मृदा : महाराष्ट्रातील जमिनी प्रामुख्याने ऑजाइट, बेसाल्ट, ग्रॅनाइट व पट्टिताश्म यांसारख्या खडकांपासून तयार झालेल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत बेसाल्ट खडकांत बदल होऊन जेथे जांभ्याचा खडक तयार झालेला आहे, तेथे जांभ्याच्या जमिनी तयार झालेल्या आहेत.

भूपृष्ठातील चढउतार, खडकांच्या स्वरूपातील फरक, वार्षिक पर्जन्यमानातील फरक (५० सेंमी. ते ५०० सेंमी.) व नैसर्गिक वनस्पती (वनश्री) समूहातील फरक यांमुळे महाराष्ट्रातील मृदा प्रामुख्याने सात गटांत विभागल्या जातात. या मृदांची काही वैशिष्ट्ये खाली थोडक्यात दिली आहेत.


(१)लवणयुक्त व गाळाच्या जमिनी : पश्चिम किनापट्टीत या जमिनी आढळतात. या काळ्या पत्थरापासूनच निर्माण झालेल्या असून जेथे जेथे त्या समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून आहे तेथे तेथे समुद्राचे पाणी आत घुसत असल्याने जमिनीतील लवणांचे प्रमाण वाढून त्या लवणयुक्त बनतात. त्यांनाच कोकणात ‘खार जमिनी’ या नावाने संबोधिले जाते. किनारपट्टीपासून जसजसे दूर जावे तसतसे खार जमिनीऐवजी गाळाच्या जलोढ जमिनीचे प्रमाण वाढत जाते. या जमिनी कमीअधिक खोलीच्या असून त्यांची उत्पादनक्षमता खूपचकमी असते. खार जमिनीतील लवणांमुळे व गाळांच्या जमिनीत भूपृष्ठातील चढउतारामुळे जमिनीचा विकास जेवढा व्हावयास पाहिजे तेवढा झालेला नाही. या जमिनीत सध्या तरी भात हेच प्रमुख पीक घेतले जाते.

(२) जांभ्याच्या, जांभ्यासारख्या व तांबड्या जमिनी : जंगलातील विशिष्ट स्वरूपाची वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांमुळे बेसाल्ट या खडकामध्ये बदल होताना त्यापासून जांभ्याच्या व जांभ्यासारख्या जमिनी तयार होतात. या जमिनी प्रामुख्याने रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, नासिक व पुणे या जिल्ह्यांचा पश्चिम भाग यांत आढळतात. या जमिनी साधारणपणे अम्ल स्वरूपाच्या असतात व त्यात चुनखडी अजिबात आढळत नाही. जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम ते कमी असते. फॉस्फेट व पोटॅश यांचा पुरवठा खूपच कमी असतो. वनश्री व हवामान या दोन घटकांचा जांभ्याच्या जमिनीवर विशेष परिणाम दिसून येतो.

तांबड्या जमिनी प्रामुख्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आढळतात व त्यांची उत्पत्ती मिश्र खडकापासून होते. या जमिनींच्या बाबतीतही वनश्री व उष्ण आर्द्र हवामान यांचा संयुक्तपणे परिणाम होतो. जांभ्याच्या जमिनी असलेल्या भागात २०० ते ३०० सेंमी. वार्षिक पाऊस पडत असल्याने ह्या जमिनीत भात, नागली व फळझाडांची पिके प्रामुख्याने घेतात. जांभ्यासारख्या जमिनी असलेल्या भागातही पावसाचे वार्षिक प्रमाण २०० ते ३०० सेंमी. असते पण या जमिनीत खरीप हंगामात भात व नागली आणि रबी हंगामात वाटाणा, घेवडा अशी पिके घेतात. ठाणे, रायगड व नासिक या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जांभ्यासारख्या जमिनीचे प्रमाण जास्त आहे.

(३) वरड जमिनी व दरीतील चिकण दुमट जमिनी : या जमिनी बेसाल्ट खडकापासूनच झालेल्या आहेत पण त्या मात्र डोंगरी प्रदेशात घाटमाथ्यावर आढळतात, तर चिकण दुमट जमिनी दरीच्या प्रदेशात आढळतात. चढ उतारातील फरकाप्रमाणे या जमिनी ३ ते ४ सेंमी. खोलीपासून १ ते १.५ मी. खोलीच्या आढळतात. जास्त पावसाच्या प्रदेशातच या जमिनी आढळत असल्याने जमिनीतील विनिमय घटक द्रव्यांचे प्रमाण बरेच कमी असते व त्यांचे pH मूल्य ६.५ ते ७.५ या दरम्यान आढळते [⟶पीएच मूल्य]. उतार फार असलेल्या भागातील जमिनींना ‘कुमारीस’ असे म्हणतात व त्यांत नाचणीसारखी पिके व गवत घेतात. चिकण दुमट जमिनी सुपीक असल्याने त्यांत भाताचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. या जमिनीचा पोत व pH मूल्य सर्वसाधारणपणे स्थिर असतात.

(४) मध्यम व जास्त खोलीच्या काळ्या जमिनी : महाराष्ट्रातील जमिनीचे जास्तीत जास्त क्षेत्र या प्रकाराखाली मोडते. मध्यम काळ्या जमिनीत चुनखडीचे व विनीमय घटक द्रव्यांचे प्रमाण भरपूर व जमिनीचे pH मूल्य ८ ते ८.५ च्या पुढे असते. या जमिनीत फॉस्फेट व पोटॅशचे प्रमाण साधारणपणे समाधानकारक असले, तरी सेंद्रिय कार्बनाचे व नायट्रोजनाचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. जमिनीची प्रत्यक्ष खोली व तिचा पोत याबाबतींत खूपच विविधता आढळते.

जास्त खोलीच्या काळ्या जमिनी या मोठ्या नद्यांवरील पाणलोट भागांत व असंख्य लहान पाणवठ्याच्या भागातील तिरावर आढळतात. या बहुसंख्य जमिनी जलोढ आहेत. या खूप खोल व अत्यंत सुपीक आहेत. तापी, भीमा, कोयना, गोदावरी, प्रवरा, नीरा, कृष्णा यांसारख्या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत या जमिनीचे प्रमाण जास्त आहे. जमिनीच्या सुपीकतेमुळे त्यांच्यात सर्व बागायती पिके उत्तम तऱ्हेची येतात. उशिरा पडणारा पाऊस जेव्हा अनुकूल असेल तेव्हा गव्हाचे व रबी ज्वारीचे उत्कृष्ट पीक काढले जाते. मध्यम व खूप खोलीच्या काळ्या जमिनींच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात फारसाफरक नाही. पावसाच्या प्रमाणाप्रमाणे ज्वारी आणि गव्हाबरोबरच द्विदल धान्ये, कापूस, भुईमूग, निरनिराळी कडधान्ये, गळिताची पिके यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ऊस, द्राक्षे या नगदी पिकांसाठीही या जमिनी प्रसिद्ध आहेत. या भागात ६० ते ७५ सेंमी. एवढाच पाऊस पडत असल्याने सिंचन व्यवस्थेला शेतीत विशेष महत्त्व दिले जाते.

(५) वरड ग्रॅव्हली जमिनी : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील डोंगराळ प्रदेशात या जमिनी प्रामुख्याने आढळतात. स्थानिक भाषेत त्यांना वरडी, रेटरी इ. नावांनी संबोधितात.  जमिनीची सुपिकता फार कमी असल्याने त्यांच्यात नाचणीसारखी पिकेच फक्त येऊ शकतात.

(६) उथळ व चिकण दुमट जमिनी : भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ ७० टक्के जमीन मिश्र खडकापासून तयार झालेली असून ती उथळ व चिकण दुमट स्वरूपाची आहे. बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनीप्रमाणेच या जमिनीचे गुणधर्म आढळून येतात. पावसाचे प्रमाण निश्चित असल्याने खरीप हंगामात भात व खोल जमिनीत रबी हंगामात गहू, जवस यांसारखी पिके घेतली जातात.


(७) लवणयुक्त व चोपण जमिनी :  विशिष्ट भौगोलिक स्थिती व कमी पावसाचा प्रदेश या भागांत या जमिनी मोठ्या प्रमाणात आढळतात. खाऱ्यापाण्याच्या सिंचनासाठी वापर, सिंचन म्हणून पाण्याचा अमर्याद वापर, पाण्याची पातळी वर असलेला भाग व निचऱ्याचा अभाव यांमुळेही या तऱ्हेच्या जमिनी तयार होतात. ज्या जमिनींत विद्राव्य लवणांचे प्रमाण ०.५ प्रतिशतपेक्षा जास्त असते, त्यांना लवणयुक्त जमिनी असे संबोधिले जाते. सोडियमयुक्त विद्राव्य लवणांची मृण्मय खनिजांशी रासायनिक प्रक्रिया झाली की, लवणयुक्त जमिनीचे चोपण जमिणीत रूपांतर होते व त्यांचे pH मूल्य ८.५ ते ९.० च्या पुढे आढळते. लवणयुक्त व चोपण जमिनीचे क्षेत्र सारखे वाढत असून सध्या त्याचे प्रमाण सु. ०.५० लाख हेक्टर आहे. या जमिनी रासायनिक दृष्ट्या सुपीक असल्या, तरी भौतिक व जैव दृष्ट्या पीक वाढीला प्रतिकूल असल्यामुळे त्यांची सुधारणा केल्याशिवाय त्या भरघोस पीक देत नाहीत.

झेंडे, गो. का.

नैसर्गिक साधनसंपत्ती 

जमीन, जलसंपत्ती, ऊर्जा-उद्गम, खनिज पदार्थ, वनसंपत्ती, पशुधन व सागरी संपत्ती यांचा यात समावेश होतो. याच नोंदीत शेतजमिनीविषयीची अधिक माहिती ‘मृदा’ या उपशीर्षकाखाली, तर विविध साधनसंपत्तीविषयीची काही माहिती व कोष्टकरूपातील आकडेवारी ‘आर्थिक स्थिती’ या उपशीर्षकाखाली आलेली आहे.

जमीन : प्रत्यक्ष लागवडीखालील, सध्या पडीत असलेली, वृक्षांच्या लागवडीखालील, वनांखालील, कायमची कुरणे व गवताळ प्रदेश, मशागतयोग्य पडीत, डोंगराळ भागातील व इतर मशागतीस अयोग्य आणि बिगरशेती अशी जमिनीची वर्गवारी करतात. महाराष्ट्रात ५ टक्के जमीन लागवडीखाली आणता येण्यासारखी आहे. १९८२ साली महाराष्ट्रात १.९८६ कोटी हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती आणि भारतातील लागवडीखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के होता.  भारतातील एकूण कृषिउत्पादनक्षमतेच्या मानाने महाराष्ट्राची कृषीउत्पादनक्षमता कमी आहे. अपुरे सिंचन, पावसाची अनिश्चितता आणि पर्जन्यच्छाया प्रदेशात मोडणारा बरच भाग, ही यामागील काही कारणे आहेत.

जलसंपत्ती : जमिनीवरील व जमिनीखालील पाण्याचा उपयोग सिंचन, वीजनिर्मिती, घरगुती व औद्योगिक वापर आणि वाहतूक यांसाठी करता येतो. महाराष्ट्रात बहुतेक पाऊस ठराविक काळातच पडतो. शिवाय महाराष्ट्रातील ‘दक्षिण ट्रॅप’ या शेलसमूहाच्या रचनेमुळे भूजल संपत्तीवर मर्यादा पडल्या आहेत त्यामुळे पाण्याच्या वापरावरहीमर्यादा पडतात. शिवाय नद्या बारमाही वाहत नसल्याने धरणे मोठी बांधावी लागतात आणि कालव्यांची लांबीही वाढते परिणामी खर्च वाढतो. जलवाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल नाही विशेषतः औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झालेला आहे.

सिंचन : महाराष्ट्राची सिंचनक्षमता ४५ लाख हेक्टर असून १९८१ साली २३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. १९६० पासून राज्यात सिंचनाचे बरेच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सु. ५० टक्के सिंचन विहिरींद्वारे होते. त्याखालोखाल कालवे, तलाव (मुख्यत्वे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत), उपसा जलसिंचन (मुख्यतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत) व कूपनलिका यांद्वारे सिंचन केले जाते.

ऊर्जा-उद्गम : दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, पाणी (वीजनिर्मितीसाठी) व अणुइंधने हे प्रमुख ऊर्जा-उद्गम आहेत. यांपैकी महाराष्ट्रात दगडी कोळसा व पाणी हे उपलब्ध आहेत. अर्थात बाँबे हाय व त्यालगतच्या तेलक्षेत्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचा राज्याला उपयोग होत आहे. तारापूरची अणुवीज महाराष्ट्राला मिळत असली, तरी येथे अणुइंधनाच्या दृष्टीने उपयुक्त असलेली खनिजे आढळलेली नाहीत. या ऊर्जा साधनांशिवाय शेण (गोबर वायू गोवऱ्या), जैव वायू, लाकूड, लोणारी कोळसा, तसेच पशूंची व मानवी श्रमशक्ती ही ऊर्जेची साधनेही महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.

सूर्याचे प्रारण, वारा, भरती-ओहोटी, लाटा व पृथ्वीतील उष्णता हे ऊर्जा-उद्गम वापरण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. वर्षातील बराच काळ महाराष्ट्रात चांगले ऊन पडते (उदा., मुंबई येथे दर दिवशी दर चौ. सेंमी. क्षेत्रावर सरासरी ७०१ कॅलरी उष्णता पडत असते) आणि महाराष्ट्रातीलखडक व माती गडद रंगाची असल्याने त्यांच्याद्वारे पुरेशी उष्णता शोषली जाते. किनारी भागात भरती-ओहोटीचा व लाटांचा, तर डोंगराळ आणि किनारी भागांत वाऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करता येण्यासारखा आहे.


दगडी कोळसा : भारतातील दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सु. ४ टक्के (५०० कोटी टन) कोळसा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा अकोकक्षम आहे. मात्र काही थर पहिल्या व दुसऱ्या प्रतींचे असून त्यांतील कोळसा झरिया येथील कोकक्षम कोळशात १५ ते २० टक्के या प्रमाणात मिसळून वापरात येण्यासारखा आहे.  नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत मुख्यतः दगडी कोळसा आढळतो व तो गोंडवनी संघाच्या दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकांत आढळतो. याची प्रमुख क्षेत्रे पुढील आहेत : (१) वैनगंगा खोरे (कामटी, उमरेड इ.) (२) वर्षा खोरे (बांदर, वरोडा, वुन, बल्लारपूर, दुर्गापूर, वणी इ.) आणि (३) यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा एकमेकांना लागून असलेला सीमावर्ती भाग (घुगुस, तेलवासा).

खापरखेडा, बल्लारशा व पारस येथील औष्णिक वीज केंद्रांत, तसेच उद्योगधंदे व रेल्वे यांसाठी महाराष्ट्रातील दगडी कोळसा वापरला जातो. काही कोळसा प्रोड्यूसर नावाचा जळणाचा वायू निर्माण करण्यासाठी वापरता येण्यासारखा आहे, तर काही कोळशाचे कार्बनीकरण करून कोक, इंधन वायू, हलके तेल, अमोनियम सल्फेट इ. पदार्थ मिळविता येऊ शकतील. [⟶कोळसा, दगडी].

जलविद्युत् : महाराष्ट्रातील एकूण विजेपैकी ५० टक्क्यांहून जास्त वीज जलविद्युत् केंद्रामधून मिळते. १९८१ साली या विजेची अधिष्ठापित क्षमता १,२९७ मेवॉ. होती. पश्चिम घाटाची जलविद्युत् निर्मितिक्षमता १,०४० मेवॉ. काढण्यात आली असून कोयना(५४०मेवॉ.),खोपोली, मिरा व भिवपुरी (२७४ मेवॉ.), येलदरी (२२.५ मेवॉ.), राधानगरी (४.८ मेवॉ.) व भाटघर (१ मेवॉ.) ही या भागातील जलविद्युत् केंद्र होत. पूर्व महाराष्ट्रातील डोंगराळ भागीची काढण्यात आलेली जलविद्युत् निर्मितिक्षमता १,९०० मवॉ. आहे.

महाराष्ट्रात एकूण २,०९३.८ कोटी किवॉ. ता. (१९८२-८३) वीजनिर्मिती होत असली, तरी उद्योगधंदे, शेती, वाहतुक, घरगुती वापर यांकरिता ती उपयोगात आणली जाते व राज्यात विजेचा नेहमी तुटवडा पडतो. यावर उपाय योजले जात असले, तरी ते कमीच पडतात. मध्य प्रदेश, कर्नाटक या शेजारच्या राज्यांतून वीज काही प्रमाणात घेतली जाते.

अणुवीज : महाराष्ट्रात तुर्भे व तारापूर येथे अणुप्रकल्प केंद्राच्या वापरांकरिता होते. तारापूर येथील अणुवीज निर्मितिकेंद्राची अधिष्ठापित क्षमता ४२० मेवॉ. असून येथे निर्माण होणारी वीज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना पुरविण्यात येते. १९८२-८३ सालात या केंद्रामध्ये ६७.८९५ कोटी किवॉ. ता. एवढी वीज निर्मिती झाली.