चित्रपट  : भारतीय चित्रपटांची सुरूवात सर्वप्रथम महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाली आणि ७ जुलै १८९६ रोजी चलत्-चित्रपट प्रथमतः पडद्यावर मुंबईच्या वॅटसन हॉटेलमध्ये दिसले. तेव्हापासून चित्रपटाच्या शास्त्रात व तंत्रात जी स्थित्यंतरे,ज्या सुधारणा, जो विकास आणि विस्तार झाला त्या सर्वांची सुरुवात मुंबईत म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रातच झाली त्यामुळे महाराष्ट्र आणि चित्रपट यांचे अतूट नाते चित्रपटाच्या जन्मापासूनच जडले गेले.

सर  रघुनाथराव  परांजपे  हे  हिंदुस्थानातील  पहिले  रँग्लर  होऊन  जेव्हा  १९०१  साली  भारतात  परत  आले,त्यावेळी पहिला वार्तापट हरिश्चंद्र भाटवडेकर ऊर्फ सावेदादा यांनी मुंबईत तयार केला  व त्यानंतरच १९०७ साली ⇨ पाते फ्रॅर  ही पहिली चित्रपट-वितरणसंस्था मुंबईत सुरू झाली तेव्हापासूनच परदेशी चित्रपट आणि चित्रपटांची यंत्रसामग्री देशात नियमितपणे यायला लागली. तसेच ‘कोडॅक’ या जगप्रसिद्ध कंपनीची शाखा १९१३ साली मुंबईत काढण्यात आल्यानंतरच चित्रपटाकरिता लागणारी कच्ची फिल्म गरजेप्रमाणे मिळू लागली.

त्यानंतर १९१२ मध्ये चित्रे आणि टिपणीस यांनी पुंडलिक या नाटकाची  फिल्म  मुंबईतच  तयार  केली तर १९१३ साली  ⇨ दादासाहेब  फाळके  यांनी  राजा  हरिश्चंद्र  हा  पहिलाच  देशी   मूकपट मुंबईच्या  दादर  परिसरात  निर्माण केला. विशेष म्हणजे हे दोन्ही देशी मूकपट प्रथम मुंबईच्या ‘कॉरोनेशन’ सिनेमातच दाखविले गेले. त्यामुळे परदेशी चित्रपटांबरोबर देशी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग तेथे अधिकाधिक प्रमाणात तयार होऊ लागला. याप्रमाणे पहिले महायुद्ध सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील मुंबई शहर हे चित्रपट-व्यवसायाचे केंद्र बनले होते.

महायुद्धाच्या काळात चित्रपट-क्षेत्रातील हालचाल काही काळ थंडावली होती मात्र १९१८ साली युद्ध संपल्यानंतर खुद्द मुंबईत चित्रपटनिर्मिती वाढत्या प्रमाणात सुरू झाली. मूकपटकाळातील एकूण १९१  संस्थांपैकी  ११२  संस्थांचे  मूकपट  एकट्या  मुंबईत  तयार झाले होते. साहजिकच त्यावेळच्या मुंबई प्रांतातील इतर ठिकाणीही चित्रपटनिर्मितीचे हे लोण पोहोचले होते. पुणे,कोल्हापूर,नासिक,सोलापूर, बडोदे,राजकोट,अहमदाबाद येथेही सु. १६ संस्था चित्रपट निर्मितीत उतरल्या होत्या. खुद्द मुंबईत तर त्यांपैकी ७२% मूकपट तयार झाले होते.

बोलपट युगाची सुरुवात १९३१ साली आलमआराने केली, तीही मुंबईतच. परिणामतः महाराष्ट्रातील पुणे,कोल्हापूर,नासिक इ. ठिकाणीही बोलपट-निर्मिती लगोलग सुरू झाली. हिंदी,मराठी आणि गुजराती भाषिक बोलपटांखेरीज तमिळ,तेलुगू,कन्नड व पंजाबी इ. बोलपटांची निर्मितीही सुरूवातीच्या काळात महाराष्ट्रात होत असे. कारण दक्षिणेत व उत्तरेत त्यावेळी बोलपटाला योग्य अशी चित्रपटनिर्मितिगृहे अस्तित्वातनव्हती [⟶चित्रपटनिर्मितिगृह].

दुसऱ्या महायुद्धापर्यंत चित्रपटनिर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर होता. १९४६ साली अनेक  भाषांत निघालेल्या २०० बोलपटांपैकी ८०%  बोलपट  महाराष्ट्रात  तयार  झाले  होते.  त्यानंतर  दक्षिणात्य आणि  बंगाली  वगैरे  बोलपटांची  संख्या  हळूहळू  वाढायला  लागली परंतु महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मितीचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही. कारण भाषिक चित्रपटांचे क्षेत्र त्या त्या भाषेपुरतेच मर्यादित होते. उलट महाराष्ट्रात तयार होणारे हिंदी बोलपट देशातल्याच सर्व भागांत नव्हे, तर  जगातल्या  अनेक देशांत दाखविले जात असत. साहजिकचराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरीलभारतीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्रातील हिंदी चित्रपट असे समीकरणआपोआपच बनून गेले. सुरूवातीच्याकाळात ⇨ प्रभात फिल्म कंपनी,हंसआणि नवयुग यांसारख्या महाराष्ट्रीयचित्रपटसंस्था आपल्या चित्रपटांच्यामराठीबरोबर हिंदी आवृत्त्याही काढीतअसत,त्यामागे हीच दूरदृष्टी होती.   प्रभातच्या अनेक कलात्मक बोलपटांनीआसेतुहिमाचल कीर्ती मिळविली, ती हिंदीआवृत्ती काढल्यामुळेच.

दुसऱ्यामहायुद्धानंतर चित्रपट-निर्मितीमध्ये ज्या अनेक तांत्रिकसुधारणा घडून आल्या,त्यांचाही उगममहाराष्ट्रातच झाला. १९५० नंतर रंगीत     चित्रपट सुरू झाले, तर १९६०च्यासुमारास ‘सिनेमास्कोप’ चित्रपट तयार होऊ लागले व १९७० नंतर ७० मिमि. मध्ये चित्रपट निघाले. फिल्मऐवजी    ‘टेप’ वर ध्वनिमुद्रण करण्याचीही सोय तेव्हा झाली होती. या व इतरहीअनेक छोट्या-मोठ्या तांत्रिक सुधारणा मुंबईतच घडून आल्या.

अशा तऱ्हेने महाराष्ट्राचा चित्रपट-माध्यमाशी सतत संबंध जुळत  गेल्यामुळे  चित्रपटाशी संलग्न असलेली केंद्र सरकारची कार्यालयेही महाराष्ट्रात आली.


अभ्यवेक्षण मंडळ (सेंट्रल सेन्सॉर बोर्ड), ⇨ फिल्म प्रभाग (डिव्हिजन), ⇨ बालचित्रसमिति (चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी), ⇨ राष्ट्रीय फिल्म विकास निगम (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉपोरेशन) ह्यांच्या मूळ कचेऱ्या मुंबईत आहेत,तर ⇨ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व ⇨ राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार (नॅशनल फिल्म आर्काइव्हज) या संस्था पुण्यात आहेत. राज्य सरकारने चित्रपटनिर्मितीकरिता मुद्दाम उभे केलेले अद्ययावत चित्रपटनिर्मितिगृह मुंबईतील चित्रनगरीच्या (फिल्म सिटी) रूपाने फक्त महाराष्ट्रातच पहावयास मिळते. एकूण महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे १८९६ सालापासून चित्रपटव्यवसायाचे केंद्रस्थान झाल्यामुळे चित्रपट हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनाचा  अविभाज्य घटक बनून गेला आहे.

महाराष्ट्रातील चित्रपट-उद्योग : महाराष्ट्रात ३१ मार्च १९८३ अखेरपर्यंत  कायम  स्वरूपाची  ७,१४९  व  फिरती ४,५३३ अशी एकूण  ११,६८२  चित्रपटगृहे  होती.  भारतातील  सु.  ७०%  लोकसंख्या ही खेडेगावांत वसलेली असल्याने तिला फिरत्या चित्रपटगृहांद्वारेच शिक्षण व करमणूक मिळते त्यामुळे फिरती चित्रपटगृहे ही स्थायी स्वरूपाच्या चित्रपटगृहांचे अग्रेसर ठरतात. १९७० पर्यंत महाराष्ट्रातील फिरत्या चित्रपटगृहांवर कित्येक बंधने लादली गेली. राज्यातील कायम स्वरापाच्या चित्रपटगृहांइतकाच करमणूक कर फिरत्या चित्रपटगृहांवर लादल्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्यावर त्याचा विपरीत परिणाम घडून आला. तमिळनाडू,आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात फिरती चित्रपटगृहे ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत.

महाराष्ट्रातील चित्रपट-पारितोषिके : महाराष्ट्र शासनाने १९६१ सालापासून राज्यातील मराठी चित्रपटांना दरवर्षी पारितोषिके देण्यास प्रारंभ केला असून ती प्रत्येक वर्षी देण्यात येतात. ती स्थूलमानाने १८ प्रकारांत विभागली आहेत.

(१) उत्कृष्ट चित्रपट: प्रथम पुरस्कार-निर्मात्यास वीस हजार रूपयांचे दादासाहेब फाळके पारितोषिक, तर दिग्दर्शकास पाच हजार रूपयांचे रोख.

(२)द्वितीय पुरस्कार-निर्मात्यास बारा हजार रूपायांचे बाबूराव पेंटर पारितोषिक,तर दिग्दर्शकास तीन हजार रूपयांचे रोख.

(३) तृतीय पुरस्कार-निर्मात्यासआठ हजार रूपयांचे मास्टर विनायक पारितोषिक, तर दिग्दर्शकास तीन हजारांचे रोख.

(४) उत्कृष्ट कथा : पंधराशे रूपयांचे रोख.

(५) उत्कृष्ट पटकथा (६) उत्कृष्ट संवाद (७) उत्कृष्ट चित्रपट गीते (८) उत्कृष्ट अभिनेता (९) उत्कृष्ट अभिनेत्री (१०) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (११) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (१२) उत्कृष्ट संगीतदिग्दर्शक (१३) उत्कृष्ट छायाचित्रकार (रंगीत व एकरंगी छायाचित्रण) (१४) उत्कृष्ट ध्वनिमुद्रण (१५) उत्कृष्ट संपादक (१६) उत्कृष्ट कलादिग्दर्शक (रंगीत व एकरंगी) (१७) उत्कृष्ट पुरूष पार्श्वगायक (१८) उत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक-प्रत्येकी एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक.

शासनाने चित्रपट उद्योगधंद्यासाठी केलेला विकास : मराठी चित्रपटांना १९७० च्या आसपास अडचणीचे दिवस आल्यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अशा विपत्तीच्या प्रसंगी मराठी चित्रपट महामंडळाने १९६७ साली मराठी ‘फिल्म इंडस्ट्री’ नावाची एक संस्था स्थापन केली व तिच्या द्वारे मराठी चित्रपट-निर्मात्यांच्या सर्व अडचणी शासनासमोर मांडल्या. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाने १९७५ सालापासून मराठी चित्रपटांवरील करमणूक कर परत देण्यास सुरूवात केली तर दरम्यानच्या काळात शासनाने स्वतःच मुंबईजवळील आरे गौळीवाड्यानजिक ‘चित्रनगरी’ काढण्याची एक योजना आखली. या चित्रनगरीची मूळ कल्पना तशी मुंबईतील चित्रपट-निर्मात्यांची होती. सध्या ही चित्रनगरी ‘महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉपोरेशन’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली १९७९ पासून कार्य करीत आहे. या संस्थेद्वारा मराठी चित्रपटनिर्मात्यांना सवलतीच्या दराचा लाभ होत असला, तरी ती अपुरी पडत असल्यामुळे मराठी चित्रपट-निर्माते कोल्हापूर वा अन्यत्र प्रयत्न करण्याची धडपड करीत असतात परंतु कोल्हापूर येथील नियोजित चित्रनगरीच्या उभारणीच्या कामाने अद्याप तरी आकार घेतलेला नाही मात्र महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वीच मराठी चित्रपटमहामंडळाकडून कॅमेरा व ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) पुरविण्याची सोय कोल्हापूर येथील मराठी चित्रपटनिर्मात्यांसाठी केली आहे.

मराठी चित्रपटांना कर परत देण्याची योजना व चित्रपटनिर्मितीबाबत दिलेल्या सवलती यांसंबंधात मात्र महाराष्ट्र शासनाने फार बहुमोल कामगिरी बजाविली आहे. चित्रपट उद्योगाबाबत म्हणजे चित्रपटनिर्मिती, प्रदर्शन,कर इत्यादींच्यासंबंधात सरकारचे बरेच विभाग सहकार्य देत असतात. उदा.,वित्त विभाग,कायदा विभाग,नागरी विकास व सांस्कृतिक कार्य विभाग इत्यादी तथापि चित्रपट उद्योगधंद्याबाबतच्या सर्व समस्या व अडचणी निवारण्यासाठी मंत्रालयात एक वेगळा विभाग स्थापन करून त्या दूर कराव्यात, या विनंतीचा मात्र अव्हेरच होत आला आहे.

मराठी चित्रपटांचे सक्तीचे प्रदर्शन : ६ मार्च १९६८ च्या अध्यादेशानुसार मुंबई सिनेमा (रेग्युलेशन) अधिनियम १९५३ अन्वये महाराष्ट्र सरकारकडून असे आदेश देण्यात आले आहेत,की प्रत्येक चित्रपटगृहातून वर्षातून कमीत कमी चार आठवडे मराठी चित्रपट दाखविण्यात यावेत.


मराठी चित्रपटांना करसवलत : प्रादेशिक चित्रपटांना करसवलत देऊन त्यांना उत्तेजन देण्याची योजना सर्वप्रथम आंध्र प्रदेशाने १९६० पासून सुरू केली असून त्या राज्यात राज्य सरकारकडून तेलुगू चित्रपट-निर्मात्यांना १९६५-६६ पासून कराच्या रकमेत सूट दिली जाते तर १९६७-६८ मध्ये कर्नाटक आणि केरळ राज्यानेही त्या त्या राज्यभाषांतील चित्रपटांना उत्तेजन देण्यासाठी या योजनेचा पुरस्कार केला आहे. ही सूट रू. ५०,००० ते २,००,००० रूपयांपर्यंत असते. १९७५ पासून गुजरात सरकारने गुजराती आणि १९ फेब्रुवारी १९७५ पासून महाराष्ट्र शासनाने वरील करपरतीची योजना मराठी चित्रपटांना लागू केली आहे. प्रस्तुत नियमाप्रमाणे एकरंगी मराठी चित्रपटांना ४ लाखांपर्यंत तर रंगीत चित्रपटांना ८ लाखांपर्यंत कर परत मिळतो.

महाराष्ट्रातील चित्रपट व्यापारी-संस्था: महाराष्ट्रातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या चित्रपट संस्था मुंबई येथेच केंद्रित झाल्या आहेत त्यांपैकी काही महत्त्वाच्या चित्रपट-संस्था : (१) ऑल इंडिया फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिल, (२) सिने-आर्टिस्ट्स असोसिएशन, (३) सिने-लॅबोरेटर्स असोसिएशन, (४) सिनिमॅटोग्राफ इग्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया, (५) फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया, (६) फिल्म प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, (७) फिल्म रायटर्स असोसिएशन, (८) इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशन, (९) इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन, (१०) इंडियन मोशन पिक्चर डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशन, (११) फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने-एमप्लॉयर्स इत्यादी.

कोष्टक क्र. १२.

महाराष्ट्रातील चित्रपटावरील

करमणूक कराचेप्रमाण

वर्ष रक्कम (कोटीमध्ये)
१९७७-७८ ३१.९३
१९७८-७९ ३६.७०
१९७९-८० ४०.३९
१९८०-८१ ४५.५०
१९८१-८२ ५३.४४
१९८२-८३ ६३.००

मुंबई येथील ‘मराठी चित्रपट महामंडळ’ ही मराठी चित्रपटक्षेत्रातील दिग्दर्शक.निर्माते व अन्य कलाकारांची प्रमुख संघटना असून पुणे व कोल्हापूर येथे तिच्या इतर शाखा आहेत. मुंबई हे १९२० पासून भारतातील चित्रपट-उद्योग-धंद्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनले असून बहुसंख्य हिंदी चित्रपटांची. तेथेच निर्मिती होते व ते देशी  परदेशी प्रदर्शित होतात. त्यांतप्रामुख्याने गल्लाभरू चित्रपटांचाचअधिक भरणा असला, तरी गुणात्मक दृष्टया उत्तम व कलात्मक दृष्टिकोनअसलेले चित्रपटही बरेच असतात.

मराठीचित्रपटांना असलेली मर्यादित बाजारपेठ व दर्जेदारहिंदी चित्रपटांची स्पर्धा या वइतरही कारणांनी गेल्या दहा वर्षात मराठी चित्रपटसृष्टी आपली ‘मराठी’ अस्मिता प्रकट करू शकली नाही त्यामुळे पूर्वीच्या मानाने नवीन मराठी चित्रपट निकृष्ट व कलाहीन निपजू लागले आहेत.

[⟶ चित्रपट (मराठी) चित्रपट-उद्योग चित्रपटगृह चित्रपट-निर्मिति बालचित्रपट].

धारप,भा. वि. (इं) बोराटे,सुधीर (म.)

संदर्भ :

1. Mujawar, Isak, Maharashtra : Birthplace  of Indian Film Industry , Bombay, 1969.

२. फडक, सुधीर, संपा., चित्रशारदा, मराठी चित्रपट सुवर्ण महोत्सवी अंक, मुंबई, १९८२.

३. वाटवे, बापू, प्रभात चित्रे, पुणे, १९८०.