रंगभूमी :  महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीची सुरुवात ⇨ विष्णुदास भावे  यांनी सांगली राजदरबाराच्या प्रेरणेने,कर्नाटकातील ⇨यक्षगानाच्या धर्तीवर रचलेल्या सीतास्वयंवर या ⇨ लळिताच्या प्रयोगाने केली,असे मानतात. आरंभीच्या या नाट्यप्रयोगाचे संचलन सूत्रधार करी. सूत्रधार आणि त्याचे साथीदार रंगमंचाच्या मागील बाजूस कायम उभे राहून गायिलेल्या पद्यांतून कथा सांगत. पौराणिक विषय,देवदानवांचा संघर्ष, देवांची व राक्षसांची कचेरी अशी दृश्ये वा कथेतील प्रसंग उचित वेशभूषा केलेल्या पात्रांचे हातवारे,हालचाली,क्वचित काही उत्स्फूर्त उद्-गार यांच्या साहाय्याने दाखविले जात. सूत्रधाराला रंगमंचावरील किरकोळ व्यवस्थेसाठी विदूषक मदत करी [⟶ भारत (रंगभूमी) ].

कालिदासाच्या शाकुंतलाचा गद्यपद्य अनुवाद  ⇨ अण्णासाहेब किर्लोस्करांनी  केला  व  त्याच्या  पहिल्या  चार  अंकांचा प्रयोग १८८० साली पुण्याच्या आनंदोद्भव नाट्यगृहात मराठी रंगभूमीचा वारसा घेऊन झाला. संस्कृत नाट्याचे लिखित संवादाचे साहित्यनिर्भर रूप आणि भरतप्रणीत चतुर्विध अभिनयाने संपन्न व रसदर्शी नाट्य या प्रयोगाने आकाराला आले. संस्कृत नाटकाप्रमाणेच पारशी रंगभूमीचेही रूप  किर्लोस्करांच्या  डोळ्यापुढे  होतेच, त्यातूनच  नेपथ्य-दृश्ये मराठी नाटकात आली. किर्लोस्करांनी मूळ संस्कृत श्लोकांचा गेय अनुवाद केल्याने संगीत नाटकाचाही आरंभ झाला. या परंपरेत पुढे अनेक अभिनयकुशल आणि संगीतनिपुण गायक-नट निर्माण झाले. उदा., ⇨ भाऊराव  कोल्हटकर,  ⇨ बालगंधर्व,⇨ केशवराव  भोसले,  ⇨ मास्तर कृष्णराव, ⇨ दीनानाथ मंगेशकर इत्यादी. तसेच पौराणिक संगीत नाटकांची परंपरा उदयास आली नाट्यगृहे उभी राहिली मोठ्या शहरी जाऊन प्रयोग करणे शक्य झाले. संगीत नाटकाची ही महाराष्ट्रीय प्रणाली किर्लोस्कर,गंधर्व,ललितकलादर्श,बलवंत या आणि इतर अनेक व्यावसायिक नाटकमंडळ्यांनी समृद्ध केली.

‘एकच प्याला’ नाटकातील एक दृश्य

परंतु एकोणिसाव्या शतकात इंग्रजी अमदानीतील इंग्रजी भाषेच्या  आणि  इंग्रजी  माध्यमातून  शिक्षणाने  या  नाट्यपरंपरेला वेगळे  वळण  मिळाले.  महाविद्यालयातील  प्राध्यापक  आणि  तरूण विद्यार्थी  शेक्सपिअरच्या  नाटकांशी  परिचित  झाले  त्या  नाटकांची मराठी   भाषांतरे-रूपांतरे  झाली.  त्यांच्या  प्रयोगांनी  गंभीर  व  गद्य नाटक  मराठी रंगभूमीवर आले. संस्कृत नाट्यातील पल्लेदार,काव्यमय संगीतप्रधान, गद्यपद्य  संवादाची  जागा  कसदार  व  साहित्यगुणांनी मंडित  अशा  गद्याने  घेतली. नाट्य पौराणिक विषयाकडून ऐतिहासिक, इतिहाससदृश काल्पनिक आणि सामाजिक विषयाकडे वळले. संस्कृत नाट्यात नसलेली ⇨ शोकात्मिका (ट्रॅजेडी) व भावगंभीर नाट्य अवतरले,नवनाट्यदशनाची कक्षा एकंदरीत विस्तारली, गायक-नटांच्या परंपरेप्रमाणेच ⇨ गणपतराव जोशी,गणपतराव भागवत, ⇨ केशवराव दाते,चिंतामणराव कोल्हटकर असे समर्थ गद्य नट उदयास आले. खाडिलकर, देवल,गडकरी यांच्यासारखे अव्वल दर्जाचे नाटककार निर्माण झाले.महाराष्ट्रातील रंगभूमीचा हा काळ संगीत आणि गद्य नाटकांमुळे वैभवाचा ठरला.

याच वेळी  इंग्रजी भाषांतरांवरून मोल्येरसारख्या यूरोपीय नाटककारांशीही मराठी रंगभूमीचा परिचय झाला. प्रचलित सामाजिक विषयांवर उपहास,विडंबन व विनोदी टीका यांच्या आश्रयाने हलकी-फुलकी नाटके इंग्रजीतून भाषांतर वा रूपांतर करून किंवा स्वतंत्रपणेही रचली गेली. अशा ‘फार्सिकल’ नाटकांखेरीज [⟶ प्रहसन] शेक्सपिअरच्या अनुकरणाने करमणूकप्रधान व आनंददायी नाटके तयार होत होतीच [⟶सुखात्मिका]. खेरीज,गंभीर नाट्यातही ‘भावनिक उतार’ म्हणून विनोदी प्रवेश आवश्यक वाटू लागले. लोकाचारावर विनोदी ढंगाने केलेली टीका आणि करमणुकीबरोबर मानसिक उद्बोधन हा मराठी रंगभूमीने घडविलेला मोठा लाभ आहे.

नाट्यमन्वंतर संस्थानिर्मित ‘आंधळ्याची शाळा’ मधील एक देखावा

पन्नास–पाऊणशे वर्षे दिमाखाने मिरविणाऱ्या मराठी रंगभूमीच्या  ऱ्हासाला  अनेक  कारणे  आहेत  (सु. १९२५–३०) त्यांतील एक चित्रपट होय. व्यावसायिक कंपन्यांचा प्रेक्षक चित्रपटाकडे खेचला गेला,नट चित्रपट-व्यवसायात शिरू लागले,व्यावसायिक नाटक-मंडळ्या  बुडाल्या.  विसाव्या  शतकाच्या  तिसऱ्या-चौथ्या  दशकामध्ये  ढासळलेल्या रंगभूमीला सावरण्याचे जे प्रयत्न झाले त्यांत ⇨ मा. वि. वरेरकरांची  तत्कालीन  समाजविषयक प्रश्न घेऊन  आलेली  नाटके,आचार्य ⇨ प्र. के. अत्रे यांची सामाजिक व्यंग्याची थट्टा करणारी खुसखुशीत  नाटके, ‘नाट्यमन्वंतर’  ने  दाखविलेली नवी दिशा आणि तिचे अनुकरण करून,आपल्या ‘नाट्यनिकेतन’ द्वारा ⇨ रांगणेकरांनी केलेली   स्वतःची  नाटके, यांचा  उल्लेख  अवश्य  केला  पाहिजे.  आधुनिकतेशी  निकट  असा  हा महाराष्ट्रातील रंगभूमीचा कालखंड अनेक  विशेषांमुळे  महत्त्वाचा  आहे: (१) हा काळ इब्सेनच्या प्रभावाचा, म्हणजे नव-नाट्याचा. अनेकांकी,अनेक प्रवेशी रचनेऐवजी एकांकी,एकप्रवेशी रचना (२) नांदी – सू