हस्तव्यवसाय

पितळी सूर्यदीप, १८ वे शतक.

भारतीय हस्तव्यवसायांची किंवा हस्तकलांची परंपरा अत्यंत प्राचीन असून ती कलात्मकता, उपयुक्तता व विविधता या बाबतींत अत्यंत समृद्ध आहे. वस्त्रकला, ⇨भरतकाम, ⇨काष्ठशिल्प, धातुकलाकाम, बुरुडकाम, ⇨ चर्मकलाकाम, लाखकाम, यांसारख्या अनेक हस्तव्यवसायांचा त्यांत समावेश होतो. पारंपरिक आणि सांकेतिक मर्यादेत राहूनही कारागिराच्या व्यक्तिगत कल्पकतेची व कौशल्याची चमक दाखवणारी आणि समाजाच्या दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणारी भारतीय हस्तकला ही पिढ्यान्‌पिढ्या टिकून आहे. हस्तकला या एकप्रकारे उपयुक्त लोककलाच होत. त्यातून सामूहिक सर्जनशक्तीचाच आविष्कार असतो. लोकांच्या गरजांचे भान ठेवून त्या गरजा कलात्मक स्वरूपात भागविण्याचे कार्य हस्तकला प्राचीन काळापासून पार पाडत आल्या आहेत, त्यातून कारागिराच्या कलात्मक आत्माविष्काराला वाव मिळतो.

भारतीय हस्तकलांतून कारागिरांच्या अनेक पिढ्यांनी निश्चित केलेली रचनेची सूत्रे व कार्यपद्धती दिसून येतात. समाजातील सर्वसामान्यांचा वर्ग तसेच सरदार-धनिकांचा वर्ग अशा दोन प्रमुख वर्गांसाठी ज्याप्रमाणे हस्तकलांची निर्मिती होत राहिली त्याप्रमाणे परदेशांत निर्यात करण्यासाठीही उत्कृष्ट हस्तकला-वस्तू तयार करण्यात आल्याचे दिसून येते. भारतीय हस्तकलांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रादेशिक विविधता.

प्राचीन वैदिक वाङ्‌मयात ‘कारू’ वा ‘शिल्पी’ यांसारख्या संज्ञांनी तत्कालीन कारागिरांचा निर्देश केलेला आढळतो. रथकार, कर्मार (लोहार), तक्षा (सुतार) कुलाल (कुंभार), पेशिता (मूर्तिकार), रजक (रंगारी / परीट) यांसारखे कितीतरी कारागिरांचे प्रकारे प्राचीन वाङ्‌मयात निर्दिष्ट केले आहेत. कामसूत्रासारख्या ग्रंथातून चौसष्ट कलांची परिगणना केलेली आढळते तर प्रगत समाजाप्रमाणे भारतात विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्येही हस्तव्यवसायाची परंपरा दिसून येते.

भारतीय हस्तकलांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी माध्यमे तसेच हत्यारे, उपकरणे आणि रंग इ. गोष्टी प्रदेशपरत्वे उपलब्ध असणाऱ्या सामग्रीवर अवलंबून असतात. निर्मितीचे तंत्र त्यावरच ठरते तथापि या हस्तकलांमधील आकृतिबंधाची सांस्कृतिक पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. धार्मिक श्रद्धा, पौराणिक कल्पना व देवदेवतांच्या संकल्पना तसेच रूढी आणि लोकभ्रम इत्यादींचा प्रभाव हस्तकलांच्या सर्व वैशिष्ट्यांवर दिसून येतो. स्वस्तिक, गोपदादी चिन्हे, शंखचक्रादी भौमितिक आकार, चंद्रसूर्याच्या प्रतिमा, कमल, बिल्वपत्रे, पिंपळपान, कोयरी, वटपिंपळादी वृक्ष तसेच गाय, हत्ती, मोर, पोपट, नाग यांसारखे प्राणी इत्यादींची प्रतिमाने भारतीय हस्तकलांत विशेषत्वाने दिसून येतात. कालमानानुसार या पारंपरिक प्रतीक-प्रतीमानांत काहीशी भर पडत गेली, हे खरे पण अशा नाविन्यापेक्षा पारंपरिक प्रतीके व प्रतिमाने यांचेच आकर्षण टिकून राहिलेले दिसते.

मोहे-जो-दडो येथील उत्खननात आढळून आलेल्या चात्या व ब्राँझच्या सुया भारतीय वस्त्रनिर्मितीच्या प्राचीन परंपरेच्या निदर्शक ठरतात. विविध वस्त्रप्रकारांचे निर्देश प्राचीन ग्रंथांतूनही आढळतात. भारतीय वस्त्रकलेच्या क्षेत्रात गालिचे व नमदे विशेष प्रसिद्ध आहेत. गालिचानिर्मितीची सात राज्यांतील वीस केंद्रे प्रमुख आहेत, ती अशी : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, भादोही, कोपीगंज, खमरिया, आग्रा जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर पंजाबातील अमृतसर हरयाणातील पानिपत राजस्थानातील जयपूर व बिकानेर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आंध्र प्रदेशातील एलुरू व वरंगळ तामिळनाडूतील मद्रास व वालजापेठ आणि बिहारमधील ओबरा. या सर्व केंद्रांतील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन उत्तर प्रदेशातून व १० टक्के उत्पादन काश्मीरमधून होत असून सर्व केंद्रांतून मिळून दोन लाख कारागीर काम करीत असतात. या एकूण उत्पादनापैकी ८५% गालिचे निर्यात केले जातात. त्यांतील काश्मीरचे गालिचे सर्वोत्तम प्रतीचे मानण्यात येतात. त्यातही सतेज रंगाचा व वजनाने जड असणारा ‘हमदम’ हा प्रकार अत्युत्कृष्ट समजण्यात येतो. गालिच्याप्रमाणेच लाटून तयार केलेले लोकरीचे विविध आकारांचे काश्मीरी नमदेही प्रसिद्ध आहेत. [→ गालिचे].

वस्त्रकला : रेशमी व सुती वस्त्रांची तलम वीण, सोन्यारुप्याचे भरतकाम वा सुंदर आकृतिबंधांचे रंगकाम ही भारतीय वस्त्रकलेची परंपरागत वैशिष्ट्ये होत. वाराणसीचे ⇨किनखाब, महाराष्ट्राची ⇨पैठणी, बंगाली ⇨बालुचार, टांडाची (उ. प्र.) जामदानी. [→ जामदानी कलाकाम], मध्य प्रदेशाची चंदेरी, गुजरात-राजस्थानचा ⇨ पाटोळा, ओरासाची इक्कत व दक्षिणेकडील कोरनाद हे साडीप्रकार उत्कृष्ट मानले जातात. ⇨ खडीकाम केलेली महाराष्ट्राची चंद्रकळा तसेच बांधणी व रंगणी – तंत्राच्या साहाय्याने तयार करण्यात येणारी गु्जरात-राजस्थान-सौराष्ट्राची ⇨बांधणी व मध्य प्रदेशाची चुनरी आणि दक्षिणेकडील ⇨ कलमकारी हे प्रकार उक्तृष्ट समजले जातात.

भारतीय भरतकामाची मूळ प्रेरणाच निसर्गापासून मिळालेली असल्यामुळे त्यात प्रदेशपरत्वे आढळणाऱ्या वृक्षवल्ली, पशुपक्षी व नैसर्गिक रंगसंगती यांचे वेधक प्रतिबिंब आढळते. त्याचबरोबर भौमितिक आकार, ठिपके आणि स्वस्तिक, तुलसी वृंदावन, पिंपळपान, कैरी (कोयरी) रथादी प्रतिमानांना खूपच वाव मिळालेला असतो. या दृष्टीने बंगाली ⇨ कंथा, चंबाचा ⇨चंबा रुमाल, पंजाबची ⇨ फुलकरी, बाग. हे वस्त्रप्रकार आणि कर्नाटकाची कसूती, कच्छचे कच्छी व सिंधी भरतकाम, लखनौचे चिकनकारी [→ मलमल] हे प्रकार उल्लेखनीय आहेत. विशेषतः काश्मीरी शाली [→ शाली] म्हणजे भारताची अभिमानास्पद कलानिर्मितीच होय. जरीचे भरतकाम [→ जर व कलाबतू] हेही वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. थेट वेदकाळातील पेशकारीशी (जरीकामाशी) आधुनिक जरीकामाचा सांधा जुळलेला दिसतो. भारतभर हातमाग वा यंत्रमागावरील साड्यांसाठी जरीच्या धाग्यांचा वापर सर्रास केला जातो. विशेषतः पैठण, भोपाळ, त्रिचनापल्ली, बंगलोर व मद्रास येथे याचे प्रमाण अधिक आढळते. यांखेरीज जरीकाम, टिकल्या व भिंग यांनी सजविलेल्या अनेक लहान मोठ्या वस्तू उदा., साड्या, हस्तमंजुषा, पादत्राणे, पट्टे, पट्ट्या (लेस) अथवा तत्सम जरतारी वस्तूंची निर्मिती आग्रा, लखनौ, बरेली, व दिल्ली इ. ठिकाणी होत असून वाराणसी व बरेली येथील कलात्मक जरतारी वस्तूंची निर्यातही करण्यात येते. [→ वस्त्रकला].


सांडणीस्वार : राजस्थानी धातुकाम.

धातुकाम : भारतीय धातुकलाकामाची परंपरा सु. इ. स. पू. तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची आहे. मोहें-जो – दडो येथे सापडलेल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका ब्राँझशिल्पामध्ये श्रेष्ठप्रतीची कारागिरी दिसून येते. विविध आकार, पानाफुलांची वेधक नक्षी आणि सुंदर निसर्गदृश्ये यांचे आकृतिबंध असलेल्या कोरीव पितळी भांड्यांसाठी वाराणसी, मुरादाबाद (उ. प्र.) व जयपूर (राजस्थान) ही केंद्रे प्रसिद्ध आहेत. याशिवाय लंबाकार मद्यपात्रे, पुष्पपात्रे, मेजपृष्ठे, तबके, मेणबत्तीच्या बैठकी, भोजनाच्या थाळ्या, घंटा, फळांची तबके, सिगारेट पेट्या, रक्षापात्रे, सुराभाजन (बीअर मग), ⇨ हंड्या व झुंबरे अशा नाना तऱ्हेच्या कलावस्तूंची निर्मिती असते. त्यांपैकी मुरादाबादी व वाराणसीची धातुपात्रे वेधक असतात तर जयपूरची धातुपात्रे ही चिकन, ‘मारोरी’ व बीदरनक्षीने अलंकृत असतात. [→ धातुकलाकाम].

अश्वाकृती कुलूप

दक्षिण भारतातील ⇨ कोफ्तगारी अर्थात बीदरकामाची केंद्रे म्हणजे बीदर व हैदराबाद ही होत. [→ बीदरचे कलाकाम]. तेथे परंपरागत वस्तू उदा., पानाचे डबे, हुक्के, पंचपात्रे, पुष्पपात्रे, आणि विविध प्रकारचे चिमटे व पकडी, चहादाणी, फळांची तबके, रक्षापात्रे, होतात. सिगारेट पेट्या मोठ्या मद्यपात्रांच्या बैठकी इ. तयार करण्यात ब्राँझशिल्पाच्या दृष्टीने स्वामीमलाई, मदुराई, मद्रास व बेंगलोर ही केंद्रे परंपरागत भारतीय अशा चोलापद्धतीच्या ब्राँझशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. ही शिल्पे एकसंघ व पोकळ असतात तर काहींचे ऑक्सिडीकरण करण्यात येते. दाक्षिणात्य ब्राँझशिल्पे त्यांच्या स्वयंपूर्ण सौंदर्यासाठी व कलात्मक गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. [→ ब्राँझशिल्प].

पारंपरिक काष्ठतक्षणाचा नमुना

लाकूडकाम : लाकूडकाम हा भारतातील एक प्राचीन हस्तव्यवसाय असून कमीअधिक प्रमाणात भारतात तो सर्वत्र आढळतो. प्रायः शिसवी, साग, अक्रोड वा चंदन यांसारख्या मोजक्याच वृक्षविशेषांपासून मिळणाऱ्या लाकडावर कोरीवकाम करून पशुपक्षी व माणसांच्या प्रतिकृती, खणपाट (पॅनेल्स), फर्निचर व विविध प्रकारच्या सौंदर्यपूर्ण जिनसांची निर्मिती प्रदेशपरत्वे आपापल्या वैशिष्ट्यानुसार करण्यात येते. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या खोलगट नक्षीच्या कोरीवकामासाठी ख्याती असलेल्या आरशाच्या चौकटी, बैठी मेजे, मेजपृष्ठे पंजाबचे अद्ययावत स्वरूपाचे फर्निचर किंवा अक्रोडच्या मऊ लाकडावरील जाळीदार कोरीवकाम केलेले काश्मिरी दीपाधार, गोलाकार तबके व फर्निचर तसेच पुष्पसदृश खोदकाम वा लतावेलीचे कोरीवकाम केलेली मध्य प्रदेशातील टेबले, कपाटे आणि परंपरागत धर्तीचे महाराष्ट्रातील दिवाण वा बैठकी इ. फर्निचर-वस्तू वैशिष्ट्यपूर्ण असतात.

याखेरीज मोहक आणि रंगीत ⇨ संखेडाकाम केलेले गुजराती फर्निचर त्रिमितीय व उत्थित शिल्पांकित आंध्र प्रदेशातील खणपाट (पॅनेल्स), पेले, बशा, चमचे व निर्मळ येथील फर्निचर तमिळनाडूतील विरूधनगर, मदुराई आणि तंजावरची कोरीव शिल्पे प. बंगाल-बिहारच्या मनुष्याकृती, मंजुषा, अलंकारपेट्या, बुद्धीबळाचे पट अाणि दीपाधार ही सर्व आपापली प्रादेशिक वैशिष्ट्येच प्रकट करीत असतात तर आसाम, मणिपूर, त्रिपुरा व नागालॅंड येथील आदिवासी लाकूडकामातील वैचित्र्य मनोवेधक असते.

हस्तिदंती जडावकाम केलेला लाकडी चौरंग

तथापि याहीपेक्षा कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, राजस्थान आणि प. बंगाल येथील चंदनीकामाला जगात तोड नाही. त्यावरील जाळीकाम वा बेलपत्रीचे कोरीवकाम अतिशयच नाजूक, मोहक व वेधक असते. हस्तिदंत, अस्थी वा तांबे-पितळीच्या तारांचे चंदनी लाकडावरील जडावकाम म्हणजे एक प्रकारचे भरतकामच म्हणावे लागेल, इतके ते बारीक व नाजूक असते. [→ फर्निचर लाकडी कलाकाम].

खेळणी व बाहुल्या : पारंपरिक भारतीय खेळणी व बाहुल्या यांतून लोकजीवनाचे प्रतिबिंब दिसून येते. विशेषतः अभिजात साहित्य वा लोकगीते यांतून आढळणाऱ्या व्यक्तीरेखा उभ्या करण्यात किंवा विविध

माढिया आदिवासींच्या लाकडी बाहुल्या.

व्यावसायिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडविण्यात भारतीय बाहुल्या अग्रेसर आहेत. या बाहुल्या प्रायः हलके लाकूड, भाजलेली माती आणि कापड यांपासून तयार करतात. वाराणसीच्या लाकडी बाहुल्या, कोंडापल्लीच्या मातीच्या बाहूल्या, पुणे (महाराष्ट्र) आणि बिहारच्या कापडी बाहुल्या व सावंतवाडीची खेळणी, मध्य प्रदेशातील भुशाचे प्राणी, प, बंगालचा खापरी घोडा, कृष्णानगरच्या फळांचा गर व माती यापासून बनविलेल्या बाहुल्या चन्नपटणची (म्हैसूर) लाखेची खेळणी ही भारतीय खेळण्यांची झलक दाखविणारी आहेत. [→ खेळणी बाहुली].

जडजवाहीर व अलंकार : साधेपणातील सौंदर्य, भारदस्तपणा आणि वेधक कारागिरी यांसाठी भारतीय अलंकारांचा पूर्वीपासूनच लौकिक आहे. आजही चांदीच्या कोंदणात प्रवाळ, वैडूर्य, सतेज रत्ने, पाचू, माणिक, लाल, पुष्कराज आणि हरितमणि (जेड) बसवून अलंकृत केलेली काश्मीरमधील कंकणे, अंगठ्या, बाळ्या व गळसऱ्या आपला प्रभाव गाजवीत आहेत तर पूर्व आफ्रिकेतील

हस्तिदंती तक्षणाची कलाकृती, राजस्थान
बांकुरा अश्व : खापरीकामाचा परंपरागत नमुना, पं. बंगाल.

हस्तिदंतावर कोरीवकाम करून बनविलेल्या बाळ्या, कंकणे व बांगड्यांनी मोगलकाळापासून आपले अस्तित्व टिकवून धरले आहे. राजस्थानच्या लाखेच्या बांगड्याही शतकानुशतके प्रसिद्ध असून काहींवर नाजूक खोदकाम व सप्तरंगांची उधळण केलेली असते तर काहींवर लाखेमध्ये लहान लहान खडे व भिंगे बसवून त्यांची शोभा वाढविण्यात येते. मनगटाच्या हालचालीबरोबर ते खडे व भिंगे चकाकू लागतात. [→ अलंकार जडजवाहीर बांगडी].

हस्तिदंती वस्तू : हस्तिदंतशिल्पन हे अतिशय कष्टप्रद व क्लिष्ट असले, तरी दिल्ली, पंजाब, राजस्थान, केरळ, म्हैसूर व प. बंगाल येथील कारागीर आपापल्या प्रादेशिक वैशिष्ट्याचा आविष्कार करून वस्तुनिर्मिती करीत असतात. भस्मपेटिका (पॉवडर बॉक्सेस), जडावकामयुक्त अलंकार व अलंकारमंजुषा, पदके, देवादिकांच्या मुर्ती, पशुपक्ष्यांच्या प्रतिमा, दीपाधार, हुक्क्याच्या दांड्या यांवर वेलबुटीची नक्षी कोरलेली असते, तर कानांतील बाळ्या, बांगड्या, पिना इ. वस्तू कलापूर्ण रीतीने तयार करण्यात येतात. [→ हस्तिदंतशिल्पन].


कुंभारकाम : संपूर्ण भारतभरच मृत्तिकापात्रांना मागगणी असल्यामुळे प्रत्येक राज्यातून त्यांची निर्मिती होत असते. तथापि राजस्थानातील जयपूरच्या मृत्तिकापात्रांना मात्र एक विशिष्ट दर्जा असतो तर दिल्लीची नील मृत्तिकापात्रे (दिल्ली ब्लू पॉटरी) ही आपला वेगळा दर्जा प्रस्थापित करतात. यांखेरीज उत्थितशिल्पयुक्त रामपूर व खुर्जांची मृत्तिकापात्रे परंपरागत पद्धतीची असून चुनार, आझमगढ व अलीगढ येथेही कलापूर्ण मुत्तिकापात्रांची निर्मिती होते.

दक्षिणेकडील परंपरागत जुन्या पद्धतींची उभट मुत्तिकापात्रे रेषाकृतींनी वा अन्य आकृतींनी अलंकृत केलेली असतात. द. भारतीय खापराची भांडी उच्च प्रतीची असून त्यांचा बराच विकास झालेला आहे, तर शैलीदार खापरी प्राण्यांच्या प्रतिकृती द. भारत, प. बंगाल व महाराष्ट्रातून दिसून येतात. प. बंगालातील सुप्रसिद्ध ‘बांकुरा अश्व’ हा त्यांपैकीच एक होय. वेल्लोर येथेही शुद्ध पांढऱ्या मातीपासून विविध प्रकारची भांडी बनविण्यात येतात. त्यांवर आकर्षक रंगांची वा नीलवर्णाची झिलई चढविण्यात येते. [→ मृत्पात्रो].

शिलाशिल्पन : शिलाशिल्पनाचे अस्तित्व भारतात प्राचीन काळापासून आहे. या दृष्टीने सारनाथ येथील चकचकीत वालुकाश्माच्या प्रतिकृती महत्वाच्या ठरतात. शिलाशिल्पनाच्या अनेक शैलींमध्ये मौर्य, गांधार, गुप्त, चालुक्य, चोला, विजयानगर, ओरिसा, होयसळ, मोगल, हिंदू-मुस्लिम व दख्खिनी शैली या प्रमुख होत.

तसेच खडक कोरून केलेल्या कलाकृतीच्या दृष्टीने अजिंठा, एलोरा (वेरूळ), उदयगिरी, पट्टदकलचे चालुक्यकालीन विरूपाक्षी मंदिर, मदुराईचे नायकांचे मंदिर, पुरी, कोणार्क व भुवनेश्वरचे हिंदु-आर्यन मंदिर, मोढेराचे सुर्यमंदिर, खजुराहोची चंदेलनिर्मिती मंदिरे ही सर्व शिलाशिल्पनाचे उत्कृष्ट नमुने आहेत तर आग्र्याचा ताजमहाल हीदेखील कलाक्षेत्रातील एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. सद्यकालीन कारागिरांना यापासून आजही प्रेरणा मिळत राहते. विशेषतः प्राचीन शिल्पांतील उभी असलेली दीपलक्ष्मी, अप्सरा, कमलकलिका, उत्फुल्ल कमलपुष्प, दीपाधार, रक्षापात्रे वा दगडफूल यांसारख्या परंपरागत आकृतिबंधांचा वापर आजचेही कारागीर करताना आढळतात. [→ शिलाशिल्पन].

बुरूडकाम : बुरुडकाम ही एकप्रकारे लोककलाच आहे. वेळू (बांबू), वेत, गवत, बोरू तसेच ताडपत्र, माडाची वा खजुरीच्या झाडाचा पाने यांचा वापर करून त्यांच्या वस्तू तयार करण्याची प्रथा अतिप्राचीन काळापासून आहे. उदा., चटया, पेटारे, पेट्या, तबके, खेळणी, बाहुल्या, अलंकार. एवढेच नव्हे तर आधुनिक पद्धतीची भित्तिशोभिते इत्यादींची निर्मिती इ. स. पू. ५००० वर्षांपासून चालू आहे.

देशातील विविध भागांतील स्त्री-पुरूष विविध प्रकारच्या गवतांपासून मिळणाऱ्या धाग्यांच्या विभिन्न आकारप्रकारांच्या वस्तू विणीत असतात. उदा., धान्य भरण्याच्या कणग्या, कोळ्यांच्या टोपल्या, वस्तूंची ने-आण करणाऱ्या पिशव्या, स्वयंपाकाची भांडी, बाळाचा झोपाळा, ऊनपावसापासून बचाव करणाऱ्या छत्र्या इत्यादी. अशा प्रकारे आल्हाददायक व शीतल रंगाच्या आणि अलंकृत केलेल्या वस्तूची निर्मिती भारतात सर्वत्र होते. भारतीय चटयांनी तर आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आसाम व हिमालयाचा डोंगराळ भाग, बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेश, तमिळनाडू व केरळ येथे वैविध्यपूर्ण रंगीत नक्षीच्या व आकाराच्या चटयांची निर्मीती होते तर ओरिसामध्ये भौमितीक आकृत्या असलेले पेटी-पेटारे बनविण्यात येतात. तसेच मलबारचे बोरूकाम, बिहारचे सिक्की तृणकाम, काश्मीरचे वाळुंजकाम (विलो), आसामचे वेतकाम व प. बंगाल, बिहार, ओरिसा येथील वेळूकाम यांतील कारागिरीच्या कौशल्याला तोड नाही. [→ चटया बुरूडकाम].

अस्थी, शंख व शिंगे यांचे कलाकाम : हस्तिदंती कलावस्तूंनंतर अस्थीच्या कलावस्तूंचा क्रम लागतो. यापासून बऱ्याच वेधक व सजावटीयोग्य वस्तू बनविण्यात येतात. उदा., मेजदीप, दीपाधार, अलंकारभूषणे इत्यादी. आग्रा, दिल्ली, लखनौ येथे या वस्तूंची निर्मिती होते.

शृंगशिल्पनाचा नमुना

शंख-शिंपल्यांपासून विविध रंगांत वस्तू उदा., दीपाच्छादने, रक्षापात्रे, पत्रभारके (पेपर वेट), उदबत्तीची घरे व अलंकार बनविले जातात. रामेश्वर, कन्याकुमारी, नागरकोइल, किझाकारई व मद्रास हे तमिळनाडू आणि मुर्शिदाबाद, बांकुरा, मिदनापूर व चोवीस परगणा ही प. बंगालची मुख्य केंद्रे आहेत. शिंगांपासूनही अनेक प्रकारच्या वस्तू बनविण्यात येतात. उदा., कंगवे-फण्या, लेखणीधारक (पेन होल्डर्स), पंचा ठेवण्याचे कडे (नॅपकीन रिंग), चमचे, छडी (वॉकिंग स्टिक), काटे-चमचे व चाकू – सुऱ्यादिकांच्या मुठी इत्यादी तथापि शिंगांपासून तयार केलेले काळेशार चमकदार व वेधक पशुपक्षी यांचा वापर गृहशोभनाकडे होत असल्याने ते अतिशय लोकप्रिय आहेत. प. बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांत शिंगांच्या कलावस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. [→ अस्थिशिल्पन शुक्तिशिल्पन शृंगशिल्पन].

लोककला : भारतीय ग्रामीण भागातील लोकांच्या परंपरागत प्रसन्न अभिरुचीचे लाघवी दर्शन, गूढ श्रद्धांवर आधारित अशा नाना लोककलांतून उत्कृष्ट प्रकारे घडते. उदा,, बिहारची मधुबनी चित्रकला, बंगाल ओरिसाची पट चित्रकला, आंध्रची निर्मळ चित्रकला ही याची काही उदाहरणे असून, विस्तृत अशा चित्रदालनातील या प्रत्येक चित्रकला विषयदृष्ट्या परस्परांशी सजातीय वाटल्या, तरी त्यांचे रूप, रंग व तंत्र यादृष्टीने त्यांच्यातील पुराणकल्पनांचे चित्रण भिन्न स्वरूपाचे असते. महाकाव्ये, पुराणे व कृष्णलीला हेच त्यांचे मुख्य स्त्रोत असून त्यांपासूनच त्यांना प्रेरणा लाभते. [→ मधुबनी चित्रशैली].


पितळी अडकित्ता, केरळ.

संकीर्ण हस्तव्यवसाय : भारतामध्ये असंख्य असे नवनवीन हस्तव्यवसाय असून ते तसे साधेसुधेच पण आकर्षक आहेत. त्यांचे स्वरूप प्रत्यही नवीनतम होत असते.

यांपैकी फळांच्या गरापासून तयार होणाऱ्या कलात्मक वस्तूंसाठी प. बंगाल आणि तमिळनाडू विशेष प्रसिद्ध आहेत. त्यातील कारागिरी अत्यंत नाजुक स्वरूपाची असते. त्यांत प्रायः विविध प्रकारच्या, धार्मिक स्वरूपाच्या व सजविलेल्या बाहुल्या-खेळणी यांचा समावेश होतो.

यांशिवाय काश्मीर, राजस्थान (जयपूर), प. बंगाल येथे चर्मकलाकाम चालत असून त्यात असंख्य वस्तू निर्माण केल्या जातात. उदा., पादत्राणे, पिशव्या, थैल्या इत्यादी आंध्र प्रदेशात मात्र रंगीत चर्मवस्तू तयार होतात. त्यात कळसूत्री बाहुल्यांचा वरचा क्रम लागतो.

तसेच कागद लगद्यापासूनही काश्मीर, जयपूर, ग्वाल्हेर, वाराणसी, उज्जैन, दिल्ली, लखनौ, आग्रा व मद्रास येथे मेजदीप. पत्रभारक (पेपर वेट), खेळणी तयार होत असून बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश येथे उत्तम प्रकारचे लाखकाम चालते तर मिरज, तंजावर, मद्रास, दिल्ली व कलकत्ता ही गावे संगीतवाद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. [→ लाखकाम].

संघटना व शासकीय उपक्रम : अलीकडे भारतात हस्तोयोगी कारागिरांची श्रेणी (गिल्ड) संघटना तयार करण्यात आली आहे. ही श्रेणी-संघटना प्रायः पिढीजात कारागिरांची असली, तरी अन्य कारागीरही हिचे सभासदत्व घेऊ शकतो. कारागिरांच्या कामाचे तास निश्चित करणे, कामाचा दर्जा टिकविणे व चुकांबद्दल कारागिरांना योग्य समज देणे, तसेच अनिष्ट स्पर्धा वा वादग्रस्तता दूर करणे इ. कामे ही संघटना करते. एखाद्या हस्तोद्योगात बेकारी असेल, तर त्यात जादा कामाला संघटनेकडून प्रतिबंध करण्यात येतो. शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल व कलाकुसरीतील गुणवत्ता या बाबींवर संघटनेचा कटाक्ष असतो.

भारत सरकारतर्फे हस्तकलाव्यवसायाच्या विकासार्थ अखिल भारतीय हस्तकलाव्यवसाय मंडळ (ऑल इंडिया हॅंडिक्रॅफ्ट्‍स बोर्ड) १९५२ साली स्थापन करण्यात आले. हस्तकलावस्तुनिर्मिती केंद्रांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने व त्यासंबंधात त्यांना काही उपाय सुचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाला सल्ला देणे, हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

या मंडळाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून लखनौ, मुंबई, कलकत्ता, मद्रास व नवी दिल्ली येथे प्रादेशिक कार्यालय आहेत. तसेच दिल्ली, कलकत्ता, मुंबई, व बंगलोर अशी चार प्रादेशिक अभिकल्प केंद्रे (रिजनल डिझाइन सेंटर्स), आठ मार्गदर्शी केंद्रे (पायलट सेंटर्स) आणि हस्तकलाव्यवसाय विकास केंद्र व हस्तकला वस्तुसंग्रहालय देखील आहे.

हस्तकलाउद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने १९६८-६९ या दरम्यान तसेच निर्यात प्रवर्तनाच्या उद्देशाने अनेक उपाय करण्यात आले आहेत. या काळात हा निर्यातीचा आकडा ७६·४७ कोटी रूपयापर्यत म्हणजे तत्पूर्वीच्या वर्षाच्या जवळजवळ ४० टक्के अधिक होता. १९६०–६१ पासून हा नियातीचा आकडा दरवर्षाच्या तुलनेने अधिकच होता. संपूर्ण देशातील इतर अन्य वस्तूंच्या निर्मितीच्या तुलनेने हस्तकलावस्तु–निर्मितीचा आकडा १५·२ ( १९८०–८१ ) पर्यत जाऊन पोहोचला.

बंगलोर, कलकत्ता, दिल्ली व मुंबई या चार अभिकल्प केंद्रांनी १,१०६ नव्या आकृतिबंधांची निर्मिती केली व ३५० हस्तकलावस्तुनिर्मात्यांना त्या दृष्टीने सहाय्य केले. त्यांपैकी १९७०-७१ पर्यत १४५ कारागीर नवीन होते. हे आकृतिबंध प्राय: लाकूड व लाखकाम, मेजचटई ( टेबल मॅट ), खेळणी, बाहुल्या, हस्तिदंती वस्तू व शिलाशिल्पन यासंबंधीचे होते. प्राय: ४१ टक्के नवीन आकृतिबंध हे व्यापारी दृष्ट्याच उपयोगी पडणारे होते. एका वर्षात या अभिकल्प केंद्राने १७४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या कलेतील तज्ञांची नेमणूक केलेली होती. विशेषतः दोरुखा, नमदा, गब्बा व मिक्ष टाक्याचे भरतकाम यातील वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध शोधून काढणे, हे या तज्ञांचे काम होते. [→ हस्तव्यवसाय].

जोशी, चंद्रहास

संदर्भ :

1. Chattopadhyaya, Kamaladcvi, Glory of Indian Handicrafts, New Delhi, 1976.

2. Dhamija, Jasleen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.

3. Mukharji, T. N. Art- Manufactures of India, New Delhi, 1974.

4. Saraf, D. N. Indian Crafts : Development and Potential, New Delhi, 1982.