ग्रंथप्रकाशन :  महाराष्ट्रातील ग्रंथनिर्मितीला जवळजवळ साडेसातशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. तेरावे शतक हे महाराष्ट्राचे सुवर्णयुग मानले जाते. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू (१२६८) नंतर ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. हा  ग्रंथ मराठीतील पहिला व सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. यानंतर महानुभाव पंडित तसेच नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास व त्यांच्या प्रभावळीतील अन्य संत मंडळी मुक्तेश्वर, मोरोपंत, आदी पंतकवी आणि शाहीर आदींनी सतराव्या शतकाअखेरीपर्यंत विपुल ग्रंथरचना केलेली आहे. संस्कृतचे ग्रंथभांडार आबाल-वृद्ध व स्त्री-पुरुष यांना सोपे करून सांगणे हा यामागील उद्देश असून, ईश्वरी साक्षात्कार, गुरुकृपा, गुर्वाज्ञा, स्मृतिकथाकथन, धर्मप्रसार व संकटनिवारण यांसारख्या प्रेरणा या ग्रंथनिर्मितीमागे होत्या त्यामुळे या ग्रंथाचा प्रसारही त्या काळी विपुल प्रमाणात होत असे.

मुद्रणपूर्व हस्तलिखित ग्रंथ : मुद्रित ग्रंथप्रकाशनपूर्व काळातील ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात असत. काळ्या रंगाची शाई (मसीची शाई) वापरून कागदावर ग्रंथलेखन केले जाई. चांगल्या शुद्ध व मुळाबरहुकूम प्रती तयार करणाऱ्या विद्धानांना आणि नकलनवीसांना भरपूर द्रव्य मिळे त्यामुळे त्याकाळी हे काम उपजीविकेचा धंदा बनले होते व त्याला प्रतिष्ठाही मिळाली होती. या धंद्यात महाराष्ट्रीयांबरोबरच कन्नड व गुजराती व्यक्तीही होत्या. ज्ञानेश्वरीसारखा मोठा ग्रंथ नकलण्यास बराच काळ लागत असे आणि त्याची किंमतही त्याकाळी २६ रुपये इतकी असे. तेरा ते अठराव्या शतकापर्यंत लिहिलेले व ज्यांच्या चौदाव्या शतकानंतर प्रती होऊ लागल्या, असे हस्तलिखित ग्रंथ विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध असलेली भोसल्याची बखर कागदाऐवजी शिलेवर आहे, तर दासोपंताची पासोडीनामक चार फूट (सु.१.२२ मीटर) रुंद व चाळीस फूट (सु.१२.१९ मीटर) लांब वस्त्रावरील १,६०० ओव्यांचा पंचीकरण हा ग्रंथ, तसेच ताडपत्रावरील कलानिधि हा ग्रं थ वगळता बहुतेक सर्व मराठी हस्तलिखिते कागदावरचीच आहेत. हे ग्रंथ सुट्या पानांच्या ‘पोथ्या’, अभंगांच्या वह्या, ऐतिहासिक परंपरेचे ‘बंद’ या स्वरूपांत, तर महानुभावीय ग्रंथ शिवलेले व पाण्याने न भिजणाऱ्या कापडाच्या वेष्टणात उपलब्ध झाले आहेत. सोळाव्या शतकात महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी हस्तलिखित ग्रंथाविषयी केलेलेकार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी परमार्थकारणाबरोबर ‘ग्रंथकारण’ सुद्धा केले. त्यांच्या ग्रंथकारणांत ग्रंथनिर्मिती, ग्रंथाध्ययन, ग्रंथसंरक्षण व ग्रंथप्रसार या चतुर्विध कार्याचा समावेश होतो. यांशिवाय त्यांनी स्थापन केलेल्या मठांतून मराठी हस्तलिखितांचा संग्रह केला होता. या सर्व मराठी ग्रंथांच्या प्रती व माहिती शं. श्री. देव यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक जमवून सत्कार्योत्तेजक सभा, धुळे या संस्थेकडे एकत्रित केली आहे. तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय, भारतातील विद्यापीठे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय व विविध हस्तलिखित ग्रंथालये यांतून हे हस्तलिखित ग्रंथ संग्रहित केलेले आढळतात. या हस्तलिखितांचा काल मात्र चौदा-पंधराव्या शतकामागे जात नाही.


महाराष्ट्रातील मुद्रण-प्रकाशनाचे आरंभीचे प्रयत्न : मराठी ग्रंथाला मुद्रणाचा पहिला संस्कार घडविण्याचा मान विल्यम कॅरी या पाश्चात्त्य मिशनऱ्याकडे जातो. त्याने१८०५ मध्ये बंगालमधील श्रीरामपूर येथील छापखान्यात मराठी भाषेचे व्याकरणमॅथ्यूचे शुभवर्तमान हे ग्रंथ छापले. अन्यत्र मराठी ग्रंथांचे मुद्रण मात्र सतराव्या शतकाच्या आरंभीच झाले होते. त्या दृष्टीने पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनचे प्रयत्न उल्लेखनीय ठरतात. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १५५६ मध्ये ॲबिसिनियाच्या बादशाहाला भेट दिलेले मुद्रणयंत्र घेऊन स्पॅनिश मुद्रक हू वान दे बूस्तामान्ते हा गोव्यात आला. हे यंत्र काही कारणाने पुढे न जाता गोव्यातच राहिले. त्याचा उपयोग धर्मप्रसारासाठी केला गेला. दौत्रिना क्रिस्तां हे तमिळ लिपीतील पुस्तक १५७८ मध्ये प्रसिद्ध झाले. भारताच्या भूमीवर छापले गेलेले हे पहिलेपुस्तक होय. यानंतर १६१६ मध्ये फादर स्टीफन्सचे मराठी क्रीस्तपुराण प्रसिद्ध झाले तर १६१६ ते १६७४ या कालात रिबेइरू, साल्दान्य, आल्मेईदा आदींचे मराठीतील ख्रिस्त वाङ्मय प्रसिद्ध झाले. पण हे सर्व रोमन लिपीत होते. म्हणून मुंबईच्या कुरियर प्रेसमध्ये छापून प्रसिद्ध झालेलेपं चोपाख्यान हेच महाराष्ट्रातील देवनागरी लिपीमधील पहिलेपुस्तक ठरते. अक्षरसाधनेच्या आणखी काही प्रयत्नांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करावयास हवा. पोर्तुगीज व इंग्रज यांच्याशी आलेल्या संपर्कामुळे त्यांच्यासारख्या दूरदर्शी राष्ट्रनिर्मात्याच्या ध्यानात मुद्रणयंत्राची उपयुक्तता आली नसेल, हे संभवत नाही. भीमजी पारेख यांच्यामार्फत मुद्रणयंत्र आणण्याचा शिवाजी महाराजांचा १६७० मधील प्रयत्न मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिला. तंजावरमध्ये राजा सरफोजींनीही डॅनिश मिशनरी श्वार्टस याच्या प्रेरणेने आपल्या राज्यातील छापखान्यात १८०६ मध्ये बालबोध मुक्तावली, तर १८०९ मध्ये एकनाथानचे भावार्थ रामायण (युद्धकांड) हे ग्रंथ छापले होते. तसेच मराठी राज्यातील अखरेचे मुत्सद्दी नाना फडणीस यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा वकील चार्ल्‌स मॅलेट यांच्या साह्याने भगवद् गीता हा धर्मग्रंथ एका तांबटाकडून तयार करून घेतलेल्या मराठी अक्षरांच्या खिळ्यांद्वारा छापण्याचे योजिले होते परंतु सवाई माधवराव यांच्या मृत्यूने हा प्रयत्न अपुरा राहिला तथापि हे तांब्याचे टंक (टाईप) व लाकडी मुद्रणयंत्र मिरज संस्थानचे अधिपती गंगाधरराव पटवर्धन यांनी मिरजेस नेले आणि १८०५ मध्ये भगवदगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. हे वर्ष व कॅरीने छापलेल्या मराठी व्याकरण ग्रंथाचे प्रकाशनवर्ष एकच होते. देवनागरी लिपीतील मुद्रणाचा महाराष्ट्रातील आद्य यशस्वी प्रयत्न म्हणून या ग्रंथास ऐतिहासिक महत्त्व आहे.

अव्वल इंग्रजी काळातील मराठी ग्रंथप्रकाशन : भारतात इंग्रजांची सत्ता दृढमूल करावयाची असेल, तर लोकशिक्षण हा एकच मार्ग असल्याची मौंट स्ट्यूअर्ट एल्फिस्टन या गर्व्हनरची पक्की जाणीव व त्यासाठी ग्रंथनिर्मिती हे महत्त्वाचे साधन होय, ही त्याची निष्ठा. यांतूनच महाराष्ट्रातील प्रकाशनाला पाश्चात्यांनी प्रारंभ केला. आपल्या संस्कृतीचा, धर्माचा व वैज्ञानिक सुधारणांचा परिचय मराठी जनतेला करून देणे हाही एक उद्देश त्यांच्या प्रकाशनकार्यामागे होताच. अमेरिकन मिशन प्रेस, बाँबे बुक अँड ट्रस्ट सोसायटी वा ख्रिश्चन व्हर्नॅयुलर लिटररी सोसायटी यांच्यासारख्या मिशनरी मंडळींनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी बायबल वा लेकराच्या पोथ्यांसारखी शेकडो मराठी पुस्तके छापली व त्यांतील बरीचशी फुकट तर काही अल्प किंमतीत वाटली. या धर्मप्रसाराची स्वाभाविकरित्या प्रतिक्रिया होऊन मराठी माणसाच्या प्रकाशन-व्यवसायाला त्यातूनच प्रारंभ झाला. त्या प्रमुख व्यक्तींमध्ये गणपत कृष्णाजी पाटील (१८३१-३२ पासून)  व जावजी दादाजी (१८६४ पासून) यांचा अग्रक्रम लागतो.

पुढे १८४७ या वर्षीलेखाधिकाराचा कायदा (इंडियन कॉपीराइट ॲक्ट) झाला व त्यामुळे ग्रंथकर्त्यास संरक्षण मिळाले तर १८६७ मध्ये झालेल्या ग्रंथनोंदणी कायद्याने ग्रंथनोंदणी करण्याची व्यवस्था झाल्यामुळे ग्रंथप्रकाशनाची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ लागली. या काळातील प्रकाशित ग्रंथांना ‘दोलामुद्रिते’ अथवा ‘आद्यमुद्रिते’ असे नाव देण्यात आले.  ग्रंथप्रकाशनाला ज्या व्यक्तींनी व संस्थांनी हातभार लावला त्यांत प्रामुख्याने बडोद्याचे संस्थानिक⟶सयाजीराव गायकवाड तसेच ग्वाल्हेर, इंदूर, धार, देवास येथील संस्थानिक यांचा उल्लेख केला पाहिजे.  बाँबे नेटिव्ह स्कूल बुक्स अँड स्कूल सोसायटी अर्थात हैंदशाळा पुस्तक मंडळी (१८२२) बोर्ड ऑफ एज्युकेशन दक्षिणी भाषेत पुस्तके प्रकाशित करणारी मंडळी, मुंबई (१८४९) महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (पूर्वीची डेक्कन व्हर्नँक्युलर ट्रान्स् लेशन सोसायटी, पुणे) (१८९४) दक्षिणा प्राइझ कमिटी, (१८५१) सहविचारिणी सभा, बडोदे (१८९०) महाराष्ट्र ग्रंथमाला, बडोदे (१८८६) आदी संस्थांनी ग्रंथप्रकाशनास फार मोठा हातभार लावला आहे. १९०० पर्यंत मराठी प्रकाशकांनी २,१९३ग्रंथाचे प्रकाशन केल्याची नोंद आढळते.

मुद्रण आणि प्रकाशन हे दोन्हीही व्यवसाय एकत्र चालवून यशस्वी झालेल्या गेल्याव चालू शतकांतील काही प्रकाशकांमधील रावजी श्रीधर गोंधळेकर (जगत्‌हितेच्छु छापखाना), धार्मिक वाङ्मय प्रसिद्ध करणारे नारो अप्पाजी गोडबोले, आर्यभूषण, चित्रशाळा व केसरी या मुद्रण-प्रकाशन संस्थांचे संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, कथाकल्पतरु आणि कथासरित्‌सागर यांसारखे पौराणिक ग्रंथ लोकप्रिय करणारे दामोदर सावळाराम यंदे, शालेय व महाविद्यालयीन क्रमिकांचे प्रकाशन मोठया प्रमाणावर करणारी कर्नाटक प्रकाशन संस्था व तिचे संचालक मंगेशराव नाडकर्णी,गणेश महादेव आणि कंपनीचे ग.म. वीरकर, ग्रंथप्रकाशन आणि विक्री हा जोडधंदा यशस्वी करणारे पॉप्युलर प्रकाशनाचे गणेश रामराव भटकळ, अल्प किंमतीत धार्मिक व संतवाङ्मय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणारे आणि इंग्रजी, मराठी, हिंदी, कन्नड व गुजराती या पाचही भाषांतून ग्रंथप्रकाशनाची योजना आखणारे केशव भिकाजी ढवळे, अभिजात आणि शाश्वत मोलाचे ग्रंथ प्रकाशित करणारे ह.वि. मोटे या सर्वच प्रकाशकांनी मराठी ग्रंथनिर्मितीचे बहुमोल कार्य केले आहे. आजच्या काळातील (१९६० नंतर) यशस्वी प्रकाशक म्हणून कोश, संदर्भग्रंथ व वैचारिक ग्रंथ ध्येयनिष्ठेने प्रकाशित करणारे पुण्याच्या व्हीनस प्रकाशनचे स.कृ. पाध्ये कथा-कादंबऱ्या, विद्यापीठ-महाविद्यालयीन क्रमिके व वैचारिक ग्रंथ प्रकाशित करणारे काँटिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी सुविचार प्रकाशन मंडळ नागपूरचे श्री. ना. बनहट्टी तसेच धार्मिक ग्रंथ व त्यांच्या जोडीला शब्दकोश प्रसिद्ध करणारे प्रसाद प्रकाशन, पुणे मुलांसाठी वाङ्मय प्रसिद्ध करणारी अमरेन्द्र गाडगीळांची गोकुळ प्रकाशन संस्था, पुणे मॅजेस्टिक प्रकाशन व परचुरे प्रकाशन संस्था, मुंबई यांचा उल्लेख करणेही इष्ट ठरेल. याखेरीज रामभाऊ देशमुख व त्यांची देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी प्रकाशन क्षेत्रात लोकप्रिय लेखकांच्या ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्या काढण्याचा उपक्रम केला तर मौज मुद्रणालय व मौजप्रकाशन या संस्थेने आपल्या सुबक व कलात्मक मुद्रणाने आणि ललित-वैचारिक वाङ्मय प्रकाशनाने शासनाची व जनतेची लोकप्रियता तर मिळवलीच, पण त्याचबरोबर प्रकाशनव्यवसायावर कर्तृत्वाचा ठसा उमटवून मुद्रण आणि प्रकाशन हे केवळ पूरकच नव्हे, तर परस्परपोषकही आहे, असे सिद्ध केले.

प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे स्वरूप :ग्रंथप्रकाशन हे राष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि भौतिक विकासाच्या तसेच परिवर्तनाच्या दृष्टीने एक प्रभावी साधन असल्यामुळे ग्रंथाची जागा रेडिओ, दूरदर्शन किंवा इतर ज्ञानसाधने घेऊ शकणार नाहीत. असे असले तरी लेखक, चिंतक, मुद्रक, वितरक, समीक्षक, ग्रंथालय व सर्वसामान्य वाचक या ग्रंथव्यवहारातील अन्य घटकांवरच ग्रंथप्रकाशनाचे यश अवलंबून असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर (१९६०) महाराष्ट्रातील प्रकाशनव्यवसाय भरभराटीस येईल अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. सर्वसाधारण वाचकाची स्वतः ग्रंथ विकत घेऊन वाचण्यासंबंधीची अनास्था, ग्रंथनिर्मितीचा वाढता खर्च, ग्रंथांचा कमी खप, त्यांमुळे कमी प्रतींची आवृत्ती त्यामुळे अधिक किंमत व जास्त किंमतीमुळे पुन्हा मर्यादित ग्रंथविक्री या दुष्ट च्रक्रात प्रकाशनव्यवसाय सापडलेला आहे. भारतात १९८० मध्ये सु. तेरा हजार ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांत ७,६५५ इंग्रजी २,२२५ हिंदी व १,३६१ मराठी ग्रंथ होते. पैकी ललित साहित्याचे प्रमाण ८० टक्क्याहून अधिक, तर दर्जेदार ग्रंथनिर्मितीचे प्रमाण अल्प होते.


सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ४७% इतके आहे. शिक्षण संस्थांची, विद्यार्थ्यांची संख्याही सतत वाढत आहे. आजच्या राजकीय व सामाजिक अस्थिरतेच्या काळात ललित व ललितेतर, वैचारिक, शास्त्रीय आणि वैज्ञानिक स्वरूपाच्या ग्रंथनिर्मितीची व प्रकाशनाची नितांत आवश्यकता आहे परंतु प्रकाशनव्यवसायाची वाढ त्यामानाने होताना दिसत नाही.

महाराष्ट्रातील प्रकाशने : विविध नमुने

लहानपणापासून वाचनाची गोडी निर्माण करणे, वाचनाभिरुची वाढविणे, ग्रंथसंग्रह करण्यास लोकांना प्रवृत्त करणे, सहकारी संघटनेच्या द्वारा अल्प किंमतीत दर्जेदार ग्रंथ केवळ पुणे-मुंबईसारख्या शहरांतील वाचकांपुरते मर्यादित न राहता ते खेडेगावातील साक्षर वाचकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य होणे आवश्यक आहे. लेखकाला योग्य मोबदला

देऊन ग्रंथ प्रकाशित करणे प्रकाशकाला शक्य झाले पाहिजे. ग्रंथविक्रेत्याला योग्य अडत (कमिशन) मिळून ग्राहक-वाचकाला परवडेल अशा किंमतीत ग्रंथ मिळाला पाहिजे व एकूण ग्रंथव्यवहार नीट चालला पाहिजे,या दृष्टीने त्यांतील सर्व घटक व शासन प्रयत्नशील आहे. काही उल्लेखनीय उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.

वाचक व ग्रंथ यांना एकत्र आणणे, तसेच ग्रंथप्रसार करणे या दृष्टीने डिसेंबर १९७६ मध्ये या वाचकचळवळीस दिनकर गांगल, अरूण टिकेकर, प्र. वा. परांजपे, अशोक जैनप्रभृतींनी प्रारंभ केला. प्रकाशकांकडून अडतीवर पुस्तके घेऊन ती वाचकांना व संस्थासदस्यांना स्वस्तात पुरविणे,ही यामागील मूळ कल्पना,पण पुढे या संस्थेने स्वतःच ग्रंथप्रकाशनास प्रारंभ केला आणि तळागाळातून नवेनवे लेखक पुढे आणले, पारितोषिक विजेत्यांचे सत्कार केले. लेखक-वाचकांचा परिचय,मुलाखती,ग्रंथप्रदर्शने,चर्चा आदी कार्यक्रम योजून वाचक,प्रकाशक,ग्राहक यांना एकत्र आणले. रूची मासिकाव्दारा नवनव्या प्रकाशनांचीमाहितीही वाचकांपर्यंत पोहोचविण्याची योजना केली. १९८३ मध्ये ग्रंथदिंडी,ग्रंथमोर्चा,ग्रंथप्रदर्शने,जत्रा आदी कार्यक्रमांव्दारा ‘ग्रंथाली’ ने ही चळवळ लोकप्रिय केली असून या यात्रेत सु. दी डशे लेखक सहभागी करून घेतले आणि ४० हजार पुस्तकांची विक्रीही केली. यावरून संस्थेच्या यशाची कल्पना येण्यासारखी आहे. फोर्ड फाऊंडेशन या जागतिक संस्थेने ग्रंथाली चळवळीला खेडोपाडी ग्रंथप्रसार करण्यासाठी सात लाखांचे अनुदानही दिले आहे.

लेखक व ग्राहक यांच्या हितसंबंधांना प्राधान्य देऊन मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी ‘साहित्य सहकार संघ मर्यादित’ या संस्थेची स्थापना १९४९ मध्ये होऊन १९५० मध्ये ती नोंदविली गेली. वा. वि. भट, वा. रा. ढवळे इ. प्रकाशकांच्या प्रयत्नाने या सहकारी संस्थेने संस्थासभासदांना रास्त किंमतीत पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम केला. पुढे १९६० साली ग्रंथवितरणासाठी अलिबाग,ठाणे,पुणे,मुंबई व औरंगाबाद येथे विक्रीकें द्रेही उघडली.

रसिक साहित्य संस्थेच्या वतीने सुरू झालेले साहित्य सूची मासिक,तसेच त्या संस्थेच्या वतीने पुण्यातील परचुरे सभागृहात भरवली जाणारी विविध प्रकाशन संस्थांची प्रदर्शने यांमुळे नवीन ग्रंथांची माहिती ग्राहकांना मिळू लागली.

मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेचे लेखक व नवे ग्रंथ यांची माहिती देणारे ललित मासिक तसेच पुणे येथे प्रतिवर्षी होणाऱ्या ‘मॅजेस्टिक गप्पा’, त्याला जोडून मांडलेली ग्रंथप्रदर्शने, त्यातील लेखकांच्या मुलाखती इ. अभिनव कार्यक्रमांमुळे ग्रंथव्यवहारास मोठाच हातभार लागला आहे.

बॉम्बे बुक क्लबच्या बॉम्बे बुक डेपो (१९७३) च्या वतीने १९७६ पासून प्रसिद्ध होणारे पुस्तक पंढरी हे मासिक व सभासदांना प्रतिवर्षी वर्गणीतून मिळणारा ग्रंथ,तसेच ‘माझा ग्रंथसंग्रह’ (माग्रस) नागपूर या संस्थेची अल्प किंमतीत सभासदांना ग्रंथ मिळवून देण्याची योजना, यांचा उल्लेख करणे जरूर आहे.

जगातील उत्तमोत्तम ग्रंथांचा परिचय व्हावा म्हणून भारतीय भाषांतून ग्रंथ प्रसिद्ध करणारी ⟶ साहित्य अकादेमी,दिल्ली (शाखा मुंबई) ही संस्था आणि सर्वसाधारण वाचकाला ग्रंथाविषयी प्रेम निर्माण व्हावे, पुस्तके विकत घेऊन वाचली जावीत,यांसाठी स्थानिक व प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवर ग्रंथप्रदर्शने व चर्चासत्रे आयोजित करून लेखक-वाचक संवाद घडवून आणणारी⟶ नॅशनल बुक ट्रस्ट,दिल्ली (शाखा मुंबई) आणि मराठीतील उत्कृष्ट वाङ्-मयनिर्मितीला उत्तेजन देण्यासाठी ग्रंथप्रकाशनाला अनुदान देणारे ⟶ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ,मुंबई,मराठी विश्वकोश तयार करणारे ⟶महाराष्ट्र राज्य मराठी विश्व-कोश निर्मिति मंडळ,मुंबई,या संस्था आणि मराठी वाङ्-मयात प्रतिवर्षी   प्रसिद्ध होणाऱ्या विविध प्रकारांतील ग्रंथांना पारितोषिके देणारी महाराष्ट्र शासनाची योजना,पुणे विद्यापीठ,महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे विदर्भ साहित्य संघ विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर (१९३३) शालेय,विद्यालयीन आणि महाविद्यालयीन क्रमिक पुस्तकनिर्मितीस वाहून घेतलेले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे मराठवाडा साहित्य परिषद,औरंगाबाद आणि महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ,नागपूर (१९७०) अशा वीस-पंचवीस संस्थांचा उल्लेख मराठी प्रकाशनास उत्तेजन देणाऱ्या संस्था म्हणून करणे योग्य ठरेल. दिल्ली येथील ‘राजा राममोहन रॉय नॅशनल एज्युकेशन रीसोर्सेस सेंटर’ (१९७२) या संस्थेच्या वतीनेही प्रादेशिक भाषांतून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांच्या प्रती विकत घेण्यात येतात व त्या शासकीय ग्रंथालयांना दिल्या जातात. या उपक्रमानेही महाराष्ट्रातील ग्रंथप्रसारास फार मोठा हातभार लावला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील ग्रंथव्यवहार सुरळीत चालावा म्हणून प्रकाशक,ग्रंथपाल,ग्रंथविक्रेते,ग्राहक आदींच्या सहकार्याने १९८० मध्ये ‘मराठी ग्रंथ-व्यवहार परिषद’ या नावाची संस्था स्थापन झाली असून या संस्थेच्या वतीने आतापर्यंत कार्ले,ठाणे,वणी (जि. यवतमाळ) व खोपोली या ठिकाणी परिषदा  भरविण्यात आल्या आहेत व त्यांचे या क्षेत्रातील कार्यही चालू आहे. [⟶ ग्रंथ ग्रंथप्रकाशन ग्रंथवेष्टन पुस्तक-बांधणी].

                   पेठे. म. प.

संदर्भ :

1. Priolkar, A. K. The Printing Press in India, Bombay, 1958.

२. कुलकर्णी. पु. बा. निर्णयसागरची अक्षर साधना : शेठजावजी दादाजी ह्यांचे चरित्र, मुंबई, १९६७.

३. तुळपुळे,शं.गो. मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल,पुणे, १९७४.

४. नाईक, बापूराव,भारतीय ग्रंथमुद्रण, पुणे, १९८०. ५.लिमये, अ. ह.मराठी प्रकाशनाचे स्वरूप, प्रेरणा व परंपरा,पुणे, १९७२.