वनश्री 

महाराष्ट्रातील वनश्रीचे आढळणारे विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्व स्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर, चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यावर अवलंबून असलेले दिसतात. वनश्रीच्या जडणघडणीमध्ये वरील नैसर्गिक कारणांप्रमाणे काही अनैसर्गिक कारणांचाही म्हणजे बेकायदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. या कारणांमुळे विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारच क्वचित ठिकाणी, अतिदुर्गम ठिकाणी अथवा देवरायांतून आढळतात. शास्त्रीय दृष्ट्या महाराष्ट्रातील वनश्रींचे ढोबळमानाने खालील प्रकार सांगता येतील : (१) सदाहरित वने, (२) निमसदापर्णी वने, (३) आर्द्र पानझडी वृक्षवने, (४) शुष्क पानझडी वृक्षवने, (५) खाजणवने, (६) नदीकाठची वने, (७) रूक्ष प्रदेशातील काटेरी खुरटा झाडोरा आणि (८) लागवडीखालील वनशेती.

(१) सदाहरित वने : महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधरणतः १,२०० ते १,४०० मी. उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. या भागात पर्जन्यमान ३६० ते ६०० सेंमी. असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली, तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरून आढळतात : जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजन, आंबा, लाल देवदार वगैरे. झुडपांमध्ये फांगळा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी वगैरे अजस्त्र वेली आढळतात. भरपूरछाया आणि ओलावा असणाऱ्या ठिकाणी आमरी, नेच्यांचे विविध प्रकार दिसतात. अशा जंगलातून आंबा, फणस, कोकम, हिरडा वगैरे वृक्ष, शिकेकाईसारख्या वेली व जळाऊ लाकूड यांपासून काही अल्प प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने ही वने मोहक असली, तरी अर्थप्राप्तीच्या दृष्टीने तितकीशी महत्त्वाची नाहीत. तरी पण घाटमाथ्यावर होणाऱ्या प्रचंड पर्जन्यवृष्टीपासून पाणलोट भागातील मृदा संरक्षणाच्या दृष्टीने ही वने महत्त्वाची आहेत.


(२) निम-सदापर्णी वने : सदहरित वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान २०० ते ३६० सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणतः हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, किन्हई, जांबत वगैरे तर मध्यम आकाराच्या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, चांदडा, अंजन, गेळा वगैरे झाडोरा आढळतो. सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिक दृष्ट्या ह्या वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही परंतु सह्याद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने या वनांचे महत्त्व फार आहे.

(३) आर्द्र पानझडी वने : घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगर उतारावर, काही वेळी सपाटीवर सुद्धा या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी., निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मी. पर्यंत असू शकते. व्यापारी दृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, वीजा, हळदू , कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात. सागवानी इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारती मालांपेक्षा कित्येक पटींनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते. अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढ्यांच्या काठी साधारणतः काटेरी बांबूंची बेटे आढळतात.

(४) शुष्क पानझडी वृक्षवने : या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वांत जास्त असते. उन्हाळ्यामध्ये तर अशा वनराजीमध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशा रानात सागवान वृक्षही आढळतात पण त्याची प्रत एवढी चांगली नसते. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, कोशिंब, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा, तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाऊ लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जाता. अशा तऱ्हेच्या रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली, तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंडू, गवते, औषधी वनस्पती इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

(५) खाडीकाठची खाजण वने : कच्छ वनश्री (मँग्रोव्ह फॉरेस्ट) कोकण प्रदेशातील काही खाड्यांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते. अशारानातील वृक्षांची उंची ४ ते ६ मी. असते. पाणथळ जमिनीमुळे वृक्षाच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने ही जंगले समुद्र लाटांनी होणारी जमिनीची धूप व आक्रमण थांबवतात. या रानातील प्रमुख वृक्ष म्हणजे तिवर, आंबेटी, मारुडी, काजळा, समुद्रफळ इत्यादी.

(६) नदीकाठची वने : बारमाही पाणी असणाऱ्या नद्यांच्या अथवा ओढ्यांच्या काठी अरुंद उंच सखल भागात ह्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात. गाळाची माती व पाण्याची विपुलता यांमुळे या वनांची वाढ चांगली होते. काही वेळा अशा ठिकाणी असणाऱ्या देवरायांमधून ३०−४० मी. उंचीचे वृक्ष आढळतात. अशा रानातील झाडोऱ्यात नेहमी हिरवेगार असणारे वृक्ष असतात. उदा., करंज, आंबा, जांभूळ, उंबर, पाडळ, पुत्रजीवी वगैरे. इतर झाडोऱ्यात अटक, करवंद, दिंडा, गिरनूळ वगैरे झुडपे सापडतात. काही ठिकाणी काटस बांबूची बेटे व बाभळीची वने चांगली पोसतात. अशा रानातून आणि विशेषतः देवरायांतून स्वच्छ पाण्याचे झरे आढळतात. व्यापारी दृष्ट्या या रानांस महत्त्व नसले, तरी जमिनीची धूप थांबविणे, भूभागातील पाण्याचा साठा वाढविणे ही कार्ये अशा वनांमुळे होतात. नदीकाठचा सर्व प्रदेश लागवडीखाली जाऊ लागल्याने पूर्वी नदीकाठी कशा तऱ्हेची वनराजी असावी, याचा अंदाज अशा वनांच्या अभ्यासातून घेता येतो.

(७) रुक्ष खुरटी वने : अतिशय कमी पर्जन्यमानाच्या, नेहमी पाण्याचे अवर्षण असलेल्या प्रदेशात खुरट्या, काटेरी वनस्पती आढळतात. चराऊ प्राण्यापासून बचाव करण्यासाठी, तसेच पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी अशा वनस्पती खुज्या आणि तीक्ष्ण काटे असलेल्या आढळतात. तरी पण मानव इंधनाकरिता अशी झुडपेदेखील काढून नेतो व त्यामुळे अधिक वैराण असलेला प्रदेश उजाड होतो. वाळवंटी हवामानास उपयुक्त अशा वनस्पतींची अशा ठिकाणी पद्धतशीर लागवड करून या प्रदेशाचा विकास साधता येईल.

(८) वनशेती : समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये काही ठिकाणी गेली कित्येक वर्षे वन विभागातर्फे खडशेरणीची लागवड केली जाते. यापैकी काही लागवडीची सुरूवात १८८९-९० साली झाली असून ही लागवड व्यापारी दृष्ट्या किफायतशीर समजली गेली आहे. आपण जसे नियमितपणे पीक काढतो त्याप्रमाणे १५-२० वर्षांच्या आवर्तनानंतर वृक्ष तोड करून पुनर्लागवड आयोजन कार्य वनविभागातर्फे होत असते. हल्ली सामाजिक वनीकरण प्रकल्पाखाली ठिकठिकाणी जनतेच्या सहकार्याने वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन व संरक्षण या गोष्टींचे महत्त्व पटत चालले आहे. युकॅलिप्टस, सुबाभूळ, विलायती बाभूळ वगैरे जलद वाढणाऱ्या व इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर असणाऱ्या वृक्ष जातींची लागवड सुरू आहे व त्याला मर्यादित प्रमाणात यश येऊ लागले आहे.


महाराष्ट्रात एकूण ३,००० पेक्षा जास्त सपुष्प वनस्पतींच्या जाती आहेत. त्यांत १,२०० च्या वर प्रजातींची, १५० च्या वर कुलांची संख्या जाईल. सपुष्प वनस्पतींच्या मानाने पाइन, देवदार व नेचे वर्गातील वनस्पतींची संख्या अत्यंत अल्प आहे.

वर्तक, वा. द.

 प्राणिजात 

महाराष्ट्रातील काही प्राणी

प्राण्यांच्या निवासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पुढील चार भौगोलिक विभाग पाडता येतील : (१) पश्चिमेकडील कोकणपट्टी, (२) सह्याद्रीच्या रांगा, (३) पूर्वेकडील पठारी प्रदेश आणि (४) उत्तरेकडील सातपुडा पर्वत व लगतचा सखल प्रदेश. महाराष्ट्रात सापडणारे पुष्कळसे प्राणी भारतात इतरत्रही आढळतात. या प्राण्यांत  पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी प्रमुख होत. या प्राण्यांचे मत्स्य, उभयचर (जमिनीवर आणि पाण्यातही राहणारे), सरीसृप (सरपटणारे), पक्षी व सस्तन प्राणी हे पाच मुख्य वर्ग होत.

महाराष्ट्राचे प्राणिजीवन बरेच समृद्ध आहे. येथे सस्तन प्राण्यांच्या सु. ८५ पक्ष्यांच्या ५०० हून जास्त, सरीसृप प्राण्यांच्या १०० हून अधिक, माशांच्या सु. ७०० व कीटकांच्या २५,००० हून जास्त जाती आढळतात. यांशिवाय उभयचर व इतर प्राणीही कमीअधिक प्रमाणात आहेतच. महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख प्राण्यांची माहिती वर्गवारीनुसार पुढे दिली आहे.

महाराष्ट्रात लांडगे उघड्या माळरानावर आणि कोल्हे, खोकडे कोणत्याही जंगलात आढळतात. जंगली कुत्रे रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, भंडारी व चंद्रपूर या जिल्ह्यांत दिसून येतात. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगार, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतील जंगलांत अस्वले आहेत.भंडारा, अमरावती व सातारा येथील जंगलांत पाणमांजरे (ऊदमांजरे) आढळतात. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील जंगलांत कस्तुरी मांजरे (जवादी मांजरे) आहेत. महाराष्ट्रात मुंगसाच्या दोन जाती असून हा प्राणी सर्वत्र कमीअधिक प्रमाणात सापडतो. तरस हा भटका प्राणी महाराष्ट्रात जेथे जेथे साळी, मुंगसे व ढाण्या वाघ आढळतात तेथे तेथे आढळतो.

अकोला, अमरावती, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांतच वाघ सध्या आढळतात. पूर्वी वाघांची संख्या पुष्कळ होती. आज महाराष्ट्रात अवघे १६० वाघ आहेत. वाघाला कायद्याने संरक्षण दिलेले असून त्यांची संख्या वाढावी म्हणून भारतातील इतर काही राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही त्यांच्यासाठी राखीव उपवने ठेवण्यात आली आहेत. बिबळ्याची महाराष्ट्रात एकच जात आढळते. रानमांजरेही महाराष्ट्रातील जंगलात आहेत. शुष्क जंगलातील मांजरे, तांबड्या ठिपक्यांची मांजरे व वाघाटी ह्या रानमांजरांच्या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती आहेत.

बाजरा (रेंटल) हा मांसाहारी गणातील प्राणी भंडारा जिल्ह्यात आढळतो. जाहक चिचुंदरी हे कीटकपक्षी प्राणी महाराष्ट्रातील जंगलांत आढळतात. महाराष्ट्रात फळे खाणाऱ्या वटवाघळांच्या २५ जाती आहेत.

खार, घूस, उंदीर व साळ हे महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणारे कृंतक (कुरतडून भक्ष्य खाणारे) प्राणी आहेत. मोठी उडणारी खार पुष्कळ जंगलांत आढळते. हल्ली यांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात साळी उघडे माळरान अगर आर्द्र वा शुष्क जंगले यांत कोठेही आढळतात. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा ससा हा लिपस निग्निकोलीस या जातीचा आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांतील डोंगराळ जंगलांत गवे मोठ्या प्रमाणावर आढळतात. दक्षिण चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूच्या जंगलांत रानरेडे आहेत. सातारा, अहमदनगर, बुलढाणा, परभणी व भंडारा जिल्ह्यांतील जंगलांत काळवीट आढळतात. नीलगाय हा प्राणी महाराष्ट्रातील काही जंगलांत दिसून येतो. सांबर व हरणे हे कळप करून राहणारे प्राणीही महाराष्ट्रातील जंगलांत आढळतात. ठिपकेवाली हरणेही दिसून येतात. दाट झुडपांच्या जंगलांत भेकरे आढळतात. पिसोरा हे मृगासारखे प्राणीही काही जंगलांत आढळतात. महाराष्ट्रात रानडुकरे बहुतेक सर्व जंगलांत दिसून येतात. खवल्या मांजर हा मुंग्या व वाळवी खाणारा सस्तन प्राणीही जंगलांत आढळतो.

महाराष्ट्रात निरनिराळ्या जातींची माकडे व वानरे आढळतात. लाल तोंडाची माकडे (टोपी माकडे) मुंबई, पुणे, नासिक, अहमदनगर, सातारा व सांगली या भागांतील जंगलांत आहेत. ऱ्हिसस माकडे मुंबई व नासिक येथे मनुष्यवस्तीच्या जवळपास आढळतात. हनुमान वानरे किंवा काळ्या तोंडाची वानरे महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात. अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर या भागांत त्यांचे प्रमाण अधिक आहे. तेवांग (सडपातळ लोरिस) हा निशाचर सस्तन प्राणी खंडाळ्याच्या आसपास दाट जंगलात आढळतो.

महाराष्ट्रास बराच मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे काही सस्तन जलचर प्राणी पुष्कळदा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येतात. देवमासा, डॉल्फिन, पॉरपॉइज (शिंशुक) यांसारखे काही प्राणी पुष्कळदा किनाऱ्यावर आढळले आहेत. महाराष्ट्रातील नद्या, सरोवरे व जलाशय यांतही बरेच सरीसृप, उभयचर व मत्स्य या वर्गांतील प्राणी आढळतात पण सस्तन प्राणी त्या मानाने नाहीतच म्हटले तरी चालेल.


महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या ५०० जातींपैकी ३०० स्थायिक असून २०० स्थलांतराकरिता हिवाळ्यात महाराष्ट्रात येतात. या वेळी नद्या, तळी व सरोवरे ही पाण्यानी भरलेली असून येथे आढळणाऱ्या पक्ष्यांत बगळे, करकोचे, क्रौंच, हंसक, मोर, रानकोंबडे, होले, पोपट, माळढोक इ. जातींची उपस्थिती असते. माळढोकसारख्या काही जाती विनाशाच्या मार्गावर असल्याने त्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.

सरीसृप प्राण्यांत विविध जातींचे साप, सरडे व कासवे महाराष्ट्रातील जंगलांत, जलाशयांत व नदीपात्रांत आढळतात. सापाच्या ३० जाती महाराष्ट्रात आढळतात आणि त्यांपैकी नाग, मण्यार व घोणस सर्वत्र आढळतात. फुरसे विशेषेकरून रत्नागिरी जिल्ह्यात आढळते.

राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये : वन्य प्राण्यांना संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुढील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये निर्माण केली आहेत. भौगोलिक व हवामानाचा विचार करता ही उद्याने काही विशिष्ट प्राण्यांस उपयुक्त आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही पशुपक्ष्यांनाही या अभयारण्यांमुळे संरक्षण मिळते.

कोष्टक क्र. २ महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये
अ. क्र. अभयारण्याचे नाव स्थळ क्षेत्रफळ
ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर ११६.५५ चौ. किमी.
पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर २५७.२६ चौ. किमी.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान भंडारा १३३.८८ चौ. किमी.
बोरिवली राष्ट्रीय उद्यानमुंबई मुंबई ६७.७७ चौ. किमी.
मेळघाट अभयारण्य

(खास वाघांसाठी)

अमरावती ३८१.५८ चौ. किमी.
नागझिरी अभयारण्यभंडारा भंडारा १३६.१४ चौ. किमी.
किनवट अभयारण्य यवतमाळ, नांदेड १३८.०० चौ. किमी.
रेहेकुरी अभयारण्य

(खास काळविटांकरिता)

अहमदनगर २.१७ चौ. किमी.

पक्षी अभयारण्य

(माळढोक)

अहमदनगर ७८१.८४ चौ. किमी.
१० राधानगरी अभयारण्य

(गव्यांकरीता)

कोल्हापूर २०.७२ चौ. किमी.
११ बोर अभयारण्य वर्धा ६१.१० चौ. किमी.
१२ यावळ अभयारण्य जळगाव ११७.५२ चौ. किमी.
१३ कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड ४.४७ चौ. किमी.
१४ तानसा अभयारण्य ठाणे २१६.७५ चौ. किमी.

यांशिवाय आणखी काही अभयारण्ये शासनाने नियोजित केली आहेत. ती अशी : (१) सागरेश्वर उद्यान−सांगली, (२) कोयना उद्यान−सातारा, (३) वन्य प्राणी गवताळ अभयारण्य−औरंगाबाद, (४) राजगड पक्षी अभयारण्य−नांदेड. [⟶राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश वन्य जीवांचे आश्रयस्थान वन्य जीवांचे रक्षण].

इनामदार, ना. भा.

संदर्भ :

1. Botanical Survey of India,Flora of the Presidency of Bombay. 3. Vols, Calcutta, 1958.

2. Buit, S. S. The  Forests of Mahashtra,  Proceedings of the Autumn  School  in Botany. University of Poona,  1966.

3. Sagreiya. K. P Forests and Forestry, New Delhi, 1967.

4. Santapau, H. Kapadia, Z. Orchids of Bombay, Delhi, 1966.

5. Vartak, V. D. Some Aspects of the Vegetation and Flora of KonKan and Goa, Bulletin of Indian Natural Science Academy, 45. 1973.

६. डहाणूकर, शरदिनी, वृक्षगान, मुंबई,  १९८४.

७. मेहता, हरिचंद, खेडेगावात मिळणारी वनौषधी,  ४ खंड,  कोल्हापूर, १९७७.

८. मेहेंदळे, वि. दा. सह्याद्रीच्या परिसरातील वनश्री, मराठी विज्ञान स्मरणिका, तळेगाव, १९७४.