संग्रहालये व कलावीधि

चित्रशिल्पादी कला, हस्तव्यवसाय, पुरावस्तू इ. दृष्टीने भारतीय परंपरा अतिशय समृद्ध आहे. या परंपरेच्या निदर्शक अशा वस्तू व वास्तू आजही अवशेषांच्या रूपाने दिसून येतात. या कलावस्तूंचे दर्शन घडविणारे प्रमुख साधन म्हणजे वस्तुसंग्रहालये होत. भारतामध्ये अशा प्रकारच्या स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर लहानमोठ्या वस्तुसंग्रहालयांची संख्या तीनशेपर्यत जाते. त्याशिवाय व्यक्तिगत स्वरूपाचे संग्रह हे वेगळेच. ही संग्रहालये देशात सर्वत्र विखुरलेली आढळतात.

संग्रहालये : भारतामध्ये पुरातन काळापासून अशी संग्रहालये अथवा चित्रशाळा अस्तित्वात असल्याची साक्ष गावोगावची देवालये आजही देतात. तत्कालीन कलाकसुरीचे, शिल्पाकृतींचे, वस्त्रकलेचे, रंगचित्रांचे अथवा हस्तलिखित पोथ्यांचे दर्शन याच पुरातन देवालयांतून घडू शकते. मंदिर हे धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक केंद्र म्हणूनच समजण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्यादृष्टीने तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील राजराजा संग्रहालय, सरस्वतीमहाल राजवाड्यातील कलाप्रदर्शन, श्रीरंगम्‌ मंदिरातील संग्रहालय, मदुराईच्या मीनाक्षीसुंदरेच्या मंदिरातील संग्रहालय आणि तिरुपतीचे व्यंकटेश्वर संग्रहालय ही सर्व उल्लेखनीय आहेत. यांतील काहींत मूर्ती, धातुशिल्पे, हस्तिदंती शिल्पे तर काहींत जुन्या कागदपत्रांचा मोठा संग्रह आढळतो.

मध्ययुगीन काळात विजयी राजे जितांकडून मिळविलेली विजयचिन्हे किंवा हिरेमाणकांची तसेच इतर कलावस्तूंची लूट इत्यादींचे संग्रह-प्रदर्शन करीत तर शौकीन सरदार, रसिक श्रीमंत किंवा व्यासंगी विद्वान लोकही जडजवाहीर व मूल्यवान रत्ने, कलात्मक वस्तू वा दुर्मिळ चिजा यांचा संग्रह करून ठेवीत. दुर्मिळ धार्मिक पोथ्यांच्या संग्रहाच्या दृष्टीने झांशीची पुस्तकशाला प्रसिद्ध होती.

भारतातील आधुनिक संग्रहालय चळवळीचे श्रेय कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीलाच द्यावे लागेल. या सोसायटीच्या सदस्यांना देणगीरूपाने वेळोवेळी मिळालेल्या वस्तूंचा एक संग्रह सुव्यवस्थितरीत्या मांडून ठेवण्याची कल्पना पुढे आली आणि त्यासाठी डॉ. नाथॅनियल वॉलिच नामक डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञाने तिचा पाठपुरावा करून १८१४ साली एक संग्रहालय स्थापन केले. तेच सध्याचे भारतीय संग्रहालय होय. यामध्ये मानवशास्त्र, पुरावस्तुशास्त्र, कला, भूगर्भशास्त्र, औद्योगिक व प्राणिशास्त्र असे एकूण सहा विभाग असून प्रत्येक विभाग अतिशय समृद्ध आहे. याच्यानंतर पुढे शासकीय संग्रहालय, मद्रास (१८५१), व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय, मुंबई (१८५५), शासकीय संग्रहालय, त्रिवेंद्रम (१८५७), मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर (१८६३), शासकीय संग्रहालय, लखनौ (१८६३), म्हैसूर शासकीय संग्रहालय, बंगलोर (१८६६), पुराणवस्तु संग्रहालय, मथुरा (१८७४), शासकीय केंद्रीय संग्रहालय, जयपूर (१८७६) आणि जम्मू-काश्मीरचे महाराज प्रतापसिंग यांच्या आश्रयाखाली स्थापन झालेले एस्‌. पी. एस्‌. संग्रहालय, श्रीनगर (१८९८) या संग्रहालयांचा क्रम लागतो. १९ व्या शतकात इतरत्रही काही संग्रहालये स्थापन करण्यात आली होती. ही सर्वच संग्रहालये पुरातत्त्वीय व सांस्कृतिक वस्तूंचा संग्रह करणारी असली, तरी त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. उदा., जयपूरचे संग्रहालय हे रामनिवास बागेतील राजप्रासादाच्या प्रसन्न व संपन्न वातावरणात मांडल्यामुळे ते विशेष आकर्षक वाटते. तेथील जुनी व पुरातन हस्तलिखिते, कलात्मक लघुशिल्पे, वस्त्रप्रारवणे, अलंकारभूषणे, राजमुकुट, परंपरागत शस्त्रास्त्रे व हस्तकलांचे मनोवेधक नमुने यांतून १६ व्या शतकातील शाही वैभवाची कल्पना येते. नागपूरच्या संग्रहालयातील हिंदूंच्या सोळा संस्कारांचे दिग्दर्शन करणारी मृत्तिकाचित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

इ. स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीच्या अर्धशतसांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने ब्रिटिश साम्राज्यात ठिकठिकाणी संग्रहालये स्थापन करण्याची एक नवी लाटच निर्माण झाली व परिणामी अनेक संग्रहालये उदयास आली. मद्रासचे व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट वा जयपूर, उदयपूर, राजकोट, विजयवाडा येथील अशीच संग्रहालये आणि कलकत्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल ही सर्व त्याच काळात निर्माण झालेली आहेत.

नैसर्गिक वा ऐतिहासिक वस्तूंचा सर्वसाधारण संग्रह म्हणून संग्रहालयाची सुरूवात झाली असली, तरी त्याचे स्वरूप उत्तरोत्तर विकसित होत गेले आणि त्यांना विविध रूपे प्राप्त झाली. मोहें-जो-दडो, हडप्पा, तक्षशिला, सारनाथ, नालंदा, नागार्जुनकोंडा, कोंडापूर, हंपी, अमरावती, आमलपूर, खजुराहो, बोधगया आणि श्रीरंगपट्टम येथील संरक्षित उत्खननक्षेत्रे हा त्यांपैकी एक प्रकार होय. यांमधून उत्खननात सापडलेले पुरावशेष जतन केलेले आहेत. टिपू सुलतानाच्या व्यक्तिगत वस्तूंचे दर्शन घडविणे हे श्रीरंगपट्टम संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. अशा संग्रहालयांना पुराणवस्तुसंशोधन केंद्राची व त्यांनी दिलेल्या वस्तूंची बरीच मदत झाली. भारतीय संग्रहालयातील रत्ने व नाणी यांचा मौलिक व उत्कृष्ट पीअर्सचा संग्रह याची साक्ष देतो. अशा प्रकारच्या वस्तू पाटणा, मुंबई, मद्रास, लखनौ येथील संग्रहालयांतही आढळतात.

स्थापत्य संग्रहालये ही दुसऱ्या प्रकारची संग्रहालये असून गिंडी (मद्रास), गुरुकुल कांगडी व दिल्ली येथील संग्रहालये याच प्रकारात मोडतात. स्थापत्य विषयाच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी उपयुक्त ठरणारे शेकडो नमुने गिंडी संग्रहालयात आहेत तर नदीवरील धरणयोजना विशद करणाऱ्या अनेक नमुन्यांचा संग्रह दिल्लीच्या संग्रहालयाने केला आहे. धरणयोजना व विद्युत्‌पुरवठा या क्षेत्रात राष्ट्राने केलेल्या प्रगतीचे यथार्थ दर्शन याच संग्रहालयाकडून घडविले जाते.

वैद्यक संग्रहालये हा तिसरा प्रकार मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजने १८४५ मध्ये सुरू केला असून तेथील सर्वात जुने पुस्तक १८५० मधील आहे. रोगनिदान संग्रहालयाचा यात अंतर्भाव होतो. अशीच संग्रहालये कलकत्ता व मद्रास येथील वैद्यकीय महाविद्यालयांनी अनुक्रमे १८४० व १८६८ मध्ये सुरू केली. मात्र शरीररचनाशास्त्र, आरोग्यशास्त्र, औषधिविज्ञान संग्रहालयांची सुरूवात १९५० नंतरच झाली. या दृष्टीने मुंबई, कलकत्ता, लखनौ इ. ठिकाणाच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्य उल्लेखनीय आहे. व्याधिग्रस्त प्राण्यांचे विच्छेदित नमुने, उष्णकटिबंधातील रोगांचे स्वरूपदर्शक प्लॅस्टिकचे नमुने, निरनिराळ्या जीवाणूंचे नमुने, शिवाय उल्कापाषाणशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, पाणीपुरवठा, हवा व वायुजीवन, मल व जलनिःस्सारण आणि पौष्टिक आहार असे विविध विभागीय संग्रह त्यात आहेत.

संग्रहालयाचा चौथा प्रकार म्हणजे सृष्टिविज्ञान संग्रहालये हा मानावा लागेल. मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील सृष्टिविज्ञान विभागात नैसर्गिक दृश्यांचा हुबेहुब भास घडविणारी उत्कृष्ट चित्रे आहेत. दार्जिलिंग येथील सृष्टीविज्ञान संग्रहालयाच्या उत्कृष्ट दर्जामुळे मुक्त कंठाने त्याचा गौरव करण्यात आला आहे. महाविद्यालयातही अशीच सृष्टीविज्ञान संग्रहालये फार पूर्वीपासून म्हणजे १८७४ पासूनच सुरू झालेली असून एर्नाकुलम्‌, मुंबई, अलाहाबाद व मद्रास येथील प्राणिशास्त्र व सृष्टिविज्ञान संग्रहालये या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. मुंबईचे तारापूरवाला मत्स्यालय म्हणजे तर नव्या दिशेने केलेला एक स्तुत्य टप्पाच मानला जातो.

पाचवा प्रकार वन व कृषिसंग्रहालयांचा म्हणता येईल. डेहराडून येथील वनशाळेची स्थापना १८७८ मध्ये झाली असली, तरी १९१४ मध्ये वनसंशोधन संस्थेच्या स्थापनेनंतरच या कार्याला विशेष गती आली. या संग्रहालयात वनसंवर्धन, इमारती लाकूड, सामान्य वन्य उत्पादने व कीटकशास्त्र असे विविध विभाग आहेत. येथील वनसंशोधन संस्था व वनमहाविद्यालय भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये सर्वोत्तम मानण्यात येते. त्याशिवाय कोईमतूर (१९०२) येथील कृषी व तत्संबद्ध शास्त्रास वाहिलेले कृषी संग्रहालयही उल्लेखनीय ठरते. यात भूस्तरचना, कृषि-अवजारे, मृदाप्रकार, खते तसेच कृषक–प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजंतुशास्त्र इ. विषयांशी संबंधित वस्तूंचाही संग्रह केलेला आहे.

सहाव्या प्रकारात विज्ञान संग्रहालये मोडतात. विशिष्ट विषयांच्या अभ्यासकांना आणि सामान्य जनतेत वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्याकरिता उपयुक्त ठरणाऱ्या विज्ञान संग्रहालयांची देशात उणीव होती. ती दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळा या संस्थेने एक विज्ञान संग्रहालय सुरू करून भरून काढली तर सातव्या प्रकारच्या औद्योगिक संग्रहालयाच्या दृष्टीने भरीव प्रयत्न करून पुण्याच्या लॉर्ड रे महाराष्ट्र औद्योगिक संग्रहालयाने आघाडी मारली. भारतीय कलावस्तू व कारखान्यातील उत्पादन यांचे पुण्यात जे प्रदर्शन भरविले होते, त्यातून हे संग्रहालय १८८८ मध्ये जन्माला आले. तसेच पश्चिम बंगालमधील कलकत्त्याचे हस्तकला संग्रहालय (१९५०) याचीही सुरूवात अशीच झाली आहे. भारतीय कला व हस्तकला यांचे अत्युत्तम नमुने उदा., बांकुराचा जदू-पथ, कालाघाटची पटवा पद्धतीची खास चित्रे, कलमकारी, साड्या, जडजवाहीर व सोन्या-चांदीच्या कलात्मक वस्तूंचे दर्शन येथे घडते. १९३६ मध्ये बिहारमध्येही असेच एक वाणिज्य संग्रहालय अस्तित्वात आले असून ते देशातील या प्रकारचे संग्रहालय आहे. तसेच १९४९ मध्ये अहमदाबाद येथील गौतम साराभाई यांनी कॅलिको वस्त्र संग्रहालय निर्माण करून त्यात अत्युत्त्कृष्ट आधुनिक वस्त्रप्रदर्शनावर भर दिला. कापूस, ताग, लोकर, रेशीम तसेच नायलॉनसारखे कृत्रिम धागे आणिँ कताई-विणाईच्या पद्धती यांचा आदिकालापासूनच्या विकासक्रमाचा आलेख दर्शविणारे प्रदर्शन हे या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य आहे.

आठवा प्रकार म्हणजे बालसंग्रहालये हा होय. पी. जी. मेहता यांनी स्थापन केलेले अमरेलीचे बालसंग्रहालय. सी. बी. गुप्ता यांच्या प्रयत्ना ने १९५७ मध्ये लखनौ येथे स्थापन झालेले मोतीलाल नेहरू बालसंग्रहालय आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बालसंग्रहालय ही या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहेत.हाच घागा धरून आदिवासींच्या कलाविष्काराचा वेध घेण्याच्या दृष्टीने निर्मिलेली सांची, शिलाँग व छिंदवाडा येथील आधिजमाति-संशोधन संस्था संग्रहालये (१९५४) उल्लेखनीय आहेत.


संग्रहालयाची स्थापना व व्यवस्था केंद्रीय शासनाप्रमाणेच, राज्यशासन, महानगरपालिका किंवा विद्यापीठे यांच्याकडूनही करण्यात येते. १९२१ ते १९४७ या काळात इंदूर, हैदराबाद, हिंमतनगर, जामनगर, पद्‌मनाभपूर, कोल्हापूर, सातारा व रेफा (नौगाँग) येथे संबंधित राज्यशासनाची संग्रहालये अस्तित्वात आली तर मुंबई, अलहाबाद, पुणे, कलकत्ता, बडोदे, अहमदाबाद येथील महानगरपालिकांनी आपापली संग्रहालये नावारूपास आणली. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय व पुण्याचे लॉर्ड रे महाराष्ट्र औद्योगिक संग्रहालय (विद्यामान महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, १९६८) ही आदर्शवत ठरली आहेत. त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या आशुतोष मुकर्जी संग्रहालयाचा आदर्श पुढे ठेवून व त्यापासून स्फूर्ती घेऊन देशातील विविध विद्यापीठांनी आपापली संग्रहालये निर्माण केली आहेत. त्यात अलहाबाद विद्यापीठाचे कौशांबी संग्रहालय, वाराणसी विद्यापीठाचे भारतकला भवन, पुणे विद्यापीठाचे डेक्कन महाविद्यालयाच्या पदव्युत्तर संशोधन संस्थेचे संग्रहालय (१९२५) आणि कर्नाटक विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील धारवाडाचे कन्नड संशोधन सोसायटीचे संग्रहालय (१९४०) इ. महत्त्वाची आहेत.

शासन, महानगरपरिषदा व संस्था यांच्याप्रमाणेच काही संस्थांनी वा व्यक्तींनीही संग्रहालय चळवळीस आपला हातभार लावला. आंध्रमधील हैदराबादचे सालारजंग संग्रहालय (१९५१), पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळाचे संग्रहालय (१९१०), गौहातीचे कामरूप अनुसंधान समिती संग्रहालय (१९४०), बंगालचे बंगीय साहित्य परिषद संग्रहालय (१९१०), वाराणसीचे भारत कलाभुवन संग्रहालय (१९१९), महाराष्ट्रातील पुणायाचे केळकर संग्रहालय (१९२०) व औंधचे भवानी संग्रहालय (१९३८) इत्यादींचा उल्लेख उदाहरणादाखल करता येईल. यांपैकी सर्वच संग्रहालयांत सुंदर व कलापूर्ण वस्तूंचा संग्रह तर केलेला आढळतोच तथापि त्या प्रत्येकाचे काहीतरी खास वैशिष्ट्यही जाणवते. उदा., केळकर संग्रहालयाचे वैशिष्ट्य जसे ऐतिहासिक दिव्यांच्या संग्रहातून झळकते, तसे औंधच्या भवानी संग्रहाचे पाश्चिमात्य व पौर्वात्य अशा विविध रंगचित्रांच्या संग्रहातून जाणवते. एकट्या पौर्वात्य रंगचित्रांचेच अवलोकन केले, तरी त्यांतील जयपूर, मोगल, रजपूत, कांग्रा, हिमालयीन, गढवाल, पंजाबी, विजापूर, महाराष्ट्र, नेपाळी, बंगाली अशा विभिन्न शैलींतील रंगचित्रांचे दर्शन घडते.

विशिष्ट व्यक्तीच्या व्यक्तिगत वस्तूंचा संग्रह करून त्याद्वारे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, जीवनकार्य, विचारप्रणाली इत्यादींचे दर्शन घडविणारी संग्रहालये अस्तित्वात आली आहेत. दिल्ली, सेवाग्राम, साबरमती व मदुराई (१९४९) येथील गांधी स्मारक संग्रहालय आणि शांतिनिकेतन (बोलपूर) येथील रवींद्र-सदन (टागोर संग्रहालय, १९४२) यांचा समावेश यांत होतो.

कलावीथी : भारतात कला प्रदर्शनासाठी आवश्यक ठरणाऱ्या कलावीथींचा प्रारंभ उशिराच झाला. काही प्रमुख संग्रहालयांपैकी अनेक संग्रहालयांनी मात्र स्वतःचा कलाप्रदर्शन विभाग निर्माण केला होता व त्यातून ते त्यांच्या संग्रहातील राजस्थानी, मोगल व दाक्षिणात्य शैलींची चित्रे प्रदर्शित करीत असत. या दृष्टीने प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचा कलाविभाग अत्यंत समृद्ध आहे. त्यात भारतीय व पश्चिमी अशा दोन्ही चित्रकला-परंपरांवर यथायोग्य भर दिलेला आहे, त्यानंतरचा क्रम बडोदे येथील कलाप्रदर्शन विभागाचाच (सयाजी बाग, १८९४) लागतो. सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या प्रेरणेने हा सुरू झाला असून त्यात दुर्मिळ कलावस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. त्रिवेंद्रमचे श्रीचित्रालयम्‌ (१९३५) व त्रिचूरचे श्रीमूलम्‌ चित्रशाला (१९३८) उल्लेखनीय आहेत. पहिल्यातील चिनी-जपानी शैलीतील रंगचित्रे, तर दुसऱ्यातील कोचीनची भित्तिचित्रे उल्लेखनीय वाटतात. ग्वाल्हेरच्या कलाप्रदर्शनात अजिंठा-बाघ येथील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती, म्हैसूरच्या कलाप्रदर्शनात आधुनिक भारतीय श्रेष्ठ कलाकृती, हैदराबादच्या सालारजंग कलाप्रदर्शनात पश्चिमी रंगचित्रांचा सुंदर संग्रह आणि मद्रासच्या कलाप्रदर्शनात द. भारतीय कलेच्या प्रत्येक अंगाचे समग्र दर्शन घडविण्यात आले आहे.

तथापि देशातील चित्रकला व शिल्पकला यांच्या आधुनिक कलाकृतींचे वेधक प्रदर्शन मांडण्याच्या दृष्टीने उणीव भासत होती. ती दिल्लीच्या राष्ट्रीय नवकला कलावीथीने (नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट) दूर केली. हे प्रदर्शन ‘जयपूर हाउस’च्या प्रशस्त इमारतीत २९ मार्च १९५४ मध्ये उघडण्यात आले. यातील उच्च कारागिरीचे व मूल्यवान कलाकृतींचे नमुने वेधक असून त्यांत द. भारत, गुजरात, नेपाळ येथील धातुमूर्ती, हातछपाईचे व भरतकलेचे उत्कृष्ट वस्त्रनमुने, रजपूत व कांग्रा शैलीची रंगचित्रे, अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, गगनेंद्रनाथ टागोर, अब्दुल रहमान चुगताई, क्षितींद्रनाथ मजुमदार इत्यादींची बंगाली शैलीतील रंगचित्रे व अमृता शेरगिल तसेच रवींद्रनाथ टागोर प्रभृतींच्या अनेक चित्रकलाकृतींचा समावेश केलेला आहे. शिवाय हस्तकलेतील काष्ठशिल्पे, लिनो-खोदकाम (लिनोकट) अम्लउत्कीर्णन, जल-उत्कीर्णन ( ॲक्वार्टिट) यांसारख्या आरेख्यक कलांचे वेधक नमुनेही आहेत.

नवोदितांसाठीही काही ठिकाणी प्रदर्शन भरविण्याच्या दृष्टीने कलावीथी निर्माण करण्यात आल्या असून मुंबईची जहांगीर कलावीथी (जहांगीर आर्ट गॅलरी) ही त्यांपैकी एक उल्लेखनीय कलावीथी आहे. त्यात वेळोवेळी रंगचित्रे, शिल्पाकृती, रांगोळ्या, पुष्परचना, बाहुल्या खेळणी, बुरूडकाम, चर्मकलाकाम इ. विविध क्षेत्रांतील कलाकृतींची प्रदर्शने भरविण्यात येतात.

संघटन व उपक्रम : नंतरच्या काळात संग्रहालयासंबंधाने विविध उपक्रम सुरू झाले. त्यांपैकी एक म्हणजे १९४३ मध्ये काही संग्रहालयीन कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन एक संघटना निर्माण केली हा होय. याच संघटनेतर्फे भारतीय संग्रहालय पत्रिकेचे प्रकाशन व राष्ट्रीय पातळीवरील संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात मुख्यत्वे संग्रहालयासंबंधीच्या ताज्या प्रश्नांविषयीचा ऊहापोह व विविध परिसंवादांचे आयोजन केले जाते.

पंचवार्षिक योजनांतही संग्रहालयाच्या पुनर्रचनेच्या व नवनिर्मितीच्या प्रश्नांचा अंतर्भाव केलेला असून शासनातर्फे एखाद्या संग्रहालयाची वास्तू, भांडारगृह, सुधारणा, शिक्षण-प्रशिक्षण, साधनसामग्री व प्रकाशनाबाबतच्या खर्चासाठी लागणाऱ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर वैयक्तिक रीत्या संग्रह करणाऱ्यांना उत्तेजन आणि संशोधकांना अनुदान देण्याची योजनाही आखली आहे.

बडोदे व कलकत्ता येथील विद्यापीठांनी आपल्या शिक्षणक्रमात संग्रहालय विद्येचा समावेश केला असून त्यासाठी पारंगत व पदविका दर्जाच्या अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. बडोदा विद्यापीठाने तर शोधनिबंधांचे प्रकाशन करण्याचे धोरण ठेवले असून त्यानुसार १९५९ मध्ये सर्वप्रथमच भारतीय संग्रहालयाची मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचप्रमाणे विविध संग्रहालयांतर्फे सेवाकालातील शिक्षणक्रमाचे व शासनातर्फे १९६३ पासून दोन आठवड्यांच्या शिबिरांचे संग्रहालयीन तज्ञांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात येते. त्यात शासकीय संग्रहालयातील अधिकारीवर्गाची तांत्रिक विषयांवरील व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित केली जातात.


यूनेस्कोतर्फे १९६६ मध्ये दिल्ली व मुंबई येथे द्वितीय आशियाई प्रादेशिक संग्रहालय-परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, तर १९५८ मध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाने स्वतःच्या एका प्रयोगशाळेची उभारणी केली होती आणि १९७१ मध्ये यूनेस्कोच्या सहकार्याने केंद्रीय संग्रहालय पारंपारिक प्रयोगशाळेतर्फे संग्रहालयीन कार्यकर्त्यांसाठी एका प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. नवी दिल्लीच्याच राष्ट्रीय संग्रहालयाच्या बालभवनातर्फे देखील मार्गदर्शक सहली, चर्चासत्रे, बोधपटप्रदर्शने, सांस्कृतिक समारंभ, बालांसाठी वेधक प्रदर्शने आणि तरुण-किशोरांसाठी परिचय-प्रसंगांचे आयोजन इ. अनेक उपक्रमांद्वारे संग्राहक वृत्तीचा स्फुल्लिंग चेतविला जातो. असे उपक्रम दरवर्षीच होत असून त्यांचा अहवालही प्रकाशित करण्यात येतो.

एकूण पुराणवस्तूंचा हा मौलिक वारसा जतन करण्याची दृष्टी लोकांना प्राप्त व्हावी हाच यामागील मुख्य उद्देश आहे. या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद म्हणूनच रोमचे आंतराष्ट्रीय पुराणवस्तू जतन व संरक्षणात्मक अभ्यासकेंद्र यांच्यातर्फे नवी दिल्ली येथे १९७२ मध्ये आशियाई-पॅसिफिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. [→ संग्रहालये].

जोशी, चंद्रहास

संदर्भ :

1. The Publications Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India, Museums and Art Galleries, Delhi, 1956.

2. Salar Jung Estate Committee, Salar Jung Museum Souvenir, Hyderabad, 1951.

३. केतकर श. म. संग्रहालयपरिचय, पुणे, १९६२.

४. शिवराममूर्ति, सी., अनु. महाराष्ट्र शासन, भारतीय संग्रहालयांची निर्देशिका, दिल्ली, १९६०.