खेळ व मनोरंजन  :  महाराष्ट्रात खेळ, व्यायाम व मनोरंजन यांची प्रदीर्घ परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली असून, ती एकूण लोकजीवनास व समाजस्वास्थ्यास सातत्याने उपकारक ठरली आहे. प्राचीन संतवाङमयात ⇨ आट्यापाट्या, हुतुतू, गोट्या इ. खेळांचे जे रूपकात्मक उल्लेख सापडतात, त्यावरून ते खेळ तत्कालीन समाजजीवनात रूढ असावेत असे दिसते. इतरही अनेक खेळांचे व रंजनप्रकारांचे उल्लेख तत्कालीन लोकगीते, लोकनृत्ये यांतून आढळतात.

महाराष्ट्रात वैदिक काळात द्यूतक्रीडा, ⇨ फाशांचे खेळ, ⇨ धनुर्विद्या, ‘मृगया’ म्हणजे ⇨ शिकार  इ. खेळ प्रचलित असल्याचे उल्लेख आढळतात. तसेच यज्ञ,समनादी उत्सवप्रसंगी घोड्यांच्या वा रथांच्या शर्यती, सामूहिक नृत्ये इ. होत असत. सातवाहन काळापासून विविध प्रकारचे करमणुकीचे खेळ महाराष्ट्रात रूढ असल्याचे दिसून येते. सातवाहनकालीन लोक सोंगट्या खेळत असत. ⇨ कुस्ती  हा महाराष्ट्राचा खास देशी प्रकार सातवाहन काळाइतका प्राचीन आहे. गाथासप्तशतीत (इ. स. पहिले-दुसरे शतक) मल्लयुद्धाचे निर्देश आढळतात.


रस्त्यावरील डोंबारी-कसरतीचा लोकरंजनप्रकार.

यादवकाळात गारूडी व कोल्हाटी (डोंबारी) लोकांचे ⇨ कसरतीचे खेळ,  ⇨ कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इ. रंजनप्रकार लोकप्रिय होते. द्यूत वा सारिपाट हाही लोकप्रिय होता. कुस्ती,कोलदांडू, ⇨ लगोऱ्या, चेंडूचे  खेळ,हमामा,सूरकांडी (सूरपारंबी) हे खेळ मुलांमध्ये प्रिय होते. लहान मुलामुलींच्या खेळण्यांमध्ये मातीची व लाकडी खेळणी, बाहुल्या,चित्रे इत्यादींचा समावेश असे. बैठ्या खेळांमध्ये भिंगरी,तारांगुळी,चिंचोरे,कवड्या इत्यादींचे उल्लेख सापडतात. बहमनीकाळात उत्तर भारतातून काही खेळ महाराष्ट्रात आले, त्यांपैकी ⇨ बुद्धिबळ हा खेळ जास्त लोकप्रिय ठरला. प्राचीन काळी तो ‘चतुरंग’ या वेगळ्या नावारूपाने खेळला जात होता. त्याशिवाय चौसर,गंजीफा इ. खेळही खेळले जात. विटीदांडू,चेंडूफळी,लगोऱ्या,  ⇨ भोवरा,सूरपारंबी,पटपट सावली,  ⇨ लपंडाव, वावडी वा ⇨ पतंग, एकीबेकी, हुतुतू, हमामा इ. खेळ मुलांमध्ये प्रिय होते. यांपैकी ⇨ विटीदांडू हा खेळ दक्षिणेतून महाराष्ट्रात आला. त्याचे मूळ नाव ‘वकट-लेंड मूंड’ असे होते. पिंगा, ⇨ फुगडी,टिपरी  इ. मुलांचे  खेळ  प्रचलित होते. जनजीवनात लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून मानले गेलेले वाघ्या-मुरळी,भुत्या,वासुदेव, ⇨ बहुरूपी,पोतराज इ. लोकरंजनाचे कार्य करीत. कथाकीर्तन, ⇨ गोंधळ,  ⇨ भारूड इ. प्रकारची धार्मिक उद्बोधन करणारी करमणूक त्याकाळी रूढ होती. त्याचबरोबर बैल,रेडे,एडके,कोंबडे इ. ⇨पशूंच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती,हत्तीची ⇨ साठमारी, साप-मुंगूसाची लढाई, अस्वले, माकडे इ. प्राण्यांच्या कसरती, ⇨ जादूचे खेळ, ⇨ पत्ते व पत्त्यांचे खेळ   इ. महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेले लोकरंजनप्रकार होत.

खास जनानी खेळ म्हणून ओळखले जाणारे फुगडी, पिंगा, टिपरी,झिम्मा,कीस बाई कीस,आगोटा-पागोटा, कोंबडा यांसारखे नृत्य-खेळ मुली व स्त्रिया नागपंचमी,गौरी,हदगा इ. सणांच्या प्रसंगी खेळत.

मराठेशाहीत ⇨ लाठी, ⇨ बोथाटी, ⇨ फरीगदगा, कुस्ती,⇨ लेझीम इ. मर्दानी खेळ लोकप्रिय होते. कुस्त्यांचे आखाडे व स्वतंत्र ⇨ व्यायामशाळा शिवकाळापासून अस्तित्वात आल्या. सुदृढ शरीरसंपदा आणि उत्तम बलोपासना यांसाठी दंड,जोर,बैठका, ⇨ सूर्यनमस्कार, ⇨ मल्लखांब  इ. व्यायामप्रकार मुले व तरूण यांच्यात मोठ्या प्रमाणात रूढ होते. शरीरस्वास्थ्यासाठी केले जाणारे ⇨ प्राणायाम व ⇨ योगासने यांनाही फार जुन्या काळापासूनचा वारसा आहे. कथाकीर्तनांबरोबरच लोकशाहीरांच्या लावण्या व पोवाडे ही जनसामान्यांच्या मनोरंजनाची या काळातील खास प्रभावी साधने होती.

जगताप,नंदा

लष्करी व शारीरिक शिक्षणाची सांगड हे महाराष्ट्राच्या क्रीडाविषयक इतिहासाचे वैशिष्टय आहे. शिवकालीन आखाड्यांत तरूणांना जोर,जोडी,कुस्ती यांबरोबरच धनुर्विद्या,दांडपट्टा,बोथाटी,तलवारबाजी,भालाफेक, ⇨ अश्वारोहण वगैरे शारीरिक कौशल्याचे प्रकार शिकविले जात. पेशवेकाळात होऊन गेलेले बाळंभटदादा देवधर हे आधुनिक मल्लविद्येचे प्रणेते होत. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य दामोदर गुरू यांनी मल्लविद्येची अपूर्व सेवा केली. त्यांनी मल्लखांबविद्येचा प्रचार महाराष्ट्रात केला. तसेच ठिकठिकाणी व्यायामशाळाही स्थापन केल्या.

महाराष्ट्रात शिक्षण संचालनालयाची स्थापना १८५५ मध्ये झाली. त्या दृष्टीने शासकीय प्रयत्नांच्या पुढाकराने झालेल्या महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षणाच्या वाटचालीचा मागोवा दोन कालखंडात घेता येईल : पहिला कालखंड शिक्षण संचालनालयाच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत (१८५५-१९४६) आणि दुसरा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळापासून -१९४७ पासून – ते आजतागायत.


स्वातंत्र्यपूर्व काळ : महाराष्ट्रात सुरूवातीला अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात शारीरिक शिक्षण ही आवश्यक बाब म्हणून समजली जात नव्हती. मात्र ज्या संस्थांमध्ये पाश्चिमात्य अधिकारी काम करीत होते, त्या ठिकाणी कसरतीचे खेळ, ⇨ क्रिकेट,⇨ फुटबॉल, ⇨ व्यायामी व मैदानी खेळ इ. अनेक प्रकार ऐच्छिक स्वरूपात सुरू झाले होते.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युवकांना शरीरस्वास्थ्य,शारीरिक  सुदृढता, कौशल्य  आदींबाबत  मार्गदर्शन  करणाऱ्या  संस्था म्हणजे प्रामुख्याने व्यायामशाळा, तालमी व आखाडे होत. स्थानिक प्रतिष्ठित  व्यायामप्रेमी  मंडळी  अशा संस्थांमधून विनामूल्य काम करून विद्यार्थ्यांना भारतीय व्यायामप्रकारांबद्दल मार्गदर्शन करीत असत. शिवाय राष्ट्रप्रेम,स्वदेशाभिमान,चारित्र्यविकास व उत्तम नागरिकत्व यांचेही शिक्षण त्यांना मिळत असे. पुढे १९१० ते १९३० या काळात त्यावेळच्या शिक्षणतज्ञांमध्ये शारीरिक शिक्षणाबद्दल जाणीव व आस्था निर्माण झाली आणि पी. सी. रेन, एफ्. वेबर,ए. जी. नोरेन यांसारख्या पाश्चिमात्य शारीरिक शिक्षणतज्ञांच्या मदतीने शिक्षकांकरिता प्रशिक्षण  वर्ग  सुरू  करण्यात आले. हे प्रयत्न शासकीय पातळीवर झाले.  अशा शिक्षकांच्या मदतीने काही शाळांतून ⇨कवायती व संचलने  तसेच काही खेळ यांची सुरूवात झाली. याशिवाय भारतीय व्यायामपद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या ‘जुम्मादादा व्यायाम मंदिर’,बडोदे ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’,अमरावती ‘महाराष्ट्रीय मंडळ’,पुणे अशा काही संस्थांनी उन्हाळ्याच्या सुटीत शारीरिक शिक्षणाचे वर्ग सुरू करून व्यायाम-शिक्षक तयार केले. १९२७ मध्ये शारीरिक शिक्षणाची सुरूवात शिक्षणसंस्थांतून कशी करावी,ह्याबाबत सल्ला देण्यासाठी कन्नैयालाल मुनशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पण शासनाचे आर्थिक पाठबळ नसल्याने या समितीच्या अहवालावर कार्यवाही होऊ शकली नाही. या सुमारास मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने कानिटकर, शहा व रॉलिंग्टन यांनी एक योजना तयार केली, ही योजना प्रथम पुण्यात प्रायोगिक पातळीवर राबवण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या तुकड्या पाडून दररोज ४० ते ४५ मिनिटांचे वर्ग सुरू झाले व त्यांत व्यायाम, ⇨ खोखो, आट्यापाट्या,  ⇨ कबड्डी,फुटबॉल इ. खेळांचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले.

ह्याच सुमारास बडोद्याचे आबासाहेब मुजुमदार (करंदीकर) यांनी व्यायामज्ञानकोशाचे १० खंड (१९३६-४९) प्रसिद्ध करून क्रीडा-विषयक माहितीचे पद्धतशीर संकलन केले. तसेच ⇨स्वामी कुवलयानंद (१८८३-१९६६) यांनीही योगविद्येचे शास्त्रीय स्वरूपाचे संशोधन करून ते पुस्तकांद्वारे जनतेसमोर मांडले. व्यायाम विषयावर लेखन करणाऱ्या मंडळींत अण्णासाहेब भोपटकर,पुणे बापूसाहेब म्हसकर,मुंबई नानासाहेब पुराणिक, पनवेल हरिहरराव देशपांडे,अमरावती इ. तज्ञांचा समावेश होतो.

लोकनियुक्त मंडळाकडे १९३७ मध्ये राज्याची सूत्रे प्रथमच सोपविण्यात आली. बा. गं. खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री झाले. त्यांनी स्वामी कुवलयानंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व या समितीच्या महत्त्वाच्या शिफारशींनुसार शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात पुढील महत्त्वाच्या गोष्टी सुरू केल्या: (१) राज्यात शारीरिक शिक्षणाच्या विकासाकरिता एक सल्लागार मंडळ नेमले. (२) पदवीधरांकरिता एक वर्षाचे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी कांदिवली येथे एक शासकीय संस्था १९३८ मध्ये सुरू केली.  (३) प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांकरिता अल्प मुदतीचे प्रशिक्षण   वर्ग सुरू केले. (४) प्राथमिक व माध्यमिक शाळांतून, तसेच महाविद्यालयातील प्रारंभीच्या दोन वर्षांसाठी शारीरिक शिक्षण सुरू करावे, असे आदेश शासनाने दिले. (५) शाळांमधून शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षकांची नेमणूक, वेळापत्रकात शारीरिक शिक्षणाच्या तासिका, क्री डांगणे, क्रीडासाहित्य आदींबाबत नियमावली तयार करून शारीरिक शिक्षणाकरिता खास अनुदानपद्धती सुरू केली. (६) विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता आदेश दिले. (७) व्यायामशाळांना मान्यता देऊन त्यांच्याकरिता अनुदानपद्धती सुरू केली. (८) शारीरिक शिक्षणाच्या पर्यवेक्षणाकरिता विभागीय पातळीवर प्रत्येक विभागात दोन अधिकारी नेमण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धामुळे तसेच लोकनियुक्त सरकारने अधिकाराचा त्याग  केल्यामुळे  शारीरिक  शिक्षणाच्या  विकासाची  गती  मंदावली. १९४५  साली  पुन्हा  एकवार स्वामी कुवलयानंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली व शारीरिक शिक्षणाच्या विकासाची दिशा कशी असावी, याबद्दल शिफारशी मागविण्यात आल्या. या समितीने एकूण १०४ शिफारशी केल्या. या अहवालात शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षण-पद्धतीचा विकास,राज्य पातळीवर वैद्यकीय तपासणीकरिता स्वतंत्र यंत्रणा, शारीरिक शिक्षणाची वर्गवारी,वार्षिक परीक्षा,शारीरिक शिक्षणाच्या आर्थिक तरतुदींत वाढ इ. महत्त्वाच्या बाबी होत्या.

कुस्ती : महाराष्ट्राचा लोकप्रिय व पारंपरिक क्रीडाप्रकार.

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई इलाख्यात मुंबई विभाग, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक  व  गुजरात  असे  चार  विभाग होते. या विभागांतील  व्यायामसंस्थांनी  शारीरिक  शिक्षणाची  अमोल सेवा केली. या संदर्भात ‘महाराष्ट्रीय मंडळ’,पुणे ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’,अमरावती ‘जुम्मादादा व्यायाम मंदिर’,बडोदे ‘समर्थ व्यायाम-मंदिर’, दादर  ‘मल्ल  सज्जन  व्यायामशाळा’, धारवाड  ‘यशवंत व्यायामशाळा’,  नासिक ‘अंबाबाई’ व ‘भानू तालीम’,  मिरज या संस्थांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तसेच  निरनिराळ्या संस्थांचे संघटन करण्याच्या दृष्टीने ‘अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ’, पुणे या संघटनेने (स्थापना १९२७) बहुमोल कार्य केले. भारतीय देशी खेळांच्या नियमांत  एकसूत्रीपणा आणून व नियमावली-पुस्तिका छापून त्या जनतेस उपलब्ध करून देण्याचे कार्यही या संघटनेने केले. अखिल महाराष्ट्रशारीरिक शिक्षण    मंडळाने प्रकाशित केलेल्या काही नियमावली पुस्तिका पुढीलप्रमाणे : आट्यापाट्या,खोखो,हुतुतू या मैदानी खेळांचे नियम (१९६५), कुस्ती व मल्लखांब या खेळांचे नियम (१९५९), मैदानी शर्यती व चढाओढी (१९५१), लंगडी, लगोऱ्या,विटीदांडू या खेळांचे नियम (१९५८) इत्यादी. ‘मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ’, ‘गुजरात शारीरिक शिक्षण मंडळ’,अहमदाबाद ‘कर्नाटक शारीरिक शिक्षण मंडळ’,धारवाड इ. संस्थांनी आपापल्या विभागांत कौतुकास्पद व उल्लेखनीय कार्य केले.

ब्रिटिश अमदानीत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यत्वे जिल्ह्यांच्या ठिकाणी,मनोरंजनार्थ विदेशी खेळांसाठी ‘जिमखाने’ चालवले गेले. पुण्यात ५ ऑक्टोबर १९०६ रोजी ‘डेक्कन जिमखाना’ ही संस्था शं. रा. भागवत,जी. जी. मालशे,जी. आर्. सरदेसाई इत्यादींच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली. त्यात टिळक तलाव,११ टेनिस-मैदाने,बास्केटबॉल,क्रिकेट, टेबल-टेनिस, बिल्यर्डझ, व्हॉलीबॉल,पत्ते इ. अनेक क्रीडा व रंजन-प्रकारांच्या सोयी-सुविधा आहेत. या संस्थेने ‘डेव्हिस कप’ साठी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाही आयोजित केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांचे दालन भारतासाठी खुले करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रयत्न कारणीभूत झाले. १९१४ पासून पुण्याच्या डेक्कन जिमखाना या संस्थेने शं. रा. भागवत यांच्या नेतृत्वाखाली, ऑलिंपिक  खेळांत  भारताने भाग घ्यावा,यासंबंधी खटपट सुरू केली. सर दोराबजी टाटा यांच्या सक्रीय प्रयत्नांमुळे भारताचा पहिला संघ पुण्याहून १९२० मध्ये अँटवर्प येथील ऑलिंपिक सामन्यांत भाग घेण्यास रवाना झाला.

मैदानी खेळ, फुटबॉल, ⇨ टेनिस, ⇨हॉकी,क्रिकेट,व्यायामी खेळ, ⇨व्हॉलीबॉल,  व्यायामविद्या (जिम्नॅस्टिक्स), ⇨ बास्केटबॉल, ⇨ पोहणे इ. खेळांच्या विकासाकरिता राज्यपातळीवरील संघटना व त्यांच्या उपशाखा ठिकठिकाणी सुरू होऊन या खेळांच्या विकासाकरिता स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रामध्ये प्रयत्न झाले.

शारीरिक शिक्षण समितीच्या १९४५ च्या अहवालानुसार शासनाने विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाच्या वर्गवारी अभ्यासक्रमाबाबत,तसेच शारीरिक शिक्षणाच्या तासिका,क्रीडांगणे,साहित्य,स्पर्धा इत्यादींबाबत योग्य ते आदेश दिले.

अशा रीतीने स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील विद्यार्थी-युवकांत, तसेच प्रौढवर्गातील जनतेत या क्षेत्रातील उपक्रमांबाबत आवड निर्माण होऊन शारीरिक शिक्षणास पोषक असे वातावरण निर्माण झाले.

स्वातंत्र्योत्तर काळ : १९४५ च्या शारीरिक शिक्षण समितीच्या शिफारशीप्रमाणे १९५० पासून खाजगी संस्थांसाठी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक वर्षाच्या मुदतीचे शारीरिक शिक्षणाचे प्रमाणपत्र-वर्ग (सी. पी. एड्.) सुरू करण्याचे नियम ठरवून देण्यात आले व त्यांची अनुदानपद्धतीही ठरविली गेली. त्याप्रमाणे त्या वेळच्या मुंबई राज्यातील एकूण सात संस्थांना मान्यता मिळाली,त्या पुढीलप्रमाणे : ‘शारीरिक शिक्षण प्रसारक मंडळ’,पुणे ‘गुजरात व्यायाम प्रसारक मंडळ’,अहमदाबाद ‘समर्थ व्यायाम मंदिर’,दादर ‘महाराष्ट्रीय मंडळ’, पुणे ‘मल्ल सज्जन व्यायाम शाळा’,धारवाड ‘छोटुभाई पुराणिक व्यायाम मंडळ’, राजपीपला ‘बेनियन स्मिथ इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल एज्युकेशन’, बेळगाव. त्याचप्रमाणे पुण्याच्या ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेस पदवीधरांकरिता शारीरिक शिक्षणाचा पदविका-अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता मिळाली.

या काळात शारीरिक शिक्षणाकरिता खास निरीक्षक वर्ग वाढवून राज्य पातळीवर एक आणि जिल्हा पातळीवर दोन असे अधिकारी नेमण्यात आले. शिक्षक व विद्यार्थी यांच्याकरिता खास शिबिरे आयोजित करण्याच्या योजना सुरू झाल्या. १९५४ मध्ये घोड्यांच्या शर्यतींपासून होणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम बाजूस काढून राष्ट्रीय खेळांचा विकास करण्याच्या हेतूने राष्ट्रीय क्रीडा-निधी उभारण्यास सुरूवात झाली. निरनिराळ्या संस्थांना खेळांची आंतरगृहे,जलतरण-तलाव, प्रेक्षागृहे आदी सोयींकरिता या निधीतून मदत देण्यात येते. त्याच निधीतून प्रतिवर्षी राज्य क्रीडा महोत्सव सुरू करण्यात आला. या महोत्सवात वैयक्तिक स्पर्धा,व्हॉलीबॉल,कबड्डी,खोखो,लेझीम,कुस्ती,मल्लखांब,लोकनृत्ये इ. प्रकारांचे प्रथम केंद्र-तालुका व जिल्हा पातळीवर सामने सुरू झाले व त्यातून जिल्हा संघाची निवड करून त्यांचा राज्यपातळीवर क्रीडा महोत्सव सुरू झाला. महाराष्ट्रातील सु. लाखाच्यावर स्त्री-पुरूष खेळाडू या महोत्सवात भाग घेत असत. हा उपक्रम काही वर्षापूर्वी बंद करण्यात आला. कारण अखिल भारतीय पातळीवर ग्रामीण क्रीडा महोत्सव, स्त्रियांकरिता क्रीडासामने सुरू करण्यात आले,त्यांत महाराष्ट्राचे संघ भाग घेतात. १९५७ साली ‘राज्य क्रीडा मंडळा’ ची स्थापना शासनाने केली. त्याद्वारे क्रीडासंस्थांच्या कार्यात एकसूत्रीपणा आणणे,त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढविणे अशा प्रकारच्या कार्यास सुरूवात झाली. शिवाय ही परिषद क्रीडा-मार्गदर्शन केंद्रे, क्रीडामहोत्सव इ. योजना कार्यान्वित करण्यास मदत करीत असे.

भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे १९५८ मध्ये महाराष्ट्रात ⇨ राष्ट्रीय अनुशासन योजना सुरू झाली. ही योजना भारत सरकारने जगन्नाथराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. या योजनेमध्ये  कवायती,संचलने,लेझीम,मल्लखांब,लोकनृत्ये,समूहगीते, व्यायामविद्या इ. कार्यक्रमांचा समावेश होता. या योजनेचा विकास महाराष्ट्रातील शाळांत मोठ्या प्रमाणात झाला. या योजनेचे प्रशिक्षण भारतीय पातळीवरील प्रशिक्षण संस्थेत दिले जात असे. महाराष्ट्रात असे सु. १,२०० पेक्षा अधिक प्रशिक्षित शिक्षक शाळांतून काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी पातळीवरील नेतृत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शारीरिक शिक्षणाचा जो विकास घडून आला,त्याचा थोडक्यात आढावा पुढे घेतला आहे.


शारीरिक शिक्षण-शिक्षकांचे प्रशिक्षण : प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरांवर शारीरिक शिक्षण व क्रीडा ह्या विषयांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षक उपलब्ध व्हावेत,म्हणून प्रशिक्षणसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. ही वाढ करताना १९६५-६६ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण महामंडळाच्या आदेशानुसार शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाचीही पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार पदविका-अभ्यासक्रमाचा दर्जा पदवीसमान करून ह्या शिक्षणाच्या पदवी-अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासह अन्य क्रमिक विषयांपैकी एका विषयाच्या अध्यापनपद्धतीचा समावेश करण्यात आला. ह्यामुळे शारीरिक शिक्षणाबरोबर दुसरा एक बौद्धिक विषय शिकविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली. ह्या पुनर्रचनेमुळे शारीरिक शिक्षकांचा दर्जा व वेतनश्रेणी इतर शिक्षकांबरोबर झाली. सध्या पदवीधरांकरिता शारीरिक शिक्षणाच्या पदवी-अभ्यासक्रमाची महाराष्ट्रात कांदिवली व वडाळा (मुंबई),पुणे, औरंगाबाद,नागपूर,(२) यवतमाळ,बार्शी,अमरावती (२) या ठिकाणी एकूण दहा महाविद्यालये आहेत.

ह्याशिवाय बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता तीन वर्षांचा शारीरिक शिक्षणाचा पदवी-अभ्यासक्रम चालविणाऱ्या दोन संस्था महाराष्ट्रात अमरावती व नागपूर येथे आहेत. प्राथमिक शाळांकरिता शारीरिक शिक्षणाचा खास अभ्यासक्रम देणारी एकूण १५ कनिष्ठ प्रशिक्षण-महाविद्यालये महाराष्ट्रातआहेत.या महाविद्यालयांत प्राथमिक शाळेतील अन्य विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांतर्गत शारीरिक शिक्षणाचाही खास अभ्यासक्रम राबविला जातो.

भारतातील एकूण शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयांपैकी सु. ५० महाविद्यालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. यावरून शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची वाढ महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणावर झाली आहे, हे दिसून येते.

याबरोबरच पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडासंस्थेत क्रीडा-मार्गदर्शनाचे खास प्रशिक्षण घेतलेले शिक्षक महाराष्ट्रात काम करीत आहेत. त्यांच्याकरिता शासनातर्फे विभागीय पातळीवर व जिल्हा पातळीवर क्रीडा-मार्गदर्शन-केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी खेळाडूंची निवड करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न होतात. महाराष्ट्रात सु. सहा-सात क्रीडा-मार्गदर्शन-केंद्रे असून ती हळूहळू प्रत्येक जिल्ह्यात एक ह्याप्रमाणे वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.

शालेय क्रीडासामने: प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळांतील स्पर्धात्मक अनुभव मिळावा व त्यांची क्रीडाक्षेत्रातील  गुणवत्ता  वाढीस  लागावी, म्हणून  जिल्हा-राज्य व राष्ट्रीय स्तरांवर शालेय सामने भरवले जातात. हे सामने तीन गटांत होतात : (१) लहान मुलांकरिता छोट्या स्वरूपातील ‘मिनी’ सामने,(२) कनिष्ठ गट आणि (३) वरिष्ठ गट. ह्या सामन्यांत एकूण १५ खेळांचा समावेश होतो : (१) मैदानी स्पर्धा, (२) व्हॉलीबॉल, (३) हॉकी, (४) फुटबॉल, (५) बास्केटबॉल, (६) खोखो.  (७) कबड्डी, (८) बॅडमिंटन, (९) टेबल-टेनिस, (१०) कसरती खेळ(जिमनॅस्टिक्स), (११) कुस्ती, (१२) हॅंडबॉल, (१३) जूदो, (१४) पोहणे व (१५) क्रिकेट. महाराष्ट्राचा ह्या सामन्यांतील दर्जा उच्च प्रतीचा आहे. १९७०-७१ पासून महाराष्ट्राच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता जिल्हानिहाय क्रीडा-शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू झाली. तसेच अखिल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतर्फे राज्य पातळीवर कुस्तीच्या स्पर्धा घेऊन त्यामध्ये खास गुणवत्ता दाखविणाऱ्या खेळाडूंनाही स्वतंत्र क्रीडा-शिष्यवृत्त्यांची तरतूद शासनाने केली आहे.

राष्ट्रीय क्षमता मोहीम: राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता अजमावून राष्ट्राची उत्पादनशक्ती वाढविण्याकरिता व राष्ट्रसेवेस त्यांचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा,या हेतूने भारत सरकारने १९६० पासून राष्ट्रीय क्षमता मोहीम सुरू केली. यातील कसोट्यांत भाग घेणाऱ्या लोकांना नियोजित नियमांप्रमाणे तीन गटांमध्ये प्रमाणपत्रे देण्यात येतात : (१) उच्च श्रेणी, (२) मध्यम श्रेणी व (३) साधारण श्रेणी. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या कसोट्या घेण्याकरिता कसोटीकेंद्रे उभारली जातात. प्रतिवर्षी सु. ५० टक्के स्पर्धक उत्तीर्ण होतात. साधारणपणे दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक युवक या मोहिमेत भाग घेतात.

भारत सरकारच्या योजनेप्रमाणे महाराष्ट्रातही ग्रामीण क्रीडा महोत्सव, तसेच स्त्रियांकरिता खास स्पर्धा व्यापक प्रमाणात प्रतिवर्षी आयोजित केल्या जातात.

क्रीडांगणे व प्रेक्षागृहे : शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रांतील नियोजित कार्याचा विकास साधण्यासाठी प्रेक्षागृहे व क्रीडांगणे ह्यांच्या सोयी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. विभागीय पातळीवर पाच लाख रूपये अनुदान देऊन एक सुसज्ज प्रेक्षागृह व जिल्हा पातळीवर दोन लाख रूपये अनुदान देऊन क्रीडांगण उभारण्याच्या,तसेच अन्य ठिकाणी ५०,००० रूपयांचे अनुदान देऊन क्रीडांगणे तयार करण्याच्या योजना चालू आहेत. या योजनांच्या अंतर्गत महाराष्ट्रात एकूण २६ ठिकाणी क्रीडांगणे व प्रेक्षागृहे शासनाच्या अनुदान पद्धतीने उभारण्यात येत आहेत. ह्याशिवाय प्रतिवर्षी खाजगी संस्थांना २,५०० रूपयांपासून ६,००० रूपयांपर्यंत अनुदान देऊन सु. ५० ते ६० क्रीडांगणे तयार होत असतात.


शिवछत्रपती राज्य-क्रीडा-पुरस्कार: महाराष्ट्र राज्य शासनातर्फे १९६९-७० पासून उत्कृष्ट खेळाडू व कार्यकर्ते यांना खास पुरस्कार देण्याची शिवछत्रपती  योजना सुरू करण्यात आली आहे. पुरस्काराकरिता पुरूष व स्त्री खेळाडूंची निवड केली जाते. कसरती व व्यायामी खेळ,  ⇨ बॅडमिंटन,बास्केटबॉल,हॉकी,कबड्डी,खोखो,पोहणे, ⇨ टेबल-टेनिस,व्हॉलीबॉल,क्रिकेट,फुटबॉल,मल्लखांब, ⇨ वजन उचलणे, ⇨ शरीरसौष्ठव स्पर्धा,कुस्ती, ⇨ बिल्यर्डझ,रायफल-नेमबाजी, ⇨ गिर्यारोहण,बुद्धिबळ, ⇨ मुष्टियुद्ध,  ⇨ सायकल शर्यती इ. खेळांत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंची निवड पारितोषिकासाठी केली जाते. या खेळांच्या संख्येत सतत वाढ होत असलेली दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून अपंग व्यक्तींसाठीही स्वतंत्र स्पर्धा राज्यपातळीवर आयोजित केल्या जातात. या विविध स्पर्धांत प्रावीण्य मिळविणाऱ्या स्पर्धकांची छत्रपती पुरस्कारासाठी स्वतंत्रपणे निवड केली जाते. [⟶ शिवछत्रपती पुरस्कार].

योगविद्या : लोणावळा येथे योगविद्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाकरिता व सामान्य लोकांपर्यंत योगाचा प्रसारकरण्यासाठी स्वामी कुवलयानंदांनी १९२४ मध्ये ⇨ कैवल्यधाम आश्रमाची स्थापना केली. प्राणायाम,योगासने,बंधक्रिया, मुद्रा इ. यौगिक प्रक्रियांसंबंधी पारंपरिक आध्यात्मिक व आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनांतून अभ्यास व संशोधन या संस्थेत केले जाते. रूग्णाची यौगिक चिकित्सा व उपचार करण्यासाठी रूग्णविज्ञानशाळाही स्थापन करण्यात आली. योगमीमांसा हे त्रैमासिकही सुरू करण्यात आले. कैवल्यधामच्या शाखा मुंबई (१९३२) आणि राजकोट (१९४३) येथे सुरू करण्यात आल्या. विदेशातही योगाचा शास्त्रशुद्ध प्रसार करण्याचे बरेचसे श्रेय कैवल्यधाम या संस्थेस आहे. नुकतीच स्वामी कुवलयानंदांची जन्मशताब्दी तेथे साजरी केली गेली, त्यावेळी पहिली आंतरराष्ट्रीय योग व संशोधन परिषद घेण्यात आली. तेव्हा भारतातील व जगातील चाळीस देशांचे प्रतिनिधी त्यास उपस्थित होते. योगविद्येचा प्रसार करण्याच्या दृष्टीने १९७० मध्ये शासकीय पातळीवर एक समिती नेमण्यात आली. ह्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांना योगविद्येचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला व या प्रशिक्षकांमार्फत शाळांतून विद्यार्थ्यांना योगविद्येचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली.

महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण: १९३८ पासून महाविद्यालयांतून शारीरिक शिक्षण देण्यास सुरूवात झाली, तरी १९७० पासूनच पुढे शारीरिक शिक्षण-क्रीडाविकासाला खरीखुरी गती प्राप्त झाली. प्रत्येक महाविद्यालयासाठी क्रीडा संचालकाची नेमणूक करण्यात येऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण व क्रीडाविषयक उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन सुरू झाले. भारत सरकारने महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण व क्रीडाविषयक कार्यक्रम राबविण्यासाठी सोयी उपलब्ध व्हाव्यात,म्हणून राष्ट्रीय क्रीडा संघटना स्थापन केली (१९६६-६७). शासनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता क्रीडा-शिष्यवृत्त्या देण्याची योजना १९७० पासून सुरू केली. आंतरमहाविद्यालयीन क्रीडासामने,आंतरविद्यापीठ क्रीडासामने यांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष पुरविण्यात आले व अशा सामन्यांत भाग घेऊन विशेष दर्जा प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी खास गुण राखून ठेवण्यात आले,त्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो.

महाराष्ट्रात १९७० मध्ये त्यावेळचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या  मार्गदर्शनाखाली  शिक्षणाच्या  धोरणविषयक निवेदनात, ‘शारीरिक शिक्षणाला शिक्षणाचा अविभाज्य घटक मानून शिक्षणाच्या  सर्व  स्तरांवर  खेळ, क्रीडा  व  युवककल्याणाचा कार्यक्रम  राबविण्याचा  प्रयत्न  करणे’, हे  मार्गदर्शक  तत्त्व  मांडण्यात आले. या कार्याचा व्याप स्वातंत्र्योत्तर काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला,की १९७० पासून तो सुव्यवस्थित रीतीने सांभाळण्याची जबाबदारी स्वतंत्ररीत्या क्रीडा मंत्र्यांवर सोपविण्यात आली. तसेच या वर्षी स्वतंत्र क्रीडा व युवकसेवा-विभाग आणि संचालनालय स्थापन करण्यात आले. या संचालनालयाचा प्रमुख म्हणून क्रीडा व युवकसेवा-संचालकपदाची निर्मिती करून,त्याच्या कार्यालयात दोन उपसंचालक व अन्य कर्मचारी तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा क्रीडा-अधिकारी असा सेवकवर्ग निर्माण करण्यात आला. या विभागाच्या कक्षेत एकूण १८ विषय येतात: (१)प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण (२) शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण (३) विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण,खेळ व क्रीडा (४) बिगर विद्यार्थी युवकांचे खेळ व क्रीडा (५) क्रीडा व रंजन विकासाच्या संस्था (६) शारीरिक क्षमता कसोट्या (७) क्रीडांगणे व प्रेक्षागृहे यांचा विकास (८) व्यायामशाळा व आखाडे यांना प्रोत्साहन (९) क्रीडा-महोत्सव (१०) मल्लविद्येचा विकास (११) बिगर विद्यार्थी युवकांचे शारीरिक शिक्षण (१२) युवक कल्याण योजना (१३) राष्ट्रीय  क्रीडा-निधीचे  व्यवस्थापन  (१४)  मुंबई  शहरातील क्रीडांगणांचे व्यवस्थापन (१५) साहसयुक्त व्यायामास प्रोत्साहन (१६) क्रीडा व रंजनपर वाङमयास प्रोत्साहन (१७) क्रीडाक्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन (१८) युवक-विकास-संघटना-स्काउटिंग अँड गाइडिंग, एन्.सी. सी. इत्यादी.

महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद : महाराष्ट्रातील क्रीडा व खेळ यांच्या  विकासाबाबत  क्रीडा  संचालनालयाला  सल्ला  देण्याचे काम ही परिषद करते. परिषदेच्या कार्याचा व्याप १९६० नंतर विस्तृत प्रमाणावर वाढला. शिक्षणसंस्थांतील क्रीडाविकासाच्या कार्याला मदत करणे,राज्य पातळीवरील क्रीडा-संघटना व शासन यांच्या कार्यात दुवा सांधणे,राज्यातील क्रीडा-संस्थांना मान्यता व अनुदानाबाबत शिफारस करणेव क्रीडाविकासाकरिता योजना आखून त्या कार्यान्वित करण्यास शासनास मदत करणे इ. प्रमुख कामे या परिषदेच्या कक्षेत येतात. या परिषदेच्या सल्ल्याने क्रीडा-संस्थांना अनुदान देण्याच्या संदर्भात पुढील क्रीडाप्रकार शासनाने मान्य केले आहेत : (१) मैदानी स्पर्धा, (२) व्हॉलीबॉल, (३) बास्केटबॉल, (४) हॉकी, (५) फुटबॉल, (६) क्रिकेट, (७) बॅडमिंटन, (८) टेनिस, (९) टेबल-टेनिस, (१०) पोहणे, (११) कसरती व व्यायामी खेळ, (१२) सायकल शर्यती, (१३) बिल्यर्डझ, (१४) बुद्धिबळ, (१५) ⇨ जूदो, (१६) बॉल-बॅडमिंटन, (१७) कबड्डी, (१८) खोखो, (१९) कुस्ती, (२०) मल्लखांब, (२१) योगासने, (२२) वजन उचलणे, (२३) मुष्टियुद्ध. (२४) रायफल-नेमबाजी, (२५) ⇨ सॉफ्टबॉल, (२६) गिर्यारोहण, (२७)⇨ रिंगटेनिस, (२८) ⇨ हँडबॉल, (२९) शरीरसौष्ठवस्पर्धा, (३०) ⇨ कॅरम.


या खेळांच्या संघटनांच्या साहित्यावर,क्रीडांगणावर,स्पर्धांवर,क्रीडा-मार्गदर्शनांवर (कोंचिग) होणाऱ्या खर्चावर शासनाकडून आर्थिक तरतुदीप्रमाणे अनुदान दिले जाते.

महाराष्ट्रात क्रीडाविकासाचे कार्य करणाऱ्या संस्था एकूण ४ वर्गात मोडतात. ते वर्ग असे : (१) राज्य व विभागीय पातळीवर काम करणाऱ्या एकविध क्रीडा-संघटना, (२) जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या व राज्य वा विभागीय पातळीवर एकविध क्रीडा-संघटनांशी संलग्न असणाऱ्या क्रीडा-संस्था, (३) जिल्हा पातळीवर निरनिराळ्या खेळांचे व क्रीडा-संस्थांचे संघटन करणाऱ्या बहुविध क्रीडासंस्था आणि (४) स्थानिक पातळीवरील संघ अथवा एकविध किंवा बहुविध क्रीडासंस्था.

 प्रजासत्ताक दिनानिमित्त (१९८३) दिल्ली येथे झालेल्या संचलनात, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे सादर करण्यात आलेला ‘बैलपोळा’ हा चित्ररथ.
प्रजासत्ताक दिनानिमित्त (१९८३) दिल्ली येथे झालेल्या संचलनात, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे सादर करण्यात आलेला ‘बैलपोळा’ हा चित्ररथ.

क्रीडासंस्थांनी हाती घेतलेल्या योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून राज्य-क्रीडा-परिषदेच्या सल्ल्याने अनुदान देण्यात येते. प्रेक्षागृहे,जलतरण-तलाव,नेमबाजीचे मैदान व कक्षा,क्रीडामंडप (पॅव्हेलीयन),क्रीडांगणावरील स्वच्छतागृहे इ. सोयी उपलब्ध करून देण्याकरिता या क्रीडासंस्थांना तदर्थ अनुदान दिले जाते. तसेच क्रीडाशिबिरे,क्रीडासामने,खेळाडूचा राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभाग,क्रीडासाहित्य,गिर्यारोहण, हवाई उड्डाण,नौका शर्यती व शीडजहाज शर्यती इ. प्रकारांकरिता क्रीडसंस्थांना खास अनुदान देण्याची व्यवस्था या क्रीडापरिषदेमार्फत केली जाते. महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या चार वर्गातील एकूण सु. ८०० पेक्षा जास्त क्रीडासंस्था वा संघटना आहेत.

मनोरंजन : महाराष्ट्रात लोकरंजनाच्या वा सामुदायिक करमणुकीच्या दालनात व्यायामशाळा,आखाडे, रंजनकेंद्रे इ. संस्थांनी बरेच कार्य केले आहे. विशेषतः यात्रा, मेळावे,उत्सव इ. प्रसंगी लोकरंजनपर कार्यक्रमांना उधाण आलेले दिसून येते. निरनिराळ्या खेळांच्या वा रंजनप्रकारांच्या स्पर्धा,भजने,नाटके, ⇨ नकला, ⇨ सहली, लोकनृत्ये इ. प्रकारांचा अशा रंजनात्मक कार्यक्रमांतून समावेश होतो. १९३९ मध्ये शासनाने कामगार कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रात चार तऱ्हेची रंजनकेंद्रे सुरू केली व या केंद्रांत ⇨ मनोरंजनाच्या विविध प्रकारच्या सोयी-सुविधा,तसेच सांघिक स्वरूपाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सुरूवात झाली. या केंद्रांना लागणाऱ्या इमारती  व खुली मैदाने यांची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली. १९५१ मध्ये शासनाने दारूबंदी विभागातर्फे मनोरंजनाच्या कार्याचा विस्तार कसा करावा, याबाबत  एक  समिती  नेमली.  पुढे  औद्योगिक  क्षेत्रात मोठमोठ्या कारखान्यांना जोडून रंजनकेंद्रे असावीत,या शासनाच्या आदेशाप्रमाणे  महाराष्ट्रात  सर्व  कारखान्यांतून  रंजनकेंद्रांची सुरूवात झाली.  तसेच  विद्यार्थ्यांकरिता  निरनिराळे  छंदवर्ग, क्रीडा वा खेळ व मनोरंजनपर कार्यक्रम,वननिवास,गिर्यारोहण-केंद्रे, शिबिरे, युवक-महोत्सव,नाट्यकला-वर्ग इ. रंजनात्मक कार्यक्रम निरनिराळ्या संस्थांतून सुरू करण्यासाठी शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात आले. युवकांना आपल्या फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करण्यास योग्य वाव मिळावा,म्हणून त्यांच्याकरिता रंजनात्मक कार्यक्रम,सामुदायिक खेळ, शारीरिक कौशल्याचे तालबद्ध प्रकार,लोकनृत्ये तसेच त्यांच्या भावनिक,सांस्कृतिक,सामाजिक गरजांनुरूप योग्य व पोषक अशा संगीत,नृत्य,नाट्य,चित्रकला,वक्तृत्व, विविध छंद इ. प्रकारच्या उपक्रमांकरिता लागणाऱ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने शासनाने राज्य-युवक-कल्याण मंडळाची स्थापना १९७० मध्ये केली. तसेच या मंडळाच्या उपसमित्या शालेय, महाविद्यालयीन पातळ्यांवरील विद्यार्थ्यांच्या आणि अन्य युवकांच्या विकासासाठी नेमल्या गेल्या. या मंडळाच्या मार्फत महाराष्ट्रात युवक-मार्गदर्शन-केंद्रे, कला व छंद विकास-केंद्रे,वननिवास स्थळे,पर्यटन व सहली,सांस्कृतिक केंद्रे,युवक-महोत्सव इ. उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येते. तसेच दारूबंदी विभाग,समाज कल्याण खाते,हरिजन-गिरिजन यांच्या विकासाकडे लक्ष देणारे खाते इ. विभागांकडून लोकांसाठी शिबिरे, रंजनकेंद्रे, मेळावे, महोत्सव,स्पर्धा इ. अनेक रंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात व हे कार्यक्रम हाती घेणाऱ्या संस्थांना योग्य ते प्रोत्साहन दिले जाते.

विक्रमवीर सुनील गावसकर
विक्रमवीर सुनील गावसकर

राष्ट्रीय क्रीडास्पर्धांत,विशेषतः राष्ट्रीय शालेय क्रीडास्पर्धां, व्यायामी आणि कसरती खेळ,पोहणे,बॅडमिंटन,टेबल-टेनिस इ. क्रीडाप्रकारांत महाराष्ट्र अग्रेसर आहे.

भारताचे क्रीडाक्षेत्रातील स्थान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील ज्या नामवंत खेळाडूंनी हातभार लावला, त्यांत पुढील खेळाडूंचा समावेश होतो : कुस्ती : खाशाबा जाधव, माणगावे, श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारूती माने, दादू चौगुले, युवराज पाटील इत्यादी. कबड्डी : सदानंद शेट्टी, मधू पाटील, संभा भाले, शांताराम जाधव, शकुंतला खटावकर इत्यादी. खोखो : सुधीर परब, हेमंत जोगदेव, हेमंत टाकळकर, सतीश देसाई, मधू झंवर, अचला देवरे, निर्मला मेढेकर इत्यादी.

क्रिकेट : पी. विठ्ठल, दि.  ब.  देवधर, विजय मर्चंट, विजय हजारे,विनू  मन्कड, सुभाष  गुप्ते, पॉली  उम्रीगर, विजय  मांजरेकर,बापू नाडकर्णी,चंदू बोर्डे,  दिलीप सरदेसाई,  अजित वाडेकर,  सुनील गावसकर,  एकनाथ सोळकर,  दिलीप वेंगसरकररवीशास्त्री इत्यादी. सुनीलगावसकर हे सध्याचे जगातील आघाडीचेसर्वोत्तम फलदांज मानले जातात. त्यांनीअनेक जागतिक विक्रम केले आहेत.त्यांनी कसोटी सामन्यांत एकूण ३० शतकेझळकवून, डॉन ब्रॅडमनयांचा गेली ३५ वर्षेअबाधित राहिलेलाविक्रम मोडला. तसेचकसोटी क्रिकेटमधीलसर्वाधिक धावांचा(सु. ८,५०० पेक्षाअधिक) जागतिक विक्रमही त्यांनी केला.   ४९ शतकी भागिदाऱ्याही  केल्या.  असे  अनेक  आंतरराष्ट्रीय  विक्रम  त्यांच्या नावावर आहेत.  ही  कामगिरी  महाराष्ट्राला  भूषणावह  वाटावी , अशीच  आहे. बॅडमिंटन: नंदू नाटेकर,मनोहर बोपर्डीकर,उदय पवार,प्रदीप गंधे,तारा, सुंदर व सुमन या देवधर भगिनी,सुशिला रेगे,शशी भट,सरोजिनी आपटे इत्यादी. बिल्यर्डझ: विल्सन जोन्स व मायकेल फरेरा, मुंबई. रायफल-नेमबाजी: जयसिंग कुसाळे, कोल्हापूर शरद चौहान इत्यादी. बुद्धिबळ: प्रवीण ठिपसे,जयश्री व रोहिणी खाडिलकर, भाग्यश्री साठे इत्यादी.हॉकी: एलिझा नेल्सन,मार्गारेट तोस्कोनो,रीना अल्बुकर्क,सेलमा डिसिल्व्हा,नझलीन मद्रासवाला,ओमाना कुमारी इ. महिला खेळाडू आणि एस्. सोमय्या, मर्विन फर्नांडिस, मेरोलिस गोमेज, जे. कारव्हेले इ. पुरूष-खेळाडू.नौकास्पर्धा: जीजी उनावाला,फली उनावाला. फरूक तारापोर व झरीन करं जिया. पोहणे: संजय करंदीकर,शैलेश ताम्हनकर इत्यादी. घोड्यांच्या शर्यती : जॉकी पांडू खाडे,शामू चव्हाण इत्यादी. टेनिस: शशी मेनन,जगजीत सिंग,नंदन बाळ इत्यादी.

महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ ज्यांनी लोकांच्या मनोरंजनाचे कार्य केले आहे,अशा नामवंत व्यक्तींमध्ये पुढील व्यक्तींचा उल्लेख करता येईल.:जादूचे खेळ: के. बी. लेले,जादूगार रघुवीर,चंद्रकांत सारंग, डी. एल्. कुलकर्णी इत्यादी. सर्कस: विष्णुपंत आणि काशीनाथपंत छत्रे, देवल बंधू,कार्लेकर बंधू, भोसले बंधू,पर्शराम माळी,माधव शेलार,काशीनाथ यशवंत मोरे,वालावलकर बंधू,जी. ए. सर्कस इत्यादी. नकला: गोपाळ विनायक,भोंडे, सदानंद जोशी,वि. र. गोडे,रणजित बुधकर,एच्. जी. घोडके,शाहीर नानिवडेकर,दादा कोठीवान,नाना रेटर,इ यांशिवाय खाडिलकर,दीक्षित,साबळे,अमरशेख इ. शाहिरांनी लोकरंजनाचे भरघोस कार्य महाराष्ट्रात केले. प्रख्यात कवी वसंत बापट आणि त्यांचे राष्ट्रसेवादलाचे कलापथक यांनी सादर केलेले ‘महाराष्ट्र दर्शन’ व ‘भारत दर्शन’ हे लोकरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरले.

महाराष्ट्राची क्रीडाक्षेत्रातील ही थोर परंपरा टिकवून हे राज्य क्रीडाक्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण,खेळ व मनोरंजन या क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती होत आहे.

   वाखारकर, दि. गो.

संदर्भ :

1. Kapadia, Harish, Ed. Trek the Sahyadris,  Bombay, 1979.

2 . Sandesara,  B. J. Ed. Mallapurana, Baroda, 1964.

3. Wakharkar, D. G. Kabaddi, Bombay, 1969.

४. आलेगावकर, प. म. शासकीय आश्रमशाळेतील शालेय सांस्कृतिक जीवन सांघिक खेळ व सांघिक गीते, पुणे, १९८२.

५. करंदीकर (मुजुमदार), द. चिं. संपा. व्यायामज्ञानकोश, खंड १, २, ३, ४ व १०, बडोदे, १९३६ ते १९४९.

६. केळकर, भा. दा. लिमये, ह, शं. देशिंगकर, ग. वि. खेळातील विज्ञान, पुणे, १९८२.

७. खासनीस, द. वि. क्रीडा आणि मनोरंजन, पुणे, १९७१.

८. घाणेकर, प्र. के. चला जाऊ भटकायला, पुणे, १९८४.

९. चव्हाण, वि. म. पारध, पुणे, १९६८.


१०. जोशी, चंद्रहास, छंद : तंत्र आणि मंत्र, पुणे, १९७५.

११. दाण्डेकर, गो. नी. छंद माझे वेगळे, मुंबई, १९७९.

१२. दाभोलकर, नरेंद्र, कबड्डी, मुंबई, १९७९.

१३. बाबर, सरोजिनी, संपा. स्त्रियांचे खेळ आणि गाणी, पुणे, १९७७.

१४. भागवत, राम, ॲथलेटिक्स, पुणे, १९७८.

१५. माणिकराव, ग. य. भारतीय व्यायाम, पुणे, १९५९.

१६. यादव, योगेश, खोखो, मुंबई, १९६९.

१७. राजगुरू, श्रीधर, मुलांसाठी खेळ, पुणे, १९८२.

१८. वझे, चिंतामण सदाशिव, विविध खेळ, भाग १, २, ३, पुणे, १९६५ ते १९६७.

१९.वाखारकर, दि. गो. महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षणाची वाटचाल, औरंगाबाद, १९७३.

२०. सांगलीकर, व्ही. एन् . कुलकर्णी, पी. डी. मैदानी खेळ (ॲथ्लेटिक्स), कोल्हापूर, १९६२.

२१. साबळे, तुकाराम लिंगोजी, भारतीय मल्लविद्याशास्त्र, कोल्हापूर, १९७५.

२२. सूर्यवंशी, कृ. गो. भारतीय मल्लविद्या : उदय आणि विकास, पुणे, १९६५.