दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेच्या विकासाची नवी दालने खुली झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि ज्ञाननिर्मिती यांचा विकास करण्याकरिता जी अनेक पावले उचलली, त्यांतले महत्त्वाचे पाऊल म्हणजे दि. १ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्हीं गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन ज्ञानशाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मंडळाकडून मराठी विश्वकोशाच्या नऊ खंडांचे प्रकाशन करण्यात आले.

पुढे विश्वकोशाच्या कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन दि. १ डिसेंबर १९८० रोजी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यार्थ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली. या आधी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा अनेक शास्त्रांचे ज्ञान मराठी भाषेतून करून देणारा प्रकल्प श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी स्वबळावर हाती घेऊन पूर्ण केलेला आहे.

इंग्लीश भाषेतून प्रकाशित झालेला आणि जगातील विद्वज्जनांकडून मान्यता पावलेला एन्‌सायक्लोपिडिया ब्रिटानिका या कोशाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती करावी असे ठरले. प्राज्ञ पाठशाळेच्या माध्यमातून संस्कृतचे अध्ययन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर ही जबाबदारी आली आणि मराठी विश्वकोशाचे कार्य सुरू झाले. या प्रकल्पासाठी आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केली. विश्वकोशाचे संपादकीय कार्यालय ज्या वास्तूत आहे, त्या वास्तूची पायाभरणी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते दि. ११ ऑक्टोबर १९५९ रोजी वाई, जि. सातारा येथे झाली.

मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना, संशोधकांना, अभ्यासकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व माहिती उपलब्ध करून देणे हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू होता. मराठी विश्वकोशाची निर्मिती सर्वविषयसंग्राहक स्वरूपात अकारविल्हे करावी असे ठरविण्यात आले. एन्‌सायक्लोपिडिया ब्रिटानिका या कोशाचे संपादकीय कार्य तसेच त्याची कार्यप्रणाली यांचे प्रत्यक्षरीत्या आणि अप्रत्यक्षरीत्या अवलोकन करण्यात आले आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व पूर्वतयारीसाठी अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि सदस्य म्हणून श्री. गोवर्धन पारीख, श्री. गो. वा. बेडेकर, श्री. ना. गो. कालेलकर, श्री. आ. रा. देशपांडे, श्री. अनंत काणेकर, श्री. वि. भि. कोलते, श्रीमती सरोजिनी बाबर यांसारख्या मातब्बर व्यक्ती कार्यरत होत्या. प्रारंभी मराठी विश्वकोशाचा आराखडा बनविण्यात आला. मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रविद्या या दोन कक्षांसाठी विश्वकोशात प्रत्येकी ८५०० पृष्ठे राखण्यात आली आणि या दोन कक्षांत येणार्‍या विषयांच्या व्याप्तींनुसार प्रत्येक विषयासाठी पृष्ठे राखून ठेवण्यात आली. यासोबतच विषयपूरक अशी चित्रे आणि चित्रपत्रे यांची योजनाही करण्यात आली.

मराठी विश्वकोशाची निर्मिती ही जागतिक पातळीशी समांतर असणाऱ्या कोशानुरूप करावयाची असल्याने त्या दर्जाचे जागतिक संदर्भमूल्य असणारे ग्रंथालय उभे करावयाचे होते. त्या दृष्टीने तर्कतीर्थांनी विशेष प्रयत्न केले. विश्वकोशातून वाचकांसमोर येणारी माहिती ही अधिग्राह्य असावी यासाठी अधिग्राह्य अशा संदर्भग्रंथांची खरेदी केली. विशेष प्रयत्न म्हणून भारतीय दूतावासांतील त्या-त्या देशांनी त्यांच्या देशातील ज्ञान आणि माहिती यांचे अधिग्राह्य ग्रंथ विश्वकोशाच्या ग्रंथालयास पाठविले. त्यातूनच मराठी विश्वकोशाचे सुसज्ज असे संदर्भ ग्रंथालय उभे झाले. या ग्रंथालयाच्या भक्कम आधारावरच विश्वकोशाची उभारणी होणार होती.

एखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सर्व भौतिक आणि मानवी संसाधने उभी करणे हे कार्य परिश्रमांनीच साध्य होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लोकसंपर्क दांडगा होता आणि त्या काळात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या महान नेत्यांनाही त्यामुळे मराठी विश्वकोशाच्या आणि तर्कतीर्थांच्या एकूण कार्याबद्दल आस्था होती. त्यामुळे त्या काळातील महान भारतीय नेते आणि विद्वान मंडळी मराठी विश्वकोशाच्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देत असत. त्यांमध्ये प्रामुख्याने भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मा. सुधाकरराव नाईक यांचा समावेश होतो. या सर्व लोकांच्या सक्रिय प्रोत्साहनाने विश्वकोशाचे कार्य पुढे आले.

मुद्रणाची व्यवस्था हा त्या काळातील महत्त्वाचा प्रश्न होता. ही सर्व व्यवस्था त्या काळी केवळ मुंबईलाच होत असे. वाईला संपादकीय व्यवस्थेबरोबर मुद्रणाची व्यवस्थाही उपलब्ध व्हावी यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुढाकार घेऊन ९ एप्रिल १९७२ ला वाईत स्वतंत्र मुद्रणालयाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशासाठी वाईतील रास्तेवाडा खरेदी केला आणि या वाड्यात स्वतंत्र मुद्रणालय उभारले. मुद्रण आणि संपादन यांमध्ये सुयोग्य समन्वय झाला आणि विश्वकोशाच्या मुद्रण कार्याला गती आली.

विश्वकोशाच्या मूर्त कार्याला सुरुवात करताना गरज होती ती विषयघटक निवडण्याची. मानव्यविद्या आणि विज्ञान व तंत्रविद्या हे मराठी विश्वकोशाचे दोन घटक ठरलेले होते. त्यांमधले विषयही ठरलेले होते. परंतु नोंद म्हणून ज्या विषयाचा समावेश विश्वकोशात करावयाचा आहे, त्या घटकांची निश्चिती मंडळाला करावयाची होती. जे घटक अंतर्भूत करावयाचे, त्यांचे निकष ठरवून त्यांची निश्चिती करावयाची होती. यासाठी महाराष्ट्रीय संस्कृती, भारतीय संस्कृती आणि जागतिक परिप्रेक्ष्य हा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. शिवाय नोंदी ठरविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. एन्‌साक्लोपिडिया ब्रिटानिका, एन्‌सायक्लोपिडिया अमेरिकाना, कोलियर्स आणि इतर जागतिक दर्ज्याच्या कोशांनी कोणत्या विषयांची नोंद घेतली आहे, कोणत्या विषयाला किती शब्दमर्यादा दिली आहे यांचा अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्रीय आणि भारतीय परिप्रेक्ष्याच्या संदर्भात त्यांतील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आणि १८,००० विषयघटकांची नोंदयादी तयार करण्यात आली. शब्दमर्यादा ठरविण्यात आली. सोबतच लेखक, समीक्षक आणि त्या-त्या विषयातील तज्ज्ञ यांचा शोध घेऊन तशा याद्या तयार करण्यात आल्या आणि मराठी विश्वकोशाच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

या विश्वकोशाचे लेखनकार्य मराठीमधून करत असताना पारिभाषिक शब्दांची खूप अडचण होतीच. पाश्चिमात्य देशांमध्ये निर्माण झालेल्या कोशांसाठी वापरून रूढ झालेली भाषा आणि पारिभाषा उपलब्ध होती. शिवाय मराठी विश्वकोशात जगातल्या हजारो भाषांमध्ये विखुरलेल्या ज्ञानविज्ञानाचे लेखन मराठी भाषेत करावयाचे आव्हान होते. यासाठी केंद्र सरकारने निर्माण केलेल्या पारिभाषिक शब्दसंग्रहाचा वापर करण्यात आला. मात्र मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी आणि तो-तो विषय समर्पक परिभाषेतच वाचकांसमोर जावा यासाठी मराठी विश्वकोशाने आधी परिभाषा कोशाची निर्मिती केली. जागतिक दर्जाच्या अनेकविध कोशांचा अभ्यास करून त्यांतील शब्दांसाठी मराठी शब्दांची घडण नव्याने करण्यात आली. १९७३ साली या परिभाषा खंडाचे प्रकाशन करण्यात आले आणि बदलत्या भाषिक वातावरणासह या परिभाषा संग्रहाच्या आधारे मराठी विश्वकोशातील घटकांचे लेखनकार्य करण्यात आले.

विश्वकोश हा एक पूर्ण प्रकल्प होता. त्याच्या आराखड्याप्रमाणे १७ संहिता खंड, सूचिखंड, परिभाषा खंड आणि नकाशा खंड अशा सर्व खंडांचे लेखन आणि प्रकाशन एकत्रच करावयाचे होते. त्या दृष्टीने सर्व कार्य एकत्रितरीत्या चालू होते. परंतु लेखन आणि मुद्रण पूर्ण झालेले खंड वाचकांसमोर लवकर यावेत या दृष्टीने भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांच्या हस्ते पहिल्या पाच खंडांचे प्रकाशन १९७६ मध्ये करण्यात आले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष उमाशंकर जोशी यांच्या हस्ते दि. ०९-०५-१९७९ रोजी विश्वकोशाचा सहावा आणि सातवा खंड यांचे प्रकाशन करण्यात आले.

जसजसा काळ पुढे सरकत होता, तसतसे नवे विषय आणि नव्या योजनाही मराठी विश्वकोशात अंतर्भूत होत होत्या. मे १९९४ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन झाले. तोवर मराठी विश्वकोशाच्या एकूण सर्वच खंडांतील नोंदींचे लेखन झाले होते. १५ खंडांचे प्रकाशनही झाले होते. तर्कतीर्थांनंतर मे. पुं. रेगे आणि रा. ग. जाधव यांनी विश्वकोशाच्या या प्रकल्पाला आकार दिला. २००३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकांत जिचकार यांनी तत्कालीन राष्ट्रपती ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत विश्वकोश वार्षिकी या सर्वविषयक अद्ययावत माहितीच्या वार्षिकांकाचे प्रकाशन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वार्षिकी उपयुक्त आहे.

२००८ साली मराठी विश्वकोशाच्या १८ व्या खंडाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रकाशन समारंभात मा. विलासराव देशमुख यांनी विश्वकोश हा कोशात न राहता तो जगात पोहचावा ही भावना व्यक्त केली. ही भावना लक्षात घेऊन आणि बदलते तंत्रज्ञान आणि त्याची सहजसुलभ उपलब्धता लक्षात घेऊन मराठी विश्वकोशाचे सर्व खंड वाचकांना महाजालावर बघता यावेत या दृष्टीने योजना आखण्यात आली.

योजनेचा पहिला भाग म्हणजे मराठी विश्वकोशाच्या १ ते १७ खंडांची एकत्रित सीडी तयार करण्यात आली आणि शासनातर्फे ती वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी विश्वकोशाचे सर्व प्रकाशित खंड महाजालावर टाकून ते वाचकांना मोफत उपलब्ध करून देणे हा होता. पुण्यातील प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) या केंद्र सरकारच्या संस्थेद्वारे मराठी विश्वकोशाचे सर्व खंड सहज शोधक्षम अशा प्रारूपात महाजालावर टाकण्यात आले. प्रारंभी या सर्व खंडांचे पुनर्मुद्रण महाजालास योग्य अशा टंकामध्ये करण्यात आले आणि त्यानंतर सर्व खंड वाचकांसाठी लोकार्पित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील इतर विश्वकोशांच्या तुलनेत मराठी विश्वकोशाला आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून तो महाजालकावर आणण्याचा हा सर्वोत्तम प्रयत्न होता.

२०११ साली पहिल्या खंडाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महामहिम राज्यपाल श्री. के. शंकर नारायणन, श्री. जयंत नारळीकर, श्री. अनिल काकोडकर, श्री. नरेंद्र जाधव, श्री. रा. ग. जाधव अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी विश्वकोशाचे खंड कालांतराने आणि कालानुक्रमे महाजालावर टाकण्यात आले.

मराठी विश्वकोशाच्या पुढील खंडांचे कार्य अविरत चालू आहे. १९ डिसेंबर २०१४ साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मा. संजय देवतळे यांच्या हस्ते मराठी विश्वकोशाच्या १९ व्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले.

खंड २० हा पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मोठा होणार ही बाब लक्षात घेऊन पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे या खंडाचे दोन भाग करण्यात आले. मराठी विश्वकोश खंड २० च्या पूर्वार्धाचे प्रकाशन जानेवारी २०१५ मध्ये लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आले.  खंड २० च्या उत्तरार्धाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जून २०१५ मध्ये करण्यात आले. मराठी विश्वकोशाचा जो संकल्पित आराखडा होता, त्या आराखड्याप्रमाणे मराठी विश्वकोशाचे सर्व संहिता खंड (अंक ते ज्ञेयवाद) प्रकाशित झाले आहेत.

मराठी विश्वकोशाचा जो संकल्पित आराखडा होता, त्या आराखड्याप्रमाणे मराठी विश्वकोशाचे सर्व संहिता खंड (अंक ते ज्ञेयवाद) प्रकाशित झाले आहेत. मराठी विश्वकोश सूचिखंड आणि परिभाषा खंड या खंडांचे संपादकीय कार्य सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत विश्वकोशाचे २० खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्व खंडांचे लोकार्पण भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे (मोबाईल ॲप) दि. १२ जानेवारी २०१८ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते वाई येथे करण्यात आले. जगभरातील लोकांच्या हातात मराठी विश्वकोशाचे खंड देणे हे या उपयोजकामुळे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या वीस खंडांतील माहिती या उपयोजकामध्ये समाविष्ट केली आहे. हा उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरून विनामूल्य डाउनलोड करता येईल. अँड्रॉईड, आय फोन झिंगल या प्रमुख मोबाईल प्रणालींमध्ये हा उपयोजक वापरता येणे शक्य आहे.

विश्वकोशाच्या २० खंडांमध्ये संपादित व संकलित केलेली माहिती कोणाही व्यक्तीला सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी हा उपयोजक बनविला आहे. याचा फायदा जगभरातील मराठी भाषेचे वाचकांना व अभ्यासकांना होईल. बुकगंगा.कॉम, पुणे या संस्थेने हा उपयोजक सामाजिक जाणिवेतून विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे, तसेच हा उपयोजक जास्तीत जास्त वाचकांनी डाउनलोड करावा आणि ज्ञानाच्या खजिन्याचा लाभ घ्यावा

मराठी विश्वकोशाचा प्रकल्प सुरू होऊन ५ दशके लोटली. दरम्यान मराठी विश्वकोशाच्या लेखनाचे, समीक्षणाचे आणि संपादनाचे कार्य निरंतर सुरू होते. ज्या वेळी ज्या खंडाचे लेखन संपादन सुरू असायचे, त्या काळातील अद्ययावत माहितीचा अंतर्भाव त्यात करण्याचा प्रयत्न संपादकांनी केला आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळामुळे निर्माण झालेल्या ज्ञानाचा प्रस्फोट बघता या माहितीच्या अद्ययावतीकरणाला काही मर्यादा पडल्या. त्यामुळे मराठी विश्वकोशाच्या एकूण सर्व प्रकल्पाच्या संदर्भात अद्ययावतीकरणाचा प्रश्न होता. २०१५ ऑगस्टला विद्यमान अध्यक्ष मा. दिलीप करंबेळकर यांनी मंडळाची सूत्रे हाती घेतली. मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी ज्ञानमंडळ ही संकल्पना पुढे आणली. विश्वकोशात प्रकाशित झालेल्या सर्व माहितीचे अद्ययावतीकरण करण्याअगोदर त्याची विषयवार विभागणी करावी. प्रत्येक विषयाचे स्वतंत्र ज्ञानमंडळ करावे अशी ती योजना आहे. अशा प्रकल्पाचा भविष्यात अवलंब करावा असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मूळ मराठी विश्वकोशाच्या परिचय ग्रंथात सुचविले होते. त्याप्रमाणे मानव्यविद्या आणि तंत्रविद्या या दोन विद्याशाखांमधील वेगवेगळ्या विषयांची ६० ज्ञानमंडळे स्थापन करण्याची ही योजना आहे. मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण हा या योजनेचा प्राथमिक उद्देश असला, तरी या निमित्ताने संपूर्ण मराठी विश्वकोशाचे लेखन आणि संपादन नव्याने होणार आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६० च्या दशकात हा प्रकल्प उभा करताना अनेक लेखक, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशविदेशातील मार्गदर्शक यांचा पाठिंबा मिळविला होता. ज्ञानमंडळाची ही योजनाही व्यापक स्वरूप असणारी असल्याने तिला राज्यातील सर्वच तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, संशोधक आणि विविध विद्याशाखीय संस्था यांचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग मिळणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन मा. दिलीप करंबेळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम विद्यासागर राव यांची भेट विश्वकोश मंडळाच्या शिष्टमंडळांसह प्रांरभीच घेतली. महाराष्ट्रातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था यांनी मराठी विश्वकोशाच्या या ज्ञानमंडळात सक्रिय योगदान द्यावे यासाठी राज्यपालांनी कुलपती म्हणून आवाहन करावे यासाठी ही भेट होती.

‘ज्ञानमंडळ’ या योजनेस मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांशी सामंजस्य करार करून त्या-त्या विद्यापीठातील तज्ज्ञांकडे त्यांच्या-त्यांच्या विषयांच्या संपादनाची जबाबदारी सोपविली आहे. अशा पद्धतीने सामंजस्य करार करून आजवर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या पालकत्वाखाली ज्ञानमंडळांतर्फे संपादनाचे कार्य सुरू आहे.