-कला-

भारताच्या सांस्कृतिक जीवनात विविध ललित कला, क्रीडा व रंजनप्रकार यांना पूर्वापार प्रदीर्घ परंपरा असल्याचे दिसून येते. ह्या परंपरेचा थोडक्यात मागोवा घेऊन या कलांचा व रंजनप्रकारांचा स्थूल परिचय येथे करून दिला आहे.

चित्रकला व मूर्तिकला : भारतात सु. चवथ्या-पाचव्या शतकांपासून लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथांत चित्रकलेच्या व इतर कलांच्या शास्त्रांचा उल्लेख आहे. तसेच भगवती सूत्र या जैन ग्रंथातही चित्रकलेचा निर्देश आढळतो. शिवाय आठव्या शतकातील कुवलयमाला या जैन ग्रंथात चित्रावरून नीतितत्त्वे कथन करणाऱ्या गुरूंचे वर्णन आहे. तथापि सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या विष्णुधर्मोत्तर पुराणात ‘चित्रसूत्र’ नावाचा अध्याय असून तो केवळ चित्रकलेच्या शास्त्रावर लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे बाराव्या शतकातील अभिलषितार्थ चिंतामणिऊर्फ मानसोल्लास यातही चित्रकलेच्या शास्त्राचे वर्णन आहे. चित्रकलेप्रमाणे मूर्तिकलेच्या शास्त्राचाही ऊहापोह काही जुन्या ग्रंथांत आहे. ते ग्रंथ म्हणजे सोळाव्या शतकातील शिल्परत्न व नादशिल्पसमरांगणसूत्रधार या ग्रंथात स्थापत्यकलेविषयीचे संकेत वर्णिलेले आहेत. शिल्पशास्त्राच्या व्याप्तीची माहिती भृगुसंहितेत दिलेली आहे. शिल्पावर एकंदर अठरा संहिता आहेत, असे मत्स्यपुराणात सांगितले आहे. भृगू, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्मा, कुमार, नदीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र व बृहस्पती असे अठरा शिल्पसंहिताकार असल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. याशिवाय सरस्वतिशिल्प व प्रजापतिशिल्प हेही ग्रंथ शिल्प आणि स्थापत्य या शास्त्रांवर आधारलेले आहेत. कालिदास, भवभूती, भास इ. कवींनीही आपल्या कलाकृतींत चित्रकलेचा उल्लेख केला आहे.

'राधाकृष्णाचे आदर्श प्रसाधन', कांग्रा चित्रशैली, १७८०-१८००

या ग्रंथांतून भारतीय चित्र-शिल्प-स्थापत्य या कलांविषयीची तात्विक व तांत्रिक भूमिका स्पष्ट होते. चित्रकलाशास्त्राची सहा अंगे सांगितलेली आहेत. त्यांस ‘षडांग’ असे म्हणतात. चित्रांचे प्रकार सत्य, वैनिक, नागर व मिश्र असे सांगितले आहेत. रसशास्त्राचाही ऊहापोह केलेला आढळतो. शिल्पशास्त्रात मूर्तीच्या संकल्पनेविषयीच्या संहिता दिलेल्या आहेत. स्थान, आसन, आयुध, वाहन या विषयींच्या संकेतांनुसार मूर्तिशिल्पाचे शास्त्र बसविलेले आहे. प्रतिमासंकल्पनेकरिता तालमानपद्धतीचा ऊहापोह केलेला आहे. भारतीय चित्रकलेच्या संदर्भात भित्तिचित्रांचा इतिहास जुना आहे. इ. स. पू.२०० वर्षांपासून रंगविलेली भित्तिचित्रे ⇨अजिंठ्याच्या गुंफांत आढळतात. सातवाहन, गुप्त व वाकाटक या काळात अजिंठ्यातील चित्रे रंगविली गेली. सहाव्या शतकापर्यंत ही चित्रे रंगविली जात होती. सातव्या शतकातील चालुक्य वंशातील ⇨बादामी येथे, आठव्या शतकात सित्तन्नवासल येथील जैन भित्तिचित्रे, राष्ट्रकुटांच्या काळातील ⇨वेरूळ येथील, आठव्या ते दहाव्या शतकांतील हिंदू व जैन भित्तिचित्रे आजही काही प्रमाणात पहावयास मिळतात. याशिवाय लेपाक्षी येथील चौदाव्या व सतराव्या शतकांतील भित्तिचित्रे, चिदंबरम् येथील सतराव्या व अठराव्या शतकांतील चित्रे, कोचीनमधील त्रिचूर मंदिरातील सोळाव्या व अठराव्या शतकांतील चित्रे इतिहासात नमूद झाली आहेत. महाराष्ट्रात वाई व मेणवली येथील अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील मोतीबाग व नाना फडणीस यांच्या वाड्यातील भित्तिचित्रे उल्लेखनीय आहेत.

'शकुंतला' (१८९८) - राजा रविवर्मा

भारतीय चित्रकलेची विविधता हस्तलिखितांतूनही प्रगट होते. अकरा ते तेराव्या शतकांतील भूर्जपत्रावरील वा ताडपत्रावरील जैन चित्रे, त्याचप्रमाणे सोळाव्या शतकापर्यंत निर्माण झालेली जैन हस्तलिखिते सचित्र आहेत. मुसलमानी अंमलात पर्शियन हस्तिलिखितांचा प्रभाव पडला व त्यानंतर हिंदु हस्तलिखितांतही प्रगल्भता व विविधता वाढत गेली. विशेषतः श्रीमद्‌भागवतरामायण ही दक्षिणी धाटणीची हस्तलिखिते वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

भित्तिचित्रे, पटचित्रे, हस्तलिखितातील चित्रे या चित्रप्रवाहांनंतरचा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे ⇨लघुचित्रणाचा होय. उत्तरेत बाबर बादशाहने सोळव्या शतकात पर्शियन कलाकारांना भारतात आणले व नव्या चित्रशाळा वसविल्या. या चित्रशैलीस मोगल चित्रशैली म्हणतात [→ मोगल कला]. या शैलीचे मुख्यत्वे दोन उपप्रवाह होत : दिल्ली आणि दख्खनी. दिल्ली शैली मोगल बादशाहांनी जोपासली. मोगल शैलीतील महत्त्वपूर्ण चित्रपद्धती हम्जानामा व अकबरनामा या ग्रंथांत दिसतात. अकबरास हिंदू धर्मात रस निर्माण झाल्यामुळे त्याने अनेक हिंदू कलाकारांना आश्रय दिला. जहांगीरच्या काळात व्यक्तिचित्रे, राजदरबाराची चित्रे, निसर्गाचित्रे यांवर भर होता, तर शाहजहानच्या काळात स्थापत्य व राजवैभवदर्शक चित्रे रंगविली जात. औरंगजेबाच्या काळात चित्रकलेस आश्रय मिळाला नाही व पुढे मोगल चित्रकलेतील दिल्ली शैली क्षीण होत गेली. दख्खनी चित्रशैली अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा येथील इस्लामी राजांनी पदरी ठेवलेल्या तुर्कस्तानी कलाकारांनी निर्माण केली. येथेही सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हा कलाप्रवाह अस्तित्वात होता [→ दख्खन कला]. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत हैदराबाद, औरंगाबाद, पुणे, सातारा, नागपूर, कुर्नूल इ. ठिकाणीही चित्रनिर्मिती झाली.

लघुचित्रांचा दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे राजपूत शैली होय. [→ राजपूत चित्रकला]. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांत घडत गेलेली ही शैली मुख्यत्वे समाजाभिमुख होती. चित्रविषय जनसामान्यांना रुचणारे होते. कृष्णलीला, रामायण, गीतगोविंद इ. ग्रंथांवर आधारित तसेच अष्टनायिका, रागमाला, बारामास, पुराणकथा इ. विषयांवर आधारित चित्रनिर्मिती या शैलीत झाली. या शैलीचे प्रमुख प्रकार दोन : राजस्थानी व ⇨ पहाडी चित्रशैली. पहाडीमध्ये ⇨बसोली चित्रशैली आणि ⇨कांग्रा चित्रशैली असे पुन्हा दोन उपप्रवाह पडतात. राजस्थानी शैलीत मेवाड ⇨बुंदी चित्रशैली, कोटा, माळवा, बिकानेर, मारवाड, अंबर, ⇨ किशनगढ चित्रशैली, नाथद्वारा इ. उपप्रकार दिसतात तर बसोलीमध्ये बसोली, बिलासपूर, मानकोट, कुलू, जसरोटा इ. आणि कांग्रामध्ये कांग्रा, जम्मू, गुलेर, गढवाल इ. उपप्रकार दिसून येतात.


मूर्तिकलेची निर्मिती धर्म-पंथादी धार्मिक बाबींवर अधिष्ठित होती. त्यात एक प्रकारे सातत्य असल्याचेही दिसून येते. कारण बहुधा प्रत्येक शतकात मंदिरे बांधली जात होती आणि पाषाणाच्या तसेच बाँझच्या ओतीव मूर्ती घडवल्या जात होत्या. दक्षिणेतील चोल वंशकाळातील धातूच्या मूर्ती अप्रतिम आहेत. त्यांपैकी ⇨ नटराजाची मूर्ती तर विश्वविख्यात आहे.

उत्तरेत औरंगाजेबाच्या काळापासून कलेला उतरती कळा लागली. कलावंत परागंदा झाले. त्यानंतर हळूहळू ब्रिटिशांचे आक्रमण सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभावाने नवी ‘कंपनी शैली’ निर्माण झाली. या प्रभावातून वास्तववादी व आभासात्मक चित्रे काढण्याची नवी प्रथा रुजू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पारंपरिक कला जवळजवळ नष्टप्राय झाली. इंग्रजांनी पाश्चात्य धाटणीची कला भारतात शिकविण्यासाठी व प्रसृत करण्यासाठी मद्रास (१८५३), कलकत्ता (१८५६), मुंबई (१८५७) तसेच लाहोर (१८५८) येथे कलाविद्यालये निर्माण केली. या सर्व कलाविद्यालयांत मुंबईची ⇨ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही संस्था अग्रेसर गणली जात होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळेपर्यंत या कलाशाळेचे संचालक ब्रिटिश होते.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पाश्चात्त्य चित्रशिल्पशैलीचा पाया भारतात दृढ झाला. याच सुमारास थिओडोर जेन्सनकडे प्राथमिक धडे घेऊन राजा ⇨रविवर्मा याने देवादिकांची चित्रे रंगविण्याची नवी शैली निर्माण केली. विशेषतः त्याने आपल्या चित्रांच्या शिलामुद्रित प्रतिकृती करण्यासाठी मळवली येथे कार्यशाळा निर्माण केली. त्या कलाकृती घरोघरी पोहोचल्या व त्यायोगे कला जनसामान्यांमध्ये प्रसृत झाली. याच काळात जॉन रस्किन, रॉजर फ्राय, वेस्टमकट, सर विल्यम्स, जॉर्ज बर्डवुड व व्हिन्सेन्ट स्मिथ या इंग्रज कलासमीक्षकांनी भारतीय पारंपरिक चित्रशिल्पशैलीवर प्रखर टीका केली व कलेच्या क्षेत्रातून ही चित्रपद्धती रद्दबातल ठरवली. परंतु ई. बी. हॅवेल, कुमारस्वामी, भगिनी निवेदिता, अरविंद घोष या विद्वानांनी त्यांच्या टीकेस चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय कलापरंपरेची महनीयता पुन्हा ठासून प्रतिपादन केली. १९०३ साली दिल्ली येथे भारतीय कलापरंपरेतील चित्रशिल्पांचे एक अभूतपूर्व प्रदर्शन झाले व भारतीय कलेतील विविधता जगासमोर आली. त्यात ⇨ गणपतराव म्हात्रे या शिल्पकाराचा गौरव झाला. त्यांची मंदिरपथगामिनी व शबरी ही दोन शिल्पे बक्षिसपात्र ठरली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बंगालमध्ये भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करण्याची लाट आली. ⇨ अवनींद्रनाथ टागोर, विनोदविहारी मुखर्जी इत्यादींनी नवी चित्रशैली निर्माण केली. पुढे ⇨नंदलाल बोस यांनी त्याचा पाठपुरावा केला. ⇨रविंद्रनाथ टागोर यांनी ‘विचित्र’ नावाची कार्यशाळा स्थापन केली व अनेक क्षेत्रातील कलावंत जमा केले. या घटनेचा प्रभाव मुंबईच्या कलाशाळेवर पडला. जे. जे. स्कूलचे संचालक ग्लॅडस्टन सॉलोमन प्रभावित झाले व त्यांनी भारतीय भित्तिचित्र-परंपरेचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र वर्ग काढला. नगरकर, चिमुलकर, जगन्नाथ अहिवासी हे त्या परंपरेतील प्रमुख चित्रकार होत. वास्तववादी कलाशैलीही प्रचारात होतीच. हळदणकर, आबालाल रहिमान, त्रिंदाद, धुरंधर, आगासकर, देऊसकर, आचरेकर हे या कलाशाखेचे काही प्रमुख कलावंत होत.

सॉलोमननंतर (१९३६) जे. जे. स्कूलच्या संचालकपदी जेरार्ड यांची नियुक्ती झाली व त्यांनी पुनश्च पाश्चात्त्य व कलेची नवी तंत्रे शिकवण्यास सुरुवात केली. याच सुमारास पाश्चात्य व भारतीय कलेचा संगम साधणारी नवी चित्रशैली ⇨ अमृता शेरगिल या चित्रकत्रींने सादर केली व तरुण कलावंत या शैलीने प्रभावित झाले. १९४७ साली भारतास स्वातंत्र्य मिळाले व प्रथमच व्ही. एस्. अडूरकर या भारतीय कलावंताची जे. जे. कलाशाळेचे संचालक म्हणून नेमणूक झाली. कलानिर्मितीत मात्र पाश्चात्त्य आधुनिक कलेचा प्रभाव अपरिहार्यपणे वाढतच राहिला.

मुंबई शासनाने हंसा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली एका समितीची नेमणूक करून कलाशिक्षणाचा सुधारित अभ्यासक्रम सुरू केला. १९५७ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टला शंभर वर्षे पूर्ण झाली. १९५८ साली या कलाशाळेचे तीन विभाग करून तीन स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात आल्या. तथापि कलाशिक्षणामध्ये पुन्हा एकसूत्रता आणण्यासाठी १९६५ साली कलासंचालनालयाची स्थापना करण्यात आली व कलाशिक्षण आणि कलाविषयक उपक्रम पु्न्हा एका छत्राखाली आणण्यात आले.

'ब्राइड्‌स टॉयलेट' (१९३७) - अमृता शेरगिल

कलाशिक्षणात विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम प्रथम बडोदे येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात १९६० साली सुरू झाली. तत्पूर्वी १९४८ साली अखिल भारतीय तांत्रिक कला-अभ्यास-मंडळाची स्थापन झाली. कलावंतांना प्रकाशात आणण्याच्या व त्यांना लोकाश्रय प्राप्त करून देण्याच्या संदर्भात १८८८ साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या ⇨बाँबे आर्ट सोसायटीने मोलाची कामगिरी केली. या सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक मिळविणे, हा फार मोठा बहुमान समजला जाई. अनेक गुणी कलावंतांना या सोसायटीने जगापुढे आणले. कालांतराने कलकत्ता, हैदराबाद व अन्य ठिकाणी अशा संस्था निघाल्या. १९५४ साली दिल्ली येथे ⇨ललित कला अकादमीची स्थापना झाली व राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन होऊ लागली. १९५६ साली मुंबई सरकराने व्यापक पातळीवर राज्य कला प्रदर्शनाची योजना आखली. बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक कलावंत व कारागिरांपर्यंत सर्वांना त्यायोगे संधी प्राप्त झाली. दिल्लीमध्ये १९५५ साली ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ या राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना झाली. तीमध्ये देशातील प्रथितयश कलावंतांच्या कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. त्रैवार्षिक आंतररष्ट्रीय प्रदर्शनाची योजनाही १९६९ मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून त्यायोगे अन्य देशांतील कलावंतांच्या अद्ययावत कलाकृती भारतीयांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १९८१ पर्यंत अशी पाच त्रैवार्षिक प्रदर्शने भरवण्यात आली. १९८१ साली भोपाळ येथे ‘भारत भवन’ नावाची एक भव्य संस्था स्थापन झाली असून, तीत विविध स्तरांवरील कलाकृती संगृहीत करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नंदलाल बोस, शैलोज मुखर्जी, ⇨जामिनी राय, पणिक्कर, अहिवासी, विनोदबिहारी मुखर्जी, ⇨ना. श्री. बेंद्रे, अमृता शेरगिल इ. चित्रकार आणि गणपतराव म्हात्रे, ⇨वि. पां. करमरकर, कामत, पाणसरे, धनराज भगत, शंखो चौधरी, ⇨देवीप्रसाद राय चौधरी इ. मूर्तिकार यांनी कलारसिकांवर छाप पाडली. स्वातंत्र्योत्तर काळात ⇨चावडा, ⇨हेब्बर, के. एस्. कुलकर्णी, पी. टी. रेड्डी, पळशीकर, कन्वल कृष्ण इत्यादींनी नवी शैली निर्माण केली. १९४८ साली नव्या दमाच्या तरुण चित्रकारांनी ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’ हा प्रागतिक संघ स्थापन केला. रझा, आरा, ⇨हुसेन, बाक्रे, गायतोंडे यांचा त्यात समावेश होता त्यानंतर १९५४ साली ‘बाँबे ग्रुप’ची स्थापना झाली. त्यात हेब्बर, चावडा, सामंत, गाडे, कुलकर्णी, सडवेलकर हे प्रमुख सभासद होते. १९६० नंतर अनेक नवे चित्रकार उदयास आले व प्रत्येकाने आपापला वेगळा व स्वतंत्र ढंग निर्माण केला. चित्रकारांमध्ये राम कुमार, गायतोंडे, तय्यब मेहता, कृष्ण खन्ना, हर क्रिशन लाल, अंबादास, बाबुराव सडवेलकर, रामचंद्रन्, पिराजी सागर, स्वामिनाथन्, आलमेलकर, जी. आर्. संतोष, ज्योती भट्ट, जेराम पटेल, अकबर पदमसी, भूपेन खखर, सतीश गुजराल इ. व मूर्तिकारांमध्ये दाविएरवाला, नागजी पटेल, वी. विठ्ठल, खजुरिया, रमेश पटेरिया, प्रदोष दासगुप्ता, जानकीराम, नंदगोपाल, अमरनाथ सैगल, बलवीरसिंग कट, शिवसिंग इ. उल्लेखनीय आहेत. स्त्री कलावंतांमध्ये नसरीन महंमदी, पिलू पोचखानवाला, बी. प्रभा, प्रफुल्ला डहाणूकर, नलिनी मलानी इत्यादींनी लौकिक संपादन केला आहे. या सर्व कलावंतांनी स्वतःची अशी विशिष्ट शैली निर्माण केली आहे. [→ भारतीय कला].

सडवेलकर, बाबुराव


पार्श्वनाथ मंदिर, खजुराहो.

वास्तुकला : भारतीय वास्तुकलेला सु. ५,००० वर्षांची समृद्ध व वैविध्यपूर्ण परंपरा आहे. प्राचीनतम आद्य वास्तु-अवशेष सिंधू संस्कृतीतील (इ.स.पू. ३००० ते १५००) मोहें-जो-दडो, हडप्पा, कालिबंगा, लोथल इ. ठिकाणच्या उत्खननात पाहावयास मिळतात. नगरसंरक्षण, धान्यकोठारे, गृहरचना, पाण्याची कुंडे, शिवाय जहाजासाठी प्रचंड गोदी वगैरेंचा त्यात अंतर्भाव होते. नगररचनेची सुसंबद्ध आणखी, भूमिगत गटारे व काही दुमजली गृहरचना ही या संस्कृतीची वास्तुवैशिष्ट्ये होत. वैदिक संस्कृतिकाळात (इ. स. पृ. १५००) नदीच्या खोऱ्यात ग्रामे उभारण्यास प्रारंभ झाला. त्यात झोपड्या व त्यासभोवती बाहेर काष्ठकुंपणे उभारली जात. येथेच काष्ठवास्तुशैली उगम पावली व कालौघात विकसित झाली. प्रवेशद्वार किंवा तोरण हा काष्ठशिल्पाचा अविभाज्य दर्शनी घटक ठरला. त्या काळी सुतार हाच वास्तुरचनाकार्यात पुढाकार घेत असल्याने वैदिक संस्कृतीत त्यास मानने स्थान असल्याचे ॠग्वेदातील निर्देशांवरून दिसून येते. वास्तूचे आकारसौष्ठव, जुळणी, रचनात्मकता, कोरीव अलंकरण या शाखांमध्ये तत्कालीन वास्तुशिल्पज्ञांनी काष्ठमाध्यमाचा वापर अत्यंत कौशल्याने व प्रभावीपणे केल्याचे दिसून येते. बौद्ध वास्तुशैलीचा आद्य आविष्कार मौर्य काळामध्ये (इ.स.पू. ३२१- इ.स.पू. १८५) पाहावयास मिळतो. या काळातील वास्तूंचे सुस्थित ठळक अवशेष उपलब्ध असले, तरी या साम्राज्याचा व्याप लक्षात घेता, त्यांचे प्रमाण अल्पच म्हणावे लागेल. त्यात सांची येथील स्तूपसमूह, पाटलिपुत्र येथील राजप्रासादाचे भग्नावशेष, गयेजवळील नागार्जुन व बराबर येथील शैलगुंफा इ. वास्तूंचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. बौद्ध संस्कृतीच्या पूर्वखंडात म्हणजे हीनयान काळात (इ. स. पू. ५०० ते इ. स. १००) बौद्ध वास्तुशिल्पज्ञांनी वैदिक काष्ठरचनाप्रणालीचे अश्म माध्यमात तंतोतंत अनुकरण केले. लोमश

दिलवाडा येथील एका मंदिराचा अंतर्भाग, अबू.

ॠषीच्या गुहेची आद्य कमानरचना इ. स. पू. २५० च्या सुमारास बांधली गली. त्यानंतर भाजे येथे (इ. स. पू. १५०) व अजिंठा येथे (इ. पू. सु. ५००) कमान या वास्तुप्रकारची प्रगत रूपे पहावयास मिळतात. सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत  (इ. स. पू. सु.२७३- इ. स. पू. सु. २३२) बौद्ध वास्तुशैली अनेक अंगानी विकसित झाली. पाषाणावर धर्मोपदेश कोरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अश्म माध्यमातील शिल्पतंत्रावर प्रभुत्व संपादन केलेला कारागीर-वर्ग निर्माण झाला. या शिलालेखाचे संस्कार पुढील वास्तुकलेच्या प्रगतीतही दिसून येतात. या काळात स्तूप रचनेस प्रारंभ झाला. तसेच एकाश्म स्तंभरचनाही उत्क्रांत झाली. देवदेवतांच्या धार्मिक पूजाविधींसाठी लागणारी उपकरणे अश्म माध्यमात निर्माण केली जाऊ लागली. त्यामुळे पाषाणशिल्पांमध्ये सूक्ष्म रचनात्मक अलंकरण शैली विकसित झाली. लेणी, गुहा यांसारख्या शैली वास्तुकलेस प्रोत्साहन मिळाले व त्यातून एक अभिनव स्थापत्यतंत्र विकसित झाले. बौद्ध धर्मीयांच्या ⇨स्तूप या पवित्र स्मारकवास्तूस मौर्यकाळात एक वास्तुप्रकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. स्तूपाखेरीज या काळात विटा व लाकूड यांनी बांधलेल्या प्राथमिक मंदिररचनाही अस्तित्वात आल्या. मौर्य साम्राज्याच्या अस्तापासून (इ. स. पू. दुसरे शतक) ते गुप्त साम्राज्याच्या उदयकाळापर्यंत (इ. स. चौथे शतक) स्तूपांखेरीज अन्य अवशेष फारसे अस्तित्वात नाहीत. ⇨ भारहूत, ⇨सांची, ⇨अमरावती येथील स्तूप प्रगत वास्तुशैलीचे निदर्शक आहेत. प्रमाणबद्ध, शिल्पालंकृत तोरणरचना ह्या वास्तूंमध्ये अत्यंत विकसित स्वरूपात पाहावयास मिळते. गुप्तकाळात स्तूपरचनेस सर्वंकष सधन भव्यता व आकारासौष्ठव एकरूपतेने देण्याचे प्रयत्न झाले. ⇨चैत्यगृह हा शैल वास्तुप्रकारही याच काळात विकसित झाला. कार्ले, भाजे येथे चैत्यगृह प्रथम खोदली गेली व पुढे वेडसे, कोंडाणा, पितळखोरा, अजिंठा, नासिक इ.

मीनाक्षी मंदिर, मदुराई.

ठिकाणी त्याच रचनातत्त्वावर निर्माण केली गेली. ⇨विहार म्हणजे डोंगरात खोदलेले मठ किंवा आश्रम. या शैली वास्तुप्रकाराचा विकासही गुप्तकाळातच झाला. पितळखोरा येथील अनेकमजली भव्य बिहार तसेच ओरिसातील उदयगिरी आणि खंडगिरी येथील विहार इ. ह्या प्रकारातील काही वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना होत. बौद्ध शैलीत भारहूत, सांची, अमरावती, मथुरा येथील खोदीव शिल्पांच्या अलंकरणात अनेकदा सूक्ष्मपणे वास्तुचित्रण केलेले आढळते. त्यामुळे या शिल्पांतून तत्कालीन भारतीय वास्तुकलेचे सम्यक दर्शन त्यातील सूक्ष्म प्रतिमांद्वारा घडू शकते. [→ बौद्ध कला].

हिंदू वास्तुकलेचा आद्य आविष्कार गुप्तकाळामध्ये (इ. स. चवथे ते सहावे शतक) पाहावयास मिळतो. या काळात हिंदू देवदेवतांची मंदिरे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली. मंदिर-वास्तुकल्पाचा विविधांगी विकासही याच काळात घडून आला. भितरगाव येथील विटांनी बांधलेले मंदिर व देवगढ येथील दगडी दशावतारी विष्णुमंदिर ही या काळातील मंदिर-स्थापत्याची उल्लेखनीय उदाहरणे होत. बोधगया येथील महाबोधी मंदिरात समृद्ध शिल्पालंकरण दिसून येते. या काळात मंदिराबरोबर स्तूपरचनाही प्रगत होत गेली. उदा ⇨सारनाथ येथील स्तूप. हिंदू स्थापत्यशैलीचा पुढचा प्रगत टप्पा सु. ७०० ते १६५० या काळात दिसून येतो. गुप्तकाळात उगम पावलेल्या मंदिर-वास्तुशैलींचा या काळात झपाट्याने विकास झाला. कालौघात निर्माण झालेल्या विविध स्थापत्यशैलींचे स्थूलमानाने, प्राचीन संस्कृत ग्रंथांतील वर्णनांनुसार ‘नागर’ (उत्तर भारतीय), ‘द्राविड’ (दक्षिण भारतीय) व ‘वेसर’ (मध्य भारतीय चालुक्य शैली) असे वर्गीकरण करता येईल. उत्तर भारतीय अथवा नागर मंदिरशैलीचा शिखर हा सर्वांत महत्त्वाचा वास्तुघटक होय. ओरिसामधील ⇨भुवनेश्वर येथे सु. ६०७ ते १२०० या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वास्तुनिर्मिती झाली. भुवनेश्वर व त्याच्या आसपास लहानमोठी सु. शंभर-सव्वाशे मंदिरे तरी उत्तम स्थितीत अस्तित्वात आहेत. त्यावरून हे मंदिरांचेच नगर म्हणता येईल. लिंगराज मंदिर (दहावे शतक) व ⇨कोनारक येथील सूर्यमंदिर (सु. १२३८-६४) ह्या ओरिसामधील आणखी दोन उत्कृष्ट मंदिरवास्तु होत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, बुंदेलखंड, डहाळा (जबलपूर), बर्वसागर, माळवा इ. ठिकाणी मंदिरवास्तुशैलींचे संमिश्र आविष्कार पाहावयास मिळतात. नागर वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ⇨खजुराहो येथील मंदिरसमूहाचा, विशेषत्वाने कंदरिया महादेव मंदिराचा उल्लेख करता येईल. कामशिल्पांसाठीही खजुराहो प्रसिद्ध आहे. जैन वास्तुशैली ही बव्हंशी हिंदू शैलीशी मिळतीजुळती असून तिचे उत्कृष्ट आविष्कार सातव्या शतकाच्या अखेरीस पाहावयास मिळतात. राजस्थानातच उत्तर भारतीय मंदिरशैली आठव्या शतकानंतर ठळकपणे प्रकट होऊ लागली. त्यांचा सर्वोत्तम आविष्कार अबू पर्वतातील ⇨दिलवाडा येथील जैन मंदिरसमूहामध्ये दिसतो. या मंदिरांच्या छतावरील शिल्पकाम अत्यंत कलात्मक व सौंदर्यपूर्ण आहे. या मंदिरांपैकी विमल-वसही व लूणवसही ही मंदिरे रचनासौष्ठव, अलंकरण व समृद्ध शिल्पांकन या दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुजरातमधील गिरनार आणि पालिताणा येथील शत्रुंजय टेकड्यांवरील जैन मंदिरसमूहांना त्यांच्या भौगोलिक उंचीमुळे एक आगळेच भव्य परिमाण लाभले आहे.


ताजमहाल, आग्रा.

कर्नाटकामध्ये उत्तरेकडील नागर व दक्षिणेकडील द्राविड या दोन्ही वास्तुशैली विकसित अवस्थेत पाहावयास मिळतात. त्यांच्या संगमातून चालुक्य वंशाच्या काळात चालुक्य वास्तुशैली उदयास आली. पट्टदकल, ऐहोळे, बादामी इ. ठिकाणच्या मंदिरवास्तू या दृष्टीने अभ्यसनीय आहेत. दक्षिण भारतीय वा द्राविड शैली तमिळनाडूमध्ये उगम पावली व पुढे ती उत्तरेकडे, विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्रसृत झाली. ⇨वेरूळचे कैलास मंदिर हे या शैलीचे उत्कृष्ट उदाहरण होय. [→ कैलास लेणे]. पल्लव वंशाच्या काळात (६५०-८९३) तमिळनाडूमध्ये या वास्तुशैलीची जडणघडण प्रामुख्याने सुरू झाली. सुरुवातीच्या रचना एकाश्मातून खोदून केल्या जात. उदा., महाबलिपुर येथील धर्मराजाचा रथ हे तीमजली एकसंध पाषाणशिल्प. कांचीपुरम्‌च्या कैलासनाथ मंदिरामध्ये ⇨गोपूर या वास्तुघटकाचे पहिले अस्तित्व नजरेत भरते. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मंदिराच्या प्रवेशद्वावरील गोपुररचना विशेषत्वाने विकसित होत गेली. श्रीरंगम् येथील रंगनाथ हे भव्य मंदिर अनेक गोपुरांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिर हेही भव्य वास्तुकल्पाच्या द्दष्टीने उल्लेखनीय ठरते. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिरामध्ये द्राविड रचनातत्त्वांचा परिणत आविष्कार पाहावयास मिळतो. बाराव्या शतकात या प्रदेशातील काही उत्कृष्ट वास्तुशिल्पे निर्माण झाली. उदा., उत्तगीचे महादेव मंदिर, होयसळ राजवटीत हळेबीड येथे बांधलेले होयसळेश्वर मंदिर, बेलूरचे चेन्नकेशव मंदिर (१११७), अमृतपूरचे अमृतेश्वर मंदिर (११९६), सोमनाथपूरचे केशव मंदिर (१२६८) या मंदिरवास्तूमधील शिल्पे ही उत्कृष्ट कारागिरीची द्योतक आहेत.

गांधीभवन.चंदीगढ.

भारतामध्ये साधारणपणे बाराव्या शतकापासून इस्लामी वास्तुशैलीच्या धर्तीवर इमारती बांधल्या जाऊ लागल्या. दिल्लीचा परिसर हेच त्याचे प्रामुख्याने काही काळ केंद्र होते. ‘कुव्वतुल इस्लाम’ ही ११९६ मध्ये उभारलेली मशीद आद्य नमुना म्हणून उल्लेखनीय आहे. या मशिदीबाहेरच जगप्रसिद्ध ⇨कुतुबमीनार हा ७२·५६ मी. उंच मनोरा आहे. १४ व्या शतकात फिरोझशाह तुघलकाने मशिदी, राजप्रसाद वगैरे वास्तू विपुल प्रमाणात बांधल्या, पण त्या आज केवळ भग्नावस्थेत अवशिष्ट आहेत. उत्तरकाळात विजापूर येथील गोलघुमट, इब्राहीम रोझा, अहमदाबाद व गुलबर्गा येथील जामा मशिदी इ. वास्तूंमध्ये इस्लामी शैलीचा उत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो. मोगल काळात हिंदू-मोगल ही नवी संमिश्र वास्तुशैली उदयास आली. या काळात हिंदू राज्यकर्त्यांनीही खास भारतीय धर्तीची वास्तुनिर्मिती केली. उदा., मानसिंह तोमर याने ग्वाल्हेर येथे उभारलेला मानमंदिर राजवाडा (सु. १५०७). हिंदू-मोगल शैली हुमायून बादशहाने अस्तित्वात आणली व ती पुढे विलक्षण वेगाने विकसित होत गेली. लाल वालुकाश्म व संगमरवर हे वास्तुसाहित्य या काळात विशेषत्वाने प्रचलित होते. हुमायूनची कबर ही त्यातील महत्त्वपूर्ण वास्तू. नंतर अकबराने आग्रा किल्ला व ⇨फतेपुर सीक्री हे नवे शहर वसवले. येथील बुलंद दरवाजा, जामी मशीद ही इस्लामी वास्तुशैलीची उत्कृष्ट उदाहरणे होत. तसेच पंचमहाल, दिवाण-इ-आम, जोधाबाईचा महाल इ. शैलीदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू येथे आहेत. जहांगीरने आग्रा येथे बांधलेली इतमाद उद्दौला कबर इराणी वास्तु-अलंकरणाचा कलात्मक आविष्कार मानला जातो. मोगल वास्तुशैलीचा परमोत्कर्ष शाहजहानच्या कारकीर्दीत दिसून येतो. दिल्लीचा लाल किल्ला, आग्रा येथील ⇨ ताजमहल, जामी मशीद, मोती मशीद वगैरे अप्रतिम वास्तू या काळात निर्माण झाल्या. त्यांपैकी ताजमहाल हे अनेक दृष्टिकोनांतून अभ्यसनीय असे एक कलासंपन्न व सौंदर्यपूर्ण वास्तुशिल्प आहे. औरंगजेबाच्या राजवटीपासून मोगल शैली अस्तंगत होत गेली. त्याने औरंगाबाद येथे ‘बीबीका मकबरा’ ही ताजमहलची दुय्यम प्रतिकृती, तसेच दिल्ली येथे मोती मशीद, सफदरजंग कबर इ. वास्तूही उभारल्या. सु. १७५४ नंतर मोगल शैली लोप पावली.

भारतात स्थूलमानाने १८०० ते १९४७ या काळात ब्रिटिश अर्वाचीन वास्तुशैली प्रसृत झालेली दिसते. साधारण सोळाव्या शतकापासूनच पाश्चात्य वास्तुशैलीचे प्रतिध्वनी भारताच्या भूमीवर उमटू लागले. गोवा येथे पोर्तुगीजांनी उभारलेल्या अनेकविध वास्तूंचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. नंतर ब्रिटिश साम्राज्यकाळात यूरोपातील आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण झाल्या. प्रबोधनकालीन तसेच गॉथिक, बरोक इ. कालखंडातील वास्तुशैलींचे आविष्कार भारतातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास इ. मोठ्या शहरांतून पाहावयास मिळतात.

प्रत्यक्षात आधुनिक वास्तुशैली भारतात अवतीर्ण होण्यास १९३० चे दशक उजाडावे लागले. तत्कालीन भारत सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दादर, माटुंगा इ. भागांत भारतातील पहिल्यावहिल्या आधुनिक शैलीच्या वास्तू उभ्या केल्या. त्यायोगे प्रमुख वास्तुसाहित्य म्हणून सलोह काँक्रीट वापरले की इमारत आधुनिक शैलीची झाली, असा एक संकेतच रूढ झाला. परंतू आधुनिक शैलीच्या सघन कलाविष्काराची नवी प्रतीती केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशीय लोकांनाही आली ती १९५० च्या सुमारास झालेल्या ⇨ चंडीगढच्या नगररचनेमुळे. पं. नेहरूंच्या प्रेरणेमुळे विश्वविख्यात फ्रेंच वास्तुतज्ञ व नगररचनाकार ल कॉर्ब्यूझ्ये यांनी चंडीगढ शहराच्या निर्मितीद्वारे विसाव्या शतकातील वास्तुशैलीचे चिरकाळ अभ्यसनीय वाटणारे एक शिल्प उभे केले. या रचनेतही सलोह काँक्रीट हेच प्रमुख वास्तुसाहित्य आहे. अवकाश व आकाशरचना यांची कलात्मक सांगड त्याच्याशी संलग्न अशा स्थानिक हवामान, अंतर्गत अभिसरण, अंतर्बाह्य प्रमाणभूतता, रंगसंगती, भु-रचना इ. घटकांशी घालताना ल कॉर्ब्यूझ्येने संपूर्ण शहराच्या गुणविशेषांना, एकात्मतेला कुठेही बाध येऊ दिला नाही. भारतीय भूमीवर झालेली ही नगररचना म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात वास्तुकलेच्या क्षेत्रात घडलेली सर्वांत महत्त्वाची घटना मानावी लागेल. कारण व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेकविध विभिन्न पातळ्यांवर चंडीगढच्या निर्मीतीचा सखोल परिणाम झाला. वास्तुकलेच्या व्यावसायिक क्षेत्रात त्याचा प्रभाव सर्वत्र पडलेला दिसून येऊ लागला. चंडीगढच्या वास्तूंतील किरणभेदकांच्या रचनेचे सर्वत्र अनुकरण होऊ लागले. तीच गोष्ट इतरही सुक्ष्म वास्तुरचनाघटकांविषयी प्रतिपादन करता येईल. हा अनुकरणात्मक प्रभाव केवळ भारतीय वास्तुतज्ञांपुरताच मर्यादित नव्हता, तर जगभरच्या वास्तुतज्ञांवरही तो पडला. शैक्षणिक क्षेत्रावर जाणवणारा आद्य प्रभाव म्हणजे वास्तुकलेच्या शिक्षणसंस्थांची झपाट्याने वाढ झाली. या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ व विद्यार्थी यांना चंडीगढ शहराच्या भेटीने आधुनिक वास्तुसंकल्पनेच्या नव्या जाणिवा दृग्गोचर झाल्या. चंडीगढ नगररचनेमुळे सामाजिक क्षेत्रातही वास्तुविषयक रूढ कल्पना व संकेतांना वेगळे वळण मिळाले. त्यामुळे सामान्यजन वास्तुसंदर्भात अधिक संवेदनक्षम, कलाभिमुख होण्यास साहाय्य झाले. भारतीय वास्तुतज्ञांमध्ये वास्तु-आकारातील घनतासौष्ठवाची नवी जाण निर्माण करून देण्यास चंडीगढच प्रेरक ठरले. त्यानंतरच्या कालखंडात पाश्चात्य जगात निर्माण झालेल्या वास्तुशैलींचे अनुकरण भारतात झालेच. परंतु आधुनिक वास्तुकला या मुलभूत शैलीची ती वास्तुसाहित्य, रचनातंत्र इत्यादींद्वारे निर्माण झालेली नवनवी रूपे आहेत. त्यात वास्तूचा बाह्यभाग मढविण्यासाठी प्लॅस्टिक व काचेचे विभिन्न प्रकार उपयोगात आणणे, तसेच वास्तुघटकांची रचना पूर्वरचित (प्री फॅब्रिकेटेड) घटकांचा वापर करून करणे, सलोह काँक्रीटने शिंपलाकृती छताकार उभारणे वगैरे आधुनिक तंत्रे वापरून देशभर नवनव्या वास्तू उभारण्यात आल्या.


स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील बहुसंख्य वास्तुनिर्मिती रूढ मार्गाने झालेली असली, तरी चंडीगढप्रमाणेच नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई वगैरे प्रमुख शहरांमध्ये आधुनिक वळणाची कलासंपन्न वास्तुनिर्मिती झालेली निदर्शनास येते. या वास्तूंमध्ये वास्तुशिल्पज्ञाची तरल कल्पकता दिसून येते. तद्वतच येथील नागरी समाजामध्ये वास्तुगुणांची जाण, नव्या वास्तुरचनांना आश्रय देण्याची क्षमता आणि रसिकता दिसून येते.

नवी दिल्ली येथील ‘अमेरिकन एम्बसी’ची वास्तूही १९५९ मध्ये श्रेष्ठ अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ एडवर्ड स्टोन यांनी उभारली. स्थानिक हवामानाच्या समस्यांना समर्थपणे तोंड देणारी एक कल्पकतापूर्ण यशस्वी वास्तुरचना म्हणून ती खास उल्लेखनीय आहे. अवकाशरचनेत सर्वत्र जाळ्यांची रचना करून त्यांद्वारे हवेतील तपमान व आर्द्रता विवक्षित पातळीवर राखण्यात या वास्तुशिल्पज्ञाने यश संपादल्याचे दिसून येते. प्राचीन भारतीय वास्तुकलेतील काही तंत्रांनी प्रभावित होऊनच स्टोन यांनी त्या तंत्राचे आधुनिकतेत रूपांतर केले. पुढे १९६२ साली अहमदाबाद येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या वास्तुसमूहाची रचना आणखी एक ख्यातनाम अमेरिकन वास्तुशिल्पज्ञ लूइस कान यांनी केली. या वास्तुरचनेमध्ये स्थानिक वास्तुसाहित्याचा उपयोग सातत्याने भौमितिक आकृतिबंधामध्ये करून सौंदर्यनिर्मिती साधली आहे. चंडीगढप्रमाणेच या दोन्ही विदेशी वास्तुशिल्पज्ञांच्या वास्तुरचनांचा सखोल प्रभाव देशातील वास्तुकारांच्या तरुण पिढीवर पडल्याचे दिसून येते. इतरत्रही देशभर आधुनिक कलात्मक वास्तू विखुरलेल्या आहेत. परंतु त्यांचे प्रमाण नगण्य, अत्यल्प आहे. सर्वत्र साचेबंद वास्तुकल्प व घटकजुळणी असणाऱ्या इमारतीच नजरेस पडतात. कारण वास्तुकला हा नवनवोन्मेषशाली कल्पना दाखवण्याचा व्यवसाय आहे. हे भान धंदेवाईक वास्तुतज्ञांना राहत नाही.

आज भारतातील आधुनिक श्रेष्ठ वास्तुशिल्पज्ञांमध्ये चार्ल्स कोरिया, फिरोझ कुडीयनवाला, रूस्तम पटेल व उत्तम जैन (मुंबई) जसबीर सचदेव, कुलदीप सिंग, अच्युत कानविंदे (नवी दिल्ली) बाळकृष्ण दोशी, हसमुख पटेल (अहमदाबाद) इ. प्रतिभाशाली वास्तुतज्ञांचा उल्लेख करावा लागेल. नवव्या आशियाई क्रीडास्पर्धाच्या आयोजनामुळे १९८२ साली नवी दिल्ली येथे विविध प्रकारची अत्याधुनिक क्रीडागृहे (स्टेडियम्स) बांधली गेली. आधुनिक भारतीय वास्तुकलेचा संपन्न आविष्कार यामध्ये दिसून येतो. वास्तुक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ ही संस्था १९१७ साली स्थापन झाली. ही संस्था विविध व्यावसायिक समस्या शासकीय पातळीवर नेऊन सोडविण्याचे कार्य करते त्याचप्रमाणे वास्तुकलेच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, व्यवसायाचा उच्च दर्जा जतन करणे वगैरे कार्येही प्रस्तुत संस्थेमार्फत केली जातात. तिचे आजमितीस सु. साडेतीन हजार सभासद आहेत. याखेरीज वास्तुसाहित्यविषयक संशोधनकार्य करणारी ‘नॅशनल बिल्डिंग ऑर्गनायझेशन’, शैक्षणिक दर्जाचे नियंत्रण करणारी ‘ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज फॉर आर्किटेक्चर अँड अलाइड कोर्सेस’ वगैरे संस्था राष्ट्रीय पातळीवर आहेत. तर ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन्स’ ही राज्य पातळीवरील संस्था पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेते. भारतातील वास्तुकलेचे शिक्षण पुस्तकी ज्ञानावर भर देणारे आहे, अशी टीका तज्ञांकडून केली जाते. व्यावहारिक तसेच लोकजीवनाच्या संदर्भांतील अडीअडचणींचा अभ्यास त्यामुळे इथल्या वास्तुतज्ञास कल्पकतेने करणे अशक्य होते, असेही म्हटले जाते. एक वास्तुतज्ञ निर्माण करण्यासाठी शासन तीस हजार रुपये खर्च करते व पदवीधरांपैकी चाळीस टक्के वास्तुतज्ञ विदेशी जातात, असेही काही निष्कर्ष आहेत.

भारतात पाच किंवा सहा वर्षांचे वास्तुशास्त्रविषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या सु. वीस संस्था आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर पदवी किंवा पदविका वास्तुविशारद विद्यार्थ्यांना दिल्या जातात.

भारतातील वास्तुकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे होत : मुंबई, बडोदे, दिल्ली येथील विद्यापीठांमध्ये वास्तुकलाविषयक पदवी व पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच रूडकी, कलकत्ता, नागपूर, मद्रास विद्यापीठे पंजाब विद्यापीठ (चंदीगड) खरगपूर येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थांतून पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. पदविका अभ्यासक्रम बऱ्याच ठिकाणी आहेत. उदा., हैदराबाद व अहमदाबाद येथील महाविद्यालये मुंबईमधील ‘अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ व ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’ पुण्यामधील ‘अभिनव कला विद्यालय’ व कोल्हापूर येथील ‘स्कूल ऑफ आर्ट’ भोपाळ येथील ‘एम्. ए. कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ लखनौ येथील ‘शासकीय कला विद्यालय’ श्रीनगरचे ‘इंजिनियरिंग कॉलेज’ आग्रा येथील ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ इत्यादी. मुंबई येथील ‘आर्किटेक्चरल ट्रेनिंग सेंटर’ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सोय आहे. [→ भारतीय वास्तुकला ].

दीक्षित, विजय

संदर्भ :

1. Acharya, P. K. Indian Architecture According to Manasara, Oxford, 1921.

2. Agrawala, V. S. The Heritage of Indian Art, Delhi, 1964.

3. Ambrose, K. Ram Gopal, Classical Dances and Costumes of India, London, 1951.

4. Anand, Mulk Raj, The Hindu View of Art, London, 1933.

5. Archer, W. G. India and Modern Art, London, 1959.

6. Bhavnani, Enakshi, The Dance In India, Bombay, 1965.

7. Brown, Percy, Indian Painting, Calcutta, 1927.

8. Bussagli, Mario Sivaramamurti, Calcmbus, 5000 Years of the Art of India, Bombay, 1972.

9. Cholamandal Artists’ Village, Indian Art Since the Early 40’s, Madras, 1974.

10. Coomaraswamy, Anand, History of Indian and Indonesian Art, New York, 1965.

11. Deshpandc, Vamanrao, Indian Musical Traditions, Bombay, 1973.

12. Fergusson, J. History of Indian and Eastern Architecture, 2 Vols., Delhi, 1967.

13. Gopinath Rao, T. A. The Elements of Hindu Iconography, 2 Vols., Delhi, 1968.

14. Gosvami, O. The Story of Indian Music, Bombay, 1961.

15. Goswami, A. Ed. Indian Terracotta Art, Calcutta, 1959.

16. Halladc, Madeleine Trans. Imber, Diana, The Gandhara Style and the Evolution of Buddhist Art, London, 1968.

17. Havell, E. B. Ideals of Indian Art, London, 1911.

18. Khandalwala, Karl, Paharl Miniature Painting, Bombay, 1958.

19. Kramrisch, Stella, The Art of India, London, 1954.

20. Kramrisch, Stella, The Hindu Temple, 2 Vols., Delhi, 1980.

21. Marg Publications, Classical and Folk Dances of India, Bombay, 1963.

22. Marg Publications, The Performing Arts, Bombay, 1982.

23. Nandikeswara Trans. Coomaraswamy, A. K. Duggirala, G. K. The Mirror of Gesture, New York, 1936.

24. Ragini Devi, Dance Dialects of India, Bombay, 1972.

25. Ramachandra Rao, P. R. Contemporary Indian Art, Hyderabad, 1969

26. Randhawa, M. S. Galbraith, J. K. Indian Painting, Bombay, 1982.

27. Rawson, Philip, Indian Painting, New York, 1961.

28. Rowland, Benjamin, The Art and Architecture of India, London, 1953.

29. Sivaramamurti, C. Chitrasutra of the Vishnudharmottara, New Delhi, 1978.

30. Sivaramamurti, C. Nataraja in Art, Thought and Literature, New Delhi, 1974.

31. Sivaramamurti, C. The Painter In Ancient India, New Delhi, 1978.

32. Yazdani, G. Ajanta, 4 Vols., London, 1930-55.

33. Zimmer, H. The Art of Indian Asia, 2 Vols., New York, 1960.

३४. आचरेकर, वा. गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.

३५. पाटकर, रमेशचंद्र नारायण, कलेचा इतिहास : भारतीय व पाश्चात्य , मुंबई, १९७३.

३६. मराठे, रा. वि. इंग्रजी –मराठी स्थापत्य –शिल्पकोश, मुंबई, १९६५.

३७. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, १९७४.

३८. वझे, कृष्णाजी विनायक, हिंदी शिल्पशास्त्र, पुणे, १९२८.