भाषा व साहित्य :  महाराष्ट्रात मराठी भाषा प्रामुख्याने बोलली जाते, ही वस्तुस्थिती कमीत कमी आठशे वर्षांची जुनी आहे. त्यापूर्वीच्या प्रागैतिहासिक आणि प्राचीन युगात महाराष्ट्राच्या भूप्रदेशात कोणत्या बोली कोणत्या भागात, कोणत्या काळात बोलल्या जात होत्या ह्याचा साधार इतिहास आज तरी उपलब्ध नाही. मराठी भाषेचे इतर भारतीय-आर्य भाषांशी संबंध तपासता चार गोष्टी निष्पन्न होतात : (१) मराठी बोली क्रमाने वायव्य बाजूला गुजराती बोलीत (उदा., डांगीबद्दलचा वाद) आणि नैऋत्येला कोंकणी बोलीत (उदा., नष्टप्राय चितपावनी बोली) विलीन होतात. भाषिक सीमा धूसर आहेत. (२) उलटपक्षी उत्तरेला राजस्थानी गटातील मालवी, नीमाडी बोली आणि मध्यदेशी (पश्चिम हिंदी) गटातील बुंदेली बोली आणि ईशान्येला कोसली (पूर्व-हिंदी) गटातील छत्तीसगढी बोली ह्यांच्यापासून मराठीच्या बोली स्पष्ट वेगळ्या राहतात. (३) गुजरातीखेरीज मराठीला निकट वाटणाऱ्या भारतीय-आर्य भाषा म्हणजे वायव्य सीमेवरची अहिराणी, नैऋत्य सीमेवरची कोंकणी आणि ईशान्य सीमेवरची हळबी- ह्या तिघींचे मराठीशी भाषेतिहासदृष्टया असलेले संबंध वादग्रस्त आहेत. (४) दीर्घ संपर्कामुळे भारतीय-आर्य भाषांवर एकंदरीतच द्राविड कुलातील भाषांचे परिणाम दिसतात. पण त्यातल्या त्यात मराठीच्या बोलींवर (प्रमाणेतर बोलींवर अधिकच) द्राविड छाया विशेष गडद आहे.

महाराष्ट्रातील लोकांनी आपली अगोदरची द्राविड बोली टाकून एखाद्या भारतीय बोलीचा अंगीकार केला असावा आणि त्यातून मराठीने आकार घेतला असावा, असे अनुमान काढायला जागा आहे. पण ह्यातली भारतीय-आर्य बोली आणि द्राविड बोली ह्या कोणत्या हे आज तरी निश्चित सांगता येणार नाही. (महाराष्ट्री प्राकृतचा महाराष्ट्राशी आणि मराठीशी खास निकटचा संबंध आहे असे वाटत नाही. मराठीवरच्या द्राविड छायेच्या स्वरूपावरून ती कन्नडला की तेलुगूला अधिक जवळ हे सांगता येणार नाही). मराठीच्या भौगोलिक आणि सामाजिक बोलींचे पूर्वीचे चित्र काय होते आणि त्यांपैकी कोणा एका बोलीला प्रमाणबोलीची प्रतिष्ठा केव्हा मिळाली, का आणि प्रमाणेतर बोलींचे पुढे काय होणार ह्या प्रश्नांचा शोध साहित्य (उदा., तुकाराम, रामदास ह्या समकालीनांच्या मराठीची तुलना), इतर भाषिक पुरावा (उदा., शिलालेख, ख्रिस्ती धर्मप्रचाराशी संबंधित लिखाण, स्थानिक वृत्तपत्रे, जुनी व्याकरणे व कोश) आणि भाषाबाह्य घटना (उदा., मुद्रणप्रसार, साक्षरताप्रसार, महाराष्ट्रभर पुण्याच्या केसरीचा प्रसार) ह्यांची छाननी करून घेता येईल. 

मराठी प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलली जात असली, तरी महाराष्ट्राच्या बाहेर सीमांपासून दूरच्या प्रदेशांतही ती आढळते. महाराष्ट्राबाहेर स्थलांतर करणारे मराठी भाषिक काही ठिकाणी मराठी पूर्ण विसरले (उदा., कुरुक्षेत्र, गढवाल येथील मराठी घराणी), काही ठिकाणी अजून तरी बोलतात (उदा., बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर इ. ठिकाणची मराठी घराणी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथले शिवणकाम करणारे काही कारागीर). उलटपक्षी महाराष्ट्रात कोंकणी, गुजराती, राजस्थानी, कच्छी (ही सिंधीच्या जवळची), सिंधी, पंजाबी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, भाषिक स्थायिक झालेले दिसतात. सीमावर्ती प्रदेशातले गुजराती, हिंदी, तेलुगू, कन्नड,कोंकणी भाषिक आणि मुंबई, नागपूर, पुणे ह्या आधुनिक महानगरांतली मिश्र वस्ती ह्यांचा विचार बाजूला ठेवला, तरी मूळ भाषा विसरलेल्या (उदा., हिंदीभाषी किराड, कच्छीभाषी काची, गुजरवाणी, तमिळभाषी द्राविड-ब्राह्मण व मुदलियार, तेलुगूभाषी पद्मसाळी, कन्नडभाषी दिंगबर जैन) आणि मूळ भाषा टिकवणाऱ्या (उदा., गुजरातीभाषी कंजारभाट, मेहतर, बोहरा, मदारी, राजस्थानीभाषी बनिया, वंजारी, कीर, मारवाडी कुंभार, तेलुगूभाषी वडार, कैकाडी, गोल्ल) ह्या जातींजमातींची नोंद घ्यावी लागेल. परदेशातून आलेले म्हणजे गुजरातीभाषी पारशी, जरथुश्त्री व मुस्लिम इराणी, पुश्तूभाषी पठाण, उर्दूभाषी अरब, मराठीभाषी हबशी व बेनेइस्त्रायली हे आहेत.

महाराष्ट्रात केवळ मराठीच बोलली जात नाही, हे ह्यावरून स्पष्ट होईल. शिवाय पुढील गोष्टींची नोंद घ्यावी लागेल. महाराष्ट्रात अँग्लो-इंडियन आणि काही प्रॉटेस्टंट घरी इंग्लिश बोलतात काही मुस्लिम घरी दखनी बोलतात आणि त्यांपैकी काही मुलांना उर्दूमाध्यम शाळांत पाठवतात तापी खोऱ्यातले लेवापाटीदार व इतर गुजरकुणबी अहिराणी बोलतात चंद्रपूरकडचे काही हळबा हळबी बोलतात काही आदिवासी भारतीय-आर्य बोली बोलतात (ठाकूर, महादेव कोळी, कोकणा, धोडिया व इतर भिल्ल, वारली, दुबळा, कातकरी, आंध, फासेपारधी)- ज्यांपैकी काही बोलींचे मराठीप्रमाणेच गुजराती आणि राजस्थानी बोलींशी साम्य दिसते काही आदिवासी मध्य-द्राविड शाखेतल्या बोली बोलतात (माडिया, पर्धान व इतर गोंड, कोलाम) काही आदिवासी ऑस्ट्रो-अशियाई कुलातील बोली बोलतात [कोर्कू व काही नहाल कोरवा बोलतात].  

महाराष्ट्रात संस्कृत, फार्सी, अरबी ह्या विदग्ध भाषांच्या अध्ययनाची परंपरा आहे. 

केळकर, अ. रा. 

१९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात निरनिराळ्या प्रमुख भाषा बोलणाऱ्या लोकांची (व्यक्तींची) संख्या. 
भाषा  लोकसंख्या 
मराठी  ३,८६,१९,२५७
गुजराती  १३,८८,७७३ 
कन्नड ७,७५,३५४ 
तेलुगू ७,६४,२५७ 
उर्दू ३६,६१,८९८ 
हिंदी २५,२८,४२० 
अहिराणी १,५१,६६४ 
हळबी २,०२८ 
कोंकणी २,७७,०४८ 
कोष्टी  
गोंडी ३,८१,८६३ 
कोलामी ५६,४२७ 
कोरकू /कोरवा ८६,२७३ 
नहाली  
* इतर भाषा १७,८८,९७३ 
एकूण लोकसंख्या ५,०४,१२,२३५ 
पैकी
(अ) घटनेच्या ८ व्या अनुसूचीमधील भाषा बोलणारे – 

(ब) ८ व्या अनुसूची व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारे –

४,८८,५३,९८३

१५,५८,२५२ 

* इतर भाषा बोलणारे काही प्रमुख 

सिंधी 

भिली / भिलोदी 

तमिळ 

मलयाळम् 

बंगाली 

पंजाबी 

इंग्रजी 

तुळु 

गोरखाली/नेपाळी

४,३२,०७३

४,४२,२७०

२,३३,९८८

१,८१,८५८

९२,८३६

१,६३,२४७

६९,२४८

३१,९१७

१९,८२८  

महाराष्ट्र आणि कोंकणी भाषा : कोंकणी ही एक संस्कृतोभ्दव भाषा असून तिचा मराठीशी निकटचा संबंध आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या

राज्यांत ती बोलली जाते. ज्यांना आद्य कोंकणी साहित्यिकाचा मान दिला जातो, ते कृष्णदास शामा (१५ वे- १६ वे शतक) यांनी श्रीकृष्णचरित्रकथा (भागवताच्या दशम स्कंधावरील टीका) या मराठी भक्तिकाव्याबरोबरच अश्वमेधुसारखी काही आख्याने कोंकणी भाषेत लिहिली. ही आख्याने त्यांनी प्रथम मराठीतून लिहिली असावीत आणि नंतर त्यांचे कोंकणी भाषांतर करण्यात आले असावे, असेही एक मत आहे. सोळाव्या शतकाच्या आरंभी गोवा जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार आरंभिला धर्मांतरे घडवून आणण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना मराठी व कोंकणी या भाषांची कास धरावी लागली. या दोन्ही भाषांत प्रावीण्य मिळवून त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोमंतकात मुद्रणकलेचा प्रवेश झाल्यामुळे ग्रंथनिर्मितीस उत्तेजन मिळाले. इंग्रज धर्मोपदेशेक ⟶फादर स्टीफन्स याने लिहिलेला क्रिस्तपुराण (१६१६) हा ख्रिस्ती पुराणग्रंथ मराठीत असला, तरी गोमंतकातील सर्वसामान्य श्रोत्यांला ग्रंथाचे आकलन व्हावे म्हणून कोंकणी शब्दांचा वापरही या ग्रंथात केला गेला आहे. ख्रिस्ती धर्मतत्त्वे संक्षेपाने सांगणारी दौत्रिन क्रिस्तां ही कोंकणी प्रश्नोत्तरी फादर स्टीफन्सनेच तयार केली (१६०६ पासून हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध १६२२ मध्ये रोमन लिपीत मुद्रित, १९६५ मध्ये देवनागरी आवृत्ती). फादर स्टीफन्सने आर्ति लिंग्व कानारी हे कोंकणी भाषेचे पहिले व्याकरणही लिहिले (१६१० पासून हस्तलिखित स्वरुपात उपलब्ध : १६४० मध्ये मुद्रित). हे परकीय मिशनऱ्यांच्या उपयोगासाठी असल्यामुळे पोर्तुगीज भाषेत आहे. ⟶पाद्री दियोगु रिबैरू (१५६०-१६३३) याने क्रिस्तावाचे दौक्त्रिनिचो अर्थु हा ग्रंथ लिहिला (१६३२). निरनिराळ्या पाद्र्यांनी कोंकणी भाषेचे शब्द गोळा केले होते त्यांच्यात महत्त्वपूर्ण भर घालून रिबैरूने आपला कानारी कोश (१६२६) तयार केला. हा कोश २६९ पृष्ठांचा असून त्यात आरंभी कोंकणी शब्द देऊन नंतर त्यांचा पोर्तुगीज अर्थ दिलेला आहे. जुन्या ग्रांथिक मराठीतील अनेक शब्द या कोशात आहेत, हे या कोशाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. कोंकणी भाषेतील आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे पाद्री आंतोनिउ द् साल्दान (१५९८-१६६३) याचा  जीवित वृख्याची अमृतां-फळां हा होय (हा छापल्याचे दिसत नाही). या ग्रंथाचा पहिला भाग कोंकणी गद्यात असून दुसरा मराठी पद्यात आहे. साल्दानने ख्रिस्ती संत अँटनी ह्याने केलेले चमत्कार आणि त्याचे चरित्र सांगण्यासाठी दोन ग्रंथ लिहिले (सांतु आंतोनीची अच्छर्यो, १६५१ २ भाग, कोंकणी गद्यात सांतु आंतोनीची जीवित्वकथा, १६५५ मराठी पद्यात).. 


पाद्री जुआंव द पेद्रोझ (१६१५-७२) याने सोलिलॉकियुश दिव्हिनुश या मूळ स्पॅनिश ग्रंथाचे देवांची येकांग्र बोलणी, (१६६०) या नावाने कोंकणी भाषांतर केले. या ग्रंथाच्या शैलीवर जुन्या मराठी कथा-पुराणांचा प्रभाव दिसतो. पाद्री येतियेन द ला क्रुआ (१५७९-१६४३) याने पेद्रुपुराण (१६२९) हा मराठी ग्रंथ लिहिला. त्याने कोंकणीत लेखन केल्याचाही उल्लेख मिळतो. पाद्री मिगेल द आल्मैद (१६०७-८३) याचा वनवाळ्यांचो मळो (५ खंड, १६५८-१६५९) हा ग्रंथ म्हणजे कोंकणी गद्याचा एक उत्कृष्ट नमुना होय. लॅटिन आणि ग्रीक वाक्यरचनांचे आदर्श समोर ठेवून आल्मैद याने कोंकणी गद्याची रचना करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रिबैरूचा कानारी कोश सुधारून वाढविण्याचे कार्यही त्याने केले. सतराव्या शतकाच्या अखेरीस ख्रिस्ती धर्मन्यायपीठाचा (इंक्किझिशन) जोर वाढला. पोर्तुगीज व्हाइसरॉय कोन्दि द् ऑल्हॉर याने खास फर्मान काढून (१६८४) कोंकणी भाषेचे उच्चाटन करण्याचा चंग बांधला. पुढे १७४५ मध्ये आर्चबिशप लोउरेन्सु द सांतमारीय याने गोमंतकातील तमाम ख्रिस्ती धर्मीयांवर पोर्तुगीज बोलण्याची सक्ती केली. अशा दडपशाहीच्या धोरणामुळे कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषांतील ख्रिस्ती धर्मसाहित्याचा ऱ्हास झाला. काही स्फुट धार्मिक गीतांची रचना तेवढी होत राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येलिओदोरू द कुन्य रिव्हार या पोर्तुगीज अधिकाऱ्याने ‘कोंकणी भाषेवरील ऐतिहासिक प्रबंध’ (मराठी शीर्षकार्थ) हा ग्रंथ लिहून कोंकणी भाषेच्या दुःस्थितीकडे सरकारचे आणि गोमंतकीय जनतेचे लक्ष वेधले. कोंकणी भाषेच्या पुनरुत्थानाचे मार्ग त्याने सुचविले तसेच कोंकणी व मराठी ग्रंथांची सूची प्रसिद्ध करून काही ग्रंथांचे पुनर्मुद्रणही त्याने केले. कुन्य रिव्हार याच्या हाकेला उत्तर दिले ⟶माँसिग्नोर सेबाश्तियांव रोदोल्फु दाल्गादु (१८५५-१९२२) यांनी. कोंकणी-पोर्तुगीज शब्दकोश (दिसियोनारियु कोंकानीपुर्तुगेज, १८९३) आणि पोर्तुगीज-कोंकणी शब्दकोश (दिसियोनारियु पुर्तुगज-कोंकानी, १९०४) असे दोन कोश त्यांनी प्रसिद्ध केले आणि कोंकणीच्या अभ्यासाला जोरदार चालना दिली. कोंकणीत घुसलेल्या पोर्तुगीज शब्दांना काढून टाकून मूळ संस्कृतोभ्दव शब्दांची पुनःस्थापना करण्याचा त्यांचा मानस होता. ख्रिस्ती प्रार्थनामंदिरात कोंकणीतून प्रवचने करण्याचा पायंडा त्यांनीच पाडला.  

 

याच सुमारास पुणे येथे येदुआर्दु जुझे ब्रुनु द सोउझ यांनी उदेन्तेचे साळक हे कोंकणी वर्तमानपत्र प्रसिद्ध करून कोंकणी पत्रकारीचा पाया घातला (१८८९). १८९० मध्ये मुंबईत, आगोश्तिनु फेर्नांदिश (१८७१-१९४७) यांनी ‘तियात्र’ हा कोंकणी नाट्यप्रकार सादर करण्यास सुरुवात केली. आधुनिक कोंकणी साहित्याचे अध्वर्यु वामन रघुनाथ वर्दे वालावलीकार ऊर्फ ⟶शणै गोंयबाब (१८७७-१९४६) यांनी आपले साहित्य मुंबईतच लिहिले. कोंकणीच्या पुनरुत्थापनात आणि कोंकणी साहित्याच्या विकासात त्यांचा फार मोठा वाटा आहे. कोंकणी ही एक स्वतंत्र व संपन्न भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले : कोंकणी भाशेचे जैत (१९३०) व्याकरण रचिले : कोंकणिची व्याकरणी बांदावळ (१९४९) कथा लिहिल्या : गोमंतोपनिषत् (२ खंड १९२८, १९३३), नाटके रचिली: मोगाचे लग्न (१९१३), पोवनाचे तपले (१९४८), झिल्बा राणो (१९५०). शणै गोंयबाब यांनी राम कामती व आबे फारिय यांसारख्या काही प्रसिद्ध गोमंतकीयांची चरित्रे लिहिली (१९३९ १९४१). आल्बुकेर्कान गोंय कशै जिखले (१९५५) आणि वलिपत्तनाचो सोद (१९६२) हे त्यांनी लिहिलेले इतिहासग्रंथ. यांखेरीज भगवंताले गीत (१९५९) हे भगवदगीतेचे सोप्या कोंकणीत त्यांनी केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. श्रीधर नायक ह्यांनी ‘बयाभाव’ या टोपणनावाने लिहिलेल्या कोंकणी कविता सडयावेली फुलां (१९४६) या नावाने संग्रहरूप झाल्या आहेत. आधुनिक कोंकणी काव्याची सुरुवात या संग्रहाने होते. रामचंद्र शंकर नायक (१८९३-१९६०) ह्यांनी काही प्रभावी विनोदी एकांकिका लिहिल्या (चवथिचो चंद्र, १९३५ आणि दामू कुराडो, १९४८).

गोव्याच्या स्वातंत्र्यचळवळीत गोव्यातून हद्दपार झालेले गोमंतकीय लेखक मुंबईत येऊन कोंकणी साहित्याची सेवा करू लागले. मराठीतील श्रेष्ठ कवी बा.भ. बोरकर (१९१०-८४) ह्यांनी लिहिलेल्या कोंकणी कविता पांयजणां या नावाने संगृहीत आहेत (१९६०). मनोहरराय सरदेसाय (१९२५– ) ह्यांच्या गोंया तुज्या मोगाखातीर (१९६१) या काव्यसंग्रहात गोव्याच्या सृष्टिसौंदर्याची लोभस वर्णने आढळतात. गोमंतकमुक्तीनंतर कोंकणी साहित्यनिर्मितीला उधाण आले. लक्ष्मणराव सरदेसाय, रवींद्र केळेकार, दामोदर मावझो, शीला कोळंबकार, मीना काकोडकार,पुंडलीक नायक यांनी कोंकणी कथेला आणि निबंधाला आकार व आशय दिला. बा.भ. बोरकर आणि मनोहरराय सरदेसाय ह्यांच्याप्रमाणे पांडुरंग भांगी आणि र.वि. पंडित यांची नावे काव्याच्या संदर्भात उल्लेखनीय होत. दामोदर मावझो यांनी वास्तववादी कोंकणी कादंबरी लिहिली, तर पुंडलीक नायक यांनी नाटके. अ.ना. म्हांब्रो आणि दत्ताराम सुखटणकर हे कोंकणीतील उल्लेखनीय विनोदकार. राजकीय दृष्टया गोमंतक हे वेगळे राज्य असले, तरी कोंकणी भाषिक गोमंतकीयांचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक कोंकणी भाषिक महाराष्ट्रात रहात आहेत आणि मराठीप्रमाणेच कोंकणी साहित्याचेही ते आस्थेवाईक वाचक आहेत. १९७५ मध्ये साहित्य अकादेमीने कोंकणीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली. आज तरुण कोंकणी साहित्यिक गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही कोंकणीतून लेखन करून कोंकणी साहित्याच्या विकासास हातभार लावीत आहेत.

सरदेसाय, मनोहरराय

महाराष्ट्राचे हिंदीला योगदान : हिंदी आणि मराठी या दोन्ही आर्य भाषांत संस्कृत शब्द विपुल असल्यामुळे, तसेच त्यांची लिपी देवनागरी असल्यामुळे या दोन्ही भाषा आणि त्यांचे साहित्य खूपच निकट आले. भारतीय संतांच्या संपर्काची व भारतातील अनेक तीर्थाच्या ठिकाणी व्यवहारात असणारी भाषा हिंदी असल्याने मराठी लेखकांना हिंदीबद्दलविशेष आपलेपणा वाटत आला आहे. अनेक मराठी संतांनी हिंदी काव्यरचना कमीअधिक प्रमाणात केल्याचे दिसते. संत नामदेवांनी रचिलेल्या हिंदी पदांपैकी एकूण ६१ पदे श्रीगुरूग्रंथसाहिब  या शिखांच्या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट केली गेली आहेत. नाथसंप्रदायी व महानुभाव पंथीय ह्यांनीही हिंदीचा वापर कसा केला आहे, हे डॉ. विनय मोहन शर्मा ह्यांच्या हिंदीको मराठी संतोकी देन ह्या प्रबंधावरून दिसून येते. दक्षिणेत बहमनी राज्य होते. त्यामुळे उर्दूच्या प्रभावाने तेथेही हिंदीचे एक रूप -‘दखिनी हिंदी’- निर्माण झाले व त्या हिंदीत अनेक महाराष्ट्रीय कवींनी रचना केली. गोदावरीतीरी राहणारे कवींद्राचार्य सरस्वती (सतरावे शतक) यांनी बनारसला जाऊन तेथे विपुल ग्रंथनिर्मिती केली. कवींद्रकल्पलता, ज्ञानसार आणि समरसार हे त्यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ. 


छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी नायिकाभेद, नावशिख, सातसतक हे हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत. शिवाजी राजांचे सावत्र बंधू एकोजी ह्यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजी राजे ह्यांनी लिहिलेल्या पंचभाषाविलास ह्या नाटकात पाच भाषांचा उपयोग केलेला असून त्यांतील एक भाषा हिंदी आहे. महाराष्ट्रातील शाहीर रामजोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा, सगनभाऊ इ. शाहीरांनीही हिंदी रचना केली आहे. अनेक मराठी कवींनी काव्यरचनेसाठी मराठीनंतर हिंदीचा वापर केला असला, तरी संत नामदेव आणि कवींद्राचार्य सरस्वती ह्यांसारखे काही अपवाद सोडल्यास त्यांच्या मराठी रचनेतील गुणवत्ता त्यांच्या हिंदी रचनेत फारशी आढळत नाही.  

 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध आधुनिक साहित्यप्रकारांत मराठी भाषिकांनी हिंदीतून लेखन केले. पं. केशव वामन पेठे ह्यांनी राष्ट्रभाषा (१८९४) ह्या आपल्या पुस्तकात हिंदीचे महत्त्व सांगितले. काव्याच्या क्षेत्रात ⟶गजानन माधव मुक्तिबोध आणि ⟶प्रभाकर माचवे ही नावे विशेष उल्लेखनीय होत. हिंदी नवकवितेचा प्रस्थानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारसप्तक (१९४३, संपा. वात्स्यायन) या सात कवींच्या काव्यसंग्रहात उपर्युक्त दोन कवींची रचना समाविष्ट आहे. प्रयोगवादी काव्यधारेचा विकास करण्याचे श्रेय प्रभाकर माचवे यांना दिले जाते, तर गजानन मुक्तिबोधांच्या पुरोगामी व समाजोन्मुख काव्याने, तसेच त्यांच्या काव्यविषयक चिंतनाने आधुनिक हिंदी काव्यावर फार मोठा प्रभाव पाडलेला आहे. हिंदी काव्यात स्वतःची प्रतिमा उभी करण्याऱ्या मराठी कवींत वसंत देव यांचे नाव महत्त्वाचे. दिनकर सोनवलकर, अनिलकुमार, मालती परुलकर ही नावेही निर्देशनीय. 

 

दामोदर सप्रे, शंकर शेष आदी सु. तीस नाटककारांनी हिंदी नाट्यलेखन केलेले आहे. अनेक मराठी नाटकांची हिंदीत भाषांतरे झालेली आहेत. विजय तेंडूलकर, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर यांसारख्या मराठी नाटककारांची नावे या संदर्भात सांगता येतील.

मराठी भाषिकांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय अशा हिंदी कादंबरी लेखनात अनंत गोपाळ शेवडेकृत ज्वालामुखी, भग्नमंदिर, निशागीत प्रभाकर माचवे यांच्या तीस-चालीस-पचास, किसलिए गजानन मुक्तीबोध यांची विपात्र ही लघुकादंबरी यांचा समावेश होतो. शंकर बाम, मालती परुलकर यांनीही हिंदी कादंबरीलेखन केले. काठ का सपना हा गजानन मुक्तिबोधांच्या हिंदी कथांचा संग्रह बहुचर्चित ठरला. 

 

आचार्य विनोबा भावे आणि आचार्य काकासाहेब कालेलकर यांचे वैचारिक हिंदी लेखन फारच मोलाचे आहे. माधवराव सप्रे, प्रभाकर माचवे आदी सु. वीस लेखकांनी हिंदीत निबंधलेखन केले आहे.  

 

गजानन मुक्तिबोधांनी हिंदी साहित्यसमीक्षेला वैचारिक दृष्ट्या  प्रगल्भ केले. कामायनी : एक पुनर्विचार या त्यांच्या समीक्षाग्रंथाने हिंदीत एक नवी समीक्षादृष्टी निर्माण केली. नयी कविता का आत्मसंघर्ष तथा अन्य निबंध, नये सा हित्यका सौंदर्यशास्त्र तसेच एक साहित्यिक की डायरी या त्यांच्या साहित्यसैद्धांतिक ग्रंथांनी  हिंदी समीक्षाविचार समृद्ध केला. प्रभाकर माचवे यांच्या समीक्षात्मक लेखनानेही हिंदी समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हिंदीतील समीक्षालेखनाला विद्वन्मान्यता प्राप्त झालेली आहे. भाषां तरे, हिंदी-मराठी साहित्यकृतींचा समीक्षात्मक परिचय घडवणे, हिंदी-मराठी वाङ्मयप्रवृत्तींचा तुलनात्मक आलेख दर्शविणे इ. प्रकारे चंद्रकांत बांदिवडेकरांनी हिंदी-मराठी साहित्यांना जोडण्याच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.  

 

मराठीभाषी पत्रकारांनी हिंदी वृत्तपत्रव्यवसायाच्या संदर्भात अभिमानास्पद सेवा बजावली आहे. गोविंद रघुनाथ थत्तेसंपादित बनारस अखबार आणि दामोदर सप्रेसंपादित बिहारबंधू (१८७४) ही दैनिके उल्लेखनीय आहेत. सखाराम चिमणाजी चिटणीस यांनी शेतकरी अर्थात कृषक हे वैज्ञानिक नियतकालिक अमरावतीहून सुरू केले. वाराणशीच्या ज्ञानमंडल संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या आज या नियतकालिकाचे संपादक ⟶बाबूराव विष्णू पराडकर (१८८३-१९५५) यांना तर हिंदी पत्रकारांमध्ये शीर्षस्थ स्थान दिले जाते. रामकृष्ण रघुनाथ खाडिलकर यांनीही आजचे संपादकत्व यशस्वीपणे केले. अन्य उल्लेखनीय पत्रकारांत भास्कर रामचंद्र भालेराव, राहुल बारपुते, गो.प.नेने यांसारख्यांचा समावेश होतो. ‘महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा’, पुणे ह्या संस्थेतर्फे प्रकशित होणाऱ्या राष्ट्रवाणी ह्या मासिकाने नवसाहित्याला रूप देण्यात मोठा वाटा उचलला. त्याचे संपादक गो.प. नेने होते. ‘राष्ट्रभाषा प्रचारसमिती’. वर्धा या संस्थेचे राष्ट्रवीणा  हे मासिकही उल्लेखनीय. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे निघणाऱ्या महाराष्ट्र मानस या पाक्षिकाने मराठी-हिंदी साहित्यांना जोडण्याचे काम अनेक प्रकारे केले आहे. 

 

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती हिंदीत आणण्याची कामगिरी अनेक मराठी भाषिकांनी पार पाडली आहे. माधवराव सप्रे (गीतारहस्याचा अनुवाद), सि.का.देव (ज्ञानेश्वरीचा अनुवाद), बापूराव कुमठेकर (ज्ञानेश्वरीचा अनुवाद), रामचंद्र रघुनाथे सरवटे (सु. ७० कादंबऱ्या व ३०० लघुकथांचे अनुवाद) यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. विजय बापट, प्रकाश भातंब्रेकर, श्रीनिवास कोचकर, वनमाला भवाळकर, शरद मोझरकर, वसंत देव, चंद्रकांत बांदिवडेकर, माधव मोरोलकर, ग.ना.साठे, मो. ग. तपस्वी, श्रीपाद जोशी, र.वा.बिवलकर आणि मो. दि. पराडकर ही नावेही महत्त्वाची आहेत. 

 

हिंदीच्या प्रचाराचे कार्य महाराष्ट्रात अनेक संस्थांनी केले. ‘राष्ट्रभाषा प्रचार समिती’, वर्धा (स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी भाषाप्रचाराचे कार्य मुख्यत्वे हिनेच केले) ‘बंबई हिंदी विद्यापीठ’ (१९३८) ‘महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा’, पुणे (१९४५), ‘हिंदुस्तानी प्रचारसभा’ (१९३८) यांचेही कार्य महत्त्वाचे आहे. 

बांदिवडेकर, चंद्रकांत

संदर्भ :

1. Ghatage, A. M. A Survey of Marathi Dialects, Vols. I-XII, Bombay, 1963.

2. Governmnet of Maharashtra, Maharashtra State Gazetteers,  Language and Literature, Bombay, 1971.

३. गुप्ते, विलास, आधुनिक हिंदी साहित्य को अहिंदीलेखकोंका योगदान, १९७३.

४. नगेंद्र, संपा. हिंदी साहित्यका बृहत् इतिहास, भाग १५वा, वाराणसी, १९७९.

५. विद्यालंकार, विद्यासागर, संपा. प्रकर अंक जानेवारी-फेब्रुवारी, १९७१.

६. सिद्धेश्वरप्रसाद, विश्वहिंदी, नवी दिल्ली, १९८३.