खेळ व मनोरंजन

‘शारीरिक शिक्षण’ या संज्ञेत स्वास्थ्य, शारीरिक व्यायाम, खेळ व मनोरंजन यांचा समावेश आता सर्वसामान्य झाला आहे. भारताच्या शारीरिक शिक्षणाच्या व तदानुषंगाने खेळ-मनोरंजनाच्या इतिहासाचे सिंहावलोकन स्थूलमानाने पुढीलप्रमाणे चार भागांत दिले आहे : (१) वैदिक व पौराणिक काळ (इ. स. पू. २००० ते ६००), (२) मध्ययुगीन काळ (इ. स. पू. ६०० ते इ. स. १७५०), (३) ब्रिटिश अमदानीतील काळ (१७५० ते १९४७) व (४) स्वातंत्र्योत्तर काळ (१९४७ नंतर).

वैदिक व पौराणिक काळ : या काळात शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमात स्वरंक्षणासाठी स्वतःचे सामर्थ्य वाढविणे, युद्धोपयोगी हालचाली व शस्त्रांचे शिक्षण यांचा समावेश असे. रामायण आणि महाभारत काळात आश्रमव्यवस्थेवर भर असे. गुरूगृही राहून श्रमाची व स्वालंबनाची कामे, ⇨ सूर्यनमस्कार, योगविद्या इ. उपक्रमांच्या साहाय्याने शरीराची सुदृढता, मनोनिग्रह व चारित्र्यसंवर्धन यांवर भर दिला जात असे. संरक्षणविषयक शिक्षणात ⇨ मुष्टियुद्ध, गदायुद्ध, ⇨ धनुर्विद्या, तसेच परशु, भाला यांसारखी शस्त्रे चालविणे इ. प्रकारचे शिक्षण दिले जाई. राम-लक्ष्मण व त्यांची वानरसेना, कृष्ण, बलाराम, भीम, जरासंध तसेच युद्धकलेत निपुण असलेला व समतोल व्यक्तिमत्त्वाचा अर्जुन इ.पौराणिक व्यक्तींच्या चारित्र्याचा परिचय त्या काळच्या ग्रंथांतून होतो. शिवाय त्या काळात ⇨ पोहणे, नृत्यकला, द्यूतक्रीडा इ. रंजनप्रकारही आढळतात. तक्षशिला, पाटलिपुत्र, कनौज यांसारखी प्रसिद्ध शिक्षणकेंद्रे या काळात अस्तित्वात होती. तक्षशिला केंद्र हे शारीरिक शिक्षणाचे माहेरघर मानले जात असे. अन्य देशांतील विद्यार्थीही शिक्षणासाठी तेथे येत असत. हे केंद्र इ. स. चौथ्या शतकापर्यत अस्तित्वात होते.

मध्ययुगीन काळ : या काळात अहिंसा, सात्त्विक जीवन, शरीरस्वास्थ्य व मिताहार अशा विचारांचा पगडा सर्वसाधारण लोकांवर बसला. याच काळात मौर्यांच्या राज्यात लढाऊ वृत्ती टिकविण्यासाठी कुस्ती, मुष्टियुद्ध, घोडदौड, तिरंदाजी यांवर भर असे. डोंगर चढणे, घोड्यावरून लांब रपेट आदींचेही शिक्षण दिले जाई. सम्राट अशोकाच्या राजवटीत साधी राहणी, धार्मिक वृत्ती यांबरोबरच शारीरिक बलसंवर्धन आणि सैनिकी शिक्षण यांवर विशेष भर दिला जाऊ लागला. सु. पाचव्या शतकात पाटण्याजवळ नालंदा येथे मोठे विद्यापीठ सुरू झाले. या विद्यापीठात अनेक विद्या, कला आणि शास्त्रे यांच्या बरोबरीनेच सूर्यनमस्कार व अन्य व्यायामप्रकार यांचाही समावेश करण्यात आला. येथील विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये शारीरिक शिक्षणास महत्त्वाचे स्थान असे. पाचव्या ते बाराव्या शतकांत भारतात बरीचशी राजकीय सत्ता राजपूत राजांकडे होती. राजपूत हे कणखर व शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होते. शरीरसामर्थ्य व शुद्ध चारित्र्य यांच्या संवर्धनाच्या हेतूने घोडदौड, ⇨ नेमबाजी, धनुर्विद्या, ⇨ कुस्ती, ⇨ शिकार यांवर त्यांनी जास्त भर दिला. याबरोबरच संगीत, नृत्य इ. रंजनात्मक कलांचाही विकास या काळात झाला. साधारणपणे इ. स. १२०० पासून इस्लामी राजवटीचे वर्चस्व भारतात जाणवू लागले. त्यांनी घोडदौड, नेमबाजी, तलवार-युद्ध, कुस्ती, पोहणे, द्वंद्वे, शिकार इ. क्रीडाप्रकारांतील कौशल्याचे व सरावाचे शिक्षण लोकांना दिले. बैल, रेडा, हत्ती इ. प्राण्यांबरोबरच्या झुंजीचे प्रकारही त्या काळात रूढ होते. मोगल काळात समाजात ⇨ बुद्धिबळ, सोंगट्या, द्यूत इ. मनोरंजनपर खेळांनाही खास स्थान असल्याचे दिसून येते. या सत्तेची सामना देण्याकरिता दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना हेतुपुरस्सर बलसंवर्धनाचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणेने वीर मारूतीच्या मूर्तीपुढे आखाडे स्थापन झाले. त्यात कुस्ती, दंड-बैठका, सूर्यनमस्कार, ⇨ वजन उचलणे, लाठी चालवणे, ⇨ पट्ट्याचे हात, ⇨ फरीगदगा, जंबिया चालवणे इ. प्रकारांच्या शिक्षणावर भर दिला जाई. तसेच मुलांना व तरुणांना घोडदौड, ⇨ गिर्यारोहण, जलतरण वगैरे प्रकारांचे शिक्षणही दिले जाई. स्त्रियांच्या सण-उत्सव प्रसंगी खेळावयाचे झिम्मा, ⇨ फुगडी, पिंगा, सुपारी, कोंबडा इ. नृत्यात्म रंजनप्रकार तालबद्ध व आकर्षक असत आणि त्यातून अनायासे व्यायामही घडत असे. तसेच घोड्यावर बसणे, जंबिया आदी शस्त्रे चालवणे यांसारखे स्वसंरक्षणाचे शिक्षणही त्यांना दिले जाई. मुलांसाठी ⇨ भोवरा, ⇨ पतंग, ⇨ विटीदांडू, गोट्या, सूरपारंब्या इ. रंजनात्मक खेळ होते. युवकांना आपले शरीरसामर्थ्य वाढविण्यासाठी योग्य असे शारीरिक शिक्षण देणारी व त्यांच्याकडील देशाभिमान जोपासणारी ही शिवकालीन परंपरा आखाडे व ⇨ व्यायामशाळा ह्यांच्यातून पेशवाईतही जतन करण्यात आली. शरीर कसदार व चपळ करण्यास तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास पूरक असणारे मल्लविद्या, ⇨ मल्लखांब यांचेही शिक्षण या काळात मुलांना व तरुणांना दिले जाई. ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांच्या ओव्या अभंगांतून हुतूतू-हमामा, गोट्या इ. खेळ चंद्रभागेच्या वाळवंटात मांडल्याची रूपके आढळतात. लोक व्यायामपर अशा हुतूतू, आट्यापाट्या इ. सांघिक खेळांत, तसेच ⇨ लेझीम, झांज , ढोल वाजविणे, तुतारी, शिंग फुंकणे इ. रंजनप्रकारांत हिरिरीने भाग घेत असत. रंजनात्मक खेळ हे प्रामुख्याने ग्रामदेवतांच्या जत्रा, उरूस इ. प्रसंगी, विवाहसमारंभांतून, नवीन धान्याच्या साठवणीच्या वेळी वगैरे प्रसंगी खेळले जात. शेकडो लोक क्रीडापर द्वंद्वे व सामुदायिक लोकनृत्ये यांतून भाग घेत असत. सारांश, प्राचीन व मध्ययुगीन भारतीय व्यायामपद्धती, खेळ व रंजनप्रकार हे भारतीय परंपरेस अनुसरून शरीरसंवर्धनास, आत्माक्षणास आणि चरित्र्यविकासास पोषक असल्याचे आढळून येते.

ब्रिटिश काळ : १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर भारतात इंग्रजांचे वर्चस्व सुरू झाले व त्यांनी हिंदूस्थानातील निवडक लोकांना, त्यांचा नोकरवर्ग वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण देणे सुरू केले. शिक्षणाची जबाबदारी १८८० मध्ये प्रांतिक सरकारांवर सोपविण्यात आली पण त्यात शारीरिक शिक्षणाला स्थान नव्हते. १८८२ च्या ‘इंडियन एज्युकेशन कमिशन’च्या शिफारसींवरून काही निवडक संस्थांमध्ये मर्दानी व्यायाम, ⇨ कवायती व संचलने इ. प्रकार सुरू झाले. १८९४ मध्ये ह्या विचारांस चालना मिळाली आणि प्रत्यक्षात फुटबॉल, क्रिकेट, ⇨ व्यायामविद्या ( जिम्नॅस्टिक्स ) यांसारखे काही प्रकार सुरू करण्यात आले. मात्र भारतीय व्यायाम व खेळ यांच्या परंपरा टिकविण्याचे कार्य या काळातही खाजगी व्यायामसंस्था व आखाडे ह्यांनीच केले. तसेच भारताच्या प्राचीन शास्त्रशुद्ध योगविद्येचा प्रसारही काही संस्थांनी चालू ठेवला.

पुढे १९१२ मध्ये मध्यवर्ती सरकारने शारीरिक शिक्षणाकरिता प्रथम तरतूद केली. काही सरकारी शाळांतून निवृत्त सैनिक व व्यायामपटू यांची कवायत ( ड्रील ) – शिक्षक म्हणून नेमणूक करण्यास सुरूवात झाली. १९२० मध्ये भारतामध्ये एच्‌. सी. बक यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षणाकरिता प्रशिक्षणसंस्था सुरू करण्यात आली. नंतर उदयास आलेल्या शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणसंस्था पुढीलप्रमाणे : ( १ ) वाय्‌. एम्. सी. ए.’ (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) शा. शि. महाविद्यालय, मद्रास ( १९२० ), ( २ ) शासकीय शा. शि. महाविद्यालय, हैदराबाद ( १९३१ ) ( ३ ) शा. शि. महाविद्यालय, कलकत्ता ( १९३२ ) ( ४ ) ख्रिश्चन शा. शि. महाविद्यालय, लखनौ ( १९३२ ) ( ५ ) शा. शि. महाविद्यालय, कांदिवली, मुंबई ( १९३८ ) ( ६ ) शा. शि. महाविद्यालय, रामपूर, उ. प्र. ( १९४५ ) ( ७ ) तिरुत शा. शि. महाविद्यालय, मुझफरपूर, बिहार ( १९४६ ) (८) शा. शि. पदविका विद्यालय, अमरावती ( १९४७ ).

तदनंतर काही प्रांतांतील शाळांतून विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण देण्याची व्यवस्था झाली. १९२० मध्ये अँटवर्पच्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताचा एक अनधिकृत संघ पाठवण्यात आला असला, तरी ‘इंडियन ऑलिंपिक असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली ती १९२७ मध्ये दिल्ली येथे. पॅरिसच्या ऑलिंपिक सामान्यता ( १९२४ ) भाग घेण्यासाठी भारताचा पहिला अधिकृत संघ पाठवण्यात आला. [→ ऑलिंपिक क्रीडासामने ]. पुढे भारतात फुटबॉल, हॉकी, टेनिस, क्रिकेट, व्यायामी खेळ ( ॲथलेटिक्स ) इ. अनेक खेळांच्या राष्ट्रीय संघटनाही साधारपणे १९१० ते १९३७ या काळात स्थापन झाल्या.

विविध खेळांचे सामने भरविण्यासाठी मुंबई, कलकत्ता, मद्रास, दिल्ली इ. ठिकाणी क्रीडागृहे बांधण्यात आली. पण हे प्रयत्न फक्त शहरी भागांतूनच झाल्यामुळे त्याचा फायदा फार थोड्या लोकांना मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळात शारीरिक शिक्षणाचा विकास खाजगी संस्थांच्या प्रेरणेने आणि काही प्रमाणात संस्थानिकांच्या आश्रयाखाली झाला, असे आढळून येते.


स्वातंत्र्योत्तर काळ : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानानुसार शिक्षणाची पुनर्रचना करण्यास सुरुवात झाली. शारीरिक शिक्षण हे व्यक्तिविकासाचे व समाजरक्षणाचे प्रमुख साधन मानले गेले. निकोप प्रकृती, सुदृढ शरीर, स्नांयूचे कौशल्य, मानसिक उत्साह, फुरसतीच्या वेळेचा मनोरंजनपर सदुपयोग इ. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शारीरिक शिक्षण हेच योग्य माध्यम आहे, हा विचार शिक्षणतज्ञ मान्य करू लागले. भारत सरकारने १९५० साली शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळ नेमले. या मंडळाने १९५६ मध्ये शारीरिक शिक्षण व मनोरंजन या विषयांचा राष्ट्रीय आराखडा तयार केला. शिक्षणाच्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन या सर्व स्तरांवर शारीरिक शिक्षणाचा श्रेणीयुक्त ( ग्रेडेड ) अभ्यासक्रम, शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण, या विषयाची मूल्यांकन पद्धती इ. बाबींवर योजना तयार करण्यात आल्या. लहान मुलांकरिता अनुकरणात्मक हालचाली, गोष्टीरूप खेळ, कृतियुक्त गाणी, मनोरंजक खेळ, नाट्यीकरण, कसरतीचे व्यायाम, तालबद्ध हालचाली, सांघिक खेळ, सुलभ शर्यती इ. प्रकार भारतातील शाळांतून आयोजित करण्यास सुरूवात झाली.

कालांतराने विद्यार्थी-युवकांच्या विकासाकरिता शारीरिक शिक्षण, खेळ, ⇨ बालवीर संघटना, राष्ट्रीय अनुशासन योजना, ⇨ राष्ट्रीय छात्र सेना ( एन्‌. सी. सी. ) यांसारख्या अनेक योजना सुरू झाल्या. या योजनांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने १९५९ मध्ये कुंझरू समितीने ज्या शिफारसी केल्या, त्यांच्या अनुरोधाने भारत सरकारने, जगन्नाथराव भोसले यांच्या राष्ट्रीय शिस्त योजनेत योग्य त्या सुधारणा करून माध्यमिक शाळांकरिता एक ⇨ राष्ट्रीय स्वास्थ्य योजना तयार केली. या सुधारित अभ्यासक्रमात शरीरसंवर्धक व्यायाम, कवायती, कसरतीचे व्यायाम, लोकनृत्ये, सांघिक खेळ, मनोरंजनात्मक खेळ, ⇨ व्यायामी व मैदानी खेळ, द्वंद्वे, नागरिक-शिक्षण इ. प्रकारांचा समावेश केला गेला.

पुढे भारतात कोठारी शिक्षण आयोगाच्या (१९६४–६६) शिफारसीप्रमाणे शिक्षणपद्धतीमध्ये १० + २ + ३ हा आकृतिबंध राबवला गेला, तेव्हा भारत सरकारच्या ‘एन्‌. सी. इ. आर्‌. टी.’च्या विभागाचे एक ते दहा इयत्तांकरिता शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना सुचविली. त्यांत आवश्यक व ऐच्छिक असे प्रकार असून स्वास्थाच्या अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. शिवाय शाळांतून आंतरवर्गीय व आंतरशालेय स्पर्धा तसेच आंतरजिल्हा व आंतरराज्य पातळींवरील शालेय स्पर्धा विस्तृत प्रमाणावर आयोजित करण्यावर भर देण्यात आला. स्वास्थ्य व शारीरिक शिक्षण परीक्षापद्धतीचाही आराखडा तयार करण्यात आला. शाळांतून शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयांचे आयोजन करण्यासाठी क्रीडांगणे, क्रीडासाहित्य, प्रशिक्षित शिक्षक, शारीरिक शिक्षणाचे वर्गवार तास इ. बाबींवर प्रत्येक राज्य शासनाने शाळा-मुख्याध्यापकास योग्य ते आदेश वेळोवेळी देऊन त्यांची कार्यवाही सुकर व्हावी, म्हणून शारीरिक शिक्षणाच्या निरीक्षकांचीही व्यवस्था केली.

भारत सरकारने १९४८ मध्ये नेमलेल्या डॉ. राधाकृष्णन्‌ समितीने महाविद्यालयांच्या विकासासंबंधी ज्या शिफारसी केल्या, त्यांत शारीरिक शिक्षण व खेळ यांच्या व्यवस्थेबद्दल उल्लेख आहे. महाविद्यालयातील पहिल्या दोन वर्षाकरिता या विषयाचे आयोजन करण्यात आले. पुढे १९६५-६६ मध्ये महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व खेळ यांचा विकास कसा करावा, याकरिता डॉ. सी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक खास समिती नेमण्यात आली. या समितीच्या प्रमुख शिफारसी अशा : ( १ ) महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाला प्राधान्य द्यावे व ते सर्वांकरिता असावे. ( २ ) महाविद्यालयांतून क्रीडांगणे, प्रशिक्षित अध्यापक, क्रीडासाहित्य इ. बाबींची व्यवस्था व्हावी. ( ३ ) महाविद्यालयात प्रवेश तसेच कोणत्याही क्षेत्रात नोकरीकरिता निवड या बाबतींत क्रीडापटूंना प्राधान्य द्यावे. मात्र त्यांनी प्रवेशाच्या वा नोकरीच्या अन्य आवश्यक निकषांची पूर्ती केलेली असावी. ( ४ ) विद्यार्थ्याच्या पदवीपत्रात त्याच्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीचाही उल्लेख असावा.

महाविद्यालयातील क्रीडाविकासाकरिता भारत सरकारने राष्ट्रीय शालेय क्रीडासंघटना ( नॅशनल स्पोर्ट्‌स ऑर्गनायझेशन) स्थापन केली.

शारीरिक शिक्षण व क्रीडा-प्रशिक्षण : शारीरिक शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांत श्रेष्ठ दर्जाचे नेतृत्व उपलब्ध व्हावे, म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय पातळीवर दोन संस्था स्थापन केल्या : ( १ ) ‘लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिझिकल एज्युकेशन’, ग्वाल्हेर ( १९५७ ) आणि ( २ )‘नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स’, पतियाळा ( १९५८ ).

लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिझिकल एज्युकेशन : या कॉलेजमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले : ( १ ) शारीरिक शिक्षणाचा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम – ‘बी. पी. ई.’, ( २ ) शारीरिक शिक्षणाचा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम – ‘एम्‌. पी. ई.’ या पदवीकरिता तीन वर्षांच्या सुट्टीत येणाऱ्या शारीरिक शिक्षणाच्या पदवीधरांकरिता खास अभ्यासक्रम ( व्हेकेशन कोर्स ) आहे. ( ३ ) मास्टर ऑफ आर्ट्‌स / सायन्स – फिझिकल एज्युकेशन–हा दोन वर्षांचा, शारीरिक शिक्षण व एक शालेय विषय घेऊन केलेला, अभ्यासक्रम आहे. ( ४ ) उच्च पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर ‘एम्‌. फिल्‌.’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम हे. शिवाय ( ५ ) ‘डॉक्टरेट इन फिझिकल एज्युकेशन’ प्राप्त करण्याकरिता इथे मार्गदर्शन दिले जाते. हे महाविद्यालय स्वायत्त आहे.

नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स : या संस्थेत निरनिराळ्या खेळांचा क्रीडाशास्त्राच्या दृष्टीने सखोल अभ्यास करण्यासाठी क्रीडातंत्रविषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच व्यायामी खेळ व व्यायामविद्या, कुस्ती, टेनिस, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, क्रिकेट, जलतरण इ. क्रीडाप्रकारांच्या संदर्भात या संस्थेत मार्गदर्शन कार्य चालते. या संस्थेतील शिक्षणक्रम असे : ( १ ) विविध खेळांचा मार्गदर्शन काळ एक वर्षाचा आहे व अंतिम उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रशिक्षण ( कोचिंग ) – पदविका दिली जाते. ( २ ) दोन वर्षाचा ‘मास्टर ऑफ स्पोर्ट्‌स’चा अभ्यासक्रमही येथे सुरू केला आहे. ( ३ ) भारतातील शासीरिक शिक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांकरिता सहा आठवड्यांचा प्रबोधन वर्ग ही संस्था चालविते. ( ४ ) राष्ट्रीय पातळीवर क्रीडासंघटनांकरिता त्यांच्या खेळांची क्रीडा-मार्गदर्शन-शिबिरे येथे भरविली जातात. या संस्थेच्या दोन शाखा बंगलोर व कलकत्ता येथे आहेत.

नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स, पतियाळा.

ग्वाल्हेर व पतियाळा या संस्थांचे कार्य ‘सोसायटी ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिझिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्‌स’ ( स्नाइप्स ) या पतियाळा येथील स्वायत्त स्वरूपाच्या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली चालते.

भारतात खाजगी स्वरूपाच्या पण चांगली परंपरा असलेल्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’, अमरावती व ‘वाय्‌. एम्‌. सी. ए.’, मद्रास या संस्थांच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयांनी भारतीय पातळीवर शारीरिक शिक्षण महाविद्यालयांनी भारतीय पातळीवर शारीरिक-प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. याशिवाय निरनिराळ्या राज्यांत एका वर्षाच्या मुदतीचे पदवी /पदविका दर्जाचे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण – अभ्यासक्रम सु. ३५ ते ४० आहेत, तसेच शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांकरिता एका वर्षाचे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्या सु. ८ ते १० संस्था आहेत.


प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांकरिता त्यांच्या प्रशिक्षणअभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण अध्यापनपद्धतीचा, समावेश करण्यास सुरूवात काही राज्यांत झाली आहे. कारण प्राथमिक शाळांत वर्गशिक्षकच शारीरिक शिक्षणासह सर्व विषय शिकवत असतो.

शासकीय पातळीवरील प्रयत्न : भारतातील क्रीडाविकासाकरिता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारे तसेच सर्व स्तरांवरील क्रीडासंघटना, शिक्षणसंस्था, विद्यापीठे या सर्वांनीच या कामाला नव्या दिशेने प्रारंभ केला. या कार्याचा परिचय पुढे दिला आहे :

अखिल भारतीय क्रीडा परिषद : (१९५४). कार्यकक्षा-( १ ) निरनिराळ्या खेळांच्या राष्ट्रीय संघटनांमध्ये समन्वय साधणे, ( २ ) त्यांना योग्य तो सल्ला देणे, ( ३ ) त्यांना अनुदान देण्याबद्दल शिफारशी करणे, ( ४ ) भारतीय संघाची निवड, परदेशी होणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्याकरिता परवानगी देणे, निवड झालेल्या संघाकरिता क्रीडामार्गदर्शन-शिबिरे भरविणे. ( ५ ) त्यांना आर्थिक मदत वगैरेबाबत सल्ला देणे, ( ६ ) नामवंत क्रीडापटूंना राष्ट्रीय पुरस्काराबाबत मार्गदर्शन करणे. अशाच धर्तीवर निरनिराळ्या राज्यांत राज्य-क्रीडापरिषदा स्थापन करण्यात आल्या. सर्व भारतात क्रीडाविकासाच्या तसेच संघटनांच्या कार्यात समन्वय साधण्याच्या संदर्भात या परिषदा योग्य ती कार्यवाही करीत असतात.

क्रीडाविकासाच्या कार्याकरिता भारत सरकारने १९५८ व १९६० या वर्षी दोन समित्या नेमल्या. त्यांपैकी पहिली समिती पतियाळाच्या महाराजांच्या अध्यक्षतेखाली होती. या समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी अशा : (१) क्रीडाविकासासाठी योग्य नियोजन असावे, ( २ ) राष्ट्रीय पातळीवर क्रीडामार्गदर्शनाचे प्रशिक्षण देणारी संस्था असावी, ( ३ ) ग्रामीण भागांत क्रीडाविकासावर भर देण्यात यावा, ( ४ ) क्रीडासंघटनांच्या कार्यात सुव्यवस्थितपणा आणणे, शिक्षणसंस्थांत सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणे, क्रीडापटूंना पोषक आहाराची व्यवस्था करणे इ. बाबींचाही त्यात समावेश आहे. पतियाळा येथील ‘नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स’ची स्थापना होण्याचे श्रेय या समितीस द्यावे लागेल.

दुसरी समिती म्हणजे कौल – कपूर समिती ( १९६० ) होय. १९६० मध्ये रोम येथे ज्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्या, तेथे हे दोघे भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यांच्या महत्त्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे : ( १ ) शाळा व महाविद्यालये यांतून शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा असावा, ( २ ) या संस्थांमध्ये क्रीडांगणांची सोय असावी व त्याकरिता शासनाने मदत करावी, ( ३ ) क्रीडानैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात, ( ४ ) शासन, विद्यापीठे, औद्योगिक केंद्रे यांनी ठिकठिकाणी क्रीडाकेंद्रे तसेच रंजनकेंद्रे स्थापन करावीत. या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रीय पातळीवर क्रीडा-शिष्यवृत्त्या देण्याची योजना केंद्र शासनाने मान्य केली.

राष्ट्रीय क्षमता मोहीम : (१९५९ – ६० ). भारतातील स्त्री-पुरूष व युवक – युवतींमध्ये शारीरिक शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येकाला आपली शारीरिक क्षमता अजमावता यावी. म्हणून मूलभूत कसोट्या ठरविण्यात आल्या. तसेच त्यात उत्तीर्ण होण्याकरिता तीन श्रेणींमध्ये निकष ठरविण्यात आले. हे निकष वयोगटांप्रमाणे ठरविले आहेत. प्रतिवर्षी या कसोट्यांत अंदाजे २० लाख लोक भाग घेतात. या कसोट्यांत उच्च दर्जा प्राप्त करण्याकरिता प्रतिवर्षी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा भरविल्या जातात व त्या त्या वयोगटांतील सर्वोत्कृष्ट स्पर्धेकांस राष्ट्रीय पारितोषिके व शिष्यवृत्त्या देण्यात येतात. ही कामगिरी ग्वाल्हेर येथील ‘लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिझिकल एज्युकेशन’ या राष्ट्रीय संस्थेवर सोपविण्यात आली आहे.

शिष्यवृत्त्या : राष्ट्रीय स्तरांवर विविध खेळांच्या स्पर्धात उत्कृष्ट दर्जा प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्रतिवर्षी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. तसेच अशा शिष्यवृत्त्या राज्य पातळीवरील खेळाडूंनाही राज्य शासनातर्फे दिल्या जातात.

राष्ट्रीय पुरस्कार व सन्मान : क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना १९६३ पासून प्रतिवर्षी ⇨ अर्जून पुरस्कार देण्यात येतो. तसेच राज्य शासनातर्फेही अशा तऱ्हेची पारितोषिके देण्याचा उपक्रम काही राज्यांत सुरू झाला आहे. उदा., महाराष्ट्रातील ⇨ शिवछत्रपती पुरस्कार. संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या नामवंत क्रीडापटूंना आणि क्रीडाकार्यकर्त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ इ. किताबही केंद्र शासनातर्फे देण्यात येतात.

क्रीडाविषयक वाड्‌मयनिर्मिती : शारीरिक शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांत दर्जेदार वाड्‌मयनिर्मितीस प्रोत्साहन मिळावे, म्हणून निरनिराळ्या भारतीय भाषांत पुस्तके लिहिणाऱ्या क्रीडालेखकांना राष्ट्रीय पारितोषिके प्रतिवर्षी देण्यात येतात.

नेहरू स्टेडियम, दिल्ली.

भारतातील क्रीडासंघटना व त्यांचे कार्य : भारतात खेळांच्या विकासाकरिता क्रीडासंघटना व संस्था मोलाचे कार्य करीत आहेत. या संघटनांना स्वायत्त दर्जा आहे. प्रत्येक खेळाची भारतीय पातळीवर एक संघटना असते. या संघटनेचे राज्य पातळीवर संलग्न घटक असतात. त्याच्याशी प्रत्येक राज्यातील जिल्हा पातळीवर क्रीडासंघटना, तसेच स्थानिक पातळीवरील संस्था वा संघ हे संलग्न असतात. अशी रीतीने या राष्ट्रीय क्रीडासंघटनांनी आपापल्या खेळांचे जाळे राज्य-जिल्हा व स्थानिक पातळीपर्यत पसरविलेले असते. या संघटना आपल्या खेळांचे घटकसंघ स्थापन करणे, खेळाडूंना सराव देणे, निरनिराळ्या पातळ्यांवर सामने भरविणे, आपल्या खेळाडूंची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, यांसारखी महत्त्वाची कामगिरी बजावत असतात.

भारतीय क्रीडासंघटनांमध्ये समन्वय साधणारी ‘इंडियन ऑलिंपिक असोशिएशन’ ही संघटना आहे. या संस्थेचे पहिले अध्यक्ष सर दोराबजी टाटा व डॉ. नोव्हेन आणि सचिव प्रा. जी. डी. सोंधी हे होते. जागतिक ऑलिंपिक समितीच्या संयोजनाखाली जे आंतरराष्ट्रीय सामने होतात, त्यांकरिता राष्ट्रीय क्रीडासंघटनांना सहकार्य देणे, हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. भारतातील क्रीडास्पर्धा सुव्यवस्थित भरविणे, भारतीय संघाची निवड करणे, हौशी खेळाडूंना प्रशस्तिपत्रके देणे इ. महत्त्वाची कामे ही संस्था करते.

सध्या भारतीय पातळीवर कार्य करणाऱ्या क्रीडासंघटना पुढीलप्रमाणे आहेत : ( १ ) ‘द इंडियन हॉकी फेडरेशन’ ( स्थापनवर्ष १९२८ ), ( २) ‘ऑल इंडिया पुटबॉल फेडरेशन’ ( १९३७ ), ( ३ ) ‘द स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९४० ), ( ४ ) ‘द अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ ( १९४४ ), ( ५ ) ‘द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९४८ ), ( ६ ) ‘द व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९५१ ), ( ७ ) ‘द बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९५० ), ( ८ ) ‘द नॅशनल रायफल असोसिएशन’ ( १९५१ ), ( ९ ) ‘द जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९५१ ), ( १० ) ‘द इंडियन अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशन’ ( १९३७ ), (११ ) ‘द नॅशनल सायकलिंग फेडरेशन’ ( १९३७ ), ( १२ ) ‘द बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (१९२८ ), ( १३ ) ‘द लॉन टेनिस असोसिएशन’ ( १९१० ), ( १४ ) ‘द टेबल – टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९३७ ), ( १५ ) ‘द ऑल इंडिया बॅडमिंटन असोसिएशन’ ( १९३४ ), ( १६ ) ‘द हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया’ ( १९६९ ), ( १७ ) ‘द आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया’ ( १९७१ ), ( १८ ) ‘द कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९५१ ), ( १९ ) ‘द यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ ( १९६० ), ( २० ) ‘द खोखो फेडरेशन ऑफ इंडिया’ ( १९५५ ), ( २१ ) ‘द सर्व्हिस स्पोर्ट्‌स कंट्रोल बोर्ड’ ( १९१० ), ( २२ ) ‘द स्कूल गेम्स ऑफ इंडिया’ (१९५४ ), ( २३ ) ‘द इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ स्पोर्ट्‌स ( १९५२ ), ( २४ ) ‘द रेल्वे स्पोर्ट्‌स कंट्रोल बोर्ड’, (२५ ) ‘द ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्‌स कंट्रोल बोर्ड’ ( १९५० ) आणि ( २६ ) ‘स्क्वॅश रॅकेट असोसिएशन ऑफ इंडिया’ ( १९५३ ).


आशियाई क्रीडासामने : स्त्रियांच्या ४०० मी. अंतराच्या अडथळ्यांच्या शर्यतीतील सुवर्णपदक विजेती एम्‌. डी. वळसम्मा.

या संस्था आपापल्या खेळांच्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा भरवितात. याशिवाय प्रत्येक खेळाच्या अखिल भारतीय स्पर्धा त्यांच्या परवानगीने भरविल्या जातात. अखिल भारतीय शालेय परिषद शालेय युवकांकरिता खास स्पर्धा प्रतिवर्षी भरविते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आंतरविद्यापीठे क्रीडासमिती असे सामने आयोजित करते. या शिवाय भारत सरकारतर्फे पतियाळा येथील क्रीडा – प्रशिक्षण संस्था ही अखिल भारतीय ग्रामीण क्रीडास्पर्धा, अखिल भारतीय महिला स्पर्धा इ. आयोजित करते. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांकरिता निवड झालेल्या स्पर्धकांकरिता पूर्व –सराव शिबिराची जबाबदारी या संस्थेवर असते, याकरिता या संस्थेने प्रत्येक राज्यात एक क्रीडा-मार्गदर्शन-केंद्र ( रीजनल कोचिंग सेंटर ) सुरू केले आहे.

गोल्फमधील सुवर्णपदक विजेता लक्ष्मण सिंग

केंद्र शासनातर्फे क्रीडा विकासासाठी ग्रामीण क्रीडाकेंद्रे अनुदान पद्धतीने स्थापन व्हावीत, म्हणून खास प्रयत्नी केले जातात. क्रीडाप्रकारांचा विकास व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा प्रचार व्हावा, म्हणून ‘नेहरू युवक केंद्रे’ ही ठिकठिकाणी स्थापन करण्यात आली आहेत. देशी व विदेशी खेळांच्या अनेक संघटना शासकीय मदतीने क्रीडाविकास व खेळाडूंची दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने भरीव कार्य करीत आहेत.

क्रीडाविषयक संशोधन : शारीरिक शिक्षणाचे वैज्ञानिक स्वरूप ध्यानात घेऊन या क्षेत्रात संशोधनकार्याची सुरूवात राष्ट्रीय शारीरिक शिक्षण व क्रीडा महाविद्यालये. तसेच काही खाजगी महाविद्यालये यांनी केली आहे. पारंपरिक योगविद्येचे पुनरूज्जीवन व संशोधनही भारतातील काही संस्थांनी यशस्वी रीतीने चालवले आहे. या संस्थांचे कार्य केवळ भारतभरच नव्हे, तर परदेशांमध्येही जाऊन पोहोचले आहे.

आशियाई क्रीडासामने : पं. जवाहरलाल नेहरू, देवदत्त सोंधी व पतियाळाचे महाराज यादवेंद्र सिंग यांच्या प्रयत्नाने १९५१ मध्ये दिल्ली येथे पहिल्या ⇨ आशियाई क्रीडा सामन्यांना प्रारंभ झाला आणि त्यानंतर ३१ वर्षानी १९८२ मध्ये नवम अशियाई क्रीडास्पर्धा अतिभव्य स्वरूपात पुन्हा दिल्ली येथेच भरविण्यात आल्या.

कुस्तीमधील सुवर्णपदक विजेता सत्पाल सिंग

या स्पर्धेची क्रीडाज्योत १९ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते ‘नॅशनल स्टेडियम’ दिल्ली येथे प्रज्वलित करण्यात आली. त्याच दिवशी दुपारी राष्ट्रपती झैलसिंग यांच्या हस्ते स्पर्धाचे रीतसर उद्‌घाटन झाले. या स्पर्धांसाठी अतिभव्य अशी क्रीडागारे बांधण्यात आली : ‘जवाहरलाल नेहरू स्टेडियम’ ( उभारणीचा खर्च अंदाजे १६·२१ कोटी रूपये ), बंदिस्त ‘इंद्रप्रस्थ स्टेडियम’ (१५·३५ कोटी रूपये), ‘हॉल ऑफ स्टेट्‌स’ (११·७५ कोटी रूपये). सुमारे दहा-बारा हजारांपासून ते पंचाहत्तर हजारांपर्यत प्रेक्षक बसू शकतील इतक्या क्षमतेची, अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त व शास्त्रीय साधनसामग्रीने सुसज्ज अशी ही क्रीडागारे खेळांसाठी कायमची उपलब्ध झाली आहेत. खेळाडूंच्या व व्यवस्थापकांच्या निवासासाठी खास आशियाई क्रीडानगरी अत्यंत भव्य स्वरूपात उभारण्यात आली. येथील निवास, भोजन, मनोरंजन इ. व्यवस्था अप्रतिम होती. क्रीडास्पर्धांचे वृत्तसंकलन व वितरणव्यवस्था यांसाठी सु. २० कोटी रूपये खर्च करून सर्व देशभर व जगभर दूरदर्शन, आकाशवाणी, दूरध्वनी, ‘टेलेक्स’ आदी साधनांद्वारा वृत्तप्रसारण तसेच वृत्तपत्र-प्रतिनिधींची सोय इ. यंत्रणा अत्यंत कार्यक्षम ठेवण्यात आली होती.

गोळाफेक सुवर्णपदक विजेता बहादूर सिंग.

पहिल्या आशियाई क्रीडास्पर्धाना फक्त ११ देशांतील ४८९ स्पर्धक खेळाडू आले होते. त्यांत फक्त ९ क्रीडाप्रकार अंतर्भूत होते. तर या नवम आशियाई क्रीडास्पर्धामध्ये एकूण २१ क्रीडाप्रकारांचा समावेश असून, त्यांत ३१ देशांतील सु. ५,००० खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धाची एकूण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध, आखीवरेखीव, चोख, अद्ययावत आणि वेधक होती. हॉकीसारख्या स्पर्धांसाठी भारतात प्रथमच ‘ॲस्ट्रो टर्फ’चा व व्यायामी खेळांच्या धाव-मार्गासाठी कृत्रिम पॉलियूरीथीनच्या एका प्रकाराचा वापर करण्यात आला होता. ह्या आशियाई स्पर्धेत चीन व जपान ह्यांच्यात प्रचंड चुरस होऊन चीनने एकूण १५३ पदके मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर जपानचा दुसरा क्रमांक आला. भारताचा पाचवा क्रमांक लागला. विशेष म्हणजे सांघिक खेळांत भारताच्या महिला हॉकी संघास सुवर्णपदक मिळाले. अश्वारोहण व गोल्फ या स्पर्धामध्येही भारताचे वर्चस्व दिसून आले. गोल्फमध्ये लक्ष्मण सिंग याने सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या ८०० मी. धावण्याच्या शर्यतीत चार्ल्स बोरोमिओ या भारतीय खेळाडूला १ मी. ४६·८ सेकंदांत अंतर तोडल्याने सुवर्णपदक मिळाले. तसेच चांदराम ( २० किमी. चालणे ), बहादूर सिंग (गोळाफेक), एम्‌. डी. वळसम्मा (११० मी. अडथळा-शर्यत), कौरसिंग (हेवीवेट गटातील मुष्टियुद्ध), सत्‌पाल सिंग (कुस्ती) इ. स्पर्धकांनी वैयक्तिक सुवर्णपदके मिविली. या स्पर्धामध्ये भारताची अत्युत्कृष्ट संयोजनक्षमता दिसून आली. आशियाई क्रीडास्पर्धा प्रामुख्याने दिल्ली येथे झाल्या मात्र वल्हविण्याच्या नौकास्पर्धा जयपूर येथील रामगड सरोवरात, तर शीडजहाजशर्यती मुंबईजवळील समुद्रात घेण्यात आल्या. भारताचे क्रीडामंत्री बुटासिंग हे नवव्या आशियाई क्रीडासामान्यांचे अध्यक्ष होते. भारतीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष राजा भालिंदरसिंग ह्यांनीही ह्या स्पर्धा यशस्वी होण्यास मोठाच हातभार लावला. ह्या स्पर्धा भारताने अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित करून केवळ आशिया खंडातच नव्हे, तर सर्व जगभर उत्तम नावलौकिक संपादन केला आहे. ४ डिसेंबर १९८२ रोजी या स्पर्धांचा समारोप झाला.

दिल्ली येथे २५ मार्च १९८२ रोजी भरलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ८६ व्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ऑलिंपिक सुवर्णपदक (ऑलिपिंक ऑर्डर गोल्ड मेडल ) बहाल करण्यात आले. हे जागतिक क्रीडाक्षेत्रात त्यांनी केलेल्या बहुमोल कामगिरीचा गौरव करण्यासाठी म्हणून दिले गेले. हे सुवर्णपदक मिळवणाऱ्या त्या आशियातील पहिल्याच महिला आहेत.

प्रुडेन्शियल विश्वचषकासह कप्तान कपिल देव

इंग्लंडमध्ये १९७५ पासून दर चार वर्षांनी प्रुडेन्शियल विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. १९८३ मधील तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दि. २५ जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात, कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेटसंघाने वेस्ट इंडीजचा ४३ धावांनी पराभव करून हा विश्वचषक जिंकला. (अंतिम धावफलक असा : भारत ५४·४ षटकांमध्य़े सर्व बाद १८३ धावा व वेस्टइंडीज ५२ षटकांमध्ये सर्व बाद १४० धावा). आंतरराष्ट्रीय क्रिकेटक्षेत्रामध्ये अजिंक्यपदाचा हा मान अत्युच्च समजला जातो. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातही ही गौरवशाली घटना अभूतपूर्वच मानली पाहिजे.

मनोरंजन : भारतात वेगवेगळ्या रंजनप्रकारांचे पुरातन काळापासून निर्देश आढळतात. रामलीला, रथोत्सव, नाटके, नृत्ये, संगीताचे जलसे, कीर्तन इ. प्रकारांत भारतीय संस्कृतीतील रंजनाची परंपरा दिसून येते. स्वातंत्र्याप्राप्तीनंतर कामगारवर्गांकरिता औद्योगिक संघटनांतर्फे ग्रामीण विभागांत उद्योगधंद्याबरोबरच क्रीडागृहे व रंजनकेंद्रेही मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली. १९६१ मध्ये चंडीगढला अखिल भारतीय क्रीडा रंजन-परिषद भरविण्यात आली. शरीरास व मनास तरतरीत ठेवण्याकरिता रंजनाची जरूरी आहे, ह्या जाणिवेतून भारतात ठिकठिकाणी रंजनकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच अनेक लहानमोठ्या शहरांतून क्लब, मंडळे, महिलामंडळे ह्यांची प्रचंड प्रमाणावर भर पडत आहे. वनविकास व वनसंचार, गिर्यारोहण, सांघिक नृत्ये, पोहणे, नौकाविहार तसेच ⇨ सहली, ⇨ शिबिरे, ⇨ पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह यांसारखे छंद, ⇨ पत्ते व पत्त्यांचे खेळ, ⇨ कॅरम इ. रंजनप्रकारांच्या जोपासनेसाठी आणि प्रसारासाठी अनेक संस्था व संघटना मोठ्या प्रमाणावर कार्य करीत आहेत.


शारीरिक शिक्षण व क्रीडा यांच्या विकासाचे राष्ट्रीय धोरण : अखिल भारतीय क्रीडा परिषदेने १९८० मध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा यांच्या विकासाचे राष्ट्रीय धोरण काय असावे, याबद्दल एक मसुदा तयार केला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या सूचना अशा : (अ) जागतिक ऑलिंपिक समितीच्या नियमाप्रमाणे भारतीय ऑलिंपिक समिती व राष्ट्रीय क्रीडा संघटना यांचे स्पर्धा आयोजन करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील. (आ) नागरिकांचे खेळ व मनोरंजन यांत भाग घेण्याचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी पुढील गोष्टी कराव्यात : (१) शाळा, महाविद्यालये यांतून शारीरिक शिक्षण सक्तीचे असावे. (२) जिल्हा व पंचायत समित्यांनी राज्य व भारत सरकारच्या मदतीने ग्रामीण क्रीडाकेंद्रे सुरू करावीत. (३) शहरी विभागांत राष्ट्रीय क्रीडा संघटना व त्यांचे राज्य पातळीवरील घटक यांच्या मदतीने क्रीडा मंडळे सुरू करावीत. (४) शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येथे निरनिराळ्या खेळांची पुरेशी मैदाने तसेच मैदानी शर्यती व अन्य क्रीडास्पर्धा यांसाठी सुसज्ज धावमार्ग इ. सोयी असाव्यात. (५) आदिवासी कल्याण खात्याने आधिवासींच्या क्रीडाविकासाकडे विशेष लक्ष द्यावे. (६) केंद्रीय व राज्य सरकारे यांनी स्वतंत्र क्रीडा मंत्रालये सुरू करावीत.

शारीरिक शिक्षणाच्या आणि क्रीडाविकासाच्या कार्याची महती ध्यानात घेऊन केंद्र सरकारने १९८२ मध्ये स्वतंत्र क्रीडा मंत्रालय सुरू केले. या मंत्रालयाचे पहिले मंत्री बुटासिंग हे आहेत.

शारीरिक शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांत सहभागी होण्याची समान संधी सर्वांना मिळावी व एकूणच राष्ट्राची शारीरिक क्षमता वाढून क्रीडापटूंचे कौशल्य व गुणवत्ता वाढावी. ह्या दृष्टीने ह्या क्षेत्राची प्रगती झपाट्याने होत आहे. तसेच याकरिता लागणारी आर्थिक तरतूदही मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश यांसारख्या काही राज्य शासनांनीही राज्य पातळीवर क्रीडामंत्र्यांची नियुक्ती केली आहे, तसेच स्वतंत्र क्रीडासंचालकांच्या नेमणुका केल्या आहेत. (मराठी विश्वकोशात यथास्थळी आट्यापाट्या कबड्डी कुस्ती खोखो प्राणायाम बुद्धिबळ योगासने शारीरिक शिक्षण इत्यादींवर स्वतंत्र नोंदी आहेत. त्यांखेरीज क्रिकेट टेनिस टेबलटेनिस फुटबॉल बॅडमिंटन हॉकी यांसारख्या प्रमुख विदेशी खेळांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. त्या त्या नोंदीमध्ये त्या त्या खेळाची भारतातील जडणघडण व स्थूलमानाने ऐतिहासिक आढावा, प्रसिद्ध खेळाडूंचे नामनिर्देश इ. माहिती थोडक्यात दिली आहे.)

वाखारकर, दि. गो.

संदर्भ :

1. Falkener, Edward, Games Ancient and Oriental and How to Play Them, New York, 1961.

2. Gyan Singh, Lure of Everest : Story of the First Indian Expedition, Delhi, 1961.

3. Kohli, M. S. Nine Atop Everest : Story of the Indian Ascent, New Delhi, 1969.

4. Publications Division, Government of India, Sports in India, Delhi, 1959.

5. Sandcsara, B. J. Ed. Mallapurana, Baroda, 1964.

6. Sanyal, Saradindu, Olympic Games and India, Delhi, 1970.

7. Sorcar, P. C. Hindu Magic, Calcutta, 1950.

8. Thyagarajan, S. Ed. Indian Cricket 1982, Madras, 1982.

९. करंदीकर ( मुजुमदार ), द. चिं. संपा. व्यायामज्ञानकोश, खंड १, २, ३, ४ व १०, बडोदे, १९३६ ते १९४९.

१०. कुलकर्णी, गणेश रंगो, पंडित त्रिवेंगडाचार्यकृत विलासमणिमञ्जरी अथवा बुद्धिबलक्रीडारत्ने आणि बालकबुद्धिबलक्रीडनम्‌, कोल्हापूर, १९३७.

११. जोशी, डी. पी. बालवीर चळवळ, पुणे, १९४६.

१२. दाभोळकर, नरेंद्र, कबड्डी, मुंबई, १९८०.

१३. पाटणकर, प्रभाकर, हिमालयाशी झुंज, पुणे, १९४८.

१४. माणिकराव, ग. य. भारतीय व्यायाम, पुणे, १९५९.

१५. वडनप, ना. रा. बुद्धिबळे, मुंबई, १९७५.

१६. सरदेसाई, र. गो. हिंदी क्रिकेट, पुणे, १९४८.

१७. सूर्यवंशी, कृ. गो. भारतीय मल्लविद्या : उदय आणि विकास, पुणे, १९६५.