त्स्यू यु आन : (इ. स. पू. सु. ३४३–सु. २८९). श्रेष्ठ प्राचीन चिनी कवी. हूनान प्रांतातील प्राचीन त्स्यू राज्यात एका उमराव घराण्यात जन्म. ऐन तारुण्यात त्याने त्स्यू राज्यकर्त्यांची निष्ठेने चाकरी करून त्यांचा विश्वास संपादन केला तथापि त्याच्या सहकाऱ्यांनी मत्सरापोटी राजाला त्याच्यासंबंधी खोट्यानाट्या गोष्टी सांगितल्या व परिणामतः राजाने त्याला हद्दपार केले. आपल्या राजकीय अज्ञातवासातही या कवीचे आपल्या देशावरील व राज्यावरील प्रेम यत्किंचितही ओसरले नाही. त्याने अनेक उत्कट काव्ये रचली व ती राजाला ऐकवावीत, अशी तळमळही त्यास लागून राहिली. अखेरीस देशाचा कारभार सुधारणेपलीकडे गेल्याचे पाहून निराशेच्या भरात त्याने उत्तर हूनानमधील मी–लो नदीत आत्मसमर्पण केले. त्याच्या आत्मसमर्पणाच्या दिवशी त्याच्या करुण अंताची आठवण म्हणून चीनमध्ये सर्वत्र सजविलेल्या नौकांच्या शर्यती लावल्या जातात तसेच त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडदानही करतात.
त्स्यू युआन हा चीनच्या इतिहासातील ज्ञात असा पहिलाच कवी. त्याच्या सु. २५ कविता उपलब्ध आहेत. त्यांतील ली साव् (इं. शी. लॅमेंट) ही सर्वोत्कृष्ट होय. आपल्या देशाच्या निराशाजनक भवितव्याविषयी शोक प्रकट करणारी ती एक प्रदीर्घ भावकविता आहे. त्याचबरोबर तीतून त्याच्या व्यक्तिगत दुःखांचे व आकांक्षांचेही दर्शन घडते. कवीची करुणरम्य कल्पनाशक्ती न्यायाच्या शोधात अखिल विश्वाला गवसणी घालते. फुले हेच त्याचे शील, पंचमहाभूते त्याचे सेवक आणि गरुड, ऐरावत यांसारखे त्याचे सारथी, यांसारख्या कल्पना त्याच्या कवितांतून भेटतात. विपुल उपमा–उत्प्रेक्षा, उत्कट मनोभावना व निष्ठा, उत्तुंग कल्पनाशक्ती, स्वप्नवत स्वच्छंद वृत्ती तसेच उत्कृष्ट भावगेयता यांचे दर्शन त्याच्या काव्यातून घडते. त्याची शैली लोकगीते व बोलीभाषा यांना निकटची आहे. उत्तरकालीन चिनी कवींना त्याची कविता सदैव स्फूर्तिप्रद वाटत आलेली आहे. एक थोर राष्ट्रपुरुष म्हणूनही त्याला जनमानसात अजरामर स्थान प्राप्त झाले आहे.
थान, जुंग (इं.) शिरोडकर, द. स. (म.)