इतिहास :

प्रागैतिहासिक काळ : (इ. स. पू. सु. १५००००−७००). महाराष्ट्रात प्रागैतिहासिक काळात किंवा अश्मयुगात, मानवाने वस्ती केली होती, याचा पुरावा १९४० सालापर्यंत उपलब्ध झालेला नव्हता. मानवाने महाराष्ट्रात एकदम ऐतिहासिक काळातच प्रथम वस्ती केली, असेच बहुतेक विद्वानांचे मत होते. अर्थात याआधी अश्मयुगीन पुरावा अजिबात उपलब्ध नव्हता असे मात्र नाही. १८६३ साली गोदावरीकाठी मुंगी पैठण येथे अश्मयुगीन मानवाने बनवलेले ॲगेट दगडाचे छिलका-हत्यार सापडले. याच प्रदेशामध्ये रानटी हत्तीच्या अश्मास्थी मिळाल्या. त्यानंतर १९०४ साली नासिक जिल्ह्यातील नांदूर-मदमेश्वर याठिकाणी असेच प्राचीन हत्तीचे अवशेष मिळाले.

महाराष्ट्रातील गिरणा, तापी, वैनगंगा, कृष्णा, प्रवरा, घोड, मुळा इ. निरनिराळ्या नद्यांच्या खोऱ्यांत १९३९ सालापासून गेल्या ४५ वर्षांत प्राचीन अश्मयुगीन हत्यारे सापडलेली आहेत. याशिवाय रानटी हत्ती, रानबैल, गेंडा इत्यादींच्या अश्मास्थीही सापडलेल्या असल्याने प्राचीन अश्मयुगीन काळात महाराष्ट्रात मानवाची वस्ती होती, हे सिद्ध झालेले आहे मात्र इतक्या प्राचीन काळातील मानवाचे अवशेष मात्र सापडलेले नाहीत.

गेल्या २५ वर्षांत पुरातत्त्वज्ञांनी केलेल्या समन्वेषणामुळे अश्मयुगाच्या विविध अवस्थांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे सलग जरी नव्हे, तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील मानवाचा सांस्कृतिक इतिहास मांडता आलेला आहे. अश्मयुगाच्या खालील अवस्था स्पष्ट झालेल्या आहेत :

(१) आद्य वा आदिम पुराणादमयुग−(इ.स.पू. १.५ लाख वर्षांपूर्वी), (२) मध्य पुराणाश्मयुग−(इ.स.पू. १ लाख ते ३० हजार वर्षे), (३) उत्तर पुराणाश्मयुग−(इ.स.पू. ३० हजार ते १० हजार वर्षे), (४) मध्याश्मयुग−(इ.स.पू. १० हजार ते ४ हजार वर्षे) आणि (५) ताम्रपाषाणयुग−(इ.स.पू. ४ हजार ते २७०० वर्षे).

आद्य पुराणाश्मयुग : या काळातील ओबडधोबड दगडी हात-कुऱ्हाडी, फरश्या इ. हत्यारे अनेक ठिकाणी सापडली. ⇨नेपासे (जि. अहमदनगर) येथे केलेल्या उत्खननात या हत्यारांबरोबर रानबैलांचे जीवाश्म सापडले. ही हत्यारे टॅप जातीच्या दगडाची आहेत. त्याकाळी प्रवरा नदी हल्लीच्या पातळीपेक्षा सु. १० ते २० मी. अधिक उंचीवरून वाहात असावी आणि हवामान आजच्यापेक्षा अधिक शुष्क असावे.

मध्य पुराणाश्मयुग : या काळातील हत्यारे महाराष्ट्रात सर्वत्र सापडली आहेत. ती प्रामुख्याने चर्ट जातीच्या दगडाची आहेत. त्यांत हरतऱ्हेच्या तासण्यांचा अंतर्भाव होतो. या काळात प्रवरा, कृष्णा, गोदावरी इ. नद्यांनी भूकंपीय हालचालींमुळे आपली पात्रे खोल करण्यात सुरुवात केली. त्यामुळे त्या हल्लीपेक्षा १५ ते २० मी. खोल खाली वाहात होत्या. पावसाचे प्रमाण त्या काळात २५ ते ३० टक्क्यांनी अधिक होते. हत्ती, रानबैल, गेंडा इ. अनेक जंगली प्राणी या काळात इतस्ततः वावरत होते. मराठवाड्यात आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काठी या काळातील असंख्य जीवाश्म मिळाले आहेत.

उत्तर पुराणाश्मयुग : या काळात गारांची पात्यावर बनविलेली हत्यारे वापरात होती. रानबैल, हत्ती, पाणघोडा, हरिण, सुसर इ. अनेक प्राणी अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील नद्या उथळ पात्रांतून वाहात होत्या. त्यांची पात्रे हल्लीपेक्षा ५ ते १० मी. अधिक उंचीवर होती. हे बहुधा शुष्क हवामानाने झाले असावे, असा भूशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कोकणपट्टीत समुद्रपातळी आतापेक्षा २० ते ३० मी. खाली गेली आणि त्यामुळे मोठा भूप्रदेश अस्तित्वात आला. पुराणात परशुरामाने सुपाने कोकणातील समुद्र मागे हटवून तेथील भूमी वसाहतीस योग्य केली, अशी कथा आहे. तिचे शास्त्रीय स्पष्टीकरण आता देता येते.

मध्याश्मयुग : या काळातील गारांची पात्यांवर बनवलेली हत्यारे महाराष्ट्रात सगळीकडे सापडतात. इनामगाव (जि. पुणे) आणि पाटण (जि. जळगाव) येथे झालेल्या शास्त्रशुद्ध उत्खननांवरून हे दिसून येते. या काळात हवामानात महत्त्वाचा बदल घडून आला. मॉन्सूनचा पाऊस विपुल पडू लागला. पाऊस वाढल्याने नद्यांचे पात्र खोल गेले आणि सु. ७,००० वर्षांपूर्वीपासून त्या हल्लीच्या पातळीवर वाहू लागल्या. त्यांच्या काठावर आज दिसणारी काळी जमीन तयार झाली.

ताम्रपाषाणयुग : महाराष्ट्रात खऱ्याअर्थाने नवाश्मयुग अवतरलेच नाही, असे पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. मध्याश्मयुगानंतर येथे ताम्रपाषाणयुग सुरू झाले. त्यावेळी शेतीचे ज्ञान असलेल्या आणि तांब्याची व दगडी हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या येथे स्थायिक झाल्या. गुजरातमधून उत्तर सिंधू संस्कृतीचे लोक येथे इ.स.पू. १८०० च्या सुमारास आले. त्यानंतर इ.स.पू. १६०० मध्ये आलेल्या माळव्यातील शेतकऱ्यांनी तापी, गोदावरी आणि भीमेच्या खोऱ्यांत वस्ती केली. इ.स.पू. १४०० च्या सुमारास ⇨ जोर्वे संस्कृतीचा उगम झाला. या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम जोर्वे (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील उत्खननात १९५० मध्ये लागला. या लोकांनी कोकण आणि विदर्भ सोडून सर्व महाराष्ट्रभर वसाहती स्थापन केल्या. या सर्व वसाहतींतील भौतिक जीवन समान होते फक्त रंगीत खापरे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. महाराष्ट्राचे हे आद्य शेतकरी जव, गहू,मूग, मसूर, कुळीथ इ. पिकांची लागवड करीत आणि गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी इ. प्राणी पाळीत. वन्य प्राण्यांची शिकार आणि मासेमारी यांच्यावरही त्यांची उपजीविका अंशतः अवलंबून असे. त्यांची हत्यारे गारेच्या पात्यापासून बनविलेली असत. तांबे दुर्मिळ असल्याने त्याचा वापर फक्त महत्त्वाची हत्यारे आणि अलंकार करण्यासाठी मर्यादित स्वरुपात करीत.


या ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या सु. दोनशेहून अधिक वसाहती आतापर्यंत उजेडात आल्या आहेत. त्यांपैकी प्रकाशे (जि. धुळे) ⇨बहाळ आणि टेकेवाडा (जि. जळगाव), ⇨नासिक, नेवासे आणि ⇨दायमाबाद (जि. अहमदनगर), चांदोरी, सोनगाव आणि इनामगाव (जि. पुणे) इ. स्थळी उत्खनन झाले आहे. इनामगाव येथील उत्खनन फार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तत्कालीन जीवनाचे अनेक पैलू आता उजेडात आले आहेत. दायमाबाद येथील उत्खननही महत्त्वपूर्ण आहे.

इनामगाव येथील उत्खननात सु. १३० घरांचे अवशेष सापडले. माळवा संस्कृतीची (इ. स. पू. १६०० ते १४००) घरे सर्वसाधारणपणे आयताकार (७x५ मी.) होती. त्यांच्या भिंती कुडाच्या असून छप्पर गवताचे होते. काही घरे गोलाकार होती. या काळात जव, मसूर, मूग इ. पिके घेतली जात. तसेच गर्तावासही उत्खननात सापडले : लहान मृत मुलांना खड्ड्यांत पुरले जाई. त्यांत दोन कुंभ एकमेकांना लावून आडवे ठेवीत व आत मुलाचे शव असे. या लोकांचा देव दायामाबाद येथील एका रंगीत कुंभावर चितारलेला आहे. तो उभा असून त्याच्याभोवती वाघ, हरिण, मोर इ. प्राणी आहेत. दायमाबाद येथे सापडलेला ब्राँझच्या रथातील देवही हाच असावा. तो पशूंचा स्वामी असल्याची शक्यता आहे. माळवा संस्कृती इ.स.पू. १४०० च्या सुमारास अस्तंगत झाली असावी.

जोर्वे संस्कृतीत घरे चौकोनी व कुडाची असत. यांची रंगीत भांडी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ती तांबड्या रंगाची असून त्यांवर काळ्या रंगात नक्षी आढळते. वाडगे, तोटीचा चंबू इत्यादींचे घाट लक्षणीय आहेत. या काळात महाराष्ट्रात प्रथम जलसिंचनाची सोय झाली. इनामगाव येथे याचा उत्कृष्ट पुरावा सापडला आहे. तेथील नदीचे पाणी एका पाटातून वळवून ते शेतीसाठी वापरलेले आढळले. कदाचित या जलसिंचन योजनेमुळेच त्यांना गहू पिकवणे शक्य झाले असावे. तसेच हे शेतकरी खरीप आणि रब्बी अशी दुबार पिके काढीत असल्याचे दिसून आले. या प्रकारचा हा भारतातील अतिप्राचीन पुरावा आहे.

जोर्वे काळात महाराष्ट्राची भरभराट झाल्याचे दिसून येते. शेतीमुळे लोकांचे जीवन समृद्ध झाले होते. किंबहुना त्यामुळेच या काळातील वसाहतींना तटबंदीची जरुरी भासली असावी. इनामगाव येथील वसाहतींच्या भोवती भक्कम तटबंदी आणि खंदक होता. ही समृद्धी त्यांना जलसिंचनामुळे आली असावी. अर्थात त्यामुळे वसाहतीत शासनकर्ता होता असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. जगात जलसिंचनाबरोबर नायकशाहीचा उदय झालेला दिसतो. पाण्याच्या वाटपावर नियंत्रण ठेवण्यासाठी नायक असणे आवश्यक होते. इनामगाव येथील उत्खननात एक पाच खोल्यांचे मोठे घर सापडले. त्याच्या शेजारी वसाहतीचे धान्याचे कोठार होते शिवाय घरातील दफन अत्यंत निराळ्या पद्धतीचे होते. त्यावरून ते घर वसाहत-प्रमुखाचे असावे असे वाटते. त्यावेळी घरातील जमीन चुना आणि मातीने लिंपण्यात येत असे. या घराच्या ईशान्य कोपर्यात सु. ३० सेंमी. व्यासाचा आणि १० सेंमी. जाडीचा गोल चबुतरा आढळून आला. यावर धान्य साठविण्यासाठी कणगी उभारण्यात येत. घराच्या वायव्य भागात जमिनीत निम्मा पुरलेला साठवणीचा रांजण आढळला.त्याच्याजवळ चौकोनी आकाराची एक चूल मिळाली. त्यावर मातीचा तवा अथवा अन्न शिजविण्यासाठी मातीचे मडके ठेवण्यात येई.

या शेतकऱ्यांचे धार्मिक जीवन कसे होते, याची उत्खनित पुराव्यावरून कल्पना येते. त्यांच्या अनेक देवता होत्या. त्यांपैकी एक शिरोहीन होती. एका मृर्तींच्या अंगावरील छिद्रांवरून ती देवीच्या रोगाशी निगडित असावी असे वाटते. पुरुषदेवतांच्या मूर्तीही सापडल्या आहेत. मरणोत्तर जीवनावर या लोकांचा विश्वास होता. ते मृतावे दफन करीत. मोठ्या माणसाला खड्ड्यात पुरले जाई परंतु तत्पूर्वी त्याच्या पायाच्या घोट्याखालचा भाग तोडून टाकीत. यामागे मृताने पळून जाऊन भूत बनू नये, अशी भावना असावी. वसाहतीच्या प्रमुखाचे दफन चारपायी रांजणात सापडले. लहान मुलांना मात्र कुंभात पुरीत.

उत्तर जोर्वे काळात हवामानात विलक्षण बदल घडून आला. ते अधिकाधिक कोरडे झाले. केवळ यामुळेच तापी आणि गोदावरीच्या खोऱ्यांतील आद्य वसाहती उजाड झाल्या परंतु भीमेच्या खोऱ्यात मात्र हे लोक तग धरुन राहिले. तेथे त्यांना निकृष्ट जीवन जगावे लागले. त्यांची आर्थिक दुःस्थिती त्यांच्या लहान गोल झोपड्यांवरून आणि निकृष्ट खापरांवरून दिसून येते. उत्तर जोर्वे काळातील शंखाचे व हस्तिदंताचे मणी आणि बांगड्याही सापडल्या आहेत. तसेच त्यांच्या धार्मिक कल्पनांबद्दलचा पुरावा उपलब्ध झाला आहे. कालांतराने या लोकांना भटके जीवन जगावे लागले. इ.स.पू. ७०० च्या सुमारास उत्तर जोर्वे संस्कृती लयाला गेली.

ढवळीकर, म. के.

प्राचीन काळ : (इ. स. पू. ६००−इ. स. १३१८) : लोहयुगाची सुरूवात महाराष्ट्रात इ. स. पू. ७ वे−८ वे शतक इतकी मागे नेता येते. या लोहयुगात उत्तर भारतामध्ये मोठी क्रांती घडून आली आणि तिची परिणती नंद, मौर्य यांसारख्या मोठमोठ्या साम्राज्यांमध्ये झाली. तिचे पडसाद महाराष्ट्रात फारसे दिसून येत नाहीत. काही विद्वानांच्या मते मराठवाड्यातील नांदेड आणि नंदाचे ‘नवनंदडेहरा’ हे एकच असावे परंतु नंदांचा महाराष्ट्राशी कोणत्या स्वरुपात संबंध आला असावा, याबद्दलचा पुरावा अद्यापि फारसा उपलब्ध झालेला नाही. नंदांच्या नंतर आलेल्या चंद्रगुप्त मौर्यांच्या साम्राज्याचा विस्तार लक्षात घेता महाराष्ट्राशी त्याचा थोडाफार संबंध आला असावा, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही परंतु या संपर्काचे स्वरूप निश्चित कसे होते, हे सांगणे कठीण आहे. मौर्य सम्राट ⇨अशोकाचा मात्र महाराष्ट्राशी संबंध होता, हे महाराष्ट्रात सापडलेल्या सोपारा येथील गिरिलेखावरून कळून येते. अशोकाने धर्मप्रसारार्थ धर्मोपदेशक पाठविले. त्यांपैकी अपरांतात (उत्तर कोकण) धर्मरक्षित हा यवन धर्मप्रसारासाठी पाठविला, तर महाराष्ट्रात महाधर्मरक्षित हा धर्मप्रसारक पाठविला. अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा लक्षात घेता, सध्याच्या महाराष्ट्राचा बराचसा भूभाग त्याच्या अंमलाखाली होता.

सातवाहन : मौर्यांनंतर आलेल्या सातवाहनांच्या काळामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सुस्पष्ट होतो. वायु, विष्णु, मत्स्यइ. पुराणांत त्याचप्रमाणे जैन ग्रंथांमध्ये या राजवंशाबद्दल माहिती मिळते. सातवाहन राजे हे मूळचे पैठणचे होते आणि ते ब्राह्मणपिता आणि नागवंशी आई असे संकरोत्पन्न होते.

या वंशाच्या मूलस्थानाबद्दल आणि नावाबद्दलही अनेक मते मांडली गेली आहेत. यांना आंध्र आणि आंध्रभृत्य असेही पुराणांत संबोधलेले आहे. या राजवंशाच्या कालखंडाबद्दल तसेच त्यातील राजांच्या एकूण संख्येबद्दल विद्वानांत एकमत आढळत नाही. मराठवाड्यातील पैठणजवळचा भाग व आंध्र प्रदेश येथे या घराण्यातील सुरूवातीच्या राजांची नाणी सापडली आहेत. या नंतरच्या राजांची नाणी मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक अशा विस्तृत प्रदेशांतसापडली. त्यावरून या राजवंशाच्या साम्राज्याची व्याप्ती लक्षात येते. सातवाहन राजघराण्यातील काही राजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीन महत्त्वाचे आहेत.

उत्खननात सापडलेला रोमन मद्यकुंभ.

पहिला सिमुक आणि त्यानंतर कृष्ण या सातवाहन राजांच्या कारकीर्दीविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. कृष्णानंतर पहिला सातकर्णी राज्यावर आला. पुराणानुसार हा कृष्णाचा मुलगा होता. नाणेघाट लेखानुसार पहिला सातकर्णी हा अत्यंत शूर, शत्रूंचा निःपात करणारा राजा होता. संपूर्ण दक्षिणापथाचा अधिपती म्हणून राजसूय, अश्वमेध व इतर अनेक यज्ञ त्याने केले. याच्या पत्नीचे नाव ⇨नागनिका असे असून तिचा नाणेघाट येथील लेख अत्यंत प्रख्यात आहे. ही नागनिका ‘कळलाय’ या वंशाची असून हे महारठीच होते. सातकर्णी आणि नागनिका या दोघांच्या प्रतिमा असलेले एक नाणे सापडले आहे. सातकर्णीच्या अंमलाखाली बराच मोठा भूभाग होता, हे त्याच्या नाण्याच्या प्राप्तिस्थलावरून दिसून येते. त्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम आंध्र आणि माळवा यांचा अंतर्भाव होतो.

पहिला सातकर्णी हा एक सनातनी हिंदू होता. नाणेघाट लेखाच्या आरंभी इंद्र, धर्म, प्रजापती, संकर्षण, वासुदेव आणि चार लोकपालांचा उल्लेख आलेला आहे. त्यावरून पहिला सातकर्णी भागवत संप्रदायाचा अनुयायी असावा, असे काहींचे मत आहे. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा राजा दुसरा सातकर्णी (इ. स. पू. १४३−८६) हा होय. पुराणानुसार याने जवळजवळ ५६ वर्षे राज्य करून राज्याविस्तार केला. त्याने शुंगांचा पराभव करून आपले राज्य उत्तरेकडे, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात माळवा, जबलपूर भागांत वाढविले. ‘सिरी सातस’ किंवा ‘सिरी सातकणीस’ असा लेख असलेली अनेक नाणी महाराष्ट्रात आणि माळव्यात सापडलेली आहेत. काही विद्वानांच्या मते ही नाणी पहिल्या सातकर्णीचीसुद्धा असू शकतील.


पुराणांमध्ये सातवाहन घराण्याच्या अनेक राजांची नावे उल्लेखिलेली असली, तरी त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा उपलब्ध झालेला नाही. उदा., पहिला पुळुमावी याने २४ अथवा ३६ वर्षे राज्य केले. दुसरा महत्त्वाचा राजा ⇨हाल होय. हा राजा ललित वाङ्मयाचा मोठा रसिक होता. त्याने गाथासप्तशती या सुविख्यात गाथा संग्रहाचे संकलन केले व यातील काही गाथा तर प्रत्येक गाथेला १ कोटी इतके द्रव्य देऊन त्याने मिळविल्या, असे वाङ्मयीन पुरावा सांगतो. बृहत्कथेचा विख्यात लेखक गुणाढ्य याचाही संबंध सातवाहन राजांशी लावला जातो. यानंतरचा सुविख्यात राजा म्हणजे ⇨गौतमीपुत्र सातकर्णी (इ. स. ?−८६) होय. हा गादीवर येण्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र व गुजरातमध्ये राज्य करणाऱ्या क्षत्रपांनी विशेषतः नहपानाने सातवाहन साम्राज्याचे बरेच लचके तोडले होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईचा लेख नासिक येथील गुंफेमध्ये आहे. त्यानुसार गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाशी युद्ध करून काठोवाड, राजस्थानवर कब्जा मिळवला. त्याप्रमाणे माळवा, कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्र, वऱ्हाड, मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्रचा काही भाग यांवर त्याचा अंमल होता. त्याने नहपानाचा पराभव करून क्षत्रप घराण्याचाच समूळ नाश केला. रा. गो. भांडारकरांच्या मते, गौतमीपुत्र सातकर्णीने शेवटीशेवटी आपला मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमावी याच्या बरोबर राज्य केले, परंतु हे मत सर्वमान्य नाही.

गौतमीपुत्रानंतर त्याचा मुलगा वासिष्ठीपुत्र ⇨पुळुमावी गादीवर आला. याच्या कारकीर्दीत शहरात क्षपत्र व सातवाहन या दोन घराण्यांत वारंवार युद्धे होत असत. पुळुमावीने जयदामन या क्षत्रपाचा पराभव करून त्याच्या महत्त्वाकांक्षेला आळा घातला. महाक्षत्रप रुद्रदामनच्या मुलीचे लग्न पुळुमावीचा धाकटा भाऊ वासिष्ठीपुत्र सातकर्णी याच्याशी होऊन या लढायांची समाप्ती झाली.

पुळुमावीची नाणी आणि लेख आंध्र प्रदेशात सापडले आहेत. त्यावरून याच्या अंमलाखालील प्रदेशाची कल्पना येते.

सातवाहन घराण्यातील शेवटचा महत्त्वपूर्ण राजा म्हणजे गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी (कार इ.स. १७४−२०३) असून यज्ञश्री एक अत्यंत चाणाक्ष आणि महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने क्षत्रपांवर स्वाऱ्याकरून बराचसा मुलूख परत सातवाहन साम्राज्यात आणला. त्याने अपरात इ.स.सु. १९० च्या सुमारास जिंकले. याचे काही लेख मुंबईजवळ कान्हेरी, त्याचप्रमाणे नासिक आणि आंध्रमधील चिन्नगंजम या ठिकाणी सापडलेले असून त्याची अनेक नाणी वऱ्हाडातील चंद्रपूर आणि तऱ्हाळा येथे सापडली आहेत. शीड असलेल्या जहाजाची प्रतिमा असलेली याची नाणी आंध्र-महाराष्ट्रात सापडलेली आहेत.

यज्ञश्रीच्या मृत्यूनंतर सातवाहन राजघराण्यास उतरती कळा लागली. यानंतरच्या राजांचा तपशील फारसा मिळत नाही. या साम्राज्याचे लहानलहान तुकडे होऊन अखेरचे काही राजे दुर्बल असल्यामुळे प्रादेशिक राज्ये निर्माण झाली. विदर्भातील तऱ्हाळा या ठिकाणी जो नाण्यांचा निधी सापडला, त्यानुसार या घराण्याच्या शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता काही प्रमाणात विदर्भात, काही प्रमाणात आंध्रमध्ये आणि काही प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रामध्ये होती, असे दिसते. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा भागात ‘कुर’घराण्याचे राजे अथवा सातवाहनांचे मांडलिक राज्य करीत होते, असे नाण्यांवरून दिसून येते.

रोमन मद्यकुंभावरील यवन दंपतीचे चित्र, इ. स. पू. १ ले शतक, पितळखोरे (औरंगाबाद).

सातवाहन राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत प्रगती झाली. प्राकृत वाङ्मयाला या राजांचा उदार आश्रय मिळाला तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक हीनयान बौद्ध लेणी याच काळात खोदण्यात आली. त्यावरून बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात बराच प्रभाव असावा असे दिसते. सातवाहनांच्या उत्तर काळात अंतर्गत आणि सागरी व्यापरउदीम खूप वाढला. कल्याण, चौल, सोपारा इ. महत्त्वाची बंदरे सागरी व्यापार हाताळीत होती. याउलट जुन्नर, नासिक, पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर ही महत्त्वाची व्यापारी आणि राजकीय केंद्रे होती. सातवाहनांच्या राज्यात ३० तटबंदीयुक्त नगरे होती, असे उल्लेख परदेशी प्रवाशांनी नमूद केलेले आहेत. सातवाहनांची तांब्याची, शिशाची व चांदीची नाणी या व्यापारउदीमाची साक्ष देतात. व्यापाराबरोबरच सातवाहन साम्राज्यात तगरपूर वा तेर, पैठण, ब्रह्मपुरी (कोल्हापूर), भोकरदन इ. कलाकेंद्रे उदयास आली. या ठिकाणी हस्तिदंती मूर्ती व इतर वस्तू सापडलेल्या आहेत. तेर व भोकरदन येथे सापडलेल्या काही हस्तिदंती स्त्रीमूर्तीइटलीतील पाँपेई या ठिकाणी मिळालेल्या मूर्तीशी मिळत्याजुळत्या असल्याने सातवाहन साम्राज्याचा रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होता हे स्पष्ट होते. महाराष्ट्रात सापडलेली रोमन नाणी, ॲम्फोरानामक मद्यकुंभाचे अवशेष, कोल्हापूरला सापडलेले रोमन देवतांचे ब्राँझचे पुतळे इ. गोष्टी या व्यापाराची साक्ष देतात. [⟶सातवाहन वंश].

उत्खननाचे दृश्य, ब्रह्मपुरी, कोल्हापूर.

सातवाहन साम्राज्याच्या विघटनानंतरचा महाराष्ट्राचा इतिहास फारसा सुस्पष्ट नाही. सातवाहनानंतर ⇨आमीर, यवन, तुषार, शक, मुरुंड, मौन आणि किलकिल या घराण्यांनी राज्य केले परंतु या घराण्यांबद्दलचा इतर कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही.

आमीर आणि त्यांचे मांडलिक, त्याचप्रमाणे त्रैकूटक राजांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या काही भागावर राज्य केले, असा पुरावा पुराभिलेख आणि नाणी यांच्या स्वरुपात मिळतो.

आभीरांचा सर्वांत जुना लेख ईश्वरसेनाचा असून त्यानुसार तो भाढर गोत्र असलेल्या आईचा मुलगा होता आणि त्याच्या वडिलांचे नाव शिवदत्त होते. ईश्वरसेनाने एक संवत सुरू केला. त्याची सुरूवात इ. स. २४८-४९ या सालात झाली. ईश्वरसेनाबद्दलची विस्तृत माहिती फारशी मिळत नाही परंतु याचा अंमल गुजरात, उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांवर होता असे दिसते. पुराणांच्या मते एकंदर दहा आमीर राजांनी ६७ वर्षे राज्य केले. वा. वि. मिराशी व इतर काहींच्या मते आभीरांनी १६७ वर्षे राज्य केले. आभीरांच्या काही मांडलिक राजांचा पुराभिलेखात उल्लेख येतो. ईश्वररात, स्वामीदास, रुद्रदास, महाराज मुलुंड इत्यादींचे नावे या संदर्भात उल्लेखण्यासारखी आहेत.


आमीरांच्या इतकेच महाराष्ट्राच्या इतिहासात त्रैकूटक राजे महत्त्वाचे आहेत. यांची सत्ता प्रामुख्याने नासिक विभागात होती. हे आमीरांचे मांडलिक होते असे दिसते. या घराण्यातील इंद्रदत्त महाराज, दहूरसेन आणि व्याघ्रसेन हे तीन राजे विशेष प्रसिद्धीस आले. काही त्रैकूटक राजांनी स्वतःची नाणी पाडली होती. या घराण्याचा दुसरा राजा दह्रसेन (कार. इ.स. ४४५−७५) याची नाणी दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रातील सातारा व पुणे या जिल्ह्यांत सापडलेली आहेत. याने अश्वमेघ यज्ञ केल्याचे आपल्या एका ताम्रपटात सांगितलेले आहे. हा वैष्णव होता. याच्यानंतर त्याचा मुलगा व्याघ्रसेन (कार. इ. स. ४७५−९२) राज्यावर आला. याचा ताम्रपट गुजरातेत सुरत येथे आणि चांदीची नाणी पुणे जिल्ह्यातसापडली आहेत. त्रैकूटकांचा उच्छेद इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या मध्यास कलचुरींनी केला.

वाकाटक : वाकाटकांच्या कालखंडाबद्दल विद्वानांत मतैक्य नाही. त्याचा कालखंड सर्वसाधरणपणे इ. स. तिसरे शतक ते पाचवे शतक असा मानण्यात येतो. या घराण्याचे गुप्त सम्राटांशी वैवाहिक संबंध होते आणि त्यांचे राज्य मुख्यतः विदर्भात पसरले होते. यांच्या कारकीर्दीत कला आणि वाङ्मय यांची भरभराट झाली. या घराण्यातील राजा दुसरा प्रवरसेन याचे आतापर्यंत जास्तीत जास्त ताम्रपट उपलब्ध झालेले आहेत. याशिवाय विदर्भातील मांढळ, नागरा इ. ठिकाणच्या उत्खननांमध्ये वाकाटककालीन शिल्पांचे आणि विटांनी बांधलेल्या मंदिरांचे अवशेष उपलब्ध झाले. अजिंठा येथील काही चैत्य आणि विहार याच सुमारास खोदण्यात आले आणि त्यांमध्ये चित्रकाम करण्यात आले.

अजिंठ्याच्या १६ क्रमांकाच्या लेण्यातील उत्कीर्ण लेखावरून विंध्यशक्ती राजा आणि या घराण्याची काही माहिती ज्ञात झाली. त्याच्यानंतर आलेल्या पहिला प्रवरसेन या त्याच्या मुलाने वाकाटक घराण्याचा आणि साम्राज्याचा पाया स्थिर केला. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर विभागांवर वर्चस्व स्थापिले. पुढे त्याने नर्मदेपर्यंत वचक बसवून माळवा आणि सौराष्ट्र येथील शक-क्षत्रपांवर आपली हुकमत गाजविली. प्रवरसेनाचा मुख्यमंत्री हरिषेण याचा उल्लेख अजिंठा येथील घटोत्कच लेण्यातील लेखात आलेला आहे.

प्रवरसेनाने आपले राज्य आपली तीन मुले व नातू यांच्यात वाटले. रुद्रसेन हा नातू बहुधा पुरिका अथवा नंदिवर्धन (नागपूरपासून सु. ४५ किमी.) येथे राहून विदर्भातील काही भागावर राज्य करीत असावा. सर्वसेन हा प्रवरसेनाचा मुलगा विदर्भाच्या वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) येथून राज्य करीत होता. याच्यापासूनच वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेची सुरूवात झाली. पहिल्या प्रवरसेनानंतर वाकाटक घराण्याच्या दोन शाखा झाल्या. मूळ शाखेतील पहिला पृथ्वीसेन रुद्रसेनानंतर गादीवर आला. दुसरा रुद्रसेन या त्याच्या मुलाने राज्यकारभारावर आपला ठसा उमटविला. त्याने प्रख्यात गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी ⇨प्रभावती-गुप्ताहिच्याशी लग्न केले. वैष्णव धर्माला विदर्भामध्ये उजाळा मिळाला. नंदिवर्धन हे राजधानीचे ठिकाण असावे आणि दुसऱ्या रुद्रसेनाच्या मृत्यूनंतर प्रभावती-गुप्ताने या स्थानाला महत्त्व प्राप्त करून दिले असावे. प्रभावती-गुप्ताच्या एका लेखात रामगिरी या स्थलाचा उल्लेख आला आहे. रामगिरी हे ठिकाण म्हणजेच विदर्भातील रामटेक हे होय. यानंतर आलेल्या दुसऱ्या प्रवरसेनाची कारकीर्द वाकाटकांच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. याचे अनेक ताम्रपट उपलब्ध असून हा वाङ्मयप्रेमी, विद्येचा आश्रयदाता व शिवाचा परमभक्त होता. वाकाटकांच्या दोन्ही शाखांनी बहुतांशी विदर्भ विभागावर राज्य केले. माहिष्मतीच्या कलचुरी घराण्यातील कृष्ण या राजाने सहाव्या शतकाच्या मध्यास विदर्भ जिंकून घेऊन वाकाटकांची सत्ता नाहीशी केली. [⟶वाकाटक घराणे].

वाकटकांच्या पाडावानंतरचा महाराष्ट्राचा इतिहास सुस्पष्ट नाही परंतु सहाव्या ते आठव्या शतकांत राज्य करणाऱ्या बादामी चालुक्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव पडला. बादामी चालुक्या हे प्रामुख्याने विद्यमान कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील प्रदेशांशी (विजापूर जिल्हा) जास्त निगडित असले, तरी या घराण्यातील सर्वांत प्रख्यात राजा ⇨दुसरा पुलकेशी (सु. ६१०-११ ते ६४२) याच्या एका लेखात पहिल्या प्रथम तीन महाराष्ट्रकांचा उल्लेख आलेला आहे. यामध्ये ९९ हजार गावे होती असा निर्देश आढळतो. या तीन महाराष्ट्रकांच्या बद्दल निरनिराळी मते प्रचलित आहेत. हर्षवर्धनाचा पराभव करणारा  दुसरा पुलकेशी हा एक बलाढ्य राजा होता आणि त्याच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धर्माप्रमाणे इतरही धर्म व संप्रदाय प्रचलित होते.

इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांत दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रकूटांनी आपला जम बसविलेला होता आणि यांनीच शेवटी बादामीच्या चालुक्यांची सत्ता नष्ट केली. चालुक्यांच्या उतरत्या काळात महाराष्ट्रात लहानमोठी राज्ये उदयास आली. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर महाराष्ट्रात कलचुरींनी आपला जम बसविला. त्यांची चांदीची नाणी आणि ताम्रपट नासिक भागात सापडलेले आहेत. कोकण प्रदेशात मौर्य नावाचे एक राजघराणे सत्तेवर आले. त्यांनी कलचुरींचे आधिपत्य मानले होते असे दिसते. याच काळात विष्णुकुण्डिन् राजघराणे अस्तित्वात आले. ते आंध्र प्रदेशामध्ये राज्य करीत असले, तरी त्यांची नाणी विदर्भातही उपलब्ध झालेली आहेत.

राष्ट्रकूट : राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली महाराष्ट्रात पुन्हा बऱ्याच मोठ्या प्रदेशावर एकजिनसी राज्य सुरू झाले. या घराण्याचे मूळ स्पष्ट नसले, तरी चालुक्यांच्या लेखात राष्ट्रकूट या अधिकाऱ्यांचे उल्लेख येता. इसवी सनाच्या आठव्या ते दहाव्या शतकांपर्यंत राष्ट्रकूटांनी महाराष्ट्रावर आधिपत्य गाजविले. यांच्या मान्यखेट व विदर्भ या इतर शाखा असल्या, तरी महाराष्ट्राच्या मध्य भागावर यांनी प्रामुख्याने राज्य केले. या घराण्यात काही प्रख्यात राजे होऊन गेले. वेरुळच्या दशावतार लेण्यातील लेखात दंतिदुर्गाची स्तुती आढळते. त्याने गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ आणि महाराष्ट्र यांवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. या घराण्यातील पहिला कृष्ण याने संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण कोकण आपल्या अंमलाखाली आणला. याच राजाच्या आज्ञेनुसार वेरुळचे जगद्विख्यात कैलास लेणे निर्माण केले गेले. ध्रुव आणि ⇨तिसरा गोपिद (कार. ७९३−८१४) या राजांच्या कारकीर्दीत राष्ट्रकूटांचे साम्राज्य जास्तीत जास्त विस्तृत झाले. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या ⇨पहिल्या अमोघवर्षाच्या कारकीर्दीत मात्र अनेक बंडे झाली. त्याने हिंदू आणि जैन धर्मास आश्रय दिला. त्याचप्रमाणे कन्नड साहित्याला उत्तेजन दिले. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात तिसऱ्या कृष्णाने आपले साम्राज्य संपूर्ण दख्खनवर प्रस्थापित केले. राष्ट्रकुटांचे अनेक ताम्रपट महाराष्ट्रात, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात, उपलब्ध झाले आहेत.

इ. स. ९७२ मध्ये परमार राजा सियक याने राष्ट्रकूटांचा दारुण पराभव करून कर्नाटकातील मान्यखेट (मालखेड) ही त्यांची राजधानी बेचिराख करून टाकली आणि त्यानंतर राष्ट्रकूट राजघराण्याला कायमची उतरती कळा लागली. वाङ्मय, ललित कला, वास्तुशिल्प यांना राष्ट्रकूटांनी उत्तेजन दिले. याबद्दल या काळात महाराष्ट्रात आलेले अरबी प्रवासी प्रशंसोद्गार काढतात. [⟶ राष्ट्रकूट वंश].


राष्ट्रकूटांच्या पाडावानंतर उत्तरकालीन चालुक्यांनी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. दहाव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकात राज्यावर आलेल्या दुसरा तैल किंवा तैलप या राजाने दक्षिण कोकण आणि गोदावरी खोऱ्याचा महाराष्ट्रातील प्रदेश आपल्या ताब्यात आणला. याने माळव्याच्या परमारांचा गोदावरी तीरावर पराभव केला. सत्याश्रय, पाचवा विक्रमादित्य आणि दुसरा जयसिंह या अकराव्या शतकातील चालुक्य राजांनी उत्तर कोकण, दक्षिण कोसल, महाराष्ट्राचा काही भाग इ. प्रदेश काबीज केले. दुसऱ्या जयसिंहाने चोल आणि शिलाहार यांचा पराभव केला आणि आपली राजधानी बीदर जिल्ह्यातील कल्याणी येथे नेली.

पहिला आणि दुसरा सोमेश्वर व सहावा विक्रमादित्य (१०७६−११२६) हे या घराण्यातील कर्तृत्ववान राजे होते. पहिल्या सोमेश्वराने चोल राजांचा अनेकवेळा पराभव केला. याच्या पुराभिलेखानुसार यानेनेपाळ, श्रीलंका, उत्तर कोकण, दक्षिण कोसल इ. प्रदेश जिंकून घेतले आणि यादवांचाही पराभव केला. याने कोल्लापूर (कोल्हापूर) येथे चोल राजांतर्फे होणाऱ्या उपद्रवांचा बंदोबस्त केला. यावरून असे दिसून येते की, पहिल्या सोमेश्वराचा महाराष्ट्राशी निकटचा संबंध आला.

सहावा विक्रमादित्य याने चालुक्य, होयसळ, कदंबआणि यादव यांचा पराभव केला. कोकण विभागातील शिलाहार घराण्यातल्या राजकन्येशी याने विवाह केला. सप्तकोकण आणि विदर्भ हे प्रदेशही त्याने आपल्या आधिपत्याखाली आणले. याचे अनेक लेख उपलब्ध असून श्रीलंकेच्या राजाकडे त्याने आपला वकील पाठविला होता. बिल्हण, विज्ञानेश्वर इ. पंडित त्याच्या आश्रयाला होते.

सहाव्या विक्रमादित्यानंतर आलेल्या तिसऱ्या सोमेश्वराने (कार. ११२६−३८) अनेक युद्धे केली परंतु युद्धविजयापेक्षा त्याचे नाव मानसोल्लास अथवा अमिलषितार्थचिंतामणि या ग्रंथाचा लेखक म्हणून अधिक प्रख्यात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात चालुक्यांनी संस्मरणीय कामगिरी केली. यादवांनी अखेर चालुक्यांची सत्ता नष्ट केली. बिज्जलानंतर आलेले राजे फारसे प्रभावी नव्हते आणि त्यामुळे चालुक्यांनी पुन्हा उचल खाल्ली परंतु पाचव्या भिल्लम यादवाने चालुक्यांचा पाडाव केला. [⟶चालुक्य घराणे].

शिलाहार : शिलाहारांची तीन घराणी असून यांतील एक उत्तर कोकण, दुसरे दक्षिण कोकण आणि तिसरे दक्षिण महाराष्ट्रात मिरज, कऱ्हाड (कराड) व कोल्हापूर या विभागांवर राज्य करीत होते. शिलाहारांचा राज्यकाल सु. चार शतकांचा असून तो इसवी सनाचे नववे ते तेरावे शतक असा आहे. या घराण्यातील राजे ‘तगरपुरवराधीश्वर’असे बिरुद लावीत असत. कराडचे शिलाहार कराड येथून राज्य करत असत. अकराव्या शतकात यांनी दक्षिण कोकण आपल्या अंमलाखाली आणला. याच घराण्यातील गण्डरादित्य हा राजा बुद्ध, जिन आणि शिव या तिन्ही देवतांचा उपासक होता आणि त्याने मिरजेजवळ गण्डसमुद्र या नावाचे एक तळे बांधले, असे उल्लेख मिळतात. यानंतरच्या काळात शिलाहारांचा फारसा प्रभाव पडला नाही आणि ⇨सिंधण यादव याने शिलाहार घराण्याचा नाश केला. उत्तर कोकणातील शिलाहार घराण्याचा पराभव तेराव्या शतकात यादव महादेव याने केला.

शिलाहारांचे अनेक लेख कोकणपट्टीत आणि दक्षिण महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहेत. मुंबईजवळ अंबरनाथ येथे शिलाहार काळातील एक शिवमंदिर प्रसिद्ध आहे. दक्षिण महाराष्ट्रातील शिलाहार हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे उपासक असून त्यांचा ध्वज सोनेरी गरुड चिन्हाने चित्रित केलेला होता. [⟶शिलाहार घराणे].

यादव : शिलाहारांच्या काहीसे समकालीन पण नंतर सत्ताधीश झालेले यादव हे महाराष्ट्राचे खऱ्याअर्थाने राजे होते. सुरूवातीला राष्ट्रकूटांचे आणि नंतर चालुक्याचे मांडलिक असलेले यादव हे कालांतराने संपूर्ण महाराष्ट्राचे स्वामी झाले. यांची राजधानी प्रारंभी नासिक जिल्ह्यातील सिन्नर (सेऊणपूर) येथे असावी. पुढे ती औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी येथे होती.

यादवांच्या उत्पत्तीबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही. त्यांचे मूळ नाव ‘सेऊण’ असे होते आणि त्यांच्या प्रदेशास ‘सेऊणदेश’ असे म्हटले जात असे. यांचे अनेक लेख आणि ताम्रपट प्रामुख्याने महाराष्ट्राच्या देश विभागात सापडलेले असून त्यांच्या काळातील अनेक मंदिरे महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत पहावयास मिळतात. यादव घराण्यात अनेक नामवंत राजे होऊन गेले आणि त्यांतील पाचवा भिल्लम, जैतुगी, सिंधण, कृष्ण, महादेव व रामचंद्र हे प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रकूटांच्या काळातच नवव्या शतकाच्या अखेरीस पहिला सेऊणचंद्र याने सेऊणपुराची स्थापना करून आपल्या राज्याचे नाव ‘सेऊणदेश’असे ठेवले. यादवांनी खानदेश, नासिक, अहमदनगर इ. विभागांवर आपला अंमल प्रस्थापित केला. पाचवा भिल्लम (कार. ११८५−९३) हा या राजघराण्याचा पहिला स्वंतत्र राजा. त्याने कल्याणी चालुक्यांचा पराभव करून सध्याच्या आंध्र प्रदेशातील काही भाग, उत्तर कर्नाटक, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र हे प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले. त्याने देवगिरी येथे आपली राजधानी स्थापली असे दिसते. या घराण्यातील सिंधण (कार. १२१०−१२४६) हा आणखी एक विख्यात राजा होऊन गेला. त्याने अनेक नवीन प्रदेश जिंकून खानदेश, दक्षिण कोकण, आंध्र प्रदेशाचा काही भाग त्याचप्रमाणे विदर्भाचा बराच मोठा भाग व दक्षिण महाराष्ट्र हे प्रदेश आपल्या अंमलाखाली आणले. गोव्याचे कदंब राजे याचे मांडलिक होते. याचे अनेक कोरीव लेख उपलब्ध असून त्याने ज्योतिष आणि संगीत यांना उदार आश्रय दिला.

कृष्ण (कार. १२४६−१२६१), महादेव (कार. १२६१−१२७०) आणि रामचंद्र (कार. १२७१−१३११) यांच्या कारकीर्दीत यादव साम्राज्यात उत्तर कोकण आणि मध्य प्रदेशातील छत्तीसगड हे प्रदेश अंतर्भूत करण्यात आले. याच काळात यादवांनी शिलाहारांचा सागरी युद्धात पराभव करून माळव्याचे परमार, गुजरातचे वाघेल आणि आंध्रचे काकतीय यांच्याबरोबर यशस्वी युद्धे केली.

यादवकालीन शिवमंदिर, सातगाव.

महादेवाचा ⇨हेमाद्री अथवा हेमाडपंत हा श्रीकरणाधिप होता. हेमाद्री हा रामचंद्र यादवाच्या काळामध्येही पंतप्रधान म्हणून होता. याच्या काळात अनेक मंदिरे बांधण्यात आली. ती हेमांडपती मंदिरशैली म्हणून पुढे विख्यात झाली. रामचंद्र याच्या कारकीर्दीत यादवांचे आधिपत्य विदर्भाच्या बऱ्याच मोठ्या भागावर आणि मध्य प्रदेशातील बालाघाट विभागावर प्रस्थापित झाले परंतु कर्नाटकातील होयसळांनी याचा पराभव केला. तसेच इ. स. १२९४ साली अलाउद्दीन खल्जीने केलेल्या स्वारीमुळे यादव साम्राज्य खिळखिळे झाले. अलाउद्दीनने देवगिरीची जाळपोळ करून ती उद्ध्वस्त केली. रामचंद्राला प्रचंड खंडणी द्यावी लागली. पुढे इ. स. १३०७ मध्ये मलिक कफूर या अलाउद्दीनच्या सेनापतीने देवगिरीवर पुन्हा स्वारी करून यादवांना आणखी एक धक्का दिला. शंकरदेव आणि हरपालदेव या शेवटच्या राजांची हत्या खल्जींच्या कडूनच झाली आणि इ. स. १३१७ पासून यादव साम्राज्याचे विभाग मुसलमानी राज्यपालांच्या हुकमतीखाली आले.


यादवांचे सु. चारशेहून अधिक शिलालेख आतापर्यंत उपलब्ध झालेले असून त्यांतून तत्कालीन समाजजीवन आणि राज्यकारभारविषयक माहिती मिळते. चक्रधरांचा महानुभाव पंथ व ज्ञानेश्वर-नामदेवांचा भक्ती वा वारकरी संप्रदाय यादवांच्या काळातच उदयास आले.मराठी भाषेला आणि वाङ्मयाला उत्तेजन मिळून ज्ञानेश्वरी आणि महानुभावांचे आद्य ग्रंथ या काळात लिहिले गेले. मराठी भाषिक महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व यादव काळातच घडविले गेले. [⟶यादव घराणे].

यादवानंतर निरनिराळ्या मुस्लिम सत्तांनी आणि दिल्लीच्या सुलतानांनी महाराष्ट्रावर आधिपत्या मिळविण्याचा प्रयत्न केला. सतराव्या शतकात शिवाजीमहाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्राला स्वातंत्र्य असे उपभोगावयास मिळाले नाही.

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा विचार केल्यास असे दिसून येते की, अगदी पाषाणयुगापासून ते तहत यादवकाळापर्यंत इतर प्रदेशांतून महाराष्ट्रात विविध लोक आपापल्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीस मदत केली. या व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत भूभागाच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांनीही आपला ठसा उमटविला. कोकण, देश, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ यांची काही वैशिष्ट्ये आजही टिकून आहेत परंतु यांचे एकसंघ स्वरूप निर्माण करण्यात महाराष्ट्राच्याच भूमीतील सातवाहन आण यादव या राजघराण्यांनी मदत केली.

देव, शां. भा.

 

मध्ययुगीन इतिहास  : तेराव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिण भारताच्या राजकारणात ठळकपणे झळकू लागलेल्या यादव घराण्याच राजवटीपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या कालखंडाला ‘मध्ययुगीन इतिहास’या संज्ञेने संबोधण्याची इतिहासकारांची प्रथा आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या जीवनाचा सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक ताणाबाणा हा ऐतिहासिक दृष्ट्या सामंतयुगीन चौकटीत विणला गेला होता. उच्चकुलीन भूपतींचे स्वामित्व आणि कनिष्ठ वर्णीय स्रशूदांचे दास्य हा सामंतयुगीन जीवनाचा मुख्या सामाजिक गाभा होता. यादव काळात स्थानिक भूपतींचे वर्चस्व, मुसलमानी अंमलात तुर्क−अफगाण−मोगल आदी सुलतानांचा अंमल आणि शिवकाळात व पेशवाईत ब्राह्मण, प्रभू, मराठी इ. उच्चवर्णीय व सत्ताधिशांचे स्वामित्व असा या सामाजिक वर्चस्वाचा ऐतिहासिक क्रम आहे. स्थानिक असोत की बाहेरचे असोत, हिंदू असोत की इस्लामचे पुरस्कर्ते असोत, मध्ययुगीन महाराष्ट्रातील ध्येयवादाची आणि कर्तृत्वाची क्षितिजे ही सामंतयुगीन महाराष्ट्रातील ध्येयवादाची आणि कर्तृत्वाची क्षितिजे ही सामंतयुगीन होती. इंग्रजी वसाहतवादी राजवट येईपर्यंत सामंतकुलीन श्रेष्ठींच्या आपापसांतील तणावांच्या ओझ्याखाली मराठी मुलखातील सामान्य जनता दबली होती. अशा या मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाशी आधुनिक महाराष्ट्राचे नाते मात्र अगदी हाडामांसाचे आहे. आज महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा, पूजली जाणारी दैवते, घातली जाणारी वस्त्रे आणि आळवली जाणारी गीते ही बव्हंशी मध्ययुगीन कालखंडात पहिल्यांदा अवतरली होती.

उत्तर भारतात ⇨महमूद गझनी (कार. ९९८−१०३०) आणि ⇨मुहम्मद घोरी (कार. १२०३−०६) यांच्या स्वाऱ्यांनी तुर्की राजवटीची पार्श्वभूमी तयार झाली. ⇨कुत्बुद्दीन ऐ (कार. १२०६−१०), ⇨शम्सुद्दीन अल्तमश (कार. १२११−३६) आणि ⇨वियासुद्दीन बल्वन (कार. १२६६−८७) यांनी दिल्लीत तुर्कांचा सुलतानी अंमल पक्का बसविला. तेराव्या शतकाच्या अखेरीस आणि चौदाव्या शतकाच्या सुरूवातीस ⇨अलाउद्दीन खल्जीया दिल्लीच्या सुलतानाने दक्षिण भारतात लष्करी मोहिमा करून दिल्लीतील सुलतानी राजवटीचा विस्तार दक्षिण भारतात केला. तेराव्या शतकात दक्षिणेत सर्वांत नावाजलेले आणि बलाढ्य राजघराणे देवगिरीच्या यादवांचे होते. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांची पहाट होय. मुकुंदराज, ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांनी मराठी भाषेला प्रगल्भत्व प्राप्त करून दिले. यादवकालीन देवगिरी हे भारतातील एक अग्रगण्य नगर होते. संगीतरत्नाकर लिहिणारा शाङ्‌ र्गदेव आणि प्रख्यातगायक गोपाल नायक देवगिरीचाच. खल्जी आक्रमणापुढे देवगिरीचे यादव टिकू शकले नाहीत.

खल्जींच्या मागोमाग तुघलकांनी देवगिरी ताब्यात घेतली. ⇨मुहम्मद तुघलक (का. १३२५−५१) याने दिल्लीची राजधानीच काही वर्षे देवगिरीला हलविली (१३२७). देवगिरीला त्याने दौलताबाद हे नवे नाव दिले. मुहम्मद तुघलकाच्या लष्करी छावण्यांबरोबर दक्षिणेत मुसलमानांच्या वस्त्या उभ्या राहिल्या. मुसलमानी राज्यकर्त्यांच्या लष्करी हालचाली सुरू होण्यापूर्वीच उत्तर भारतातून दक्षिणेत मुस्लिम सूफी साधुसंतांचे आगमन झाले होते. मोमिन आरिफ व जलालुद्दीन यांसारखे मुस्लिम सूफी अवलिये देवगिरीच्या परिसरात यादव काळातच स्थायिक झाले होते. त्यांच्या पाठोपाठ मुंतजबोद्दीन, जर्जरीबक्ष, बुऱ्हानौद्दीन, मोईजोद्दीन हे सूफी अवलिये देवगिरीच्या जवळ मराठवाड्यात येऊन स्थायिक झाले. गेसूदराज बंदेनबाज गुलबर्ग्याला गेले. सूफी बुजुर्गांचे तक्ये, खानकाहे, दरगे दक्षिणेत जागोजागी उभे झाले. या सूफी अवलियांच्या प्रेरणेने आणि सुलतानाच्या जुलूमजबरदस्तीने अनेकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. मशिदींच्या कमानी, मनोरे, घुमट गावोगावी उभे राहिले. मुसलमानी धर्म, अरबी-फार्सी भाषा आणि तुर्की वेशभूषा दक्षिणेत आल्या. मुस्लिम राज्यकर्त्यांपैकी उच्चकुलीनांत तुर्की, अफगाण आणि इराणी यांचा भरणा असला, तरी बहुसंख्याक मुसलमान हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते. उत्तरेतून आलेल्या भारतीय मुसलमानांनी आपल्याबरोबर अवघी, ब्रज या भाषाही दक्षिणेत आणल्या.

मुहम्मद तुघलकाची पाठ दौलताबादेहून दिल्लीकडे वळते ना वळते, तोच हसन गंगू बहमनी याने स्वतःच्या नावे राजवटीची ग्वाही फिरविली. बहमनीने दौलताबादहून आपली राजधानी गुलबर्गा येथे हलवली. बहमनींच्या काळातच दक्षिणेत विजयनगरच्या राज्याचा उदय झाला (१३३६). तुंगभद्रेच्या काठी हम्पी व अनागोंदी या परिसरात उभारले गेलेले विजयानगर म्हणजे दक्षिणेतील प्रादेशिक सत्तेचा नवा शक्तिपुंज ठरला. हरिहर, बुक्क, माधवाचार्य (विद्यारण्य), कृष्णदेवराय या दक्षिणेत विविध कारणांनी गाजलेल्या विभूतींचे साहचर्य विजयानगराशी जडले आहे. इकडे बहमनी राज्यात ⇨महम्मद गावान या मुत्सद्याच्या मृत्यूनंतर बहमनी राज्याला उतरती कळा लागून या राज्याचे तुकडे पडले. बहमनी राज्याच्या विघटनातून गोवळकोंड्याची कुत्वशाही, विजापूरची ⇨आदिलशाही, बीदरची ⇨बरीदशाही, एलिचपूरची ⇨ मादशाही आणि अहमदनगरची ⇨निजामशाहीया स्थानिक मुसलमानी राजवटी उभ्या राहिल्या कारण बहमनींच्या उदयानंतर उत्तर भारतातून सुलतानी राजवटीला मिळणारा समर्थ माणसांचा ओघ आटला. बहमनींनी त्यांच्याऐवजी अरबस्तान, इराण, ईजिप्त, हबसाण इकडून मुसलमान तंत्रज्ञ, कलाकार, राजकारणपटू व सैनिक आणले. परदेशातून आलेले मुसलमान आणि स्थानिक मुसलमान यांच्यात स्पर्धा वाढली. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष संघर्ष उभा राहिला. बहमनी सलतनतीच्या फाटाफुटीचे हे एक महत्त्वाचे कारण होते. त्यानंतर निर्माण झालेल्या पाच शाह्यांना, या संघर्षाचा उपसर्ग होतच राहिला आणि या पेचातून सुटण्यासाठी त्यांनी पूर्वापार राजकारणातच असलेली अनेक संपन्न क्षत्रिय घराणी जवळ केली. शासनाची धुरा वाहण्यास समर्थ असा क्षत्रियांचा वर्गसोळाव्या शतकाच्या शेवटी तयार झाला. मराठी राजसत्तेच्या उदयाचा हा पाया आहे. [⟶बहमनी सत्ता].


आदिलशाही आणि निजामशाही राजवटींत अनेक मराठी सरदारांना तोलामोलाच्या कामगिऱ्यामिळाल्या होत्या पण मुसलमानी राजवटीत जहागिरी संपादन करून स्वतंत्र राज्याच्या धनी होण्याचे कर्तृत्व केवळ भोसले घराण्यातील ⇨ शहाजी आणि शिवाजी यांनीप्रगट केले. मोगली आक्रमणाच्या दडपणाला न जुमानता निजामशाही तख्तावर एका बालवयीन राजपुत्राला बसवून निजामशाही राजवट सावरून धरण्याचा प्रयत्न शहाजीने करून बघितला परंतु त्याला यश आले नाही. १६६३ साली मोगलांशी तह करून निवडक फौजेसह शहाजी आदिलशाही कर्नाटकात गेला. कर्नाटकात शहाजीने बंगरुळ येथे जहागिरीचे नवे ठाणे उभारले आणि पुणे येथील जहागिरीचे वतन सांभाळण्यासाठी जिजाबाई आणि बाल शिवाजी यांना महाराष्ट्रात ठेवले. शहाजीने मिळविलेल्या जहागिरीतून शिवाजीने हिन्दवी स्वराज्य−महाराष्ट्र राज्य−जन्माला घातले.

सतराव्या शतकात तुर्की-मोगल राजवटीविरुद्ध हिंदुस्थानात सर्वत्र वडाळी झाली. सतनामी, जाट, शीख, यूसुफझाई, आफ्रिडी इत्यादींनी मोगली सत्तेविरुद्ध लढा दिला पण यांपैकी कुठल्याही बंडातून नजिकच्या काळात दीर्घकाळ टिकणारी राजवट जन्माला आली नाही. शिवाजींच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा उठाव हा समकालीन निरीक्षकांच्या दृष्टीने आणि पुढील काळातील इतिहासकारांच्याही दृष्टीने एक अद्भूतरम्य कुतुहलाचा विषय ठरला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा

हिन्दवी स्वराज्य, महाराष्ट्र राज्य, चौथाई−सरदेशमुखी आणि मुलूखगिरी या संकेतांच्या पंचक्रोशीत मध्ययुगीन मराठी वतनदारांचे कर्तृत्व सतत गाजत राहिले. या कर्तृत्वाचे रहस्य हे शहाजी आणि शिवाजी या पितापुत्रांच्या रोमहर्षक जीवनात व अपूर्व कर्तृत्वात जसे दडलेले आहे, तसेच मध्ययुगीन मुसलमानी राजवटीच्या ढासळत्या डोलाऱ्यातही दडलेले आहे. १६८० मध्ये जेव्हा शिवाजी महाराज मृत्यू पावले, तेव्हा आपल्या मागे त्यांनी एक कार्यक्षम शासनयंत्रणा पुढील पिढ्यांसाठी सज्ज करून ठेली होती. ⇨मलिक अंबरने घालून दिलेल्या जमीन महसुलीच्या व्यवस्थेची शिवाजींनी अधिक काटेकोर घडी बसविली. शिवाजींनी शासनात वेतनव्यवस्था सुरू करून देशमुखांच्या सत्तेला आळा घातला. शिवाजींच्या धार्मिक औदार्याची प्रशंसा त्यांच्या शत्रूंनीही केली आहे. [⟶शिवाजी, छत्रपति].

शिवाजींच्या मृत्यूनंतर मराठी राज्याला काही दिवस गृहकलहाला तोंड द्यावे लागले. छत्रपती ⇨संभाजी गादीवर बसतो ना बसतो तोच ⇨औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेला सुरूवात झाली (१६८१). औरंगजेबाने दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुत्बशाही यांचे पारिपत्य केल्यानंतर आपले सर्व सामर्थ्य मराठ्यांविरुद्ध एकटवले. मराठ्यांची राजधानी रायगड, राजा संभाजी आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या हाती लागले. औरंगजेबाने संभाजीचा क्रूरपणे वध केला पण ⇨शाहूला मात्र आपल्या छावणीत वाढवून त्याला मोठी मनसब दिली. ⇨राजारामआणि त्याची पत्नी महाराणी ⇨ताराबाईयांनी प्रतिकार-युद्ध पुढे चालविले.

सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली. मोगलांच्या छावणीतून महाराष्ट्रात परतल्यावर शाहूला ताराबाई आणि तिच्या सरदारांशी मुकाबला करावा लागला. भटकुलोत्पन्न पेशव्यांचे राजकारण आकारु लागले. या काळात⇨वाळाजी विश्वनाथाने शाहूच्या सेवेसाठी जी कामगिरी पार पाडली, त्यातून पेशवे घराण्याच्या भावी उत्कर्षाचा पाया रचला गेला. सय्यद बंधूंशी संधान बांधून बाळाजी विश्वनाथाने दिल्लीच्या बादशाहाकडून सनदा आणल्या आणि छ.शाहूच्या दरबारात पेशवे घराण्याचा जम बसला. छ. शाहूच्या कारकीर्दीतच बाळाजी विश्वनाथामागून ⇨पहिला बाजीराव, ⇨बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब या कर्तबगार पेशव्यांच्या देशव्यापी उलाढाली गाजल्या. शिंदे, होळकर, गायकवाड, पवार हे मातब्बर मराठे सरदार पेशव्यांच्या हुकूमतीत आणि तालमीत तयार झाले. याच सरदारांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. छ. शाहूच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या कर्तृत्वामुळे आणि मराठी राजकारणातील अंतःस्थ कलहामुळे छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन मराठी राज्याची खरी सत्ता पेशव्यांच्या हाती आली. [⟶पेशवे].

निजामाचा ⇨उदगीरच्या लढाईत १७६० साली पराभव होऊन दक्षिण हिंदुस्थानातील मराठ्यांचे वर्चस्व पक्के झाले परंतु १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या लढाईत अब्दालीने मराठ्यांचा पराभव करून मराठी सत्तेला फार मोठा हादरा दिला. [⟶पानिपतच्या लढाया].

म्हैसूरच्या हैदर आणि टिपूने, हैदराबादच्या निजामाने आणि मुंबईकर इंग्रजांनी डोके वर काढले. ⇨मराठी राजमंडळात आणि खुद्द पेशव्यांच्या घरात कलह माजला. ⇨थोरल्या माधवरावाच्या मृत्यूनंतर झालेला नारायणराव पेशव्याचा खून (१७७३), राघोबादाद ऊर्फ ⇨रघुनाथराव पेशवे यांनी इंग्रजांकडे घेतलेला आश्रय, नागपूरकर भोसल्यांनी आणि कोल्हापूरच्या छत्रपतींनी पेशव्यांशी फटकून वागणे, ⇨नाना फडणीस आणि ⇨महादजी शिंदेया उभयतांत वाढत चाललेला बेबनाव या सर्व घटना मराठी राजमंडळाच्या अंतःस्थ दुरवस्थेची चिन्हे होती. महादजी शिंदे (१७९४) व नाना फडणीस (१८००) यांच्या मृत्यूनंतर मराठा सरदारांच्या फौजांनीच पुणे शहर लुटण्याचा आणि जाळण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारुन मराठी राजसत्तेला गळफास लावला (१८०२).

तिसऱ्या ⇨इंग्रज-मराठे युद्धात (१८१७-१८) मराठ्यांनी सत्ता टिकविण्याचा आटाकोट प्रयत्न केला. या युद्धाच्या वेळी ११ फेब्रुवारी १८१८ रोजी ⇨मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनने एक फर्मान काढून मराठी प्रजेला व छोट्या जहागीरदारांना इंग्रजांना मिळण्याचे आवाहन केले आणि ⇨छ. प्रतापसिंह भोसले यास संरक्षण दिले. त्र्यंबक डेंगळे, बापू गोखले आदी दुसऱ्या बाजीरावाच्या सेनापतींचा ब्रिटिशांनी पराभव करून खुद्द बाजीरावास इंदूरजवळ महू येथे शरणागती पतकरावयास लावली (३ जून १८१८). त्याची श्रीमंत, पेशवे इ. पदे नष्ट करून वार्षिक आठ लाख रूपये निवृत्तिवेतन देऊन त्यास ईस्ट इंडिया कंपनीने विठूर (कानपूरजवळ) या ठिकाणी नजरकैदेतठेवले. तेथेच तो १४ जानेवारी १८५१ रोजी मरण पावला. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर इंग्रजांनी हिंदुस्थानातील मराठ्यांची प्रबळ सत्ता नामशेष केली. [⟶भोसले घराणे मराठा अंमल].


 

मराठा शिपाईगडी

मराठी सत्तेच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत महाराष्ट्रातील उच्चकुली वतनदारांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय उत्थानासाठी भारतव्यापी उलाढाली केल्या. जुनी मातब्बर सरदारांची घराणी मागे सारली गेली आणि नवी घराणी उदयास आली. या घालमेलींच्या−उलथापालथींच्या मुळाशी साधुसंतांच्या शिकवणुकीचा परिणाम शोधण्याचा प्रयत्न काही इतिहासकार करतात. न्यायमूर्ती रानडे ह्यांनी तर महाराष्ट्रातील संत चळवळीची तुलना यूरोपातील धर्मसुधारणेच्या चळवळीशी करून मराठी राज्यसत्तेच्या उदयाचे मोठे श्रेय मराठी संतांच्या शिकवणुकीला दिले आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक जीवनसृष्टी निर्माण करण्याचे श्रेय या संतांकडे जाते. याउलट वि. का राजवाडे यांनी संतांना निवृत्तिमार्गी ठरवून संतांची शिकवण ही मराठ्यांच्या लढाऊ राजकारणाला पूरक नव्हती केवळ रामदासांचेच प्रवित्तिमार्गी साहित्य आणि मठप्रसार मराठी राज्याला पूरक ठरला, अशी भूमिका घेतली आहे. या दोन्ही भूमिकांच्या मध्ये कोठेतरी ऐतिहासिक सत्य दडले आहे. मराठी भाषा आणि देश यासंबंधी ममत्वाची भावना मराठी संत-साहित्यिकांनी निर्माण केली हे खरे आहे परंतु मराठी सत्तेचा उदय ही मूलतः राजकीय घटना होती. लष्करी सामर्थ्याच्या अधिष्ठानावरच ही सत्ता उभी राहिली.

मराठी राजसत्तेच्या गौरवाची भूमिका सजवीत असताना अनेक इतिहासकारांना मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील गतिहीनतेचा आणि स्थितिबद्धतेचा बराचसा विसर पडलेला दिसतो. बहमनी काळापासून तो पेशवाईंच्या अखेरपर्यंत मध्ययुगीन महाराष्ट्रातील सत्ताधिकारी वर्गाचे धार्मिक, भाषिक आणि वांशिक व्यक्तिमत्त्व सारखे बदलत गेले असले तरी या काळात सामाजिक आणि आर्थिक चौकटीत फारसा बदल झाला नाही. सुलतानाचे जागी छत्रपती आणि पेशवा आला, वजीराच्या जागी प्रधान आला, इस्लामच्या जागी महाराष्ट्र-धर्म आला, तरी वर्तनाचे रूप बदलले नाही. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, मिराशी, वतनदार, उपरी वतनदार, बारा बलुतेदार, बारा अलुतेदार, शेटे, महाजन ही सर्व वतनदार मंडळी मौज्यात, कसब्यात आणि पेठेत जशीच्या तशी राहिली. गावातील जमीन महसुलीची पद्धती थोड्याफार फरकाने तशीच कायम राहिली. महाराष्ट्रात बव्हंशी भागात रयतवारी पद्धतीने जमीनमहसूल सरकारात जमा होई. पंचायत, गोतसभा, देशकसभा या ग्रामीण संस्थात फारसा बदल झाला नाही. मध्ययुगीन महाराष्ट्रात जे बदल झाले, ते राजकीय सत्तास्थानातील पदोन्नती-पदांतर या स्वरुपाचे होते. आर्थिक आणि सामाजिक वर्गाची आंतरिक पुनर्रचना घडून आली नाही.

मराठ्यांच्या उदयकाळीच पोर्तुगीज, डच आणि इंग्रज या तीन यूरोपीय आरमारी सत्तांनी पश्चिम भारताच्या किनाऱ्यावर प्रवेश केला होता. त्यांपैकी डचांनी फार थोड्या

 ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांवर मराठ्यांची गुराबे हल्ला करतानाचे दृश्य

अवधीत येथून पाय काढला. पोर्तुगीजांनी वसई, साष्टी आणि गोवा येथे पाय रोवले. संभाजीने गोव्यात पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाच्या आक्रमणामुळे संभाजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली.मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्लंडला आंदण दिले. वसई मराठ्यांनी सर केली आणि अखेरीस पोर्तुगीज गोव्यात कायम राहिले. इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरतेला घातली पण इंग्रजांच्या सत्तेने मूळ धरले मुंबई बेटात. मुंबई, मद्रास आणि कलकत्ता ही तिन्ही समुद्रकाठची ठाणी इंग्रजांनी एकाच काळात उभारली. मद्रास आणि कलकत्ता यांच्या सभोवतालचा मुलूख काबीज करायला फार काळ लागला नाही. पण मुंबई शहरातून मराठी मुलखात प्रवेश करण्यासाठी इंग्रजांना मराठ्यांशी तीन युद्धे करावी लागली. नारायणराव पेशव्याच्या वधानंतर रघुनाथराव पेशव्याने मुंबईकर इंग्रजांचा आश्रय घेतला. त्यामधून पहिले इंग्रज-मराठे युद्ध उद्भवले (१७७५−८२). मुंबईच्या गव्हर्नरने रघुनाथरावाला पाठीशी घालू नये, या मताचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिग्ज होता पण कंपनीच्या संचालकांनी हेस्टिंग्जच्या या मताला बाजूला सारू न मुंबईच्या गव्हर्नरची तळी उचलून धरली. वेलस्लीच्या काळात दुसरे इंग्रज-मराठे युद्ध भडकून पुणे दरबार तैनाती फौजेच्या सापळ्यात अडकला आणि १८१८ साली दुसऱ्या बाजीरावाला पुण्यातून ब्रह्मावर्ताला पाठवून शनिवारवाड्यावर इंग्रजांचे निशाण लावण्याची कामगिरी एल्फिन्स्टनने बजावली. [⟶ईस्ट इंडिया कंपन्या].

मोगलांचे पारिपत्य करणाऱ्या मराठ्यांना इंग्रजांपुढे नमावे लागले. ज्या ऐतिहासिक काळात इंग्रज आणि मराठे यांचा सामना झाला, त्या काळात इंग्लंड हे एक गतिमान, विकासोन्मुख आणि आधुनिक तंत्रविज्ञानाने औद्योगिक क्रांती झालेले सुसज्ज असे राष्ट्र होते. भारतात इंग्रजांशी सामना देणाऱ्या सर्व सत्ता या विघटन पावत असलेल्या एका मध्ययुगीन संस्कृतीची अपत्ये होती. मराठेही त्याला अपवाद नव्हते. इंग्रज-मराठी सामन्यात इंग्रजांचा विजय या अर्थाने अपरिहार्य ठरला.

रानडे, पंढरीनाथ


अर्वाचीन इतिहास : (१८१८−१९४७). दुसऱ्या बाजीरावाच्या पाडावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात मराठ्यांचा बहुतेक मुलूख आला. कंपनी सरकारने सातारच्या प्रतापसिंह महाराजांना (कार. १८१९−३९) मराठ्यांचे राज्य देतो, असे अभिवचन देऊनही फक्त सातारा जिल्ह्यापुरतेच अधिकार दिले आणि प्रत्यक्षात मांडलिक संस्थान म्हणून सर्व सत्ता आपल्याकडे ठेवली व तेथे इंग्रजी रेसिडेंट नेमला. याच वेळी सातारच्या अखत्यारीत फलटण, औंध, जत, अक्कलकोट, भोर इ. संस्थाने होती. हेच तत्त्व काही प्रमाणात पुढे कोल्हापूर व नागपूर या संस्थानांना लागू करून इचलकरंजी, गगनबावडा , कापशी, विशाळगड, कागल, सावंतवाडी आदी संस्थानांनाही काही प्रमाणात मांडलिक बनविले. त्यामुळे संस्थानांना त्यांच्या मर्यादित क्षेत्रात जरी सकृत्दर्शनी सार्वभौमत्व असले, तरीइंग्रजांचे या संस्थानांवर पूर्ण वर्चस्व होते एवढेच नव्हे, तर लॉर्ड वेलस्ली (कार. १७९८−१८०५) याच्या तैनाती फौजेच्या धोरणामुळे ग्वाल्हेर, इंदूर, बडोदे आदी संस्थानांप्रमाणेच महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या संस्थानांनाही तैनाती फौजेची कमीअधिक प्रमाणात सक्ती झाली होतीच. त्यामुळे त्या मोबदल्यात ब्रिटिशांना काही मुलूख तोडून द्यावा लागला. परिणामतः या संस्थानिकांनी आपली स्वतंत्र फौज वा सैन्य ठेवण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे उत्तर पेशवाईत मराठ्यांच्या फौजेत असलेले लहानमोठे जहागीरदार, इनामदार, गडकरी व सामान्य शिपाई असंतुष्ट झाले.

ईस्ट इंडिया कंपनीने पेशवाईच्या अस्तानंतर महाराष्ट्राला विशाल मुंबई इलाख्याचा एक भाग बनविला आणि मुंबई इलाख्यात प्रचारात असणारी प्रशासनव्यवस्था या भागाला लागू केली. मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनला (कार. १८१९−२७) काही दिवस आयुक्त नेमून पुढे त्यास मुंबईचा गव्हर्नर नेमले. त्याने एतद्देशियांना न दुखविता महाराष्ट्रात काही मौलिक सुधारणा केल्या आणि मुंबई इलाख्यात कंपनीचे राज्य स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. सावधगिरी आणि जुन्यांची जपणूक हे त्याच्या एकूण राजनीतीचे प्रमुख सूत्र होते. छोट्या जहागीरदार-जमीनदारांच्या हक्कांना धक्का न देता त्याने खानदेशातील भिल्लांस जमिनी देऊन काहींना गावपोलीस नेमून त्यांचा असंतोष कमी केला. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीतील आंग्र्यांच्या चांचेगिरीस पायबंद घातला. यावेळी उमाजी नाईक आपल्या काही सशस्त्र रामोशी साथीदारांच्या मदतीने पुरंदरच्या परिसरात धुमाकूळ घालीत होता. त्याने काही काळ पनवेलच्या पूर्वेस डोंगराच्या पायथ्याशीही तळ ठेवला होता. तो लूटालूट करी. त्याने येथून मुरवाडचा खजिना लुटला (१८२७). १८२८−२९ मध्ये या कारवायांना ऊत आला. तेव्हा कंपनी सरकारने या कोळ्या-रामोशांचा निःपात करण्याचे ठरवून त्यांचा पाठलाग केला आणि उमाजी नाईकाचे बंड मोडून काढले (१८३४). प्रशासनव्यवस्थेसाठी एल्फिन्स्टनने महाराष्ट्राची खानदेश, पुणे, अहमदनगर, कर्नाटक अशा चार बृहत् जिल्ह्यांत विभागणी करून त्या प्रत्येकावर एक जिल्हाधिकारी नेमला. जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली मामलेदार, शिरस्तेदार, कमाविसदार, पोलीसपाटील, कुलकर्णी, तलाठी अशी तालुका व खेड्यांतून अधिकाऱ्यांची श्रेणी निर्माण करण्यात आली. त्याच्या कारकीर्दविषयी रिपोर्ट ऑन द टेरिटरिज कॉकर्ड ऑफ द पेशवाज या ग्रंथात विस्तृत माहिती मिळते. महाराष्ट्राच्या इतिहासात एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्याची कारकीर्द संस्मरणीय ठरली.

एल्फिन्स्टननंतर जॉन मॅल्कम (कार. १८२७−३०), अर्ल क्लेअर (कार. १८३१−३५), रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५−३८), जे. रिव्हेट−कारनॅक (कार. १८३९−४१), जॉर्ज आर्थर (कार. १८४२−४६), जॉर्ज क्लार्क (कार. १८४७−४८), व्हायकांउट ऑकलंड (कार. १८४८−५३), लॉर्ड एल्फिन्स्टन (कार. १८५३−६०) इ. गव्हर्नरांनी महाराष्ट्रावर ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून अधिसत्ता गाजवली. मॅल्कमच्या वेळी मुंबई−पुणे दरम्यानचा बोरघाट बांधण्यात आला, महाबळेश्वरला थंड हवेचे स्थान म्हणून वस्ती झाली आणि मुंबईहून इंग्लंडला बोटींचा नियमित प्रवास सुरू झाला. रॉबर्ट ग्रँटच्या वेळी छ. प्रतापसिंह यांच्यावर आरोप लादण्यात आले आणि कारनॅकने प्रतापसिंहांना पदच्युत केले (१८३९). त्यावेळी सातारच्या गादीवर प्रतापसिंहांचा भाऊ शहाजीस बसविले. या वेळेपासून महाराष्ट्रात असंतोषाचे अस्थिर वातावरण निर्माण झाले. ⇨चतुरसिंग भोसले, नरसिंग दत्तात्रय पेटकर, धरराव पवार इत्यादींनी सातारच्या आसपासच्या भागात १८४०-४१ च्या दरम्यान एक हजार सशस्त्र फौज जमा करून उठाव केला. सातारच्या प्रतापसिंहांना गादीवर बसवावे म्हणून गर्जना दिल्या. त्यांनी विजापूर जिल्ह्यातील बादामी घेऊन तेथे भगवा झेंडा लावला व ते सशस्त्रउठावाचे ठिकाण केले परंतु ब्रिटिशांनी हा उठाव चार दिवसांतच मोडून काढला आणि नरसिंग पेटकरला जन्मठेपेची शिक्षा दिली. सातारनंतर कोल्हापूर संस्थानातही उठावास सुरूवात झाली. त्याचे प्रमुख कारण दाजी कृष्ण पंडित हा कोल्हापूरचा दिवाण त्याने छोटे जमीनदार व गडकरी यांविरुद्ध अवलंबिलेले धोरण हे होते. १८४४ मध्ये दाजी पंडिताला गडकऱ्यांनी पकडले आणि तुरुंगात डांबले व बंडाचा वणवा भुदरगड, सामानगड, विशाळगड अशा किल्ल्यांच्या परिसरात पसरला. पुढे सावंतवाडीकरांनी यात भाग घेतला. यामुळे जवळजवळ दक्षिण महाराष्ट्रात या उठावाचे पडसाद उमटले तेव्हा ले. क. ⇨जेम्स उन्ट्रमयास दहा हजार फौजेनिशी कोल्हापूरकडे पाठविण्यात आले. त्याने हे उठाव शमवून कोल्हापूर संस्थानात शांतता स्थापन केली. त्यावेळेपासून कोल्हापूर संस्थानात ब्रिटिशांचा रेसिडॅट नेमण्यात आला (१८४५). नासिक-अहमदनगर भागांतही राघोजी भांगारे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीने उठाव केला. त्याला पकडून इंग्रजांनी फाशी दिली.

लॉर्ड जेम्स डलहौसी (कार. १८४८−५६) गव्हर्नर जनरल म्हणून हिंदुस्थानात आल्यावर त्याने राज्यविस्ताराचे धोरण अंगीकारले आणि ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’ या तत्त्वानुसार दत्तकवारस नामंजूर करून अनेक संस्थाने खालसा केली. त्यात झांशी, अवधबरोबर (अयोध्या) नागपूर, सातारा ही महाराष्ट्रातील प्रमुख संस्थाने होती. या धोरणाबरोबरच त्याने टपालखाते, रेल्वे, इंग्रजी शिक्षण, विधवाविवाह−कायदा, धर्मार्थ दवाखाने आदी काही सुधारणा कंपनीचे राज्य दृढतर करण्यासाठी केल्या. याच वेळी महाराष्ट्रात इनाम आयोगामुळे छोटेमोठे जमीनदार दुखविले गेले. उत्तर भारतात १८५७ चा उठाव झाला. उठावात नानासाहेब पेशवे, ⇨तात्या टोपे, ⇨झांशीची राणी लक्ष्मीबाईइ. महाराष्ट्रीय नेते मंडळी आघाडीवर असली, तरी महाराष्ट्रात या उठावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणचे किरकोळ उठाव व कोल्हापूरच्या राजांचा भाऊ चिमासाहेब भोसले यांचा बंडखोरीचा अयशस्वी प्रयत्न, हे वगळता फारशा हालचाली झाल्या नाहीत त्यावेळी कोल्हापूरच्या देशी पलटणीच्या उठावाचाही बेत फसला. तेव्हा चिमासाहेबास अटक करण्यात आली. इंग्रजांनी कौशल्याने सर्व परिस्थिती हाताळली. मिरजेचा कोट पाडून तेथील दारुगोळा जप्त केला नरगुंद संस्थान खालसा केले आणि महाराष्ट्रात सर्वत्र शांतता प्रस्थापित केली. या उठावानंतर राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला (१८५८) व प्रजाजनांना हत्यार न बाळगण्याचा कायदा जारी करण्यात आला. तत्पूर्वी मुंबई इलाख्यात शिक्षण खात्याची स्थापना झाली (१८५५) आणि नंतर लवकरच मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली (१८५७). हिंदुस्थानातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता १८५८ च्या कायद्याने संपुष्टात येऊन इंग्लडच्या बादशाहीचा प्रत्यक्ष अंमल सुरू झाला.


जॉर्ज रसेल क्लार्क (कार. १८६०−६२), हेन्री फ्रीअर (कार. १८६२−६७), विल्यम सिमोर (कार. १८६७−७२), फिलिप वुडहाउस (कार. १८७२−७७), रिचर्ड टेंपल (कार. १८७७−८०), जेम्स फर्ग्युसन (१८८०−८५), बॅरन रे (कार. १८८५−९०), बॅरन हॅरिस (कार. १८९०−९५), बॅरन सँडहर्स्ट (कार. १८९५−९९). हेन्री स्टॅफर्ड नॉर्थकोट (कार. १८९९−१९०३), बॅरन लॅमिग्टन (कार. १९०३−०७), जॉर्ज सिडनहॅम (कार. १९०७−१३), बॅरन विलिंग्डन (कार. १९१३−१८), जॉर्ज अँग्व्रोझ लॉइड (१९१८), लेस्ली विल्सन (१९१८−२३) हे गव्हर्नर मुंबई इलाख्यावर नेमण्यात आले. त्यांपैकी टेंपल, फर्ग्युसन, विल्सन इत्यादींच्या कारकीर्दीत शैक्षणिक सुधारणा झाल्या आणि बॉम्बे गॅझेट, प्रभाकर, केसरी, मराठा (इंग्रजी), काळ यांसारखी वृत्तपत्रे निघाली. पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलव फर्ग्युसन कॉलेज यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. मुंबईचे व्यापारी पेठ म्हणून महत्त्व वाढले. तेथे शिक्षणाबरोबरच सामायिक भांडवलदारांच्या कंपन्या निघाल्या आणि भारतीय व्यक्ती व्यापारात सहभागी होऊ लागल्या. व्यापाराबरोबरच धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत सुधारणांचे पाऊल पडू लागले. महाराष्ट्रात याच सुमारास दुष्काळ, शेतकऱ्यांचे दंगेधोपे, अबकारी कायद्याचा अंमल इ. महत्त्वाच्या घटना घडल्या. १८७५ साली पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे सावरकारांना लुबाडले. त्यामुळे दुष्काळ निवारण्याचे प्रयत्न सार्वजनिक संस्था व शासनातर्फे सुरू झाले परंतु १८७८ मधील अबकारी कायद्याने कोकणातील दीनदुबळ्या जनतेला विशेषतः भंडाऱ्यांना सतावून सोडले. तसेच खोती कायद्याची अंमलबजावणी केल्याने खोतांस निर्बल केले. शासनाने दिलासा देण्यासाठी १८७९ मध्ये एक कायदा करून सावकारांच्या पाशांतून शेतकऱ्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असला, तरी लोकांच्या मनातील असंतोष वाढत होता. त्यातून वैयक्तिक स्तरांवर दंगेधोपे होत असत, ते दडपलेही जात. ⇨वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र उठावाचे रणशिंग फुंकले. त्यांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य युद्धात (१८७८) दौलतराव रामोशी, गोपाळ मोरेश्वर साठे आदी मंडळीनी प्रकटपणे भाग घेतला आणि धामारी, दावडी, वाल्हे, सोनापूर, चांदखेड इ. गावे लुटली तसेच गव्हर्नर व इंग्रज अधिकारी यांना खुनाची धमकी दिली. त्यामुळे साऱ्यामहाराष्ट्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर वासुदेव बळवंत विश्वासघाताने पकडले गेले आणि जन्मठेपेची शिक्षा भोगीत असताना एडनच्या तुरुंगात १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मरण पावले. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी एकाकी लठा देणारा पहिला क्रांतिवीर म्हणून फडक्यांचे नाव अमर झाले.

टिळकयुगाचा १८९० ते १९२० हा कालखंड. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीची एकही संधी दवडली नाही. या काळात महाराष्ट्रात अठरा दुष्काळ पडले आणि १८९७ मध्ये प्लेगच्या साथीने हजारोंचे प्राण घेतले. शासनाने दुष्काळ निवारणाच्या योजना आखल्या आणि ‘फॅमिली रिलीफ कोड’ सारखे कायदे केले पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिरंगाई व टाळाटाळ केली काही इंग्रज अधिकाऱ्यांनी अत्याचार केले, तेव्हा टिळकांनी केसरीतून परखड अग्रलेख लिहून टीका केली. याच सुमारास पुण्यात रँड प्रकरण उद्भवले. २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूनी रँड व आयर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केला. चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. या घटनांमुळे स्वातंत्र्याचा लढा अधिक उग्र झाला. ⇨वि. दा. सावरकरांनी नासिकला ‘मित्रमेळा’ या नावाची प्रकट कार्य करणारी संस्था स्थापन केली. तिचे पुढे १९०४ मध्ये ⇨अभिनव भारत या संस्थेत रूपांतर झाले. त्यात वामनशास्त्री दातार, विष्णुशास्त्री केळकर, आबासाहेब मुजुमदार, अनंत कान्हेरे इ. सामील होते. ⇨अनंत कान्हेरे यांनी नासिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून केला (१९०९) आणि कान्हेरे-सावरकरांसह अडतीस जणांना कारावासात टाकण्यात आले. सावरकरांना जन्मठेप व कान्हेरेला फाशीची शिक्षा देण्यात आली तथापि अभिनव भारत या गुप्तसंघटनेचे कार्य पुढे चालूच राहिले.


लॉर्ड कर्झन गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आल्यानंतर १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली. तेव्हा लो. टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही सुप्रसिद्ध चतुःसूत्री दिली व स्वराज्याचा लढा उग्र केला. पुढे लोकमान्यांना राजद्रोही ठरवून सहा वर्षांची शिक्षा झाली (१९०८). लोकमान्यांनी महाराष्ट्राला भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून जनजागृतीचे महान कार्य केले.

सर फ्रेडरिक साइक्स (कार. १९२८−३०), लॉर्ड ब्रेबोर्न (कार. १९३०−३३), लॉरेन्स रॉजर लमली (कार. १९३३−३७), जॉन कॉलव्हिल (कार. १९३७−४३), अँड्र्यू क्लो (कार. १९४३−४५), व्ही राममूर्ती (कार. १९४५−४७) व जॉन कॉलव्हिल (१९४७) इ. गव्हर्नर मुंबई इलाख्यात नेमले गेले. त्यांनी ब्रिटिश सरकारचे स्वातंत्र्य लढा दडपण्याचेच धोरण पुढे चालविले. साइक्स व ब्रेबोर्न या दोघांना शिक्षण आणि खेळ यांत रस होता. त्यांच्या प्रेरणेने काही सार्वजनिक संस्थांना सुरूवात झाली एवढेच.

टिळकयुगात आणि नंतरही (१९१०−३२) महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारक गुप्तसंघटना निर्माण होत होत्या. त्या प्रयत्नांत कोल्हापूरच्या शिवाजी क्लबची प्रामुख्याने गणना होते. त्या गुप्तसंघटनेत ⇨गंगाधरराव देशपांडे, गोविंदराव याळगी, दामुअण्णा भिडे, बाळोबा मोरे इ. प्रमुख मंडळी होती आणि तिच्या शाखा पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी जिल्ह्यात होत्या. यांतील अनेक लोक सरकारच्या हाती सापडले आणि त्यांना शिक्षाही झाल्या.

याच सुमारास सोलापूर शहरात ब्रिटिश सरकारने सतत दोन महिने मार्शल लॉ पुकारून लोकांचा अनन्वित छळ केला आणि तेथील मल्लाप्पा घनशेट्टी, कुर्बान हुसैन अशा काही निरपराध देशभक्तांना फाशी दिले. त्यामुळे वासुदेव बळवंत गोगटे या फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थ्याने सर अर्नेस्ट हॉटसन या मुंबईच्या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. त्याला आठ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली (१९३१).

या सर्व लहानमोठ्या प्रयत्नांबरोबरच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्य पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यांत नेटाने चालू होते. काँग्रेसची रीतसर स्थापना ⇨ए. ओय ह्यूम, ⇨लॉर्ड डफरिन आदी इंग्रजांच्या सहकार्याने २८ डिसेंबर १८८५ मध्ये मुंबईत झाली आणि ⇨उमेशचंद्र बॅनर्जी तिचे पहिले अध्यक्ष झाले. पुढे ⇨महात्मा गांधींच्या हाती काँग्रेसची सर्व सूत्रे गेली आणि एकापाठोपाठ एक अशी देशव्यापी आंदोलने उभारु न म. गांधीनी स्वातंत्र्य चळवळीला चेतना दिली. १९२० साली असहकाराची चळवळ झाली [⟶असहकारिता]. १९३० साली सविनय कायदेभंगाचे आंदोलन उभे राहिले आणि दांडी यात्रेला प्रारंभ झाला १९४० मध्ये वैयक्तिक ⇨सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले आणि या चळवळीचा खरा कळस १९४२ च्या ⇨ छोडो भारत आंदोलनाने झाला. या सर्व आंदोलनांना महाराष्ट्राने संघटित व सक्रिय प्रतिसाद दिला. छोडो भारताचा ठराव ८ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला भरलेल्या काँग्रेसच्या सभेत संमत झाला आणि देशाच्या कोनाकोपऱ्यातून क्रांतीच्या ज्वाला भडकल्या. काही निवडक नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. काही नेत्यांची धरपकड झाल्यानंतर जनतेने हा लढा उत्स्फूर्तपणे पुढे चालविला. याबरोबरच सातारा-सांगली भागांत काही क्रांतिकारकांनी प्रतिसरकारे स्थापली. ⇨नाना पाटील, किसन वीर, लाडबंधू, ⇨वसंतदादा पाटील यांसारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी प्रतिसरकारे स्थापण्यात आली. पत्रीसरकार म्हणूनही ते त्यावेळी संबोधले जाई. या लढ्यातील लोक भूमिगत राहून आंदोलन नेटाने रेटीत होते. या प्रतिसरकारांनी सशस्त्र फौज, गावठी बाँब आदी तयार करण्याचे प्रयत्न केले. [⟶भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास].

अखंड हिंदुस्थान हे हिंदू  महासभेचे ध्येय होते. तिने राजकारणामध्ये १९३७ मध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून पदार्पण केले. तिची सर्व सूत्रे वि. दा. सावरकरांच्या हाती होती.


बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्पृश्यांच्या उद्धाराची व त्यांवर होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याची चळवळ हाती घेतली आणि या चळवळीला सर्वस्वी वाहून घेतले.

बेचाळीसच्या आंदोलनातील एक गुप्त पाक्षिक बुलटेन छोडो भारत आंदोलन–१९४२ : गुप्तपाक्षिकाचा नमुना.
अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांचे संघटन करण्यास प्रारंभ केला आणि त्या प्रचारार्थ मुंबई येथे मूकनायक नावाचे पाक्षिक काढले (१९२०) कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे एक परिषद घेतली (१९२०) आणि स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले. नागपूरला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी स्थापन केली (१९२४). ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महारमेळाव्यात त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा आदेश दिला (१९२६). १९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला (१९२७) आणि मनुस्मृती जाळली. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवदर्शन व्हावे, म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह १९३० साली नासिक येथे काळाराम मंदिर-प्रदेशासाठी सत्याग्रह केला. बहिष्कृत भारत, जनता, समता इ. नियकालिकांद्वारे त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी व इतर संस्थांद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला. अस्पृश्यांच्या इतर नागरी हक्कांबरोबर स्वतंत्र मतदारसंघाचाही त्यांनी मागणी केली. म. गांधी व आंबेडकर ह्या दोघांत राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयी चर्चा होऊन २४ सप्टेंबर १९३२ रोजी सुप्रसिद्ध ⇨पुणे करार झाला. आपल्या राजकीय मागण्यांसाठी त्यांनी १९४२ मध्ये ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला. या पक्षातर्फे अस्पृश्यांकरिता त्यांनी अनेक लढे दिले.

 

स्वातंत्र्य लढ्यात विदर्भ व मराठवाडा या भागांचा वाटाही उल्लेखनीय आहे. १९०२ मध्ये हैदराबादच्या निजामाने बेरार (वऱ्हाड) हा मोठा भूप्रदेश ब्रिटिश सरकारला भाड्याने दिला. तेव्हा तो मध्य प्रदेशाला जवळ म्हणून शासकीय दृष्ट्या मध्य प्रांतात गेला. या भागातील काँग्रेसजनांनी सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेतला.

मराठवाड्याचा बराचसा भूभाग हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होता. ⇨स्वामी रामानंद तीर्थयांच्या मार्गदर्शनाखाली  हैदराबाद स्थानात हैदराबाद स्टेट काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढा दिला. संस्थानाने या काँग्रेसवर बंदी घातली आणि अनेक नेत्यांना तुरुंगात डांबून छळ केला. वंदेमातरम् सत्याग्रह आणि छोडो भारत आंदोलनात मराठवाड्याने विशेष सहभाग घेऊन काँग्रेसला साथ दिली. [⟶मराठवाडा हैदराबाद संस्थान].

रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २८ जानेवारी १९४० रोजी मुंबईस संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली आणि बेळगावच्या १९४६ च्या मराठी साहित्य संमेलनात प्र. के. अत्रे व ग. त्र्यं. माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची घोषणा केली. स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांची सुटका १९४५ मध्ये झाली आणि भारतीय स्वातंत्र्याबरोबर मुंबई राज्याची स्थापना झाली (१९४७).

देशपांडे, सु. र.

राजकीय स्थिती

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत राष्ट्र स्वतंत्र झाले. त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याकरिता देशातील लोकप्रतिनिधींची संविधान समिती स्थापन झाली. या संविधान समितीने संमत केलेल्या भारताच्या संविधानामध्ये भाषिक प्रदेश राज्यांची स्थापना करण्यासंबंधी नियमावली अंतर्भूत केली नव्हती परंतु १९२१च्या अहमदाबाद येथील इंडीयन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात भाषिक प्रदेश राज्ये होणे आवश्यक आहे, असा ठराव संमत झाला होता. भारताच्या संविधनामध्ये भाषिक राज्यांची निर्मिती व्हावी, याबद्दल कसलाही संकेत अंतर्भूत न झाल्यामुळे ब्रिटिश राजवटीतील महत्त्वाचे प्रांत विभागच सामान्यपणे स्वीकारु न लोकसभा आणि राज्यसभा कार्यवाहीत आल्या तसेच प्रांतिक विधिमंडळेही अस्तित्वात आली. त्यामुळे भाषिक राज्यांची मागणी करणारे आंदोलन भारतात वाढू लागले. या आंदोलनाबरोबरच संस्थानिक प्रजांचे संस्थानांच्या विलिनीकरणाचे आंदोलन सुरू झाले. या भाषिक प्रदेशांच्या मागणीचे आणि संस्थानांच्या विलिनीकरणाचे आंदोलन महाराष्ट्रातही अधिक वेगाने पसरू लागले. त्या वेळचे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्देगिरीने शांततेच्या मार्गाने भारतातील शेकडो संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली परंतु ⇨हैदराबाद संस्थान पोलीस कारवाईच्या म्हणजे सैनिकी दडपणाच्या द्वारे मुक्त करावे लागले.


महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे आंदोलन १२ मे १९४६ या दिवशी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या द्वारे अनेक संयुक्त महाराष्ट्र परिषदांची अधिवेशने भरली. संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र संस्था १९५५ पर्यंत या आंदोलनाचे नेतृत्व करीत राहिली. या परिषदेत वेळोवेळी संमत झालेल्या ठरावांचा सारांश असा होता : भारतात लोकशाही राज्यघटना यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक राज्यांची रचना भाषावर करणे हेच इष्ट आणि आवश्यक आहे या सिद्धांतानुसार सर्व मराठी भाषिक प्रदेशांचा एक सलग प्रांत शक्य तितक्या लवकर स्थापन करण्यात यावा, मराठी भाषिक प्रदेशांचे निरनिराळ्या प्रदेश राज्यांमध्ये तुटक विभाग पडलेले आहेत ते सर्व समाविष्ट करून संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे. हे तुटक विभाग पुढीप्रमाणे : (१) तत्कालीन अनेक भाषिक मुंबई प्रांतातील मुंबई शहरासह मराठी भाषिक भूप्रदेश, (२) वऱ्हाड-मध्य प्रांतातील हिंदी भाषिक प्रदेश वगळून असलेला विदर्भ भूप्रदेश, (३) हैदराबाद वगैरे देशी संस्थानातील मराठी भाषिक भूप्रदेश, (४) पोर्तुगीज अंमलाखालील गोमंतक.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील काँग्रेसतर सर्वपक्षीय नेत्यांची सभा, शिवाजी पार्क, मुंबई.

भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपले लष्करी पोलीस सैन्य हैदराबाद संस्थानात धाडले. हैदराबाद संस्थानात त्यावेळी मुसलमानांची रझाकार चळवळ सुरू होती. जाळपोळ, दंगे व लु टालूट इ. प्रकारे रझाकार चळवळ हिंदूना सतावत होती. अनेक मध्यमवर्गीय व सुशिक्षित हिंदूना या रझाकार चळवळीची झळ सोसावी लागली. संस्थान सोडून बाहेरच्या प्रदेशात प्रतिष्ठित हिंदूनी आसरा घेतला. संस्थानिक प्रजेचा लढाही सुरू होता. संस्थानिक प्रजेच्या उठावामुळे या रझाकार बंडाळीचा चार दिवसांत बीमोड झाला. भारत सरकारने निजामाचे मंत्रिमंडळ बरखास्त करून निजामाला राजीनामा देण्याची सूचना दिली. भारत सरकारच्या सूचना त्याने निमूटपणे मान्य केल्या. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने राजीनामा दिला. १९ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारच्या प्रशासकाचा कारभार तेथे सुरू झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे महाराष्ट्राच्या भावी भाषिक राज्यात ⇨मराठवाडा सामील करून अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

पोर्तुगीज अंमलाखाली असलेल्या गोमंतक राज्यात १९४६ पासून स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा गोमंतक मुक्तिसंग्राम हा कालांतराने भाग बनला. १९५४ सालीगोमंतक मुक्तिसंग्राम हा सत्याग्रह बनला. गोव्याच्या हद्दीच्या बाहेरील शेकडो महाराष्ट्रीय देशभक्त गोव्याच्या हद्दीत घुसून सत्याग्रह करु लागले. भारताचाही या मुक्तिसंग्रामाला पाठिंबा मिळाला. १८ डिसेंबर १९६१ रोजी भारताने लष्करी कारवाई केली व १९६२ च्या प्रारंभी गोवा भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यात आले. नंतर निवडणुका होऊन ३० डिसेंबर १९६३ मध्ये लोकनियुक्त मंत्रिमंडळाच्या हाताखाली शासन काम करू लागले. १६ जानेवारी १९६७ रोजी गोवा महाराष्ट्र राज्यात विलीन करावे की नाही, यासंबंधी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा विलीन करु नये, असेच ठरले. [⟶गोवा, दमण, दीव].

 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्म्यांचे स्मारक, फ्लोरा फाउंटन, मुंबई.

भारतात आणि महाराष्ट्रात भाषिक प्रदेश राज्यांच्या मागणीचे आंदोलन प्रखर होऊ लागले, तेव्हा त्यात आंध्र प्रदेश राज्याच्या मागणीला प्रथम अधिक तीव्र स्वरूप आले. त्यानंतर महाराष्ट्राच्या आंदोलनाला भरती येऊ लागली. हा भाषिक राज्यांच्या मागणीचा असंतोष पसरत आहे आणि वाढत आहे, हे पाहून भारत सरकारने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. या आयोगाने आपला अहवाल १० ऑक्टोबर १९५५ मध्ये प्रसिद्ध केला. या अहवालात विदर्भाचे स्वतंत्र राज्य सुचविले आणि कन्नड भाषिक जिल्हेवगळून, मराठवाडा धरु न, गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबई राज्याचे त्या वेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी १८ नोव्हेंबर १९५५ रोजी सुरू झालेल्या अधिवेशनापुढे मान्यतेचा शिक्कामोर्तब मिळवण्याचा प्रयत्न केला अनेक दिवस चर्चा झाली शिक्कामोर्तब मिळाला नाही. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. खरा वांध्याचा मुद्दा मुंबईवाचून संयुक्त महाराष्ट्र की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, हा होता. गुजरातला मुंबईपासून अलग असे शासन नको होते कारण गुजरातचा व मुंबईचा व्यापारी व्यवहार एकमेकांत अतिशय गुंतलेला होता परंतु गुजरातमध्येदेखील सलग गुजरात भाषिक प्रदेशाची मागणी वाढू लागली आणि तीही चळवळ उग्र बनत गेली. महाराष्ट्रामध्ये चालू असलेले जनतेचे आंदोलन दडपण्याकरता मोरारजींच्या शासनाने कठोर उपाय योजले. या चळवळीत ३१,०९२ इसमांना अटक करण्यातआली, १९,४४५ लोकांवर खटले भरले व त्यांतील १८,४१९ लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई शहरात आणि महाराष्ट्रातील इतर नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळी गोळीबार करण्यात आला. सु. ५०० दुकाने लुटली ८० ट्रामगाड्यांची आणि २०० बसगाड्यांची मोडतोड केली. झालेल्या गोळीबारांमध्ये १०५ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्याता आले.


राज्यशासनाने उभारलेल्या हुतात्मा स्मारकांचा एक प्रातिनिधिक नमुना, वाई (जि.सातारा).

महाद्वैभाषिक मुंबई राज्य १ नोव्हेंबर १९५६ मध्ये अस्तित्वात आले. काँग्रेस पक्ष बहुमताने निवडून आला. नेतेपदी ⇨यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची काँग्रेस पक्षीय सदस्यांच्या बहुमताने निवड झाली. हे द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने दंगली मात्र उसळल्या नाहीत. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदावरून घोषणा केली की, चळवळ दडपण्याकरता हत्यार मी मुळीच वापरणार नाही. १९६० साली यशवंतराव चव्हाण यांनी भारत सरकारच्या केंद्रीय नेत्यांना पटवून दिले की, यापुढच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींचे बहुमत राहणार नाही. ही गोष्ट जवाहरलाल नेहरुंसारख्या नेत्यांना पटली आणि महाराष्ट्र व गुजरात या दोन प्रदेश राज्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठी भाषिक बेळगाव-कारवार इ. भूप्रदेश तत्कालीन म्हैसून राज्यात (विद्यमान कर्नाटक राज्यात) समाविष्ट झाले. ते भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याकरिता महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली. त्या समितीचे नेतृत्व बेळगाव येथील मराठी भाषिक जनतेच्या प्रमुख प्रतिनिधींनी चालविले. निजलिंगप्पा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने माजी न्यायाधीश मेहरचंद महाजन यांचा एकसदस्य आयोग स्थापन झाला. त्याचा निवाडा उभयपक्षी मान्य होईल, अशी हमी घेण्यात आली. महाजन आयोगाचा निवाडा बाहे आला (१९६७). त्यात प्रत्यक्ष बेळगाव शहर व कारवार जिल्ह्यातील मराठी भाषिक भागही कर्नाटकातच समाविष्ट केला. त्यामुळे महाराष्ट्र सलग प्रदेश राज्य निर्माण करण्याचा प्रश्न तसाच लोंबकळत राहिला. आतापर्यंत विधानसभांच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या, त्यांमध्ये कर्नाटकातील या मराठी भाषिक प्रदेशातून महाराष्ट्र एकीकरण समितीचेच प्रतिनिधी निवडून आले तरी हा जनमताचा कौल अजून बेळगाव-कारवारचा प्रश्न सोडविण्यास समर्थ ठरलेला नाही.

१९७७ ते १९८० पर्यंतचा कालखंड वगळल्यास भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई राज्यात आणि त्याबरोबर महाराष्ट्रात इंडियन नॅशनल काँग्रेसचाच आतापर्यंत राजकीय प्रभाव राहिला आहे. तो प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न प्रथम १९४९ साली काही काँग्रेस जनांनीच,ग्रामीण महाराष्ट्राचा पाठिंबा मिळेल, अशा आशेने सुरू केला. शेतकरी कामकरी पक्षाची स्थापना झाली. बहुजन समाजातले काही मुरब्बी नेते काँग्रे स सोडून या नव्या पक्षाचे नेतृत्व करु लागले. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव, र. के. खाडिलकर इ. काही त्या पक्षाचे प्रमुख नेते होत. १९५२ सालची नव्या संविधानावर आधारलेली भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. महाराष्ट्रात काँग्रेसविरुद्ध शेतकरी कामकरी पक्ष असा निकराचा सामना होऊन जेधे–मोरे यांचा हा नवा पक्ष हार खाऊन खाली बसला. या पक्षातील अनेक नेते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले तरी हा पक्ष आतापर्यंत (१९८५) महाराष्ट्रात स्थिरावला आहे.

स्वतंत्र भारताचे संविधान निर्माण करण्यात ज्यांचा मुख्य भाग होता, ते अस्पृश्य मानलेल्या हरिजनांचे व दलितांचे श्रेष्ठ नेते ⇨भिमराव रामजी आंबेडकर यांनी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन हा पक्ष १९४२ साली स्थापिला त्याचेच रूपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या राजकीय पक्षात १९५६ मध्ये झाले. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रातील वर्गीकृत जाति-जमातींवरच विशेषकरून राहिला आहे. हा पक्ष पुढे महाराष्ट्रातही एकसंघ राहिला नाही. त्यातून अनेक गट निर्माण झाले. अखिल भारतीय स्तरावर काम करणारे अनेक डावे-उजवे पक्ष महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्वकालापासून अस्तित्वात आहेत. १९२५ साली मुंबईत स्थापन झालेला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महाराष्ट्रात आणि भारतात अजून अस्तित्वात आहे परंतु त्यातूनच स्वातंत्र्योत्तर काळात १९६४ मध्ये फुटून निघालेला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) हा पक्ष पश्चिम बंगाल राज्यात विशेष प्रभावी ठरला आहे. महाराष्ट्रात या पक्षाचे सदस्य असले, तरी त्यांचा महाराष्ट्रात विशेष प्रभाव नाही.

भारत स्वतंत्र झाल्यावर जे अनेक समाजवादी डावे पक्ष अखिल भारतीय स्तरावर निर्माण झाले, त्यांत महाराष्ट्रातील लोकशाही समाजवादाच्या ध्येयवादाने प्रेरित झालेले एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे, अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन इ. मंडळींचा पुढाकार राहिला. समाजवादी पक्षातूनही अनेक पक्ष निर्माण झाले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा १९७७ साली लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करण्याकरिता अस्तित्वात आलेल्या जनता पक्षात समाजवादी पक्ष विलीन झाले. या जनता पक्षाने १९७७ ते १९७९ पर्यंत अडीच वर्षे भारतावर वर्चस्व महाराष्ट्रात १९८० पर्यंत राहिले. या जनता पक्षाच्या राजवटीच्या अवधीत इंडियन नॅशनल काँग्रेसमधून जे अनेक काँग्रेस नाव धारण करणारे राजकीय पक्ष अस्तित्वात आले, त्यातला इंदिरा गांधींनी संघटीत केलेला काँग्रेस (इंदिरा) पक्ष १९८० सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वी झाला आणि त्याच साली झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तो पक्ष यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्यावर शासन करु लागला. डिसेंबर १९८४ मध्ये झालेल्या आठव्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस (इंदिरा) पक्षाचे ४८ पैकी ४३ उमेदवार निवडून आले णि केंद्रात काँग्रेस (इंदिरा) पक्षास प्रचंड बहुमत प्राप्त होऊन इंदिरा गांधीचे पुत्र राजीव गांधी हे पंतप्रधान झाले (३१ डिसेंबर १९८४).


महाराष्ट्रात राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनसंघ या पक्षाचा फार थोड्या निर्वाचन क्षेत्रांमध्ये प्रभाव राहिला आहे परंतु भारतीय जनसंघाचा अखिल भारतीय स्तरावर पाठिंबा असलेली ⇨राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची सांस्कृतिक संघटना १९२५ साली ⇨केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे स्थापन केली. यालाच संक्षेपाने आर्.एस्.एस्. या संघटनेला प्रथमआयुष्य वाहिलेले महाराष्ट्रीय कार्येकर्ते मिळाले. त्यानंतर भारतातील सगळ्या भाषिक प्रदेशांमध्ये संघाच्या शाखा व उपशाखा विस्तारत गेल्या. ही संघटना राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरत नाही परंतु प्रथम भारतीय जनसंघ म्हणून अस्तित्वात आलेला, त्यानंतर १९७७ साली अस्तित्वात आलेल्या जनता पक्षात विलीन झालेला आणि त्याचेच नामांतर होऊन अस्तित्वात आलेला भारतीय जनता पक्षास राजकीय दृष्ट्या आर्.एस्.चाच पाठिंबा मिळालेला आहे तथापि १९८४ च्या आठव्या लोकसभेच्या निवडणुकीत आर्.एस्.एस्.ने भा.ज. पक्षाला पाठिंबा दिल्याचा कोठेही पुरावा मिळत नाही.

हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर माधवराव सदाशिवराव गोळवलकर हे सरसंघचालक झाले. गोळवलकरांच्या कारकीर्दीत संघटनेची लिखित घटना तयार झाली. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीचा वध झाला. त्यावेळी काही कालापर्यंत संघ हा बेकायदेशीर ठरला. ही संघबंदी थोड्याच काळात शासनाने उठवली आणि १९४९ ते १९७३ पर्यंत सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत संघाची वाढ झाली. १९७३ मध्ये गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर मधुकर दत्तात्रय देवरस यांची सरसंघचालकपदी नेमणूक झाली. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक आणि सामाजिक चळवळीला महत्त्व देऊन सांस्कृतिक समानतेचा पुरस्कार केला आणि हिंदू शब्दाच्या व्याख्येत सगळ्या भारतीय नागरिकांचा समावेश होतो, या कल्पनेचा पुरस्कार चालविला.

लोकशाहीच्या दृष्टीने ग्रामीण महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून १९६१ साली महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा विधानसभेने संमत केला आणि हा कायदा १ मे १९६२ पासून अंमलात आला. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने टाकलेले अत्यंत महत्त्वाचे असे हे पाऊल ठरले आणि इतर भारतीय प्रदेश राज्यांमध्ये अशी ही मूलगामी लोकशाही निर्माण करणारी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदा यांची संघटना महाराष्ट्राने टाकलेले प्रगतीचे हे पाऊल पाहून निर्माण करण्यात आली.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

शासनयंत्रणा : १ नोव्हेंबर १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार तत्कालीन मुंबई राज्याची पुनर्रचना करण्यात येऊन द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये कच्छ आणि सौराष्ट्र यांचा समावेश करण्यात येऊन हैदराबाद संस्थानच्या (तत्कालीन हैदराबाद राज्य) अखत्यारीतील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग आणि मध्य प्रदेश राज्यातील विदर्भ (वऱ्हाड) हा भाग अंतर्भूत करण्यात आले. याच वेळी बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड जिल्ह्यांतील कन्नड भाषिक प्रदेश मुंबई राज्यातून वेगळा करून तत्कालीन म्हैसूरराज्यात (विद्यमान कर्नाटक राज्यात) अंतर्भूत करण्यात आले व बनासकांठा हा तालुका राजस्थान राज्यात समाविष्ट करण्यात आला.

१९६० च्या मुंबई पुनर्रचना कायद्यानुसार या द्वैभाषिक मुंबई राज्याचे पुन्हा विभाजन करण्यात आले आणि १ मे १९६० रोजी गुजराती भाषिक १७ जिल्ह्यांचा अंतर्भाव गुजरात या स्वतंत्र राज्यात करण्यात येऊन उरलेल्या मराठी भाषिक जिल्ह्यांसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली.

भारतीय संघराज्यातील हे एक घटक राज्य असून राष्ट्रपतींना नेमलेला राज्यपाल विधिमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्याद्वारे व सल्ल्यानुसार शासनव्यवस्था पाहतो. विधिमंडळ द्विसदनी असून त्याची विधानसभा व विधानपरिषद अशी दोन स्वतंत्र गृहे आहेत. विधानसभेत २८८ निर्वाचित सभासद असून अँग्लो-इंडियन समाजातील आणखी एक सभासद राज्यपालांतर्फे नियुक्त करण्यात येतो. विधानपरिषदेत एकूण ७८ सभासद असतात.राज्यातून लोकसभेत ४८ सभासद निवडून दिले जातात व राज्यसभेत १९ सभासद महाराष्ट्रातून निवडले जातात.

१९८० च्या सार्वत्रिक निवडणूकीत पक्षोपक्षांचे बल पुढीलप्रमाणे होते : काँग्रेस (इंदिरा) १८६ काँग्रेस (अरस) ४७ जनता १७ भारतीय जनता १४ अपक्ष २४. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ६ मार्च १९८५ रोजी महाराष्ट्रात पक्षोपक्षांचे बल पुढीलप्रमाणे होते : काँग्रेस (इंदिरा) १६२ काँग्रेस (स) ५४ जनता २० भारतीय जनता १६ शे. का. प. १३ कम्युनिस्ट २ कम्युनिस्ट (मार्क्स) २ अपक्ष १९ नियुक्त १. विधानसभेतील बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची राज्यपाल मुख्यंत्री म्हणून नियुक्ती करतात. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने ते इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. मंत्रिमंडळ हे विधानसभेला सामुदायिक रीत्या जबाबदार असते. मुख्य सचिव हा शासकीय व प्रशासकीय कामाचे नियोजन व सुसूत्रीकरण करतो.

स्वातंत्र्योत्तर काळात विशाल मुंबई राज्य, मुंबई द्वैभाषिक राज्य आणि महाराष्ट्र अशा तिन्ही अवस्थांत असलेल्या या घटक राज्यात दुष्काळ, भूकंपादी नैसर्गिक आपत्तींना शासनाला तोंड द्यावे लागले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने कूळ कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, दारुबंदी यांसारखे काही प्रागतिक कायदे अंमलात आणले. तसेच अनुसूचित जाति-जमाती, आदिवासी व इतर दुर्बळ घटक यांच्या कल्याणार्थ काही विधायक योजना कार्यान्वित केल्या. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने राज्य कायद्यानुसार ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा अशी त्रिसूची योजना १९६१ च्या कायद्याने अंमलात आणली. शहरी तसेच ग्रामीण भागात औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य, वीज व पाणी, घरबांधणी इ. बहुविध क्षेत्रांत प्रगती घडवून आणली.

प्रशासन व्यवस्था : प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची विभागणी पुढील ३० जिल्ह्यांत केली आहे : अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, जालना, लातूर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नासिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, यवतमाळ आणि मुंबई.


प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हाधिकारी हा प्रमुख शासकीय अधिकारी असून जिल्ह्याची प्रशासनाच्या सोयीसाठी पुन्हा तालुक्यांत विभागणी केली आहे. प्रत्येक तालुक्यावर तहसीलदार हा प्रमुख असतो. राज्यशासनाचा कारभार वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांकडे सोपविलेला असून प्रत्येक मंत्रालयाचा एक सचित्र असतो आणि धोरणात्मक बाबी, सर्वसामान्य प्रशासन यांबाबतीत तो संबंधित मंत्र्याला साहाय्य करतो. प्रशासनात मंत्रालय हा महत्त्वाचा घटक असून सर्वोच्च पातळीवरील निर्णयात समन्वय साधण्याचे व त्याची कार्यवाही करण्याचे काम मंत्रालयातीलसचिवांमार्फत केले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्वतंत्र आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केले जाते. या आयोगाचा अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करतात.

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 
१. बाळ गंगाधर खेर : (कार. ३ एप्रिल १९४६−१६ एप्रिल १९५२)
२.  मोरारजी देसाई : (कार. १७ एप्रिल १९५२−१६ ऑक्टोबर १९५६)
३.  यशवंतराव चव्हाण : [कार. १७ ऑक्टोबर १९५६−१ मे १९६०(द्वैभाषिक मुंबई राज्य) आणि १ मे १९६०−१९नोव्हेंबर १९६२]
४.  मारोतराव कन्नमवार : (कार. २० नोव्हेंबर १९६२−२४ नोव्हेंबर१९६३−मृत्यू)
५.  वसंतराव नाईक : (कार. ५ डिसेंबर १९६३−१९ फेब्रुवारी१९७५)
६.  शंकरराव चव्हाण : (कार. २१ फेब्रुवारी १९७५−१६ एप्रिल

१९७७)

७.  वसंतदादा पाटील : (कार. १७ एप्रिल १९७७−१७ जुलै १९७८)
८. शरद पवार

राष्ट्रापती राजवट

:

:

(कार. १८ जुलै १९७८−१७ फेब्रुवारी १९८०)

(१७ फेब्रुवारी १९८०−१३ जून १९८०)

९. अब्दुल रहमान

अंतुले

: (कार. १४ जून १९८०−१९ जानेवारी १९८२)
  १०. बाबासाहेब भोसले : (कार. २० जानेवारी १९८२−३१ जानेवारी१९८३)
११. वसंतदादा पाटील : (कार. १ फेब्रुवारी १९८३−−)

स्थानिक स्वराज्य संस्था : इंग्रजी अमदानीतील मुंबई इलाख्यात १८८४-८५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक कायदे संमत झाले. त्यानुसार ग्रामपंचायतींकडे काही सार्वजनिक कामे आणि सुविधांची जबाबदारी सोपविण्यात आली. लॉर्ड रिपनसारख्या उदारमतवादी गव्हर्नर जनरलंच्या धोरणामुळे नागरी सुखसोयी पुरविणाऱ्या कँटोनमें, नगरपालिका, महानगरपालिका यांसारख्या संस्था विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत मुलकी इलाख्याच्या बहुतेक शहरांत निर्माण झाल्या होत्या. १९५६ पर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत ग्रामपंचायतविषयक भिन्न कायदे अंमलात होते. राज्यपुनर्रचनेनंतर व काटजू समितीच्या शिफारशींनुसार बॉम्बे व्हिलेज पंचायतॲक्ट १९५८ साली संमत झाला. पुढे १९६५ च्या अधिनियमानुसार आणखी काही सुधारणा करण्यात आल्या.

कँटोनमेंट : १९०३ साली कॅप्टन स्टॅक व कर्नल मीड यांनी पुणे छावणीचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार तत्कालीन मुंबई इलाख्यात अनेक छावण्या अस्तित्वात आल्या व सुस्थिर झाल्या. इंग्रजी अंमल स्थिरावल्यानंतर या छावण्यांना स्वायत्त असे स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. पुण्याच्या परिसरातील वानवडी, खडकी, घोरपडी तसेच सोलापूर, कामठी, जालना, औरंगाबाद, हिंगोली इ. ठिकाणच्या छावण्या पुढे कँटोनमेंट या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. यासंबंधीचा कायदा १९२४ साली करण्यात आला. कँटोनमेंट बोर्डावर नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असते आणि बोर्डाला या सोयींकरता संपत्तीवरील सर्वसाधारण कर, जकात, सीमा कर व विक्री कर बसविण्याचा अधिकार आहे. शिवाय केंद्र सरकार अनुदानाद्वारे काही आर्थिक साह्य देते. १९८२ मध्ये महाराष्ट्रात सात कँटोनमेंट बोर्डे होती.

नगरपालिका : छोट्या शहरांतही नगरपालिका स्थापन करता याव्यात, यासाठी आवश्यक ती तरतूद करणारा बॉम्बे डिस्ट्रिक्ट म्युनिसिपॅलिटीज ॲक्ट १९०१ साली करण्यात आला. मोठ्या शहरांतील नगरपालिकांसाठी सुधारलेला कायदा १९२५ साली बॉम्बे म्युनिसिपल बरोज ॲक्ट या नावाने करण्यात आला. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी राज्याच्या विविध भागांत नगरपालिकाविषयक वेगवेगळे कायदे लागू होते. (पश्चिम महाराष्ट्रात बॉम्बे डिस्ट्रिक्ट म्युनिसिपॅलिटीज ॲक्ट १९०१ व बॉम्बे म्युनिसिपल बरोज ॲक्ट १९२५ विदर्भात सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार म्युनिसिपॅलिटीज ॲक्ट १९२२ आणि मराठवाड्यात हैदराबाद म्युनिसिपॅलिटीज ॲक्ट १९५६). या कायद्यांचे एकसूत्रीकरण करणे व इतरही काही सुधारणा करणे यांबाबत अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी १९६३ साली तत्कालीन नगरविकासमंत्री रफीक झकेरिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. तिच्या अहवालातील मुख्य शिफारशी स्वीकारुन महाराष्ट्र शासनाने १९६५ साली महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम केला. त्याची अंमलबजावणी जून १९६७ पासून करण्यात आली. १९६५ च्या कायद्यानुसार १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या नसलेल्या शहरांसाठी नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला देण्यात आला व त्यापेक्षा कमी वस्ती असलेल्या ज्या गावी नगरपालिका अस्तित्वात होत्या, त्यांना त्या बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करायची असेल, तर तसे करण्याचा अधिकार देण्यात आला. १९७० साली महाराष्ट्रात नगरपरिषदांची संख्या खालीलप्रमाणे होती : अ वर्ग−२१, ब वर्ग−४५, क वर्ग−१४९, गिरिस्थान नगरपरिषदा−६. एकूण २२१. १९८२ मध्ये २२२ नगरपरिषदा होत्या.

महानगरपालिका : मुंबई इलाख्यात १९४९ साली बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ॲक्ट संमत झाला आणि त्याप्रमाणे अहमदाबाद व पुणे या महानगरपालिका अस्तित्वात आल्या. या कायद्यान्वये स्थापन झालेल्या महानगरपालिका बरखास्त करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. पुढे राज्यपुनर्रचनेनंतरही महाराष्ट्र राज्यात हाच कायदा अंमलात होता. तत्पूर्वी जुन्या मध्य प्रदेश राज्य शासनाच्या कायद्यानुसार विदर्भात नागपूर महानगरपालिका अस्तित्वात आलेली होती. १९६५ साली सोलापूरच्या नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे व सोलापूर या चार महानगरपालिका १९७० पर्यंत अस्तित्वात आल्या. शासनाच्या दि. द. साठे−एकसदस्य समितीच्या अहविलानुसार (१९७९) १९८४ पर्यंत पुढील शहरांतही नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकांत करण्यात आले : कोल्हापूर, ठाणे, कल्याण, नासिक, औरंगाबाद, अमरावती आणि पिंपरी-चिंचवड. [⟶ग्रामपंचायत कँटोनमेंट नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था].

देशपांडे सु. र.

संदर्भ :

1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1934.

2. Bhandarkar, R. G. Early History of the Dekkan, Calcutta, 1957.

3. Burton, R. G. Mahartta and Pindari War,  Delhi, 1975.

4. Government of Maharashtra, Maharashtra’s Case in Brief on Its Border Dispute with Mysore, Bombay, 1982.

5. Kulkarni, G. T. The Mughal-Maratha Relations : Twenty Five Fateful Years (1682-1707), Pune, 1983.

6. Kumar Ravindra, Western  India  in the Nineteenth Century, London, 1968.

7. Majumdar R. C. Ed. The History and Culturre of Indian People, Vols.   6. to 8, Bombay, 1971, 1974 &amp 1977.

8. Mishra, D. N. RSS : Myth and Reality, Delhi, 1980.

9. Pagadi, Setu Madhava Rao, Ed. Gazetteer of India : Maharashtra  State History, Part I &amp III,  Bombay, 1967.

10. Paradasani, N. S. Organisation  of  Government in Maharahstra, Bombay, 1965.

11. Radhey Shyam. The kingdom of Ahmednagar, Varanasi, 1966.

12. Ranade, M. G. Rise of the Maratha Power and Other Essays,  Bombay, 1961.

13. Ritti, shrinivas, The Seunas, Dharwar, 1973.

14. Sardesai, G. S. The Main Currents of Maratha History, Calcutta, 1926.

15. Verma, O. P. The Yadavas and Their Times, Nagpur, 1970.

16. Yazdani, Gulam, Ed. The Early History of The Deccan, Vols, I &amp II,    Parts I to IX, London, 1960.

१७. अळतेकर, अ. स. शिलाहारांचा इतिहास, मुंबई,  १९३५.

१८.आठवले,सदाशिव सासवडकर,प्र. ल. मराठी सत्तेचा  विकास व ऱ्हास, पुणे,१९७४.

१९.  कुंटे,भ. ग. बहमनी राज्याचा इतिहास, मुंबई, १९६६.

२०. कुंटे, भ. ग. संपा. स्वातंत्र्य-सैनिक चरित्र : महाराष्ट्र राज्य, पश्चिम विभाग,३. खंड,मुंबई, १९७८-८०.

२१. कुंटे, भ. ग. संपा. स्वातंत्र्य सैनिक चरित्र : महाराष्ट्र राज्य, विदर्भ विभाग, २ खंड, मुंबई,१९७६.

२२.कुंटे, भ. ग. संपा. स्वातंत्र्य-सैनिक चरित्र :महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभाग, मुंबई, १९७६

२३. कुलकर्णी,अ.र. देशपांडे,प्र. न. मराठ्यांचा इतिहास (१६३०– १७०७), पुणे,१९७९.

२४. केतकर,श्रीधर व्यंकटेश,संपा.प्राचीन महाराष्ट्र: कुरू युद्धापासून शकारंभापर्यंत, पुणे, १९३५.

२५.के तकर,श्रीधर व्यंकटेश केळकर, वि. म. संपा, प्राचीन महाराष्ट्र : सातवाहनपूर्व, भाग २ रा,पुणे,१९६३.


२६. खरे,ग. ह. संपा. महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग, मुंबई,१९७१.

२७.खानोलकर,गं. दे. संपा. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र,औरंगाबाद,१९७५.

२८. खोबरेकर,वि. गो. महाराष्ट्रातील दप्तरखाने : वर्णन आणि तंत्र, मुंबई, १९६८.

२९ गुजर, मा. वि. संपा.करवीर छत्रपती घराण्याच्या इतिहासाची साधने,८ खंड,पुणे, १९६५.

३०. गोखले अर्थशास्त्र संस्था, महाराष्ट्रराज्य : जिल्हा परिषद व पंचायती राज्य परिषद, पुणे, १९६३.

३१. ढेरे, रा. चिं. खेर,मा. द. प्रभु,सुधाकर, संपा, महाराष्ट्र इतिहास दर्शन,मुंबई,१९६१.

३२. तुळपुळे, शं. गो. संपा. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे, १९६३.

३३. देव, शां. भा.महाराष्ट्र : एक पुरातत्त्वीय समालोचन,नागपूर,१९६८.

३४. देव,शां. भा. महाराष्ट्रातील उत्खनने,मुंबई, १९६२.

३५. देशपांडे, य. खु, लांडगे, दे. गो. संपा. विदर्भातील ऐतिहासिक लेखसंग्रह, खंड पहिला, नागपूर, १९५९.

३६. देशपांडे, स. ह. संघातले दिवस आणि इतर लेख, पुणे, १९८३.

३७. पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्र, मुंबई, १९६३.

३८. बेंद्रे, वा. सी. संपा. विजापुरची आदिलशाही, मुंबई, १९६८.

३९. बेंद्रे, वा. सी. श्रीछत्रपती शिवाजी महाराज, २ खंड, मुंबई, १९७२.

४०. भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक-महाराष्ट्र इतिहास परिषद, पुणे, १९८३ : निंबध, पुणे, १९८४.

४१. भुसारी, रघुनाथ महारूद्र, आद्य महाराष्ट्र आणि सातवाहन काल, हैदराबाद, १९७९.

४२. भोळे, भास्कर लक्ष्मण, आधुनिक भारतातील राजकीय विचार, पुणे, १९७८.

४३. मिराशी, वा. वि. वाकाटक राजवंश का इतिहास तथा अभिलेख, वाराणसी, १९६४.

४४. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

४५. मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७९.

४६. मोटे, ह. वि. संपा. त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह, मुंबई. १९७७.

४७. शेजवलकर, त्र्यं. शं. श्रीशिवछत्रपति, मुंबई, १९६४.

४८. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, खंड १ ते ६, मुंबई, १९२९.

४९. सांकलिया, ह. धी. माटे, म. श्री. संपा. महाराष्ट्रातील पुरातत्त्वे, मुंबई, १९७६.

५०. स्वामी रामानंद तीर्थ, हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी, मुंबई, १९७६.