खंड-२ : या शब्दाचे तीन वेगवेगळे अर्थ आहेत: (१) व्यावहारिक, (२) सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी केलेला व (३) आधुनिक अर्थशास्त्रास संमत असलेला. हे तीन अर्थ वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारलेले असूनही खंड ही एकच संज्ञा त्यांच्यासाठी वापरली गेल्यामुळे अनेक वेळा या विषयावरील विवेचनात गोंधळ निर्माण होणे साहजिक आहे.
(१) व्यावहारिक अर्थ : व्यावहारिक दृष्ट्या ‘खंड’ हा शब्द कोणत्याही टिकाऊ उपभोग्य वस्तूच्या वापरासाठी तिच्या मालकाला देऊ केलेल्या भाड्याच्या संदर्भात सामान्यपणे वापरला जातो. उदा., एखाद्याने सायकल काही वेळापुरती भाड्याने वापरण्यासाठी घेतल्यास तिच्या मालकाला द्यावे लागणारे भाडे, हा खंड होय. त्याचप्रमाणे घरे, दुकाने इत्यादींचा वापर करणारे जेव्हा त्यासाठी भाडे भरतात, तेव्हा ते भाडे म्हणजे त्या वस्तूंच्या तत्कालीन वापरासाठी दिलेला खंड होय. हा तीन गोष्टींवर अवलंबून असतो- त्या वस्तूसाठी असलेली मागणी, तिचा भाड्यासाठी उपलब्ध होणारा पुरवठा व तिच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी तंत्रविद्या, यांवरून खंडाची निश्चिती होते.
(२) सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी केलेला अर्थ : सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी खंड हा शब्द एका विशिष्ट संकल्पनेसाठी वापरला आहे. ज्या उत्पादक घटकांचा पुरवठा किमतीनुसार लवचिक नसतो, म्हणजे जास्त किंमत दिली तरी वाढू शकत नाही, अशा घटकांच्या वापरासाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेलाच त्यांनी ‘खंड’ असे संबोधिले व तेही विशेषत: जमिनीसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेला उद्देशूनच. एखाद्या जमिनीत मालकाने काही गुंतवणूक करून तिच्यात सुधारणा केली असल्यास ती वापरताना जी रक्कम मालकास द्यावी लागते, तीमध्ये या गुंतवणुकीसाठी खर्च केलेल्या भांडवलावरील व्याजाचाही समावेश असतो, परंतु केवळ जमिनीच्या वापरासाठी जी रक्कम द्यावी लागते तिला ‘खंड’ ही संज्ञा आहे. मालकाला काहीही परिश्रम घ्यावे न लागता केवळ तो जमिनीचा मालक आहे म्हणून ही रक्कम मिळते. साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की, परिश्रम न करणाऱ्या मालकास खंड कशासाठी द्यावयाचा ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न डेव्हिड रिकार्डो (१७७२–१८२३) या अर्थशास्त्रज्ञाने केला. त्याच्या काळात इंग्लंडमधील जमिनीचे खंड बरेच वाढले होते. नेपोलियनशी कराव्या लागलेल्या लढायांमुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या किंमतींत बरीच वाढ झाली होती. खंड वाढल्यामुळे जमीनदार जनतेची पिळवणूक करून स्वत: गबर होत आहेत, अशी सर्वसाधारण समजूत झाली होती. रिकार्डोपूर्वी होऊन गेलेल्या ‘फिझिओक्रॅट्स’ (प्रकृतिवादी) म्हणून संबोधण्यात आलेल्या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे निसर्गाच्या सुबत्तेमुळे जमिनीसाठी खंड द्यावा लागतो. याउलट रिकार्डोचे म्हणणे होते की, सुपीक जमीन मुबलक नसल्यामुळे व तिची मागणी वाढली तरी ती वाढविता येणे शक्य नसल्यामुळे तिच्यासाठी बराच खंड द्यावा लागतो. त्याने असा सिद्धांत मांडला की, खंड म्हणजे जमिनीच्या नैसर्गिक व अविनाशी शक्तींच्या उपयोगासाठी द्यावी लागणारी किंमत होय. खंडाची त्याने केलेली ही व्याख्या आजच्या युगात आक्षेपार्ह वाटते. जमिनीच्या नैसर्गिक शक्ती कशाला म्हणावयाचे? आज उपलब्ध असलेली जमीन निसर्गदत्त किंवा नैसर्गिक म्हणता येईल काय? ती तर नैसर्गिक जमिनीवर अनेक पिढ्यांनी केलेल्या प्रक्रियांनंतर बनलेली जमीन आहे. शिवाय रिकार्डो म्हणतो त्या ‘अविनाशी’ शक्ती तरी कोणत्या? सांप्रतच्या अणुयुगात काहीही ‘अविनाशी’ आहे, असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. जमिनीच्या शक्ती अविनाशी असणे म्हणजे वर्षानुवर्षे कायम टिकणे शक्य आहे काय? जमिनींच्या सुपीकतेमध्ये बदल होऊ शकतो; सुपीक जमीन ओसाड बनू शकते; त्याचप्रमाणे वाळवंटदेखील सुपीक होऊ शकते, या आधुनिक वैज्ञानिक जगाचा अनुभव आहे तेव्हा खंड हा जमिनीच्या नैसगिक व अविनाशी शक्तींमुळे उद्भवतो, हे रिकार्डोचे म्हणणे सध्याच्या युगात मान्य करता येण्यासारखे नाही. खंडाचे मूळ, जमीन हा आवश्यक उत्पादक घटक असून तिचा पुरवठा किमतीनुसार लवचिक नाही, या वैशिष्ट्यातच आढळते. जमिनीसाठी मागणी वाढली, तरी अधिक जमीन उत्पन्न करता येत नाही, म्हणूनच तिच्या वापरासाठी मालकास खंड घ्यावा लागतो. रिकार्डोचा ‘नैसर्गिक व अविनाशी शक्ती’ हा शब्दप्रयोग जमिनीचा पुरवठा लवचिक नाही–किंमतीनुसार तो बदलू शकत नाही– अशा अर्थाने घेणेच आज उचित होय. रिकार्डोच्या म्हणण्याप्रमाणे खंड हा फक्त जमिनीसाठीच द्यावा लागतो. निरनिराळ्या जमिनी कमीअधिक प्रमाणावर सुपीक असतात किंवा बाजारात पीक विकण्याच्या दृष्टीने कमीअधिक सोईस्कर जागी असतात. यामुळेच खंड उद्भवतो असे त्याचे म्हणणे होते. ज्या जमिनीवरील पिकापासून होणारे उत्पन्न मशागतीच्या खर्चाइतकेच असते. ती जमीन सीमांत जमीन होय. तिला खंड नसतो. तिच्याहून सुपीक असलेली किंवा अधिक सोईस्कर असलेली जमीन शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळवून देते; तिला सीमांतांतर्गत जमीन म्हणावयाचे. अशा जमिनीवरील पिकाच्या उत्पन्नातून मशागतीचा खर्च वजा जाता जो वाढावा राहतो, तोच त्या जमिनीचा खंड. सीमाबाह्य जमिनीवरील मशागतीचा खर्च तिच्यावरील उत्पन्नापेक्षा जास्त असतो म्हणून ती लागवडीखाली आणली जात नाही. मात्र जसजसा लोकसंख्येचा उत्पादनसाधनांवरील दाब वाढतो व अन्नधान्यांची मागणी वाढून त्यांच्या किंमती वाढत जातात, तसतशा सीमाबाह्य असलेल्या कमी सुपीक किंवा गैरसोईच्या जमिनी लागवडीखाली आणल्या जातात व अधिक सुपीक जमिनींवरील मशागतीचा खर्च तेवढाच असल्यामुळे त्यांच्यावरील खंडामध्ये भर पडत जाते. थोडक्यात म्हणजे, रिकार्डोच्या मते खंड हा जमिनीच्या बाबतीतच उद्भवतो व तोही गुणस्थितीमधील भेदामुळे द्यावा लागतो. त्याच्या विवेचनानुसार आऱ्हासी सीमांत प्रत्याय तत्त्वही फक्त जमिनीच्या बाबतीतच लागू आहे.
(3) आधुनिक खंड सिद्धांत : आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते खंड जमिनीपुरताच मर्यादित नसून सर्व घटकांच्या बाबतीत आढळणारा आणि विशिष्ट परिस्थितीत निर्माण होणारा उत्पन्न प्रकार आहे. रिकार्डो आणि अन्य सनातन पंथीयांनी खंड केवळ जमिनीशी निगडित असल्याचे मानले, कारण त्यांच्या समजुतीप्रमाणे सर्व घटकांपैकी जमीन हा एकच घटक विशिष्टोपयोगी असतो. परंतु, वास्तविक पाहता आधुनिक सिद्धांताप्रमाणे अन्य घटकही विशिष्ट परिस्थितीत विशिष्टोपयोगी असतात. ज्याप्रमाणे अन्य घटक विविधोपयोगी असतात, त्याप्रमाणे जमीन हा घटकही विविधोपयोगी असतो. आधुनिक सिद्धांतानुसार जमिनीतील गुणभेदांचा खंडाशी काहीही संबंध नाही. सर्व जमीन सारखीच असली, तरी विशिष्ट उपयोगासाठी ती दुर्मिळ असल्यास खंड द्यावा लागेलच. खंड हा शब्द ‘आधिक्य’ किंवा ‘वाढावा’ या अर्थी वापरला असतो. तो जमिनीपुरता मर्यादित न ठेवता सर्व घटकांना लागू करता येतो. कोणत्याही घटकाचा उपयोग करून द्यावयाचा झाल्यास त्यासाठी किमान किंमत द्यावी लागते. तो घटक अन्यत्र आकर्षिला जाऊ नये म्हणून द्यावा लागणारा मोबदला म्हणजे खंड. सर्वसाधारणपणे सर्व घटकांचा मोबदला सीमांत उत्पादनाक्षमतेइतका धरला, तर त्यापेक्षा जास्त मिळणारा मोबदला म्हणजे खंड होय. विशिष्ट उपयोगासाठी उत्पादक घटक वापरता यावा म्हणून त्यास कमीत कमी अन्यत्र मिळू शकेल इतका मोबदला तर दिलाच पाहिजे. हा मोबदला म्हणजेच त्याची बदली किंमत. प्रत्यक्ष त्या घटकासाठी द्यावी लागणारी किंमत व ही बदली किंमत यामधील फरक म्हणजे खंड होय. उदा., एखादा कारागीर एका व्यवसायात दोनशे रु. वेतन मिळवीत असेल, तर त्याला अन्य व्यवसायात आकर्षित करून घेण्यासाठी कमीतकमी दोनशे रु. वेतन तर द्यावेच लागेल. ही त्याची बदली किंमत होय. समजा, अन्य व्यवसायात त्याला अडीचशे रु. देऊ केले, तर त्यास पन्नास रुपये इतके ‘अतिरिक्त वेतन’ मिळेल. यालाच त्या कारागिराचा खंड म्हणावयाचे. रिकार्डोच्या म्हणण्याप्रमाणे खंड म्हणजे उत्पादनखर्चापेक्षा जादा मिळणारे उत्पन्न, तर आधुनिक सिद्धांताप्रमाणे बदली उत्पन्नापेक्षा अधिक असलेल्या उत्पन्नासच खंड म्हणावे.
आभास खंड (खंडनिभ): जमिनीप्रमाणेच इतर उत्पादन घटक विशिष्ट परिस्थितीत दुर्मिळ झाले की, त्यांना खंडसदृश उत्पन्न प्राप्त होते. कोणताही घटक मागणीच्या मानाने अपुरा पडू लागला की, त्यास तात्पुरते जादा उत्पन्न मिळू लागते. दीर्घकाळाने त्या घटकाचा पुरवठा वाढला की, वाढलेली मागणी पुरी होऊ शकते आणि तात्पुरता मिळालेला जादा मोबदला मिळेनासा होतो. अल्पकाळांसाठी मिळणारा हा मोबदल्याचा वाढावा म्हणजे जणू काही खंडच होय. त्याला ‘आभास खंड’ वा ‘खंडनिभ’ अशी संज्ञा आहे. कोठल्याही घटकास तात्पुरता मिळणारा अतिरिक्त नफा म्हणजे त्याचा अभ्यास खंड. जमीन व अन्य उत्पादक घटक यांमधील एक फरक म्हणजे निसर्गदत्त जमिनीची दुर्मिळता अल्पकालीनच नव्हे, तर दीर्घकालीनही असते; अन्य घटक मात्र केवळ अल्पकाळापुरतेच दुर्मिळ असतात. दीर्घकाळात त्यांचा पुरवठा सहज वाढविता येतो. दीर्घकाळात अन्य घटकांच्या उत्पन्नातील खंडसदृश भाग शिल्लक राहत नाही; तो नाहीसा होतो. म्हणूनच त्याला ‘खंड’ असे न म्हणता ‘खंडसदृश उत्पन्न’ (आभास खंड ) असे म्हणतात.
खंड आणि वस्तूची किंमत: रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार खंड हे वरकड उत्पन्न आहे. जमिनीवरील पिकांची किंमत सीमांत जमिनीच्या मशागतीच्या खर्चाने ठरते. त्याचे हे विचार त्याने मांडलेल्या श्रममूल्य सिद्धांताशी जुळतात. श्रम आणि भांडवल यांच्या परिमाणांच्या सहकार्याने उत्पादन होत असते. भांडवल म्हणजे यंत्रसामग्री व अवजारे. ही मानवी श्रमनिर्मित असल्याने त्यांच्यामध्ये भूतकाळाचे श्रम साठविलेले असतात. यास्तव कोणत्याही वस्तूची किंमत रिकार्डोच्या मते त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या श्रमाने ठरते. परंतु जमिनीच्या खंडाचे स्पष्टीकरण देताना अडचणी उत्पन्न होतात. जमीन ही निसर्गाची देणगी आहे, तिला उत्पादन-परिव्यय नाही. म्हणून पिकाच्या उत्पादन-परिव्ययात खंडाचा अंतर्भाव नाही. जमिनीवरील खंड हा किंमतीचा परिणाम आहे; किंमतीवर खंडाचा परिणाम होत नाही, असे रिकार्डोने प्रतिपादिले.
रिकार्डोची ही विचारप्रणाली ‘प्रत्येक जमिनीला एकच विशिष्ट उपयोग आहे’ या गृहीतकृत्यावर आधारलेली आहे. वास्तविक जमिनीला पर्यायी उपयोग असतात. त्यामुळे जमीन आणि इतर उत्पादन-घटकांचे परिणाम एका विशिष्ट उपयोगात आणावयाचे, म्हणजे त्याला पर्यायी मूल्य दिले पाहिजे. हे पर्यायी मूल्य उत्पादन-परिव्ययाचा भाग ठरते; आणि म्हणून किंमतीत त्याचा समावेश करावाच लागतो, असा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आहे.
धोंगडे, ए. रा.