भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचे प्रमुख तीन विभाग पडतात : (१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी, (२) सह्याद्रीच्या रांगा व (३) पूर्वेकडील पठारी प्रदेश.

(१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी : उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंतच्या चिंचोळ्या व सपाट भूप्रदेशाला कोकण असे म्हणतात. कोकणपट्टीचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग केले जातात. या किनारपट्टीच्या पश्चिमेस अरबी समुद्र, तर पूर्वेस सह्याद्रीची रांग आहे. किनारपट्टीची एकूण दक्षिणोत्तर लांबी ७२० किमी. व रुं दी ४० ते ८० किमी. आहे. उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यात रुंदी सर्वात जास्त म्हणजे १०० किमी. पर्यंत आहे. दक्षिणेकडे मात्र रुं दी कमी होत जाते. सह्याद्रीच्या रांगेमुळे कोकणपट्टीची रुंदी मर्यादित झाली आहे. हा भाग सपाट नसून बराचसा उंचसखल व खडबडीत आहे. सह्याद्रीच्या तीव्र उतावरून द्रुतगतीने वाहत येणाऱ्या नद्यांनी किनारपट्टीवर खोल चर पाडलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर झीज झालेल्या उभ्या आडव्या डोंगररांगांनी हा प्रदेश व्यापलेला आहे.


कोकणच्या किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत असून ती साधारणपणे १५ मी. पासून २७५ मी. पर्यंत आढळते. अगदी पश्चिमेकडील अरबी समुद्रलगतच्या सखल भागाची सस. पासून उंची फारच कमी असून या भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. तेथून पूर्वेकडील डोंगराळ भागाला ‘वलाटी’ असे म्हणतात. यानंतर सह्याद्रीच्या रांगेची सुरुवात होऊन त्याची उंची द्रुतगतीने वाढत जात असलेली दिसते. किनारपट्टीवर काही ठिकाणी कमी उंचीचे व जांभा खडकांचे पठारी भाग, तर नदीमुखांच्या प्रदेशात मैदाने आढळतात (किनारपट्टीचा, विशेषतः दक्षिणेकडील, भाग जांभ्या मृदेने व्यापला असून तेथे सस. पासून सरासरी७५ मी. उंचीचे पठारी भाग आढळतात). किनाऱ्यालगत मुरुड, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग आहेत. कमी उंचीचे भाग नद्यांच्या गाळाने भरून आलेले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर लहानमोठी बरीच बंदरे असून फार पूर्वीपासून व्यापाराच्या दृष्टीने ही बंदरे प्रसिद्ध आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळातही येथून अरबस्तान, ईजिप्त, ग्रीस, रोम यांच्याशी व्यापार चाले.

(२) सह्याद्रीच्या रांगा : महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील ही ⇨सह्याद्रीची रांग कोकणच्या किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. तिला पश्चिम घाट असेही म्हणतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेस राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक, केरळपर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आढळतात. सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग निर्माण झाले असून कोकण व पठारावरील नद्यांच्या हाच प्रमुख जलविभाजक आहे. पर्वताच्या उभय बाजूंना भूरचनेची दोन भिन्न स्वरूपे आहेत. पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकांच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. अधूनमधून झीज होऊन निर्माण झालेले उघडे व वनाच्छादित असे पर्वतांचे अवशिष्ट उतारही पहावयास मिळतात. या पश्चिम उतारावर नद्यांनी खोल दऱ्यातयार केल्या आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याकडे कोकणची किनारपट्टीआहे. पर्वताचा पूर्व उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन होतो.

सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे अनेक फाटे फुटलेले असून त्यांतील उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे ⇨सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंदगड, ⇨बालाघाटडोंगररांगा व महादेवाचे डोंगर प्रमुख आहेत. पठारावरील नद्यांचे हे दुय्यम जलविभाजक ठरतात. सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक व दक्षिणेकडे कमी आढळते. सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट या प्रदेशात आहेत त्यांवरून याला घाटमाथा असे म्हटले जात असावे. भीमाशंकर, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी स्थळे अशाच भागावर आहेत. सह्याद्री व त्याच्या निरनिराळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले अनेक डोंगरी किल्ले आहेत. नासिक-अहमदनगर जिल्हांच्या सीमेवर असलेले ⇨कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर (उंची १,६४६ मी.) आहे. याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), महाबळेश्वर (१,४३८ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही सह्याद्रीतील इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत.

सह्याद्री श्रेणी बरीचशी सलग असली, तरी तीमध्ये अधूनमधून खिंडी किंवा ⇨घाटही असलेले आढळतात. थळ, माळशेज, बोर, वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा , आंबोली इ. घाटांनी देश व कोकण एकमेकांना जोडले आहेत. या दोन प्रदेशांतील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने या घाटांना पूर्वीपासून महत्त्व आहे. मुंबई-नासिक महामार्गावरील कसारा येथील थळघाट व मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळ्याजवळील बोरघाट यांद्वारे महाराष्ट्राचा पूर्व भाग मुंबईशी रस्ते व लोहमार्गाने जोडला गेला आहे.

(३) पूर्वेकडील पठारी प्रदेश : सह्याद्रीच्या पूर्वेस विस्तृत असा पठारी प्रदेश पसरलेला असून त्याला देश म्हणूनही ओळखले जाते. राज्याच्या जवळजवळ नऊ-दशांश भाग या पठाराखाली मोडतो. दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्रात येत असून त्याला महाराष्ट्र पठार असेही संबोधले जाते. पश्चिमेस सह्याद्रीच्या पूर्व उतारापासून ते विदर्भाच्या अगदी पूर्व भागातील सूरजगड, भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत सु. ७५० किमी. व उत्तरेकडील सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्हापर्यंत सु. ७०० किमी. पर्यंत महाराष्ट्राचे पठार पसरले आहे. मुंबईसभोवतालच्या भागात या पठाराची जाडी अधिक आहे. पठाराची पश्चिम बाजू काहीशी उंचावलेली असून प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे व आग्नेयीस बंगालच्या उपसागराकडे असलेला दिसतो. पश्चिमेकडील सरासरी उंची ६०० मी. असून पूर्वेकडे वैनगंगा खोऱ्यात ती ३०० मी. पर्यंत कमी होत गेलेली आढळते.

महाराष्ट्राच्या पठारावर ठिकठिकाणी भूमिस्वरूपांची स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात. पठारावर सह्याद्रीच्या अनेक रांगा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुक्रमे ⇨सातपुडा पर्वत, तापी−पूर्णेचे खोरे, सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, गोदावरी खोरे, हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, भीमा खोरे, महादेवाचे डोंगर व शेवटी दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे अशी या पठारी प्रदेशाची भूरचना आहे. पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरफाट्यांचे प्रारंभ सह्याद्रीत होत असून त्या पश्चिम वायव्येकडून पूर्व आग्नेयीकडे पसरलेल्या आहेत. यांचे उत्तर उतार तीव्र व दक्षिण उतार मंद आहेत. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या नदीखोऱ्यांनी ह्या डोंगररांगा एकमेकींपासून अलग केलेल्या आहेत. हा संपूर्ण प्रदेश लाव्हारसापासून तयारझालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हे याच पठारी प्रदेशात येतात. पठारावर सपाट माथ्याचे डोंगर व टेकड्या हे भूविशेष आढळतात. डोंगरांच्या मुख्य रांगांना किंवा अन्य भूमिस्वरूपांना त्या त्या भागात स्थानिक नामाभिधाने देण्यात आली आहेत.


महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी व तिच्या दक्षिणेस तापी−पूर्णा खोरे असून काही वेळा हा एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला जातो. सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. तसेच अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट डोंगररांगा असे म्हणतात. बैराट (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तसेच चिखलदरा (१,११५ मी.) हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगांत आहे.

विदर्भाच्या पूर्वेकडील सीमाप्रदेशातील भूमिस्वरूपात विविधता आढळते. तेथे आर्द्र हवामानाच्या परिणामांमुळे झिजलेले ग्रॅनाइटी, चुनखडी व तत्सम खडक भूपृष्ठावर डोकावताना दिसतात व त्यामुळे अनियमित आकाराच्या सुळक्यांसारख्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. प्रसिद्ध रामटेक टेकडी (४०० मी.) हा या भागातील प्रातिनिधिक भूविशेष आहे. विदर्भात चिरोली, चिमूर, नवेगाव, भामरागड अशा लहानमोठ्या टेकड्या आढळतात.

नद्या : महाराष्ट्र राज्याच्या विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाल्या स्पष्टपणे दिसतात. कोकणातील नद्या व पठारावरील नद्या अशीही विभागणी करता येते. पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्राला, तर पूर्ववाहिनी नद्या काहीशा पूर्वेस अगर आग्नेयीस वाहत जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर बंगालच्या उपसागराला मिळतात. बहुतेक नद्या सह्याद्रीच्या रांगेत ५०० ते ७०० मी. उंचीच्या भागात उगम पावत असून सह्याद्री हा राज्यातील प्रमुख जलविभाजक आहे. याशिवाय सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांगा व उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग यांमध्येही काही नद्या उगम पावत असून त्यांना दुय्यम जलविभाजक म्हणता येईल.

पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रात ⇨तापी ही सर्वांत लांब व प्रमुख नदी आहे. ⇨पूर्णा नदी  ही तापीची प्रमुख उपनदी असून तापी-पूर्णेचे खोरे प्रसिद्ध आहे. हे खोरे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असून त्याने खानदेशाची भूमी सुपीक केली आहे. ⇨गिरणाव ⇨पांझरा नदीह्या तापीच्या इतर उपनद्या आहेत. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. ३१,३६० चौ. किमी. आहे. तापी-पूर्णा खोऱ्याचा दक्षिण भाग अधिक सपाट व सुपीक, तर उत्तर भाग वालुकामय व ओबडधोबड आहे

तापी खोऱ्याच्या उत्तरेस ⇨नर्मदा नदीचे खोरे असून ती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या उत्तर सीमेवरून सु. ५४ किमी. अंतर वाहते. नर्मदेचे फारच कमी जलवाहनक्षेत्र महाराष्ट्रात आहे. तापी व नर्मदा या दोन्ही नद्यांच्या मुखाचा प्रदेश गुजरात राज्यात असून उगम मध्य प्रदेश राज्यात आहे.

कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्रीत उगम पावून १०० ते १५० किमी. पश्चिमेस प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणची किनारपट्टी अरुं द असल्याने येथील बऱ्याच नद्यांची लांबी ८० किमी. पेक्षाही कमी आहे. दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इ. कोकणातील नद्या आहेत. वैतरणा व उल्हास नद्या तुलनेने अधिक लांब आहेत. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी (लांबी १३० किमी.) साष्टी बेटाच्या थोड्या उत्तरेस वसईखाडीत अरबी समुद्राला मिळते. कोकणातील नद्यांच्या मुखांशी खाड्यांची निर्मिती झालेली आढळते. काहींच्या मुखांशी वाळूचे दांडे आढळतात. वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर, विजयदुर्ग, तेरेखोल या ठिकाणी अशा खाड्या आढळतात. कोकणातील नद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या या नद्या विशेष उपयुक्त नाहीत. या नद्यांमुळे सह्याद्रीचा पश्चिम उतार विदीर्ण झाला आहे.

पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये ⇨गोदावरी नदी,भीमा नदीव ⇨कृष्णा नदीह्या प्रमुख नद्या आहेत. यांना आर्थिक तसेच धार्मिक-सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. यांपैकी गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी नासिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी. व जलवाहनक्षेत्र ७८,५६४ चौ. किमी. आहे. दारणा, प्रवरा, सिंदफणा, पूर्णा, प्राणहिता, ⇨मांजरा नदी, दुधना नदी व इंद्रावती ह्या गोदावरीच्या मुख्य उपनद्या आहेत. तापी व गोदावरी यांची खोरी सातमाळा−अजिंठा डोंगररांगांनी एकमेकींपासून अलग केलेली आहेत.

गोदावरीच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे असून ही दोन खोरी हरिश्चंद्रगड−बालाघाट डोंगररांगांनी एकमेकींपासून विभागली आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमेचा उगम होतो. भीमा ही कृष्णेची उपनदी असली, तरी ती महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर कृष्णेला मिळते, त्यामुळे महाराष्ट्रात या नद्यांची वेगवेगळी खोरी आहेत. कर्नाटक-आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर भीमा कृष्णेला मिळते. भीमेची महाराष्ट्रातील लांबी ४५१ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८४ चौ. किमी. आहे. कुकडी, घोड, भामा, पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा, गुंजवणी, येळवंडी, नीरा नदी, कऱ्हा, सीना, माण ह्या भीमेच्या उपनद्या आहेत.

भीमेच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे असून ही दोन्ही खोरी महादेव डोंगररांगांनी एकमेकींपासून वेगळी केली आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या वेण्णा, कोयना तसेच वारणा, वेरळा, ⇨पंचगंगा ह्या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेची राज्यातील लांबी २८२ किमी. व जलवाहनक्षेत्र २४,६८२ चौ. किमी. आहे.


महाराष्ट्राच्या पूर्व भागातील−विदर्भातील−नद्या दक्षिणवाहिनी असून त्यांची एक स्वतंत्र नदीप्रणाली असलेली दिसते. ⇨वर्धा नदी व ⇨वैनगंगा नदी ह्या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांचा उगम महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेस मध्ये प्रदेश राज्यात आहे. वर्धा-वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते. ⇨वैनगंगा ही वर्धा नदीची पश्चिमेकडून येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे. उंचसखल भूभागातून वहाणाऱ्या वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी ४५५ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८२ चौ. किमी. आहे तर वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी २९५ किमी. व जलवाहनक्षेत्र ३७,९८८ चौ. किमी. आहे.

कोकण व पठारावरील नद्यांमध्ये भूरचनेच्या फरकामुळे काही वैशिष्ट्ये आढळतात. कोकणातील नद्या लांबीने कमी, शीघ्रवाही, अरूं द व खोल दऱ्यांतून वाहणाऱ्या, उथळ मुख्यप्रदेश असलेल्या तर पठारावरील नद्या त्यांच्या तुलनेने लांबीने अधिक, कमी वेगवान, रुंद व उथळ दऱ्यांतून वाहणाऱ्या आहेत. कोकणातील नद्यांचे बरेचसे पाणी वाया जाते तर पठारावरील नद्यांच्या पाण्याच्या बराचसा उपयोग जलसिंचन व जलविद्युत्निर्मितीसाठी करून घेतला जात आहे. मात्रदोन्ही प्रदेशातील नद्यांना नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात भरपूर पाणी असते.

महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांत लहानमोठे नैसर्गिक वा कृत्रिम तलाव आढळतात. विशेषतः विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत तलावांची संख्या खूपच आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यातच सु. १५,००० तलाव आहेत. त्यामुळे विदर्भातील या भागाला तलावांचा प्रदेश असे म्हणतात. सह्याद्रीच्या उतारावर अनेक लहानमोठे गरम पाण्याचे झरे आहेत. उदा. ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, राजापूर-खेडजवळील गंगा, रायगड जिल्ह्यातील पाली (उन्हेरे) इत्यादी.

चौधरी, वसंत

प्राकृतिक स्वरूपाचे सौंदर्य : ‘राकट, दगडांचा व कातळांचा देश’ अशी महाराष्ट्राविषयी जी रूढ समजूत आहे, ती तितकीशी योग्य वाटत नाही. बेसाल्टी महाराष्ट्र म्हणजे एक साच्याचा असला, तरी तो नीरस नाही. बेसाल्टी भूस्तरांवर विविध व आकर्षक भूमिस्वरूपे ठिकठिकाणी आढळतात. सह्याद्रीच्या मुख्य रांगांमध्ये सप्तशृंगी, ‘ड्यूक्स नोज’, कळसूबाई असे उंच सुळके, किंवा सह्याद्रीच्या उतारावर असलेले वनाच्छादित लांबच लांब पट्टे, पायथ्याशी व दऱ्याखोऱ्यांमधील निबिड अरण्ये, अधूनमधून दिसणारे शीघ्र प्रवाहांचे पांढरे स्त्रोत व खळखळणारे धबधबे ही निसर्गाची देणगी, विशेषतः पावसाळ्यात व हिवाळ्यात, खुलून दिसते. या भागांतील लोणावळा, महाबळेश्वर, तसेच आंबा घाट आणि आंबोली घाट हे विविध जातींच्या वृक्ष-वनस्पतींनी समृद्ध आहेत. मध्य महाराष्ट्राच्या कोरड्या व निमकोरड्या डोंगराळ भागांतील बरीच वनसंपदा खालावली असली, तरी अजिंठा, महादेव, पुरंदर या रांगांच्या दऱ्याखोऱ्यांमधील वनश्री पावसाळ्यात रमणीय दिसते. सातपुड्यातील तोरणमाळ, मेळघाटमधील चिखलदारा, मराठवड्यातील म्हैसमाळ यांचे परिसरही प्रेक्षणीय आहेत. सहल, साहस व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला, तर महाराष्ट्राची भूमी खूपच आकर्षक व अभ्यसनीय आहे, असे दिसून येईल.

ग्रॅनाइटी व चुनखडकी भूस्तरांवरील पूर्व विदर्भातील डोंगराळ प्रदेशांमध्ये तर सृष्टिसौंदर्य जवळजवळ बाराही महिने पाहावयास मिळते. पण अद्याप त्याकडे आपले लक्ष आकृष्ट झालेले दिसत नाही. त्याप्रमाणेच दक्षिण सिंधदुर्ग जिल्ह्यातील सृष्टिसौंदर्य गोव्याप्रमाणेच रमणीय आहे.

देशपांडे, चं. धुं.

संदर्भ :

1. Directorate of Pubicity, Govt. of Maharashtra,Minerals In Maharahshtra, Bombay, 1961.

2. Govt.  of Maharashtra,Maharashtra  State Gozeteer, Bombay, 1961.

 3. y3wuohi, C. B. Arunachalam, B. Maharashtra (A Regional  study), Bombay, 1962.

4. Kulkarni, D. G., River Basins of Maharashtra, Poona, 1970.

५. देशपांडे, चं. घुं. अनु. तावडे,मो. द. महाराष्ट्राचा भूगोल, नवी दिल्ली, १९७६.

६. महाराष्ट्र जनगणना कार्यालय, महाराष्ट्रातील खेड्यांची व शहरांची वर्णक्रमी,मुंबई, १९६५