कला : इ. स. पू. सु. १५०० या काळात मध्य भारतातील माळवा येथून एक कृषी जमात महाराष्ट्रात येऊन गोदावरी,प्रवरा,तापी,भीमा इ. नद्यांच्या खोऱ्यांत स्थिरावली व तेथूनच महाराष्ट्राच्या कलापरंपरेस सुरूवात झाली. त्या जमातीने महाराष्ट्रास कुंभाराच्या चाकाची ओळख करून दिली. त्यांनी केलेली भांडी तंत्रदृष्टया परिपूर्ण आहेत. तांबे या धातूची ओळखही त्यांच्यापासून झाली. उत्खननात सापडलेल्या वस्तूंच्या कार्बन-१४ पद्धतीने केलेल्या कालमापनपद्धतीनुसार इ. स. पू. सु. १५०० ते १००० यांदरम्यान महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन ⟶ जोर्वे संस्कृती उदयास आली. अहमदनगर जिल्ह्या तील ⟶ दायमाबाद येथे सापडलेली तांब्याची (भरीव) हत्ती,बैल,गेंडा व बैलगाडी ही शिल्पे इ. स. पू. १३०० या काळांतील असून,ती कलात्मक आहेत. महाराष्ट्रात नेवासे,तेर,नासिक,पैठण,ब्रह्मपुरी (कोल्हापूर),कराड,कौंडिण्यपूर,भोकरदन इ ठिकाणांच्या उत्खननांतून सापडलेली ओतीव शिल्पे,नक्षीकामयुक्त वस्तू,भांडी इ. वस्तूंमधून महाराष्ट्रातील कलापरंपरा इ. स. पू. सु. १५०० वर्षे या काळापासून चालत आली असावी,असे दिसते. तथापि महाराष्ट्रात नागर संस्कृतीची सुरूवात मौर्यांच्या राजसत्तेपासून झाली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ खास दूत महाराष्ट्रात पाठविले होते. याचा पुरावा नालासोपारा (ठाणे जिल्हा) येथे सापडलेल्या इ. स. पू. तिसऱ्या शतकातील गिरिलेखात आढळतो. इ. स. पू. सु. २०० या काळात सातवाहनांची राजसत्ता उदयास आली व पुढे ती. सु. चार शतके होती. पैठण ही एक त्यांची राजधानी होती. कल्याण आणि भडोच या व्यापारी बंदरांतून रोमन साम्राज्याशी व्यापार होत असावा, ह्याचे काही नमुने (रोमन मद्यकुंभ, पाँपेईसदृश मूर्ती, दिवे इ.) महा राष्ट्रातील उत्खननांतून उपलब्ध झाले.

महाराष्ट्रातील प्राचीन कलापरंपरेचा विचार पुढील कलाप्रकारांच्या  संदर्भात  करता  येईल  :  (१)  मूर्तिकला :  गुंफा,  देवळे इ., (२) चित्रकला, (३) लघुचित्रे, (४) भित्तिचित्रे, (५) सचित्र हस्तलिखित पोथ्या, (६) कोरीव अलंकरण व नक्षीकाम, (७) ओतकाम, (८) लोककला: पैठण व पिंगुळी येथील चित्रकथी,  काचेवरील चित्रे, गंजीफा  इ.  आणि  (९)  आदिम-आदिवासी  कला  :  वारली  चित्रकला  इत्यादी. याशिवाय वास्तुकला, संगीत, नृत्य, हस्तव्यवसाय, संग्रहालये व कलावीथी, रंगभूमी व चित्रपट यांचा आढावा स्वतंत्रपणेपुढे घेतलेला आहे. तसेच साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीपासून ब्रिटिश अंमलाखाली सुरू झालेल्या नव्या कलाशिक्षणपद्धतीतून उत्क्रांत झालेली अर्वाचीन व आधुनिक कला, तसेच कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या संस्था यांचाही थोडक्यात आढावा  इथे घेतलेला आहे.


मूर्तिकला :सातवाहन, गुप्त, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवटींच्या काळात म्हणजे इ. स. पू. सु. २०० पासून ते जवळजवळ बाराव्या शतकापर्यंत मूर्तिकला ही वास्तुकलेशी निगडित होती. महाराष्ट्रात दगडात खोदलेली ⟶  लेणी सु. १,१०० आहेत. त्यांमधून ही शिल्पे कोरलेली आहेत. त्यांपैकी ⟶  कार्ले, ⟶ भाजे, बेडसे, नासिक, ⟶  कान्हेरी, ⟶ अजिंठा, ⟶ वेरूळ, औरंगाबाद, ⟶ घारापुरी यांतील शिल्पकृती अद्वितीय आहेत. भाजे येथील लेणी सर्वांत जुनी म्हणजे इ. स. पू. २५० या काळातील आहेत. बौद्ध लेण्यांतील बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा व बुद्धाचे महापरिनिर्वाण (अजिंठा) ही शिल्पे अप्रतिम आहेत. वेरूळ येथील एका महाकाय पाषाणात खोदलेले, मुक्तपणे उभे असलेले कैलास लेणे (आठवे शतक) हा तर वास्तु-शिल्पकलेतील एक चमत्कारच आहे. त्याचप्रमाणे घारापुरीच्या लेण्यातील शिवाची तीन स्वरूपे प्रकट करणारे त्रिमूर्तीचे भव्य शिल्प मन थक्क करून टाकणारे आहे. सुमारे सहाव्या शतकापासून, म्हणजे बौद्ध धर्माचा प्रभाव क्षीण होऊ लागल्यानंतर दहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकूटांच्या कारकीर्दीत (इ. स. ७५७ ते ९७3) ही शिल्पे खोदली गेली आहेत.   लेणी कोरण्याची कला अकराव्या शतकानंतर पूर्णपणे खंडित झाली.

यानंतरची मूर्तिकला बांधीव देवळांवर दिसून येते. अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत चालुक्या, राष्ट्रकूट व यादव यांच्या कारकीर्दीत अनेक मंदिरे बांधली गेली. यादवकाळात हेमाडपंती वास्तुशैलीची अनेक मंदिरे बांधली गेली. त्यांवरील शिल्पकला सुंदर आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने पंढरपूर (विठोबा), एलिचपूर (विष्णू), कोल्हापूर (महालक्ष्मी), अमरावती (आदित्य), वहाळ (भवानी) इ. देवळांवर आढळतात. शिवाय नासिक, त्र्यंबकेश्र्वर, कोकण, वऱ्हाड या भागांतील देवळेही शिल्पदृष्टया वैशिष्टपूर्ण आहेत. शिलाहारांनी बांधलेले अंबरनाथ येथील मंदिर (१०६१) व गंडरादित्याच्या कारकीर्दीतील (१११०-४०) खिद्रापूरचे (जि. कोल्हापूर) कोप्पेश्र्वर मंदिर, तसेच यादवांनी बांधलेले सिन्नर येथील मंदिर (सु. तेरावे शतक) ह्या शिवमंदिरांवरील शिल्पकाम लक्षणीय आहे. उत्तम शिल्पकृती असलेली अनेक देवळे महाराष्ट्रात आहेत.

चित्रकला : इथे चित्रकला ह्या विषयांतर्गत महाराष्ट्रातील भित्तिचित्रे, लघुचित्रे, सचित्र पोथ्या, चित्रकथी, काचेवरील चित्रे, गंजीफा, आदिवासी कला इत्यादींचा आढावा घेतला आहे.

भित्तिचित्रे : महाराष्ट्रात सर्वांत पुरातन चित्रकला अजिं ठा लेण्यांमध्ये सापडते. अजिंठ्यामध्ये एकूण ३० बौद्धधर्मीय गुंफा (लेणी) आहेत. त्यांतून प्राचीन व पारंपरिक महाराष्ट्रीय वास्तु-शिल्प-चित्रादी कलांचे सुंदर प्रातिनिधिक दर्शन घडते. दहाव्या क्रमांकाच्या गुंफेमधील भित्तिचित्रे सर्वांत जुनी असावीत (इ. स. पू. दुसरे शतक). जातककथांचा आधार घेऊन ही भित्तिचित्रे रंगविली आहेत. जातक-कथांव्यतिरिक्त पद्मपाणी, अवलोकितेश्र्वर, नृत्यांगना, गंधर्व इ. अनेक चित्रविषय त्यात हाताळलेले आहेत. यांशिवाय पानेफुले, पशुपक्षी, काही परदेशीय नरनारी, तसेच तत्कालीन समाजजीवनातील प्रसंग इ. अनेक विषय या भित्तिचित्रांतून प्रभावीपणे रंगविले आहेत. अजिं ठ्यातील भित्तिचित्रांचे तंत्र पाश्चात्त्य भित्तिचित्रांच्या तंत्राहून वेगळे आहे. जुनी पाश्चात्त्य भित्तिचित्रे ओल्या गिलाव्यावर रंगविली जात. अजिंठ्यामध्ये चित्रे सुकलेल्या गिलाव्यावर रंगविलेली आहेत. प्रथम खनिज लाल रंगाने रेखांकन करण्यात येई व मग हळूहळू इतर रंग भरण्यात येत. गडद, फिकट व उठावाचे रंग भरल्यानंतर पुन्हा गडद रंगाने रेखांकन करण्यात येई. रंग बहुतांशी खनिज प्रकारचे असत व काही वनस्पतिजन्य असत. अजिंठ्याप्रमाणेच वेरूळ, भाजे या लेण्यांतही भित्तिचित्रे असावीत पण ती काळाच्या ओघात नाश पावली आहेत.

आठव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात उल्लेखनीय भित्तिचित्रे रंगविली गेली नसावीत, असे दिसते. उत्तर मराठा काळात पुन्हा महाराष्ट्रात भित्तिचित्रे रंगविण्यात येऊ लागली. या काळात मराठे दिल्लीपर्यंत पोहोचले व तेथे त्यांना कलासंपन्न जीवनरहाणीचा परिचय झाला असावा. मोगल आणि राजपूत राजांच्या महालातील कलावैभवाचा त्यांच्यावर प्रभाव पडला व नक्षीकाम, भित्तिचित्रे, कलाकुसरीच्या गोष्टी इ. त्यांनीही आपल्या जीवनात आणल्या. त्याचा परिणाम म्हणून पुणे, सातारा, अहमदनगर, नासिक, वाई इ. ठिकाणी अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत बांधलेल्या प्रासादांत, महालांत, मंदिरांत, वाड्यांत तसेच साध्या घरांतही भित्तिचित्रे रंगविलेली आढळून येतात. या भित्तिचित्रांत वैष्णव धर्माचा प्रभाव जास्त दिसतो. त्यांचे विशेष आवडीचे विषय म्हणजे गणपती, महिषासुर-मर्दिनी, विष्णू, शिव, दशावतार, समुद्रमंथन, सरस्वती, कृष्ण, कृष्णलीला, गायक-वादक, रामायण-महाभारतातील प्रसंग, देवादिक, राजे, राण्या, सरदार, शिकारीचे प्रसंग इत्यादी.

सर्वांत अधिक भित्तिचित्रे आज वाई येथे आढळतात. सरदार रास्ते यांचा मोतीबाग वाडा, द्रविड वाडा, देवांचा वाडा, पटवर्धन वाडा, जोशी-मेणवलीकर वाडा यांतील चित्रे अद्याप अवशिष्ट असून ती पहाण्याच्या स्थितीत आहेत. वाईपासून जवळच मेणवली येथे नाना फडणीस यांच्या वाड्यातही एका खोलीत भित्तिचित्रे रंगविली आहेत. याशिवाय वाईमधील अनेक घरांत व घरांबाहेरच्या भिंतींवर भित्तिचित्रे आढळतात. महाराष्ट्रात इतर ठिकाणी बऱ्यावाईट अवस्थेत आढळणारी भित्तिचित्रे अशी : हरिनारायण मठ, बेनावाडी (जि. अहमदनगर) निपाणीकर-देसाई वाडा (निपाणी, सध्या कर्नाटकात) पंतप्रतिनिधी वाडा, मलकापूर (जि. कोल्हापूर) बालाजी मंदिर, चांदोरी (जि. नासिक) होळकरांचा रंगमहाल, चांदवड (जि. नासिक) भद्रकाली मंदिर, शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य मठ (नासिक) नाना वाडा, बेलबाग, वारामतीकर वाडा,कानडे वाडा (पुणे) नवा राजवाडा, सातारा नाईक-निंबाळकर महाल, वाठार (जि. सातारा) इत्यादी.

उत्तर मराठा काळातील ही भित्तिचित्रे चुन्याच्या सुक्या गिलाव्यावर रंगविलेली आहेत. चित्रांच्या शैलीही वेगवेगळ्या आहेत. यावरून अनेक ठिकाणच्या चित्रकारांनी ती रंगविली असावीत. स्थानिक चित्रकारांची निर्मितीही काही ठिकाणी असावी. राजस्थानी,आंध्र,दक्षिणी व मिश्र या येथील विशेष आढळणाऱ्या चित्रशैली होत. रंगसंगती व अलंकरणही त्याप्रमाणे बदललेले दिसते. भित्तिचित्रे रंगविण्याची प्रथा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कमीअधिक प्रमाणात प्रचिलत होती. विसाव्या शतकात एकूणच नागर संस्कृतीची वस्तुशैली बदलली व भित्तिचित्रकला पूर्णपणे नाहीशी झाली.

लघुचित्रे  : दक्षिणेमध्ये गोवळकोंडा,विजापूर व अहमदनगर ही मुसलमानी राज्ये होती. येथील राज्यकर्त्यांचा इराण आणि तुर्कस्तान यांच्याशी  संबंध  होता.  त्यांनी  काही  कलावंत  खास  तेथून आणले होते. पुढे अनेक कलावंत येथे निर्माण झाले. १५६५ ते १६२७ या काळात  या  राज्यातील  चित्रकला  परमोच्च  अवस्थेला  पोहोचली  होती.

ही चित्रकला बहुतांशी मोगल धाटणीची होती. ती ⟶ दख्खनी कला (दक्षिणी  कलम)  म्हणून  ओळखली  जाते.  अहमदनगर येथे विशेषतः संगीतातील रागांवर आधारित चित्रे रंगविली गेली. त्यांना ⟶ रागमाला चित्रे असे म्हणतात. एका रागमालेत ३६ किंवा ४२ चित्रे असतात.

पोथ्या: ताडपत्र, भूर्जपत्र, कागद यांवर हाताने लिहिलेल्या चित्रमय पोथ्या भारतात अनेक ठिकाणी निर्माण झाल्या. विशेषतः पंधराव्या शतकातील कल्पसूत्र हे जैन हस्तलिखित श्रेष्ठ कलागुणांसाठी प्रसिद्ध आहे. [⟶ जैन कला].अशा प्रकारच्या चित्रमय,सुशोभित हस्तलिखितांचा प्रभाव महाराष्ट्रातही पडला. सतराव्या – अठराव्या शतकांत भागवत धर्मावर काही चांगल्या चित्रमय पोथ्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या. बऱ्याचशा पोथ्या खाजगी मालकीच्या आहेत. तथापि धुळे,नगर,पुणे व नागपूर येथील वस्तुसंग्रहालयांत काही चांगल्या पोथ्या आहेत. नागपूर वस्तुसंग्रहालयातील रघुजी भोसले यांच्या मूळ मालकीची श्रीमद्-भागवत ही पोथी सर्वोत्कृष्ट आहे.


चित्रकथी: कागदावर रंगविलेल्या चित्रमालिकेस अनुसरून संगीतमय कथाकथन करण्याची एक परंपरा महाराष्ट्रात सतराव्या शतकापासून  चालत  आली  आहे.  आजमितीस  त्यातील काही अखेरचे  अवशेष  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील  पिंगुळी या खेड्यात अस्तित्वात आहेत. गुजरातमधील ‘पाबुजीना पढ’,राजस्थानमधील ‘जादू पटुवा’,ओरिसामधील ‘पटचित्र’ यांप्रमाणेच महाराष्ट्रातील ‘चित्रकथी’ ही एक पिढीजाद पारंपरिक लोककला आहे. महाराष्ट्रात पैठण व पिंगुळी या दोन ठिकाणी चित्रकथींच्या पोथ्या सापडल्या. या पोथ्या म्हणजे चित्रांचा संच असतो. चित्रे एकमेकांस पाठीमागच्या बाजूने चिकटवलेली  असतात. सर्वसाधारणपणे एका पोथीत ३० ते ५० पाने असतात. म्हणजे सु. ६० ते १०० चित्रे असतात. या चित्रमाला रामायण,महाभारत व पुराणे यांतील कथानकांवर रंगविलेल्या असतात. पोथ्यांना शीर्षकेही तशीच असतात. उदा.,इंद्रजीत वध,सीताशुद्धी,कर्ण पर्व,युद्धकांड,अरण्यकांड,अहिरावण-महिरावण,नंदी पुराण इत्यादी. पैठण व पिंगुळी येथील पोथ्यांतील चित्रांच्या शैली एकमेकींशी मिळत्याजुळत्या नाहीत. किंबहुना त्यांचा एकमेकींशी काही संबंध असावा,असेही वाटत नाही. पैठण येथील चित्रशैली पूर्णपणे आंध्र पद्धतीची असून,ती अति-आलंकारिक आहे. रंगही अगदी मोजकेच असून विशेषतः लाल रंग मोठ्या प्रमाणात वापरलेला दिसतो. ही चित्रशैली चामड्याच्या पारदर्शक बाहुल्यांशी मिळतीजुळती आहे. सध्या पैठणमध्ये या चित्रांवरून कथाकथन करणारी एकही जमात अस्तित्वात नाही. पिंगुळी येथील पोथ्यांतील चित्रशैली मूलतः राजस्थानी पद्धतीची आहे. तीमध्ये ढोबळ मानाने चार प्रकार आढळतात. काही पोथ्यांतील चित्रण आलंकारिक आहे, काहींच्या रचनेमध्ये गुंतागुंत वाटते,तर काहींचे चित्रण साधे,लघुचित्रांच्या पद्धतीचे आहे. तथापि पिंगुळी येथील एकही पोथी पैठण पद्धतीने रंगविलेली नाही. अठराव्या शतकातील उत्तरार्धात रूढ झालेली ही चित्रकथी-परंपरा पिंगुळी येथील ठाकर जमातीने आजतागायत सांभाळून पुढे चालू ठेवली आहे. या जमातीकडे एकूण ७१ पोथ्या आढळल्या. त्यांपैकी केवळ २८ चांगल्या व वापरण्याच्या स्थितीत आहेत. या चित्रांच्या पोथ्या जमातीने कोठून मिळविल्या,हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण या जमातीत चित्रकार आढळत नाहीत. पिंगुळी हे खेडे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानात येत असे. या संस्थानचे पूर्वीचे राजे जयराम सावंत (कार. १७३८-१७५२) यांचे पूर्वज राजस्थानमधून आले होते. त्यांच्या बरोबर काही चित्रकार या भागात आले असावेत व त्यांनीच या चित्रशैलीचा पाया घातला असावा. सावंत राजे हे कलेचे   आश्रयदाते असावेत व त्यांच्यामुळेच ठाकर ही मूळची भटकी जमात पिंगुळी या गावी स्थिरावली असावी,असे त्यांच्या इतिहासावरून दिसते.

काचेवरील चित्रे : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपातील अनेक देशांचे भारताशी व्यापारी संबंध घनिष्ठ झाले. पोर्तुगीज,फ्रेंच,ब्रि-टिश आणि डच व्यापाऱ्यांनी किनारपट्टीवर आपल्या वसाहती केल्या. त्यांच्यामुळे काचेच्या व इतर मोहक वस्तूंची आयात वाढली. विशेषतः घड्याळे,झुंबरे,चिनी मातीची भांडी,नव्या प्रकारच्या बाजाच्या पेट्या, काचेवरील चित्रे इ. वस्तूंना स्थानिक बाजारात मागणी वाढू लागली. त्यांत काचेवरील चित्रे सर्वाधिक लोकप्रिय झाली. यूरोपात पोलंडपासून स्पेनपर्यंत अनेक देशांत काचेवरील चित्रे रंगविली जात. तथापि यूरोपि-यन बाजारांतील बहुतांश चित्रे चीन देशात तयार होत व भारत-आफ्रिका-मार्गे यूरोपातील देशांत जात. अठराव्या शतकात फ्रेंच मिशनऱ्यांकडून चिनी लोकांनी ही कला आत्मसात केली असावी, असे इतिहासावरून वाटते. चिनी व्यापाऱ्यांनीही ही कला भारतात आणली. चिनी व्यापारी गावोगावच्या बाजारपेठांत ही चित्रे विकत. ही चित्रे गुळगुळीत,मोहक व लखलखीत असत. त्यामुळे ती फार लोकप्रिय झाली. बरेच चिनी चित्रकार राजे-सरदारांच्या पदरी काम करू लागले. परिणामतः येथील चित्रकार-कारागिरांनीही अशी चित्रे बनविण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रात काचेवरील चित्रे विपुल प्रमाणात निर्माण झाली. विशेषतः पुणे,अहमदनगर,सातारा,मुंबई येथील बाजारांत ही चित्रे विकली जात. घरामध्ये,दुकानामध्ये किंवा महालामध्ये भिंत व छत यांमध्ये ४५ अंशांचा कोन करून अशी काचेवरची चित्रे ओळीने लावण्याची प्रथा होती. घर किंवा दुकान सुशोभित करण्याची ती एक मुख्य पद्धत होती. काही ठिकाणी काचेवरील देवादिकांची चित्रे भिंतीमध्येच लिंपून टाकलेली आढळतात. अहमदनगरमधील बाजारातील अनेक दुकांनात आजही ही चित्रे तशा प्रकारे लावलेली दिसतात. सातारा येथील राजवाड्यातही अशीच अनेक चित्रे आहेत. पुण्यातील ‘राजा केळकर वस्तुसंग्रहालया’ तही बरीच काचेवरील चित्रे आढळतात. भारतातील अनेक राज्यांत काचेवरील चित्रे वेगवेगळ्या शैलींत बनविलेली आढळतात. महाराष्ट्रात ही चित्रे दोन शैलींमध्ये रंगविलेली दिसतात : (१) राजे,सरदार,राण्या यांची व्यक्तिचित्रे अत्यंत गुळगुळीत,लालसर करड्यारंगात यूरोपीय पद्धतीने रंगविलेली असून त्यांत गडद बाह्यरेषेचा संपूर्णपणे अभाव दिसतो आणि (२) जोरकस गडद रेखांकन व भडक रंगांत रंगविलेली देवादिकांची व राजे-राण्यांची चित्रे दुसऱ्या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रातील चित्रांत मराठे सरदार,पेशवे,नाना फडणीस,मस्तानी,होळकर,शिंदे अशा नावांनी ओळखली जाणारी अनेक चित्रे आहेत.

राजा ⇨रविवर्मा (१८४८-१९०६) यांनी रंगविलेली लक्ष्मी,सरस्वती व इतर देवादिकांची चित्रे,त्याचप्रमाणे रामायण,महाभारत यांतील प्रसंगांवरील चित्रे यांच्या तैलरंग-शिलामुद्रित (ऑलिओग्राफ) प्रती विसाव्या शतकाच्या सुरूवातीस बाजारात आल्या व अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. त्यामुळे काचेवरील चित्रे कायमची मागे पडली. तथापि काचेवरील काहीशी ओबडधोबड दिसणारी चित्रे साधारण १९५० पर्यंत इराण्यांच्या हॉटेलांतून पहावयास मिळत.

गंजीफा : गंजीफा म्हणजे पत्त्यांचा जोड. हे पत्ते गोल आकाराचे असतात. पत्त्यांवरील चित्रे दशावतार, नवग्रह इत्यादींवर आधारलेली असतात. प्रत्येक अवताराचे एक मुख्य पान, एक उप-मुख्य पान (वजीर) व गुणानुक्रमे दहा पाने असा एकूण १२० पत्त्यांचा संच असतो. पत्त्याच्या कागदावर अनेक संस्कार करून तो टणक व गुळगुळीत बनवतात. त्यावर लघुचित्रण पद्धतीने चित्रे काढून,त्यावर लाख व राळ यांच्या मिश्रणाचा एक लेप दिला जातो. त्यामुळे ती पाने गुळगुळीत राहून त्यांचा पृष्ठभाग पाणी व आर्द्रतेपासून सुरक्षित रहातो.

ही पाने ठेवण्यासाठी एक सुंदर रंगीत पेटी असते. असे गंजीफाचे जोड बनविणारी एक चितारी जमात ⇨सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे पिढ्यान्-पिढ्या गेली २०० वर्षे काम करीत आहे. पेशव्यांच्या काळी गंजीफाचा खेळ फार लोकप्रिय होता. स्त्रियाही हा खेळ खेळत. पेशव्यांना हे गंजोफाचे जोड सावंतवाडीहून जात. [⟶गंजीफा]. सावंतवाडी येथे याशिवाय लाकडी रंगीत खेळणी,फळेस पाट,देव्हारे इ. अनेक शोभेच्या वस्तू बनविल्या जाता त. आजही अनेक कारागीर या व्यवसायात आहेत. [⟶सावंतवाडी संस्थान].

लाकडी कोरीवकाम: लाकडी कोरीवकामाची परंपरा प्राचीन काळापासून असली,तरी तिचे अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट प्रतीचे लाकडी कोरीवकाम झाले. हे काम करणारे सर्वच कारागीर स्थानिक नव्हते. गुजरात व सौराष्ट्र येथून अनेक कारागीर तेव्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांना राजाश्रय व लोकाश्रय मिळाला. नासिक,पैठण,पुणे तसेच कोकणात सावंतवाडी,आकेरी,आचरे,कुणकेश्र्वर इ. ठिकाणी मंदिरांमध्ये ठिकठिकाणी लाकडी कोरीवकाम आढळते. विशेष उल्लेखनीय लाकडी कोरीवकाम ज्या ठिकाणी आहे, ती ठिकाणे अशी पुण्याचा विश्रामबाग वाडा, नासिकचा सरकारी वाडा, चांदवड येथील होळकरांचा रंगमहाल, पळशी (अहमदनगर) येथील इंदूरकरांचा वाडा, आचरे येथील रामेश्वर मंदिर,कुणकेश्वर येथील शिवमंदिर,वाई येथील वनवडीकरांचा वाडा इत्यादी.


दैनंदिन व्यवहारातील लोककला: घरातील जमिनीवर व अंगणात सुंदर आलंकारिक ⇨रांगोळी काढण्याची परंपरा महाराष्ट्रात कित्येक पिढ्या चालत आली आहे. विशेषत: शुभ दिनी किंवा मंगल प्रसंगी ही रांगोळी रंगांनी भरली जात असे. खेडोपाडी परंपरागत पद्धतीची रांगोळी-कला अजूनही आढळत असली, तरी आजच्या शहरी संस्कृतीत रांगोळीचे महत्त्व कमी होऊ लागले आहे.

तांबे, पितळ, चांदी इ. धातूंची विविध आकारांची भांडी व इतर वस्तू बनविण्यामध्येही महाराष्ट्राचे खास वैशिष्टय दिसून येते. विशेषत: नासिक आणि कोल्हापूर येथील भांडी व वस्तू सुबक कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. याही कारागिरीला आता फारसे महत्त्व उरले नाही. तथापि कोल्हापूर जिल्ह्यात ⇨हुपरी या गावी परंपरागत चांदीचे दागिने बनविले जातात. त्यांतील कलात्मकता अद्यापही टिकून आहे.

वारली जमातीची चित्रकला : लग्नविधीनिमित्त काढलेले चित्र चित्रकार-जिव्या सोमा.

आदिवासी कला: ठाणे जिल्ह्यामध्ये डहाणूजवळच्या डोंगराळ भागात ⇨वारली या आदिवासी जमातीची वस्ती आहे. ही आदिम जमात नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून दूर आहे. या जमातीत अद्यापही विधीप्रसंगी वधू-वराच्या झोपडीवर सर्व बाजूंनी चित्रे काढली जातात. पिढ्यान्-पिढ्या चालत आलेल्या संकेतांनुसार ही चित्रे काढली जातात. भुताखेतांपासून वधुवरांचे संरक्षण व्हावे, हाही हेतू त्यामागे असतो. त्यांच्या चित्रांतील आकार सहजस्फूर्त आणि आलंकारिक असतात. चित्रांतील झाडे-वनस्पती चैतन्यमय भासतात. तसेच नृत्याच्या चित्रणातून लयबद्धता प्रकट होते. चित्रकारांची निरीक्षणशक्ती तीक्ष्ण असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांच्या चित्रांत त्यांनी पाहिलेल्या व अनुभवलेल्या अनेक घटना लहान-सहान तपशिलांनिशी आकाररूप धारण करतात.

 

आधुनिक कलासंप्रदाय: परंपरेनुसार चालत आलेल्या या विविध प्रकारच्या दृक्-कला एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून हळूहळू नाहीशा होऊ लागल्या,किंवा त्यांचे स्वरूप बदलू लागले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच व डच या परकीयांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या व त्यांच्याबरोबर त्यावेळी यूरोपात प्रचलित असलेल्या कलांचे अनेक नमुने भारतात आले.  त्यांचा प्रभाव राजे-महाराजे,सरदार,सधन व्यापारी इ. कलांच्या आश्रयदात्यांवर पडू लागला. इंग्रज लोक कलेचे भोक्ते, पण सुरूवातीच्या काळात भारतीय कलेचे सौंदर्यशास्त्र त्यांना उमगले नाही. १८५० पासून १९१० पर्यंत जॉन रस्किन,रॉजर फ्राय,वेस्टमकट,मोनिअर विल्यम्स,जॉर्ज वर्डवुड,व्हिन्सेन्ट स्मिथ इ. इंग्रज टीकाकारांनी भारतीय कलेवर कडाडून हल्ले केले. भारतीय कला शास्त्रशुद्ध तर नाहीच पण ती तर्कशुद्धही नाही,अशी त्यांची टिका असे. इंग्रजांच्या सत्तेच्या प्रभावाने भारतीय कलाकारांचा आत्मविश्वा सही नाहीसा झाला व इंग्रजांनी इथे रूजवलेल्या वास्तववादी कलेचे अनुकरण करण्यास भारतीय कलावंतांनी सुरूवात केली. या संक्रमणावस्थेतील कलेस ‘कंपनी शैली’ किंवा ‘फिरं गी शैली’ या नावांनी ओळखले जाते.

लंडनमध्ये १८५१ साली आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले, तेव्हा ते पाहून  मुंबईचे  व्यापारी  व  कलेचे  भोक्ते  जमशेटजी  जीजीभाई यांना वाटले, की  आपल्या  ‘नेटिव्ह’  मुलांनाही  शास्त्रशुद्ध  कलेचे शिक्षण द्यावे.  त्यांनी ‘कंपनी’ सरकारला एक लाख रूपये देणगी देऊन कलाशाळा  निर्माण  करण्याची  विनंती  केली.  त्यातूनच  १८५७  साली मुंबईत ⇨सर  जे. जे. स्कूल  ऑफ  आर्टची  स्थापना झाली व कलेच्या  नव्या  इतिहासाला  सुरूवात   झाली.  कलाशाळेचे प्राचार्य व इतर शिक्षक इंग्लंडहून मागविण्यात येऊ लागले. चित्रकलेच्या शिक्षणाबरोबरच  नक्षीकाम  व  कोरीवकाम  करणारे,लोहार,तांबट, कासार, सोनार  इत्यादींसाठी  वर्ग  उघडण्यात  आले.  लोखंडाच्या  नक्षी-ओतकामात  ‘जे.  जे.  स्कूल  ऑफ  आर्ट’  अल्पावधीत  प्रसिद्ध  झाले. अनेक  मोठ्या  इमारती  व  प्रासाद  यांचे  मुख्य  दरवाजे  व  नक्षीयुक्त कठडे  या  संस्थेमध्ये  केले   जात.  लॉकवुड  किपलिंग हे शिल्पकार होते. त्यांच्या कारकीर्दीत (१८६५ ते १८८०) मुंबईतील बोरीबंदर (व्ही. टी.) स्टेशनची इमारत,मुंबई विद्यापीठातील ‘राजाबाई टॉवरस’, ‘सेलर्स होम’ (जुने विधानभवन) इ. इमारतींवरील दगडातील नक्षीकाम या संस्थेद्वारा करण्यात आले. ग्रिफिथ यांच्या कारकीर्दीत (१८६५ ते १८८४) अजिंठा येथील गुंफांमधील भित्तिचित्रांच्या तंतोतंत प्रतिकृती करण्यात आल्या. त्यावर आद्य ग्रंथ निर्माण करण्यात आला. १९१० मध्ये चिनी मातीची  भांडी बनविण्याची कार्यशाळा उघडण्यात आली. या शाळेत बनविलेल्या    भांड्यांना  लंडन,  अँटवर्प,  अँम्स्टरडॅम  इ.   ठिकाणच्या प्रदर्शनांत  अनेक  पारितोषिके  मिळत  गेली.  ही  शाळा  अचानक  १९२६ मध्ये  बंद  करण्यात  आली.  १९१९ ते १९३५ या काळात कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमन  हे  जे.  जे.  स्कूलचे  प्राचार्य  होते  व  तो  कलेचा  वैभवशाली काळ  होता.  अनेक  नामवंत  कलावंत  या  काळात  पुढे  आले.  म.  वि. धुरंधर,एस्. पी. आगासकर,ए. एक्स्. त्रिंदाद,एल्,तासकर,अ. आ.  भोसुले  यांच्यासारखे  निष्णात  शिक्षक  आणि  गोपाळ  देऊसकर,व्ही.  एस्.  अडूरकर, ज.  द.  गोंधळेकर, नागेशकर, वि.  सी. गुर्जर,र. गो. चिमुलकर,प्र. अ. धोंड,जी. एम्. सोळेगावकर इ. गुणी विद्यार्थी या काळात जे. जे. स्कूलमध्ये होते. भारतीय अभिकल्पाचा व भित्तिचित्रणाचा  असे  खास  वर्ग  सुरू  करण्यात आले. मुंबईच्या ‘गव्हर्न्मेंट  हाउस’  मध्ये  २०  चित्रचौकटी  रंगविण्याचे  (१९२२), तसेच दिल्लीच्या  ‘इंपीरियल  सेक्रेटरिएट’  मध्ये  भित्तिचित्रे  रंगविण्याचे काम (१९२८)  या  संस्थेमार्फतच  पार  पाडण्यात  आले.   त्यामुळे   आशिया खंडात संस्थेचा नाव-लौकिक झाला.स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला ,जि. पुणे) येथीलभित्तिचित्रे व लाकडी कोरीवकाम (१९५५)   व मुंबईच्या विधान-भवनावरील ब्रांझचे भव्य अशोकचिन्ह(१९८०-८१) हीया संस्थेची वैशिष्टय-पूर्ण कामगिरी होय.प्राचार्य जेरार्ड यांनी आपल्या कारकीर्दीत(१९३५-४७) जे.जे. स्कूलमध्ये व्यावसायिक कलेचा पाया घातला व त्याबरोबरच यूरोपमध्ये प्रचलित असलेल्या आधुनिक कलेची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यास सुरूवात केली. याच काळात ⇨श्यावक्षचावडा, ⇨कृष्णा हेब्बर,पी. टी. रेड्डी इत्यादींनी कलेच्या क्षेत्रात नवनवीन  प्रयोग  सुरू  केले.  १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर व्ही. एस्. अडूरकर यांची जे. जे. कलाशाळेचे पहिले भारतीय  कलासंचालक  म्हणून  नेमणूक  झाली.  स्वातंत्र्योत्तर काळात पाश्र्चात्त्य आधुनिक कलेचा प्रभाव झपाट्याने वाढू लागला. काही कलाविद्यार्थ्यांनी  भारतीय  कलेतून  आधुनिक  कलेचा  शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काहींनी पाश्र्चात्त्य कलामूल्यांचा सढळपणे स्वीकार केला. १९४७ पासून १९६० पर्यंत जे कलावंत उदयास आले,त्यांत सय्यद हैदर रझा,अकबर पदमसी,शंकर पळशीकर,मोहन सामंत,के. एच्. आरा,एच्. ए. गाडे,व्ही. एस्. गायतोंडे,बाबुराव सडवेलकर,लक्ष्मण  पै, ए. ए. रायवा,अब्दुल रहीम आलमेलकर इत्यादींचा अंतर्भाव  होतो.  आधुनिक   प्रयोगशील   चित्रकारांमध्ये ⇨ना.   श्री. बेंद्रे (१९१०-  ) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. व्यावसायिक चित्रकलेच्या क्षेत्रात दीनानाथ दलाल,रघुवीर मुळगावकर,पद्मा सहस्त्रबुद्धे,सुभाष अवचट इत्यादींनी मोलाची भर घातली. त्यांनी मराठी नियतकालिके व पुस्तके सुंदर वेष्टनांनी व मुखपृष्ठांनी सजवली. १९६० नंतरच्या मोजक्याच मान्यवर कलावंतांमध्ये बी. प्रभा,प्रफुल्ला डहाणूकर,प्रभाकर बरवे,गोपाळ आडिवरेकर इत्यादींचा उल्लेख करता येईल.


 ‘सो लाँग अँज आय् ब्रीद, आय् होप’ (१९६५) – बी. प्रभा

मुंबई हे जरी कलेचे प्रमुख क्षेत्र असले, तरी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील काही संस्थांनिकांनी कलेल्या चांगला आश्रय दिलेला होता. विशेषतः कोल्हापूर,औंध,सांगली या संस्थानांत १९१० ते १९४० या काळात काही चांगले कलावंत निर्माण झाले. कोल्हापूरमधील आबालाल रहिमान हे जे. जे. स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले पहिले चित्रकार होत. १८८२ ते ८६ या काळात ते विद्यार्थी होते त्यानंतर माधवराव बागल, दत्तोबा दळवी यांनी कलेचे रीतसर शिक्षण घेतले होते. कलाशाळेत न जाता स्वतःच्या प्रज्ञेने लौकिक संपादन केलेले कलावंत म्हणजे ⇨बाबूराव पेंटर. चित्रकला,शिल्पकला व चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी बहुमोल कामगिरी केली. त्यांच्या प्रभावाखाली बाबा गजबर,गणपतराव वडणगेकर यांनी कला संपादन केली. औंध संस्थानात ⇨बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे कलेचे भोक्ते,चित्रकार व कलासंग्राहक होते. त्यांनी पंडित सातवळेकर व नंतर माधव सातवळेकर यांना कलासाधनेत साह्य केले. त्यांनी आपल्या संग्रहाचे जतन करण्याकरिता औंधमध्ये ‘श्री भवानी संग्रहालय’ (स्थापना – १९३८) हे समृद्ध कलावस्तुसंग्रहालय उभारले. सांगली येथेही एक कलावस्तु-संग्रहालय आहे व त्यात म्यूलर या चित्रकाराची अनेक ऐतिहासिक महत्त्वाची चित्रे आहेत. वास्तववादी पद्धतीच्या जलरंगचित्रणामध्येही महाराष्ट्रातील चित्रकारांनी केलेली कलानिर्मिती अजोड अशी आहे. व्यक्तिचित्रणामध्ये सा. ल. हळदणकर,गजानन हळदणकर,एम्. आर्. आचरेकर,एस्. एन्. कुलकर्णी,वडणगेकर तर निसर्गचित्रणामध्येके. वी. चुडेकर, माधवराव बागल, एस्. जी. जांभळीकर,एम्. के. परांडेकर,धोंड,वडणगेकर,चंद्रकांत मांढरे इत्यादींचा खास उल्लेख करावा लागेल. तैलरंगातील व्यक्तिचित्रणामध्ये त्रिंदाद. गोपाळ देऊसकर,माधव सातवळेकर,एस्. एम्. पंडित,व्ही. ए. माळी, रविंद्र मेस्त्री यांची कामगिरी विशेष आहे. या संदर्भात त्रिंदाद यांची चित्रे अजोड अशी आहेत.

चित्रकलेप्रमाणेशिल्पकलेतही महाराष्ट्रातील कलावंत अग्रेसर राहिले आहेत. ⇨ गणपतराव म्हात्रे यांनी १८९४ मध्ये, वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, मंदिर-पथगामिनी हे अजरामर शिल्प निर्माण केले. १८९६ ते १९०४ या काळात त्यांची शिल्पे लंडन,पॅरिस,शिकागो येथे प्रदर्शित करण्यात आली आणि त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. म्हात्रे यांच्यानंतर बाळाजी तालीम, ⇨वि. पां. करमरकर,बी. के. गोरेगावकर. डी. बी. जोग,र. कृ. फडके यांनी वास्तववादी पद्धतीची अनेक चांगली कामे केली विशेषतः व्यक्तिशिल्पांमध्ये प्रत्येकाची स्वतंत्र शैली होती. पुढे इंग्लंडमध्ये शिकून आल्यावर इतर शिल्पकारांनी नवे प्रयोग सुरू केले. त्यांमध्ये राम कामत व ना. ग. पाणसरे यांची कामे उल्लेखनीय आहेत. साधारण १९५० पासून   आधुनिक कलेचा प्रभाव शिल्पकलेतही दिसू लागला. या आधुनिक शिल्पकारांत ए. दाविएरवाला,नारायण सोनवडेकर,पिलू पोचखानवाला,वी. विठ्ठल इत्यादींची कामे महत्त्वपूर्ण वाटतात. व्यक्तिशिल्पे व स्मारकशिल्पे यांमध्ये एस्. डी. साठे,राम सुतार,वा. वि. मांजरेकर,रविंद्र मेस्त्री यांची कामे सर्वमान्य आहेत. मुंबईमध्ये आधुनिक कलेची चळवळ १९५० मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’ नामक प्रागतिक चित्रकारसंघाने  केली.  लायडन, श्लेसिंजर  व  लँगहॅमर  या   यूरोपीय कलातज्ञांनी त्यास चालना दिली. आरा, ⇨ एम्. एफ्. हुसेन,रझा,फ्रान्सिस  न्यूटन  सोझा, गाडे  हे  त्या  संघाचे  सभासद  होत.  हा  संघ फार काळ टिकला नाही. त्यानंतर ‘बाँबे ग्रूप’ नावाचा संघ पुढे आला. १९५४  ते  १९६२  पर्यंत  त्यांची  प्रदर्शने  झाली  व  ती  गाजली.   या संघाचे सभासद आरा, हेब्बर, चावडा, सामंत, बाबुराव सडवेलकर, डी. जी. कुलकर्णी व हरक्रिशन लाल हे होत. १९६२ मध्ये हा संघ विसर्जित झाला.

 ‘गडकरी रंगायतन’ नाठ्यगृहाच्या (ठाणे) दर्शनी भिंतीवरील देवल-गडकरी-बालगंधर्व यांचे उत्थित शिल्प शिल्पकार-नारायण सोनवडेकर.
‘गडकरी रंगायतन’ नाठ्यगृहाच्या (ठाणे) दर्शनी भिंतीवरील देवल-गडकरी-बालगंधर्व यांचे उत्थित शिल्प शिल्पकार-नारायण सोनवडेकर.
महाराष्ट्रातील कलाविकासाचे संगतवार व सर्वांगीण दर्शन घडविणारा कलासंग्रह कोठेही एकत्रितपणे उपलब्ध नाही. तथापि मुंबईमधील  कलासंचालनालय  कार्यालय,  जे.  जे.  स्कूल  ऑफ  आर्ट आणि  ‘प्रिन्स  ऑफ  वेल्स  म्युझियम’  तसेच  औंध, सांगली, नागपूर,कोल्हापूर   येथील  कलावस्तुसंग्रहालये इ. ठिकाणी ऐतिहासिक महत्त्वाच्या कलाकृती जतन केल्या आहेत. खाजगी संग्रहालयांतील कलाकृतींची  मोजदाद  अद्याप  झालेली  नाही.  महाराष्ट्रातील  आदिवासी वन्य जमातींच्या कला व कारागिरीच्या वस्तूंचा संग्रह पुणे येथील शासकीय  आदिवासी संशोधन केंद्राच्या ‘आदिवासी वस्तुसंग्रहालया’ मध्ये  जतन  केला  आहे.  त्याचप्रमाणे  रोजच्या  व्यवहारातील  धातूंच्या कलात्मक  वस्तू-उदा., दिवे, अडकित्ते, पानदान  इ.  तसेच लाकडावरील नक्षीकाम,  काचेवरील  चित्रे, गंजीफा,चित्रकथी इ. लोककला यांचा सुंदर संग्रह पुणे येथील ‘राजा केळकर वस्तुसंग्रहालया’ त आहे. महाराष्ट्रातील कलेस उत्तेजन व आश्रय लाभावा, या हेतूने मुंबईस काही संस्था स्थापन झाल्या. पहिली संस्था १८८८ मध्ये ⇨बाँबे आर्ट सोसायटी या नावाने सुरू झाली. १९१० मध्ये ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ची स्थापना झाली.  या   संस्थांची   प्रतिवर्षी   मोठी  प्रदर्शने  भरतात. एके  काळी  बाँबे  आर्ट  सोसायटीच्या  सुवर्णपदकाला  फार  मोठी  प्रतिष्ठा होती. कलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन भरवण्याकरिता मुंबईत ‘जहांगीर  आर्ट  गॅलरी’, ‘ताज  आर्ट  गॅलरी’, ‘गॅलरी  केमोल्ड’, ‘पंडोल  आर्ट  गॅलरी’  इ.  कलावीथी  आहेत.  अशाच  प्रकारची  एक सुसज्जकलावीथी ‘जमशेटजी जिजीभाईकलावीथी’ या नावाने मुंबईमध्ये कलासंचालनालयात स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कलानिर्मिती व कलावंत यांची ऐतिहासिक कालक्रमानुसार, तपशीलवार माहिती देणारा ग्रंथ उपलब्ध नाही.तथापि महादेव विश्वनाथ धुरंधरया प्रथितयश कलावंताने कलामंदिरातीलएकेचाळीस वर्षे (१९४०) हा ग्रंथ लिहून १८९० ते १९३१ या काळातील, मुंबईतील व विशेषतः जे. जे. स्कूलमधील महत्त्वपूर्णघडामोडींचा तपशीलवार इतिहास लिहिला आहे. कॅ. ग्लॅडस्टन सॉलोमनही सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी द आर्ट ऑफ एलिफंटा (१९३१),  विमेन इन अजंठा पेंटिग्ज (१९३२)व म्यूरल पेंटिंग्ज इन द बाँबे स्कूल(१९३३) ही उत्कृष्ट पुस्तके लिहिली.शिवाय त्यांनी कलाविषयक बरेच लेखही लिहिले असून ते टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्षिक अंकांतून प्रसिद्ध झालेआहेत. विशेषतः त्यांचा गोपाळ देऊसकरयांच्या चित्रांवर लिहिलेला लेख उद्बोधकआहे. अलीकडच्या काळात जे. जे. स्कूलचे माजी प्राचार्य आणि कलासंचालक प्र. अ. धोंड यांनी रापण (१९७९) हाग्रंथ लिहून, त्यात ललितरम्य शैलीत मुंबईतील  कलाविश्वा चा  १९६६  पर्यंतचा  रसग्राही  आढावा  घेतला आहे. त्यात अनेक चित्रकारांच्या जिवंत व्यक्तिरेखा आढळतात. कलासमीक्षणाच्या  बाबतीत  महाराष्ट्रात  तितकीशी  भरीव कामगिरी झालेली  नाही. टाइम्स  ऑफ  इंडियातून  कॅ. सॉलोमनप्रमाणेच कन्हैयालाल  वकील  व  डॉ.  डी.  जी.  व्यास  हे  भारतीय  कलेविषयी लिहीत.  १९४०  नंतर  डॉ.  लायडन  हे  टाइम्समध्ये  लिहू  लागले. त्यांचे समीक्षण अभ्यासपूर्ण व दर्जेदार असे.पुढे १९५० नंतर ए. एस्. रामन लिहू लागले. त्यानंतर राम चतर्जी, ए. आर्. कनंगी यांनी काही चांगले कलासमीक्षण केले. मराठीमध्ये नी. म. केळकर लिहीत. अलीकडच्या काळात वासुदेव,निस्सीम इझिकेल,ज्ञानेश्व र नाडकर्णी,बाळकृष्ण दाभाडे,माधव आचवल,द. ग. गोडसे इत्यादींनी विपुल,दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण कलासमीक्षण केले आहे. देशातील इतर शहरांच्या मानाने मुंबईमध्ये कलेला चांगला लोकाश्रय मिळतो,असा अनुभव आहे. पूर्वीच्या राजाश्रयाच्या ऐवजी आता आलिशान कार्यालये,हॉटेले,व्यापारी संस्था इ. कलेला आश्रय देताना दिसतात. त्यांमध्ये ‘एअर इंडिया’,टाटा संस्थेची कार्यालये, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ इ. संस्था समकालीन कलेविषयी आस्था दाखवत आल्या आहेत. महाराष्ट्रातील कलेच्या जडणघडणीमध्ये व नवोदित कलावंतांना उत्तेजन देण्यामध्ये डॉ. लायडन, श्र्लेसिंजर, सर कावसजी जहांगीर, डॉ. होमी भाभा, जहांगीर निकोल्सन, जे. जे. भाभा इत्यादींनी फार मोठा वाटा उचललेला आहे. कलाशिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात ४ शासकीय व २१ खाजगी कलासंस्था आहेत. कलाशिक्षणाकरिता  स्वतंत्र  कलासंचालनालय  (स्थापना  १९६५)  असून, सर्व   कलासंस्थांवर   संचालनालयाचे   प्रशासकीय नियंत्रण असते. मुंबई,नागपूर,मराठवाडा या विद्यापीठांमधून चित्रकला,मूर्तिकला,उपयोजित कला या कलाविषयांचे ५ वर्षांचे पदवी अभ्यासक्रम ‘बी. एफ्. ए.’ (बॅचलर ऑफ फाइन आर्टस) – व पुढे २ वर्षांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम – ‘एम्. एफ्. ए.’ (मास्टर ऑफ फाइन आर्टस) – चालू आहेत. शासकीय कलासंस्थांतून हे विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.

सडवेलकर,बाबुराव

श्रीगोंदेश्वर मंदिर, सिन्नर (जि. नासिक).

वास्तुकला : महाराष्ट्राची विशिष्ट भौगोलिक रचना,वारंवार परकी  सत्तेशी  करावा  लागलेला  संघर्ष  व  संमिश्र  संस्कृती यांचा परिणाम  महाराष्ट्राच्या  वास्तुशिल्पावर  झालेला दिसून येतो. महाराष्ट्र हा दगडांचा देश म्हणून ओळखला जातो. साहजिकच दगड हेच महाराष्ट्रीय वास्तुशिल्पाचे आद्य व प्रमुख माध्यम ठरले. हा दगड म्हणजे सह्याद्रीचा दख्खनी कातळ (डेक्कन ट्रॅप) होय. तो एकसंघ, कणखर व कोरण्यास कठीण असा आहे. दगडातून कोरून वास्तुशिल्प घडवण्याची एक प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्रात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मौर्य-सातवाहन काळात लेणी खोदण्याची कला उदयास आली आणि वाकाटक राष्ट्रकूटांच्या राजवटीत ती परमोत्कर्षास पोहोचली.  कार्ले,भाजे,बेडसे,जुन्नर,नासिक, कान्हेरी,अजिंठा,वेरूळ,पितळखोरा येथील बौद्ध लेणी वेरूळ घारापुरी येथील हिंदू लेणी तसेच वेरूळ, धाराशीव येथील जैन लेणी ही महाराष्ट्राच्या वास्तुवैभवाची साक्ष देतात. बौद्ध लेण्यांचे ⇨चैत्य (प्रार्थनामंदिर) व ⇨विहार (निवासस्थान) असे द्विविध रूप प्रायः आढळून येते. अतिप्राचीन वैदिक संस्कृतीतील काष्ठमाध्यमातील वास्तुरचनांचे अनुकरण बौद्ध कारागिरांनी दगडाच्या माध्यमामध्ये यशस्वी रीत्या केले. भाजे येथील चैत्य सर्वांत प्राचीन मानला जातो. दगड खोदण्याच्या ह्या प्राचीन महाराष्ट्रीय कलेचा अत्युच्च विकास वेरूळच्या ⇨कैलास लेण्यात पाहावयास मिळतो. साधारणपणे इ. स. पू. तिसऱ्या शतकात सुरू झालेली ही लेणी खोदण्याची कला इ. स. अकराव्या शतकानंतर खंडित झाली. महाराष्ट्रातील बांधीव मंदिरवास्तूचे सर्वांत प्राचीन अवशेष उस्मानाबाद जिल्ह्यातील ⇨तेर येथे आढळतात (इ. स. चौथे-पाचवे शतक). वादामी-चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या कारकीर्दीतील साधारणपणे सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंतच्या काळातील  बांधीव   मंदिरवास्तूंचे  फारसे  पुरावे  आढळत   नाहीत.  तथापि उत्तरकालीन चालुक्य व यादव यांच्या कारकीर्दीत अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात विपुल प्रमाणात मंदिरे बांधली गेली. विशेषतः यादवकालीन हेमाडपंती वास्तुशैलीची मंदिरे खास वैशिष्टयपूर्ण आहेत. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर,अमरावती येथील आदित्य मंदिर,वहाळचे भवानी मंदिर,एलिचपूरचे विष्णुमंदिर,नेवासे येथील मोहिनीराज,तसेच शिलाहारांनी बांधलेली कोल्हापूरची जैन व हिंदू मंदिरे नासिक,त्र्यंबकेश्र्वर,मराठवाडा,विदर्भ इ. भागांतील देवळे उल्लेखनीय आहेत. त्यातही मुम्मणी या शिलाहार राजाने बांधलेले अंबरनाथ येथील शिवमंदिर व यादवांनी बांधलेले सिन्नरचे श्रीगोंदेश्र्वर मंदिर (सु. १३ वे शतक) हे महाराष्ट्रातील मंदिरवास्तुशिल्पाचे सर्वोत्तम आविष्कार म्हणता येतील. सतत परकी आक्रमणांना तोंड द्यावे लागल्याने, संरक्षक वास्तुशिल्पांची निर्मितीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाली. ग्रामे व छोटी नगरे ही परकी आक्रमणाच्या छायेत फारशी येत नसल्याने स्वसंरक्षणाचा प्रश्न  तिथे फारसा उपस्थित झाला नाही. त्यामुळे ग्रामांची व त्यांतील घरांची रचना मोकळी व बहिर्मुख असे. तथापि मोठ्या शहरांभोवती मात्र कोट असत व त्यातील घरे व वाडे यांची रचना अंतर्मुख असे. कारण परकी आक्रमणांचा मुख्य भर ही शहरे काबीज करण्यावरच असे. घरांच्या व वाड्यांच्या रचनेत भुयारे व तळघरे यांना प्राधान्य असे. उन्हाळ्यात ही तळघरे थंडावा देत तसेच धान्य,जडजवाहिर साठवण्यसाठी व वेळप्रसंगी जीवित रक्षणसाठी त्यांचा उपयोग होत असे. यातील काही भुयारे गावातल्या वाड्यांतून थेट वेशीबाहेर काढलेली असत. शिवकाळात ⇨ किल्ले वा गड बांधणे व त्यांची डागडुजी करणे हेच मुख्य वास्तुकार्य झाले. रायगड,पुरंदर,तोरणा,विशाळगड,पन्हाळा,प्रतापगड इ. डोंगरी किल्ले व सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,जंजिरा इ. जलदुर्ग प्रसिद्ध आहेत. पेशवेकाळात मंदिरे,नदीवरील घाट,वाडे,उद्याने, कारंजी इ. प्रकारांत वास्तुनिर्मिती झाली. मात्र ती बव्हंशी पारंपरिक व साचेबंद अशीच होती. त्यांत स्वतंत्र व कल्पक वास्तुवैशिष्टयांचा ठसा तत्कालीन वास्तुकारांना काही उमवटता आला नाही. पेशवाईतील सरदारांनी पुणे,नासिक,सातारा,कोल्हापूर इ. शहरांत चिरेबंदी वाडे मोठ्या प्रमाणावर बांधले.. मराठी वा पेशवाई ⇨ वाडा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा वास्तुविषय आहे.  कारण कार्यानुरूप आकारनिर्मिती,भक्कम बांधकाम,सूक्ष्म कलाकुसर,वायुवीजन,छाया-प्रकाशाचे योग्य कार्यानुरूप नियोजन इ. वैशिष्टये या वास्तुप्रकाराची निदर्शक म्हणता येतील. मुस्लिम वास्तुशैली महाराष्ट्रात फारशी रूजली नाही. औरंगजेबाने औरंगाबाद येथे बांधलेली ‘बिवीका मकबरा’ (१६८०) ही ताजमहालची प्रतिकृती,शहरातील काही मशिदी व किल्ले अशी त्यांची तुरळक व दुय्यम प्रतीची उदाहरणे आढळतात. तथापि मुस्लिम संस्कृतीचा परिणाम मात्र एकूण महाराष्ट्रीय जीवनावरच झाला असल्यामुळे तो वास्तुशिल्पाच्या क्षेत्रातही दिसून येतो. उदा., वाड्यातल्या भागांची नावे (दिवाणखाना, मुदपाकखाना, गुसलखाना, जवाहरखाना इ.) तसेच काही तत्कालीन मंदिरांवर मशिदीच्या वास्तुशिल्पाची छाप जाणवते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत  ब्रिटिश  अंमलाखाली  तत्कालीन  पाश्चिमात्य प्रभावातून प्रबो धनकालीन  व  गॉथिक  शैलीची वास्तुनिर्मिती  महाराष्ट्रात  झाली. मुंबईतील  काही  प्रमुख  वास्तू  या  दृष्टीने  खूपच विलोभनीय  आहेत.  उदा.,  मुंबई  विद्यापीठ, हायकोर्ट, सेलर्स  होम,एल्फिन्स्टन  कॉलेज, व्हिक्टोरिया  टर्मिनस, जनरल  पोस्ट ऑफिस,टाउन हॉल,मुंबई महानगरपालिका इत्यादी. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी बांधलेली शासकीय कार्यालये व निवास्थाने, काही सधन व प्रतिष्ठित पारशी घराण्यांनी बांधलेले प्रशस्त बंगले ही वसाहतकालीन वास्तुशैलीची उदाहरणे  होत.  विसाव्या  शतकात  आधुनिक   वास्तुकलेचे   वारे इंग्रजांमुळे  प्रथम  आले  ते  महाराष्ट्रातच  मग  पुढे  ते   देशभर  पसरले. १९३० च्या सुमारास मुंबईतील दादर,माटुंगा इ. उपनगरांत प्रथम आधुनिक शैलीची निवासस्थाने बांधण्यात आली. मेडवार बंधूंनी वास्तुरचना  केलेले  ‘इरॉस’  चित्रपटगृह  मुंबईमध्ये  १९३४  मध्ये बांधले  गेले.  तदनंतर  आधुनिक  शैली देशभर प्रचलित झाली. सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांतून आधुनिक रचनातंत्रे,पूर्वरचित वास्तुघटक इत्यादींचा वापर करून आधुनिक वास्तुनिर्मिती सातत्याने होत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वास्तुसाहित्य वापरून माफक किंमतीत कलात्मक गृहनिर्मिती करणारे कल्पक वास्तुकारही अनेक आहेत. वास्तुविशारदांच्या अखिल भारतीय संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ (१९१७) हे मुंबई येथे आहे. या संस्थेचे सु. साडेतीन हजार सभासद सर्व जगभर पसरले आहेत. वास्तुकलेचा व्यवसाय व शिक्षण यांत सुधारणा,वास्तुकलेचा प्रसार, प्रतिनिधित्व इ. कार्ये ही संस्था करते. ‘महाराष्ट्र बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’ ही राज्य शासकीय संस्था वास्तुकलेच्यापदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा घेते. महाराष्ट्रात सध्या वास्तुकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्था एकूण पाच आहेत,त्या पुढीलप्रमाणे: मुंबई येथील ‘जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई विद्यापीठाचा पदवी व पदविका अभ्यासक्रम), ‘रहेजा कॉलेज ऑफ आर्ट’ (पदविका) व ‘अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ (पदविका) पुणे येथील ‘अभिनव कला विद्यालय’ (पुणे विद्यापीठाची पदवी) आणि नागपूर येथील नागपूर विद्यापीठ (पदवी). महाराष्ट्रातील प्रमुख वास्तुविशारदांत मुंबई येथील नार्वेकर,परेलकर,वाजपेयी, चार्ल्स कोरिया,आय्. एम्. काद्री, रूस्तम  पटेल, प्रेमनाथ, गोषाय, फिरोझ  कुडीयनवाला,मदन पत्की,राझदान,म्हात्रे,उत्तम जैन इत्यादींचा अंतर्भाव होतो. प्रख्यात वास्तुशिल्पज्ञ चार्ल्स कोरिया यांना लंडन येथील ‘आर्. आय्. बी. ए.’ (रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स) या संस्थेतर्फे सन्माननीय पदक बहाल करण्यात आले. वास्तुकलाक्षेत्रातील हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होत. मुळचे महाराष्ट्रीय असलेले वास्तुशिल्पज्ञ अच्युत कानविंदे हे दिल्ली येथे वास्तुव्यवसाय करतात. माधव आचवल हे महाराष्ट्रीय वास्तुशास्त्रज्ञ बडोदा येथे सयाजीराव विद्यापीठात वास्तुशास्त्र शाखेचे प्रमुख होते. त्यांनी  वास्तुकलाक्षेत्रात  लेखन  करून  काही  मौलिक विचार मांडले.


महाराष्ट्रातील आधुनिक वास्तुकलेच्या इतिहासात मुंबई शहराचे स्थान अग्रगण्य आहे. जागतिक कीर्तीचे अनेक वास्तुशिल्पज्ञ या महानगरात आपल्या वास्तुरचना उभारत आहेत. तथापि विसाव्या शतकात वास्तुक्षेत्रात अत्याधुनिक साधनतंत्रांच्या वाढत्या सुविधांबरोबरच नव्याने काही समस्याही निर्माण होत आहेत. त्यांपैकी गलिच्छ वस्त्यांचे व झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करून नवनवीन वसाहती उभ्या करून राहत्या घरांची प्रचंड संख्येने वाढती आवश्यकता लवकरात लवकर पु री करणे,ही एक समस्या आहे.

महाराष्ट्रातील निवासस्थानांची गरज भागवण्यासाठी,१९४९ साली तेव्हाच्या मुंबई सरकारने गृहनिर्माण मंडळाची स्थापना केली. १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यास ‘महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ’ हे नाव दिले गेले. या मंडळाच्या वतीने औद्योगिक कामगार तद्वतच अत्यल्प,अल्प,तसेच मध्यम उत्पन्नगटांतील लोकांसाठी वेगवेगळ्या गृहनिर्माण योजना राबविल्या जातात. गलिच्छ वस्ती निर्मूलनाच्या उद्देशाने झोपडपट्ट्यांतून राहणाऱ्या लोकांसाठी खोल्या,बेघरांसाठी गाळे इ. योजनाही मंडळातर्फे अंमलात आणल्या जातात. [⟶ इमारती व घरे गृह गृहनिवसन, कामगारांचे]. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणाचा वेग,वाढती लोकसंख्या,जमिनीच्या वाढत्या किंमती  व  अपुरी  उपलब्धता,   घरांचा  तुटवडा  इ. समस्यांना तोंड देण्यासाठी मोठमोठ्या शहरांतून ⇨गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणात उभारल्या जात आहेत. मुंबईमधील ‘उषाकिरण’ (२३ मजली), ‘एअर इंडिया बिल्डिंग’ (२६ मजली), ‘ओबेरॉय शेरेटन हॉटेल’ (३२ मजली) इ. वास्तूंचा या संदर्भात उल्लेख करता येईल. नागरी कमाल जमीनधारणा अधिनियम,भाडेनियंत्रण अधिनियम यांसारख्या कायदेशीर तरतुदी करून तसेच मुंबईसारख्या शहरात समुद्र मागे हटवून भूमिसंपादन करण्याच्या योजना अंमलात आणून वरील समस्या सोडविण्याचे प्रयत्न शासनामार्फत चालू आहेत.

मुंबई वगळता,महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये वास्तुकलेचा दर्जा फारच सामान्य आढळतो. ह्याची कारणे म्हणजे जनसामान्यांत या कलेविषयी असलेली अपुरी जाण आणि काही प्रमाणात त्याविषयीची उदासीनता व आर्थिक कुवत ही होत. या सर्व कुंठिततेमागे आर्थिक,सामाजिक,व्यावहारिक अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेतच. महाराष्ट्रातील पाच वास्तुविद्यालयांतून दरवर्षी सामान्यतः तीनशे वास्तुपदवीधर बाहेर पडतात. शैक्षणिक जगातून व्यावहारिक जगात आल्यावर शिक्षण व व्यवसाय यांमध्ये त्यांना मेळ बसवावा लागतो. या क्षेत्रात तंत्रविषयक प्रगती फार झपाट्याने होत आहे. तसेच साधनसामग्रीच्या बाबतीतही फार मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. याविषयीची समग्र माहिती शैक्षणिक अभ्यासक्रमात तितक्या त्वरेने अंतर्भूत होत नाही.

दीक्षित,विजय

संगीत: कोणत्याही प्रदेशाच्या राजकीय सीमा आणि कलासीमा ह्यांचा मेळ बसणे नेहमीच कठीण असते. किंबहुना,कलासीमांचा विचार करताना राजकीय सीमा काही वेळा दुर्लक्षित कराव्या लागतात. त्यामुळे आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणून संबोधितो आणि प्रायः राजकीय अर्थ मनात ठेवून त्याचा विचार करतो,त्यामध्ये कलांची बाहेरून पुष्कळ आवक-जावक झालेली आहे. ह्या सर्वांचा तपशीलवार हिशेब मांडणे व रेषा आखून देणे,हे फार कठीण काम आहे. महाराष्ट्राच्या कलेच्या पुसट खुणा सातवाहन काळापासून दिसतात. तथापि त्याला सुव्यक्त स्वरूप यादवांच्या राजवटीपासून आले,असे आपण संगीताच्या संदर्भात मानावयाला हरकत नाही. ह्याच्याच आगे-मागे महानुभाव काळ,ज्ञानदेवांचा काळ हे येतात आणि अलाउद्दीन खलजीच्या स्वारीने ह्या उभारीच्या राजवटीचा अंत होतो.

परंतु ह्याच्या पूर्वीच्या एका ग्रंथाचा पूर्वपीठिका म्हणून उल्लेख करावयास पाहिजे. तो चालुक्य वंशातील तृतीय सोमेश्व र याच्या मानसोल्लास  अथवा  अभिलषितार्थंचिंतामणि (सु. ११२९) ह्या ग्रंथाचा. प्रस्तुत ग्रंथात रत्नपरीक्षा, पशुवैद्यक इ. अनेक विषयांबरोबर संगीताचाही परामर्श घेतलेला आहे आणि संगीतवाद्यांची नृत्य-गायनाच्या साथीसाठी,युद्ध-उत्सवादी प्रसंगांकरिता आणि स्वतंत्र वादनासाठी अशी वर्गवारी केलेली आहे. अशी वर्गवारी करणे हे ज्या अर्थी ग्रंथकाराला महत्त्वाचे वाटले,त्या अर्थी संगीताचा प्रसार त्या काळी येथल्या प्रदेशात बऱ्यापैकी झाला असावा,असे अनुमान काढता येईल. त्यानंतर यादवांच्याच राजवटीत शार्ङ्गदेवाचा संगीतरत्नाकर (सु. १२१० – १२४७) हा सुविख्यात ग्रंथ निर्माण झाला. उत्तरेकडच्या आणि दा क्षिणात्य अशा दोन्ही संगीतपरंपरांमध्ये ह्या ग्रंथाचे स्थान अद्वितीय आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने त्याचे वैशिष्टय हे की,तो ग्रंथ महाराष्ट्राच्या ऐन अंतरंगात-देवगिरीस-यादववंशीय सिंघण राजाच्या कारकीर्दीत (१२१०-१२४७) निर्माण झाला. सातारा जिल्ह्यातील सिंधणापूरचे प्रसिद्ध देवस्थान (सध्याचे शिखर शिंगणापूर) ह्याच राजाने बांधले. वस्तुतःशार्ङ्गदेव ह्याचे घराणे मूळचे काश्मीरचे.  पण  तीन  पिढ्या  त्याचा  निवास  महाराष्ट्रात  घडला. शार्ङ्गदेव आणि  त्याचा  पिता  सोढल हे दोघेही यादवांच्या राजवटीत ‘श्रीकरणाधिप’ म्हणजे महालेखाकार झाले. त्यावरून त्यांचा मान व प्रतिष्ठा ही सहज कळून येतात. संगीतरत्नाकर हा ग्रंथ इतका मोठा व व्यापक तपशिलाचा झालेला आहे की,भरताच्या नाट्यशास्त्रानंतर त्यालाच एकमुखी मान्यता लाभली आहे. ह्याचे कारण प्रस्तुत ग्रंथामध्ये शार्ङ्गदेवाने संगीताच्या सर्व प्रकारांचे आणि विशेषांचे सांगोपांग विवेचन केलेले आहे हे. गानप्रकारांबरोबरच स्वर,रागविवेक,वाद्यांचे प्रकार,ताल इ. कितीतरी विषयांचे अत्यंत सखोल विवेचन त्याने केले आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या प्राकृत-मराठी संज्ञा त्यात आढळतात. ‘खण्डत्रयं प्रासयुतं गीयते देशभाषया│ ओवीपदं तदन्ते चेदोवी तज्ज्ञैस्तदोदिता’ (ज्यात यमकयुक्त तीन खंड देशभाषेत गाइले जातात व ज्याच्या शेवटी ‘ओवी’ शब्द असतो,त्याला तज्ञांनी ओवीप्रबंध म्हटले आहे.) अशी त्याने ओवीची व्याख्या (संगीतरत्नाकर ४.३०४, ३०५) केलेली आहे. पण ओवीचे वर्णन त्याहीपूर्वी मानसोल्लासात ‘महाराष्ट्रेषु योषिभ्दिरोवी गेया तु कण्डने’ (महाराष्ट्रात स्त्रिया कांडताना ओवी गातात) असे आलेले आहे. शिवाय,महाराष्ट्रभाषेतील दोन गीतेही त्यात दिली आहेत. संगीतरत्नाकरात ओवीव्यतिरिक्त इतरही म हाराष्ट्री गानप्रकार आणि गानसंज्ञा आलेल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथात ‘प्रबन्ध’ ह्या गानप्रकाराला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. ते लक्षात घेता त्या वेळच्या संगीतामध्ये ‘प्रबंध’ हा लोकप्रिय आणि रूढ असा गानप्रकार असावा,असे दिसते.

 

शार्ङ्गदेवाचा जवळजवळ समकालीन असा,जैन संप्रदायातील पार्श्व देव याचा संगीतसमयसार (सु. १३००) नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. त्यातही अशाच कित्येक मराठी संज्ञा आणि गेयप्रकार आलेले आहेत. ह्या संज्ञा दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळत नाहीत. उदा., प्रबंधाच्या सहा अंगांपैकी ‘बिरूद’ नावाचे एक अंग आहे. त्या ‘बिरूद’ नावासंबंधी तो शब्द प्राकृत की म्लेच्छ,असा इतिहासकाळी एक वाद उत्पन्न होऊन तो थेट विद्यारण्यस्वामींकडे (१३०२-१३८७) निर्णयासाठी गेला. त्या वेळी विद्यारण्य स्वामींनी विचारपूर्वक ‘भवेत् महाराष्ट्रजनप्रसिद्धः’ (महाराष्ट्रलोकांमध्ये रूढ असणार.) असा एक महत्त्वाचा निवाडा दिला. ह्याहीवरून संगीताच्या अंगोपांगांमध्ये महाराष्ट्राला कसे महत्त्वाचे स्थान होते, ते लक्ष्यात येते.

महाराष्ट्रातील लोकप्रिय असा संगीताचा जुना प्रकार म्हणजे भक्तिसंप्रदायामधून उत्पन्न झालेला कीर्तन अथवा हरिकीर्तन [⟶ कीर्तन-२]. ‘कीर्तन’ ह्या शब्दाचा अर्थच मुळी भगवंताची स्तुती करणे असा आहे. अर्थात वैष्णव संप्रदायातील भक्तीला हा प्रकार मानवला,तर आश्चर्य नाही. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव वाळवंटी कीर्तन करीत असल्याचे उल्लेख आढळतात. भागवत संप्रदायात कीर्तन आणि त्याचे फड हे जुन्या काळापासून नां दत आले आहेत आणि त्यांच्या शाखोपशाखाही आहेत. नामदेवांनंतर संत तुकारामही कीर्तन करीत,असे दिसते आणि हे कीर्तन उघडच साग्रसंगीत असले पाहिजे. टाळ,मृदंग,वीणा ही वाद्ये आणि श्रोत्यांचा समुदाय,त्यात येणारा भगवद्-भक्तीचा रंग,वेदान्त,तत्त्वज्ञान,निरूपण इ. सर्व गोष्टी त्यात स्वाभाविकच आहेत. केवळ मनोरंजनासाठी त्याचा उपयोग होत असेल, हे मात्र संभवत नाही. त्याचे उद्दिष्ट होते भक्ती आणि परिणाम होता प्रेमाचे वातावरण.

महाराष्ट्रातील कीर्तन हा संमिश्र गानप्रकार पूर्वी येथे तर लोकप्रिय होताच परंतु १६७३ च्या सुमारास भोसल्यांचे वंशज  जेव्हा  तंजावर (तंजावूर) येथे गेले,तेव्हा त्यांच्याबरोबर कीर्तनही तमिळनाडूमध्ये गेले आणि तेथे ते कालांतराने चांगलेच वाढले. ‘हरिकथाकालक्षेपम्’ ह्या संज्ञेने आजही  ते  तेथे  रूढ  आहे आणि आजही अभंग,दिंडी,ओवी, श्लोक इ. गेय छंद ⇨ कथाकालक्षेपममध्ये तत्रस्थ भागवत कीर्तनकार गातात.

महानुभाव संतांपैकी ⇨ दामोदर पंडित (मृ. सु. १३०६) हे संगीतात प्रवीण असल्याचे प्रसिद्ध आहे. त्यांची हिंदी भाषेमधील रागतालांत बांधलेली,हरिभाऊ नेने ह्यांनी प्रकाशित केलेली पदे उपलब्ध आहेत.

अलाउद्दीन खल् जीने यादवांचे राज्य बुडवल्यानंतर आणि त्यांचा दरबार-गवई गोपालनायक आणि अन्य विद्वान व कलावंत यांना आपल्याबरोबर दिल्लीला नेल्यावर महाराष्ट्रियांची वाताहत सुरू झाली. पारतंत्र्य आले. अंदाधुंदी माजली. स्वाभाविकच कलेचा आश्रय लोपला. लवकरच बहमनी अंमल (१३४७) सुरू झाला. १४६८ मध्ये दुर्गादेवीचा भयंकर दुष्काळ पडला आणि तो सात वर्षे टिकून राहिला. ह्या सर्व घडामोडींचे विपरीत परिणाम संगीतादी कलांच्या विकासावर होणे स्वाभाविकच होते.

शिंग एक लोकवाद्य.

महाराष्ट्रातील  संगीताच्या  वाटचालीतील  पुढचा महत्त्वाचा टप्पा  म्हणजे

दासोपंतांचा (१५५१-१६१५)  होय.  मराठवाड्यातील आंबेजोगाई येथे त्यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. दासोपंतांची ग्रंथरचना तर अवाढव्य आहेच,परंतु त्यांनी लाखावर पदे केली होती,असे म्हणतात. त्यातली सु. सोळाशे पदे उपलब्ध आहेत. ह्या पदांचे वैशिष्टय असे की,ती. सु. चाळीस शास्त्रोक्त रागांमध्ये बांधेलली आहेत. हे राग जसे उत्तर हिंदुस्थानी गायनाचे आहेत (उदा., श्री,काफी, भैरव,हुसैनी,धनाश्री,मारू-धनाश्री इ.),तसे दाक्षिणात्यही (उदा., मालवगौड) आहेत. काही रागांतील पदे हिंदीतही बांधलेली आहेत. ह्यावरून राग-नियम नीटपणे सांभाळून हिंदी-मराठी पदबांधणीचे तंत्र दासोपंतांना चांगलेच अवगत असले पाहिजे. दासोपंतांच्या काळी महाराष्ट्रातील संगीतपरंपरेत उत्तर-दक्षिण हा भेद कदाचित अस्तित्वात नसेल,अथवा तो असल्यास त्यांना दक्षिण परंपरेचीही फार चांगली माहिती असावी. अखंड परंपरेच्या अभावी दासोपंत स्वतः गात असत की नाही,ते निश्चयाने सांगवत नाही तथापि गाण्याचे अंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात फार चांगले परिपुष्ट झाले होते,ह्यात शंका नाही. संगीताची फार चांगली जाणकारी असलेले दासोपंत हे संतमंडळीतील एकमेव रचनाकार होत.

  

संत  एकनाथांनीही  (१५३३-१५९९)  अशीच  विविध आण विपुल  रचना  केलेली  आहे.  भक्तिपर  पदे, मोहक गौळणी,खुसखुशीत भारूडे  ह्यांची  रचना, त्यांतील  प्रा सादिकता, भाषेचे बहुविध  प्रयोग  हे  सर्व  लक्ष्यात  घेता  संगीतोपयोगी  अशी किती विपुल रचना त्यांनी केली आहे,ते सहज कळते. एवढेच नव्हे,तर त्यांच्या ह्या रचनांची मोहिनी आजही कायम आहे. हीच स्थिती संत रामदासांच्याही (१६०८-१६८१) अनेक रचनांची. त्यांच्या रचना तर तंजावरकडेही गेल्या. ह्या रचनांचे संगीत हे लोकरूढ असे साधे-सरळ संगीत होते, हे उघड आहे आणि ठसकेबाज गेयता हे या रचनांचे वैशिष्टय होते. पदरचनेचा हा प्रचंड ओघ येथेच थांबत नाही, तर पुढील अनेक संतमंडळींमध्ये तो अविरत आढळून येतो. लोकसंगीत आणि संतकवींच्या रचना ह्यांचा फार चांगला मेळ ह्या काही शतकांमध्ये बसलेला दिसून येतो.

विजापूरचा बादशहा दुसरा इब्राहिम आदिलशहा (१५८०-१६२७) हा संगीताचा मोठा जाणकार, गायक,कवी,रचनाकार आणि अनेक – भाषाभिज्ञ होता.

शिवकाळ हा राजकीयदृष्ट्या संघर्षाचा व धामधुमीचा असल्याने संगीतासारख्या कलांना आणि तद्विषयक चळवळींना या काळात पायबंद बसल्याने दिसून येते. मात्र उत्तर पेशवाईच्या काळात संगीताला आणि तदनुषंगिक चळवळींना बहर आला. या काळात ⇨ पोवाडे,लावण्या ह्यांचा तर पूर लोटला होता. पण शास्त्रोक्त संगीताचे कलावंतही पेशव्यांच्या दरबारी होते. १८०० च्या सुमारास मुरलीकर्ते देवनाथ महाराज (१७५४-१८२१),सोलापूरचा राम जोशी (सु. १७६२ – सु. १८१३),होनाजी (१७५४ –१८४४),अनंत फंदी (१७४४-१८१९),सगनभाऊ (१७७८-१८५०),प्रभाकर (१७६९ ? – १८४३),परशराम (१७५४- १८४४) इ. गेयकवितेचे रचनाकार चांगले उमेदीत होते लोकप्रिय होते. संतकवी मठाधिपती शुभराय (१७३५-१८२०) ह्याच सुमाराचे. दुसरा बाजीराव पेशवा हा गाण्या-बजावण्याचा,नृत्याचा फार शौकीन होता. त्याच्या पदरी मेंहदी हुसेन,तानसेनाचा वंशज विलास बरसखाँ,दावलखाँ अशी कलाकार मंडळी होती. पुण्याचे कोणी नगरकर हे  ‘सारंगिये अप्रतिम’ अशी नोंद आहे. १७९४ साली महादजी शिंदे मृत्यू पावले, परंतु ते संगीताचे हौशी असल्याने,कदाचित पुढे अनेक पिढ्या ग्वाल्हेरकरांनी ही संगीताची परंपरा चांगली जतन करून ठेवली असावी. त्याचा परिणाम पुढे ग्वाल्हेर हे संगीताचे एक अव्वल दर्ज्याचे केंद्र होण्यात झाला. तसेच पुढे महाराष्ट्रात कोल्हापूर, मुंबई,पुणे अशी अनेक केंद्रे संगीताच्या बाबतीत तयार झाल्याचे दिसून येते.


महाराष्ट्रातील काही लोकवाद्ये : (१) वीणा, पखवाज, चिपळ्या आणि टाळ (२) तुणतुणे, संबळ, खंजिऱ्या, घांट, टाळ व लोखंडी लंगर (३) ढोलकी, ढुमके, ताशा.

महाराष्ट्रामध्ये सातारकर छत्रपतींच्याही घराण्यात गाणे-बजावणे अखेर-अखेरच्या पिढ्यांमध्ये जिवंत होते. त्यांत पखवाजवादन चालू होते. अशी नोंद आहे. आता,पखवाजवादन हे गायनाच्या साथीने होणार,हे उघड आहे. ह्यावरून संगीताचा नुसता टिळाच येथे लागला,असे समजता येणार नाही. बरोबरच कीर्तनातही पखवाज होता आणि कीर्तनाची परंपरा तमिळनाडूमध्ये सहज जाण्याइतपत येथे भरघोस,सकस होती. कीर्तनाच्या ज्या तीन परंपरा-नारदी,वारकरी आणि दासगणूंची – त्यांतली शेवटची अलीकडली. पण नारदी आणि वारकरी ह्या परंपरा जुन्या. ह्या कीर्तन-परंपरांनी जसे संगीत नाटकांना काही खाद्य पुरवले,त्याप्रमाणे त्यांनी संगीत नाटकांपासून घेतलेही खूप. कारण कीर्तनकार हा अभिनयकारही होता,व्युत्पन्न होता,उत्कृष्ट निवेदक होता, चिंतक होता. संगीत नाटकाची काही पर्यायी गरज भागविण्याइतके-किंबहुना,कधीकधी त्यावर मात करण्याइतके-संगीताचे व्यावहारिक, प्रायोगिक ज्ञान त्याच्यापाशी होते.

‘किर्लोस्कर नाटक मंडळी’च्या काळात नारायणबुवा गोगटे-फलटणकर नावाचे कीर्तनकार होऊन गेले. ते आपल्या कीर्तनांनी किर्लोस्करांचीही नाटके ओस पाडीत असत, असा खुद्द किर्लोस्कर मंडळीचे एक चालक शंकरराव मुजुमदार यांचाच पुरावा आहे. त्याशिवाय ताहराबादकर,गंगाधरबुवा काशीकार,राशिनकर,पाटणकर,कऱ्हाडकर इ. कितीतरी कीर्तनकारांनी कीर्तनपरंपरेची ध्वजा फडकत ठेवली. संस्कारित गायन,तत्त्वज्ञान, ठसकेबाज   निवेदनकौशल्य, हजरजबाबीपणा, पाठांतराची  अमाप व्याप्ती,व्यापक माहितगारी इत्यादींमुळे कीर्तनकार ही संस्था एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत महाराष्ट्रात आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनली. राष्ट्रीय चळवळीच्या काळात ह्या संस्थेने राष्ट्रीय वळण घेतले आणि त्यातून राष्ट्रीय कीर्तनकार उदयास आले. सारांश,महाराष्ट्रात सांस्कृतिक प्रवाह वाहता आणि जिवंत ठेवण्याचे एक महत्त्वाचे कार्य मनोरंजनासमवेत कीर्तन संस्थेने केलेले आहे.

हा काळ आणि ह्याच्याही पूर्वीचा काळ लावण्या,पोवाडे,तमाशा ह्यांच्या भरभराटीचा होता. महाराष्ट्रात लावण्या चवीने ऐकणारा आणि तमाशा असोशीने पाहणारा असा एक वर्ग होता आणि आजही आहे. लावणीचे संगीत हे शब्दनिष्ठ संगीत असल्यामुळे ते संगीत स्वाभाविकच अतिशय आकर्षक ठरले. मूळचा तो मर्दासाठी किंवा फौजी जवानासाठी गावयाचा थोडा स्वैर,सैल प्रकार त्यामुळे घरंदाज स्त्रियांना त्यात संकोच वाटणे स्वाभाविक. पण लावणीची ढब,भिंगरी तान पुढे संगीत नाटकांतही गेली आणि पुष्कळ काळ ती टिकून राहिली. शिवाय स्त्रीगीते, बारसे,डोहाळे ह्यांसारखे कौटुंबिक सोहळे,भोंडले इ. प्रसंगी गाइल्या जाणाऱ्या गेयरचनाही रूढ होत्याच. ह्या सर्वांमधून साकार होणारे महाराष्ट्रातील संगीताचे चित्र चांगले समृद्ध असून ते मौखिक परंपरेनेच प्रायः चालत आलेले होते. पण ह्याशिवाय प्रत्येक समाजामध्ये व्यवसायनिष्ठ अशी गाणी असतातच,तशी ती येथेही होती. उदा., शेतकऱ्यांची गाणी,मोटेवरची गाणी,देवीची गाणी,गोंधळाची गाणी,मजूर-कामकऱ्यांची श्रमगीते,नावाड्यांची कोळीगीते इत्यादी. मात्र ती असंस्कारित किंवा अनघड असल्याने तालासुराची घासाघीस अशा ठिकाणी नाही असण्याचे कारण नाही.

गेयता ही दोन प्रकारची असते : व्यक्तिगत आणि सामूहिक. भक्तीला कदाचित व्यक्तीगत गेयता तन्मयतेच्या दृष्टीने अधिक मानवत असेल पण सामूहिक स्वरूपाच्या गेयतेचेही एक महत्त्व आहे. ते महत्त्व एकवटपणा, एकात्म जाणीव उत्पन्न करण्याच्या दृष्टीने अधिक पटणारे आहे. मग त्या गेयतेत फारशी छानबीन नसली,तरी ती चालण्यासारखी असते. सामूहिक गेयतेमध्ये तन्मयीभवनापेक्षा एकीभवनाचा भाग हा प्रभावी असतो.


संगीत  ही  कालाने  मर्यादित  केलेली  अशी  एक  अत्यंत  तरल  कला  आहे.  जोपर्यंत  ती  केवळ  आपल्या  श्रवणाचा विषय असते,तोपर्यंत तिचे आयुष्य क्षणभंगुर आणि स्मृतीमध्ये नांदणारे  असे  असते.  ह्यास्तव  संगीतकला गोठवून धरण्यासाठी काही-ना-काही विद्या वा युक्ती उत्पन्न केली पाहिजे, हा ध्यास मनुष्याला प्रथमपासून आहे. संगीताचे लिपिकरण वा स्वरलेखन (नोटेशन) ही त्यासाठीच  केलेली  युक्ती.  महाराष्ट्रात  ती  सर्वप्रथम  १८६४  साली गोवर्धन छत्रे आणि रावसाहेब मंडलिक ह्यांनी गीतलिपि हे पुस्तक प्रकाशित करून अमलात आणली. पण त्याच्या चौदा वर्षे अगोदर,१८५० साली भाऊसाहेब अष्टपुत्रे ह्यांनी गायनप्रकाश प्रकाशित करून मराठीमधील संगीताचे पहिले पुस्तक उजेडात आणले. १८६५ साली अण्णासाहेब घारपुरे  ह्यांनी  सतार–बीन-वादनाचे  तालादर्श  हे  पुस्तक  प्रसिद्ध  केले.  लगोलग  पाच  वर्षांनी  १८७०  साली कैखुस्त्रो नौरोसजी काब्राजी ह्यांनी मुंबईत ‘ज्ञानप्रसारक मंडळी’ व ‘गायनोत्तेजक मंडळी’ ह्या जोडसंस्था स्थापन केल्या आणि व्याख्याने,चर्चा,लेख,जलसे इ. सोयी ह्या संस्थांच्या द्वारे उपलब्ध करून दिल्या. ह्या संस्थांची शताब्दी नुकतीच साजरी झाली,हे लक्षणीय आहे. पुण्यामध्येही १८७५ साली बळवंतराव सहस्त्रबुद्धे,बाळकोबा नाटेकर इत्यादिकांनी ‘पुणे गायनसमाज’ (आजचा ‘भारत गायनसमाज’) स्थापन केला. १८७२ साली सूर्याजी सदाशिव महात्मे व विश्वनाथ रामचंद्र काळे ह्यांचे सतार शिकण्याचे पुस्तक स्वरलिपीसह प्रकाशित झाले. ह्या वेळेपर्यंत ⇨ बाळकृष्णबुवा  इचलकंरजीकर (१८४९ – १९२७)    उत्तरेकडून  गायनविद्या शिकून येथे आलेले होते. त्यांनी भारतातील पहिले संगीतविषयक नियतकालिक संगीतदर्पण (१८८२) ह्या नावाने मुंबईस सुरू केले. ते पुढे वर्ष-सव्वा वर्ष व्यवस्थित चालले. १८८९ च्या सुमारास सोमनाथ पंडिताच्या रागविबोध ह्या संस्कृत ग्रंथाचे घारपुरे ह्यांनी मराठीत खंडशः भाषांतर सुरू केले १८९४ मध्ये भवानराव पिंगळे ह्यांनी संगीताविषयी आपला एक ग्रंथ इंग्रजीत प्रसिद्ध केला आणि १८९६ मध्ये पुण्याच्या ‘आनंदाश्रम’ ह्या संस्थेने शार्ङ्गदेवाचासंगीतरत्नाकार हा सुविख्यात ग्रंथ संपादून कल्लिनाथाच्या ‘कलानिधि’ ह्या टीकेसह प्रथमच प्रसिद्ध केला. तसेच १८९६ च्याच आगे-मागे नर्मदा उतरून उत्तरेकडून दोन वेगवेगळ्या घराण्यांचे महान गायक महाराष्ट्रात स्थायिक होण्यासाठी आले. ते म्हणजे ⇨अब्दुल करीमखाँ (१८७२–१९३७) आणि ⇨अल्लादियाखाँ (१८५५–१९४६) होत. ह्या दोन्ही घटना पुढे महाराष्ट्रियांच्या  सांगीतिक जीवनात आपापल्या परींनी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात अनेक संगीत नाटक  मंडळ्या  स्थापन  झाल्या. त्यांनीही संगीताच्या अभिवृद्धीच्या कामी  व  प्रसाराच्या  कार्यात  फार  मोठा  हातभार लावला. विष्णुदास भावे (१८१८–१९०१) ह्यांच्यापासून ज्याला सुरूवात झाली,त्या अनघड संगीत नाटकाला अण्णासाहेब किर्लोस्करांनी (१८४३–१८८५) आपल्या अत्यंत देखण्या संगीत नाटकांनी आणि अतिमधुर संगीताने वेगळे,सुविहित वळण लावले. त्यांच्या संगीत नाटकांनी सबंध महाराष्ट्राला इतके वेड लावले की,ते आजवर टिकून राहिले आहे. किंबहुना,तेच आद्य संगीत नाटककार ठरले आहेत. ह्या संगीत नाटकांतले संगीत प्रायः बाळबोध वळणाचे,साधे-सरळ वाटत होते. परंतु त्यातला संस्कारितपणा आणि आविष्कार असा विलक्षण स्वरूपाचा होता की,त्याचे अनुकरण करणे हे सोपे मात्र नव्हते. लोकांमध्ये रूढ असलेली गीते,स्त्रीगीते,कीर्तनात ज्ञात असलेल्या चाली आणि अन्य काही संगीत ह्यांनी हा सर्व भाग घडलेला असे. मौज अशी की,हेच संगीत पुढे कीर्तनातही ऐकू येऊ लागले. लोकरूढ संगीत हे नाटकात आणि नाटकातले संगीत पुन्हा लोकांत रूढ,असा हा परस्पर-जवाब होता. पण सर्व समाजात संगीताची जी एक अनिवार आवड,ओढ निर्माण झाली,ती  ह्यायोगे नाटकाच्या संदर्भात शंभरावर वर्षे टिकून राहिली आहे,ह्यात मात्र शंका नाही. किर्लोस्करांच्या पाठोपाठ माधवराव पाटणकरांची संगीत नाटक मंडळी, ‘वाईकर संगीत नाटक मंडळी’, ‘आर्योद्धारक संगीत नाटक मंडळी’ अशा अनेक नाटक मंडळ्या निर्माण झाल्या आणि विशेष म्हणजे त्यांतल्या काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे संगीत रूढ करण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला. काहींनी तर ध्रुपद-धमाराचेही संगीत दाखल केले. लोकसंगीत,बाळबोध संगीत (साकी,दिंडी इ.) ध्रुपदी,ख्याली वळणाचे असे सर्वच प्रकारचे संगीत नाट्यसंगीताच्या रूपाने समाजात सारखे कित्येक वर्षे झिरपत राहिले. नाटकात ख्यालाची मैफल झाली,हा उत्तरकाली आलेला आक्षेप वस्तुतः नीट तपासून घ्यावयाला पाहिजे. एकदा नाटका त संगीत आणल्यानंतर श्रोत्यांना नवनवीन आणि विविध असे संगीताचे प्रकार देत राहणे,हे नाटक मंडळ्यांचे व्यावसायिक कामच होऊन बसते आणि ते नीटपणाने समजून घेतले पाहिजे. [⟶ नाट्यसंगीत].

येथून पुढे आपण संगीतकला आणि संगीतविद्या ह्यांच्या परिष्कृत अशा आधुनिक काळात प्रवेश करतो. त्याचा एक मोठा टप्पा म्हणजे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर. बाळकृष्णबुवांच्या आधी महाराष्ट्रात ‘पक्के’ म्हणजे शास्त्रोक्त गाणे आलेच नव्हते,असे समजण्याचे कारण नाही. बाळकृष्णबुवांचेच गुरू धारचे देवजीबुवा टप्पेवाले हे मूळचे पुण्याचे राहणारे.  त्यांचे  मूळचे  नाव  रामकृष्ण  परांजपे.   वासुदेवबुवा  जोशी हेही कुलाबा जिल्ह्यातील (सध्याचा रायगड) नागावचे. पुढे ते ग्वाल्हेरला स्थायिक झाले. बाळकृष्णबुवांना ह्या दोघांनीही गानविद्या दिली. त्याचाच परिपात बुवांच्या ठिकाणी झाला. पण बाळकृष्णबुवांच्याही पुष्कळ अगोदर साताऱ्याला बापूबुवा बुधकर नावाचे एक ध्रुपदिये होते. ते हैदराबादच्या झैनुल-आबदीनखाँचे शिष्य. हे झैनुल-आबदीनखाँ तानसेनच्या गानपरंपरेचे,ते मिरजेस येत असत. प्रसिद्ध गायक महादेवबुवा गोखले (१८१३-१९०१) हे बाळकृष्णबुवांना वयाने कितीतरी वडील,ते प्रथम ह्याच बापूबुवा बुधकरांकडे ध्रुपद गायन शिकले आणि नंतर हैदराबादेस जाऊन,झैनुल-आबदीनखाँकडे अनेक वर्षे राहून संपूर्ण गायन,ख्याल इ. शिकून आले. महादेवबुवा गोखल्यांच्या गायकीची थोडी मुद्रित साक्ष केशव गुंडो इंगळे यांच्या गोखले घरानेकी गायकी (१९३५) ह्या पुस्तकात आपल्याला मिळते. ह्या पुस्तकात त्यांच्या घराण्याच्या बंदिशी स्वरलेखनासह तर दिलेल्या आहेतच पण त्यात मराठीमध्ये रागरागिण्यांच्या १२२ आर्याही आहेत. काही प्रचलित,काही अप्रचलित. महादेवबुवांचे गुरूबंधू अंतूबुवा आपटे आणि गुरूभगिनी पुण्याची कोणी मिश्रा हे होत.

दक्षिण महाराष्ट्रातले पक्क्या गाण्याचे वातावरण असे बाळकृष्णबुवांच्या अगोदरच संपन्न झालेले होते. कदाचित त्यानेही बुवांना स्फूर्ती मिळाली असणे शक्य आहे. बाळकृष्णबुवांनी महाराष्ट्रात ख्यालगायनाचे आधुनिक युग सुरू केले. त्यांनी अस्सल विद्या जितक्या कष्टाने मिळविली,तितक्याच उदारपणाने ती वाटून दिली. त्यांनी गानविद्येचा व्यापार असा कधी केलाच नाही. त्यांच्या ठायी नुसतीच विद्या नव्हती कलेचा गोडवा होता. गोड,गोल,पूर्ण तीन सत्पकांत अनायासे फिरणारा आवाज,गमकयुक्त तान,शास्त्राची बूज इ. अनेक गुणांमुळे बाळकृष्णबुवा हे गायक म्हणून सर्वत्र अतिशय प्रिय झाले,आदराचे स्थान झाले. आपले गुरूजन उत्तरेकडून येथे आल्यावर बुवांनी त्यांची फार कदर केली. वासुदेवबुवा जोशी महाराष्ट्रात आल्यावर बुवांनी त्यांचा ठिकठिकाणी गायनदौरा आयोजित करून त्यांना बरीच कमाई करून दिली प्रसिद्धी मिळवून दिली. विद्या,कला,दिलदारी ह्या तिहींचा समवाय असलेला असा हा श्रेष्ठ गायक महाराष्ट्राला आधुनिक काळाच्या आरंभबिंदूलाच लाभावा, हे केवढे भाग्य !


बाळकृष्णबुवांची शिष्यशाखा फार मोठी होती आणि त्या बहुतेक सर्व शिष्यांनी बुवांचे नाव उज्ज्वल केले. त्यांचे चिंरजीव अण्णाबुवा ह्यांना बुवांनी आपली सर्व विद्या दिली,पण ते तरूणवयात मृत्यू पावले. तथापि गुंडूबुवा इंगळे,विष्णू दिगंबर,मिराशीबुवा,गणपतराव भाटेबुवा,अनंत मनोहर जोशी,नीळकंठबुवा जंगम,वामनबुवा चाफेकर इ. पुढे प्रसिद्धीस आलेले अनेक गायक बुवांचे शिष्य होत. इतकेच नव्हे,तर बुवा मुंबईस होते,तेव्हा सर रामकृष्ण भांडारकर,विश्र्वनाथ नारायण मंडलीक,महादेव मोरेश्र्वर कुंटे,महादेव चिंतामण आपटे इ. अन्य क्षेत्रांतीलही मंडळी त्यांच्याकडे गायन शिकत होती. ह्या सर्व शिष्यांत ⇨ विष्णू दिगंबर पलुस्कर (१८७२–१९३१) हे १८९६ साली उत्तरेस गेले आणि त्यांनी संगीताचा प्रचार-प्रसार करण्यामध्ये आपली उभी हयात वेचली. विष्णू दिगंबरांनी संस्थांच्या द्वारे संगीताची संघटना कशी करावी,त्याला आधुनिक डूब कशी द्यावी,संगीताचे शिक्षण कसे द्यावे व परीक्षा कशा घ्याव्या हे नुसत्या महाराष्ट्रालाच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानाला शिकविले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर,त्यांचे शिष्य विष्णू दिगंबर पलुस्कर,अण्णासाहेब किर्लोस्कर आणि कृष्णाजी बल्लाळ देवल ह्या चतुःस्तंभांवर ह्या वेळपावेतो येथल्या संगीताची भव्य इमारत उभी आहे.

कृ. ब. देवल (१८७४–१९३१) ह्यांच्या पूर्वी काही संगीतविषयक पुस्तके हिंदुस्थानात निर्माण झाली होती. संगीतसार हा जयपूरचा  महाराजा सवाई प्रतापसिंह (कार. १७७९ — १८०४) याने रचलेला ग्रंथ,तसेच यंत्रक्षेत्रदीपिका (१८७९) ही ती पुस्तके होत. ही पुस्तके स्वरलेखनाची होती. पण युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ म्यूझिक (१८९६) हे एस्. एम्. टागोरांचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर तेव्हाच्या सरकारने भारतीय संगीताची पाहणी करण्यासाठी एलिस यांचे एकसदस्य मंडळ नेमले. त्या मंडळाने असा निष्कर्ष काढला की, ‘भारतीय संगीताला शास्त्र म्हणून म्हणतात ते नाहीच,गवयांना आपले स्वरसप्तकही धड सांगता येत नाही,ते गातात एवढेच…’ ह्या विचित्र निष्कर्षाने कृ. ब. देवल थक्क झाले आणि मग त्यांनी स्वरसप्तकाचे संशोधन हा विषय आपला जीवितहेतूच केला त्याचा ध्यास घेतला. त्यांना पुढे अब्दुल करीमखाँसारख्या प्रख्यात गायकाची साथ मिळाली आणि देवलांनी बावीस श्रुतींचा आपला सिद्धांत मांडला. प्रथमच त्याचे अनेक कर्णप्रत्ययी प्रयोग त्यांनी केले. एवढेच नव्हे,तर ते लोकांना करून दाखविले. तर्काच्या आधाराने हे सर्व पटवून दिले आणि त्याचा प्राचीन भारतीय स्वरशास्त्राशी मेळ घालून दाखविला. देवलांचे हे स्वरसंशोधन खरोखर मूलगामी होते आणि त्याने हिंदुस्थानी संगीताची पारंपरिक मौलिकता सिद्ध केली.

विसाव्या शतकात संगीताच्या क्षेत्रात अनेक संघटना निर्माण झाल्या व परिणामी संगीताचा सर्वदूर प्रसार झाला. संगीतविषयक चर्चा,लेखन,गायन,वादन,प्रचार-प्रसार ह्यांच्या योगे महाराष्ट्रात एक समृद्ध संगीतमय वातावरण तयार होऊन उत्तरोत्तर ते अधिकाधिक जोपासले गेले व त्यातून खास महाराष्ट्राची अशी एक संगीतविषयक अस्मिता निर्माण झाली.

मराठी संगीत नाटकांनी गेली शंभर वर्षे महाराष्ट्रातील संगीताची सर्वांगीण व समृद्ध जोपासना केली. वर्षानुवर्षे कसदार,सुरेल,अभिजात संगीत हे नाटकांद्वारे सामान्य रसिकांपर्यंत सातत्याने व विपुल प्रमाणात पोहोचले व त्यायोगे संगीताची जाणकारी व रसज्ञता महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिसू लागली. ⇨ केशवराव भोसले (१८९०-१९२१), ⇨ बालगंधर्व ऊर्फ नारायणराव राजहंस (१८८८–१९६७), ⇨ मास्तर कृष्णराव (१८९८–१९७४), ⇨ सवाई गंधर्व (१८८६–१९५२), ⇨ दीनानाथ मंगेशकर (१९००–४२),व्यंकटेश बळवंत पेंढारकर (१८९२–१९३७),गणपतराव भाटेबुवा, वसंतराव देशपांडे इ. गायकांनी ही परंपरा खूपच समृद्ध केली आहे व त्यात उत्तरोत्तर भर पडत आहे.

पण हे संगीत फक्त नाटकापुरतेच मर्यादित राहिले नाही. नाटकांना अवकळा आल्यावर ते चित्रपटांतही गेले. त्याची सुरूवात अयोध्येचा राजा (१९३२) ह्या पहिल्या मराठी बोलपटापासून झाली. १९११ साली मानापमानाच्या संगीताच्या संदर्भात ⇨ गोविंदराव टेंबे (१८८१-१९५५) ह्यांनी जसा धुरीणपदाचा मान मिळविला, तसाच तो ह्या वरील बोलपटाच्या संगीताच्या बाबतीतही मिळविला. मराठी चित्रपटात संगीत जे एकदा आले,तेही तेथेच राहिले नाही इतस्ततः पागंले,पसरले. हिंदी,बंगाली,गुजराती,तमिळ इ. यच्चयावत साऱ्या भाषांत पसरले. अशा प्रकारे १८८० सालची नाटकांतून सुरू झालेली संगीताची गंगोत्री आता भारतभर वेगवेगळ्या रूपांनी जाणवत आहे.

परंतु ह्या चित्रपट संगीतात केवढा बदल झाला आहे,हे मागे वळून पाहताना आज कळते. ह्या संगीतात सर्व प्रवाह मिसळलेले आहेत. त्यात पाश्चात्त्य लकेरीही ऐकू येतील,पण साकल्याने पाहता त्यातले भारतीयत्व मात्र ओळखू येते व पटतेही. मग ते लोकगीताच्या धुनीच्या रूपातले असो,किंवा रागाने बांधलेले असो किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातले असो. ताल तर सर्व अत्रस्थच. फरक काय तो वाद्यांच्या सरमिसळीच्या मेळाचा. वाद्ये मात्र पाश्र्चात्त्य-पौरस्त्य अशी दोन्ही आढळतात. ह्या चित्रपटसंगीतात आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती संपादन  केलेली आहे,त्या ⇨ लता मंगेशकरांचा (१९२९- ) उल्लेख केलाच पाहिजे. त्याबरोबर आशा भोसलेही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. तथापि ह्यापूर्वीच्या शांता आपटे,खुर्शीद,सुरैया,नूरजहाँ,शमशाद बेगम अशा कितीतरी उत्तमोत्तम गायिकांचा उल्लेख चित्रपटसंगीताच्या जडणघडणीच्या संदर्भात करावा लागेल. ⇨ कुंदनलाल सैगेल हे त्या काळचे अनभिषिक्त गानसम्राट,त्यांच्या आवाजाने व गानशैलीने एके काळी भारतातील लक्षावधी चित्ररसिकांना मंत्रमुग्ध केले होते. तद्वतच महमंद रफी,मुकेश,मन्ना डे.,किशोरकुमार इ. पार्श्वगायकांनी हिंदी चित्रपटसंगीतात विविधता आणून ते समृद्ध केले आहे.

संगीत नाटकांच्या भरभराटीच्या काळात ⇨भास्करबुवा बखले (१८६९–१९२२), गोविंदराव टेंबे,  ⇨रामकृष्णबुवा वझे (१८७१–१९४५),मा. कृष्णराव,सवाई गंधर्व अशी मातबर गायक-मंडळी त्यांच्याशी संलग्न होती. पुढे चित्रपटसंगीताच्या वैभवकाळात अनेक संगीत दिग्दर्शक या क्षेत्रात पुढे आले. त्यांत गोविंदराव टेंबे, ⇨केशवराव भोळे (१८९६–१९७७),मा. कृष्णराव, ⇨शं. वि. चांदेकर (१८९७–१९७६) इ. मराठी संगीत दिग्दर्शकांच्या कर्तुत्वाचा कालखंड ठळकपणे उठून दिसतो. तसेच नंतरच्या काळात ⇨ सुधीर फडके (१९१९ –  ),वसंत पवार,राम कदम,भास्कर चंदावरकर,हृदयनाथ मंगेशकर,राम-लक्ष्मण इ. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत खेमचंद प्रकाश,ओ. पी. नय्यर,एस्. डी. बर्मन,शंकर-जयकिशन,सी. सामचंद्र,नौशाद,वसंत देसाई,लक्ष्मीकांत-प्यारेलाल,आर्. डी. बर्मन इ. अनेक नामवंत संगीत दिग्दर्शकांची कारकीर्द गाजली. संगीताच्या नवनव्या तर्ज,चाली कल्पकतेने शोधून काढण्यात ह्या संगीत दिग्दर्शकांची आगळी वैशिष्टये दिसून येतात.

संगीतासंबंधीच्या विद्याविषयक कार्यामध्ये ज्यांचा उल्लेख केल्यावाचून पुढे जाताच येणार नाही, असे ⇨विष्णू नारायण भातखंडे (१८६०-१९३६) हे संगीतातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होऊन गेले. मुळात वकील असूनही आपले सर्व जीवित त्यांनी संगीताच्या संशोधनाला वाहिले. त्यांची कार्यपद्धती अतिशय व्यवस्थित आणि सर्वांगपरिपूर्ण होती. अनेक प्राचीन मूलसंहितांचे संपादन-प्रकाशन,संकलन,वर्गीकरण,अवलोकन,वर्णन,प्रवास,प्रचार,संघटन,चर्चा इ. अनेक मार्गांनी त्यांनी जे कार्य केले,ते विश्वकोशात्मकच म्हणावयास हवे. हिंदुस्थानी संगीतपद्धती (४ भाग),श्रीमल्लक्ष्यसंगीतम्,चिजांचे संग्रह,शोधनिबंध इ. अनेकविध लेखन त्यांनी केले. संगीताचा प्रसार पद्धतशीर व पायाभूत रीतीने व्हावा,म्हणून अनेक प्रकारच्या शाळांमधूनही त्यांनी त्याचा प्रवेश घडविला. अखंड,अथक परिश्रम,जाज्वल्य निष्ठा,सखोल व्यासंग या गुणांमुळे त्यांचे कार्य लोकोत्तर ठरले. त्यांची ग्रंथसंपदा व मौलिक संशोधन संगीतशास्त्राच्या अभ्यासकांना फार उपयुक्त व मोलाचे ठरले आणि केवळ महाराष्ट्रापुरतेच ते मर्यादित नव्हते. त्याची व्याप्ती अखिल भारतीय होती. एखाद्या संस्थेलाही करता येणार नाही, असे कार्य भातखंडे नावाच्या एकट्या व्यक्तीने केले आणि महत्त्वाचे ग्रंथ प्रायः मराठीत लिहिले. विष्णू दिगंबर व विष्णू नारायण या दोघांचेही महाराष्ट्र-संगीतावर अपार उपकार झालेले आहेत. संगीताच्या बाबतीत त्यांच्यामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला.


ज्या काळात भातखंडे आपले प्रचंड कार्य एकाग्र निष्ठेने करीत होते, त्याच  काळात  तत्सदृश  काम  बारकाव्याने  आणि इतर अंगांनी करणारे काही व्यासंगी संगीतज्ञही निर्माण झाले. १९३० साली भारतीय संगीत हे द्वैमासिक निघाले,पण ते फार थोडे दिवस चालले. त्याच   सुमारास  गंगाराम  भिमाजी  आचरेकर  ह्यांचे मत्सरीकृता मूर्च्छना  हे  छोट्या  मूर्तीचे  पण  चांगल्या  कीर्तीचे पुस्तक प्रकाशित झाले.  हे  पुस्तक  श्रुतिव्यवस्थेच्या  बाबतीतले देवलांच्या नंतरचे एक  महत्त्वाचे पुस्तक. त्याच सुमारास हार्मोनियम ऊर्फ बाजाची पेटी संगीतात स्थिर झालेली होती. गोविंदराव टेंबे ती उत्तम वाजवीतही,पण तिच्या स्वरांच्या दर्ज्याविषयी आक्षेपही निर्माण झाले होते. आचरेकरांना स्वरज्ञान उत्तम असल्यामुळे,स्वतः बीनकार असल्यामुळे,आणि कारागिरीची हातोटीही अवगत असल्यामुळे त्यांनी भारतीय संगीताला अनुकूल अशा श्रुतियुक्त स्वरांची नवी बाजाची पेटी निर्माण केली (१९३१).अब्दुल करीमखाँचे प्रायोगिक श्रुतिसंशोधनही ह्याच सुमारास झाले (१९३३). भारतीय संगीत हे कृष्णराव गणेश मुळे ह्यांचेही पुस्तक ह्याच काळातले (१९४०). तेही संगीताचे असेच महत्त्वाचे पुस्तक. बा. र. देवधरांनी संगीत कला विहार हे मासिक १९४७ साली काढले आणि ते आजपर्यंत व्यवस्थितपणाने चालू आहे.

गोविंदराव टेंबे ह्यांनी ⇨गोहरजान (सु. १८६७ – सु. १९२७) मृत्यू पावल्यावर ‘गायिका गोहरजान’ नावाचा एक सुंदर लेख रत्नाकर मासिकात लिहिला. संगीताच्या रसास्वादपर अशा आधुनिक लेखाची ही सुरूवात म्हटली पाहिजे. टेंबे ह्यांचा संगीतानुभव,चिंतन,लेखनातले लालित्य, गोडवा,समधातपणा ह्या सर्व गुणांचा आविष्कार त्यांच्या ह्या आणि पुढील लेखनात झालेला  स्पष्ट दिसतो. त्यानंतर अन्यही लेखकांचे रसास्वादपर लेखन मराठीत विपुल प्रमाणात निर्माण झाले आणि त्याला अनेक अंगेही लाभली. टेंबे यांचे माझा संगीत-व्यासंग (१९३९) हे पुस्तक म्हणजे मराठी वाङमयातला संगीतविषयक साहित्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

महाराष्ट्रात वाद्यवादन हे बंगालइतके प्रचलित नव्हते पण गायनाच्या अनुषंगाने आणि आकाशवाणीद्वारा त्याचाही रिघाव आणि प्रचार होण्याला वेळ लागला नाही. एव्हाना संगीतपरिषदा,संगीतमंडळे (म्यूझिक सर्कल्स) ह्यांच्यायोगे अनेकविध प्रकारच्या गायनवादनाचा लोकांना परिचय होऊ लागला होता. विविध प्रदेशांतील जा-ये पुष्कळ वाढली. मुंबई हे व्यवसायाचे केंद्र असल्यामुळे तेथेच स्थायिक होण्याची प्रवृत्ती वाढीस लागली असल्यास आश्चर्य नाही. आजवर ग्वाल्हेर,बडोदे,इंदूर,दक्षिण महाराष्ट्र, बेळगाव,कोल्हापूर,धारवाड,उत्तर कर्नाटक ही संगीताची केंद्रे होती. पण आता मुंबई-पुणे हीही केंद्रे नव्याने उदयास आली,इतकेच नव्हे, तर गाजू लागली. ‘उत्तर पैदा करती है, लेकिन दख्खन दाद देती है’ ह्या अल्लादियाखाँ यांच्या उक्तीचा साक्षात अनुभवच आला. ह्या सर्व संक्रमणात,तंत्र-साधनांच्या वैपुल्यात स्वरनिष्ठ संगीताची ओढ कधी नव्हे इतकी वाढली. तितक्या प्रमाणाने श्रेष्ठ गायक मिळणे हेच दुर्घट झाले. त्यामुळे गायक-वादकांचा मुशाहिरा वाढू लागला, अतोनात वाढला. त्यामुळे अन्य काही प्रश्न  उत्पन्न झाले. परंतु महाराष्ट्रात संगीताला खरोखरच ऊर्जस्वल असा काळ आला आणि संगीत अनेक अंगांनी समृद्ध झाले. विशेषतः मैफल,नाटक आणि चित्रपट ह्यांमधून.

भास्करबुवा बखले यांच्या मृत्यूनंतर (१९२२) एक अतिशय कलंदर  वृत्तीचा, अस्सल  गायक-कलावंत  हरपला.  ‘कलावंत’  ही  पदवी जर  दुर्मिळ  आणि  कमालीच्या  साक्षेपाने  द्यावयाची  असली, तर  ती  त्यांनाच  द्यावी लागेल.  तथापि  त्यांच्या  काळी  उत्तुंग  प्रतिभेचे कितीतरी गायक अवतीभवती वावरत होते. ⇨किराणा घराण्याचे अब्दुल करीमखाँ, ⇨ जयपूर घराण्याचे (अतरौलीचे) अल्लादियाखाँ,  ⇨ आग्रा घराण्याचे ⇨ फैयाझखाँ (१८८१-१९५०),अनेक घराण्यांचे  शागीर्द  वझेबुवा  असे  कितीतरी  श्रेष्ठ गायक आणि त्यांच्या शिष्यशाखाही होत्या [⟶ घराणी,संगीतातील]. त्या सर्वांचा एकवट असा कलाविष्कार हे महाराष्ट्राचे वैभव होते व आहे. गायकी घराण्याची संकल्पना त्या वेळी मूळ धरून होती. आजही ती काही प्रमाणात आहे. पण तिचे कंगोरे आज झिजू लागले आहेत अलीकडच्या काळातील  ⇨ भीमसेन जोशी (१९२२-  ),  ⇨ कुमार गंधर्व (१९२४-  ) किशोरी आमोणकर इ. गायक-गायिकांनी हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीतात नावीन्य आणि विविधता आणली आहे. सर्व प्रकारच्या गायनप्रकारांची महाराष्ट्रात बूज होऊ लागली आहे. ध्रुपद,ख्याल,ठुमरी,टप्पा,होरी,गीत,भावगीत,गझल,चित्रपटगीत असा कोणताही प्रकार असो,आवडीने ऐकणारा श्रोतृवर्ग आहेच. चिकित्सा करणाराही आहेच. संगीत आणि संगीतविषयक चळवळी ह्यांना आज महाराष्ट्रात असे काही उधाण आलेले आहे,की इतिहासात त्याला क्वचितच तोड मिळेल. श्रोत्यांची संगीताविषयीची भूक अनिवार वाढली आहे इतकी की,कलाकारांना ती पुरविणे कठीण जात आहे. आकाशवाणी,दूरदर्शन इ. आधुनिक साधनांमुळे संगीत ज्यांमधून वहावयाचे,त्या सारणी वाढल्या पण खुद्द ह्या माध्यमांनी संगीतात काही भर घातली,असे मात्र झाले नाही. असलेले अथवा तयार झालेले संगीत सादर करणे एवढेच त्या माध्यमांचे काम. संगीताच्या संघटना मात्र अनेक झाल्या. ⇨ संगीत नाटक  अकादमीपासून एखाद्या गावामधल्या संगीत मंडळापर्यंत व्याप वाढला आहे. स्पर्धा-परिषदाही भरपूर प्रमाणात आहेत. संगीत-व्यवसायाचे समग्र केंद्र मुंबई हे असल्यामुळे हिंदुस्थानातील कोणतीही संगीत-परिषद साजरी होण्यासाठी मुंबईचे,म्हणजे महाराष्ट्राचे नाव येणारच,अशी स्थिती आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह वाटणारी आहे.

१९१५ ते १९५० हा कालखंड जर घेतला,तर असे म्हणता येईल की,तो महाराष्ट्राच्या संगीतविषयक अस्सल निर्मितीचा काळ होता. काही प्रमाणात संगीत नाटकांचाही आणि भावगीतांचाही. महाराष्ट्रात भावगीत-गायनाची दीर्घ परंपरा सु. ५० वर्षे चालत आली आहे. जे. एल्. रानडे, जी. एन्. जोशी,गजानन वाटवे, बबनराव नावडीकर,माणिक वर्मा,ज्योत्स्ना भोळे,सुधीर फडके,अरूण दाते इ. गायक-गायिकांनी ही परंपरा समृद्ध व वैविध्यपूर्ण बनवली आहे. केशवराव भोळे यांनी अनेक सुप्रसिद्ध भावगीतांना सुंदर चाली दिल्या. ह्या संदर्भातच यशवंत देव,श्रीनिवास खळे आदी संगीत दिग्दर्शकांचाही वाटा मोलाचा आहे [⟶भावगीत]. अभिजात संगीतामध्ये त्या कालखंडात जी उभारी,जी निर्मितिक्षमता आणि सखोल चिंतनशीलता ओतप्रोत भरलेली अशी जाणवत होती, त्यांचा एकत्रित साक्षात्कार आज होत आहे काय,ह्या प्रश्र्नाचे उत्तर देण्याची आवश्यकता आहे,असे नाही. ते उत्तर ज्याचे-त्यानेच आपल्याशी पडताळून घ्यावयाचे आहे. गेल्या सहाशे वर्षांत महाराष्ट्राने संगीताच्या बाबतीत जे काही केले,घडविले,संपादिले,ते महत्त्वाचे होते. त्यात विद्याविषयक आणि कलाविषयक असा उभयविध भाग होता. आता ह्यापुढचा काळ नवा आहे. त्यातील प्रसंग,अडचणी,आव्हाने नवीन असणार आहेत. सर्व अकल्पित आहे. नवनवीन यंत्रांना प्रत्यही सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी काय-काय करावे लागेल,त्याचा अंदाज आजच्या गायकांना,वादकांना घेण्यासाठी बरीच मानसिक,बौद्धिक पूर्व-सिद्धता कदाचित करावी लागेल. ह्या पूर्वसिद्धतेच्या खुणा तरी आपल्या काळात आता दिसल्या पाहिजेत. तसे झाले, तरच एकविसाव्या शतकाला उभारीने सामोरे जाता येईल.

मंगरूळकर, अरविन्द.


नृत्य : महाराष्ट्रातील पुरातन नृत्यकलेचा सर्वांत जुना दाखला औरंगाबाद येथील सहाव्या-सातव्या शतकांतील शिल्पांमधून पहावयास मिळतो. औरंगाबाद येथील सातव्या क्रमांकाच्या लेण्यामधील सहा स्त्रीवादकांसमवेत नृत्य करणारी ललना ही भारतीय शिल्पकलेचा एक उत्तम नमुना समजली जाते. तिचा आकृतिबंध शास्त्रशुद्ध असून ‘कटिसमम् करण’ असे त्याचे वर्णन भरताच्या नाट्यशास्त्रात सापडते. आठव्या-नवव्या शतकांतील कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवालयावरही अनेक नृत्यशिल्पे आहेत. त्या  शिल्पांमधून  नाट्यशास्त्रातील ‘तलपुष्पपुट’, ‘करिहस्त’, ‘पृष्ठस्वस्तिक’, ‘दिक्-स्वस्तिक’ इ. ‘करणां’ ची  प्रतिबिंबे  स्पष्ट  दिसतात. हे मंदिर राष्ट्रकूटांच्या काळातील आहे. हे राजे कलांचे चाहते होते. राष्ट्रकूटांनंतर कदंब,शिलाहार व यादव राजांनी महाराष्ट्रात राज्य केले. त्यांपैकी यादवांनी संगीतनृत्यादी कलांना उत्तम राजाश्रय दिला. यादवकाळातील अनेक देवालये – उदा., सिन्नर,बलसाणे,खिद्रापूर,अंबरनाथ इ. ठिकाणची-महाराष्ट्रभर विखुरली आहेत आणि त्यांवरील नृत्यशिल्पे नाट्यशास्त्रीय शैलीशी साधर्म्य दाखविणारी आहेत. साधारणपणे चौदाव्या शतकापूर्वी,महाराष्ट्रात मानसोल्लास,संगीतरत्नाकर,संगीतसमयसार,संगीतसुधाकर इ. गीत,वाद्य,नृत्य या विषयांवरील संस्कृत ग्रंथरचना झाली होती. त्यांपैकी शाङर्गदेवाचा संगीतरत्नाकर (तेरावे शतक) हा देवगिरी (सध्याचे दौलताबाद) येथे लिहिला गेलेला ग्रंथ नाट्यशास्त्रानंतरचा पुरातन संगीतावरील प्रमाणग्रंथ समजला जातो. या ग्रंथात नृत्यावर वेगळा अध्याय आहे. यादवकाळातील देवगिरी या राजधानीचे वर्णन इत्नबतूता या अरबी प्रवाशाच्या लिखाणातून सापडते. त्यावरून त्या काळात गायिका,नर्तकी यांचे ऐश्वर्य व त्यांना मिळणारा मानसन्मान यांची कल्पना येते.

आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भात नृत्याचा विचार चार वेगवेगळ्या पातळ्यांवर करणे आवश्यक ठरते : (१) अभिजात शास्त्रीय नृत्यशैली, (२) लोकनृत्यशैली : आदिवासी अथवा ग्रामीण लोकांच्या उत्स्फूर्त नृत्यपरंपरा, (३) तमाशा अथवा लोकनाट्यातील लावणी नृत्यशैली आणि (४) मराठी चित्रपटांतील संमिश्र नृत्यशैली.

अभिजात शास्त्रीय नृत्यशैली : महाराष्ट्रात पुरातन शास्त्रानुसार नृत्यशैली अस्तित्वात होती,असा अंदाज येथील प्राचीन शिल्पकलेवरून व संगीतरत्नाकरासारख्या  ग्रंथांवरून करता येतो. परंतु आधुनिक काळात मात्र,केरळमधील कथकळी किंवा तमिळनाडूमधील भरतनाट्यम् यांसारखी,जिला खास महाराष्ट्राची म्हणता येईल अशी प्राचीन शास्त्रीय नृत्यपरंपरा चालत आलेली दिसत नाही. परकी आक्रमणांच्या काळात महाराष्ट्राच्या जनजीवनातील अभिजात नृत्यपरंपरा खंडित झालेली दिसते. या काळात नृत्यकला ही शरीरप्रदर्शन,निव्वळ करमणुकीचे साधन व पैशाची बटीक म्हणून वावरू लागल्याकारणाने उच्चभ्रू मराठी समाजाने नृत्यकलेलाच गौण मानले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र अभिजात भारतीय कलापरंपरांच्या पुनरूज्जीवनाची लाटच उसळली आणि त्यात महाराष्ट्रही सहभागी झाला. शास्त्रीय हिंदुस्थानी शैली महाराष्ट्राने आपलीशी केली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत शास्त्रीय संगीत पोहोचले आहे. संगीताच्या जोडीने येणाऱ्या शास्त्रीय नृत्यशैलींनाही आता हळूहळू लोकप्रियता लाभत आहे. चांगल्या घराण्यातील मुलींनी नृत्य करणे गैर यांसारख्या तत्कालीन कल्पनांचे आता सुसंस्कृत मराठी समाजातून संपूर्ण उच्चाटन झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता हिंदुस्थानी संगीताशी निगडीत असलेली कथ्थक शैली महाराष्ट्रात अधिक परिचयाची आहे. परंतु कथ्थकच्या जोडीने आता भरतनाट्यम् ही दाक्षिणात्य शैलीदेखील तिच्यातील दृक्-सौंदर्य व अभिनय यांमुळे अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शास्त्रीय नृत्यशैलीच्या सुसंस्कृत मराठी अभ्यासक-नर्तकांची जी पहिली पिढी उदयास आली,तीमध्ये दमयंती जोशी,रोहिणी भाटे,मोहनराव कल्याणपूरकर,पार्वतीकुमार (ऊर्फ जगन्नाथ महादेव कांबळी),सुरेंद्र वडगावकर इत्यादींचा अंतर्भाव होतो. कथ्थक शैलीतील सुप्रसिद्ध नर्तकी दमयंती जोशी यांनी प्रख्यात नर्तकी मेनका यांच्याकडे कथ्थकचा अभ्यास केला. नृत्यातील त्यांच्या तपश्चर्येबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ आणि राष्ट्रपती पदक ही मानचिन्हे  लाभली आहेत. भारत सरकारच्या फिल्म प्रभागातर्फे त्यांच्या नृत्यावर एक अनुबोधपटही तयार करण्यात आला आहे. रोहिणी भाटे या कथ्थक शैलीतील आणखी एक जाणकार नर्तकी होत. मोहनराव कल्याणपूरकर व नृत्यगुरू लच्छूमहाराज यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. प्रत्यक्ष नृत्यकलेबरोबरच त्यांचा त्या शास्त्राचा व्यासंगही आहे. विश्वविख्यात अमेरिकन नर्तकी इझाडोरा डंकन यांच्या माय लाइफ या आत्मचरित्राचा मी-इझाडोरा ! (१९७५) हा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. ‘नृत्यभारती’ ही त्यांची संस्था मुंबई व पुणे येथे गेली अनेक वर्षे सातत्याने कथ्थकचे शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. कथ्थक शैलीतील नाणावलेले गुरू मोहन कल्याणपूरकर हे हुबळी येथे स्थायिक झालेले असले,तरी अनेक वर्षे मुं बईत त्यांचे वास्तव्य होते. श्रेष्ठ कथ्थकगुरू शंभूमहाराज यांची प्रत्यक्ष तालीम त्यांना लाभली. त्यामुळे जुन्या पठडीतील कथ्थकचे सौंदर्य ते आपल्या शिष्यांसमोर समर्थपणे मांडू शकतात. मुंबई येथील राष्ट्रीय संगीत-नाट्य केंद्रातर्फे कथ्थकमधील उच्चस्तरीय शिक्षण देण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. भरतनाट्यमच्या क्षेत्रात मान्यवर गुरू म्हणून लौकिक संपादन केलेले आचार्य पार्वतीकुमार हे मूळचे कथ्थक व कथकळी नर्तक होत. परंतु नंतर त्यांनी स्वतःला भरतनाट्यम् नृत्यपरंपरेला वाहून घेतले. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील तंजावरचे मराठा राजे सरफोजी भोसले यांनी त्याकाळी भरतनाट्यम् शैलीसाठी लिहिलेल्या मराठी रचनांवर संशोधन करून त्यांतील बऱ्याच रचना आचार्य पार्वतीकुमारांनी यशस्वीपणे प्रयोगात आणल्या आहेत व भरतनाट्यमच्या परंपरागत रचनांमध्ये मौलिक भर घातली आहे. त्यांना १९७९ सालचा उल्लेखनीय सांस्कृतिक कामगिरी-बद्दलचा राज्य पुरस्कार लाभला. श्रेष्ठ नृत्यगुरू म्हणून राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचे १९८२ सालचे पारितोषिकही त्यांनी मिळविले आहे. नृत्याच्या क्षेत्रात सुरेंद्र वडगावकर यांनीही लक्षणीय कार्य केले आहे. १९४२ साली ‘किंकिणी वृंद’ ही नृत्यसंस्था त्यांनी स्थापन केली. कथ्थ-क,भरतनाटयम् इ. शास्त्रीय शैलींच्या प्राथमिक शिक्षणाबरोबरच लोकनृत्याचेही शिक्षण ते देतात. शाळा आणि महाविद्यालये यांतून शास्त्रीय तसेच लोकनृत्याच्या स्पर्धांचे नियम करून या स्पर्धांना सर्वमान्यता आणि लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मुंबई,पुणे येथील काही शिक्षणसंस्थांमधून नृत्य,योगासने व तालबद्ध व्यायाम यांचा संमिश्र अभ्यासक्रम शिकविण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी केला आहे. तसेच नृत्यावर लेख लिहून आणि व्याख्यानांचे कार्यक्रम करून नृत्यप्रसाराचेही मौलिक कार्य केले आहे. वरील सर्वच सुशिक्षित नर्तक-नर्तकींच्या प्रयत्नांमुळे अभिजात नृत्यशैलींना महाराष्ट्रात पुन्हा प्रतिष्ठा लाभण्यास मोठा हातभार लागला आहे. तरूण पिढीतील अग्रणी नर्तक-नर्तकींमध्ये  भरत-नाट्यमच्या क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या सुचेता भिडे-चापेकर यांचा उल्लेख करावा लागेल. गुरू पार्वतीकुमार व गुरू किटप्पा पिळ्ळे यांच्याकडे त्यांचे नृत्याचे शिक्षण झाले. तंजावरच्या मराठा राजांच्या नृत्यरचनांवरील गुरू पार्वतीकुमारांचे संशोधन त्यांनी पुढे चालविले असून भरतनाट्यम् शैलीत आणखी काही मौलिक रचनांची भर घातली आहे. सर्वसामान्य मराठी रसिकाच्या मनात या नृत्यशैलीविषयी ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जुनी मराठी नाट्यगीते भरतनाट्यमच्या माध्यमातून सादर करण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी केला. हिंदुस्थानी संगीत व भरतनाट्यम् नृत्यशैली या दोहोंचा समन्वय,या दोहोंमधील मूळ संहिता न बिघडवता,साधण्याचा त्यांचा अभ्यास व प्रयत्न चालू आहे. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर खास लहान मुलांसाठी शास्त्रीय नृत्याच्या रसग्रहणपर कार्यक्रमांची एक मालिका सादर केली. तसेच नृत्यप्रसारार्थ इंग्रजी व मराठीतून नृत्यावर लेख व प्रात्यक्षिकांसह व्याख्यानाचे  कार्यक्रमही  त्यांनी केले आहेत. तरूण  पिढीतील  अन्य  गुणी कलावंतामध्ये पुढील नर्तक-नर्तकींचा समावेश होतो : कथ्थकच्या क्षेत्रात रोहिणी भाटे यांच्या शिष्या शमा भाटे व प्रणती प्रताप या दोघी ‘जुगल-कथ्थक’ म्हणजे एकत्रितपणे अभिनव प्रयोग सादर करतात. कथ्थकच्या प्रयोगात अधिक एकसंधपणा यावा ही दृष्टी त्यांच्या या प्रयोगशीलतेमागे दिसते. त्यांनी अनेक नवनवीन नृत्यरचना कथ्थक शैलीत सादर केल्या आहेत. रोहिणी भाटेंच्याच आणखी एक शिष्या व सहकारी पुण्यातील शरदिनी गोळे ह्याही एक उत्तम कलाकार व शिक्षिका आहेत. त्यांखेरीज पुण्यातील मनिषा साठे,मुंबईतील भाग्यश्री ओक,राजा केळकर,अरूण चांदीवाले इत्यादींचा उल्लेख करता येईल. भरतनाट्यमच्या क्षेत्रात सुचेता भिडे-चापेकर यांच्या शिष्या स्मिता साठे या एक उदयोन्मुख नर्तकी होत.


शास्त्रीय संगीताइतके शास्त्रीय नृत्य अजून मराठी मनात रूजले नसले,तरी हळूहळू सुसंस्कृत मराठी जनमानसात अभिजात नृत्यशैलीविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. मुंबई,पुण्यासारख्या शहरांतील खाजगी नृत्यशिक्षणसंस्थांतून नृत्य शिकणाऱ्या युवक-युवतींची गर्दी वाढत्या प्रमाणात दिसून येते. तद्वतच शाळा-महाविद्यालयांतील नृत्यस्पर्धांतून मराठी मुलींचा सहभाग अधिकाधिक प्रमाणात दिसतो. मुंबई विद्यापीठात भरतनाटयम्,कथकळी व मोहिनीआट्टम् ह्या नृत्यविषयांतील अभ्यासक्रमाला बी. ए., एम्. ए. आणि पीएच्. डी. या पातळ्यांवरही मान्यता मिळालेली आहे. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाचे शिक्षण मुंबईतील नालंदा नृत्यकला महाविद्यालयात दिले जाते. त्याचप्रमाणे पुणे येथील टिळक विद्यापीठातही कथ्थक व भरतनाट्यम्-मधील पदविका परीक्षा घेतल्या जातात. गांधर्व महाविद्यालयातर्फेही संपूर्ण महाराष्ट्भर या दोन शैलींसाठी पदवी परीक्षा घेतल्या जातात. नृत्यशिक्षण देणाऱ्या मान्यवर संस्थाही मुंबई,पुण्यातच एकवटल्या आहेत. पार्वतीकुमार यांची ‘तंजावूर नृत्य शाळा’ व सुचेता भिडे-चापेकर यांची ‘नाद-नुपूर’ या संस्था मुंबईत आहेत. सुरेंद्र वडगावकर यांची ‘किंकिणी वृंद’ व रोहिणी भाटे यांची ‘नृत्यभारती’ यांच्या शाखा मुंबई व पुणे या दोन्ही ठिकाणी आहेत. पुण्यात प्रभा मराठे यांची ‘कलाछाया’ ही कथ्थक संस्था आहे. तसेच प्रेरणा देसाई आणि सौदामिनी राव पुण्यात भरतनाट्यम् शिकवतात.

शास्त्रीय नृत्यक्षेत्रातील अनेक नामवंत अ-मराठी कलाकार व त्यांच्या  संस्था  मुंबईत  आहेत.  त्या पुढीलप्रमाणे : गुरू कल्याणसुंदरम्,गोविंदराजन् व महालिंगम् पिळ्ळै यांची ‘श्री राजराजेश्र्वरी भरतनाट्य कला मंदिर’ गुरू कृष्णन् कुट्टी यांची ‘नृत्यश्री’ (कथकळी),कनक रेळे यांची ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ (भरतनाट्यम्,मोहिनीआट्टम् व कथकळी) झवेरी भगिनी यांची ‘रंगनर्तन’ (मणिपुरी) इ. संस्था नृत्यशिक्षण देतात. यांखेरीज रोशनकुमारी,सितारादेवी,गोपीकृष्ण,गौरीशंकर,सुनयना,हजारीलाल (कथ्थक) राघवन् नायर,पणीक्कर (कथकळी)  गुरू कदरीवेलू,गुरू सौंदर राजन्,गुरू राजी नारायण,गुरू मणि-कलासदन संस्था,चंद्रिका (भरत-नाट्यम्) इ. तज्ञही नृत्यविषयक शिक्षण देत असतात. महाराष्ट्रातील मुंबई,पुणे यांव्यतिरिक्त इतर ठिकणी नृत्यशिक्षण देणाऱ्या काही संस्था व कलावंत आहेत, ते पुढीलप्रमाणे : नागपूर येथे शोभा वकील,नलिनी शर्मा,भारद्वाज नासिक येथे शेख व ‘किर्ती कला मंदिर’ ही संस्था सोलापूर येथे गट्टी बंधू, चंचला शहा आणि कोल्हापूर येथे बद्रीनाथ कुलकर्णी,मिरजकर व परूळेकर हे नृत्यशिक्षणाचे कार्य करतात.

मुंबईमध्ये शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांपैकी ‘द नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस’, ‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट’, ‘द षण्मुखानंद फाइन  आर्टस  अँड  संगीत सभा’, ‘भारतीय  म्यूझिक अँड आर्टस सोसायटी’, ‘चेंबूर फाइनआर्टस’, ‘सूरसिंगारसंसद’ इ. उल्लेखनीय आहेत.

प्रख्यात नर्तक उदय शंकर यांनी सर्व शास्त्रीय शैलींचा समन्वय साधून,तसेच काही भारतीय लोकनृत्यशैली व ‘बॅले’ या पाश्चात्त्य समूहनृत्यशैलीतील संकल्पना यांचा वापर करून एक आधुनिक नृत्यनाट्यशैली निर्मिली. त्यापासून स्फूर्ती घेऊन काही नर्तकांनी महाराष्ट्रातही काहीशी तशाच प्रकारची नवनृत्यशैली निर्माण केली. त्यांत गुरू पार्वतीकुमार यांचे स्थान अग्रगण्य आहे. द ऱ्हिदम ऑफ कल्चर,देख तेरी बम्बई,डिस्कव्हरी ऑफ इंडिया ही त्यांची गाजलेली नृत्यनाट्ये त्यांनी मुंबईतील ‘आय्. एन्. टी.’ या संस्थेमार्फत सादर केली. त्यांपैकी देख तेरी बम्बई चे प्रयोग त्यांनी पॅरिस येथील आं तरराष्ट्रीय महोत्सवात १९५९ साली केले होते. अलीकडे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबईतील ‘आविष्कार’ ही संस्था लहान मुलांसाठी नृत्यनाट्ये सादर करते. ह्या क्षेत्रात सुरेंद्र वडगावकर (व्याध,शिवरात्री,तुकाराम इ. नृत्यनाट्ये) रोहिणी भाटे (मीरा,हिमगौरी व सात बुटके इ.) वैजयंतीमाला (संत सखू,चंडालिका) सचिन शंकर (रामायण,ट्रेन इ.) व योगेंद्र देसाई यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

लोकनृत्यशैली : अभिजात शास्त्रीय शैलीखेरीज आढळणाऱ्या महाराष्ट्रातील नृत्यपरंपरांमध्ये लोकनृत्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रांतर्गत विशिष्ट समाजातील संस्कृती,चालीरीती,धार्मिक भाव-भावना,जनजीवनशैली आदींचे प्रतिबिंब ज्यांत दिसते अशा अनेक लोकनृत्यपरंपरा महाराष्ट्रात आहेत. लोकनृत्ये सर्वसाधारणपणे उत्सवप्रसंगी,सणासुदीला केली जातात. महाराष्ट्रात असे लोकप्रिय सण म्हणजे गौरी,होळी,दिवाळी आणि गोकुळाष्टमी हे होत. ग्रामीण भागातील कुणबी,आगरी,मराठा,कातकरी,भिल्ल,कोळी इ. समाजांत लोकनृत्ये अद्यापही रूढ व लोकप्रिय असली,तरी आधुनिक व पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव जास्त असलेला नागर सुशिक्षित समाज मात्र या पारंपरिक लोकनृत्य-प्रथांपासून वंचित झालेला दिसतो.

कोकणात लोकनृत्यांहून अधिक प्रगत असे ⇨ लळित, ⇨दशावतारी  नाटके यांसारखे नृत्यनाट्यप्रकार सादर केले जातात. भरताच्या नाट्यशास्त्रातील प्रयोगतंत्राचा वापर करणाऱ्या दक्षिण कर्नाटकातील यक्षगान,तमिळनाडूतील भागवत मेळा इ. नृत्यनाट्य-परंपरांशी साधर्म्य दाखविणारे कोकणातील दशावतारी प्रयोग आहेत. मुंबईतील ‘इंडियन नॅशनल थिएटर’ या सुप्रसिद्ध संस्थेच्या संशोधन केंद्रातर्फे अशोकजी परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लोकसंगीत-नृत्य-नाट्य या विषयांवर मौलिक संशोधन केले जात आहे.

नागरी समाजास लोकनृत्यशैलींचा आणि पर्यायाने साध्याभोळ्या ग्रामीण संस्कृतीचा परिचय व्हावा,या हेतूने विविध ग्रामीण भागांतील कलाकारांना एकत्र संघटित करून त्यांच्याद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये लोककलामहोत्सव घडवून आणण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे प्रतिवर्षी केला जातो.

लावणी नृत्य : महाराष्ट्राचे लोकनाट्य वा ⇨ तमाशा  हा एक प्रमुख लोकरंजनप्रकार आहे. तमाशातील वगाचा एक भाग म्हणून सादर होणारी ⇨ लावणी  ही खास महाराष्ट्राची जुनी नृत्यपरंपरा म्हणता येईल. ही नृत्यशैली शास्त्रीय शैलींच्या काटेकोर शिस्तीत बसणारी नसली, तरी ग्रामीण लोकनृत्यांचा रां गडेपणा तिच्यात नाही. लावणी नृत्याचा खास वेगळा असा वाज आहे आणि या शैलीची खास अशी प्रतीकात्मकताही आहे. सर्वसामान्य जनांचे मनोरंजन एवढेच तिचे उद्दिष्ट. पेशवाईच्या उत्तरार्धात लावणी नृत्याचा परमोत्कर्ष दिसून येतो. लावणी ही वैशिष्ट्यपूर्ण गीत-संगीतरचना नृत्यातून तीन प्रकारे सादर करता येते.  पैकी तमाशातील लावणी नाचीने आपल्या नृत्याभिनयाने,तसेच सोंगाड्याच्या व तुणतुणे,ढोलकी इ. वाद्यांच्या साथीने रंगवायची असते. लावणी नृत्यात शृंगारिक लावण्याच विशेषेकरून सादर केल्या जातात. अंगाच्या हालचालींतील डौल,विशिष्ट लोकधर्मी हस्तमुद्रा,ढोलकीच्या साथीने ठेक्याची विविध वजने दाखविणारे पदन्यास,दोन्ही हातांच्या चिमटीत पदर मागून डोक्यावर धरून केला जाणारा पदन्यास हे या नृत्यशैलीचे विशेष होत. तालांगप्रधान असलेली ही लावणी नृत्यशैली अवगत होण्यासाठी तालीम व रियाझ दोन्हींची आवश्यकता लागते. अलीकडच्या काळात मात्र अस्सल जुनी लावणी ऐकण्या-बघण्यास मिळणे दुर्मिळ झाले असून,बव्हं शी लावण्यांतून भडक शृंगाराचे प्रदर्शन व हिंदी चित्रपटांतील संमिश्र नृत्याचाच प्रादुर्भाव दिसतो.


या लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कलासंचालनालयातर्फे दरवर्षी तमाशा महोत्सवाचे आयोजन केले जाते,तसेच शासनातर्फे प्रतिवर्षी तमाशा शिबीरही आयोजित केले जाते. या शिबिरातून अप्पा इनामदार यांच्यासारख्या जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तमाशातील स्त्री कलाकारांना लावणी नृत्याच्या जुन्या परंपरेची शिकवण दिली जाते. कौसल्या  कोपरगावकर,यमुना वाईकर,गोदावरी पुणेकर,भामा पंढरपूरकर,हिरा अवसरकर,रोशन सातारकर,गुलाब कोरगावकर,विठाबाई नारायणगावकर,मधू कांबीकर तसेच भाऊ-बापू,शिवा-संभा,काळू-बाळू,तुकाराम खेडकर,चंद्रकांत ढवळापुरीकर इ. या क्षेत्रातील नावाजलेली मंडळी होत.

चित्रपट-नृत्ये : आधुनिक काळात आणखी एका वेगळ्या माध्यमातून नृत्याचा विचार होऊ लागला आहे आणि तो म्हणजे चित्रपटांतून. मराठी चित्रपटांचे साधारणतः दोन वर्ग पडतात : (१) ग्रामीण  जीवनावरील  तमाशाप्रधान  चित्रपट आणि (२) शहरी जीवनावरील कौटुंबिक,सामाजिक विषय हाताळणारे चित्रपट.तमाशाप्रधान  चित्रपटांतून  आधुनिक लावणी नृत्ये आढळतात तर शहरी चित्रपटांतून हिंदी चित्रपटांच्या धर्तीवर संमिश्र प्रकारची नृत्ये असतात. चांगली लावणी नृत्ये असणाऱ्या अमर भूपाळी,सांगत्ये ऐका,पिंजरा इ. चित्रपटांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. जैत रे जैत सारख्या आधुनिक चित्रपटात आदिवासींचे लोकसंगीत आणि लोकनृत्यांतील हालचाली यांचा चांगला वापर करून घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय नृत्यतारकांमध्ये जुन्या पिढीतील हंसा वाडकर,लीला गांधी,जयश्री गडकर,संध्या तसेच नवीन पिढीतील उषा चव्हाण,माया जाधव इ. उल्लेखनीय आहेत. [⟶ चित्रपट –मराठी नृत्य – महाराष्ट्रातील नृत्य].

भिडे-चापेकर,सुचेता

संदर्भ :

1. Agarkar, A. J. Folk-dance of Maharashtra, Bombay, 1950.

2. Appaswamy, Jaya, “ Painting on Glass” :India Magazine, No. 2. January 1981.

3. Deglurkar, G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashtra, Nagpur, 1974.

4. Gangoli, O. C.: Goswami,  A.  Ed. The Art of the Rashtrakutas, Calcutta, 1958.

5. Gupta, Ramesh Shankar Mahajan, B. D. Ajanta, Ellora and Aurangabad Caves, Bombay, 1962.

6. Marg Publications, Marg, Vol, 34,  No. 2 :The Art of Chhatrapatis and Peshwas, Bombay, March, 1981.

7. Mate, M. S. Maratha Architecture (1650 A. D. to 1850 A. D.) Poona, 1959.

8. Mate, M. S. Temples and Legends of Maharashtra, Bombay, 1962.

9. Pathy, T. V. Elura, Art and Culture, New Delhi, 1980.

10. Prince of Wales Museum, Dawn of Civilization in Maharashtra, Bombay, 1975.


11. Ranade, G. H. Music in Maharashtra, New Delhi,  1967.

12. Sadwelkar, Baburao, “Chitrakathi Tradition of Pinguli” : The Performing Arts, Marg Publication, Bombay, 1982.

13. Yazdani. G. Ajanta, 4. Vols. London, 1930-55.

१४. इंगळे, के. गुं. पंडित गायनाचार्य कै. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र, पुणे, १९३६.

१५. जोशी, लक्ष्मण दत्तात्रेय, संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास, पुणे, १९३५.

१६. टेंबे, गोविंद स. माझा संगीत – व्यासंग, किर्लोस्करवाडी, १९३९.

१७. देशपांडे, वामनराव अनु. देशपांडे, श्री. ह. महाराष्ट्राचे संगीतातील कार्य, मुंबई, १९७४.

१८. देशपांडे, वामन हरि, घरंदाज गायकी, मुंबई, १९६१.

१९. धनेश्वर, त्रिंबक गंगाधर, वेरूळची लेणी, मुंबई, १९०९.

२०. धुरंधर, महादेव विश्वनाथ, कलामंदिरांतील एकेचाळीस वर्षे : जानेवारी ८-१८९० ते जानेवारी ३१ – १९३१, मुंबई, १९४०.

२१. धोंड, प्रल्हाद अनंत, रापण, मुंबई, १९७९.

२२.पाठक, यशवंत, नाचू कीर्तनाचे रंगी, पुणे, १९८०.

२३. बागल, माधवराव, कोल्हापूरचे कलावंत, कोल्हापूर, १९६३.

२४. भोबे, गोपालकृष्ण, सात स्वरश्री, मुंबई.

२५. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्प – वैभव, मुंबई, १९६४.