वृत्तपत्रसृष्टी : महाराष्ट्रात आधुनिक स्वरूपाचे ‘वृत्तपत्र’ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी अवतरले असले, तरी त्याचा पाया ऐतिहासिक बखरी आणि पत्रव्यवहार यांनी घातला होता. हिंदुस्थानात विल्यम कॅरी व अन्य मिशनऱ्यांनी मुद्रणालय स्थापन केल्यानंतर त्यांच्या वृत्तपत्रांच्या अनुकरणाने प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर सु. ५० वर्षांनी महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा जन्म झाला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर या मराठी वर्तमानपत्रांचा उल्लेख महाराष्ट्रातील पहिली वृत्तपत्रे म्हणून आतापर्यंत होत होता परंतु त्र्यं. शं. शेजवलकर व अ. का. प्रियोळकर यांच्या नव्या संशोधनानंतर हा मान आता मुंबापुर वर्तमान याकडे जातो. रविवार २० जुलै १८२८ रोजी ते प्रसिद्ध झाले. मात्र या वृत्तपत्राचा 

एकही अंक अद्यापि उपलब्ध नाही. यानंतर दर्पण हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यातला अर्धा मजकूर इंग्रजी, तर अर्धा मराठी असे. जाति-धर्मविषयक वादविवादाबरोबरच पृथ्वी, ग्रहणे, वाफेचे यंत्र, ग्रहगोल, तारे या लोकांना उपयुक्त ठरणाऱ्या शास्त्रीय विषयांची माहितीही यात प्रसिद्ध होत असे. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालविलेल्या ज्ञानोदय या पाक्षिकाचा प्रारंभ १८४१ मध्ये झाला. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराबरोबरच हिंदुधर्माच्या कुचेष्टेचाही त्यात प्रयत्न करण्यात येई. याची प्रतिक्रिया म्हणून हिंदुधर्माभिमान्यांची वृत्तपत्रे निघाली.  


दर्पणच्या मागोमाग प्रभाकर (१८४१) या वृत्तपत्राने राजकीय व सामाजिक विचार-जागृतीचे कार्य सुरू केले. भाऊ महाजन यांनी सुरू केलेल्या या वृत्तपत्रातून लोकहितवादी तथा गो. ह. देशमुख यांनी लिहिलेल्या शतपत्रामुळे आधुनिक विचारांची महाराष्ट्राला ओळख झाली.  

 

‘थंड गोळ्यासारख्या होऊन पडलेल्या’ या महाराष्ट्रात नवविचारांचे चलनवलन निर्माण करण्याचे कार्य वृत्तपत्रसृष्टीच्या १९८० पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात झाले. ज्ञानप्रसार आणि विचारजागृती हे वृत्तपत्रांचे ध्येय होते. त्याकाळी निघालेल्या बहुतेक वृत्तपत्रांची नावेसुद्धा ज्ञान व विद्या यांच्याशी संबंधित अशीच होती. या वृत्तपत्रांमध्ये ज्ञानप्रसाराबरोबर सुधारणेचा प्रवाह बळावला. ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीही वृत्तपत्राद्वारे येथील धर्मावर टीका करणे सुरू करून लोकांना धार्मिक सुधारणांची जाणीव करून दिली. त्यास प्रत्युत्तर द्यावे म्हणूनही काही वृत्तपत्रे व नियतकालिके निघाली. त्यांच्या दर्शनी पानावर अग्रलेखवजा मजकूर विस्ताराने असे. पत्रव्यवहारांच्या सदरातून सामाजिक व धार्मिक मतांची चर्चा चाले. संकलित वृत्त आणि स्फुटेही असत. त्यांची भाषा इंग्रजीच्या प्रभावामुळे व प्राचीन मराठी गद्याचा दुवा खंडित झाल्यामुळे ओबडधोबड होती परंतु पुढच्या काळात मात्र तिला अभिजात स्वरूप प्राप्त झाले.  

मराठीतील पहिले व शंभर वर्षांहून अधिक काळ टिकलेले दैनिक वृत्तपत्र म्हणजे ज्ञानप्रकाश होय (१२ फेब्रुवारी १८४९). छापखाने म्हणजे सुधारणेचे द्वार आहे, असे ब्रीद घेऊन जन्मलेल्या या वृत्तपत्राने शंभर वर्षांच्या आपल्या काळात बरीच स्थित्यंतरे पाहिली. त्या काळी ‘मवाळांचे वृत्तपत्र’ म्हणून त्याकडे पाहिले जाई परंतु आधुनिक वृत्तपत्र-व्यवसायाच्या सर्व खुणा या वृत्तपत्रात सापडतात. हवामान, बाजारभाव, सरकारी नेमणुका, घात-अपघाताच्या बातम्या, सत्कार व गौ रवाचे वृत्त, स्थानिक तक्रारी, सरकारी नोकरांवरील टि कात्मक मजकूर, परदेशी व देशी वृत्त. इ. विविध प्रकारचा मजकूर त्यांत येत असे. लोकमान्य टिळकांच्या मुंबईत चाललेल्या खटल्याची बातमी दूरध्वनीवरून घेऊन तातडीने देण्याची तत्परता ज्ञानप्रकाशनेच दाखविली होती. काव्यशास्त्रविनोदाचे सदर सुरू करून सांस्कृतिक घटना व घडामोडींचा परामर्श तसेच नाटयसमीक्षणे देण्याचा उपक्रम, स्त्रियांचे प्रश्न, शेती, सहकार वगैरे विषयांवर साद्यंत व इत्थंभूत माहिती देण्याची पद्धती अशा ज्ञानप्रकाशच्या अनेक बाबींचे पुढे मराठी वृत्तपत्रव्यवसायात अनुकरण करण्यात आले.  

महाराष्ट्रात राजकीय जागृती करण्याची कामगिरी केसरी या पत्राने केली (१८८१). चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर व त्यांचे इतर सहकारी यांनी वृत्तपत्र हे देशसेवेचे साधन मानले. राष्ट्रवादाची प्रेरणा, स्वधर्म व स्वभाषा इत्यादींविषयींचा अभिमान आणि स्वदेशीय विरोधक व परकीय सरकार यांचे सतत खंडन ही केसरीची वैशिष्ट् ये होती. आगरकरांचे सुधारक १८८७ पासून सुरू झाले. राजकीय हक्कांप्रमाणेच, सामाजिक सुधारणांना महत् व देऊन आधुनिक समाजनिर्मितीसाठी ते झटले. सुधारक वृत्तपत्राने वाचकांना बुद्धिप्रामाण्यवादाची ओळख करून दिली आणि खरा धर्म सांगून त्यांची बहुश्रुतता  वाढविली तर विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी समाजातील न्यूनगंडावर प्रहार करणारे लेखन आपल्या निबंधमालेतून (१८७४) केले. मुंबईत निघालेल्या इन्दुप्रकाश (१८६२) या दैनिकानेही महत्त्वाची कामगिरी केली. तसेच याच काळातील विचार लहरी, वि.ना मंडलिकांचे नेटिव्ह ओपिनियन, वृत्तवैभव, मित्रोदय, सत्शोधक आदी वृत्तपत्रे उल्लेखनीय आहेत. १८५० ते १९२० पर्यंतच्या काळात वृत्तपत्रांनी तत्कालीन समाज-जीवनातील चालीरीतींच्या अनेक विषयांवर वाद रंगविले. स्त्री-पुरुषांच्या पेहरावापासून तर धार्मिक आणि जटिल तात्त्विक प्रश्नांपर्यंत नानाविध विषयांवर वृत्तपत्रांत लेख येत असत. सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकांचे बौद्धिक भरणपोषण या वृत्तपत्रांनी केले. वृत्तपत्राद्वारे समाजातील सर्व वर्गात जागृती करण्याची नवी दृष्टी आली. स्त्रियांच्या, दलितांच्या, बहुजनसमाजाच्या उद्धाराची जाणीव निर्माण झाली. कामगारांसाठी वृत्तपत्रे निघाली, तशीच शेतकऱ्यांचे कैवारी ठरणारीही वृत्तपत्रे सुरू झाली. महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रेरणेने दीनबंधू (१८७३) या पत्राने महाराष्ट्रातील बहुजन समाजात नवी जागृती निर्माण केली, तर नंतरच्या काळात कैवारी, विजयी मराठा यांनीही हे कार्य साधले. तत्कालीन वृत्तपत्रांत सामाजिक चळवळींचे    प्रतिबिंब पडल्याशिवाय राहिले नाही. या वृत्तपत्रांचे स्वरूप प्रामुख्याने गंभीर असले, तरी ‘गोल्या घुबड’, ‘छिचोरे’ यांसारख्या टोपण नावांनी उपहासगर्भ, विनोदी व बोचरी पत्रेही वाचकांच्या स्तंभांतून येत. हिन्दु पंच (१९०९) यासारख्या वृत्तपत्राने व्यंगचित्रांच्या द्वारा प्रचलित घडामोडींवर मार्मिक टीका करण्याचा पहिला प्रयत्न केला. वाङ्मयविषयक चळवळी आणि वाङ्मयप्रकारांच्या वृद्धीसही वृत्तपत्रांनी या काळात हातभार लावला. भाला (१९०५) व मुमुक्षु पाक्षिक (१९०७) ही तत्त्वज्ञान व धर्मविषयक मतपत्रे होती, तर देशसेवक (१९०७) व राष्ट्रमत (१९०८) ही राष्ट्रीय वृत्तीची वृत्तपत्रे होती. विदर्भातील पहिले वृत्तपत्र वऱ्हाड समाचार (१८६७) आणि त्यानंतरचे वैदर्भ (१८७०) ही अकोल्याहून प्रकाशित होणारी आणि नागपूरचे सेंट्रल प्रॉव्हिन्सेस न्यूज हे त्रैभाषिक व १८८५ पासून काही काळ चालणारे मराठी हे कृ.ना. करमरकरसंपादित शिळाप्रेसवरील वृत्तपत्र इ. उल्लेखनीय ठरतात. 

मराठी वृत्तपत्रांत इंग्रजी वृत्त्पत्रांवरून वर्तमानसार व बातम्या देण्यात येत परंतु बातम्यांपेक्षा विचारप्रगटीकरण आणि ज्ञानप्रसार हेच वृत्तपत्रांचे प्रारंभीच्या कालखंडातील कार्य होते. अच्युत बळवंत कोल्हटकरांचा संदेश (१९१८) सुरू झाल्यानंतर वृत्तपत्रसृष्टीला नवे वळण मिळाले. महायुद्धाचे वातावरण असल्याने व ‘युद्धस्यकथा रम्या’ ऐकण्याची लोकांची उत्सुकता वाढलेली असल्यामुळे वृत्तपत्रांचे स्वरूप वृत्ताकडे अधिक झुकू लागले. गंभीर व जड मजकुराऐवजी रंजकप्रधान मजकूर देण्याकडे वृत्तपत्रांचा कल वाढला. पूर्वी शि.म. परांजपे यांच्या काळ (१८९८) या वृत्तपत्रातील वक्रोक्तिपूर्ण लेखनाने भाषेला एक नवे लेणे दिले होते परंतु आता ढंगदार, विनोदप्रचुर व रंजक शैलीची सदरे वृत्तपत्रांतून येऊ लागली. ‘बेटा गुलाबच्या कथा’, ‘वत्सला वहिनींची पत्रे’ इ. सदरे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येतील. खास वार्ताहर पाठवून शब्दशः वृत्तांत मिळविण्याची प्रथा सुरू झाली. क्रिकेटसारख्या खेळांचे वर्णन वृत्तपत्रात येऊ लागले. अग्रलेखाची भारदस्त शीर्षके जाऊन त्यांऐवजी चित्तवेधक शीर्षके आली.  

सामान्य मराठी माणसांत वृत्तपत्र लोकप्रिय करण्याचा पुढचा टप्पा सकाळ (पुणे) वृत्तपत्र सुरू करून ना. भि. परुळेकर यांनी गाठला (१९३१). छोटया जाहिराती देण्याची पद्धत, शेती व शेतकरी यांचे वृत्त, बलुतेदारांच्या व्यवसायांविषयी माहिती, छायाचित्रांचा वापर इ. अनेक प्रकाराने सकाळ समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्रिक्राळ (पुणे), लोकशक्ती (पुणे), भारत (पुणे),नवशक्ती, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स (तीनही मुंबई) तरुण भारत (नागपूर व पुणे) इ. दैनिकांनीही समाजजागृतीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईचा लोकमान्य (१९२१), नवाकाळ (१९२३) व प्रभात (१९२९) या वृत्तपत्रांनी राष्ट्रीय प्रचारकार्याचा जोर धरला होता. राजकीय चळवळींना महत्त् व आल्याने समाजजीवन व सुधारणाविषयक उद्देश बाजूला पडले तथापि आंबेडकर यांच्या मूकनायकबहिःष्कृ भारत या मुंबईच्या वृत्तपत्रांनी दलितांचे प्रबोधन केले. 

पवार, सुधाकर.  

विदर्भातील वृत्तपत्रे : शिक्षणाच्या वाढत्या प्रसाराबरोबर विदर्भातही वृत्तपत्रांची संख्या वाढू लागली. १९०२ च्या सुमारास टीकाका नावाचे एक साप्ताहिक निघाले होते. त्याचे वैशिष्टय व्यंगचित्रे देणे हेच होते, तर देशसेवक (नागपूर-१९०७) या वृत्तपत्राने एक तेजस्वी परंपरा सुरू केली. त्याचे संपादक अच्युतराव कोल्हटकर हे होते. पुढे गोपाळराव ओगले झाले परंतु पुढे ओगल्यांनी १४ जानेवारी १९१४ मध्ये महाराष्ट्रनामक (नागपूर) नवीन साप्ताहिक सुरू केले. त्याला विदर्भात त्याकाळी केसरीची प्रतिष्ठा लाभली होती. त्यानंतर द्विसाप्ताहिकात (१९२९) व पुढे दैनिकात त्याचे रूपांतर करण्यात आले (१९४७). त्यावेळी त्याचे संपादक पुरुषोत्तम दिवाकर ढवळे होते. पुढे महाराष्ट्र १९७५ पासून तेथील कामगारांनी सहकारी तत्त्वावर चालविण्यास घेतले असले तरी ते बंद पडले आहे. याखेरीज वर्धा येथून सुमती. अमरावती येथून ना.रा. बामणगावकरसंपादित उदय व वीर वामनराव जोशीसंपादित स्वतंत्र हिंदुस्थान (१९२३) आणि नागपूरहून ना.भा.खरे यांचा तरुण भारत अशी अनेक वृत्तपत्रे निघू लागली. त्यांतील उदय दीर्घायुषी ठरले, तर तरुण भारताचे पुनरुज्जीवन ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४४ साली केले. पुढे ते नरकेसरी प्रकाशन संस्थेला विकले. त्यांच्यानंतर मा. गो.वैद्य व सध्या  दि. मा. घुमरे हे त्याचे संपादक आहेत. तरुण भारत हे विदर्भातील एक अग्रगण्य वृत्तपत्र मानले जाते. जनजागरणाचे काम तर त्याने केलेच, पण लोका भिरुची विकसित करण्याची जबाबदारीही पार पाडली.  

 

नागपूरप्रमाणेच यवतमाळचे लोकनायक बापूजी अणेसंपादित लोकमत साप्ताहिक (४ एप्रिल १९१९-जून १९३०-३२) आणि अकोल्याचे मातृभूमि (१९३१) तसेच शिवशक्ती (१९६०) या वृत्तपत्रांनीही लोकमत तयार करण्याची बाजू चांगली सांभाळली. लोकमत पुढे जवाहरलाल दर्डा यांनी नागपूरला आणले व १५ डिसेंबर १९७१ मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर केले. सध्या ते आघाडीवर असून त्याच्या जळगाव व औरंगाबाद येथूनही आवृत्त्या निघतात. याखेरीज चांडक यांचे महासागर (नागपूर-१९७१) आणि अनंतराव शेवडे यांची नागपूर पत्रिका (नागपूर -१९७०) या वृत्तपत्रांनीही वैदर्भीय वृत्तपत्रसृष्टीला फुलविण्याचे काम सुरू ठेवले आहे.

धारप, कमलाकर. 

मराठवाड्यातील वृत्तपत्रे : मराठवाडयातील वृत्तपत्रांचा इतिहास मराठवाडामुक्तिसंग्रामाशी निगडित आहे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात १८६४ मध्ये इंग्रजी व १८९७ मध्ये उर्दू वृत्तपत्रे जन्माला आली. त्यांपैकी निजाम वैभव (१८९७), भाग्येषू विजय (१९६०) व निजाम विजय ही या संदर्भात उल्लेखनीय ठरतात तथापि मराठवाडयातील आद्य मराठी वृत्तपत्र म्हणून मात्र रंगाबाद समाचार (१८८४) याच वृत्तपत्राचा नामनिर्देश करण्यात येतो. यातील अर्धा मजकूर मराठी व अर्धा उर्दूत असे.  

त्यानंतरच्या काळात गाजलेले वृत्तपत्र म्हणजे मराठवाडा (औरंगाबाद) होय. १० फेब्रुवारी १९३८ मध्ये आनंद कृष्ण वाघमारे या झुंझार सामाजिक कार्यकर्त्याने ते साप्ताहिकाच्या स्वरूपात सुरू केले परंतु त्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हा पुण्याहून निरनिराळ्या  अकरा नावांनी प्रकाशित करून ते संस्थानात पाठविण्यात येऊ लागले. पुढे मराठवाडामुक्तीनंतर त्याचे रूपांतर द्विसाप्ताहिकात झाले, तर १४ ऑगस्ट १९६५ पासून दैनिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. वाघमारे यांच्यानंतर अनंत भालेराव यांनी त्याच्या संपादकत्वाची धुरा समर्थपणे सांभाळली.  

पुढे स्वातंत्र्योत्तर काळात इतर अनेक वृत्तपत्रांची भर पडून मराठवाडयातील वृत्तपत्रसृष्टी जिल्हापातळीवर जाऊन पोहोचली. विशेषतः द.वा. पोतनीस यांच्या संपादनाखालील औरंगाबादवरून प्रकाशित होणाऱ्या जिंठा  या दैनिकाकडे त्याचे श्रेय जाते. जिल्हा पातळीवर पत्रमहर्षी ज.प.मुळे यांचे कार्य भरघोस असून त्यांच्या पंचशीलरामराज्य या साप्ताहिकांनी पंचवीस वर्षाहूनही अधिक काळ मराठवाडयातील स्वातंत्र्य चळवळीचा जोम कायम ठेवला, तर औरंगाबादच्या लोकविजय या दैनिकाद्वारे रांजणीकरांनी आणि नांदेडच्या गोदातीर समाचारद्वारे रसाळ यांनीही त्या चळवळीचा पाठपुरावा केला. याशिवाय बीडचे वृत्तपत्र पंचनामा, बीड समाचार, चंपावती पत्र,झुंझार नेता आणि लातूरचे राजधर्म, यशवंतसिद्धेश्व समाचार, लातू समाचार, नांदेडचे जनक्रांती, परभणीचे प्रतोद, उस्मानाबादचे धाराशिव समाचार  इ. नियतकालिके आपापल्या वैशिष्ट्याने लोकप्रिय झाली आहेत. त्यातही ग्रामीण बोलीभाषेतील नियतकालिक म्हणून भूमिसेवक साप्ताहिक व खास वैशिष्ट्य पूर्ण सदरासाठी संघर्ष  हे साप्ताहिक लोकप्रिय ठरले. याशिवाय मराठवाड्यात उर्दू व दलित पत्रकारिताही बरीच रुजली, फोफावली आहे.

वृत्तपत्रांचे स्वरूप : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे मराठी वाचकांत उत्सुकता निर्माण होऊन दैनिकांच्या वाढीस साहाय्य झाले. १९५६ मध्ये आचार्य अत्रे यांनी मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यास या चळवळीच्या काळात चांगलीच लोकप्रियता लाभली. त्यांचे अग्रलेख व जाहीर सभावृत्तांत देण्याची पद्धती यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. त्यांच्या पश्चात ते वृत्तपत्र बंद पडले. तसेच मुंबईचे लोकमान्य  हे वृत्तपत्रही बंद पडले.

ब्रिटिश अमदानीत सरकार-विरोधात राष्ट्रीय जागृतीसाठी वृत्तपत्रांनी ध्येयनिष्ठेनेकार्य केले परंतु त्याचा परिणाम म्हणून त्यांस सरकारने कधी जप्ती, कधी अमानत रक्कम मागणे, तर कधी संपादकास तुरुंगवास अशा प्रकारे जाच केला. लोकमान्य टिळक-आगरकरांना १८८२ मध्ये बदनामीच्या खटल्यात शिक्षा झाली व नंतरही कारावास घडला. अनेक पत्रकारांना कारावास भोगावा लागला. १९१० च्या वृत्तपत्र अध्यादेशा (प्रेसॲक्ट) मुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडली. त्यानंतर १९३० च्या वृत्तपत्र अध्यादेशामुळे अनेकांना अनामत रक्कम भरणे भाग पडले. जी वृत्तपत्रे भरू शकली नाहीत ती बंद पडली. स्वातंत्र्योत्तर काळातही वृत्तपत्रांना सरकारला तोंड द्यावे लागले. औरंगाबादच्या मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या एक मंत्र्याने भरलेल्या खटल्यात भालेराव यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात प्रसिद्धिपूर्व नियंत्रणे आली. विधिमंडळांच्या हक्कभंग प्रकरणी मराठा, सोबत, सकाळ, लोकमत  इ. वृत्तपत्रांची प्रकरणे महाराष्ट्रात गाजली.

वृत्तपत्रसृष्टीत दैनिकांचे स्वरूप बदलल्यामुळे महायुद्धोत्तर काळात साप्ताहिकांचाही एक जमाना होता. विविधवृत्त, चित्रा, मौज, नवयुग, धनुर्धारी, आलमगीर, निर्भिड इ. साप्ताहिके लोकप्रिय होती. त्यांमधून प्रामुख्याने साहित्यविषयक वाद रंगविण्याची रंगभूमीवरील अभिनेते व अभिनेत्री यांच्याविषयी माहिती देण्याची आणि परदेशांतील घडामोडींसंबंधी खुसखुशीत व रंजक, तर काही वेळा स्फोटक मजकूर प्रसिद्ध करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली परंतु १९६० च्या सुमारास दैनिकांनी रविवारच्या पुरवण्या काढण्यास सुरुवात केल्यानंतर  भराभर ही साप्ताहिके बंद पडत गेली आणि साप्ताहिकांचा जमाना संपुष्टात आल्यासारखे झाले. मराठी मासिकांवरही त्याचा परिणाम झाल्यावाचून राहिला नाही. मात्र त्यानंतर १९८० च्या सुमारास पुन्हा साप्ताहिकांची संख्या वाढीस लागली. विशेषतः चित्रपट, नाटक, कला-क्रिडा, राजकारण आणि समाजकारण या विषयांना वाहिलेल्या साप्ताहिकांना चांगलीच लोकप्रियता लाभली. त्या दृष्टीने मराठीतील विविधवृत्त, नवयुग, मौज ही जुनी व सोब, विवेक, साधना, माणूस आणि इंग्रजीत इलस्ट्रेटेड वीकली ही  नव्या काळातील साप्ताहिके लोकप्रिय झाली. रंगीत आणि प्रतिरूप (ऑफसेट) छपाईमुळे या साप्ताहिकांच्या स्वरूपातही आकर्षकपणा तसेच विविधता आली. बहुधा १९६० ते १९७० या दशकात पश्चिम महाराष्ट्र-विदर्भ-मराठवाडा या प्रदेशांत नव्या दैनिकांचा उदय झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणी दैनिके निघाली व काही जुन्या साप्ताहिकांचे दैनिकांत रूपांतर झाले. त्यांपैकी काही वृत्तपत्रे दूरमुद्रक (टेलिप्रिंटर) वापरून वाचकांची ताज्या बातम्यांविषयीची भूक भागवू लागली.


अन्य भाषिक वृत्तपत्रे : महाराष्ट्रात मराठीखेरीज इंग्रजी, उर्दू, गुजराती व हिंदी वृत्तपत्रेही निघतात. द टाइम्स ऑफ इडिया हे इंग्रजी वृत्तपत्र १८३८ मध्ये बॉम्बे टाइम्स या नावाने सुरू झाले. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत या वृत्तपत्रात संपादकीय काम करणारी इंग्रज मंडळी असत. पुढे या वृत्तपत्रांची मालकी देशी मंडळीकडे आल्यावरच एतद्देशीयांचा त्याच्या संपादकवर्गात समावेश झाला. याच संस्थेने हिंदीमधून नवभारत टाइम्स सुरू केले. त्याचप्रमाणे द इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्स्‌प्रेस, इंडियन एक्स्प्रेस अशी काही इंग्रजी वृत्तपत्रेही व्यापारी मंडळीच्या गोटातून प्रसुत होऊ लागली. विदर्भ हा बहुभाषिक विभाग असल्याने येथे अन्य भाषिक वृत्तपत्रे रुजली व फोफावली. माधवराव सप्रे यांनी नागपूरहून १३ जुलै १९०७ रोजी हिन्दी-केसरी सुरू केले तर सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे द हितवाद हे इंग्रजी दैनिक १९११ साली सुरू झाले. ए.डी मणी हे त्यांचे संपादक होते. पुढे ते प्रोग्रेसिव्ह रायटर्स ॲन्ड पब्लिशर्सने चालवायला घेतले. तसेच १९३९ साली अ. गो. शेवडे यांनी नवसमाज ट्रस्टची स्थापना करून १९३९ साली नागपूर टाइम्स हे इंग्रजी दैनिक सुरू केले. १८२२ मध्ये स्थापन झालेले मुंबई-समाचार हे गुजराती वृत्तपत्र सर्वांत जुने होय. त्यांनतर मुंबईत वृत्तपत्रे निघू लागली. उर्दू वृत्तपत्रेही मुंबई, औरंगाबाद, मालेगाव या ठिकाणांहून प्रकाशित होऊ लागली तर नागपूर येथे १९३८ साली नवभारत आणि १९५१ साली युगधर्म ही हिंदी दैनिके सुरू झाली.

महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्रव्यवसायाशी संबंधित अशा काही पुढील संघटना आहेत : (१) मराठी पत्रकार परिषद, (२) अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघटना, (३) अखिल भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटना (४) अखिल भारतीय लघु व मध्यम वृत्तपत्र संघ आणि (५) ग्रामीण व जिल्हा पत्रकार संघटना.

तसेच वृत्तपत्रव्यवसाय-शिक्षण खालील ठिकाणी दिले जाते :पदवी (बी.जे) अभ्यासक्रम-पुणे, नागपूर व औरंगाबाद. प्रमाणपत्र अभ्यासक्रम-मुंबई व कोल्हापूर.

वृत्तपत्रांची संख्या व खप दर्शविणारी आकडेवारी : महाराष्ट्रातील एकूण वृत्तपत्रे – २,१६९ त्यांचा एकूण खप -७९,०५,००० देशातील वृत्तपत्र खपाशी त्यांचे प्रमाण- १९.३ मराठी दैनिकांची संख्या -९५ आणि या दैनिकांचा एकूण खप १८,६१,०००.

दैनिक वृत्तपत्रांच्या खपात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. तसेच देशात सर्वांत अधिक वृत्तपत्रे महाराष्ट्रातच निघतात. 

महाराष्ट्रात निघणारी मराठीखेरीज इतर भाषांतील दैनिके पुढीलप्रमाणे आहेत:(१) इंग्रजी १३, (२) हिंदी ९, (३) गुजराती ६, (४) सिंधी२, (५) उर्दू १२, (६) द्वैभाषिक २, (७) बहुभाषिक १.

महाराष्ट्रामध्ये अधिक खप असणारी दैनिके (१९८२) अशी : (१) द टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई) २,७९,१८२ इंग्रजी (२) लोकसत्ता (मुंबई) १,६८,९३१ मराठी (३)महाराष्ट्र टाइम्स (मुंबई) १,८२,०७३ मराठी (४) बॉम्बे समाचार (मुंबई) १,४१,७५१ गुजराती (५) इंडियन एक्सप्रेस (मुंबई) ८६,३६६ इंग्रजी (६) सकाळ (पुणे) ८७,०८७ मराठी. [⟶नियतकालिके भारत (वृत्तपत्रसृष्टी) वृत्तपत्रे]. 

पवार, सुधाकर

संदर्भ :

1. Natarajan, J. History of Indian Journalism, Delhi, 1955.

2. Parvate, T. V. Marathi Journalism, New Delhi, 1969.

३. कानडे, रा. गो. मराठी नियतकालिकांचा इतिहास(१८३२ ते १९३७), मुंबई, १९३८.

४. जागुष्टे. न. रा. संपा.दैनिक वृत्तकोश, भाग १ व २ रत्नागिरी, १९८३.

५. जोशी, विनायक कृष्ण लेले, रामचंद्र केशव,वृत्तपत्रांचा इतिहास, खंड१ ला(१७८० ते १८००),मुंबई, १९५१.

६. रणपिसे, ए. एस्,दलितांची वृत्तपत्रे(१८८८-१९६२),मुंबई,१९६२.

७. लेले,रा. के. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास,पुणे,१९८५.८. शिंदे,एम्. के. मराठी वृत्तपत्र-व्यवसाय : इतिहास व शास्त्र, मुंबई, १९७७.