जॉर्जियन भाषा : कॉकेशस पर्वताच्या नैर्ऋत्य उतारावर बोलल्या जाणाऱ्या कॉकेशियन कुटुंबातील जॉर्जियन ही सर्वांत महत्त्वाची भाषा आहे. तिचा लिखित पुरावा पाचव्या शतकापासून उपलब्ध असून तेव्हापासूनच तिच्यात साहित्यनिर्मितीला सुरुवात झाली असे दिसते. आधुनिक काळातही तिच्यात उच्च दर्जाचे साहित्य होत आहे.
जॉर्जियन ही सोव्हिएट युनियनमधील जॉर्जिया या प्रजासत्ताकाची राज्यव्यवहाराची भाषा असून टिफ्लिस विद्यापीठात ती माध्यम म्हणून वापरली जाते. प्राचीन भाषेपासून ती फार दूर गेलेली नसली, तरी अभिव्यक्तीच्या दृष्टीने मात्र तिचा अतिशय विकास झाला आहे. तिच्या भाषिकांची संख्या वीस लाखांच्या आसपास आहे. प्रारंभी या भाषेसाठी फार्नावाझ या राजाने शोधून काढलेली म्खे द्रुली लिपी वापरात होती. तीत मोठी व छोटी अक्षरे हा भेद नव्हता. त्यानंतर खुचुरी ही लिपी प्रचारात आली. ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि तीत ३८ लेखनचिन्हे आहेत. त्यांपैकी स्वरांची ५, व्यंजनांची २८ व बाकीची आता प्रचारात नसलेली आहेत. ही लिपी जॉर्जियनच्या लेखनाला मात्र अत्यंत सोयीची आहे.
शब्दातील आघात नेहमी पहिल्या अवयवावर पण शेवटापासून तिसऱ्या अवयवापलीकडे न जाणारा असतो. भाषेतील बहुतेक शब्द स्वरान्त आहेत.
संदर्भ : Cohen, Marcel Meillet, Antoine, Les Langues du monde, Paris, 1952.
कालेलकर, ना. गो.