महत्त्वाची स्थळे

निसर्गसौंदर्याची विविधता आणि वैचित्र्य, प्रदीर्घ धार्मिक-कलात्मक परंपरांची द्योतक असलेली स्मारके आणि आधुनिकतेची भव्य प्रतीके यांनी हा महान देश नटलेला आहे. या विविध दृष्टींनी प्रेक्षणीय असलेली व भिन्नभिन्न अभिरुचीच्या देशी-विदेशी पर्यटकांना मोह घालणारी अनेक स्थळे भारतात सर्वत्र विखुरलेली आहेत. हिमालयाची उत्तुंग बर्फाच्छादित शिखरे, भूनंदनवन म्हणून गौरविलेले निसर्गरम्य काश्मीर पूर्व-पश्चिम सागरकिनाऱ्यांवरील मरीना बीच (तमिळनाडू), कोवळम्‌ (केरळ) यांसारख्या विस्तीर्ण पुळणी काझीरंगा (आसाम), ताडोबा (महाराष्ट्र), गीर (गुजरात) यांसारखी राष्ट्रीय वने आणि अभयारण्ये व त्यांतील चित्रविचित्र पशुपक्षी दार्जिलिंग (प, बंगाल), मांडू (मध्यप्रदेश), उटी (तमिळनाडू) यांसारखी रम्य गिरिस्थाने आणि आरोग्यधामे इत्यादींचे वरदान भारताला लाभले आहे. खजुराहोची शिल्पे, अजिंठ्याची लेणी, कोनारकचे सूर्यमंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची प्रचंड मूर्ती, आग्र्याचा ताजमहाल, दिल्लीचा लाल किल्ला व कुतूबमीनार नद्यांच्या काठाने वसलेली वाराणसीसारखी प्राचीन तीर्थक्षेत्र आणि दुर्गम पर्वतीय प्रदेशांत वसलेली बद्रिकेदार (उत्तर प्रदेश), अमरनाथ गुंफेसारखी (जम्मू व काश्मीर) प्राचीन धार्मिक स्थाने इत्यादीतून ऐतिहासिक-धार्मिक-कलात्मक परंपरांचा वारसा टिकून राहिल्याचे दिसून येते. पारंपारिक हस्तकलांची केंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. आणि तेथील वेधक कलावस्तूंचे देशी-विदेशी पर्यटकांना मोठेच आकर्षण वाटते. इतिहासप्रसिद्ध स्थळे भारतात सर्वत्रच विखुरलेली आहेत.

भारताची गुलाबी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर, इतिहासकालीन वास्तुकलेची स्मारके जपणारी फतेपुर-सीक्री, अहमदाबाद, दिल्ली, विजापूर, हंपी-होस्पेट यांसारखी शहरे, शिखांचे सुवर्णमंदिर असलेले अमृतसर इत्यादींविषयी पर्यटकांना–अभ्यासकांना मोठेच कुतूहल वाटत आले आहे. बद्रिकेदार, द्वारका, जगन्नाथपूरी व रामेश्वर या चार दिशांना असणाऱ्या चार धामांच्या तीर्थयात्रेचा संकेत भारताच्या एकात्म सांस्कृतिक परंपरेचा निदर्शक आहे [→ तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा]. भारतीय संस्कृतीचा परंपरागत स्मारकांनी नटलेल्या या देशात आधुनिक विज्ञानयुगाची नवी तीर्थक्षेत्रेही उभी राहिली आहेत. मुंबई येथील अणुविक्रियक केंद्र, जगातील सर्वांत उंच असे भाक्रा येथील धरण, अमेरिकेतील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीच्या नमुन्यावर उभारलेल्या दामोदर खोरे प्रकल्प, बंगलोर येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनी, चित्तरंजन येथील रेल्वे एंजिनांचा कारखाना, सिंद्री ( बिहार ) नानगल ( पंजाब ) येथील खत कारखाने, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ल कॉर्ब्यूझ्ये या वास्तुविशारदाने उभे केलेले आधुनिक चंडीगड, थुंबा ( केरळ ) येथील अग्निाबाण-प्रक्षेपण केंद्र इ. आधुनिक युगाची नवी प्रतीके भारताच्या प्रगतीची निदर्शक आहेत. भारतातील विविध दृष्टींनी महत्त्वाच्या असणाऱ्या सर्व स्थळांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.

१९८१ च्या जनगणनेनुसार भारतातील १० लक्षांवर लोकसंख्या असलेली शहरे पुढीलप्रमाणे आहेत : कलकत्ता (९१,६५,६५०), बृहन्मुंबई (८२,२७,३३२), दिल्ली (५७,१३,५८१), मद्रास (४२,७६,६३५), बंगलोर (२९,१३,५३७), हैदराबाद (२५,२८,१९८), अहमदाबाद (२५,१५,१९५), कानपूर (१६,८८,२४२), पुणे (१६,८५,३००), नागपूर (१२,९७,९७७), लखनौ (१०,०६,५३८) व जयपूर (१०,०४,६६९). ही सर्वच महानगरे औद्योगिक दृष्ट्या विकसित झालेली असून विविध प्रकारच्या आधुनिक उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत. आधुनिक भारताच्या विविधांगी प्रगतीचे दर्शन या महानगरांतून घडते.

स्वामी विवेकानंद समारक, कन्याकुमारी.

आधुनिक पर्यटनव्यवसायाच्या दृष्टीने भारतातील विविध प्रकारच्या पर्यटनकेंद्रांचा विकास करण्यासाठी १ ऑक्टोबर १९६६ रोजी भारतीय पर्यटन विकास निगम स्थापन करण्यात आला [→ पर्यटन]. या निगमामार्फत प्राचीन इतिहासप्रसिद्ध स्थळांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढविणे, सागरकिनाऱ्यावरील सहलींची स्थळे, पशुपक्ष्यांची अभयारण्ये, विविध मोसमांनुसार सोयीची ठरणारी क्रीडास्थाने, तसेच पर्यटकांच्या भोजननिवासाच्या दृष्टीने व दळणवळणाच्या दृष्टीने आधुनिक सुविधा उपलब्ध करणे इ. कामे केली जात आहेत. वरील निगमाची कार्यालये परदेशांतही स्थापन करण्यात आलेली आहेत. परदेशी पर्यटकांना विविध उपक्रमांद्वारे व प्रचार माध्यमांचा उपयोग करून भारताकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालू आहे.

जाधव, रा. ग.