ शकते त्याची कल्पना आ. १० वरून येईल.
(अ) हा बोलावा (कॉल) करणाऱ्याचा दूरध्वनी (प) या प्रथमक्रमी विवेचक स्विचाच्या जोडकाला जोडलेला आहे. त्याच्या साहाय्याने वांच्छित क्रमांकातील पहिल्या अंकाची (येथे दशम् स्थानच्या अंकाची) निवड केली जाते. (स१ ते स५) हे द्वितीयक्रमी विवेचक स्विच असून त्यांच्या साहाय्याने वांच्छित क्रमांकातील दुसऱ्या (येथे एकम् स्थानच्या) आकड्याची निवड होते. (प) चे १ ते ९ व ० या क्रमांकांचे स्पर्शक अनुक्रमे (स१– स२ … स९) वगैरे त्या त्या क्रमांकाच्या द्वितीयक्रमी विवेचकांच्या जोडकांना जोडलेले आहेत. (स१) च्या १, २, ३ वगैरे क्रमांकांच्या स्पर्शकांना अनुक्रमे ११, १२, १३ वगैरे क्रमांकांचे दूरध्वनी जोडलेले आहेत, त्याचप्रमाणे (स२) च्या स्पर्शकांना अनुक्रमे २१, २२, २३ वगैरे, (स३) च्या स्पर्शकांना अनुक्रमे ३१, ३२, ३३ वगैरे, (स४) च्या स्पर्शकांना ४१, ४२, ४३ वगैरे याप्रमाणे क्रमांकांचे दूरध्वनी जोडलेले आहेत. अशा प्रकारे सर्व विवेचक स्विचांना प्रत्येकी १० स्पर्शक (आ. ९ प्रमाणे ) असतात. आकृती सोपी करण्यासाठी येथे प्रत्येकी ५ स्पर्शक दाखविले आहेत.
४२ क्रमांकाच्या दूरध्वनीशी संपर्क साधण्यासाठी बोलावा करणारा धारक प्रथम (अ) च्या तबकडीवरील ४ हा आकडा फिरवील, त्यामुळे (प) चा जोडक (प) च्या चौथ्या स्पर्शकावर (आकृती पहा) जाऊन स्थिर होईल. त्यामुळे (अ) हा दूरध्वनी (प) चा जोडक ते त्याचा चौथा स्पर्शक यांच्यामधून (स४) च्या जोडकाशी जोडला जाईल, मग (अ) च्या तबडकीचा २ हा आकडा फिरविला गेला की, (स४) चा जोडक (स४) च्या दुसऱ्या स्पर्शकापर्यंत फिरून तेथे स्थिर होईल. अशा तऱ्हेने (अ) हा ४२ क्रमांकाच्या दूरध्वनीला जोडला जाईल. संभाषण संपवून दोन्ही बाजूंचे हातसंच पेट्यांवर ठेवले की, (प) व (स४) यांचे जोडक आपोआप आपल्या मूळ स्थितीत परत येतील. तीन अंकी दूरध्वनी क्रमांकासाठी तृतीयक्रमी विवेचकांची व चार अंकी क्रमांकासाठी चतुर्थक्रमी विवेचकांची जोड वरील रचनेला द्यावी लागेल, हे सहज लक्षात येईल.
दोन गतींचा व स्ट्रोजर स्विच : वर वर्णन केलेल्या स्विचाला फक्त दहाच स्पर्शक असतात. १८८९ मध्ये ए. बी. स्ट्रोजर यांनी एक स्वयंचलित पद्धती शोधून काढली. या पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या स्विचामध्ये १०० स्पर्शक असून त्यांची संख्या २०० पर्यंत वाढविता येते. यामुळे स्विचांच्या संख्येत बचत होऊन जागाही कमी लागते. आ. ११ मध्ये स्ट्रोजर स्विचाची रचना दाखविली आहे.
या स्विचात १० उभे मजले किंवा टप्पे असतात. प्रत्येक मजल्यावर १० स्पर्शक वर्तुळाकार रचनेत आडवे बसविलेले असतात. (५) ही उभी दातेरी पट्टी असून तिच्याशी संलग्न ओढ–कुत्रे व गतिदायक विद्युत् चुंबक असतात (हे आकृतीत दाखविले नाहीत). धारकाने तबकडी फिरविली की, त्या अंकानुसार संबंधित स्ट्रोजर स्विचाचा दांडा तितके मजले वर चढविला जातो. प्रत्येक मजल्यावर १० स्पर्शक असल्याने एकूण १०० स्पर्शक उपलब्ध होतात. विशिष्ट मजल्यावर स्विचाचा दांडा वर्तुळाकार फिरवून त्या मजल्यावरील कोणत्याही स्पर्शकाशी जोडक संलग्न करता येतो. दांडा फिरविण्याचे काम (६) हा दंतुर दंडगोल व त्याच्याशी संबद्ध असे वेगळे ओढ–कुत्रे व विद्युत् चुंबक करतात.
टप्प्याटप्प्यांनी होणारी स्वयंचलित जोडणी : स्ट्रोजर स्विच वापरून १०,००० पर्यंत दूरध्वनींना सेवा देणाऱ्या केंद्रात स्वयंचलित जोडणी कशी होते याचे वर्णन खाली दिले आहे. अशा केंद्रात प्रथमारंभी प्रत्येक धारकाच्या मंडलाशी संलग्न असा प्रत्येकी एक ‘एकविवेचक’ स्विच (आ. १२) असतो. या स्विचात वर्तुळात फिरू शकणारा एक जोडक व वर्तुळाकार बसविलेले २० स्थिर स्पर्शक असतात. जोडक ज्या त्या धारकाच्या मंडलाशी संलग्न केलेले असून प्रत्येक स्थिर स्पर्शक एक एका प्रथमक्रमी (किंवा सहस्रांकी) स्ट्रोजर स्विचाच्या जोडकाला जोडलेला असतो. यांपैकी प्रत्येक स्ट्रोजर स्विचाचे स्थिर स्पर्शक द्वितीयक्रमी (किंवा शतांकी) स्ट्रोजरांच्या जोडकांना जोडलेले असतात. त्याचप्रमाणे द्वितीयक्रमी स्ट्रोजरांचे स्पर्शक तृतीयक्रमी स्ट्रोजरांच्या जोडकांना जोडलेले असून या तृतीयक्रमी स्ट्रोजरांचे स्पर्शक वेगवेगळ्या दूरध्वनींना जोडलेले असतात.
दूरध्वनी उभारणीच्या खर्चाचा विचार करता गर्दीच्या वेळात कोणत्याही धारकाला मर्यादित प्रमाणातच संपर्क साधता येतील अशी व्यवस्था करणे भाग असते. त्यामुळे वरील रचनेतील स्ट्रोजर कित्येक धारकांमध्ये समाईक दिलेले असतात.
विशिष्ट स्ट्रोजरमधून एखाद्या धारकाचे संभाषण चालू असेल, तर तो स्ट्रोजर ते संभाषण चालू असेतोपर्यंत इतर कोणालाही उपलब्ध होऊ शकणार नाही. वरील रचनेतील एकविवेचकाचे कार्य असे आहे : धारकाने आपला हातसंच उचलला की, तत्संलग्न एकविवेचकाचा जोडक (एका विद्युत् चलित्राच्या–मोटरीच्या–साहाय्याने) आपोआप फिरु लागतो आणि त्याला एखादा न गुंतलेला प्रथमक्रमी स्ट्रोजर सापडला की, त्याच्याशी संलग्न असलेल्या स्पर्शकावर जाऊन तो थांबतो. त्याबरोबर वांच्छकाला अनुमति–नाद ऐकू येतो आणि तो दूरध्वनीची तबकडी फिरवू लागतो.
प्रथमक्रमी विवेचकाकडून सहस्र स्थानाचा किंवा डावीकडून पहिला अंक, द्वितीयक्रमी विवेचकाकडून शतम् स्थानाचा किंवा डावीकडून दुसरा अंक व तृतीयक्रमी विवेचकांकडून शेवटचे दोन म्हणजे दशम् व एकम् स्थानाचे अंक निवडले जातात. अशा तऱ्हेने वांच्छित क्रमांकाशी संपर्क प्रस्थापित होतो. समजा, वांच्छित क्रमांक ३२४५ आहे. वांच्छकाने ३ हा आकडा फिरविला की, प्रथमक्रमी स्ट्रोजर तीन मजले (टप्पे) वर चढून आपोआप फिरू लागतो व त्या मजल्यावरील न गुंतलेल्या स्पर्शकावर येऊन स्थिर होतो. नंतर २ हा अंक फिरविला की, द्वितीयक्रमी स्ट्रोजर दोन मजले वर चढून तेथील न गुंतलेल्या स्पर्शकावर येऊन थांबतो. शेवटचे ४५ हे दोन्ही अंक फिरविल्यानंतरच तृतीयक्रमी स्ट्रोजर ४ मजले वर जातो व फिरून चौथ्या मजल्यावरील पाचव्या स्पर्शकावर जाऊन थांबतो व अशा तऱ्हेने ३२४५ शी संपर्क प्रस्थापित होतो.
वरील आकृतीत स्ट्रोजर स्विच सांकेतिक पद्धतीने दाखविले आहेत. त्याचप्रमाणे आकृती स्पष्ट होण्यासाठी प्रत्येकी फक्त ५ मजले व प्रत्येक मजल्यावर फक्त ५ स्पर्शक (० या खुणेने) दाखविले आहेत.
पुण्या–मुंबईसारख्या मोठ्या शहरांत दूरध्वनींची संख्या १०,००० पेक्षा जास्त असते. अशा वेळी त्याच शहरातील वेगवेगळ्या भागांत उपकेंद्रे स्थापन करुन प्रत्येक उपकेंद्राशी सु. १०,००० पर्यंत दूरध्वनी जोडलेले असतात व ही उपकेंद्रे परस्परांना जोडलेली असतात. पुण्यात अशी ४ उपकेंद्रे असून मुंबईत २२ आहेत. अशा वेळी दूरध्वनी क्रमांकातील पहिला एक (पुण्यात) किंवा पहिले दोन (मुंबईत) आकडे वांच्छित क्रमांक ज्या उपकेंद्राला जोडला आहे, त्या त्या उपकेंद्राचे निदर्शक असतात. हा अंक फिरविल्यानंतर फक्त ती दोन उपकेंद्रे जोडली जातात. पुढील कार्य वरीलप्रमाणेच होते.
क्रॉसबार जोडणी पद्धती : या पद्धतीने जोडणी जास्त जलद होते. भारतात मुंबईसारख्या फार मोठ्या शहरात क्रॉसबार स्विच प्रणाली बसविल्या आहेत. क्रॉसबार स्विचमधून विशिष्ट दूरध्वनींच्या जोडणासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ही पद्धत जास्त लवचिक आहे व तिच्यामुळे जास्त उच्च दर्जाची सेवा उपलब्ध होऊ शकते. म्हणजेच गर्दीच्या वेळातही संपर्क मिळण्यासाठी लागणारा विलंब कमी होतो.
क्रॉसबार स्विचामध्ये एका चौकोनी चौकटीवर समांतर आडवे व उभे दांडे बसविलेले असतात. त्यांच्यामुळे एक प्रकारची चौकटी जाळीच बनते. जाळीच्या प्रत्येक छेदबिंदूवर स्पर्शक बसविलेले असतात. विद्युत् चुंबकांच्या साहाय्याने हे दांडे तिरके करून कोणत्याही छेदबिंदूपाशी तेथील दोन दांड्यांची जोडणी होऊ शकते. आडवे दांडे वेगवेगळ्या धारकांच्या मंडलांशी संलग्न असतात आणि उभे दांडे पुढील मुख्य वाहकाशी संलग्न असतात. वांच्छकाने आपली तबकडी फिरविल्यानंतर मिळणारे सर्व स्पंद एकत्र नोंदले जातात व त्यांवरुन वांच्छित क्रमांकाशी एकदम जोडणी होते.
इलेक्ट्रॉनीय जोडणी : ही पद्धती फारच जलद कार्य करणारी असून ती विविध प्रकारच्या सेवा देऊ शकते. हीत प्रत्यक्ष कोठल्याच भागाची हालचाल न होता जोडणी केली जाते. या यंत्रणेत विविध ‘स्मृती मंडले’ व ⇨ अर्धसंवाहक साधनापासून बनविलेले इलेक्ट्रॉनीय स्विच असतात. वांच्छकाने आपली तबकडी फिरवल्यानंतर त्यामुळे मिळणाऱ्या संकेतावरून एक प्रकारच्या संगणकाकडून जोडणीसाठी सुयोग्य मार्ग निवडला जातो व त्यानुसार जोडणी होते. इतकेच नव्हे, तर एकाच मार्गातून एका वेळी १०० पर्यंत संदेशांचे वहन होऊ शकते. यूरोप व अमेरिकेत कित्येक शहरांत या प्रकारची जोडणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. अशा पद्धतीचे केंद्र नवी दिल्ली येथे १९७७ मध्ये बांधून पूर्ण होणार आहे.
स्वयंचलित केंद्रातील इतर यंत्रणा : स्वयंचलित केंद्रातून सर्व दूरध्वनींना एकदीश विद्युत् पुरवठा होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धारकांच्या दूरध्वनी मंडलांची जोडणी करणे व ती खंडित करणे या क्रिया होत असतात, हे वर सांगितले आहेच. त्याशिवाय अशा केंद्रात पुढील गोष्टी केल्या जातात.
शुल्क आकारणी : स्थानिक बोलाव्यांचे शुल्क फक्त बोलाव्यांच्या संख्येवर अवलंबून असते. हे शुल्क आकारता येण्यासाठी प्रत्येक धारकाकरिता एक असे स्वतंत्र मापक असतात. अन्य दूरस्थ बोलाव्यांचे शुल्क कालावधीवर अवलंबून असल्याने त्यांचा अवधी मोजून त्यांची नोंद ठेवण्याची व्यवस्था असते.
विविध सांकेतिक सूचना देण्याची व्यवस्था : अनुमति–नाद : धारकाने आपला हातसंच उचलल्यानंतर केंद्रातील स्विचांची यंत्रणा बोलाव्यासाठी सिद्ध आहे, हे दर्शविणारा एक विशिष्ट आवाज त्याधारकाला त्याच्या ग्राहीतून ऐकू येतो. हा आवाज (अनुमति–नाद) ऐकू आल्याविना धारकाने तबकडी फिरविण्यास सुरुवात करावयाची नसते. यासाठी ३३१/३ हर्ट्झ कंप्रतेचा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह केंद्रामधून धारकाच्या उपकरणाला पुरविला जातो.
व्यग्रता-नाद : (एंगेज्ड टोन). वांच्छित दूरध्वनी क्रमांक गुंतलेला असल्यास वांच्छकाला त्याच्या ग्राहीतून एक विशिष्ट आवाज ऐकू येतो, त्याला व्यग्रता–नाद असे म्हणतात. यासाठी ४०० हर्ट्झ कंप्रतेचा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह केंद्रातून पुरविला जातो.
अशक्यता-नाद : वांच्छित दूरध्वनी नादुरुस्त असेल किंवा काढून टाकला असेल, तर एक विशिष्ट आवाज ऐकू येतो त्याला अशक्यता नाद असे म्हणतात. त्यासाठीही ४०० हर्ट्झ कंप्रतेचा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह केंद्रातून पुरविला जातो.
जोडणी-नाद : वांच्छित क्रमांकाशी जोडणी पूर्ण झाली की, वांच्छकाला एक विशिष्ट आवाज ऐकू येतो, त्याला जोडणी–नाद म्हणतात. त्यासाठी १३३ हर्ट्झ कंप्रतेचा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह पुरविला जातो.
हे वेगवेगळ्या कंप्रतांचे विद्युत् प्रवाह निर्माण करणारी जनित्रे केंद्रात बसविलेली असतात. यांशिवाय संभाषण चालू असलेल्या मंडलांशी इतर बोलाव्यांचा संपर्क येऊ न देणे, बोलाव्यांच्या संख्येची मोजदाद ठेवणे, अन्य बोलाव्यांसाठी जोडणी करणे इ. कामेही केंद्रात होत असतात.
खास सेवा : (१) पोलीस बोलावणे (१००), आगीचे बंब बोलावणे (१०१), रुग्णवाहिका बोलावणे (१०२) यांसारख्या निकडीच्या बोलाव्यांसाठी (कंसात दिलेले) खास क्रमांक मुक्रर केले असून ते तात्काळ मिळावेत अशी व्यवस्था केलेली असते. हे बोलावे निःशुल्क असतात.
यांशिवाय (२) दूरध्वनिविषयक चौकशी व तक्रारी (३) अन्य स्थानीय (ट्रंक) बोलाव्यांसंबंधी तक्रारी, नोंदणी, चौकशी (४) आंतर्देशीय बोलाव्यांची नोंदणी, तारा करणे (५) वेळ सांगणे, सकाळी उठवणे, करमणुकीचे कोणते कार्यक्रम कोठे आहेत, खेळांच्या स्पर्धा, परीक्षा, मतमोजणी याचे निकाल, आगगाड्या, बोटी वगैरे सुटण्याच्या वेळा यांची माहिती देण्यासाठी खास दूरध्वनिक्रमांक मुक्रर केलेले असतात. हे क्रमांक सर्व भारतभर सारखेच आहेत.
वाहक तारा : धारकाचे दूरध्वनी उपकरण केंद्राला जोडण्यासाठी प्रत्येक धारकाला एक वाहक तारांची स्वतंत्र जोडी नियुक्त केलेली असते. प्रारंभीच्या काळात या तारा खांबांवरून नेल्या जात परंतु दूरध्वनींची संख्या वाढू लागली तेव्हा अनेक दृष्टींनी ही पद्धत अडचणीची वाटू लागली. उदा., न्यूयॉर्कच्या वेस्ट स्ट्रीट या रस्त्यावर सु. ३० मी. उंचीचे खांब उभारावे लागले. अशा खांबांनी शहराची शोभा कमी होते. त्यावरील तारांची देखभाल व दुरुस्ती जास्त जिकरीची होते व असे खांब वादळात उन्मळून पडण्याचा मोठाच धोका निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी १८८१ मध्ये अटलबरो येथे जमिनीत गाडलेल्या केबलींचा उपयोग करण्याचा पहिला प्रयोग करण्यात आला. एक केबल म्हणजे तांब्यांच्या तारांच्या अनेक जोड्यांचा एक जुडगाच असतो. सर्व तारा परस्परांपासून विद्युत् दृष्ट्या निरोधित केलेल्या असून एकाच जोडीतील दोन तारा एकमेकींभोवती काहीशा पिळवटलेल्या असतात. प्रत्येक जोडी ओळखण्यासाठी तिच्याभोवती रंगीत वेष्टन असते. संपूर्ण जुडग्यावर जलप्रतिबंधक आवरण असून सर्वांत वर (कधीकधी) शिशाचा पातळ पत्रा असतो. एका केबलीमधील वाहक जोड्यांची संख्या १० पासून २७०० पर्यंतही असू शकते. कमी जोड्या असणाऱ्या केबली खांबावरूनही नेल्या जातात.
धारकाच्या मंडलाशिवाय विनिमय केंद्रातील यंत्रणा परस्परांना जोडण्यासाठी, केंद्र परस्परांना जोडण्यासाठी, दूरची शहरे परस्परांना जोडण्यासाठी व समुद्रापार असलेल्या देशांना जोडण्यासाठी खास प्रकारचे वाहक बनविण्यात आले आहेत.
समाक्ष केबल : दूर अंतरावरील संदेशवहनासाठी या केबलींचा उपयोग केल्याने उच्च दर्जाची सेवा मिळते. या प्रकारच्या केबलीमधील एक वाहक जोडी ही एक तांब्याची नळी व तिच्या अक्षावर बसविलेली परंतु तिच्यापासून विद्युत् निरोधित केलेली तार अशी बनलेली असते. एका केबलीमध्ये अशा १ ते ८ जोड्या सामान्यतः असतात. त्या परस्परांपासून विद्युत् निरोधित केलेल्या असतात (आ. १४). समाक्ष केबल खास करून संवाह तरंगांच्या साहाय्याने संदेश प्रसारित करण्यासाठी वापरली जाते [→ समाक्ष केबल].
समुद्री केबल : समुद्रातून जाणारी केबल इंग्लड व फ्रान्स यांना जोडण्यासाठी प्रथम १८५६ मध्ये टाकण्यात आली. १९७० मध्ये अमेरिका व स्पेन यांना जोडणारी अत्याधुनिक केबल टाकण्यात आली. तिच्यातून एकाच वेळी ७२० संभाषणे चालू शकतात. या केबली सामान्यतः समुद्रतळावरून जातात. समुद्र उथळ असल्यास तळात एक छोटासा खंदक खणून त्यात केबल टाकली जाते. केबलीमध्ये ठराविक अंतरावर विवर्धक बसविणे आवश्यक असते [→ केबल].
अन्य स्थानीय बोलावे : सामान्यतः दूरस्थानीय बोलावे मुख्य केंद्राकडून हातजोडणी पद्धतीने जोडले जातात. असा बोलावा करू इच्छिणारा धारक केंद्रावरील प्रचालकाशी संपर्क साधून आपल्या बोलाव्याची मागणी नोंदवतो. त्यानुसार सर्व माहिती भरलेले एक पत्रक तो प्रचालक तयार करतो, त्यास तिकिट असे म्हणतात. हे तिकिट मग हातजोडणी करणाऱ्या प्रचालकाकडे पाठविले जाते. अशा सर्व तिकिटांची त्यांची नोंदणी वेळ व प्रकार या गोष्टी विचारात घेऊन त्यांनुसार त्यांची जोडणी केली जाते.
या पद्धतीत बराच विलंब लागतो. त्यामुळे कित्येक मोठ्या शहरांत आता एसटीडी (सबस्क्रायबर्स ट्रंक डायलिंग म्हणजे धारकानेच आपल्या दूरध्वनीची तबकडी फिरवून अन्य स्थानीय दूरध्वनीशी संपर्क साधण्याच्या) पद्धतीने अन्य स्थानीय बोलावे करण्याची सोय केली आहे. जेथे ही सोय उपलब्ध आहे, अशा सर्व शहरांना एक सांकेतिक आकडा दिलेला असतो. या सर्व आकड्यांचे आरंभ शून्याने होतात. उदा., मुंबई ०२२, पुणे ०२१२, नवी दिल्ली ०११ वगैरे. त्या शहरातील दूरध्वनीशी संपर्क साधावयाचा असेल, त्या शहराचा सांकेतिक अंक आपल्या तबकडीवर प्रथम फिरवून मग त्या दूरध्वनीचा क्रमांक फिरवावा लागतो. सांकेतिक अंक फिरविण्याने त्या शहराला जोडणाऱ्या मुख्य वाहकाशी (ट्रंकशी) जोडणी होते व त्यातून मग त्या शहरातील केंद्रामध्ये इष्ट क्रमांकाशी जोडणी होते.
संवह तरंग दूरध्वनी : सु. २० किमी. पेक्षा जास्त अंतरावरील मध्यवर्ती केंद्रे जोडणाऱ्या वाहकांना मुख्य वाहक असे म्हणतात. मुख्य वाहकातून होणारी संदेशांची देवघेव प्रामुख्याने संवह (वाहून नेणाऱ्या) तरंगांच्या साहाय्याने होते. यामुळे वाहकांच्या एकाच जोडीमधून एकाच वेळी १२ ते ९६० इतकी संभाषणे प्रसारित करता येत असल्याने वाहकांच्या संख्येत मोठीच कपात करता येते व एकूण यंत्रणा कमी खर्चाची होते.
या पद्धतीची रुपरेषा सामान्यतः पुढीलप्रमाणे देता येते. विशिष्ट संदेशजन्य विद्युत् तरंगांचे उच्च कंप्रतेच्या (सु. ६०,००० हर्ट्झ किंवा अधिक) संवह विद्युत् चुंबकीय तरंगांशी विशेष प्रकारचे मिश्रण (विरूपण) केले जाते. हा तरंग विद्युत् गाळणी व विवर्धक यांतून जाऊन नंतर तो मुख्य वाहकातून प्रसारित केला जातो. ४००० हर्ट्झच्या फरकाचे वेगवेगळे संवह तरंग घेऊन त्यांच्यावर वेगवेगळी संभाषणे अध्यारोपित केली जातात व असे १२ (किंवा जास्त) अध्यारोपित तरंग एकाच वेळी मुख्य वाहकातून प्रसारित करतात. दुसऱ्या बाजूला त्यांचे विवर्धन करून ते विद्युत् गाळण्यांच्या साहाय्याने अलग केले जातात. मग प्रत्येक अध्यारोपित तरंगामधून संदेश अलग करून (हीच क्रिया रेडिओ ग्राहीमध्ये होते) ते योग्य त्या दूरध्वनीकडे दिले जातात. विरूपणाचे अनेक प्रकार आहेत. उदा., परमप्रसर विरूपम, कंप्रता विरूपण [→ विरूपण]. हे सर्व प्रकार वेगवेगळ्या परिस्थितींत वापरले जात आहेत. अंतर जास्त असल्यास मध्यंतरी जागोजागी विवर्धकांचा उपयोग करावा लागतो.
आ. १५ मध्ये संवह तरंगांच्या साहाय्याने वाहकांच्या दोन जोड्यांवरून एकाच वेळी दोन संभाषणे कशी चालू शकतील, हे दिग्दर्शित केले आहे. याच आकृतीचा विस्तार करून एकाच वेळी अनेक संभाषणे चालू ठेवणाऱ्या यंत्रणेची कार्यपद्धती समजून येईल.
ज या केंद्राशी संलग्न असे ११ व २१ हे दोन धारक असून त्यांची द या दूरच्या केंद्राशी संलग्न अशा ११२ व २१२ या धारकांशी संभाषणे संवह तरंगांच्या साहाय्याने चालू आहेत असे समजू.
दोन्ही केंद्रांतील या कामासाठी लागणारी यंत्रणा सारखीच असते. फक्त ज मधील यंत्रणाच आकृतीत थोडी जास्त तपशीलवार दाखविली आहे. ११ या दूरध्वनी उपकरणातून निघालेले ध्वनिकंप्रतेचे विद्युत् तरंग ज या विनिमय केंद्रात येतात. तेथे एका स्विचाच्या साहाय्याने ते (१२) या संकरित वेटोळ्यात (चार समान गुंडाळ्या आणि आदान प्रदान प्रवाह अलग ठेवण्यासाठी आणखी जादा गुंडाळी असलेल्या वेटोळ्यात) येतात. या वेटोळ्यातून मग ते (१३) या क्षीणकात येतात. तेथे त्यांची तीव्रता योग्य त्या पातळीवर आणली जाते. (१८) या आंदोलकात निर्माण होणारे ६० कि. ह. कंप्रतेच्या संवह तरंगाचे (१४) या विरूपकात ध्वनिकंप्रतेच्या विद्युत् तरंगाकडून (कंप्रता ३०० ते ३,४०० हर्ट्झ) विरुपण होते. मग (१५) या पट्टपारक छानकाच्या (निम्न व उच्च मज्जाव कंप्रतांमधील कंप्रता पट्टा प्रेषित करणाऱ्या छानकाच्या) साहाय्याने विरूपित तरंगापैकी ५६·६ ते ६० कि. ह. कंप्रतेचा उपपट्ट (१, २) या वाहकांच्या जोडीत सोडला जातो व त्यामधून शेवटी द या विनिमय केंद्रात जाऊन पोहोचतो. तेथे वरील क्रियेच्या उलट क्रिया होऊन ध्वनिकंप्रतेचे विद्युत् तरंग संवह तरंगापासून अलग केले जातात व विवर्धित करून ते ११२ या दूरध्वनी उपकरणाला जाऊन पोहोचतात.
११२ या उपकरणात बोललेल्या भाषणामुळे उत्पन्न होणारे विद्युत् तरंग याच पद्धतीने (म्हणजे ६० कि. ह. संवह तरंगांचे विरूपण करून) (३, ४) या वाहक जोडीवरून ज या केंद्रात येऊन पोहोचतात. पण (३, ४) यामधून इतर अनेक कंप्रतापट्टही जात असतात [उदा., आकृतीमध्ये २१२ या उपकरणावरील ध्वनीचे वहन करणारा ६०·४ ते ६४ कि. ह. हा पट्टही (३, ४) मधून जात आहे]. त्यापैकी फक्त ५६·६ ते ६० कि. ह. हाच पट्ट (१६) या पट्टपारकातून आत येऊ शकतो. मग (१७) या अविरूपकाकरवी (विरूपकाच्या उलटी क्रिया करणाऱ्या साधनाकरवी) त्यातील ध्वनिकंप्रतांचे तरंग अलग केले जातात. ते (१९) या विवर्धकाकडून विवर्धित केले जातात व शेवटी (१२) या संकरित वेटोळ्याच्या मार्फत ११ या उपकरणाला जाऊन पोहोचतात. यावरून हे लक्षात येईल की, (अ) धारकापासून विनिमय केंद्रापर्यंतच्या धारकाच्या मंडलातून जाणारे प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह हे ३०० ते ३,४०० हर्ट्झ कंप्रतांचे असतात (आ) उच्च कंप्रतांचे विरुपित तरंग हे फक्त मुख्य वाहकातून (उदा., १, २, ३, ४) जात असतात (इ) एका मुख्य वाहक जोडीतून एकाच दिशेने संदेशवहन होते म्हणून एका संभाषणासाठी मुख्य वाहकांच्या दोन जोड्या वापराव्या लागतात.
रेडिओ दूरध्वनी : दूरच्या अंतरावरील परदेशांशी दूरध्वनी संपर्क साधण्यासाठी ही पद्धत वापरतात. हिचे सर्वसामान्य स्वरूप रेडिओ प्रेषणासारखेच असते. यासाठी उच्च कंप्रतेच्या (२ ते २५ मेगॅहर्ट्झ) संवह तरंगांचे दूरध्वनीवरील संदेशाने विरूपण करतात व मग याविरुपित रेडिओ तरंगांचे इष्ट दिशेने प्रेषण करतात. ⇨ आयनांबरावरून परावर्तित झालेले हे तरंग इष्ट स्थळी पोहोचल्यानंतर विवर्धन करून त्यांतील संदेश अलग करतात आणि तो इष्ट दूरध्वनीला देतात. स. १५,००० किमी. अंतरापर्यंत या पद्धतीने संदेश पाठविता येतात. ही पद्धत कमी खर्चाची असून सामान्यतः समाधानकारक सेवा देऊ शकते परंतु केव्हा केव्हा आयनांबरातील घडामोडींमुळे संदेश फारच अस्पष्ट होतात. त्याचप्रमाणे या पद्धतीने पाठविलेल्या संदेशांची गुप्तता राहू शकत नाही. भारताचे परदेशांशी दूरध्वनी संपर्क याच पद्धतीने साधले जातात.
सूक्ष्मतरंगवहन : अती उच्च कंप्रतांचे (३०० ते ३,००० मेगॅहर्ट्झ) रेडिओ तरंग प्रकाशाप्रमाणे सरळ रेषेत जातात. त्यामुळे मर्यादित आकारमानाचे अंतर्वक्र परावर्तक वापरून त्यांचे सामर्थ्यवान झोतांच्या स्वरूपात प्रेषण करता येते. त्यामुळे फार शक्तिशाली तरंग निर्माण करण्याची आवश्यकता राहत नाही. या तरंगांचे दूरध्वनी संदेशाने विरूपण करून मग उंच (सु. २० मी.) मनोऱ्यावरील परावर्तकात बसविलेल्या आकाशकाकडून (अँटेनाकडून) त्यांचे प्रेषण केल्यास सु. ७०–८० किमी. अंतरापर्यंत चांगले संदेशवहन शक्य होते. यापेक्षा जास्त अंतरासाठी अशा मनोऱ्यांची मालिका उभारावी लागते. मागील मनोऱ्यावरील प्रेषकाकडून ग्रहण केलेल्या संदेशाचे विवर्धन करून तो पुढील मनोऱ्याकडे पुन्हा प्रेषित केला जातो. मात्र लागोपाठचे दोन मनोरे परस्परांपासून दिसू शकले पाहिजेत. या पद्धतीने तारा उभारण्याचा खर्च वाचून त्या चोरीला गेल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे तुटल्याने संदेशवहन खंडित होण्याची भीती नसते. म्हणून रेल्वे, पोलीस, हवाई हल्ल्याचा इशारा यांसारख्या सेवांना ही पद्धत फार उपयुक्त आहे. खास तंत्राचा वापर करून या पद्धतीने ३०० किमी. अंतरापर्यंतही संदेशवहन करता येते. कृत्रिम उपग्रहामार्फत करण्यात येणाऱ्या संदेशवहनासाठी ही पद्धत जास्त सोयीची आहे [→ सूक्ष्मतरंग].
दूरध्वनी योजनेची आखणी : विशिष्ट केंद्राशी संलग्न असलेल्या धारकाला दुसऱ्या कोणत्याही धारकाशी वाटेल तेव्हा ताबडतोब संपर्क साधता यावा, अशी अपेक्षा असते आणि ती पूर्ण करावयाची झाल्यास केंद्रांतील स्विचांची व मुख्य वाहकांची संख्या फारच मोठी होऊन केंद्र उभारणीचा खर्च वाढेल व शेवटी तो धारकांकडूनच वसूल केला जात असल्याने धारकांना ते परवडणार नाही. म्हणून संपर्काच्या उपलब्धतेवर काही मर्यादा घालणे आवश्यक होते. जास्त निकडीच्या (दूरस्थानीय) बोलाव्यांसाठी काही खास वाहक राखून ठेवलेले असतात. अशा बोलाव्यांना जादा शुल्क आकारले जाते.
स्थानिक बोलाव्यांच्या बाबतीत त्वरीत संपर्क शक्य होणे व त्यासाठी लागणारा खर्च यांचा समन्वय साधावा लागतो. सर्व दिवशी सर्वच वेळी बोलाव्यांची संख्या सारखीच असत नाही. म्हणजेच संदेशवहनासाठी उभारलेली यंत्रणा दिवसापैकी बराच भाग प्रत्यक्ष वापरली जात नाही. ज्या वेळी बोलाव्यांची संख्या कमाल होते त्या वेळेला व्यग्रता काल असे म्हणतात. एखाद्या धारकाने बोलावा दिल्यानंतर त्या वेळी केंद्राची यंत्रणा (इतर बोलाव्यांत) गुंतलेली असल्याने त्याला हव्या त्या क्रमांकाशी संपर्क मिळू शकला नाही, तर त्या बोलाव्याला विफल बोलावा असे म्हणतात. अशा परिस्थितीत अपेक्षित संपर्क मिळण्यासाठी त्या धारकाला जितका अवधी थांबावे लागते, त्या अवधीला विलंबावधी असे म्हणतात. व्यग्रता कालातील सरासरी विलंब कालावरून सेवेचा दर्जा ठरविता येतो. विलंबावधी जितका कमी तितका सेवेचा दर्जा जास्त उच्च हे उघड आहे. एकूण यंत्रणा उभारताना विलंबावधी विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही म्हणजेच विशिष्ट दर्जाची सेवा कशी मिळेल, ते पाहिले जाते.
वेगवेगळे धारक आपले बोलावे संपूर्णपणे यदृच्छ रीतीने करतात. म्हणून सेवा–दर्जाविषयक गणिते करताना ⇨ संभाव्यता सिद्धांताचा मोठ्या प्रमाणात वापर करता येतो [→ यदृच्छ प्रक्रिया]. या संदर्भात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काही समीकरणे काढली आहेत त्यांचा वापर करतात. त्याचप्रमाणे विशिष्ट यंत्रणेतून सरासरीने एकाच वेळी किती बोलावे येतील, संभाषणे किती वेळ चालतील यांचा आगाऊ अंदाज घेऊन मग त्यानुसार केंद्राची उभारणी करतात. वाढत्या मागणीनुसार जादा सोय करता येणे शक्य होईल, अशीही दक्षता घ्यावी लागते.
भारतातील मोठ्या शहरांत सामान्यपणे दर १,००० धारकांच्या गटापैकी फक्त १२५ जणांना एकाच वेळी सफल बोलावे करता येतील, अशी सोय केलेली असते.
दूरध्वनिक्षेत्रातील भारताची प्रगती : बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावल्यानंतर केवळ ५ वर्षांतच म्हणजे १८८१ मध्ये कलकत्ता येथे ५० दूरध्वनींचे विनिमय केंद्र उभारण्यात आले. पहिले स्वयंचलित विनिमय केंद्र १९१३ मध्ये सिमला येथे उघडण्यात आले. या क्षेत्रात १९५१ नंतर भारतात फार झपाट्याने प्रगती झाली. पुढील कोष्टकातील आकडेवारीवरूनच ही गोष्ट स्पष्ट होईल. अन्य स्थानीय बोलाव्यांची संख्या १९५१ मध्ये ७१ लक्ष होती, ती १९७२–७३ मध्ये ११·४ कोटी झाली. याच मुदतीत दूरध्वनीपासून मिळणारे सरकारचे उत्पन्न ९ कोटी रुपयांपासून १८१·३ कोटी रुपयांपर्यंत वाढले.
भारतातील दूरध्वनीची प्रगती |
||||||
वर्ष |
१९५१ |
१९६१ |
१९७१ |
१९७२ |
१९७३ |
१९७४ |
दूरध्वनिधारकांची संख्या (लक्ष) |
१·६८ |
४·६३ |
१३·०० |
१४·०० |
१५·१० |
१६·२९ |
विनिमय केंद्रांची संख्या |
५४० |
१,३७४ |
३,९६७ |
४,२०५ |
४,४४१ |
४,७०४ |
धारकाने तबकडी फिरवून अन्य स्थानीय दूरध्वनी संपर्क साधण्याची (एसटीडीची) सोय ६८ शहरांच्या जोड्यांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास बंदरांतून किनाऱ्या पासून ७५० किमी. अंतर असलेल्या जहाजांशी दूरध्वनीने संपर्क साधण्याची सोय आहे. दूरध्वनीवरुन १७९ परदेशांशी संपर्क साधता येतो. यासाठी मुंबई, मद्रास, कलकत्ता व नवी दिल्ली येथे केंद्रे स्थापन केलेली आहेत. प्रामुख्याने रेडिओ किंवा कृत्रिम उपग्रहांद्वारे हा संपर्क साधला जातो. पुण्याजवळ आर्वी येथे ‘विक्रम’ हे केंद्र कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहनासाठी उभारलेले असून असेच दुसरे केंद्र डेहराडून येथे उभारण्यात आलेले आहे. परदेश संदेशवहनाचे मुख्य केंद्र मुंबईत विदेश संचारभवन येथे आहे.
मुंबई–लंडन थेट दूरध्वनी सेवा : परदेशांशी एकदम संपर्क साधण्याचा सेवेचा प्रारंभ म्हणून ही सेवा ९ ऑक्टोबर १९७६ रोजी सुरु करण्यात आली. तूर्त फक्त मुंबईहून लंडनला बोलावा करण्यासाठीच ही सेवा रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत उपलब्ध केलेली आहे परंतु लवकरच ती उलट बाजूनेही सुरू होईल.
लंडन येथील दूरध्वनिधारकाला बोलावा करण्यासाठी मुंबईमधील धारकाला प्रथम ९०० हा आंतरराष्ट्रीय सेवेचा सांकेतिक आकडा, नंतर ४४ हा युनायटेड किंग्डमचा सांकेतिक आकडा, त्यानंतर १ हा लंडनचा सांकेतिक अंक व शेवटी लंडनमधील धारकाचा ७ अंकी दूरध्वनिक्रमांक असे एकूण तेरा अंक आपल्या दूरध्वनीच्या तबकडीवर फिरवावे लागतात.
मुंबईहून आर्वी येथील केंद्राशी व तेथून सूक्ष्मतरंगाच्या साहाय्यानेइंटेलसॅट–४ या कृत्रिम उपग्रहामार्फत लंडनशी संपर्क साधला जातो [→ उपग्रह संदेशवहन].
दूरध्वनी उपकरण निर्मिती : दूरध्वनिविषयक विविध उपकरणे तयार करण्यासाठी इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लि. या सार्वजनिक क्षेत्रातील कारखान्याची स्थापना १९४८ मध्ये बंगलोर येथे करण्यात आली. नंतर नैनी येथे एक व काश्मीरमध्ये एक असे दोन कारखाने उभारले असून, रायबरेली येथे एक व केरळमध्ये एक अशा दोन कारखान्यांची उभारणी चालू आहे. १९७३ मध्ये या कारखान्यांत सु. १७,००० कामगार काम करीत होते व कारखान्यांचे एकूण उत्पादन ३८ कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. भारतातील मागणी पुरवून हे कारखाने ४५ पेक्षा जास्त परदेशांनाही उपकरणांची निर्यात करतात. त्यांत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारखे प्रगत देशही आहेत.
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संदेशवहन : विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संदेशवहनात पुष्कळच प्रगती झालेली आहे. हे कार्य आता मुख्यत्वे संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) या संघटनेतर्फे चालते. ही संघटना १८६५ मध्येच इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनियन या नावाने स्थापन झालेली होती. या संघटनेमार्फत तांत्रिक प्रगतीचाही पाठपुरावा करण्यात येतो. ९० राष्ट्रे व प्रदेश या संघटनेचे सदस्य असून तिचा खर्च या राष्ट्रांच्या सरकारांनी दिलेल्या वर्गणीतून चालविण्यात येतो.
दूरध्वनी, तारायंत्र व रेडिओ यांच्यासंबंधी सल्ला देणाऱ्या या संघटनेच्या तीन कायम व स्वायत्त सल्लागार समित्या अनुक्रमे १९२४, १९२५, व १९२७ मध्ये स्थापन करण्यात आल्या. या समित्यांनी उत्तम अभियांत्रिकी व प्रेषण मानकांचे महत्त्व पटवून दिलेले असून आंतरराष्ट्रीय संदेशवहनात ही मानके प्रत्यक्षात आणण्याचे महत्कार्य केलेले आहे. विशेषतः प्रेषण व व्यतिकरण (संदेशांचे अनिष्ट मिश्रण), कंप्रता पट्ट व त्यांचे वाटप, दूरध्वनी उपकरणांची कार्यमानता, योग्य दर व दूरध्वनी सेवांचे प्रकार व दर्जा या सर्वांबाबत या समित्यांनी केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संदेशवहनात परिणामकारक बदल घडून आलेले आहेत. १९५७ मध्ये या तीन समित्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.
भावी प्रगती : १९७५ अखेरपर्यंत जगात एकूण सु. ३ कोटी ६० लक्ष दूरध्वनिधारक होते. दूरध्वनीच्या संख्येतील वाढीबरोबरच या सेवेतील विविधता व गुणवत्ता वाढविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कमी ऐकू येणाऱ्यासाठी दूरध्वनीला विवर्धकाची जोड देण्याची सोय आता उपलब्ध झालेली आहे. संगणकात अनेक प्रकारची माहिती साठवून माहितीची जणू एक बँकच तयार करतात. दूरध्वनीने या संगणकाशी संबंध जोडून आणि त्याला विशिष्ट संकेत देऊन हवी ती माहिती त्याकडून मिळविण्याची सोय अमेरिकेत करण्यात आली आहे.
इ. स. १९७० साली अमेरिकेत दूरचित्रध्वनीची (व्हिडिओफोन) सेवा सुरू करण्यात आली, यासाठी खास दूरध्वनी उपकरण लागते. यावरून संभाषण करणाऱ्यांना (दूरचित्रवाणी ग्राहीतल्याप्रमाणेच) पडद्यावर परस्परांचे चेहरेही दिसू शकतात. याच पद्धतीचा आणखी विकास करून ब्रिटनच्या टपाल खात्याने पाच वेगवेगळ्या शहरांतील व्यक्तींना एकाच वेळी परस्परांशी चर्चा करता येतील आणि त्याच वेळी सर्वांचे चेहरेही दिसू शकतील, असे साधन तयार केले आहे. या साधनाच्या साहाय्याने आपले गाव न सोडता वेगवेगळ्या शहरांतील व्यक्तींना आपल्या बैठकी घेता येतील म्हणून त्याला बैठक चित्रध्वनी असे नाव देण्यात आले आहे. दूरध्वनी संदेशवहनपद्धती वापरून नकाशे, आराखडे, दस्तऐवज वगैरेंचेही झटपट प्रेषण करता येते.
अपंग व्यक्तीच्या सोयीसाठी केवळ आवाजानेच तबकडी फिरविण्याची क्रिया होईल व हातसंच न उचलताच संभाषण करता येईल, अशा उपकरणाचाही बेल टेलिफोन कंपनीने शोध लावला आहे.
पहा : आंतरसंदेशवहन पद्धति उपग्रह संदेशवहन.
2. Fraser, W. Telecommunications, London, 1967.
3. Robertson, J. H. The Story of the Telephone, London, 1947.
4. Telly, D. Basic Carrier Telephony, New York, 1960.
साळुंके, रा. म. पुरोहित, वा. ल.
“