चतुर्मुख : (  ?  ). अपभ्रंश भाषेत रचना करणारा महाकवी. इ.स. ६०० ते ८०० पर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला असावा. ह्याने रामकथेवरील पउम-चरिउ तसेच हरिवंश  आणि पंचमीचरित  अशी तीन महाकाव्ये रचिली असावीत, असे उत्तरकालीन उल्लेखांवरून वाटते. ह्याचे कोणतेही ग्रंथ आज उपलब्ध नसले, तरी स्वयंभू (आठवे शतक), पुष्पदंत (दहावे शतक), धवल, नयनंदी (अकरावे शतक), देवसेनगणी (चौदावे शतक) इ. अपभ्रंशातील महाकवींनी त्याच्याबद्दल जे आदरोद्‌गार काढले आहेत, त्यांवरून चतुर्मुखाचे काव्य आणि वृत्तरचनाप्रभुत्व ह्यांचे अपभ्रंश काव्यावर मोठे ऋण असावे, असे दिसते.

तगारे, ग. वा.