टमान, गुस्टाफ : (२८ मे १८६१–१७ डिसेंबर १९३८). रशियात जन्मलेले जर्मन भौतिक रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी पदार्थांतील –विशेषतः धातूंतील–प्रावस्था व विक्रिया यांसंबंधी केलेल्या महत्त्वाच्या संशोधनामुळे आधुनिक धातुविज्ञानाचे एक आद्य संस्थापक म्हणून त्यांना मानण्यात येते. त्यांचा जन्म रशियातील यामबुर्ग (किंग्गिसेप) येथे झाला. त्यांचे शिक्षण एस्टोनियातील डॉर्पाट (तार्तू) विद्यापीठात झाले आणि तेथील रसायनशास्त्रीय संस्थेमध्ये १८९२ साली ते प्राध्यापक आणि संचालक झाले. १९०३ साली जर्मनीतील गटिंगेन विद्यापीठात अकार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व १९०७–३० या काळात ते तेथील भौतिक रसायनशास्त्रीय संस्थेचे प्रमुख होते.
पदार्थाच्या प्रावस्थांत होणारे फेरबदल आणि तापमान व दाब यांवरील त्यांचे अवलंबित्व यांसंबंधी त्यांनी मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले. तसेच कठीण व ठिसूळ स्वरूपातील पदार्थांमधील विक्रियांसंबंधीही त्यांनी अभ्यास केला. त्यांनी या दृष्टीने बर्फ व अतिशय थंड केलेल्या द्रवांसंबंधी विशेष संशोधन केले. धातूंच्या संघटनात्मक आकृत्या तयार करण्यासाठी औष्णिक विश्लेषणाचा त्यांनी केलेला अवलंब आणि मिश्रधातूंची सरंचना व स्वरूप यांसंबंधी त्यांनी केलेले संशोधन विशेष महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.
टमान यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी Lehrbuch der Metallographie (१९१४ चौथी आवृत्ती १९३२) हा सुप्रसिद्ध आहे. ते Zeitschrift für anorganische und allgemeine Chemie या नियतकालिकाचे संपादक होते. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..