जॉर्जियन साहित्य : जॉर्जियन भाषेतील लिखित साहित्याची परंपरा उपलब्ध साहित्याधारे इ.स. च्या पाचव्या शतकापर्यंत भिडविता येते. चौथ्या शतकात जॉर्जियाचे ख्रिस्तीकरण झाल्यानंतर बायबलचा प्रचार-उपदेश जॉर्जियन भाषेत करण्याची आवश्यकता जाणवू लागली व तो लेखनिविष्ट करण्यासाठी जॉर्जियन वर्णमालेच्या निर्मितीची निकडही निर्णायक ठरली. त्यानंतर ख्रिस्ती शुभवर्तमाने किंवा ‘गॉस्पेल्स’ त्यांच्या एका आर्मेनियन पाठावरून जॉर्जियनमध्ये अनुवादित करण्यात आली (पाचवे शतक). आरंभीच्या जॉर्जियन साहित्यावर ख्रिस्ती धर्माचा पगडा असणे स्वाभाविक होते. सेंट शशॅनिकच्या चरित्रांसारखी (सु. ४८०) जिवंत शैलीत लिहिलेली संतचरित्रे ह्या काळात लिहिली गेली. नीनो किंवा नीना ह्या संतिणीने जॉर्जियात ख्रिस्ती धर्म कसा आणला, ह्याचा वृत्तान्त काही ग्रंथांत आढळतो, तर काहींत व्हाख्‌टांग गोर्गासाल किंवा गोर्गास्लानी ह्या पाचव्या शतकातील राजाच्या साहसांची आख्यायिकांच्या जवळपास जाणारी वर्णने आली आहेत. इतिहासलेखनाच्या दृष्टीने जॉर्जियनांनी केलेले हे आरंभीचे प्रयत्‍न दिसतात. 

जॉर्जियन धर्मसाहित्यावर बायझंटिन ग्रीक संस्कृतीचा लक्षणीय प्रभाव दिसून येतो. सेंट बेसिल दि ग्रेट, निसचा ग्रेगोरी ह्यांसारख्या ग्रीक धर्मशास्त्रकारांच्या ग्रंथांचे अनुवाद जॉर्जियनमध्ये करण्यात आले. जॉर्जियनमध्ये रोमान्स आणि महाकाव्य ह्यांवर मात्र पर्शियन संस्कृतीचे संस्कार जाणवतात. Visramiani (इं. भा. व्हिस्रमिआनी : द स्टोरी ऑफ द लव्ह्‌ज ऑफ व्हिस अँड रॅमिन, १९१४) हा बाराव्या शतकातील गद्य रोमान्स तर एक पर्शियन रोमान्सवरूनच रूपांतरिलेला आहे. खोनीच्या मोझेसच्या नावावर मोडणाऱ्या Amiran Darejaniani (इं. भा. १९५८) हाही एक उल्लेखनीय गद्य रोमान्स. 

ख्रिस्ती धर्माच्या प्रभावामुळे जॉर्जियनमध्ये लौकिक स्वरूपाची कविता विकसित होण्यास वेळ लागला. तथापि ‘डेव्हिड द बिल्डर’ म्हणून ओळखला जाणारा राजा दुसरा डेव्हिड (१०८९–११२५) व राणी टामार (११८४–१२१३) ह्यांच्या कारकीर्दीत मात्र लौकिक कविता लिहिणारे अनुक्रमे आयोन शॅव्हटेली व चाख्रूखाड्‌झे हे दोन उल्लेखनीय कवी होऊन गेले. आपल्या आश्रयदात्यांच्या गौरवार्थ त्यांनी उत्कृष्ट उद्देशिका लिहिल्या. शॉटा रस्ट्‌हावेली (११७२–१२१६) हा राणी टामारच्या आश्रयास असलेला आणखी एक महत्त्वाचा कवी. त्याने लिहिलेल्या Vephkhis Tqaosani (इं. भा. द मॅन इन द पँथर्स स्किन, १९१२) ह्या महाकाव्यामध्ये आदर्श मैत्री, दरबारी प्रेम आणि वीरवृत्ती ह्यांचे कलात्मक चित्रण आढळते. १,५७६ कडव्यांच्या ह्या महाकाव्यात तत्कालीनांना समजण्यासारखे परंतु आता दुर्बोध वाटणारे बरेच उल्लेख आहेत. ह्या महाकाव्यास जॉर्जियाच्या राष्ट्रीय सागाचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. १०८९ ते १२३४ ह्या कालखंडात अनेक नामांकित कवी होऊन गेल्यामुळे हा कालखंड जॉर्जियन साहित्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. १२३४ मध्ये मंगोलांच्या जॉर्जियावरील आक्रमणामुळे ही काव्यपरंपरा खंडित झाली. तिचे पुनरूज्‍जीवन होण्यास सतरावे शतक उजाडावे लागले.

सतरावे व अठरावे ही दोन शतक जॉर्जियन साहित्याचे ‘रौप्ययुग’ समजली जातात. ह्या कालखंडात घडून आलेला जॉर्जियन काव्याचा विकास विशेष लक्षणीय. बरीचशी काव्यरचना राजांकडून झाली. उदा., तिसरा आर्चिल लिहिलेले (१६४७–१७१२) Archiliani  हे १२,००० हून अधिक कडव्यांचे काव्य. जॉर्जियन जीवनाचा एक पटच त्यातून उभा केला आहे. डेव्हिड गुराममिश्‌व्हिली (१७०५–८६) ह्याने जॉर्जियाचा इतिहास काव्यबद्ध केला तसेच काही उद्देशिका आणि अन्य प्रकारच्या भावकविता लिहिल्या. त्याच्या काव्यांवर अनेकदा पर्शियन काव्यशैलीचे संस्कार आढळतात. दुसऱ्या हिरॅक्लिअसच्या कारकीर्दीत पर्शियन काव्यानुकरणाविरुद्ध प्रतिक्रिया उमटू लागली होती. तरीही बेस्सारिऑन गाबाश्‌व्हिलीसारखे (१७४९–९०) काही कवी पर्शियन काव्याच्या प्रभावापासून मुक्त राहू शकले नाहीत.

अठराव्या शतकात राजा सहावा व्हाख्‌टांग ह्याने टिफ्लिस येथे एक मुद्रणालय स्थापून जॉर्जियन इतिहासाचे ग्रंथ संपादून प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली. सल्खन-साबा ऑर्बीलिआनी (१६५८–१७२५) ह्याने काही चांगल्या बोधकथा-फेबल्स-लिहिल्या. द बुक ऑफ विज्‌डम अँड लाइज  ह्या नावाने त्यांचे इंग्रजी भाषांतर झाले आहे. (१८९४).  

एकोणिसाव्या शतकात जॉर्जिया रशियन साम्राज्यास जोडला गेला. ह्या घटनेचे अपरिहार्य परिणाम जॉर्जियन साहित्यावरही झाले. रशियन कवितेचा आदर्श समोर ठेवून जॉर्जियन कविता लिहिली जाऊ लागली. तथापि ह्या काळात प्रत्यक्ष रशियन कवितेवर फ्रेंच कवितेचा प्रभाव असल्यामुळे फ्रेंच काव्याची काही वैशिष्ट्येही जॉर्जियन काव्यात आली. रशियन काव्यप्रभावाच्या संदर्भात अलेक्झांडर चॉव्ह्‌चाव्हड्‌झे (१७८६–१८६४) ह्या कवीचे नाव उल्लेखनीय आहे. ड्यरझाव्ह्यिन (१७४३–१८१६) ह्या रशियन भावकवीच्या धर्तीवर त्याने आपल्या उद्देशिका लिहिल्या. ह्याच शतकात जॉर्जियन साहित्यात स्वच्छंदतावाद अवतरला. निकोलस बारटाश्व्हिली (१८१५–४५) व ग्रेगोरी ऑर्बीलिआनी (१८००–८३) ह्या स्वच्छंदतावादी जॉर्जियन कवींच्या कवितेवरील बायरनचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. जॉर्जियन साहित्यातील स्वच्छंदतावाद हा रशियन साहित्यातील स्वच्छंदतावादाच्या अनुकरणानेच आलेला दिसतो.

जिऑर्जी एरिस्थावी (१८११–६४) ह्याने रासीन, शिलर, पुश्किन ह्यांच्या नाट्यकृतींचे जॉर्जियनमध्ये अनुवाद केले. जॉर्जियन सुखात्मिकेचा विकास त्याच्या प्रयत्‍नांनी घडून आला. आधुनिक जॉर्जियन रंगभूमीचा संस्थापक म्हणून तो ओळखला जातो. 

जॉर्जियन साहित्यातील वास्तववादापुढेही रशियन साहित्यादर्श होते. इल्या चाव्ह‌चाव्हड्‌झे (१८३७–१९०७) ह्याने वास्तववादी कादंबऱ्या लिहिल्या. अलेक्झांडर काझबेगी (१८४८–९३) ह्याने जॉर्जियन गिर्यारोहकांच्या जीवनावर कथा लिहिल्या. 

अकाकी त्सेरेतेली (१८४०–१९१५) ह्याने लिहिलेले Thornike Eristavi  हे महाकाव्य उल्लेखनीय आहे. जॉर्जियाच्या भूतकालीन माहात्म्याचे चित्र त्यात रेखाटले आहे. इव्हान माचाबेली (१८५४–९८) ह्याने शेक्सपिअरच्या अनेक नाट्यकृती जॉर्जियनमध्ये अनुवादिल्या. 

१८९० नंतरच्या काही वर्षात मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचे सूर काही कवींच्या आणि लेखकांच्या साहित्यकृतींतून उमटू लागले. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ‘ब्‍लू हॉर्न्स’ अशा इंग्रजी शीर्षकार्थाच्या एका मासिकातून फ्रेंच प्रतीकवादाने प्रभावित झालेले काही कवी उदयास आले. पी. आयश्व्हिली, टी. टॅबिड्‌से हे असे काही कवी होत. जी. रोबाकिड्‌से हा ह्या कवींचा नेता होता. १९१७ मध्ये रशियन क्रांती झाल्यानंतर जॉर्जियाला स्वातंत्र्य मिळाले आणि जॉर्जियन साहित्याच्या विकासाला विशेष उपकारक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२१ मध्ये जॉर्जियाचा सोव्हिएट प्रजासत्ताकात समावेश झाला. त्यानंतरच्या जॉर्जियन साहित्यावर साम्यवादाचा प्रभाव अपरिहार्यपणे पडलेला आहे. आयोसेब ग्रिशाशव्हिलीसारखे (१८८९–१९६५) कवी, शाल्व्हा दादीआनीसारखे (१८७४–१९५९) नाटककार आणि कॉन्स्टंटीन गामास्‌खुर्डीआसारखे  (१८१९–   ) कादंबरीकार हे काही श्रेष्ठ आधुनिक जॉर्जियन साहित्यिक होत.

कुलकर्णी, अ. र.