संग्रहालये व कलावीथी :

पुण्याच्या राजा केळकर संग्रहालयातील आलंकारिक चौफुला

महाराष्ट्रातील मुंबईच्या ग्रँटमेडिकल कॉलेजमधील प्राचीन वैद्यकविषयक  संग्रहालयाचा  (स्था. १८४५) भारतातच नव्हे,तर आशिया खंडातही अग्रक्रम लागतो. या संग्रहालयानंतर व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय (व्हिक्टोरिया गार्डन) स्थापन झाले. त्यानंतर मुंबई,नागपूर, पुणे, औंध, कोल्हापूर, धुळे, सेवाग्राम,वर्धा,सातारा अशा

निरनिराळ्या  ठिकाणी  वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली संग्रहालये स्थापन होऊ लागली. सरकार त्याचप्रमाणे ब्रिटिश कालातील संस्थानिक,खाजगी संस्था व व्यक्ती,स्थानिक स्वराज्य संस्था,महाविद्यालये व विद्यापीठे इत्यादींनी संग्रहालयांच्या निर्मितीत पुढाकार घेतल्याचे दिसून येते.

मुंबईतील व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय हे प्रामुख्याने औद्योगिक व कृषिविषयक संग्रहालय असून जुन्या मुंबईसंबंधीची छायाचित्रे,नकाशे व तक्ते यांचा खास  संग्रह हे  या  संग्रहालयाचे वैशिष्टय मानावे  लागेल तर मुंबईतीलच प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय (१९०४) यात कला,पुराणवस्तुशास्त्र,सृष्टिविज्ञान व नाणेशास्त्र असे विभाग असून त्यांतील कलादालन हे लघुचित्रे व यूरोपीय तैलचित्रे यांसाठी उल्लेखनीय आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी देणगीदाखल दिलेल्या वैशिष्टयपूर्ण वस्तू त्या कलादालनात आहेत.

नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय (१८३३) हे जुने असून त्यात कला व उद्योग,पुराणवस्तुशास्त्र,मानववंशशास्त्र,अर्थोत्पादक वस्तू,भूस्तरशास्त्र आणि सृष्टिविज्ञानविषयक वस्तूंचा समावेश केला आहे.

औंध संस्थानचे भूतपूर्व राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी औंध येथे श्रीभवानी या संग्रहालयाची स्थापना केली (१९३८) व त्याचा खूपच विकास घडवून आणला. या संग्रहालयात मुख्यतः भारतीय व यूरोपीय जुन्या-नव्या शैलींच्या चित्राचा बराच मोठा संग्रह करण्यात आलेला आहे. याचा भवानराव ग्रंथालय विभाग मूळ संग्रहालयालाच जोडलेला असून त्यात ऐतिहासिक महत्त्वाची सु. २,००० हस्तलिखिते आणि विभिन्न विषयांवरील सु. १६,६७५ ग्रंथ आहेत.

कोल्हापूर वस्तुसंग्रहालयात (१९४६) प्रायः ब्रह्मपुरीच्या उत्खननात आढळणाऱ्या वस्तूंचाच अंतर्भाव केला आहे तर पुण्यातील राजा केळकर संग्रहालय हे दिनकर गंगाधर केळकर (कवी अज्ञातवासी) यांच्या वैयक्तिक छंदातून निर्माण झाले आहे (१९२०). गृहोपयोगी वस्तूंचा,विशेषतः दिव्यांचा संग्रह हे याचे एक वैशिष्टय म्हणता येईल. या संग्रहालयातील विविध दालनांची वैशिष्टयपूर्ण मांडणी मात्र प्रेक्षकांना भुरळ पाडल्याखेरीज राहत नाही. राजा हे त्यांनी आपल्या दिवंगत मुलाचे नाव या संग्रहालयाला त्याच्याच स्मरणार्थ दिले असून १९७५ मध्ये त्यांनी आपले हे संग्रहालय शासनाला अर्पण करून टाकले आहे. पुण्यातील महात्मा फुले संग्रहालय (१८८८) या औद्योगिक संग्रहालयाचे पूर्वीचे नाव ‘लॉर्ड रे महाराष्ट्र औद्योगिक संग्रहालय’ असे होते. १८८८ मधील भारतीय कला आणि भारतातील उत्पादन वस्तूंच्या पुण्यातील प्रदर्शनातून याचा जन्म झाला. पुढे १९२९ साली नगरपालिकेने त्याचे पुनरूज्जीवन व पुनर्रचना केली. पुण्याच्याच ⇨ भारत इतिहास संशोधक मंडळाच्या (१९१०) संग्रहालयामध्ये मराठी,संस्कृत,फार्सी,हिंदी आणि कानडी या भाषांतील सु. दहा लक्षांहूनही अधिक कागदपत्रे आहेत. याशिवाय सु. अठरा हजारांहून अधिक विविध भाषांतील तालपत्रे व कागद यांवरील हस्तिलिखिते,अमाप नाणी,रंगचित्रे,ताम्रपट,शिलालेख,शिल्पाकृती,शस्त्रे नकाशे,गंजीफा,कपडे आणि विविध पुरातन वस्तू यांचाही संग्रह यात केलेला आहे.

सेवाग्राम (वर्धा) येथील गांधी स्मारक संग्रहालय (१९४९) हे गांधी स्मारक निधीने महात्मा गांधींच्या स्मरणार्थ स्थापन केले. यात गांधीजींनी स्वतः वापरलेल्या वस्तू,प्रतिमाचित्रे,गांधी-साहित्य इत्यादींचा अंतर्भाव होतो तर वर्धा येथील मगन संग्रहालय  हे महात्मा गांधींचे दिवंगत पुत्र मगनलाल यांचे स्मारक असून त्याचे उद्घाटन ३० डिसेंबर १९३८ रोजी महात्मा गांधींनी केले होते. यात खादी,ग्रामोद्योगाच्या वस्तू इत्यादींचा संग्रह केलेला आहे. तसेच धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंदिराच्या (१९३२) संग्रहालयातही इतिहासकालीन वस्तू आण चित्रे यांचा मोठा संग्रह आढळतो.

मुंबईच्या सृष्टिविज्ञान संग्रहालयाची स्थापना (१८८३) मुंबईच्या आठ नागरिकांनी खासगी स्वरूपात केली असून पुढे या संग्रहालयाची वाढ उत्तरोत्तर होत गेली. यातच १९२३ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाच्या साहाय्याने एक सृष्टिविज्ञान विभाग सुरू करण्यात आला. हा आशियातील सर्वोत्कृष्ट विभाग मानण्यात येतो. यात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक,मासे इत्यादींचे नमुने जतन केलेले आहेत. [⟶बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी].

याशिवाय मुंबईचेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय संग्रहालय (१९४६) आणि पुण्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय संग्रहालय (१९४६) ही महाविद्यालयीन संग्रहालये उल्लेखनीय आहेत तर मुंबईचे सेंट झेव्हियर्स कॉलेज संग्रहालय,शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय संग्रहालय तसेच कॅलिको वस्तुसंग्रहालय आणि सातारचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हीदेखील वैशिष्टपूर्ण संग्रहालये मानावी लागतील.

औरंगाबादच्या ‘मातोश्री कौसल्या पुरवार संग्रहालया’ चे वय केवळ दहा वर्षांचे असून त्यातील स्फटिकाचा नृसिंह व सोंडेतून पाणी सोडणारा हत्ती हे या संग्रहालयाते खास वैशिष्टय ठरते. तेर येथेही अलीकडे शासकीय संग्रहालय निर्माण झाले आहे. [⟶ पुरातत्त्वीय अवशेष पुरातत्त्वीय उत्खनने].

त्याचप्रमाणे व्यक्तिशः संग्रह करणारांपैकी पैठणचे बाळासाहेब पाटील (पैठणीचे नमुने तसेच सातवाहनकालीन वस्तुसंग्रह),तेरचे रामलिंगप्पा लामतुरे (हस्तिदंती स्त्री-शिल्पे,हस्तभूषणे,नाणी इ.) आणि पुण्याचे स. आ. जोगळेकर (नाणकसंग्रह) [⟶ नाणी व नाणकशास्त्र व प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर (ऐतिहासिक वस्तू) इ. उल्लेखनीय आहेत].

कलावंतांना आपल्या कलानिर्मितीच्या प्रदर्शनासाठी मुंबई येथे जहांगीर  कलावीथी  (जहांगीर  आर्ट  गॅलरी)  १९५१  मध्ये  स्थापन झाली  असून  २४  जुलै  १९८४  या  दिवशी  ती  दिल्लीच्या ‘नॅशनल गॅलरीज ऑफ मॉडर्न आर्ट’ या संस्थेची शाखा म्हणून शासनाला प्रदान करण्यात आली. त्यापूर्वी ‘आर्टिस्ट सेंटर’ या नावाची एक गॅलरी रँपार्टरो येथे होती.तिची पुनर्रचना ‘आर्टिस्ट एड सेंटर’ मध्ये करण्यात आली. हीच सर्वांत जुनी आर्ट गॅलरी समजण्यात येते. [बाँबे आर्ट सोसायटी]. याखेरीज ‘ताज आर्ट गॅलरी’, ‘ओयासिस गॅलरी’, ‘ओबेराय शेरटन आर्ट गॅलरी’ यांसारख्या विविध कलाविथींचीही निर्मिती झाल्याचे दिसून येते. [ प्राणिसंग्रहोद्याने भारत (संग्रहालये व कलावीथि) संग्रहालये].

   जोशी,चंद्रहास

संदर्भ :

1. Government  of India, Ministry of Education, Cultural Forum : Special Number on Museology, New Delhi, January, 1966.

२. सी. शिवराममूर्ती, भारतीय संग्रहालयांची निर्देशिका, नवी दिल्ली, १९६०.