चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीचा उदय आणि विकास ही करमणूकक्षेत्रातील एक विस्मयजनक घटना म्हणावी लागेल. केवळ चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या कलाकृतीमध्येच भारतीय चित्रपटाचे वर्चस्व आहे असे नव्हे तर वृंत्तपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी यांसारखी लोकसंपर्क माध्यमेदेखील फार मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपटावर अवलंबून आहेत.
भारतात चलत्चित्रपटांची सुरूवात ७ जुलै १८९६ रोजी झाली. तेव्हापासून जनमानसावरील चित्रपटाची मोहिनी व त्याची लोकप्रियता सतत वाढतच आहे. १९१३ मध्ये ⇨ दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला. त्या काळात भारतीय चित्रपटव्यवसायात परदेशी चित्रपटांचे विलक्षण प्राबल्य होते. तरीही प्रेक्षकांनी भारतीय चित्रपटाबद्दलची आपली पसंती तेव्हापासून सतत निःसंदिग्धपणे व्यक्त केली आहे. ⇨ जे. एफ्. मादन, दादासाहेब फाळके, ⇨ बाबूराव पेंटर, ⇨ हिमांशू रॉय इत्यादीनी सुरुवातीच्या काळात देशी चित्रपटव्यवसायाला स्थैर्य आणण्याच्या दृष्टीने खूपच प्रयत्न केले तथापि ज्ञान आणि यंत्रसामग्रीचा अभाव, भांडवलाची कमतरता, प्रादेशिक परंपरा व रूढी यांमधील भिन्नतेमुळे अधिकच मर्यादित झालेली बाजारपेठ, तत्कालीन परकीय सरकारची उदासीनता इ. कारणांमुळे मूकचित्रपटांच्या जमान्यात भारतीय चित्रपटांनी पुरेसे मूळ धरले नाही. त्यावेळी देशात चित्रपटगृहेही कमी होती. ४० कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ सु. ४०० चित्रपटगृहे अस्तित्वात होती. त्यामुळे चित्रपटप्रदर्शनातील भारतीय चित्रपटाचा वाटा फक्त १३ टक्के होता. सरकारने १९२७ साली नेमलेल्या ‘इंडियन सिनेमॅटोग्राफ समिती’ने देशी चित्रपटउद्योगाचा विकास आणि विस्तार यांसाठी अनेक उपयुक्त शिफारसी केल्या होत्या परंतु तत्कालीन परकीय सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतात १,२०० च्या वर मूकपट, अनेक माहितीपट आणि अनुबोधपट निर्माण झाले.

या परिस्थितीवर मात केली ती चित्रपटातील ‘आवाजा’च्या जादूमुळे. १४ मार्च १९३१ रोजी इंपीरिअल फिल्म कंपनीचा आलमआरा हा पहिला भारतीय बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमाच्या पडद्यावर आला. त्या बोलपटाच्या घवघवीत व्यावसायिक यशामुळे भारतीय चित्रपटव्यवसायात फार मोठी क्रांती घडवून आणली. देशी चित्रपटव्यवसायाचे पुनरुज्जीवन तर झालेच, पण यांत्रिक आणि तांत्रिक सुविधा यथावकाश उपलब्ध झाल्यामुळे काही वर्षातच भारतीय चित्रपट जागतिक दर्जाचे ठरू लागले. शिवाय ‘आवाजा’ने घडवून आणलेल्या या क्रांतीचा दुहेरी फायदा झाला, तो म्हणजे परदेशी चित्रपटांचे प्राबल्य झपाट्याने कमी झाले आणि भारतीय चित्रपटांकरिता अधिक चित्रपटगृहे बांधण्यास चालना मिळाली. १९३१ साली बोलपट सुरू झाल्यानंतर पुढील ५० वर्षांतील प्रगतीचे आकडे लक्षणीय आहेत. सध्या चित्रपटप्रदर्शनातील भारतीय चित्रपटांचा वाटा ९० टक्क्यांच्याही वर गेला आहे. देशातील चित्रपटगृहांची संख्यादेखील ११,००० च्या वर (१९८२) गेली असून त्यांत प्रत्यही वाढ होतच आहे. चित्रपटगृहांच्या देशव्यापी विस्ताराबरोबरच चित्रपट बाजारपेठेचीही प्रादेशिक विभागणी करणे आवश्यक होऊन बसले. त्यातूनच ‘चित्रपट-वितरक’ हा नवीन वर्ग-निर्माता आणि प्रदर्शक यांतील दुवा-उदयास आला.
आवाजाने घडवून आणलेल्या क्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा झाला तो असा, की देशी बोलपट सुकू झाल्यावर नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, काव्य इ. क्षेत्रांतील जाणकार चित्रपटसृष्टीकडे अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होऊ लागले. उदय शंकर, रवींद्रनाथ टागोर, पापनाश्म शिवम्, आचार्य अत्रे, मुनशी प्रेमचंद अशा त्या त्या क्षेत्रातील कितीतरी मान्यवर व्यक्तींचे सहकार्य आणि सहवास चित्रपटव्यवसायाला सतत वाढत्या प्रमाणात मिळू लागला त्यामुळे सुरुवातीला उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या चित्रपटव्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे.

देशातील भाषिक वैविध्य हे बोलपट-निर्मितीला वरदानच ठरले. आलमआराच्या पाठोपाठ निरनिराळ्या भाषांत बोलपट निर्माण होऊ लागले. हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय एकात्मता आणण्यास मदत केली, तर अन्य भाषिक चित्रपटांनी देशाच्या विविध भागांतील संस्कृती आणि परंपरा यांचा परिचय करून दिला. अनेक भाषांतील चित्रपट देशात सतत निर्माण होत असल्याने गेली कित्येक वर्षे चित्रपटनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताने आपला उच्चांक कायम ठेवला आहे.
विशेषतः १९३५ ते १९५५ ही दोन दशके म्हणजे भारतीय चित्रपटाचे सुवर्णयुग मानावे लागेल. या काळात अनेक कलाकार, दिग्दर्शक, संगीत-दिग्दर्शक, गीत-रचनाकार इ. प्रकाशझोतात आले आणि चिरंतन सौंदर्याचा आविष्कार असणाऱ्या काही कलाकृती त्यांनी निर्माण केल्या. ⇨ व्ही. शांताराम, देवकी बोस, मेहबूब खान, नितीन बोस, पी. सी. बरूआ, गुरूदत्त यांच्यासारखे समर्थ दिग्दर्शक अशोककुमार, राजकपूर, दिलीपकुमार, देव आनंद, ⇨ कुंदनलाल सैगल, सुरैया, मीनाकुमारी यांसारखे कलाकार अनिल विश्वास, ⇨ मास्तर कृष्णराव, ⇨ केशवराव भोळे, आर्. सी. बोराल, सी. रामचंद्र, ⇨ वसंत देसाई, नौशाद यांसारखे संगीतदिग्दर्शक ⇨ लता मंगेशकर, जी. एम्. दुराणी, आशा भोसले, तलत महमूद, ⇨ महंमद रफी यांसारखे पार्श्वगायक–अशा कितीतरी कलावंतांनी आपल्या उत्तमोत्तम कलाकृतींची प्रेक्षकांवर उधळण करून त्यांना चिरंतन आनंद प्राप्त करून दिला, तो याच सुवर्णयुगात.
स्वातंत्र्यापूर्वी प्रांतिक चित्रपट अभ्यवेक्षण मंडळे ह्याच केवळ शासकीय संस्था चित्रपटव्यवसायाशी संबंधित होत्या. १९१८ च्या इंडियन सिनेमॅटोग्राफ कायद्याप्रमाणे अशी मंडळे मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि लाहोर येथे अस्तित्वात होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यात बदल झाला. १९४९ च्या कायद्याप्रमाणे १९५१ सालापासून सर्व देशाकरिता एकच केंद्रीय चित्रपट अभ्यवेक्षण मंडळ (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर) अस्तित्वात आले. चित्रपट – माध्यमाचे महत्त्व जाणून दुसरी चित्रपटचौकशी समिती नेमण्यात येऊन तिचा अहवाल १९५१ साली सादर करण्यात आला. समितीने केलेल्या शिफारशींनुसार चित्रपट-व्यवसायाशी संबंधित अशा अनेक शासकीय यंत्रणा सुरू झाल्या. त्या म्हणजे केंद्रीय चित्र पुरस्कार (नॅशनल ॲवॉर्ड्स–१९५४ ), ⇨ बालचित्रसमिति, भारतातील (चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी–१९५५), ⇨ फिल्म वित्त महामंडळ (फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन – १९६० ), हिंदूस्थान फोटो फिल्म मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ( १९६० ), फिल्म इन्स्टिट्यूट (१९६१) (पुढे रूपांतरित झालेली ⇨ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ), भारतीय चित्रपट निर्यात महामंडळ ( इंडियन मोशन पिक्चर एक्सपोर्ट कॉर्पोरेशन – १९६३ ), ⇨ राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागार (नॅशनल फिल्म अर्काईव्हज ऑफ इंडिया – १९६४ ) व डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स ( १९७४ ). यातील काही संस्थांच्या कार्याचे एकत्रीकरण १९८० साली करण्यात येऊन ⇨ राष्ट्रीय फिल्म विकास निगम (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ही नवीन संस्था सुरू करण्यात आली.
गीत आणि संगीत हे भारतीय बोलपटातील महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत. बोलपटांच्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ काळात पंधरांहून अधिक भाषांत एक लाखाच्यावर गीते रचली गेली. त्यांपैकी काही गीते इतकी लोकप्रिय झाली आहेत, की त्यांच्या ध्वनिमुद्रिकांचा खप पाच लाखांच्यावर गेला. या वैशिष्ट्यपूर्ण गीत- संगीतामुळेच भारतीय बोलपट अनेक देशांत लोकप्रिय झाले आहेत. बोलपटांचा जमाना सुरू झाल्यापासून – आणि विशेषत: आन या १९५१ साली निघालेल्या बोलपटापासून-भारतीय चित्रपटांनी परदेशी बाजारपेठ काबीज करण्यास सुरूवात केली होती. सध्या जगातील शंभरांपेक्षा जास्त देशांमध्ये भारतीय बोलपट दाखविले जातात.
चित्रपटव्यवसाय हा राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. साहजिकच काही राज्य शासनांनी त्यात विशेष आस्था दाखविण्यास सुरूवात केली. विशेषतः १९७० नंतर प्रादेशिक भाषेतील चित्रपटनिर्मिती व प्रदर्शन यांस प्रोत्साहन देण्यासाठी आंध्र, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू इ. राज्यांत अनेक योजना सुरू करण्यात आल्या. आता इतर राज्यांतही तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. करमणूक कर माफ करणे किंवा तो निर्मात्यास परत देणे, चित्रपटगृहासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, छोट्या किंवा फिरत्या चित्रपटगृहासाठी करमणूक कराची ठराविक रक्कम घेणे अशा निरनिराळ्या योजना विविध राज्यांत चालू आहेत.

सीता ( हिंदी – १९३४ ), संत तुकाराम ( मराठी – १९३६ ), नीचा नगर ( हिंदी – १९४६ ) या चित्रपटांनी जागतिक चित्रपटमहोत्सवांत प्रशंसा मिळविली होती तथापि भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कायमचे बहुमानाचे स्थान प्रथम प्राप्त करून दिले, ते ख्यातनाम दिग्दर्शक ⇨ सत्यजित रे यांच्या पथेर पांचालीने (१९५५). रे यांच्या नवचित्र-तंत्राचा पुरस्कार नंतरच्या काळात श्याम बेनेगल, बासू चटर्जी, ⇨ गिरीश कार्नाड, केनन मेहता, ⇨ मृणाल सेन व गोविंद निहलानी इ. नव्या दमाच्या अनेक दिग्दर्शकांनी केला असून त्यांचेही चित्रपट आता जागतिक चित्रपटमहोत्सवात अंतर्भूत व्हायला लागले आहेत. १९८० च्या आसपास निघालेल्या अनेक भारतीय चित्रपटांनी आणि लघुपटांनी जागतिक चित्रपटमहोत्सवांत पुरस्कार आणि प्रशंसा प्राप्त करून घेतली आहे. शंकरामरमण् ( तेलुगू–१९७९ ) आणि नीम अन्नपूर्णा ( बंगाली – १९७९ ) ह्यांना अनुक्रमे बझांसाँ आणि कारलॉवी व्हारी चित्रपटमहोत्सवात पुरस्कार मिळाला, तर १९८० साली निघालेल्या चित्रपटांपैकी अनेक भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर यशस्वी झाले. उदा., अकलेर संधाने (बंगाली)-बर्लिन चित्रपट- महोत्सवात नक्षलाइट ( हिंदी )- आव्हेल्लीनो चित्रपटमहोत्सवात चक्र ( हिंदी ) – लोकार्नो चित्रपट- महोत्सवात आक्रोश ( हिंदी ) – भारत चित्रपटमहोत्सवात भावनी भवाई ( गुजराती ) – नँट्स चित्रपटमहोत्सवात व सय्यद बारीस शहा ( हिंदी ) – ताश्कंद चित्रपटमहोत्सावात. १९८१ सालात तयार झालेल्या भारतीय चित्रपटांनीही अशीच जागतिक मान्यता मिळविली. उदा., आक्रीत ( मराठी ) – नँट्स चित्रपटमहोत्सवात ३६ चौरंगी लेन ( इंग्रजी ) – मानिला चित्रपटमहोत्सवात आधारशिला ( हिंदी ) – मॅनहाइम चित्रपटमहोत्सवात इलीप्पाथयम ( मलयाळम् ) – लंडन चित्रपटमहोत्सवात ओरीडाथोरू फयलमन (मलयाळम्) आशियाई चित्रपटमहोत्सवात आणि आरोहण ( हिंदी ) – कारलॅबी व्हारी चित्रपटमहोत्सवांत. त्याचप्रमाणे या काळात तयार झालेल्या स्टोरी ऑफ होप या तीस सेकंदाच्या भारतीय जाहिरातपटाने प्रथमच ‘क्लिओ ॲवार्ड’ पटकविले. त्याखेरीज बाबा आमटे, दे कॉल मी चमार, क्विक् सँड्स्, ईश्वरचंद्र विद्यासागर, ताजमहाल, द स्टोरी ऑफ व्हीट, मिस्ट इज क्लियरिंग या लघुपटांचाही निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत प्रशंसा झाली आहे.
भारतीय चित्रपट-व्यवसायाची गेल्या ५० वर्षांत प्रचंड वाढ झाली. या व्यवसायातील भांडवली गुंतवणूकच दोन हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यामुळे कायमचा रोजगार प्राप्त झाला. भारतात प्रतिवर्षी सु. १५ भाषांत ७०० च्या वर चित्रपट निर्माण करण्यात येतात, त्यातील ८५% रंगीत असतात. त्याखेरीज दरवर्षी सु. १,००० लघुपटही देशात तयार होतात.ही चित्रपट निर्मिती मुंबई, कोल्हापूर, मद्रास, कलकत्ता, बंगलोर, हैदराबाद, त्रिवेंद्रम, बडोदा अशा अनेक ठिकाणी चालू असते. [→ चित्रपटनिर्मितिगृह]. चित्रपट आणि लघुपट-निर्मितीमध्ये प्रतिवर्षी सु. ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येते तथापि आपल्या खंडप्राय देशातील चित्रपटगृहांची संख्या केवळ ११,००० (१९८२) असल्याने अपेक्षित बाजारपेठेच्या अभावी ७० टक्क्यांपेक्षा अधिक चित्रपट तोट्यात जातात. [→ चित्रपट -उद्योग चित्रपटनिर्मिति].
चित्रपटप्रदर्शन आणि निर्मिती यांत तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक व केरळ ही दाक्षिणात्य राज्ये आघाडीवर आहेत. देशातील सु. ४२ टक्के कायम स्वरूपाची चित्रपटगृहे आणि ६६ टक्के फिरती चित्रपटगृहे या चार राज्यांत सामावलेली आहेत. तसेच प्रतिवर्षी ६० टक्क्यांपेक्षा जास्त चित्रपट वरील चार दाक्षिणात्य राज्यांत तयार होतात.
भारतीय चित्रपटनिर्मितीने १९८२ साली १९ भाषांत ७६३ चित्रपट निर्माण करून आणखी एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. अर्थात त्यांमध्ये दाक्षिणात्य राज्यांतील चित्रपटांचा वाटा पूर्वीप्रमाणेच ६० टक्के आहे. चित्रपटांची भाषावर विभागणी पाहिल्यास हिंदीच्या खालोखाल दाक्षिणात्य चित्रपटांचा क्रमांक लागतो. ७६३ चित्रपटांपैकी हिंदी – उर्दू – १५५, तेलुगू – १५४ , तमिळ – १४१, मलयाळम् – ११७ , कन्नड – ५१, बंगाली – ४९ , गुजराती – ३९, मराठी – २४, ओडिया – ९, पंजाबी – ६, असमिया – ५ , भोजपूरी – ३, राजस्थानी – ३, नेपाळी – २ आणि ब्रजभाषा, इंग्रजी, कोकणी, मैथिली व माळवी भाषेत प्रत्येकी एकएक चित्रपट निर्माण झाला, असे आढळून येते. या ७६३ चित्रपटांखेरीज याच वर्षात सु. १,००० लघुपट तयार झाले. त्यांत अनुबोधपट, बालचित्रपट, जाहिरातपट, निरनिराळ्या राज्य सरकारांचे माहितीपट यांचा समावेश आहे.
चित्रपटाद्वारे करमणुकीबरोबरच समाजप्रबोधनही होत असल्यामुळे सामाजिक दृष्ट्या निकोप व अभिरुचिसंपन्न चित्रपटांना शासनाने प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी १९५४ सालापासून केंद्र शासनातर्फे दरवर्षी उत्कृष्ट ठरलेल्या चित्रपटांना व कलावंत आणि तंत्रज्ञांना पाच लाखांची पारितोषिके प्रदान करण्यात येतात.
मुलांनाही संस्कारक्षम चित्रपटांचा लाभ व्हावा म्हणून शासनाने १९५५ मध्ये बालचित्रसमिती या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे बालचित्रपटांची निर्मिती सुरू केली. त्यांपैकी अनेक बालचित्रपटांनी जागतिक स्तरावरील पारितोषिकेही पटकाविली आहेत.[→ बालचित्रपट].
जागतिक स्तरावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत भारतीय चित्रपटांना भाग घेता यावा, तसेच भारतातही जागतिक पातळीवरील चित्रपटमहोत्सवांचे आयोजन करता यावे, या दृष्टीने केंद्र सरकारने १९७३ मध्ये ‘डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल’ हे मंडळ स्थापन केले.
भारत सरकारच्या माहिती व नभोवणी मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इन्फरमेशन अँड ब्रॉडकॉस्टिंग ) १९४८ मध्ये ⇨ फिल्म प्रभाग ( फिल्म डिव्हिजन) हा स्वतंत्र लघुपटविभाग सुरू केला. त्याद्वारे १४ प्रमुख भारतीय व एक इंग्रजी अशा एकूण १५ भाषांत माहितीपट, वार्तापट व अनुबोधपट तयार होतात. तसेच याच विभागाद्वारे व्यंगपटही तयार केले जातात. आजवर या विभागाचे असे एकूण ४,००० लघुपट निर्माण केले असून त्यांपैकी अनेक अनुबोधपटांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाची पारितोषिके मिळाली आहेत. यांखेरीज बहुतेक राज्यांतही एक स्वतंत्र असा लघुपटनिर्मिती विभाग आहे. महाराष्ट्र राज्याच्या लघुपटनिर्मिती विभागातर्फे राज्यातील विकास कार्याची दिशा व प्रगती दर्शविणारे अनेक अनुबोधपट निर्माण झाले आहेत. हे चित्रपटगृहे तसेच दूरदर्शनवरूनही प्रदर्शित करण्यात येतात. [→ चलचित्रपट तंत्र चित्रपट].
धारप, भा. वि.
चित्रपट :
1. Barnouw, E. Krishnaswamy, S. Indian Film, New York, 1963.
2. Dharap, B. V. Indian Films : 1972 1974 1977-1978, Poona, 1973-79.
3. Gaur, Madan, Other Side of the Coin : An Intimate Study of Indian Film Industry, Bombay, 1973.
4. Rangoonwalla, Firoze, A Pictorial History of Indian Cinema, London, 1979.
5. Ray, Satyajit, Our Film Their Films, Bombay, 1976.