नृत्य :भारतीय संस्कृतीत नृत्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे, किंबहुना भारतीय संस्कृतीचे ते एक अविभाज्य अंग आहे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रकारच्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा सात शास्त्रीय नृत्यपरंपरा अस्तित्वात असलेला भारत हा जगातील एकमेव देश म्हणता येईल. शास्त्रीय नृत्याप्रमाणेच येथील प्रदेशिक विविधतेनुसार अनेक प्रकारच्या लोकनृत्य-परंपराही भारतात रुजलेल्या आहेत.

उगम व परंपरा :भारतीय नृत्याचे मूळ थेट वेदकाळात जाऊन पोहोचते. इ. स. पू. ५००० वर्षे अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीतही नृत्यास स्थान होते. ह्याची साक्ष हडप्पातील विशीर्ष नर्तकाच्या व मोहें-जो- दडोतील नर्तकीच्या प्रतिकृतीवरून मिळते. दाक्षिणात्य संस्कृतीत भगवान शंकर, तर उत्तरेत भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ नर्तक व नृत्याची आराध्यदैवते मानली जातात. शंकरास ‘नटराज’ तर कृष्णास ‘नटवर’ असे संबोधले जाते. पुरातन काळी नाट्य व नृत्य ह्या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाने वापरल्या जात. या दोन्ही संज्ञांमध्ये मूळ धातू ‘नृत्’ असून त्याचा अर्थ नाचणे असाच होतो. तसेच ‘संगीत’ ही संज्ञादेखील गीत, वाद्य व नृत्य या त्रयीस मिळून वारली जात असे. म्हणूनच नाट्य व संगीतविषयक सर्व पुरातन ग्रंथांतून नृत्यविषयक विचार व विवेचन आढळते. भरतमुनींचे नाट्यशास्त्र (इ. स. पू. सु. दुसरे – इ. स. दुसरे शतक) हा या विषयावरील सर्वाधिक पुरातन ग्रंथ मानला जातो. ह्या ग्रंथांच्या पहिल्या अध्यायात ‘नाट्या’च्या उगमाची आख्यायिका आहे. देवाधिराज इंद्राच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने चार वेदांचे सार घेऊन पाचवा नाट्यवेद निर्मिला व तो भरतमुनीस देऊन त्यावर आधारित नाट्यप्रयोगाची रचना करण्याची आज्ञा दिली. गंधर्व-अप्सरांच्या मार्फत पहिला नाट्यप्रयोगात भरतमुनींनी नटराज शिवासमोर सादर केला. तेव्हा शंकराने नाट्यप्रयोगात आपल्या नृत्याचाही समावेश प्रयोगाचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्हावा, अशी सूचना भरतमुनीस केली व त्यानूसार भरतमुनीस आपला शिष्य तंडू याच्या मार्फत पौरुषयुक्त ⇨ तांडव नृत्य आणि देवी पार्वती मार्फत ‘लास्य’ हे सुकुमार नृत्य शिकविले, असे ही कथा सांगते. ह्या तांडवाचे प्रकार ‘करण’ व ‘लास्य’ या दोहोंचेही विस्तृत वर्णन नाट्यशास्त्रात आहे.

भरतनाट्यम् नृत्य

पुढे हे लास्य पार्वतीने बाणासुराची कन्या (अनिरुद्धाची पत्नी व श्रीकृष्णाची सून) उषा हीस शिकवले. उषेने हे नृत्य द्वारकेतील गोपींना व त्यांनी सौराष्ट्रातील स्त्रियांस शिकवले व तेथून इतर देशांमध्ये नृत्यकलेचा प्रसार झाला, असा उल्लेख अभिनयदर्पणभरतार्णव इ. ग्रंथांत आहे. भारतात आज प्रचलित असलेल्या सर्वच शास्त्रीय नृत्यपरंपरा नाट्यशास्त्रास मूलग्रंथ मानतात. या परंपरांचे स्वरूप पाहता नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या ‘उपरुपक’ (नृत्यनाटक) व ‘लास्य’ (अभिनयनर्तन) यांचा विविध प्रांतांत विकास होऊन या परंपरा निर्माण झाल्या, असे म्हणता येईल. नाट्यशास्त्रानंतर सोळाव्या शतकापर्यंत या विषयावर संस्कृतातून पुष्कळ ग्रंथानिर्मिती, विशेषेकरून दक्षिण भारतात झाली व त्यावरून विविध नृत्यपरंपरा कशा विकसित होत गेल्या, त्याचे स्वरूप कळू शकते. जवळजवळ सर्व भारतभर पसरलेल्या जुन्या देवळांवरील नृत्यशिल्पांमधूनही त्या त्या काळातील नृत्यपरंपरांची· प्रतिबिंबे पहावयास मिळतात.

भारतात धर्म, तत्त्वज्ञान व कला यांचे अतूट नाते आहे. जीवनात खरा आनंद अथवा मोक्ष प्राप्त करण्यासाठी धर्म, तत्त्वज्ञान व कला ही साधने मानली जात. भारतीय संतांनी काव्य, गायन व नृत्य या तिन्हींचाही सुंदर उपयोग भक्तिमार्गांच्या प्रसारासाठी केला. देवालय हे पूर्वीच्या काळी एक मोठे सांस्कृतिक केंद्र होते. गायन, वादन व नृत्य ह्या कलांचा अविष्कार येथे देवाच्या पूजेचा एक भाग म्हणून केला जात असे.

कथ्थक नृत्य

देवाश्रयाबरोबरच भारतीय नृत्यकला जोपासली गेली, ती राजाश्रयामुळे, दक्षिणेतील चेर, पांड्य, चोल, नायक, मराठे इ. सर्वच राजपरंपरा रसिक व विद्वान होत्या. त्यांनी नृत्यकलेस केवळ उदार आश्रय दिला इतकेच नव्हे, तर स्वतः कलाव्यासंग आणि कलाभ्यास करून नृत्यासाठी साहित्यरचनाही केल्या.

अभिजात नृत्यपरंपरा :आज भारतात ⇨कथ्थक नृत्य, ⇨ कथकळी नृत्य, ⇨भरतनाट्यम्‌ नृत्य व ⇨ मणिपुरी नृत्य ह्या चार मुख्य परंपरा व ⇨ ओडिसी नृत्य ⇨कुचिपूडी नृत्य व ⇨मोहिनीआट्टम्‌ ह्या भरतनाट्यम्‌शी बरेच सामर्थ्य दाखविणाऱ्या तीन उपशैली अशा एकंदर सात परंपरा, त्यांच्या प्रगत स्वरूपात नाचल्या, सादर केल्या जातात. सर्वच परंपरांचे मूळ अधिष्ठान धार्मिक होते व ते आजही तसेच टिकून आहे. रामायणमहाभारत यांतील पुराणकथा आणि राधा-कृष्ण म्हणजेच नायक-नायिका यांच्यामधील विविध प्रेमविष्कार साकार करणाऱ्या मधुराभक्तिपर रचना हे या नृत्यशैलींचे विषय असतात. सर्वच शैलींमध्ये कमीजास्त प्रमाणात ‘नृत्य’ म्हणजे शुद्ध नर्तन व ‘नृत्य’ म्हणजे ‘अभिनया’सहित नर्तन या दोहोंचाही समावेश असतो. भावाभिनयाबरोबरच शब्दार्थ दाखविण्यासाठी ‘हस्त’ वा ⇨ नृत्यमुद्रांचा वापर केला जातो, हे भारतयी नृत्यशैलीचे खास वैशिष्ट्य आहे. काव्य, अभिनय, गायन, वादन, चित्र, शिल्प इ. सर्वच कलांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संगम म्हणजे भारतीय नृत्यकला असे म्हणता येईल.

भिडे-चापेकर, सुचेता


कथकळी नृत्य

स्वरूपविवेचन : तमिळनाडूमध्ये उगम पावलेले भरतनाट्यम्‌ हा सर्वात पुरातन नृत्यप्रकार आहे. देवदासींनी ही नृत्यपरंपरा जोपासली, म्हणून त्यांस ‘दासी-आट्टम्’ अशीही संज्ञा होती. प्रामुख्याने स्त्रिया हे नृत्य करतात. तंजावरच्या नायक व भोसले राजांनी या कलेस आश्रय दिला. या नृत्यासाठी नंदिकेश्वराचे अभिनयदर्पण, शार्ङ्गदेवाचे संगीतरत्नाकरव भरताचे नाट्यशास्त्र हे संदर्भग्रंथ आधारभूत मानले जातात. यात अलारिपु, जतिस्वरम्, अनुपल्लवी, शब्दम्‌, वर्णम, जावळी व तिल्लाना हे नृत्यप्रकार केले जातात. दाक्षिणात्य संगीतपद्धती वापरली जाते. मुत्तुकुमार पिळ्ळ किट्टप्पा पिळ्ळै, चंद्रशेखर पिळ्ळै, मीनाक्षीसुंदरम्‌ पिळ्ळै हे प्रख्यात नृत्यगुरू होत.

केरळमधील कथकळी ह्या अभिजात नृत्यनाट्याचा उदय ‘कृष्ण-नाट्टम्’, ‘रामनाट्टम्’ इ. नृत्यनाट्यांतून झाला. या नृत्यातील पारंपारिक रंगभूषा वैशिष्ट्यपूर्ण असते. भावप्रकटनासाठी सांकेतिक हस्तमुद्रा वापरल्या जातात. त्यासाठी हस्तलक्षणदीपिकाह्या ग्रंथाचा आधार घेतला जातो. दाक्षिणात्य संगीतपद्धती वापरली जाते. पांचाली करुणाकर पणिक्कर, गुरू शंकरन्‌ नंपूतिरी, ⇨गोपिनाथन्, ⇨ कुंचू कुरूप, ⇨ कृष्णन् कुट्टी हे सुप्रसिद्ध नृत्यगुरू व नर्तक होत.

‘कथक’ (कथ्थक) म्हणजे नृत्यसंगीतमय कथाकीर्तनातून हरिभक्ती करणारे कीर्तनकार. कथकांचा संप्रदाय उत्तर भारतात पुरातन काळापासून अस्तित्वात होता. त्यातून उगम पावलेले व मोगलकाळात विकसित झालेले कथ्थक हे एक शास्त्रीय नृत्य होय. मूळच्या धार्मिक नृत्यास मोगलकाळात विलासी स्वरूप लाभले. या नृत्यात हिंदुस्थानी संगीतपद्धतीचा तसेच तबला, पखावज, सारंगी वा हार्मोनियम या साथीच्या वाद्यांचा वापर केला जातो. थाट, आमद, तुकडे, परमेलू, परन् आणि तत्‌कार हे नृत्ताचे आणि गत, भजन व ठुमरी हे नृत्याचे प्रकार हे कथ्थकचे प्रमुख घटक होत. कथ्थक नृत्यशैलीत लखनौ, बनारस आणि जयपूर ही चीन घराणी आहेत. अच्छनमहाराज, शंभूमहाराज, ⇨ जयलाल, लच्छूमहाराज, बिरजूमहाराज हे सुप्रसिद्ध नर्तक व नृत्यगुरू होत.

एक मणिपुरी नृत्याविष्कार

मणिपूर, त्रिपुरा, आसाम व बंगाल या प्रदेशांत रूढ असलेल्या मणिपुरी नृत्याचे ‘अंगचलन’ हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे स्त्रीपुरूषांचे समूहनृत्य आहे. गोविंद संगीत लीलाविलास हा या नृत्यसंप्रदायाचा आधारग्रंथ मानतात. या नृत्यास ‘खोल’ किंवा ‘पुंग’ नामक मृदंगसमान वाद्याची साथ असते. लायहरोबा, करताल-चोलम्, पुंग-चोलम् ही लोकनृत्ये मणिपुरी नृत्याचेच उपप्रकार आहेत. स्वरूपानंद, रसायन, अमुवी सिंग हे प्रसिद्ध नृत्यगुरू होत.

ओरिसामधील दासीनृत्य परंपरा म्हणजे ओडिसी नृत्य. या नृत्याची परंपरा मंदिरात नाचणाऱ्या देवदासी ‘महारी’ व स्त्रीवेशात नाचणारे नर्तक ‘गोटिपुआ’ यांनी जिवंत ठेवली. महेश्वर महापात्र यांनी आपल्या अभिनयचंद्रिका (बारावे शतक) या ग्रंथात ओडिसी नृत्याचे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे. मध्यंतरी हे नृत्य अस्तंगत होण्याच्या मार्गावर होते. परंतु इंद्राणी रेहमान या सुप्रसिद्ध नर्तकीने त्याचे पुनरुज्जीवन करण्यात पुढाकार घेतला. यात मंगलाचरण, पल्लवी, बाटू नृत्य, अभिनय व मोक्ष नाट हे नृत्यप्रकार सादर केले जातात. मोहन महापात्र, पद्मचरणदास, केलुचरण महापात्र आदी नृत्यगुरू प्रसिद्ध होत.

कर्नाटकमधील ⇨ यक्षगान या पारंपरिक नृत्यनाट्यप्रकारात रामायण, महाभारत, पुराणे यांतील कथांवर आधारित नृत्यनाट्ये केली जातात. त्यात दाक्षिणात्य संगीतपद्धती वापरली जाते. जोषपूर्ण तांडव नृत्यावर भर दिलेला आढळतो. कथकळीशी साधर्म्य असलेले ⇨ओट्‌टन तुळळल हा एकपात्री, मुक्त नृत्यप्रकार प्रसिद्ध मलयाळम्‌ कवी कुंचन नंप्यार यांनी प्रचारात आणला. मोहिनीआट्टम्‌ हे नृत्य केरळमध्ये रूढ आहे. ⇨ भागवत मेळा नाटक या तंजावरमधील नृत्यनाट्यात भरतनाट्यम्‌ नृत्यशैली वापरली जाते.

प्रादेशिक लोकनृत्ये : भारतात विविध प्रकारची प्रादेशिक व लोकनृत्येही प्रदीर्घ परंपरेने चालत आलेली आहेत. ही उत्स्फूर्त सामूहिक नृत्य उत्सव, सण, समारंभ, विवाहासारख्या मंगल प्रसंगी, तसेच पेरणी, कापणी यांसारख्या कृषिजीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगीही केली जातात. चिमण्यांचे दाणे टिपणे, हरिणांचे नाचणे-बागडणे, सर्प, हंसाची गती इ. पशुपक्ष्यांच्या हालचालींचे अनुकरण या नृत्यांमध्ये दिसते. तसेच पेरणी-कापणी करणे, गुरे हाकणे, नांगर चालविणे या ग्रामजीवनातील नित्याच्या क्रियाही त्यांत नृत्यबद्ध केलेल्या आढळतात. या सर्वच नृत्यांना मुळात धार्मिक अधिष्ठान असल्याचे दिसते.

भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील काही प्रमुख लोकनृत्ये अशी :

आसाममधील बिहू या उत्सवप्रसंगी ‘बिहू’ हे नृत्य करण्याचा प्रघात आहे. ‘हुकारी’ हा बिहू नृत्याचाच एक प्रकार आहे. ‘नट पूजा’, ‘वैशाख’, ‘खांबा लिम’, ‘नृइरा लिम’ ही नृत्ये वेगवेगळ्या प्रसंगी केली जातात. मिझो जमातीचे लोक ढोलकाच्या साथीवर बांबू हातात घेऊन ‘सुत्तलाम’ हे नृत्य करतात.

मणिपूरमधील ‘लायहरोबा’ हे पारंपरिक नृत्य शिव-पार्वतीच्या उपासनेचा व लीलांचा नृत्याविष्कार आहे. ⇨ रासलीला नृत्य हे कृष्णलीलांवर आधारित लोकप्रिय समूहनृत्य असून त्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. ढोलाच्या साथीने केले जाणारे ‘पुंग-चोलम्’ व करतालाच्या साथीवरचे ‘करताल-चोलम्’ ही नृत्ये ‘संकीर्तन’ या धार्मिक नृत्यगानप्रकारातून निर्माण झाली.

बंगालमध्ये ढोल व करताल या वाद्यांच्या साथीने केले जाणारे ‘कीर्तन’ हे लोकनृत्य विशेष प्रचलित आहे. ‘जात्रा’ हा नृत्यनाट्यप्रकार प्रशिक्षित कलाकारांकडून गावोगावी केला जातो. ‘गंभीरा’ हे मुखवठानृत्य, ‘रायबेश’ दोन काठ्या हातात घेऊन करावयाचे ‘काठी’ नृत्य ही लोकनृत्येही रूढ आहेत.


रासलीला नृत्याचे प्रकार उत्तर प्रदेशातही प्रचलित आहेत. ⇨ नौटंकी हा पारंपरिक नृत्यप्रकार लोकप्रिय आहे. व्यावसायिक नर्तक ही नृत्ये सादर करतात. वेगवेगळ्या जमातींत धार्मिक प्रसंगी विविध नृत्ये केली जातात. कुमाऊँ जमातीत ‘झोरा’ व ‘छपेली’ ही नृत्ये, जोनसार जमातीत ‘थाली’ हे स्त्रियांचे नृत्य, अहीर जमातीत ढोलक व झांजांच्या साथीने विवाहासारख्या प्रसंगी केले जाणारे नृत्य, चांभार जमातीत विनोदी संगीतिकेवर आधारित नृत्ये इ. लोकनृत्ये आढळतात.

पंजाबमधील ⇨ भांगडा नृत्य हे कृपिनृत्य आहे. ढोलाच्या तालावर केल्या जाणाऱ्या पुरूषांच्या ह्या नृत्यात आनंद आणि चैतन्य यांचे उत्स्फूर्त दर्शन घडते. या नृत्यात उंच उड्या, गोल गिरक्या इ. विविध हालचाली अंगविक्षेपांसह करतात. स्त्रियांचे ‘गिद्धा’ नृत्य, पुरुषांचे ‘झुमर’ नृत्य, स्त्री-पुरुषांचे ‘लाइलडी’ नृत्य ही जोषपूर्ण लोकनृत्ये आहेत.

हिमाचल प्रदेशात स्थानिक देवतेस प्रसन्न करण्यासाठी स्त्री-पुरुष ‘सांगला’ नृत्य करतात. चंबामधील ‘झांझर’ नृत्य सणाच्या प्रसंगी करतात. धनगर जमातीचे ढोलाच्या साथीवरचे स्त्री-पुरुषांचे ‘दीपक नृत्य’ आकर्षक असते.

काश्मीरमध्ये वासुकी नागाच्या जत्रेत त्याचा जयजयकार करीत ‘गद्दी’ नृत्य करण्याची प्रथा आहे. स्त्रियांचे ‘रोफ’ नृत्य, ‘हिकात’ हे तरुण मुलामुलींचे नृत्य, ‘बचनग्‌मा’ हे तरुणांचे स्त्रीवेष घेऊन करण्याचे नृत्य, फेर धरून करण्याचे ‘छज्जा’ नृत्य ही लोकनृत्ये प्रचलित आहेत.

राजस्थानातील भवाई जमातीचे गतिमान ⇨ भवाई नृत्य गावोगावी जाऊन सादर केले जाते. स्त्री-पुरुषांचे ‘घूमर’ हे धार्मिक नृत्य लोकप्रिय आहे. होळीप्रसंगीचे ‘गैर’ हे समूहनृत्य, ‘खयाल’ हा नृत्यनाट्यप्रकार, भिल्लांचे ‘गौरी’ नृत्य ही अन्य लोकनृत्ये आहेत. ‘झंकरिया’ व ‘पणिहारी’ ही लोकनृत्ये गारुडी जमातीत रूढ आहेत.

मध्य प्रदेशात गोंड जमातीमध्ये करमा या उत्सवप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा आहे. घोडकाठ्यांवरील नृत्ये वैशिष्ट्यपूर्ण असतात. ‘गौड’ हे स्त्री-पुरूषांचे नृत्य तसेच भाद्रपद महिन्यात ‘नवा राणी’, माघ व चैत्र महिन्यांत ‘देवारी’ व ‘चैतदंडा’ ही नृत्ये केली जातात. बंजारा लोकांचे ‘लोटा’ हे नृत्य व ‘लांगी’ हे वीरनृत्यही उल्लेखनीय आहेत. ‘गोंचा’ व ‘लक्ष्मीजागर’ ही अन्य काही लोकनृत्ये होत.

ओरिसातील आदिवासींमध्ये विविध प्रकारची नृत्ये प्रचलित आहेत. ‘छाऊ’ हे पैका जमातीचे पारंपरिक युद्धनृत्य, ‘पाईक’ हे शेकोटीभोवती केले जाणारे नृत्य आणि ‘किरातार्जुन’ ही नृत्ये जोषपूर्ण आहेत. देवतेच्या आराधनेसाठी ‘करमा’ व ‘जदुर’ ही नृत्ये केली जातात.

गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात केले जाणारे स्त्रियांचे ⇨गरबा नृत्य लोकप्रिय आहे. अखंडदीप लावलेला सच्छिद्र दीपगर्भघट ठेवून त्याभोवती स्त्रिया फेर धरून नाचतात. पुरुषांचे ‘गरबी’ नृत्य दसऱ्यानंतर केले जाते. ‘दांडिया रास’ हे पुरूषांचे रासलीला नृत्य आहे. यात घुंगरू लावलेल्या काठ्या हातात घेऊन ढोल व सनईच्या साथीने नाचतात. शेतकऱ्यांचे ‘कुछाडी’ नृत्य, सौराष्ट्रातील कोळ्यांचे ‘पांघर’ नृत्य, स्त्रियांचे ‘टिपणी’ ही नृत्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

आंध्र प्रदेशातील वजारी जमातीत होळीच्या वेळी मदन व रती यांच्या मातीच्या मूर्तीभोवती आकर्षक नृत्य करतात. ‘डप्पू’ हे वाद्य लहान काठ्यांनी वाजवून त्याच्या तालावरही पुरुष नृत्य करतात. ग्रामदेवतेला रेड्याचा बळी दिल्यानंतर त्याच्याभोवती फेर धरून नाचण्याची आदिवासींमध्ये प्रथा आहे. ‘मथुरी’ हे स्त्री-पुरूषांचे नृत्य उल्लेखनीय आहे. स्त्रियांचे ‘बतकम्मा’ हे व स्त्री-पुरुषांचे ‘माधुरी’ ही नृत्ये उत्सवप्रसंगी केली जातात.

तमिळनाडूमधील भरतनाट्यम्‌ या अभिजात नृत्याकडे झुकणारे ‘कुरवंजी’ हे डोंगराळ प्रदेशातील कुराती जमातीचे पारंपारिक लोकनृत्य येथे प्रचलित आहे. ‘करगम्’ हे मरिअम्माचे पूजानृत्य फुलांनी सजवलेले पितळी हंडे डोक्यावर ठेवून तुतारी व ढोल यांच्या तालावर केले जाते. मंदिराच्या आवारात उत्सवप्रसंगी एका हातात रुमाल व दुसऱ्या हातात टिपरी घेऊन पुरुष ‘ओइलाट्टम्’ नृत्य करतात. उत्सवप्रसंगी ‘कुम्मी’ हे नृत्य मुली गोलाकार फेर धरून करतात. स्त्रिया टिपऱ्या हातात घेऊन ‘कोलाट्टम्’ नृत्य करतात. ‘पिन्नल कोलाट्टम्’ हे सामुदायिक गोफ-नृत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. भटक्या पारधी जमातीच्या ‘चिंडू’ या नृत्यात चिमण्या पकडण्याचा अभिनय करतात. लाकडी घोड्याचे तोंड लावलेली काठी दोन पायांमध्ये घेऊन करावयाचे ‘अश्वनृत्य’ आदिवासींमध्ये प्रचलित आहे.

‘भूतकोला’ हे भीतिदायक नृत्य दक्षिण कर्नाटकमध्ये प्रचलित आहे. त्या विशिष्ट देवतेचा पुजारी हे नृत्य करतो. ‘प्रेत’ हे तलवार हातात घेऊन करण्यात येणारे नृत्यही भीतिदायक असते. ‘बलाकाट’ हे नृत्य रंगीबेरंगी पोशाख घालून सुगीच्या वेळी केले जाते. ‘करगा’ हे धार्मिक प्रसंगी केले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आहे.

केरळमध्ये ‘कोलकळी’ हे नृत्य मोपला मुसलमान करतात. मध्यभागी उंच समई ठेऊन त्याभोवती हातात दांडकी घेऊन फेर धरतात. ‘भद्रकाळी’ हे धार्मिक नृत्य मंदिरात करतात. ‘काईकोट्टिकळी’ हे नृत्य मुली ओणम् सणाच्या प्रसंगी करतात. नायर लोक पद्मनाम स्वामींच्या उत्सवप्रसंगी ‘वेलकळी’ हे युद्धनृत्य करतात. ‘काळीयाट्टम्’ हे धार्मिक नृत्य संघ व द्रुत लयींत केले जाते.

महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्याजवळील भागात ⇨कोळी नृत्याचे विविध प्रकार रुढ आहेत. नागर व ग्रामीण समाजात लोकप्रिय असलेल्या टिपरी व ⇨लेझीम ह्या तालबद्ध खेळांची गणना सांकेतिक अर्थाने नृत्यातही करता येईल. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या व संतांच्या पालखीपुढे वारकरी भजने म्हणत नाचत जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी लहान व तरुण मुले नाचत हिंडतात व मानवी मनोरा रचून त्यावर लहान मुलास चढवून उंच बांधलेली दहीहंडी फोडतात. दशावतारी तसेच ⇨तमाशा ही पारंपरिक नृत्यनाट्ये ग्रामीण समाजात फार लोकप्रिय आहेत. ⇨ लावणी नृत्य हे तमाशाचे खास आकर्षण म्हणता येईल. ⇨ फुगडी, पिंगा, आगोटापागोटा, कोंबडा हे स्त्रियांचे पारंपरिक नृत्यप्रकार विशेषत्वाने रूढ आहेत.


आधुनिक काळ : भारतात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच नृत्यकला राजाश्रयाकडून लोकाश्रयाकडे वळली. संस्थानिक व राजे यांच्या दरबाराऐवजी ती रंगमंचावर प्रेक्षकांपुढे सादर केली जाऊ लागली. त्यामुळे आधुनिक काळात सामान्य माणसालाही भारतीय अभिजात नृत्यकलेची ओळख झाली. अभिजीत नृत्यकलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न या काळात विशेषत्वाने झाले. ⇨रवींद्रनाथ टागोर, ⇨रूक्मिणीदेवी ॲरंडेल, ⇨मेनका, ⇨वळ्ळत्तोळ नारायण मेनन, ⇨ उदय शंकर इ. नामवंत व्यक्तींनी नृत्यशिक्षणकेंद्रे उभारली. महाकवी पळ्ळत्तोळ यांनी कथकळीच्या शिक्षणासाठी उभारलेले ‘केरल कला मंडलम्’ (१९३०) रूक्मिणीदेवी ॲरंडेल यांचे अड्यार येथील ‘कलाक्षेत्र’ (१९३६) मेनका या नर्तकीने खंडाळा येथे स्थापन केलेली नृत्यशाळा (१९३८) हि काही महत्वाची नृत्यशिक्षणकेंद्रे होत. अभिजात नृत्याबाबत स्वातंत्र्योत्तर काळात झालेला महत्वाचा बदल म्हणजे या परंपरा विशिष्ट प्रांतापुरत्या मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने भारतीय बनल्या आहेत. या सर्व शैली सर्व भारतभर पाहण्यास आणि शिकण्यास उपलब्ध झाल्यामुळे प्रांता-प्रांतातील सांस्कृतीक देवाणघेवाण व एकात्मता वाढण्यास मोठाच हातभार लागला आहे.

प्रख्यात नर्तक उदय शंकर यांनी आधुनिक भारतीय नृत्याचा परिचय पाश्चिमात्य जगास करून दिला. अतिपूर्वेकडील नृत्ये, भारतीय अभिजात नृत्यकला, भारतीय लोकनृत्ये तसेच पश्चिमी बॅले यांच्या अभ्यासातून त्यांनी स्वतःची वेगळीच नृत्यशैली निर्माण केली. लेबर अँड मशिनरीद ऱ्हिदम ऑफ लाइफ यासारखी आधुनिक नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली. अलमोडा येथे ‘इंडिया कल्चर सेंटर’ स्थापन करून (१९३८) नृत्यशिक्षणाची सोय केली. प्रयोगशीलता व नावीन्यपूर्ण कल्पना यांद्वारे भारतीय नृत्याला समृद्ध करण्याची त्यांची कामगिरी महत्वाची आहे.

आधुनिक काळात ⇨बॅले हा नृत्यनाट्यप्रकार भारतात विशेषत्वाने लोकमान्यता पावत असल्याचे दिसून येते. उदय शंकर यांच्याप्रमाणे मेनका यांची कृष्णलीला, मेनकालास्यम्मालविकाग्निमित्रम्, ही नृत्यनाट्ये कृष्णन् कुट्टींची फॉल्स प्राइड, द टेरिबल वून, बर्थ ऑफ आवर नेशन शांतिवर्धन यांची रामायण इन पपेट, मेघदूतडिस्कव्हरी ऑफ इंडिया पार्वतीकुमार यांची देख तेरी बम्बईडिस्कव्हरी ऑफ इंडिया, सचिन शंकर यांची शिवपार्वती, रामायण, शिवाजी, सुरेंद्र वडगावकर, यांचे तुकाराम ही नृत्यनाट्ये स्वातंत्र्य काळात व उत्तर काळात सादर केली गेली. उदय शंकर यांचा कलकत्ता येथील ‘डान्स सेंटर’, ग्वाल्हेर येथील ‘रंगश्री लिटल बॅले ट्रूप’ सचिन शंकर यांचे ‘बॅले सेंटर’, मुंबई दिल्ली येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉरिओग्राफी’, ‘भारतीय कला केंद्र’, ‘नाट्य बॅले सेंटर’ इ. नृत्यसंस्थांमध्ये बॅलेचे-भारतीय नृत्यशैलींवर आधारीत नृत्यनाट्यांचे-शिक्षण दिले जाते.

शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी १९२६ साली मुलींसाठी नृत्यशिक्षण सुरू केले. मुलींचे ‘नटीर पूजा’ हे नृत्यनाट्य त्यांनी कलकत्ता येथे सादर केले. मणिपुरी नृत्य, कथकळी नृत्य आणि काही लोकनृत्यांच्या संयोगातून त्यांनी शांतिनिकेतन नृत्यशैली निर्माण केली. नृत्यकलेची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी विशेषत्वाने प्रयत्न केले. पौराणिक कथांवर आधारलेली  चित्रांगदा, श्यामा आणि चंडलिका ही प्रसिद्ध नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली. [→ शांतिनिकेतन नृत्यसंप्रदाय].

आधुनिक काळातील ⇨यामिनी कृष्णमूर्ती, पद्मा सुब्रह्मण्यम्, सुचेता भिडे-चापेकर, ⇨ राम गोपाल, शांता राव, कमला इ. भरतनाट्यम्‌ नर्तक-नर्तकी प्रसिद्ध आहेत. दमयंती जोशी, गोपीकृष्ण, सितारादेवी, रोशन कुमारी, रोहिणी भाटे इ. कथ्थक नृत्यपरंपरेतील नामवंत नर्तक-नर्तकी होत. कथकळीमध्ये पांचाली करुणाकर पणिक्कर, कृष्णन कुट्टी हे नर्तक प्रसिद्ध आहेत. मणिपुरी नृत्यपरंपरेत सविता मेहता, झवेरी भगिनी इ. तर मोहिनीआट्टम्‌मध्ये कल्याणी अम्मा, कनक रेळे इ. ओडिसीमध्ये संयुक्ता पाणिग्रही, सोनल मानसिंग या नर्तकी आणि कूचिपूडीमध्ये श्री वेदांत सत्यम्, वेम्पटी चिन्नम्‌ सत्यम्, कोराडा नरसिंहराव यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

भरतनाट्यम्‌चे शिक्षण देणाऱ्या प्रमुख नृत्यसंस्थांमध्ये ⇨ बालासरस्वती यांचे ‘क्लासिकल भरतनाट्यम् स्कूल’ (मद्रास), ⇨ मृणालिनी साराभाई यांची ‘दर्पण’ नृत्यसंस्था (अहमदाबाद), कुप्पय्या पिळ्ळै यांचे ‘श्री राजराजेश्वरी भरतनाट्य कला मंदिर’ (मुंबई), वैजयंतीमालाची ‘नाट्यालय’ ही संस्था (मुंबई-मद्रास), ‘त्रिवेणी’ नृत्यसंस्था (दिल्ली) आदींचा उल्लेख करता येईल. अलवाये येथील ‘उद्योगमंडल’, कोटाकल येथील ‘पी. एस्. व्ही. नाट्यसंघम्’, दिल्लीतील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कथकळी’ या कथकळी नृत्याचे शिक्षण देणाऱ्या भारतातील मान्यवर संस्था आहेत. दिल्लीतील ‘कथक केंद्र’ ही संस्था १९६९ पासून ‘संगीत नाटक अकादमी’ तर्फे चालवली जाते. ‘गांधर्व महाविद्यालय’, दिल्ली ‘भातखंडे संगीत विद्यापीठ’, लखनौ ‘भारतीय विद्या भवन’, मुंबई ‘नृत्यभारती’ पुणे आणि मुंबई ‘कदंब’, अहमदाबाद या कथ्थक नृत्याचे शिक्षण देणाऱ्या अन्य प्रमु्ख संस्था होत. ‘संगीत नाटक अकादमी’ तर्फे चालवली जाणारी इंफाळमधील ‘जवाहरलाल नेहरू मणिपुरी डान्स अकॅडमी’, तसेच ‘गोविंदजी नर्तनालय’ या मणिपुरी नृत्यशिक्षण देणाऱ्या देशातील प्रमुख संस्था आहेत. ‘डान्स सेंटर’, कलकत्ता ‘परिमल’ अकादमी, मुंबई आणि ‘त्रिवेणी’ दिल्ली येथेही मणिपुरी नृत्याचे शिक्षण दिले जाते. मद्रास येथील ‘कूचिपूडी आर्ट अकॅडमी’ व कूचिपूडी येथील ‘ सिद्धेंद्र कलाक्षेत्र’ हैदराबाद येथील ‘नृत्यशिखर’ ही कूचिपूडी नृत्यशिक्षण देणारी महत्वाची केंद्रे आहेत. ओडिसी नृत्याचा शिक्षण ‘कला विकास केंद्र’, कटक ‘कॉलेज ऑफ डान्स अँड म्युझिक’, भुवनेश्वर व दिल्ली येथील ‘नृत्यनिकेतन’, ‘त्रिवेणी’, ‘भारतीय कला केंद्र’ या संस्थांमध्ये दिले जाते.

स्वातंत्र्यानंतर शासकीय पातळीवरही नृत्यकलेस उत्तेजन देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले. प्रजासत्ताक दिनी प्रसिद्ध नर्तक-नर्तकींना सन्मान्य किताब देऊन त्यांचा गौरव केला जातो. परदेशी जाणाऱ्या सांस्कृतिक शिष्टमंडळांमध्ये नृत्यकलाकारांचा आवर्जून समावेश केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे विविध प्रांतांची प्रादेशिक व लोकनृत्ये सादर केली जातात. त्यांतील उत्कृष्ट नृत्यप्रयोग करणाऱ्या नृत्यसंचांना पारितोषिके दिली जातात. तसेच संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांना दरमहा ३५० रुपयांचा एकूण ५० शिष्यवृत्या दिल्या जातात. ‘संगीत नाटक अकादमी’तर्फे संगीत-नृत्य-नाटक यांचे महोत्सव भरवले जातात. तसेच नृत्यस्पर्धाही आयोजीत केल्या जातात. त्यांतील यशस्वी नर्तक-नर्तकींना पारितोषिके दिली जातात. नृत्यशिक्षणसंस्थांना तसेच नृत्यगुरूंना आर्थिक साहाय्य दिले जाते. नृत्याच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. १९५५ साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य महोत्सवातून ओडिसी, कूचिपूडी यांसारख्या अभिजात नृत्यांचा तसेच आसामच्या छाऊसारख्या लोकनृत्यांचा प्रेक्षकांना सुरेख परिचय करून देण्यात आला. त्यानंतर १९७० व ७१ मध्ये दिल्ली येथे संगीत-नृत्य महोत्सव भरवण्यात आले, त्यांत नामवंतांबरोबरच नवोदित नर्तकनर्तकींनीही भाग घेतला होता. दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या नवव्या आशियाई क्रीडा सामन्यांच्या उद्‌घाटन आणि समारोप सोहळ्यांच्या प्रसंगी जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, त्यांतून विविध प्रदेशांची प्रातिनिधिक वैशिष्ट्यपूर्ण नृत्ये सादर करण्यात आली. दूरदर्शनवर दर आठवड्याला सादर होणाऱ्या संगीत- नृत्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात अनेक ख्यातनाम व कलानिपूण नर्तक-नर्तकींनी आपली हजेरी लावली आहे. [→ नृत्य लोकनृत्य].

जगताप, नंदा